8/23/26

इतिहासाच्या गल्ल्यांमधून: गोव्याचा लपलेला इतिहास आणि 'म्युझियम ऑफ गोवा'

इतिहास वाचन माझा लहानपणापासून चा  छंद आहे. अर्थातच या ब्लॉगच्या वाचकांना याची पूर्ण कल्पना आहे. इतिहासावर लिहायला बरेच असते पण त्याची सुसंगत मांडणी आणि काहीतरी नवीन शिकायला मिळावे म्हणून खुपदा एखादे पुस्तक वाचून होई पर्यंत वाट बघतो आणि त्या नंतरही खुपदा लिहिणे होत नाही. तेवढ्यात काहीतरी नविन विषय सुचतो, गोष्ट सुचते किंवा नेमके काय लिहायचे आहे हा भाग हाताबाहेर जातो. जसे मी मागे ‘चंद्रप्रकाशी लेखन’ हि मालिका सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्या अंतर्गत आता दोन लेख अपुरे लिहून धूळ खात पडले आहेत. असो. विचार केला कि मोठ्ठा ब्लॉग लिहिण्याच्या नेहमी मागे न लागता आलेला विचार लगेच मांडून टाकायचा हे ठरवले. यातून काही निष्पन्न होईलच असे नाही पण वाचकांना नवीन माहिती नक्कीच मिळेल.

एक-दीड वर्षापूर्वी गोव्याला गेलो तर चार दिवस धो-धो पाऊसच होता. समुद्राचे दुरूनच दर्शन घेतले आणि कार असल्यामुळे ज्याला टूरिस्ट भाग म्हणू शकतो तिथे न जाता इतर गोव्याचे दर्शन झाले. दोन पडीक किल्ले बघितले आणि सगळ्यात मुख्य म्हणजे  Museum of Goa या संग्रहालयाला भेट देता आली. गोव्याला आलेल्या प्रत्येकाने या संग्रहालयाला भेट नक्कीच द्यावी इतके सुंदर, आणि सुस्वरूप वास्तू आहे. शिकायला हि भरपूर आहे. हे संग्रहालयाचे तीन मजले चित्रे, तैलचित्रे, शिल्पकला, नवीन कला-अविष्कार यांनी गच्च भरले आहे. यातील एका वैशिष्ट्य पूर्ण कला आविष्काराचा आधार घेत आपण गोवा आणि पोर्तुगीजांचा भारतातील इतिहास थोडक्यात समजून घेऊ या.

भारतावर गेल्या हजार वर्षात परकीय आक्रमणे खूप झाली. आधी मुसलमान आलेत आणि मग गोव्याहून ख्रिश्चन आलेत. खरे तर ख्रिश्चन त्याहूनही आधी केरळ राज्यात आले होते पण जरी ते ख्रिस्ती धर्माचे अनुयायी असले तरी त्यांनी केरळ च्या मातीचा रंग आत्मसात केला. वास्को द गामा पोर्तुगालहून जो आधी केरळ आणि मग पुढे गोव्याला आलायाचा ख्रिस्ती धर्म वेगळा मानायला हवा. तो आक्रमक आणि हिंसक होता. त्याने आणि त्याच्या अनुयायांनी हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार केलेत. उदाहरणार्थ, गामा केरळ मध्ये पोचला, कोचीन ला, तर त्याने तिथल्या राजाची भेट घेतली. रस्त्याने जातांना त्याने कृष्ण मंदिर बघितले आणि तेथील देवकी-कृष्णाच्या मुर्त्या म्हणा कि चित्रे म्हणा, ते बघून त्याला वाटले कि केरळ मध्ये सुद्धा जीझस ख्रिस्ताची ची पूजा करतात. तो खुश झाला. पुढे त्याचा भ्रमनिरास झाला कि इथे तर कोणीच ख्रिश्चन नाहीत आणि त्याने आग्रह केला तरी कोणी ख्रिश्चन व्हायला पण तयार होईना. कोचीन च्या राजाची भेट फारशी फायद्याची ठरली नाही. म्हणून मग त्याने काही हिंदू लोकांना बंदी करून आपल्या जहाजात नेले. काहींचा शिरच्छेद केला, काहींना जाळले आणि काहींना शिडावर टांगले - धनुष्य-बाणाचा सराव करायला. पुढे त्याने कोचीन वर गोळाबाजी पण केली आणि मग तिथून निसटून गेला. कोचीनला भारतीय नौदलाचे संग्रहालय आहे. (याला पण अवश्य भेट द्यावी) त्यात पुरातन कालापासुनच्या भारतीय सागरी आरमाराचा इतिहास आहे. यात शिवाजी महाराजांच्या आरामाराबद्दलसुद्धा छान माहिती आहे. त्या संग्रहालयात स्पष्ट लिहिले आहे कि पोर्तुगीज किंवा इतर पश्चिमी युरोपीय सागरी सत्ता (त्यांना चाचे म्हणायला हवे) या प्रामुख्याने व्यापार आणि  ख्रिश्चन धर्माचा प्रसार या साठी भारतात आले. मला असली माहिती अपेक्षित नव्हती. माहिती खरी आहे, पण आपल्या देशात परधार्मियांनी हिंदुंवर केलेल्या अत्याचारांबद्दल बोललेले चालत नाही. जणू काही असे कधी घडलेच नाही. इतिहासाची माहिती त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून असावी. आणि इतिहासाची माहिती असण्याने वैमनस्य वाढेल हे एक धादांत खोटे आहे. केरळ मध्ये हिंदू-ख्रिश्चन दंगे कधी झाले नाहीत.

गोव्याची परिस्थिती केरळ पेक्षा फारच भिन्न झाले. कारण केरळ मध्ये पोर्तुगीजांना पाय रोवता आले नाही. गोवा मात्र पोर्तुगीजांनी जिंकले. गोव्याची जनता आदिशाही मुसलमानी सत्तेमुळे बेजार झाली होती. आदिलशाही सत्तेला शह द्यायला तीमोजी नावाच्या एका हिंदू सरदाराने पोर्तुगीजांना मदत केली. हा तिमोजी आधी विजयनगर राज्याचा सरदार होता. त्याला वाटले कि पोर्तुगीजांच्या मदतीने आदिलशहाला हरवून, गोवा पुन्हा स्वतंत्र किंवा विजयनगर साम्राज्यात नेता येईल. अर्थात, पोर्तुगिजांचा सरदार – अल-बुकर्की याचे वेगळे मनसुबे होते. आणि इतिहासला त्यामुळे वेगळी कलाटणी मिळाली.


(Museum of Goa धील पोर्तुगीज सरदार अल-बुकर्की याने गोवा जिंकून सत्ता प्रस्थापित करण्याच्या क्षणाचे रेखाटलेले दोन मजली उंच चित्र. फोटो मीच काढला आहे.) 

(लेखकाने काढलेला फोटो)

मुसलमानी अत्याचार थांबलेत पण त्या ऐवजी ख्रीस्तींचे अत्याचार सुरु झालेत. गोव्यातील हिंदू समाज आगीतून फोफाट्यात पडला. हिंदू लोकांना जुलुमाने ख्रिस्ती करणे, हिंदू पोरांना पळवून नेणे, देवळे पाडणे, नवीन देवळे बांधायला परवानगी न देणे, किंवा देवळांची डागडुजी करू न देणे, हिंदू पोरांना आणि बायकांना गुलाम म्हणून अरब देशांना विकणे इत्यादी कामे पोर्तुगीजांनी सुरु केलीत. पोर्तुगिजांचा हल्ला होत असेल तर कोळी समाजाचे नावाडी देवळातील देवांना पळवून होड्यांमध्ये घालून समुद्रात नेत. देवाने जनतेला पोर्तुगीजान पासून वाचाविण्या ऐवजी, जनताच देवांना वाचवीत होती. हा इतिहास दर्शविण्यासाठी, संग्रहालयात एक मोठ्ठी होडी आहे आणि ती होडी लाटांवर डूगडूगावी तशी हलते. (होडी ला  इलेक्ट्रिक मोटार ने तशी गती दिली आहे.). त्या होडीत देव ठेवले आहे. 






(लेखकाने काढलेला फोटो)

कुठल्याही दार्शनिक कलेचे वैशिष्ट्य असे कि हजारो शब्द लिहून किंवा शेकडो शब्द बोलून जे समजवता येणार नाही ते एखाद्या चित्रातून, शिल्पकलेतून चटकन बघणाऱ्याच्या थेट मनात भिनते. हे डूगडूगणाऱ्या होडीने माझ्या हृदयात खड्डा केला. केवढी केविलवाणी परिस्थिती आणि आपला समाज, मान, चालीरीती, इतिहास, आपला धर्म, आपली ओळख आणि स्वत्व वाचवायला केवढी धडपड, कष्ट आणि त्यासाठी केवढी  आबाळ.    

पोर्तुगीजांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे खूप कष्टदायी ठरले. कितीही जुलूम केलेत तरी हिंदू जुमानेना. सांप्रत काळात असे सांगितल्या जाते कि शूद्र समाज किंवा चौथ्या वर्णातील समाज ख्रिस्ती झाला. हे धादांत खोटे आहे. धर्माची सेवा आणि त्याचे रक्षण समाजाच्या सगळ्या घटकांनी केले. आणि धर्मांतर सुद्धा समाजातील सगळ्यात घटकातील लोकांचे झाले. सरकारी नोकरी हवी असेल किंवा वारसा हक्क पुढे चालू ठेवायचा असेल तर पोर्तुगीज धर्मांतर करवीत. अनाथ हिंदू मुला-मुलींना जबरदस्ती पळवून त्यांचे धर्मांतर करीत, किंबहुना त्या साठी पोर्तुगीजांनी कायदाच काढला. 


(लेखकाने काढलेला फोटो)


(लेखकाने काढलेला फोटो)

त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांचे सुद्धा धर्मांतर केले. पण धर्मांतरित ब्राह्मणांनी एक प्रश्न उभा केला.  आमची जानवी आम्ही कशी सोडणार? आणि अब्राह्मण समाजात कसे वावरणार? (धर्म बुडतोय आणि यांना जानव्याची पडली होती.) पोर्तुगीजांनी हे गाऱ्हाणे पोप समोर मांडले. पोप ने युक्ती काढली कि धर्मांतरित ब्राह्मण जानवी घालु शकतात. पण हि जानवी गोव्याच्या ख्रिस्ती पाद्री कडून पवित्र करून घ्यायला हवीत. वाह रे वाह! काय म्हणायचे यावर? एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इतिहास एका रंगाचा नाही आणि नसतो. रंग आणि अंतरंग दोन्ही समजून घ्यायला हवेत.  


(लेखकाने काढलेला फोटो) 

पुढील शंभर-दीडशे पोर्तुगीज सत्तेची पाळेमुळे गोव्यात खोल जाऊ लागली. आदिलशहाने गोव्यावर दोन-तीनदा मोठ-मोठी आक्रमणे केली. थोडा भाग पुन्हा जिंकला पण पोर्तुगीज पण भयंकर चिवट होते. त्याने ती आक्रमणे परतावून लावलीत आणि गोव्याबाहेर हात-पाय पसरवायला लागलेत. पण देवाच्या दयेने पोर्तुगीजांना बांध घालायला जणू मराठे अवतरलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी पोर्तुगीजांसोबत व्यापारही केला, त्यांच्या लोकांना नोकर्यांना ठेऊन आरमारी नावा बांधल्यात, तसेच त्यांचा धर्मप्रचार रोखण्याचासुद्धा पूर्ण प्रयत्न केला. पण महाराजांना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण जोर लाऊन गोव्यावर हल्ला केला. हि चढाई इतकी प्रखर होती कि पोर्तुगीजांना वाटले कि आपले राज्य संपले. त्यांनी पळून जाण्यासाठी दोन गलबते तयार केलीत त्यात सगळी कागदपत्र भरलीत. पण भारताचे कमनशीब पुन्हा उतू गेले, संभाजी महाराजांची चढाई शेवटल्या टप्प्यात अयशस्वी ठरली आणि पोर्तुगीजांना जीवनदान मिळाले. 


(लेखकाने काढलेला फोटो) 

संभाजी महाराजांच्या अकाली मृत्यू नंतर मराठ्यांचे लक्ष मुघालांवर आणि पुढे पेशवाईत, मराठ्यांचे लक्ष उत्तरेला होते. पेशव्यांनी (चिमाजी अप्पा) वसई जिंकले आणि पोर्तुगीजांना उत्तर कर्नाटकातून हाकुलून पुन्हा गोव्यात ढकलले पण गोवा मात्र कधी मराठ्यांना मिळाले नाही. पोर्तुगीज पण शमले आणि त्यांचे ख्रिस्ती अत्याचार कमी कमी होत गेले. पूर्ण गोवा काही त्यांना ख्रिस्ती करता आला नाही. आजही गोव्यात हिंदू बहुतांश आहे हे एक मोठे यश मानायला हवे. 




भारतात पोर्तुगीजांना फारसा भूभाग ढापता आला नसला तरी ते कोणी मामुली राज्यसत्ता नव्हती. समुद्री राज्यासत्तांचा उदय स्पानिश आणि पोर्तुगीजांनी केला. पोर्तुगीजांचे राज्य ब्राझील, फिलिपिन्स, भारतातील गोवा, आणि पुढे आफ्रिकेतले काही देश एवढे पसरले होते. एवढ्या मोठ्या भूभागावर राज्य करण्याची क्षमता ठेवणारा हा एवढासा देश अत्यंत चिवट आणि कट्टर होता. त्यामुळे आजही गोव्यात हिंदू बहुतांश आहे हे एक मोठे यश मानायला हवे.

या संग्रहालयात, वर लिहिल्याप्रमाणे, अनेक दालने आहेत आणि फक्त इतिहास किंवा ऐतिहासिकच नव्हे विविध शैलीची चित्रे, शिल्पकला आणि आधुनिक आविष्कार आहेत. मागे छोटासा कॅफे आहे आणि एक छोटी फिल्म पण तिथे दर तासाला दाखविल्या जाते. यातील काही कलाकृत्या नेहमीसाठी तिथे नेहमीसाठी स्थित आहेत तर काही दालने एखादा विषय अथवा मध्यवर्ती कल्पना घेऊन कलेचा नव-नवीन आविष्कार मांडतात. 

वरील फोटो काढतांना त्या –त्या कलाकारांच्या नावाचे फोटो काढायचे राहिले हे तेवढे चुकले. पण या कलाकारांची नावे जाणून घ्यायला आणि कलेद्वारे मांडलेला इतिहास समजून घ्यायला सगळ्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. 

संग्रहालयाची वेब साईट - https://museumofgoa.com/

संग्रहालयाची माहिती - https://museumofgoa.com/about-us/

संग्रहालायचे संस्थापक  – श्री सुबोध केरकर - https://museumofgoa.com/team/subodh-kerkar-2/ 

No comments: