5/24/07

प्रारब्ध

दु:ख म्हणजे काय, या प्रश्नांने माणसाला प्राचीन काळापासुन भांडावुन सोडलेल आहे. अद्वैत सिध्दांता नुसार आपण जे जग बघतो ती सगळी माया आहे आणि या मायेच्या जगात आपण सुख-दु:खाच्या चक्रात फसलेलो आहोत. जेंव्हा आपल्याला या मायेची अनुभुती होते तेंव्हा सत््-चित््-आनंदाची स्थिती प्राप्त होते. अर्थात, ही स्थिती प्राप्त करण्यसाठी, या मायेतुन स्वत:ला वेगळ करण्यसाठी अनेक जन्म घ्यावे लागतात आणि जन्म घेतला म्हणजे परत दु:ख प्राप्त झालेच. स्पेन मधील कुठल्या तरी राजाने म्हणे आनंदी दिवस व दु:खी दिवस याची रोजनिशी ठेविली. मृत्यु समयी त्याच्या लक्षात आले कि संपुर्ण आयुष्यात फक्त १४ दिवस तो सुखी होता. अर्थात, या निर्णयाप्रत पोचायला रोजनिशीची आवश्यकता नाहि. शेवटी "सुखं पहाता जवापाडे, दु:ख पहाता पर्वता एवढे" हेच खरे. पण तरी आपल्य पैकी फार कमी लोक दु:खाची मीमांसा करतात.

सिद्धार्थालाहि हा प्रश्न पडला होता पण त्यालाही बुध्द स्थिती प्राप्त व्हावयला ६ वर्षे लागलीत तर सामान्य माणसानी काय करावे, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण गौतम बुध्दास मनुष्य जातीच्या दु:खाची कारणे शोधायची होती. आपण आपल्या वैयक्तीक आयुष्याचे अवलोकन केले तरी पुरेसे आहे. पण अवलोकन करण्याने दु:ख कमी होइल अश्यातला भाग नाही पण सध्या भोगत असलेले दु:खाचे कारण काय, हे लक्षात आले तर पुढे परत तसलेच दु:ख वाट्याल आले तर त्रास कमी होइल किंवा पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणी नुसार ते दु:ख वाट्याला येउ न देण्याची काळजी आपण घेउ शकतो. अर्थात, येथे 'पुढचा' पण आपणच आणि 'मागच' पण आपणच.
आपली वर्तमानातली परिस्थिती आपल्या भूतकाळाशी निगडित आहे. आणि भविष्य आपल्या वर्तमानाशी. भूतकाळात केलेल्या कर्माची फळे आपण वर्तमान काळात (उप)भोगत असतो.

वेदांमधे एक सुंदर उदाहरण आहे. पारध्याने जो बाण सोडला आहे तो आपला भूतकाळ आहे. त्याचे परिणाम भोगण्या शिवाय आपल्या हातात काहिही नाही. त्यालाच प्रारब्ध म्हणतात. जो बाण सध्या धनुष्यात ताणलेला आहे तो म्हणजे आपला वर्तमान. (याल अगामी कर्म असेही म्हणतात.) याच्या परिणामांवर आपले बर्‍यापैकी नियंत्रण असते व हे परिणाम आपल्या भविष्यात दिसतात. जे बाण अजुनही भात्यात आहेत त्याल संचित कर्म असे म्हणतात. प्रारब्ध कर्म आपल्या सध्या परिस्थिती ला पूर्व जन्माशी पण जोडते. उदाहरणार्थ आपल्याला ज्या घरात जन्म मिळालेला आहे ते आपल्या पूर्व जन्माच्या प्रारब्ध कर्माचा परिणाम होय.

पण पूर्व जन्माचा मुद्दा सध्या बाजुला ठेवला व या जन्माच्या प्रारब्धाचा विचार केला तरी बर्‍याच गोष्टी थोड्या अधिक स्पष्ट दिसु शकतात. जसे अभ्यास केला नसेल तर परिक्षेत उत्तीर्ण होणे अशक्य आहे. मग माझ काही चुकलच नाही अस म्हणणे मूर्खपणा होय. अर्थात हे उदाहरण फार सोपे झाले. मनुष्य जसा वयाने मोठा होत जातो तसे त्याल अधिक क्लिष्ट व कठीण निर्णय घ्यावे लागतात. बहुतांश वेळा त्याचे निर्णय केवळ चूक-बरोबरच्या पलिकडे असतात. अश्या परिस्थित स्वतःच्या कर्मांचा विचार करणे आवश्यक व उपयोगी असते. जे झालेल आहे त्याचे परिणाम शांतपणे भोगुन, पुढे तशीच परिस्थिती येउ नये या साठी आत्ता तशी पाउले उचलणे हा कर्मयोग नव्हे का?

अर्थात हे तत्वज्ञान लिहायला, वाचायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणे महत् कठीण. पण स्वतःच्या कर्माचा हिशोब करुनच वाल्याचा वाल्मिकी झाला तसच आपल्या सारख्या सामान्य माणसांना करणे अपरिहार्य आहे.

5/22/07

उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांचे प्रतिसाद.

उत्तर प्रदेश भारतातले सगळ्यात मोठे राज्य आहे त्यामुळे तेथिल राजकारणाचे प्रतिसाद राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात उमटणे सहाजिक आहे. नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरच्या निवडणुकांचे परिणामांनी मात्र भारतीय राजकारणाल हादरवुन सोडलय. निदान वृत्तपत्रां नुसार तरी मायवतीचा विजय ही भारतीय राजकारणातले अत्यंत महत्वाचे वळण आहे असे मानवे लागेल. मायवतीचा विजय हा इतका भूकंपदायक आहे अस मला सध्या तरी वाटत नाही. म्हणजे इतक्या लौकर या निर्णय देण कठीण आहे. पण ज्या कारणांनी त्यांचा(मायावती)विजय शक्य झाला आहे त्या कारणांचा विचार करणे मात्र अपरिहार्य आहे.

उत्तर प्रदेशाचा इतिहास, तेथिल राजकारण आणी समाज व्यवस्था हे सगळेच अत्यंत क्लिष्ट आहे. १८५७ चा बंड सोडता, उत्तर प्रदेशात गेल्या हजार वर्षात कधीही कुठलाही बंड झालेला नाही. महाराष्ट्र किंवा बंगाल मधे जसे समाज प्रबोधन झाले तसेही कधी उत्तर प्रदेशात झाले नाही. परिस्थिती इतकी शोचनीय आहे की एवढ्या मोठ्या प्रदेशाचे नाव हे फक्त भौगोलीक स्थिती दर्शक आहे.

१९८९ सालच्या मंडल आयोगाच्या सुचना लागु झाल्यावर भारतीय राजकारणात प्रचंड फेर-बदलाव झाला. उत्तर प्रदेश आणी बिहार मधे त्याचे पडसाद अधिक उमटलेत. समाजा वरची जाती संस्थेची पकड ढिली होउन, समता वाढावी या साठी भारतीय सरकारने समाजाच्या प्रत्येक घटकात आरक्षण आणायचे ठरवले. पण क़ुठल्याही कार्याचा आरंभ डावा पाय पडुन व्हावा तसे केवळ आपली खुर्ची टिकावी या साठी सांप्रत सरकारने मंडल आयोगाच्या सुचना लागू केल्या होत्या. यात समाज प्रबोधनाचा यत्किंचितही हेतु नसुन केवळ आपल्याला पुढल्या निवडणुकीत अधिक मत मिळावित हेच अंतिम लक्ष्य होते. वि.पि.सिंगचे सरकार टिकले नाहीच पण समाज विभाजन करुन सत्ता टिकविण्याच्या ईंग्रजांच्या पध्दतीची पुनरावृत्ती झाली.

अशिक्षितता, हिंदु-मुसलमानांन मधीलप्रचंड वैमनस्य, गरिबी आणी भ्रष्टाचाराने जर्जर उत्तर प्रदेश समाज म्हणजे राजकीय नेत्यांसाठी परवणीचा प्रदेश होता. आरक्षण लागू केल्यानंतर राजकीय पक्ष हिंदु समाजाचे लहान लहान जातींमधे विभाजन करत गेलेत. मुस्लीम मत, यादव मतं, कुर्मी मतं, ठाकुर मतं, या साठी चढा-ओढ सुरु झाली. जो कुठला पक्ष किंवा नेता, कुठल्या जातीला मागासवर्गीय दर्जा द्यायला तयार असेल तो पक्ष निवडुन येणार.

१९९० च्या दशकाच्या पुर्वार्धात भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा होता. पण समाजवादी पक्ष आणी बहुजन समाज पार्टी, या दोन राजकीय पक्षांनी मतांच्या आणी जातींच्या व्यापारात लौकरच नैपुण्य संपादन केले. समाजवादी पार्टी मुसलमानांचा 'मसीहा' बनली तर बहुजन समाज पार्टीने स्वत:ला 'दलित' समाजाचा कैवारी घोषित केल. दलित समाज जिथे आहे तिथेच आहे आणी मुस्लीम समाजाची अधोगती थांबलेली नाही. मुसलमानांची मत मिळवायला समाजवादी पक्ष कुठल्याही थराला जाउ शकतो. तर 'दलित' विकासाच्या नावखाली बहुजन समाज पक्षाच्या राजकारण्यांनी स्वता:ची पोट तुडुंब भरुन घेतली आहेत. राजकीय पक्ष या प्रकरणात इतके सत्तांधळे झालेत की गुन्हेगारां साठी त्यानी विधान सभेची दालनं उघडी केलीत. थोडक्यात गुन्हेगार लोक-कल्याणार्थ नेमलेले प्रतिनिधी झालेत.

पण जातीय राजकारणाच सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे याविरुध्द कोणालाही बोलण्याची मुभा उरली नाही. कोणी बोलण्याच धाडस केलच तर लगेच 'ब्राह्मणवादी' किंवा 'हिंदुत्ववादी' ही 'पदवी' दिली कि ती व्यक्ती पुढल्या भाष्यातुन बाद.

आत्यंतिक ब्राह्मणद्वेश आणी आत्यंतिक मुस्लीम प्रेम यावर हे दोन पक्ष ठाम-ठोक पणे उभे होते. पण अतिरेकाचे वर्तुळ पुर्ण व्हाव तस यातील एका राजकीय पक्षाला 'सुबुध्दी' सुचली. लोकसत्ता म्हणजे समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणणे होय, विभाजित करणे नव्हे हे बहुजन समाज पक्षाला उमजले असे म्हणता येइल. मायावतीने हिंदु समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणलेल दिसतय तसेच, मुस्लीम समाजाचा हि बराच पाठिंबा त्यांना मिळालेला दिसतोय. निदान निवडणुकीत मिळालेले यश सध्या तरी हेच निर्देशित करत. पण हा विजय प्रगतीच्या मुद्द्यावर संपादन केला आहे की नाही हे आत्ता सांगण कठीण आहे कारण अस ही म्हणता येउ शकत की मायावतींनी जातीच गणित अचूक साधल.

पण दुसरा पर्याय जरी खरा असला तरी मायावतींनी जे साध्य केलय त्यातुन सुदृढ समाजाची बांधणी शक्य आहे. जर का त्यांनी या संधीचा फायदा उठवुन उत्तर प्रदेशाची प्रगती करण्याचा किंवा निदान भ्रष्टाचार कमी केला तरी पुढल्या निवडणुकीत त्या, त्यांनी केलेल्या कार्याच्या मुद्द्यावर लोकांसमोर उभ्या राहु शकतात. जाती व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगुन निवडणुका जिंकण्याच्या दुष्ट-चक्राला याने पूर्ण-विराम लागेल.

उज्वल भविष्य घडविण्याची दुर्मिळ संधी मायावतींना मिळालीय. आशा करुया कि त्यांना याची कल्पना आहे.

5/9/07

महापुरुषाचा पराभव

१०वीत आमच्या मराठी बाल-भारती पुस्तकात आम्हाला 'महापुरुषाचा पराभव' नावाच धडा होता। लेखकाचे नाव मला आठवत नाही पण त्याच्या मते महान व्यक्तींचा पराभव(म्हणजे त्याच्या तत्वांचा)होण्यात त्यांचे अनुयायी फार मोठे भागीदार असतात. स्वातंत्र्योत्तर काळात नेतेगीरीच आणी व्यक्ती-पुजेचं जे पीक आलय आणी महात्म्यांच्या तत्वांची जी खरेदे-विक्री चालते, ते बघता लेखकाच म्हणण चांगलच पटत. पण 'पराभव' म्हणजे नक्की काय?

आपल्या देशात थोर लोकांची कमतरता नाही. पण कोणी जन्मत: महान नसत. ती व्यक्ती तीच्या कर्माने महान ठरते. त्याच्याकडे सांप्रत परिस्थिती कडे वेगळ्या दृष्टीनी बघण्याची शक्ती असते. त्या दृष्टी-द्वारे तो समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा सामाज उध्दाराचा प्रयत्न करतो. पण त्याच्या कार्यामुळे तो व्यक्ती महान ठरतो, व्यक्तीमुळे कार्य महान ठरत नाही. समाजात नेहमी चांगल्या वाईट गुणांची चढा-ओढ चालू असते आणी जेंव्हा वाईट गुण जोरा करतात तेंव्हा जी व्यक्ती चांगल्या गुणांना यश मिळवुन देते ती व्यक्ती महान. पण परत, येथे ज्या तत्वांसाठी ती व्यक्ती कष्ट करते ती तत्वे अधिक महत्वाची. छत्रपतींनी स्वराज्य प्राप्तीच्या कार्याला नेहमी श्रींची ईच्छा असे म्हटले. कारण त्यांच्या दृष्टीने त्यानी आरंभिलेले कार्य हे कुठल्याही व्यक्तीपेक्षा अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच छत्रपतींच्या अकाली मृत्युनंतरही स्वराज्याचा लढा केवळ चालु न रहात अजुन फोफावत गेला.

जेंव्हा कार्यापेक्षा व्यक्तीला अधिक महत्व दिले जाते त्याच क्षणी महापुरुषाचा पराभव होतो. महापुरुषाच्या जीवनाच्या उत्तरार्धात किंवा त्याच्या मृत्यु नंतर अनुयायी त्याने आरंभिलेले कार्य पुढे चालु ठेवण्या ऐवजी त्या महा पुरुषाची पुजाच करण्यात धन्यता मानतात. त्याहुन वाईट म्हणजे त्याची तत्वे काळानुरुप न बदलता ती कुजवुन समाजाचे नुकसान करतात. भारतीय समाज माणसाल 'देव' बनवण्यात निपुण आहे. त्यामुळे कुठल्याही महात्म्याला एकदा का फुलांचा हार चढवुन कोनाड्यात बसवला कींवा जागो-जागी त्याचे पुतळे उभे केलेत की झाल, त्यानंतर कोणीही जुन्या होत असलेल्या तत्वांना बदलवु शकत नाही.

व्यक्ती
-पुजेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गांधी आणी त्यांच्या नंतरची नेते मंडळी. अर्थात या परिस्थितीला गांधीजी किती जवाबदार आहेत याचा स्वतंत्रतेने विचार करावा लागेल. पण अहिंसेच्या तत्वांचा त्यांच्य जीवन काळातच फाळणीच्या नर-संहारात सपशेल पराभव झाला असला तरी ते 'महात्मा' कधीच बनल्यामुळे त्यांच पांढर उपरण स्वच्छच राहिल. त्यांच्या मृत्यनंतर तर अहिंसेचा अतीरेक झाला. अहिंसेच्या तत्वाचा इतका पगडा नेहरुंवर होता की अस म्हणतात की त्यांनी सेना-प्रमुखांना प्रश्न विचारला की भारत हा शांती-प्रधान देशा असतांना सेनेची काय आवश्यकता आहे? अर्थात चीन युध्दा नंतर त्यांचे मत-परिवर्तन झाले ! याच्या उलट गांधींचे पट्ट-शिष्य या नावखाली आपल्या विनोबा भावे आणी-बाणीच्या काळातल्या हिंसेला आवश्यक ठरवुनही 'आचार्य' बनले.

जरी भारत आर्थिक प्रगती करत असला (जी कौतुकास्पदच आहे) तरी आपल्या समोर असलेल्या ज्वलंत सामजिक प्रश्नांची उत्तरे आपल्या कडे नाहीयात. चांगल काय आणी वाईट काय याचाच आपल्या समाजाला भ्रम झाला आहे. पश्चिमी संस्कृतीच्या झंझावात आपल्या समाजाची बिन-शिडाची नाव वाट फुटेल तीथे वहातेय. तरीही व्यक्तीपुजा तेजीत आहे आणी या भानगडीत भारताच्या भविष्याचा विचार करायला फारसा कोणाकडे वेळ नाही. यातुन बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे ते मला माहिती नाही. पण ज्यांना व्यक्ती पुजे ऐवजी कार्य पुर्तीचे महत्व अधिक पटते त्यांनीच काही केले तर परिस्थिती बदलु शकते नाहीतर प्रेक्षक होउन नुसता 'तमाशा' बघत रहायचा.

5/5/07

|| येथे मराठेचिया नगरी ||

मराठी भाषेच्या भविष्याबद्दल आज काल बरीच चर्चा होते। पुष्कळश्या मराठी वेब-साइट्स वर या विषयावर विचार मंथन चालू असत. शाळेत मराठी आवश्यक करण्यापासुन ते दुकानांवरचे फलक मराठीत लिहिण्यापर्यंत अश्या बर्याच गोष्टी सुचवल्या जातात. यातल्या किती गोष्टी कितपत उपयोगी आहेत हे सांगण कठीण आहे. जर का लोक मराठीत कमी बोलत असतील किंव्हा बोलतांना ईंग्रजी शब्दांचा अधिक प्रयोग करत असतील तर दुकानावरच्या पाटया कुठल्या भाषेत आहेत हा गौण मुद्दा ठरतो.

ईंग्रजी सत्तेच्या काळात उदय झालेल्या मराठी मध्यम वर्गाने ईंग्रजी भाषेचे महत्व लौकरच ताडले। ईंग्रजीच्या 'अमर वेलीने' याच काळातच मुळं पकडलीत। सरकारी नोकरी मिळण्याच्या हेतुने संस्कृत आणी मराठी सारखाच ईंग्रजीचा अभ्यास १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झाल असावा. तर्खडकर भाषांतर पाठमाला याच दरम्यान प्रसिध्द झाली. त्या काळात बिन-सरकारी नोकर्या कमी असल्यामुळे आणि सरकारी नोकरी साठी ईंग्रजी आवश्य असल्यामुळे, ईंग्रजी भाषा ही सामाज व्यवस्थेत वर चढण्याची पायरी मानल्या जाउ लागली. पण गंमतीचा भाग असा की हा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानता येईल.

स्वातंत्र्योत्तर काळात जरी औद्योगिकीकरणात महाराष्ट्र जरी आघाडीवर होता तरी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात मराठी माणुस पडद्याआड गेला. त्यामुळे केसरी ईत्यादी मराठी वर्तमान-पत्रांना जे महत्व होते ते स्वातंत्र्योत्तर काळात कमी होऊ लागले. थोडक्यात मराठीचे राजकीय महत्व कमी झाले. भारतीय सरकारने भारतीय भाषांचे जेवढे नुकसान केले तेवढे नुकसान ब्रिटिश सत्तेने केले नसेल. तांत्रिक किंवा वैद्यकीय उच्च शिक्षण ईंग्रजी माध्यमातच शक्य होते त्यामुळे प्राथमिक शिक्षण मराठी करण्यात फारसा अर्थ राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाल की मराठी, संस्कृत किंवा अन्य प्रांतीय भाषा केवळ बोली-भाषा राहिल्यात. ईंग्रजी ईयत्तेत शिकणारी मुले आपो-आपच हुशार मानली जाउ लागली. आणी ही 'हुशार' मुले मात्र मराठी साहित्यात अक्षरश: निरक्षर असतात. आता याचा अर्थ असा नव्हे की मराठी माध्यमात शिकणारे विद्यार्थि सहित्य प्रचुर असतात पण निदान त्यांच्यात मराठी साहित्य वाचण्याची क्षमता तर असते.

जागतिकीकरणात मराठी शिकुन करायच तरी काय, हा प्रश्न नेहमी विचरला जातो। मराठी शिकुन किंवा न शिकुन उच्च शिक्षणासाठी चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळतोच. आपली बोली-भाषा मराठीच आहे (अजुन तरी !) आणी अमेरिकेत जायला मराठीचा काय उपयोग? त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कविता वाचल्या आहेत काय किंवा नाही काय, एकच आहे.

पण भाषा हे केवळ संवादाचे साधन नसते. भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते। ती इतिहास असते आणी वर्तमान पण. आणी भाषेतच भविष्य घडविण्याचे सामर्थ्य असते. भाषा म्हणजे जणु समाजाचा आरसा असतो. समाजातले बरे-वाईट असे सगळेच गुण थोर-मोठ्यांच्या वाणी द्वारे किंवा शब्दां द्वारे प्रगट होतात. मुसलमानी सत्तेखाली भरडल्या गेलेल्या मृतवत समाजाला संतांच्या अभंगांनी संजीवनी मिळाली तर टिळकांच्या अमोघ वाणीने भ्रमीत समाजाला आत्मविश्वास मिळाला. सावरकरांच्या तेजस्वी शब्दांनी समाजात देशभक्तीची बीजं परत रोवल्या गेली तर कुसुमाग्रजांच्या कल्पना शक्तीने समाजाला नवीन पंख दिलेत. खांडेकरांच्या लेखणीतुन आयुष्याची ओळख पटली तर पु. लं.नी लिहीलेल्या व्यक्तीचित्रांतुन माणसाच्य अंतरंगीचे विविध रंगांचे दर्शन झाले. तेंव्हा जर का आपली सध्याची शिक्षण पद्धती किंवा समाज व्यवस्था तरुण पीढीला मराठी भाषेला लाभलेल्या या तारकांचा चांदण भोगायला असमर्थ करत असेल तर आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारत नाहीया का?

मराठीचा आग्रह म्हणजे ईंग्रजीला नाकरणे नव्हे. ईंग्रजी शिकणे आवश्यक आहेच. पण ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण किंवा 'प्रगती' च्या नवीन व्याख्ये अंर्तगत जर का आपल्या माय बोलीला नाकरणे येत असेल तर ते अयोग्य आहे. आपल्या भाषेचे भविष्य आपल्या हातात आहे. शेवटी आपणच आपली ओळख ठरवायची असते.

मराठी माणुस कुठे हरवला?

मराठी माणुस कुठे आहे, अस जर का कुणी विचारल तर त्याच उत्तर तो (मराठी माणुस) कुठे गेलेलाच नाही अस दयाव लागेल. कारण महाराष्ट्र अजुनही प्रत्येक क्षेत्रात पुढेच आहे. आणी या यशाच श्रेय सर्वथीय मराठी माणसालाच जात. पण फक्त पुढे असण म्हणजे यश नव्हे. छत्रपती शिवाजींच्या काळा पासुन मराठी माणुस केवल पुढे नव्हता तर तो पुढारी होता. त्यानी समाजाच रक्षण केल,पोषण केल आणी केवळ मराठी माणसामुळेच धर्म जागरुती झाली. युध्ध-क्षेत्रात मुसलमानी सत्ते ला यशस्वी रीत्या सामना करुन सार्व-भौम हिन्दवी स्वराज्य स्थापन करणारा मराठीच माणुसच होता. मराठी माणसाच्या तलवारीच्य यशाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सन १७५० साली मराठी साम्राज्याची सीमा-रेष म्हणजे आजच्या भारताची सीमा-रेषा आहे. मुघली घोडे म्हणे संताजी-धनाजीच्या भीतीने पाणी प्यायची नाहीत. थोरले बाजीराव कधी कुठे प्रगट होतील याची शाश्वती नसायची. सन १७३६ ची थोरल्या बाजीरावांची भोपाळ प्रांतातली लढाई म्हणजे मराठी शौर्याचा मानबिन्दु आहे. अर्थात खुद्द छत्रपतींच्या शौर्याची इथे प्रशंसा करण म्हजे सुर्याला दिवा दाखवण्यासारख आहे. त्यांच चरित्र सगळ्यांन परिचीत आहेच।

पण मराठी माणुस फ़क्त शक्तीच प्रतीक नव्हता तर त्यानी भारतीय भक्ती संप्रदायाच्या मंदीरावर सोन्याच जणु कळस चढवला. हर हर महादेव च्या घोषानी त्यानी समाजाच रक्षण केल तर ग्यानबा-तुकारामाच्या नादानी त्यानी समाजाची जाग्रुती केली. सांप्रत काळात जातीय राजकारणाने जो उच्छाद मांडलाय त्यात महाराष्र्टीय संत परंपरेचे यश अजुन डोळ्यात भरण्यासारखे आहे. कारण प्रत्येक 'जातीने' जणु एक एक संत समाजाल दिलाय।

मधे मी प्रसिध्दी इतिहासकार श्री जादुनाथ सरकार यांनी मराठी इतिहासावर लिहिलेल एक पुस्तक वाचले. त्यांच्या मते भारताच्या गेल्य हजार वर्षाच्य ईतिहासात तलवार आणि लेखणी सारख्याच कौशल्यानी चालवणारा फक्त मराठी समाजच आहे. त्यांच्या मते मराठी पुदारयांनी (आपल्या संत मंडळीं पासुन ते धोंडो केशव कर्वे आणी बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत) समाज जाग्रुती कुठल्याही 'सरकारी' मदती शिवाय केली. या लोकांनी केलेल्या कार्याची सुरुवात, त्याचे स्वरुप आणी अंतीम यश यात कुठलीही सरकारी यंत्रणेचा समावेश नव्हता. म्हणजे या सगळ्या चळवळी समाजा साठी आणी समाजा कडुन होत्या।

या मराठी माणसात पुढे फूट पडली आणी देश परत परकीय सत्तेच्या अधीन झाला. अर्थात, या दुर्दैवाचा दोषी मराठी माणुसच होता. पण य अपयशानी न खचता, त्या मागची कारण शोधुन, त्या कारणान वर मात करण्याच्या उद्योगाला तो लागला. स्त्री-मुक्ती आणी दलीत-मुक्ती या आघाड्यान्वर मराठी समाजच पुढे होता. पण ईंग्रजी सत्ते विरुध्द पुळचट ठराव पास करण्या ऐवजी लोकमान्यानी "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे" ही गर्जना दिली आणी स्वातंत्र चळवळीचा अग्नी-कुंड पेटवला.

टिळक महाराजां नंतर मात्र मराठी माणुस पुढारी न रहाता फक्त पुढे राहु लागला. स्वातंत्र्य चळवळीतुन मराठी माणुस जणु नामशेषच झाला. आंबेडकरांनी दलीत समाजाला जाग्रुत तर केल पण स्वराज्य प्राप्ती नंतर दलीत चळवळ समाजिक न रहाता केवल राजकीय फायद्या साठी सिमीत झाले.
मराठी माणसाचा हा संक्षीप्त इतिहास सांगण्या मागचा हेतु असा की आपल्या या वैभवशाली भूतकाळावर नजर टाकली की सद्य मराठी माणसाची दयनीय परिस्थित लगेच डोळ्यात खुपते. आपण औदयोगीक, राजकीय आणी कलेच्या दृष्तीकोनातुन मराठी समाजाची पडताळणी करुया.

माणुस राष्ट्रीय पातळी वरच्या राजकारणात कुठेच दिसत नाही. परकीय सत्तेशी झुंझण्याचा जर का आपल्याला ४०० वर्षांचा अनुभव आहे तर अजुन पर्यंत मराठी माणुस एकदाही पंत-प्रधान कसा नाही झाला? मला कुणी पर-राष्ट्रमंत्री झालेला माहीती नाही. शरद पवार काही महीने संरक्षण मंत्री झाले होते. समाजिक जाग्रुती जर का आपल्या प्रांतात सर्व-प्रथम सुरु झाली तरी राजकीय पातळी वर जातीच्य मुद्द्यावर आपण बिहार-उत्तर प्रदेशच्या समाजा इतकेच विभाजीत आहोत. छत्रपतींनी ४०० वर्षापुर्वी हिंदु धर्माला जातीच्या जंजाळातुन सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पण त्यांच स्वप्न अजुनही आपण साकार करु शकलो नाहीया. खर तर जाती-पाती च्या राजकारणातुन बाहेर पडुन आपण भारत-वर्षा समोर उदाहरण ठेवायला हव. पुणेरी ब्राह्मण अजुनही स्वता:ला उच्चाभ्रु मानतात. मराठा समाज अजुनही वर्तमानात जगायला तयार नाही. दलीत समाज 'बदला' घेण्याच्या मनस्थितीतुन अजुनही बाहेर पडु ईच्छीत नाही. (येथे मी राजकीय आणी सामजीक प्रश्नांना एकत्र बांधल आहे)अर्थात या सगळ्या घोटाळ्यात नुकसान मराठी माणसाचच होतय।

औदयोगीक क्षेत्रात खर तर मराठी माणसा सारखा काम करणारा कोणी नसेल. गेली ६० वर्ष महाराष्ट्र औद्योगीकीकरणात सतत आघाडीवर आहे. पण मराठी माणुस कामगारच रहीला अस म्हणाव लागेल. खर तर या बाबतीत माझी मराठी माणसा बद्दल काही तक्रार नाही. स्वराज्य प्राप्तीच्या काळात महाराष्र्टात जो सरळ मार्गी आणी कष्टी मध्यम वर्गाचा उदय झाला त्यानेच भारतीय औद्योगिकीकरणाचा पाया घातला.
कलेच्या बाबतीत मात्र आपली दयनीय अवस्था आहे अस मला वाटत. मराठी चित्रपटाला तिरडीवर ठेवण्याची वेळ आली आहे. महाराष्र्ट सरकारवर मराठी चित्रपट काढायला योगदान द्यायची वेळ आलीय. खर तर हिंदी चित्रपट स्रुष्टीच्या आधी मराठी चित्रपटाचा आरंभ झाला. कोल्हापुरला विज न्हवती तरी चित्रपट तयार होत होते. दादासाहेब फाळके मराठीच होते ना! पण सध्या अशी परिस्थिती आहे की नागपुरला (महाराष्ट्राची उप-राजधानी) तर बरेच मराठी चित्रपट लागत सुध्धा नाहीत. खर तर मराठी चित्रपट आणी नाटक क्षेत्रात उत्तम कलाकारांची कमी नाहीया म्हणुनच मराठी चित्रपट आणी नाट्यकलेचा हा र्हास आश्चर्यजनक आणी खेदजनक आहे. उत्तम नाटके आणी चित्रपट जर क मुंबई आणी पुण्याच्या बाहेर पडत नसतील तर दोषी कोण?

आपल्या राज्यात सुबत्ता आहे. आपण आपल्या राज्यात सुरक्षित राहु शकतो. बरीचशी सरकारी कामे सुरळीत होतात. दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या प्रतीच्या आहेत. आणी याच श्रेय मराठी माणसालाच जात पण आपल्या वैभवशाली आणी उद्यनशील भूतकाळाकडे बघितल तर अजुन बरयाच गोष्टी साध्य करायला हव्या होत्या.

मराठी माणसाची तुलना कुठल्या अन्य प्रांताशी करत नाहीया. आपण आघाडीवर होतो आणी आहोत पण आपल्यात अजुन क्षमता आहे आणी त्या क्षमतेचा आपण आवश्यक उपयोग करु नाही शकलो तर ते आपल अपयशच मानव लागेल.