खाडकन केतनच्या थोबाडीत पडली. त्याचे कान सुन्न झालेत. खरंतर केतनने कोचने शिकविल्या प्रमाणे बॉक्सिंग ची नीट पोज घेतली होती. डावा पाय थोडा पुढे आणि उजवा पाय थोडा मागे. आणि डावी मूठ वळून पुढे आणि उजव्या हाताने मूठ वळून कान-गाल-डोळा झाकला होता. निदान त्याला वाटले कि त्याने चेहेऱ्याचा उजवा भाग नीट झाकला होता. उजवा खांदा थोडा वर करून त्याने चेहरा खालती केला होता. पूर्ण लक्ष देऊन तो समोरच्या कडे बघत होता.
केतन बॉक्सिंग चे क्लासेस नुकतेच घ्यायला लागला होता पण त्याने प्रगती झपाटयाने केली होती. मुळात त्याची उंची चांगली होती आणि नियमित व्यायाम केल्या मुळे त्याच्यात ताकद चांगली होती.
निदान त्याला असे वाटत होते.
"सर, आप को मारना कैसे है, ये मैं सिखा सकता हुं. पर, मार खाना एक अलग बात है. ये तो सिखाया नहीं जा सकता." कलीम सर, केतन चे बॉक्सिंग कोच जणू त्याच्या कानात बोलत होते.
"आय-टी कंपनी मी काम करने वाला आदमी हुं, लडाई-झगडे का मौका कभी नही मिलेगा"
"तय्यारी होना सहाब"
केतनला वाटलं तेवढा त्याचा उजवा चेहरा झाकल्या गेला नव्हता. त्याला कानाजवळ गरम काही तरी ओघळतंय असे वाटले.
" हा बघ, चॊमु, बॉक्सिंग करणार आहे माझ्याशी. बांडगुळा सारखा काही तरी पोज घेऊन उभा आहे." समोरचा खिदळत त्याच्या मित्राला म्हणाला.
'मी बांडगुळासारखा उभा आहे?' केतनला प्रश्न पडला. बांडगुळ म्हणजे परजीवी वनस्पती. बांडगुळासारखा कसा कोणी उभं राहू शकत?" केतन विचार करू लागला. पण विचार करणें जरी चांगली सवय असली तरी नको त्या ठिकाणी विचार करणे तोट्याचे ठरू शकते.
या भानगडीतच तो समोरचा अचानक पुढे आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या सणसणीत झापडेने केतनच्या गालाची हिंसक पापी घेतली. केतन जागचा हलला. पण त्याच्यात तेवढीही कमी ताकद नव्हती. त्याने तोल सांभाळला आणि तो दोन-तीन पावला मागे गेला.
"अगर मारने का मौका ना भी मिले तो भी चलेगा पर. पर आपने मार खाना नहीं है. डिफेन्स फर्स्ट!" केतनच्या डोक्यात कलीम सर पुन्हा बोलू लागले. जणू ते तिथे त्याच्या बाजूलाच उभे आहेत. त्याने विचार केला डोक्यात असण्यापेक्षा कलीम सर प्रत्येक्षात तिथे उभे असते तर जास्त फायद्याचा असत.
" मैं आप को बॉक्सिंग रिंग का बॉक्सिंग सिखा रहा हूँ. पर रास्ते पे झगडा होता है तो डिफेन्स फर्स्ट के भी पाहिले आप भागने का सोचो. रास्तो पे झगडा करने में किसी का भला नहीं होता. और झगड के क्या हि मिलेगा?"
"सर, आप भी मजाक करते हो. मुसीबत बता के थोडी ना आती है. और गलत जगह फस गया फिर हात-पैर तो घुमाने हि होंगे." कलीम सर पुढे काही बोलले नाहीं.
चुकीच्या जागी केतन नक्कीच फसला होता. डोंगर चढायला म्हणून तो बायको पोरा सोबत निघाला. त्या साठी मुद्दाम प्रवास करून त्या गावात आदल्या रात्री पोचला. सकाळचे अवरोहण छान झाले. उतरतांना निमुळत्या वाटेबाजूला दोन लोक दारू पीत बसले होते. त्यांनी काही ओंगळवाण्या टिप्पण्या केल्यात. केतन त्यावर त्यांना काहीतरी म्हणाला आणि आता तो बॉक्सिंग ची डिफेन्सिव्ह पोज घेऊन उभा ठाकला होता. त्याच्या उजव्या कानातून रक्त येत होते.
समोरचा पुन्हा सरसावला आणि त्याने या वेळेस त्याचा उजवा हात सपाट्याने फिरवला. पण केतन ने त्याचा पंच बरोबर ओळखला आणि घुडघे थोडे वाकून, डोकं बरोबरअसे मागे केले कि त्या माणसाचा हात वेगाने त्याच्या धरधरीत नाकापासून काही उंचावरून निघून गेला.
पण या संधीचा फायदा घेत केतन ने डिफेन्सिव्ह पोसिशन, ऑफेन्सिव्ह मधे बदलली. आणि डाव्या हाताने वळलेली मूठ समोरच्याच्या हनुवटीवर खाडकन बसवली.
'अप्पर-कट!' कलीम सरांचा आवाज पुन्हा कानात फिरला.
समोरचा पुन्हा केतन च्या अंगावर आला. केतन ने त्याला हुलकावणी दिली आणि विरुद्ध बाजूने पुन्हा त्याच्यासमोर उभा झाला.
केतन ने मगाशी मारलेला उप्पर-कट आता त्याला त्याच्या बोटांना आणि बोटांच्या सांध्यांना जाणवायला लागला होता. आत्ता पर्यंत बॉक्सिंगच्या क्लासला त्याने बँडेज आणि ग्लोव्हस घालूनच पंचिंग केले होते. इथे आयुष्यात पहिल्यांदा त्याने कोणाला पंच मारला आणि ते पण उघड्या मुठीने! त्याने पंच अगदी पुस्तकी मारला होता. कारण समोरच्याच्या तोंडातून रक्त यायला लागले होते आणि त्याची मूठ दुखत असली तरी तो अजून मूठ वळू शकत होता. त्याचा आत्मविश्वास थोडा वाढला.
या मारा-पिटीत एक चांगली गोष्ट म्हणजे, दुसरा फारच हलका-फुलका होता. बहुधा तो एका पायाने अधू होता. खिदळण्या पलीकडे तो फारसा काही लायक नव्हता. केतनच्या समोरच्याच्या तोंडातून रक्त येतांना बघून त्याचे खिदळणे मात्र आता बंद झाले होते.
"तू पोराला घेऊन पळ इथून. मी बघतो काय करायचं ते."
"मी इथून निघत नाहीं या, तुला एकटं सोडून. जे काही आहे मिळूनच करूया" केतनची बायको त्याला म्हणाली. ती घाबरली होती पण तिने हिम्मत हारली नव्हती. तिनी जवळचा एक गरगरीत गोटा उचलून त्या अधू-दुसऱ्याला फेकून मारला. त्याच्या मांडीला का कमरेला तो सपाटून बसला.
"आई ग...लागलं रे" असा काहीस म्हणत तो मागे सरकला.
" बायकोला समोर कर तू. कारण तू मारलेला पंच मला पापी दिल्या सारखा वाटला" तोंडातून येणारे रक्त थुंकून केतनच्या समोरचा बरळला.
" साब, सामने वाला कुछ भी बोले आपने ऊसपे ध्यान नही देना है. बोलने दो सामने वाले को. बॉक्सिंग में ताकद बचा के रखना है. और जब जरुरत पडे तभी इस्तेमाल करना है.
केतनच्या कानात पुन्हा कोचिंग सुरु झाले.
तेवढ्यात केतनच्या बायकोने अजून एक गरगरीत गोटा केतनच्या समोरच्यावर पूर्ण ताकदीने फेकला. त्याला तो खांदा आणि मानेच्या सांध्यावर सपाटून बसला.
"आई ग....." तो केकाटाला. आता त्याला कळेना नेमके काय करायचे. तो खांदा दाबून मागे झाला पण आता त्याने केतनच्या बायकोवर नजर रोखली.
" आता तरी पळतेस का?" पण केतनच्या बायकोच लक्ष नव्हते. ती आणि आणि केतनच्या १० वर्षाचा पोरगा मोठे दगड शोधत होते.
"अरे टोण्या, काही कर! काही नाहीं तर त्या बाई ला आवर" केतनच्या समोरचा अधू-दुसऱ्यावर खेकसला.
"दगड मारते कि हि बया"
केतनच्या समोरच्याचा खांदा-मान चांगलीच ठणकत असणार. त्याने केतनच्या बायकोच्या दिशेने मुसंडी मारली.
केतन ने त्याच्या छातीला मिठी मारली आणि त्याची कंबर पकडून त्याला मागे रेटू लागला. पण तो काही केतन ला झेपेना.
"बॉक्सिंग में साब, सामने वाले का ताकद जलना है. आदमी को मार के कमजोर कर सकते है या थकवा के. जैसे हि आदमी थका, उसका बॅलन्स गया"
केतन पाय रेटून पूर्ण ताकद लावून त्याला ढकलले आणि मग त्याला मारलेली मिठी सोडून एकदम बाजूला झाला. केतनच्या समोरचा तोल जाऊन भेलकांडत दाणकन जमिनीवर आदळला.
केतन त्याच्या अंगावर बसला आणि दनादन त्याच्या डोक्यावर कानावर, जिथे मिळेल तिथे पंचेस मारू लागला. केतनची बायको जवळ आली आणि ती तिच्या ट्रेकिंगच्या बूटाने केतनच्या समोरच्याची बोटे चेंदु लागली. आता समोरच्याची पूर्ण वाट होती. पण तरी त्याने उजव्या हाताने अंगावर बसलेल्या केतनच्या उजव्या कानशिलावर सपाटून झापड मारली.
केतन पुन्हा सुन्न झाला. आता त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात केतनच्या बायको केतनच्या समोरच्याच्या उजव्या हाताची बोटे चेंदु लागली. केतनच्या समोरचा आता वेदनेने जोरात ओरडू लागला.
केतन त्याच्या अंगावरून उठला आणि काही पावले मागे गेला. समोरचा लगेच उठला. केतनला ते अपेक्षित नव्हते. केतनची बायको काही फूट त्याच्या मागे उभी होती. तिनी हळूच एक चापट दगड केतनला दिला आणि ती अजून थोडा अंतर मागे गेली. केतन आणि ती दोघे बघत होते कि समोरचा आता काय करतो. त्याच्या शर्टावर रक्त सांडत होते. तो कातावला होता. अश्या मनस्थिती एकतर दारू उतरून माणूस ताळ्यावर येतो किंव्हा डोक्यात राख घालून टोकाला जातो. समोरच्याने टोकाला जायचे ठरवले होते. त्याने आज बाई कडूनही मार खायला होता.
"साब, बॉक्सिंग रिंग मी ठीक है. रूल्स है, रेफ़री है. बाहर मारा-पिटी करनी है तो बचाव और फिर बचना सबसे मेन है. अगर खुदा-ना-खास्ता ऐसी नौबत आती है तो जो हात लगे वो सोना. पीटो और फिर भागो"
समोरच्याने तोंडाचे रक्त पुसले आणि हेलकावे घेत पुन्हा केतन वर धाव घेतली. केतन ने तो दगड घट्ट मुठीत दाबला. समोरचा जवळ येताच, केतन पुन्हा गुढघ्यात वाकला आणि पूर्ण ताकदीने हुक पंच मारला. पंचच्या शेवटच्या क्षणाला त्याने मूठ उघडली आणि त्या दगडाने अक्षरश: गालाचे हाड फोडले. समोरचा पुन्हा कोलमडून पडला. त्याला नीटसं रडता पण येईना. स्वतःला रेटत तो केतन पासून अजून दूर गेला. केतनच्या बायकोच्या हातातला दगड त्याला दिसला असावा.
"चल, चल, निघ." केतन बायकोला म्हणाला. तिने पोराची बकोट धरली आणि सगळे तिथून पळाले.
"चांगले पंचेस मारलेस आणि ते पण दोनदा मार खाऊन. ट्रैनिंग कामात येतंय." केतनची बायको धावता धावता केतन ला म्हणाली.
"तुला तर ट्रैनिंग ची पण गरज नाहीं. वाघीण आहेस तू आतून" केतन म्हणाला.
ते ऐकून बायकोच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित-हास्य होते.
-
No comments:
Post a Comment