1/9/23

आम्ही सगळे बाजीप्रभूनुकतच पावनखिंडीला जाण्याची संधी मिळाली. संधी मिळाली म्हणण्यापेक्षा पावनखिंडीला जाण्याचे भाग्य प्राप्त झाले. लहानपणा पासून गोष्ट तोंडपाठ आहे. पण नागपूरला हे घटना गोष्ट रुपी वाचणे आणि प्रत्यक्षात खिंडीत उभे रहाणे यात जमीन-आसमान चा फरक आहे. गोष्ट वाचतांना जे चित्र मनात उभे केले होते त्यापेक्षा खरी खिंड आणि आजू-बाजूचा प्रदेश फार वेगळा आहे. दुर्दम्य आहे, आणि चालायला आक्राळ-विक्राळ आहे. महाराज काय, बाजीप्रभू काय आणि मावळे काय, यांच्या बद्दल मनात नेहमीच जिव्हाळा आणि आदर होता पण खिंडीत उभे राहून त्या युद्धाचा विचार केला तर मन अवाक झाले. संग्रामाची भीषणता जाणवून स्तब्ध होतो. त्यांच्या पराक्रमाची उत्तुंगता जाणवते. 

आणि जर का महाराज पकडल्या गेले असते तर काय झाले असते? बहुधा आपण सगळे आज नमाज पढत असतो! 

बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि त्यांचे ३०० बांदल मावळे इतक्या बिकट परिस्थितीला कशी मात करू शकलेत? कुठून एवढे बळ आले? काय डोक्यात वेड घेऊन त्यांनी हा पराक्रम गाजवला? कुठून एवढी कर्तव्य निष्ठता आली? खिंडीत उभे राहून या ऐतिहासिक घटनेचा विचार करता छाती अभिमानाने फुलली आणि तेवढीच स्वतःच्या सामान्यत्वाची जाणीव झाली. 

महाराजांनी निवडक सहाशे मावळे आणि बाजीप्रभु सोबत भर रात्री आणि धो धो पावसात पन्हाळा सोडला. गडाला सिद्दी जौहर ची अजगर मिठी होती. पण कोणालाही थांगपत्ता लागणार नाही याची सगळ्यांनी फार काळजी घेतली. ढाल-तलवारी बाळगत, महाराजांना पालखीत घेऊन हि वारी शक्यतोवर अलगद पणे वेढ्यातून निसटलीत. महाराजांच्या धाडसाची आणि नियोजनाची पराकोटी इथेच मानली पाहिजे. पुढे पावनखिंडीचे युद्ध झाले नसते आणि महाराज आणि मावळे सुखरूप विशाळगडाला पोचले असते तर वेढ्यातून सुटण्याच्या या धाडसाचे सुद्धा पोवाडे गायले गेले असते. पण तसे होणे नव्हते. हि फक्त पहिलीच पायरी होती. विशाळगड पन्हाळ्यापासून साधारण पन्नास किलोमीटर वर आहे. आजच्या भाषेत एक मॅरेथॉन आणि त्यावर ८-९ किमी. सध्याचा जो सरकारी रस्ता पन्हाळ्याहून विशाळगडा कडे आहे, तो नागमोडी रस्ता अजूनही ६० किमी चा आहे. थोडक्यात हे अंतर काही सोप नाही. अर्थातच महाराज आणि मावळ्यांना हे अंतर काही तासातच, लौकरात लौकर, आणि एका दमात जाणे आवश्यक होते. ते पण घनदाट जंगलातून, भर पावसात. इथे मी पावसाचा उल्लेख सारखा करतोय कारण हा प्रदेश कोकणाच्या सीमेवर आहे. अजुनहि इथे २०० इंचाच्या वर पाऊस पडतो. आणि अजुनही इथले अरण्य घनदाट आहे आणि सारख्या टेकड्या आणि कडे-कपार्या आहेत. साडे तीनशे वर्षां पूर्वी पाऊस नक्कीच जास्त असणार आणि अरण्य आत्ताहून किमान दुप्पट मोठे आणि घन असणार. पण तरीही चिकाटीची पराकाष्टा करीत महाराज व मावळे साधारण पस्तीस कि.मी. असलेल्या खिंडीत सकाळी बहुधा ८-९ वाजे पर्यंत पोचले असणार असणार. 

पण पन्हाळ्याहून निघतांनाच महाराजांनी एक युक्ती लढवली होती. महाराज ज्या दिशेने किंव्हा वाटेने गेलेत, त्याच्या विरुद्ध दिशेने अजून एक पालखी आणि काही मावळे गेलेत.  पालखीत महाराजां सारखा दिसणारा शिव काशीद बसला होता. जेंव्हा सिद्दीच्या सैनिकांना महाराज पळून गेल्याचे कळले तेंव्हा सिद्दीने त्याच्या सैनिकांच्या तुकड्या वेग -वेगळ्या दिशेंनी पाठवल्यात. त्यातल्या एका तुकडीला काही अंतरावरच शिवा काशीद रुपी महाराज सापडलेत. लगेच या 'महाराजांना' आणि त्या मावळ्यांना धरून सिद्दी समोर उभे केले. महाराज नेमके कसे दिसत असत याची कल्पना फारशी कोणाला नव्हती. पण सिद्दीच्या गोटात काही घरभेदी मराठे खूप आधीच सामील झाले होते. त्यातल्या काहींनी महाराजांना जवळून बघितले होते. त्यांनी शिव काशीद महाराज नव्हेत हे लगेच ओळखले. आता आख्यायिका अशी आहे कि सिद्दी चा संताप या भानगडीने अजून वाढला. त्याने शिव काशीद ला विचारले कि तुला मरणाची भीती वाटत नाही का? त्यावर शिवा काशीद यांनी छाती ठोकून सांगितले कि शिवाजी महाराजां साठी शंभर वेळा मरणे पत्करीन. हे ऐकून शिवा काशीद यांचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केला गेला. हे शेवटले क्षण खरे असतील किंव्हा नसतील पण शिवा काशीद यांच्या मनस्थिती चा विचार करा. पकडल्या जाणार हे माहिती होते, किंबहुना पकडल्या जाणे आवश्यक होते. आणि पकडल्या गेल्यावर मृत्यू पण अटळ होता पण महाराजांना पळायला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आधी पाठलाग करण्यात आणि मग ओळख-पाळख होईपर्यंत महाराजांची भूमिका निभावत सिद्दीचा जास्तीत जास्त वेळ घालवावा हेच शिवा काशीद यांचे लक्ष्य होते. वाया घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा होता, महत्वाचा होता, आवश्यक होता. मृत्यूक्षणी शिवा काशीद यांना मुळीच कल्पना नव्हती कि हा घातलेला 'गोंधळ' पावणार का? महाराज विशाळगडी सुखरूप पोचणार का? आपले बलिदान फळास येणार का? 

तेजस्वी सम्मान खोजते नही गोत्र बतलाके|

पाते है जग से प्रशस्ती  अपना  कर्तब दिखलाके || 

                                           ० हिंदी कविश्रेष्ठ दिनकर  

कितीतरी प्रश्न मनातच ठेवून शिवा काशीद काळाच्या पडद्याआड झाले असले तर भारतीय इतिहास पटलावर एक घव -घवित आणि अजिंक्य ठसा उमटवून गेलेत. 

या दरम्यान सहाशे मावळे, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि खुद्द महाराज विशाळगडाचा रस्ता आक्रमत होते. डोंगर कपार्यातून, चिखलातून, गर्द जंगलातून, गच्च रानवेलींमधून शक्य त्या वेगाने वारी पुढे पुढे जात होती. ज्या कड्यांनी आज पर्यंत मावळ्यांचे रक्षण केले, ज्या सह्यांद्रीच्या कुशीत मावळे लहानाचे मोठे झालेत, ते कडे जणू आज सगळा हिशोब मागित होते. पण महत्वाची गोष्ट अशी कि सिद्दीच्या सापळ्यातून सुटण्याचा हा बेत फार विचारांती आखलेला होता. महाराज आणि मावळे 'वेडात दौडले वीर' नव्हते. काळ, वेळ, हवामान, परिसराचा भूगोल आणि स्थलाकृती याची पुरेपूर जाणीव ठेऊन हा बेत आखला होता. प्रत्येक क्षण मोजलेला होता आणि प्रत्येक पाऊल मापून टाकले होते. शेवट काय असेल याची कल्पना करणे कठीण असले तरी हा जोहार नव्हता. धैर्य आणि धाडसाचा भक्कम पायावर बांधलेली आणि उत्तम प्रतीची रिस्क मॅनेजमेण्ट केलेली एक योजना होती. 

शिवा कशीद यांनी भूमिका चोख बजावत सिद्दीचा बराच वेळ वाया घालविला होता. पण त्या नंतर मात्र सिद्दी पुन्हा चेकाळून महाराजांच्या मागे लागला. हजार घोडेस्वारांची काळी सावली विशाळगडाच्या दिशेनी सरसावू लागली. पावनखिंडी पासून साधारण ४-५ कि.मी वर पांढरपाणी खेड्या जवळ सिद्दी च्या एका तुकडीने महाराजांना गाठले. पहिली झडप या गावाजवळ उडाली अशी नोंद आहे. पण त्या झडपित महारांना आणि बाजीप्रभूंनी लक्षात आले असणार कि इथे झुंजण्यात अर्थ नाही. मावळे रात्रभर पायी ३० कि.मी. चालून आलेले असतांना ताज्या दमाच्या घोडेस्वारां समोर तग लागणे कठीण आहे. मावळ्यांनी तिथून पळता पाय घेतला. पण आता सिद्दी ला मावळ्यांचा पत्ता लागला होता. उजाडू पण लागले होते. त्यामुळे प्रश्न एवढाच होता कि अजून कुमक येऊन सिद्दीचे सैन्य किती वेळात मावळ्यांना गाठणार. नवीन धोरणाचा विचार करणे आले. पळता-पळताच ठरवले असणार कि खिंडीचा (तेंव्हा त्या खिंडीस घोडखिंड म्हणत असत) उपयोग ढालीसारखा करायचा. खिंडीत सैन्याची मोठी कुमक एकत्र येऊ शकत नाही, घोडे पण उतरू शकत नाहीं. म्हणजे काही वेळ तर सिद्दी च्या सैन्याला टक्कर देणे शक्य होईल. बेत असा कि बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि ३०० बांदल मावळ्यांनी खिंड शक्य तितक्या वेळ रोखायची, सिद्धीच्या सैन्याला जणू डांबायचे. त्या वेळात उरलेल्या ३०० मावळ्यांना घेऊन महाराजांनी विशालगढ गाठायचा. तिथे पोचून महाराजांनी तोफा डागायच्या. तोफांचा आवाज ऐकताच बाजीप्रभू आणि मावळ्यांनी खिंडीतून बाहेर येऊन बाजूच्या जंगलात उड्या मारून पळून जायचे. 

मी जेंव्हा खिंडीत उतरलो तेंव्हा लोखंडाच्या शिडीने किमान तीस-चाळीस फूट उतराव लागले. महिना डिसेम्बर चा होता तरीहि  खिंडीत पाणी वाहते होते पण घोट्या पर्यंतच. खिंडीत मोठं मोठाले दगड आणि धोंडे आहेत. काही धोंडे तर चढून पुढे जावे लागत होते. काही दगडांना तर चक्क धार आहे. एवढ्या पावसात आणि वाहत्या पाण्यात अजूनही कशी धार आहे देव जाणे. थोडक्यात खिंडीत उड्या मारीतच आणि वर खाली करतच पुढे जाता येते. मी दोन-तीन वळणे घेत बराच पुढे गेलो. तर पुढे मोठं-मोठाली मुळे असलेली वृक्ष पण होती. एक सारखी नागमोडी वळणे घेत खिंड तीन चार कि.मी नंतर डोंगर माथ्यावर मोकळी होते. खिंड उतरून पुन्हा दहा-पंधरा कि.मी  घनदाट जंगल आणि माथा उतरून कोकणाच्या सीमेवर तुम्ही पोचता. थोडक्यात खिंड लढविणे तर दूरच राहिले, साधे पायी ओलांडून पुढे जाणे सुद्धा एक महत् कर्म आहे. सिद्दी च्या सैनिकांची 'स्वागता' च्या तयारीत च बरेचशे मावळे जखमी झाले असणार असे वाटते. बहुधा बाजीप्रभूंनी आणि महाराजांनी विचार केला असेल कि आपल्याला जरी कठीण जाणार असेल तरी मुसलमानी सिद्दीच्या सैनिकांना हि खिंड ओलांडणे आपल्याहून कठीण जाईल. लक्ष्य खिंड लढवून सिद्दी ला थोपवणे होते, त्यांना हरविणे नव्हते. महाराजांना विशाळगडी पोचायला वेळ मिळावा हा उद्देश होता मग पुढे सिद्दी चे काही का होईना. 

इथे सिद्दी बद्दल थोडे बोलणे आवश्यक आहे. हा मुसलमानी सरदार फार शूर आणि मुत्सद्दी होता. त्याने महाराजांचा आणि त्यांच्या युक्त्यांचा नीट अभ्यास केलेला होता. महाराजांना वाटले कि पाऊस सुरु होताच सिद्दी गाशा गुंडाळून आपल्या मार्गी लागले पण वेढा जसा लांबत गेला तशी सिद्दी ने पावसाची तयारी पण चोख केली. महाराज बोलणी करण्याच्या नावाखाली निसटतील याचीपण त्यांनी काळजी घेतली होती. कारण आम्ही उद्या किल्ला मोकळा करून शरण येणार असे सांगून महाराज आदल्या रात्री पळाले पण महाराज निसटले आहेत याचा गंध सिद्दी ला फार लौकरच लागला. त्याने लगेच सैन्य मागावर पाठवले. आणि शिवा काशीद च्या हुलकावणी नंतर सिद्दीने हेरले कि महाराज विशाळगडाकडे  जाणारा म्हणून त्याने त्वरित हजार घोडेस्वार त्या दिशेने पाठवलेत. आणि त्याही आधी, असे होण्याची शक्यता आहे हे समजून सिद्दी ने विशाळगडावर वेढा घालूनच ठेवला होता. पन्हाळा ते विशाळगडाच्या बुद्धिबळाच्या पटलावर सिद्दी ने महाराजांना चेकमेट केले होते. अर्थात बुद्धिबळाच्या पाटावर बाजीप्रभू नसतो, फुलाजीप्रभू नसतो, बांदल मावळे नसतात आणि पाटावर शिवाजी महाराजां सारखा राजा पण नसतो!  

थोडक्यात सिद्दी असो, अफझल असो, किंव्हा पुढे औरंग्या असो, महाराजांनी एक से एक धर्मांध पण शूर मुसलमानी योध्यांवर मात केली होती. 

महाराजांची रणनीतीतला मुत्सद्दीपणा त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बिकट प्रसंगी लखलखतो. महाराज कधीही डोक्यात राख घालून लढले नाहीत. 'सर बचे तो पगडी पचास' हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य होत. कमीत कमी जीवाची हानी होणे हे महत्वाचे. कमीत कमी जोखीम घेणे आणि तरीही रणनीती आणि राजकीय दोन्ही उद्देश्य साधणे हि त्यांच्या राजवटीचे जणू वैशिष्ट्य. महाराज नेहमी ठरवत कि कुठे, कधी आणि कसे लढायचे ते. शत्रू ला नेहमी विचारताच ठेवणे कि महाराजांची पुढली चाली कुठली. अफझल एवढे मोठे सैन्य घेऊन आला पण महाराजांच्या जमेच्या ठिकाणीच शेवटी महाराजांनी त्याला ठेचले. पन्हाळ्याच्या बिकट परिस्थितीत असूनही महाराजांनी बिथरलेल्या सैन्याला खिंडीमार्गेच आणले. अर्थात खिंड लढवणे सोपे नव्हे पण ती लढवली म्हणूनच आपण आज आपण बाजीप्रभू व बांदल मावळ्यांचे पोवाडे गातो. खिंड नेमकी कशी लढवली याचे फारसे ज्ञान नाही. धोंडे सोडलेत? दोरखंडांना लटकुन गनिमी काव्याने वार करीत राहिलेत? नेमके काय काय केले? पण जे का असेना, खिंड इंच-न-इंच लढवली. महाराजांना शेवटच्या पंधरा कि.मी ला सहा-सात तास लागलेत. विशाळगडाचा वेढा तुरळक होता. महाराज स्वतः दाणपट्टा घेऊन लढलेत. खालती धुमश्चक्री बघून गडावरचे मावळे दार उघडून मदतीला धावलेत. वेढा फोडून दार ओलांडून आत महाराज 'भांडी वाजवा, भांडी वाजवा' असे ओरडतच गडात गेलेत. 'भांडी' म्हणजे तोफा. भर पावसाळ्यात तोफा मेण घालून बंद करून आत झाकून ठेवलेल्या असत. त्या पुन्हा चालत्या करायला तास भर तरी लागला असेलच. बर, एक बार उडवून चालायचे नाहीत. एवढ्या पावसात पंधरा कि.मी दूर आवाज पोचायला हवा. म्हणजे आठ-दहा तोफा डागल्या गेल्या असणार. तोफांचा तो क्षीण आवाज कानी पडताच, उरलेल्या मावळ्यांनी जमेल तसा पळ काढला. तो पर्यंत बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि जाणे किती मावळे वीरगतीस प्राप्त झाले होते. महाराज सुखरूप होते. बाजीप्रभू आणि बांदल मावळ्यांनी आपल्या जीवाच्या काष्ठा अर्पण करून स्वराजाच्या होमकुंड धगधगत ठेवला. 

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी| 

जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी|

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा| 

मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा |

- कविवर्य कुसुमाग्रज 

ते कसे काढलेत, काय युक्त्या केल्यात, किती जगलेत आणि किती मेलेत हा तपशील काळाच्या पडद्या आड झाला असला तरी ते का काढलेत याचा विचार केला तर आजही हे लोक स्फूर्तिस्थाने का आहेत हे कळते. स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश, स्वाभिमान, स्वामीनिष्ठता, या शब्दांना अर्थ देणारी हे लोक आहेत. कर्तव्यनिष्ठ व कर्मनिष्ठतेचे हे प्रतीक आहे. आपला धर्म व देश लढण्याजोगा आहे आणि गरज पडेल तर मरण्याजोगा पण आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.  

धर्मांध व क्रूर मुसलमानी शेकडो वर्ष होत असतांना आपल्या छातीचे गड -कोट करून आपल्या देव, देश वर धर्माचे रक्षणार्थ असंख्य व अनाम बाजीप्रभूंमुळे आणि महाराजांसारख्या युगपुरुषानंमुळे आज आपण सनातन धर्म आचरु शकतो. आशा करू या कि असे वीर भविष्यात निपजण्याचे सामर्थ्य आपल्या समाजात सदैव राहील.