7/24/24

'Bird By Bird

परदेशी आणि परभाषिक भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांच्या आढावा घेण्याच्या या मालिकेत दुसरे पुस्तक म्हणजे 'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ') हे  ऍन लमोट (Ann Lamott ) यांचे पुस्तक आहे. मागल्या लेखात आपण प्रसिद्ध भारतीय लघुकथेचें भाषांतर केलेल्या पुस्तकाचा आढावा घेतला. यंदाचे पुस्तक आणि त्याचा विषय थोडा वेगळा आहे. एक, कि पुस्तक खऱ्या अर्थाने विदेशी आहे, म्हणजे, अमेरिकेत प्रकाशित झालेले आणि अमेरिकन लेखकाचे आहे. आणि दुसरे असे कि, तब्बल तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झाले असले तरी हा विषय आपण चिरायू म्हणू शकतो. पुस्तकाचे नाव वाचून पुस्तकाचा विषय नेमका कुठला असेल हा कयास करणे कठीण आहे. पुस्तक पक्ष्यांबद्दल नाहीं! लेखन कसे करावे हा पुस्तकाचा विषय आहे. 'कदम कदम बढाये जा' या वाक्प्रचाराचा एका अर्थाने इंग्रजीत भाषांतर आपण 'बर्ड बाय बर्ड' असे करू शकतो. लेखनाकडे कसे बघावे, लेखन म्हणजे काय, लेखन का करायला हवे, लेखन का केल्या जाते अश्या विविध अंगांनी विचार करीत ऍन लॅमोट्ट विषय प्रवेश करतात. आणि शाळेतील विषय शिकवावा तश्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकीत मनातील विचारांना किंव्हा विषयाला लेखनकृती कशी द्यायची हे त्या शिकवितात.  

मनुष्य प्राण्याच्या कंठातून जेव्हापासून शब्द बाहेर पडू लागले तेंव्हापासून तो काही तरी लिहिण्याची धडपड करितो आहे. आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला लिहिलेले शब्द आवश्यक असतात. तसेच शब्दांचे आयुष्य मनुष्यपेक्षा नक्कीच अधिक असते. मनुष्याचे विचार, अनुभव, उपदेश, कल्पना इत्यादी जिवंत रहावे म्हणून अक्षर व शब्दांना प्रमाणबद्ध केल्या गेले आणि त्यातूनच भाषेचा उदय झाला. बोली भाषा आणि लिहण्याचे अक्षर याचे एकीकरण होऊन संस्कृतीचा उदय झाला. मग संस्कृतीचे जतन करायला नव-नवीन शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादीचा उदय झाला आणि जगभरात विविध संस्कृती नांदायला लागल्यात. सनातन भारतीय संस्कृती या पायावर तर गेले हजारो वर्षे उभी आहे. बोलण्याचे आणि लिहिण्याचे एवढे महत्व असतांना आणि मनुष्य जातील एवढा अनुभव या क्षेत्रात असतांना समस्त मनुष्य जात लिहिण्यात आणि बोलण्यात निष्णात असणार किंव्हा असायला हरकत नाहीं? 

अर्थात असे नक्कीच नाहीं. बडबड करणे म्हणजे बोलणे नाहीं आणि लिहिल्या गेलेले लेखन नाहीं. बहुतांश बोललेली वायफळ आणि बाष्कळ असते! बहुतांश लिहिल्या गेलेले नोकरी-धंद्या साठी असते. कारण लेखन, प्रासंगिक, मनोगत, ललित इत्यादी, हे फार कठीण काम आहे. शब्दांना नेमका असा आकार द्यायचा कि वाचणाऱ्यांना ते शब्द रोचक, अर्थपूर्ण वाटतील, किंव्हा खटपट करून शब्दांना गर्भित अर्थ प्राप्त करावा कि वाचकांना अभिप्रेत उमजेल. किंव्हा शब्दांमध्ये आपले अनुभव असे गुंफावे कि वाचणाऱ्यांना तो अनुभव आपलासा वाटेल. सूक्ष्म भावनांच्या उत्कटतेला शब्दांनी आकार देणे, प्रतिभेच्या उत्स्फूर्ततेला वाक्यांनी उत्तुंग बनविणे, हे काम सोपे नाहीं.  पण मग काय करायचे? लिहायची इच्छा आहे पण लिहिता येत नाहीं, कुठून 'श्री' करायचे हे कळत नाहीं, कुठे नेमके संपवायचे कोणाबद्दल, कशाबद्दल, कुठल्या काळाबद्दल, कुठल्या घटनेबद्दल, काहीच उमजत नाहीं. अश्या स्थितीत बर्ड बाय बर्ड पुस्तक हाताशी येते. 

पुस्तकाची भाषा आणि लेखनपद्धती खमंग आहे. किंव्हा एकाद्या टवटवीत फुलांनी भरलेल्या छोट्याश्या बागेसारखी प्रसन्न, आनंदी आणि मुख्यतः, सकारात्मक. लिहिता येत नाहीं माहिती आहे पण ते का, या प्रश्नाच्या  भानगडीत पडण्यापेक्षा, कसे या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक आहे. स्वतःच्या आयुष्यातील काही घटनांना गोवून आणि थोर-मोठ्या इंग्रजी लेखकांशी या विषयी केलेल्या संवादाद्वारे, लेखनाकडे नव्हे तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देते. लेखन हा गंभीर प्रकार नाहीं. अगदी जरी गंभीर विषयांवर लिहायचे असेल तरी. लेखन हा अनुभव हा स्वतःला आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे. हि एक कला आहे. आणि कलेचे पहिले लक्ष्य स्वानंद असते. अमूर्त विचारांना, भावनांना, कल्पनेला, एका स्वतः घडवलेल्या नवीन विश्वाचा आविष्कार करून वाचकांसमोर ठेवणे हि एक उपलब्धी आहे. पुस्तकाचा सूर आणि स्वर एकूण आनंदी आहेत. लेखन कठीण आहे पण लिहायला शिकविणे हे अजून कठीण आहे. पण हे पुस्तक वाचून लिहायला स्फूर्ती मिळते. लेखन हे जगण्यापेक्षा वेगळे नाहीं आणि त्यामुळे त्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाहीं. छोटे छोटे टप्पे गाठून एकादी लघु-कथा आज आपल्या प्रत्येकात आहे. 

पुस्तकाची अनुक्रमणिका बघाल तर लांब आहे पण पुस्तकाचे पृष्ठसंख्या फार नाहीं. पुस्तकाचे चार मुख्य भाग आहे - १) Writing , २) The Writing Frame of Mind , ३) Help Along the way , ४) Publication  - and  Other  Reasons  to  Write .आणि पुढे हे चार मुख्य भाग अजून छोट्या छोट्या धड्यांमध्ये भागले आहे. अन लमोट या अमेरिकेतील कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन ( creative writing ) हा अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. पण एका अभ्यासक्रमाप्रमाणे शिकून लिहिण्याचे ठरविले तरी लिहिण्याचा कुठला जादुई मंत्र नाहीं हे त्या लगेच स्पष्ट करतात. 

"I wish i had  a secret  i  could  let  you  in  on , some  formula  my father  passed to  me  in  a  whisper  just  before he  died , some  code  word  that  has  enabled  me  to  sit  at  my  desk  and  land  flights  of  creative  inspiration  like  an  air -traffic controller . But I don 't " 

त्यांच्या मते पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया हि लिहूनच सुरु होते. कोंबडी पहिले कि अंड पहिले सारखेच आहे. आधी लिहायला लागा, लिहिता लिहिता लिहिण्याची प्रगती होईल. सोबत सतत वाचा, वाचून वाचून लिहिण्याची संयुक्तता साधेल. खुर्चीवर बसून भिंतीकडे (किंव्हा आकाशाकडे!) बघून शब्द सुचत नाहीं, वाक्य जमून येत नाहीत, आणि कल्पना भराऱ्या घेत नाहीत. कल्पनेचे 'विलास' बांधायचे तर अक्षरशः दगड-धोंडे दोहून नेण्यासारखी ढोर मेहेनत करायला हवी. आता कल्पना विलासाचा पाय असो कि गोष्टीची बांधणी, सुरुवात नेहमी लहानच केली योग्य. गोष्ट थोडी बाजूला ठेवा आणि अनुभवाचा एकदा परिचछेद लिहा. कुठलाही अनुभव असू द्या. वैयक्तिक किंव्हा ऐकलेला. चित्र काढायच्या आधी वहीच्या मागल्या पानावर पेन्सिल ने काहीतरी हलकेच रेखाटल्या सारखे. बरं, काही तरी सखोल, तात्त्विक, किंव्हा शिकवून जाईल असे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीं. सकाळी भाजी आणायला म्हणून निघालेल्या 'अहो' आणि 'अग' मधील 'सुखद' संवाद? एक पण नक्कीच लिहू शकतो. घरून ऑफिस मध्ये जाण्याच्या प्रवास? त्यात नित्यनेमाने दिसणार, भेटणारी पात्रे? नुसता घटनाक्रम लिहून बघणार नाहीं. पुढचे धडे वाचत गेलो कि या घटनाक्रमाला गोष्टीत कसे रूपांतरित करता येईल हे शिकता येते. पात्रांना स्वभावगुण कसे घ्यायचेत, परस्परसंवाद, भाषा कुठली वापरायची? कथानक कसे हवे? एक एक धडा वाचत गेलो कि रेखाचित्राची अजून एक रेघ आणि कथानकाचा अजून एक छटा रंगवीत येऊ शकते. 

पुस्तकातील हा धडा तर होतकरू लेखकाने त्याच्या सान्निध्याचा सूक्ष्म परीक्षण करायला शिकवितो. हे परीक्षण कसे करावे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि त्याचा सुद्धा सराव करायला हवा. अनेक थोर लेखकांनी त्यांच्या घराचा, गावाचा, परिसराचा, लहानपणी त्यांच्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा, मित्रांचा ठसा आपल्या लेखकात ठळकपणे उमटवतात. ग.दि. माडगूळकर त्यांच्या 'मंतरलेल्या दिवस' या आत्मचरित्रपर पुस्तकात या बद्दल म्हणतात " अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर साहित्यकार कितीही प्रगत झाला, तरी बाल्यातील संस्कार व ऋणानुबंध त्याच्या साहित्यकृतीत वारंवार डोकावत रहातात. माझं खेडेगाव, त्या खेड्यातील चालीरीती; तिथलं वातावरण, तिथला झाड-झाडोरा, माती-पाषाण, असेच माझ्या स्मरणात टिकून राहिले आहेत. खेड्यातल्या माणसांच्या आकृती आणि स्वभावरेखाई अशाच मनावर ठासून गेल्या आहेत. नाव वाङ्मय लिहीत असताना त्यातील अनेक दुर्श्य, अनेक प्रसंग आणि अनेक स्वभावच्छटा माझ्या लिखाणात येतात; सदैव येतात. (मोहोरलेला कडुलिंब)

वी.एस. नायपॉल हे इंग्रजी भाषेतील दिग्गज लेखक होऊन गेलेत. सन २००१ चे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे मूळ भारतीय रक्ताचे असलेत तरी त्यांचे पूर्वज काही पिढयांपूर्वी सध्या ज्याला वेस्ट-इंडिज म्हणतो या देशात स्थलांतरित झाले होते. तिथल्या छोट्याश्या गावात नायपॉल यांचा जन्म झाला. त्यांनी पुढे त्यांच्या जन्म इंग्लंड मध्ये काढला तरी आयुष्याची पहिली १८-१९ वर्षे, जी वेस्ट-इंडिज मध्ये कंठिलीत, त्याचे पडसाद त्यांच्या लिखाणात नेहमीच दिसतात. त्यांचे मिगुल स्ट्रीट (Miguel Street ) हे पहिले लघु-कथांचा संचय जो प्रकाशित झाला. एका दुपारी ते लंडन मध्ये त्यांच्या टाईप-रायटर वर शून्यात बघत बसले होते. काय लिहायचे, कशावर लिहायचे याचा विचार करीत. अचानक, शून्यात, त्यांना त्यांच्या लहानपणाचे घर दिसले, त्यात त्यांचे वडील बसलेले होते आणि समोरून त्यांचा शेजारी 'बोगार्ट' जात होता. त्यांच्या वडिलांनी त्या बोगार्ट ला हाक मारली 

"‘Every morning when he got up Hat would sit on the banister of his back verandah and shout across, “What happening there, Bogart?”‘ 

हा संवाद त्यांनी लिहिलेल्या पहिल्या लघु-कथेची सुरुवात ठरली. 

पुस्तक आणि त्यातील धडे फक्त लिहायला मदत करून थांबतात असे नाहीं. कथानकाच्या विविध अंतरंग कसे शोधायचेत, आणि मग रंगवायचेत हे पण एन लमोट समजावतात. पुस्तकात "Moral Point Of View " हा धडा मला फार आवडला. 

"To be a good writer, you not only have to write a great deal but you have to care. You do not have to have a complicated moral philosophy. But a writer always tries, I think, to be a part of the solution. " (पृष्ठ १००)

गोष्ट असेल तर विषयाबद्दल, कथानकाबद्दल, घटनेबद्दल, पात्रांबद्दल आणि मनोगत असेल तर स्वतःबद्दल, आपुलकी आणि जिव्हाळा हवा. कोरड्या मनाने शब्दांचा अभिषेक चढविणे कठीण आहे. बहुधा अशक्य आहे. वाचकांना कळत-नकळत ती त्रयस्थता नक्कीच जाणवेल. असे होऊ शकते कि गोष्ट अचानक असे वळण घेईल कि रंगवलेल्या पात्रांची भूमिका पटणार नाहीं. रंग विस्कटलेल्या सारखा वाटेल पण खऱ्यात सुद्धा सीमारेषेच्या चौकटीत आयुष्य बसत नाहीं तर गोष्टींची पात्रे त्याला अपवाद कसा ठरणार? पण जिव्हाळा कायम ठेवला तर गोष्ट वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेईल. पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे पात्रे खऱ्या लोकांवर आधारित आहेत पण खरी नाहीं. आपण आपल्या पोराला अभिमानाने पाहुण्यांसमोर बोलावितो त्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येक पात्र पु.ल. वाचकांसमोर उभी करतात. सखाराम गटणे आणि अंतू बर्वे हे पात्रे विरोधाभासी आणि जणू वेगळ्या विश्वात वावरतात. पण पु. ल. दोघांवर तेवढेच प्रेम करतात. आणि हे प्रेम वाचकांच्या हृदयी कळते. सन १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही लोक विकत घेतायत आणि वाचतायत. 

पुस्तकात पुढे प्रकाशनाबद्दल हि धडा आहे. हे पुस्तक तब्बल तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. तेंव्हा पुस्तकांद्वारेच लेखन होत. आणि त्यासाठी प्रकाशनगृहेच लागत. पण गेल्या तीन दशकात परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. प्रकाशनगृहे आहेत आणि लागतील पण आता प्रकाशाची विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे लिहिलेले वाचकांपर्यंत पोचवायला अधिक सोपे झाले आहे. अगदी स्वप्रकाशन असेल तरी कुठल्याही तऱ्हेचे प्रकाशन हा एक अंतिम टप्पा झाला. प्रकाशन करणे हेच फक्त लक्ष्य नको. सुरुवातीला म्हणालो तसे, लेखन हि अविष्काराचा आनंद देणारा एक मार्ग आहे. गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न हा सांप्रत परिस्थिती, जग, समाज उमजण्याचा मार्ग आहे.

"If people cannot write well, they cannot think well, and if they cannot think well, others will do their thinking for them."   - ओरवेल

समाज प्रबोधन, समाजउत्थान करण्याचा लेखनासारखा मार्ग नाहीं. फक्त गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास बघितला तरी सगळ्या मोठं-मोठाल्या बदलांचा किंव्हा क्रांत्यांचे मूळ लिहिलेले पुस्तकच असेल. बर, क्रान्ति वगैरेच्या भानगडीत नाहीं पडला तरी लेखनाचे महत्व कमी होत नाहीं. स्वतःची स्वतःला ओळख होण्याचा लेखन एक उत्तम मार्ग आहे.  

लेखन नेहमी गंभीर असावे असे काही आवश्यक नाहीं. लेखन बोधीप्राय हवे असेही नाहीं. लेखन जगाकडे बघण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. खूपदा बोलून आपल्याला दिसत असलेले जग दुसऱ्यांना दर्शवू शकत नाहीं. अश्यावेळेस लेखणी (किंव्हा की-बोर्ड!) आपला मित्र ठरतो. लेखनाद्वारे किंव्हा गोष्टींद्वारे आपण आपल्या शेजार-पाजारच्या जगाला वेगळ्या रंगाने रंगवू शकतो. कोण म्हणत कि जसा रंग दिसतो तोच गोष्टीला द्यायला हवा? पाहिजे तो रंगवू शकतो. आकाश निळ्याचे हिरवे करू शकतो, चांगल्याला वाईट, आणि वाईटाला चांगला करू शकतो. किंव्हा चांगल्या वाईटाचा दोन्ही छटा एकाच व्यक्तिमत्वात ओतू शकतो. आकाश ठेंगणे ठरेल आपल्या कल्पनेच्या भरारी पुढे. अतर्क्य असे काहीच नाहीं इथे. खऱ्या आयुष्यात असे स्वातंत्र्य कधीच मिळायचे नाहीं. आणि हे सगळे करण्यात जो निखळ आनंद मिळेल तो फक्त आपलाच! 

पुस्तकाचे माहात्म्य आणि पुस्तकाचे यश असे कि वाचक काही तरी लिहायला उद्युक्त होतो. लिहायला प्रयोजनाची आवश्यकता नाहीं. बाळपणी चालायचे शिकायला प्रयोजन हवे होते का? बोलायला? तसेच लिहिण्याचे आहे. लिहायला लागायचे. सराव करायचा. एकदम उठून कोणी गीत-रामायण लिहू शकत नाहीं (माडगूळकरांनी गीत-रामायण लिहिले तेंव्हा त्यांना तब्बल वीस वर्षांचा विविध-रंगी लेखनाचा अनुभव होता.) पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी आणि त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही नक्कीच हवे. 

7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




7/15/24

'The Greatest Indian Stories Ever Told' - एक परीक्षण

हा पुस्तक परिचय 'पंचधारा' या त्रैमासिकाच्या जून महिन्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे. हे साहित्यिक मासिक मराठी साहित्य परिषद, हैद्राबाद द्वारे प्रकाशित होते. या मासिकाचे फेसबुक वरील पत्ता येथे आहे 


पार्श्वभूमी:

भारतीय भाषा प्रगल्भ आहेतच पण त्या सोबत प्रत्येक भाषेचे साहित्य हे त्या भौगोलिक प्रदेशाची, त्या प्रदेशाच्या इतिहासाची आणि बोलणाऱ्यांची ओळख आहे. कुठल्याही भाषेचा प्रवास हा सामाजिक व वैयक्तिक अनुभव ते बोली शब्द ते साहित्य असतो. आणि पुढे हीच भाषा साहित्य संस्कृतीला जन्म देण्याचे महत्वाचे काम करिते. नुसतेच जन्म नव्हे तर साहित्य संस्कृतीचे पालन-पोषण सुद्धा करते. म्हणूनच साहित्याला अनन्यसाधारण महत्व असते. भाषेच्या साहित्यात कथा आणि गोष्टी हा एक महत्वाचा अंग असतो. कारण  जीवनातील कधी सामान्य किंव्हा कधी मार्मिक अनुभव हे गोष्टींद्वारे पटकन टिपल्या जातात. ग्रंथ-कादंबऱ्या लिहायला आणि वाचायला वेळ लागतो. पण कथा म्हटले कि योग्य तो संदेश किंव्हा झालेले घटना पटकन पोचवता येते. हे काम सोपे आहे असे मुळीच नाहीं. प्रभावी गोष्ट लिहिणे फार कठीण आहे. काही पानांच्या कक्षेत प्रभावी कथानक आणि योग्य पात्रे फुलवावी लागतात. बहुधा म्हणूनच बहुतेक प्रसिद्ध साहित्यिक हे उत्तम कथाकार सुद्धा आहेत. 

आपण ज्या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत त्यात भारतभराच्या भाषांमधील लिहिलेल्या गोष्टींचे भाषांतर इंग्रजीत केलेले आहे. हा कथा संग्रह म्हणजे एक काळ, वेळ, विविध सामाजिक स्तर, विविध भौगोलिक प्रदेश या सगळ्यांचा प्रवास आहे.

'केल्याने देशाटन,पंडित मैत्री,सभेत संचार|

शास्त्र ग्रंथ विलोकन,मनुजा येतसे चातुर्य फार||

या पुस्तकातील गोष्टी वाचतांना असा काहीसा अनुभव मला आला. या गोष्टी भारतातील भिन्न भाषा आणि प्रदेशांमध्ये जरी लिहिल्या असल्यात तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तरी गेल्या शंभर वर्षातील भारतीयांचे अनुभव साधारणत: एकाच पटलावरचे आहेत. आणि हे ऐक्य या गोष्टींमधून जाणवते. आता एकच पटल म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने गेल्या शंभर वर्षात भारत एक राष्ट्र आणि एकसंध राष्ट्र म्हणून उदयास आले. त्यामुळे गेल्या शतकातील घडलेल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटनांची चादर सगळ्यांसाठी एकच आच्छादली आहे. पण चादर एकाच आच्छादली असली तरी सुरकुत्या सारख्या नाहीत. आणि घटनांचे उमटलेले विविध पडसाद गोष्टीद्वारे आपल्या समोर येतात.  उदाहरणार्थ, बंगाल, बिहार मधले दारिद्र्याचे अनुभव मुंबई किंव्हा तामिळनाडूतील अनुभवांपेक्षा वेगळे बोलतात पण त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारचे स्वातंत्र्योत्तर आखलेल्या तोकडे आर्थिक धोरण. याच्या उलट, भारताच्या काना-कोपऱ्यात पसरलेली जातीय विषमता. आणि त्याच्या विरोधात भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर आखलेले आक्रमक धोरण. अजून एक उदाहरण म्हणजे भारतावरचे इंग्रजांचे राज्य. जवळपास ९० वर्षे भारतावर इंग्रजांची अनभिषिक्त सत्ता होती आणि त्याचे दुष्परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर झालेत. पण बंगालच्या उच्चवर्णीयांची अनुभव, बिहार मधील शेतकऱ्याच्या तुलनेत फार वेगळे आहेत. 

हे अनुभव देशाच्या आणि समाजाच्या साहित्य द्वारे प्रतिबिंबित झाली आहेत. प्रत्येक भाषा आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यातील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी जणू त्या मातीतल्या असतात. पण वर म्हंटल्या प्रमाणे भाषा अनेक असल्यात तरी सूर एकच आहे. 

अजून एक लक्षात घेण्याजोगा महत्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य आणि इतिहासाची गाठ-भेट. इतिहास म्हणाल तर घटना आणि तारखा. पण याला साहित्याची बहार जेंव्हा येते तेंव्हा त्या तारखा आणि घटनांना एक व्यक्तिमत्व प्राप्त होते. रुक्ष इतिहास साहित्याच्या संगतीत जणू जिवंत होतो.असा जिवंत साक्षी कथा आणि गोष्टींद्वारे मिळतो. शिवाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी लिहिला आहे. तो काळ खंड बखरीं मध्ये हि नोंदला गेला आहे. आणि महाराजांचा इतिहास साधारण सगळ्यांना माहिती सुद्धा होता पण श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांनी जेंव्हा गोष्टीरूपी इतिहास जनमानसा समोर ठेवला तेंव्हा महाराज आणि मराठ्यांचा इतिहास जणू पुन्हा जागृत झाला, उल्हसित झाला. जर का श्री पुरंदऱ्यांचा हा ऐतिहासिक गोष्टी रुपी ग्रंथ तामिळ किंव्हा असामी भाषेत उपलब्ध झाला तर मराठ्यांचा हा थोर इतिहास त्या भागांमध्ये हि नक्कीच रुजेल.   

पण चेष्टा अशी हा भारताचा हा साहित्यिक ठेवा डोळ्यासमोर असूनही त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाहीं. तामिळ साहित्य वाचायला तामिळ शिकायला किती आणि कसा वेळ द्यायचा? बरं तामिळ काही नवीन भाषा नाहीं, ती हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. पण 'नवीन' भाषा म्हणून बंगाली भाषे कडे बघितले तरी परिस्थिती तशीच आहे, बंगाली साहित्याचा आनंद बंगाली वाचणाऱ्याव्यतिरिक्त कोणाला उपलब्ध नाहीं. असे वाटते कि एका घरात राहून, भावंडे असूनही एका-मेकांशी परिचय नाहीं, जवळीक नाहीं, स्नेह नाहीं. 

पुस्तकाचा परिचय:

अश्या विचित्र परिस्थितीत इंग्रजी भाषा उपयोगास येते. इंग्रजी सत्तेच्या अस्तानंतर भारतात इंग्रजीचे प्राबल्य वाढले. स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने इंग्रजीला सरकारी भाषा म्हणून प्राधान्य दिले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या वाढत्या बळामुळे इंग्रजी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हळूहळू भारतीयांनी हि इंग्रजीला 'आपलेसे' केले आणि आज भारतीय एका-मेकांशी बोलायला इंग्रजीचा आधार घेऊ लागली आहेत. पण या परिस्थितीचा, म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्राबल्याचा, एक चांगला परिणाम म्हणजे भारतातील विविध भाषिक  साहित्य इंग्रजीत भाषांतरे करून आज सर्व साहित्यप्रेमींना उपलब्ध होते आहे. या उपक्रमा अंतर्गत काही होतकरू भाषाप्रेमी, साहित्यिक आणि भाषेच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन भारतातील विविध भाषेंमंधील पन्नास लघु कथांचे भाषांतर करून एक पुस्तक छापले आहे. पुस्तकाचे नाव आहे "थे ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीएस एव्हर टोल्ड" (The Greatest Indian Stories Ever Told  ). याचे मुख्य संपादक श्री अरूणव सिन्हा आहेत. अश्या अनुवादित साहित्य संबंधी पुस्तके प्रकाशन करण्याची खासियत या प्रकाशनगृहाची आहे. या संबंधित अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे. उदाहरणार्थ 'The Greatest Marathi Stories Ever Told "  

अश्या प्रकारच्या पुस्तकाचे संपादन कार्य सोपे नाहीं. कुठल्या गोष्टी निवडायच्या आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठले लेखक निवडायचेत? इथे संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करायला हवे. निवडलेल्या भाषेंमधील प्रसिद्ध लेखक त्यांनी चांगले निवडले आहेत. लेखक यादीतील काही लेखक भारतभर प्रसिद्ध आहेत. जसे महेश्वर देवी (बंगाली) , सरतचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली), इस्मत चुगताई (उर्दू) , के. एस. दुग्गल (पंजाबी), के. आर. नारायण (मूळ कथाच इंग्रजी आहे) तसेच मुन्शी प्रेमचंद (हिंदी) आणि अमृता प्रीतम (पंजाबी). पण या व्यतिरिक्त लेखक किंव्हा कथा ज्या फक्त मूळ भाषेतच प्रसिद्ध आहेत, त्यांची हि निवड छान केली आहे. उदाहरणार्थ, व्हायकों मुहम्मद बशीर हे मल्याळम भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार आणि साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य शाळेच्या मल्याळम पाठ्यपुस्तकांमधे असतात. प्रसिद्ध मराठी दलित साहित्यिकअण्णाभाऊ साठे हे असेच अजून एक उदाहरण आहे. त्यांची प्रसिद्ध आणि हृदयद्रावक कथा 'स्मशानातील सोने' आम्हाला इयत्ता १०वीच्या वर्गात होती. 

विषय प्रवेश:

या कथांचा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळापासून १९९० च्या दशकापर्यंत आहे असे जाणवते. त्यांच्या पृष्ठ यादीत कथा प्रकाशनाच्या दिनांक दिलेली नाहीत पण कथांमधून दिसणारे समाज दर्शन म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीन-चार दशकातील ढासळती अर्थव्यवस्था, सर्व क्षेत्रात कमी होत गेलेले संधी मार्ग, लोकांच्या खिशातील पैशांचे कमी होत चाललेले दाम आणि खिशात पडायला कमी होत गेलेला पैसे आणि सगळ्यात मुख्य, या सगळ्याचा समाज प्रणाली आणि सामाजिक संस्कृतीवर होणार विपरीत परिणामांचा लेखा-जोखा. मुन्शी प्रेमचंद यांच्या कथा उत्तरेतील आणि मुख्यतः बिहार-उत्तर प्रदेशातील दारिद्र्य आणि कारुण्य दर्शवितात. त्यांची एक 'कफन' कथा याच प्राश्वभूमीवर असली तरी गोष्टीतील परिस्थितीला दोषी स्वतः कथानायकच आहेत. कथेतील दारिद्र्य जरी अंगावर येत असले तरी मनुष्याचे कुठल्या थराला पतन होऊ शकते हे बघून मन विषण्ण होते. पण मला त्या कथेतील प्रासंगिक विनोद जाणवून हसू पण आले.  

इस्मत चुगताई यांची कथा ७० किंव्हा ८० च्या मुंबईचे दर्शन घडविते. हि कथा स्वानुभवावर आधारित आहे असे वाटते. पण यातील दारिद्र्य टोचत नाहीं कारण यातील पात्रे जरी गरीब असलीत तरी लाचार नाहीत. हि पात्रे त्यांना हवे तसे जीवन हे पत्रे जगतांना दाखविली आहेत. दारिद्रय आणि लाचारीतील मुख्य अंतर म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. मुंबईतील हि कामसू पण गरीब पात्रे कोणालाही दोष देतांना दिसत नाहीत. 'आलीय भोगासी असावे सादर' या म्हणीप्रमाणे ते मिळतील ते क्षण भोगत जीवन कंठीत आहेत. 

महेश्वता देवी यांची कथा फार भन्नाट आहे. त्यांचे साहित्य वाचण्याचे भाग्य मला आधी लाभले नव्हते. गोष्ट चित्रपटासारखी समोर घडते आहे असा भास होतो. कोलकाता येथे बेतलेली हि कथा जेंव्हा शेवटल्या परिच्छेदात उलगडते तेंव्हा एखादे वेलबुट्टी केलेले कापड एकदम उलगडल्या वर जसे पिसारा फुलल्यासारखे झगमगावे तास भास होतो. कथेतील आधी विस्मित करणाऱ्या घटनांचे आकलन होते. मला स्वतःला हि कथा फार आवडली. 

अजून एक कथा म्हणजे शहनाझ बशीर यांची काश्मिरी कथा. हे कथा मूळ इंग्रजीतच लिहिली आहे.  शहनाझ बशीर हे पुस्तकातील इतर कथाकारांच्या तुलनेत तरुण आहेत. त्यांचा जन्म सन १९८० चा आहे. त्यांच्या जन्माचे वर्ष मी यासाठी सांगितले कारण त्यांच्या वाढत्या वयात त्यांनी काश्मीर मध्ये इस्लामी दहशतवाद जवळून बघितला असणार आणि अनुभवाला असणार. कारण त्या अमानुष आणि हिंसक दशकाचे प्रतिसाद त्यांच्या लघुकथेत प्रकर्षाने जाणवतात. गोष्टीतील पात्रे दारिद्र्याच्याच पाळण्यातच  जीवन कंठीत आहेत पण येथे जीवाची भीती आणि लाचारीचा संघर्ष चालू आहे. एका बाजूला धर्मांध हिंसेचे घरातच सांडलेले रक्त तर दुसरीकडे त्याचा धर्मांधतेमुळे खालावलेली पोटे. एका बाजूला भीतीपोटी त्याच धर्माशी दाखवावी लागणारी निष्ठा तर दुसरीकडे निष्ठुर वास्तवात. गोष्टीतील 'नायक' त्याच्या  सामान्य बुद्धिमत्तेस जे कळेल आणि वळेल तसे पुढे उभ्या ठाकलेल्या अक्राळ-विक्राळ परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सत्तांतरे असो, युद्ध असोत, धर्मांधता असो कि लहान-मोठ्या क्रान्ति असोत, त्यात काष्ठा सामान्य बापुड्याच्याच पडतात. जगाची हीच रीत आहे. आपला कथानायक याला अपवाद नाहीं. आमच्या शाळेच्या बालभारतीच्या 'लाल चिखल' म्हणून एक धडा होता. त्याची आठवण मला बशीर यांची हि कथा वाचतांना झाली. 

सगळ्या कथा दारिद्र्याशी किंव्हा संघर्षाच्या नाहींत. 'नादर सर' हि कथा जरी काही दशकांपूर्वीच्या चेन्नई शहराजवळ रेखाटली असली तरी हा सकारात्मक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेला आहे. गोष्टीचे लेखक सुंदर रामास्वामी यांनी शालेय जीवन आणि खासकरून भारतीय शाळेतील खेळाचे महत्व अचूक टिपले आहे. तामिळ भाषेतीलच या पुस्तकातील अजून एक गंमतीदार गोष्ट म्हणजे 'कल्की' उर्फ आर. कृष्णमूर्ती यांची इंग्रजांच्या काळात बेतलेली कथा - 'गव्हर्नर'स व्हिसिट'. एक उच्च इंग्रज अधिकारी गावात येणार आहे हे कळल्यावर, त्या गावातील दोन धनाढ्य शेठांची धावपळ होते याचे वर्णन आहे. आर. कृष्णमूर्ती स्वतः एक स्वांतत्र्य सेनानी होते त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात श्रीमंत आणि सुशिक्षित शेठ लोक इंग्रजांची बाजू घेत असत किंव्हा इंग्रज अधिकाऱ्या समोर वर-वर करायला चढाओढी कसे करीत याचे जवळून निरीक्षण केले असणार. त्याच धाग्याला घेऊन त्यांनी हि गंमतीदार कथा विणली आहे.

काही कथा, सुंदर कल्पना रम्य आहेत. त्या सूचक किंव्हा समाज किंव्हा परिस्थिती दर्शनपर नाहीं. सुब्रमणिया भारती यांची तामिळ भाषेतील कथा या श्रेणीत मोडेल. कल्पना विलासित हि कथा दोन कावळ्यांवर आहे. हे दोन कावळे नवरा-बायको दाखविले आहेत. जरी मानवी विश्वातून झेप घेतली असली तरी आपले पाय, म्हणजे कल्पनाशक्ती, मानवी अनुभवांच्या साखळ्यांमध्ये जखडले असतात. कावळ्यांचा अनुभव आपल्याला कधीच कळायचे नाहीं. पण मानवी अनुभवांच्या ब्रशने भारती यांनी या कावळ्या दाम्पत्यावर फार सुरेख कथा रेखाटली आहे. अजून एक अशी कथा म्हणजे लक्ष्मणराव सरदेसाई यांची कोकणी कथा गोव्यातील हिरवळीसारखी सुंदर आहे. यात नकारात्मकता मुळीच नाहीं. गोव्यातील ओढे, ओहोळ जसे समुद्राकडे वाट काढीत जातात तशी हि कथा वळणे घेत जाते.  एम. टी. वासुदेवन नायर यांची मल्याळम कथा सरकारी नोकरी करणाऱ्या पण घटस्फोटित स्त्री जीवनावर आहे. लग्न, पोरंबाळं हि ओझी घेऊन स्त्रीने आपले जीवन लग्न आणि पोराबाळांपुरतीच सीमित ठेवावे हि आपल्या समाजाची अपेक्षा आहे आणि ते एक बंधन सुद्धा आहे. पण लग्न जर अपेक्षित असेल अनपेक्षित असले तरी घटस्फोट हि समाजाने स्वीकारायला हवा. अर्थात तसे होत नसते. आणि खासकरून सुशिक्षित, पांढरपेशा शहरातील समाजाला हे पचवायला नक्कीच कठीण जाते. अश्या परिस्थिती कथानायिकेला अनपेक्षित व्यक्तीकडून सहानभूती मिळते. आणि तेवढेच नव्हे तर ती व्यक्ती नवीन मार्ग दाखवीत प्रोत्साहन पण देते. 

परिचित-अपरिचित कथांव्यतिरिक्त पुस्तकात काही अति-प्रसिद्ध कथा पण आहे. जसे रस्किन बॉण्ड यांची 'ब्लू अम्ब्रेला' (मूळ इंग्रजी),  श्री रबिन्द्रनाथ टागोर यांची 'काबुलीवाला' (मूळ बंगाली) , श्री मुन्शी प्रेमचंद यांची 'कफन' (मूळ हिंदी) किंव्हा अमृता प्रीतम यांची स्टेंच ऑफ केरोसिन  या कथा पण वाचायला मिळतात. अमृता प्रीतम यांची हि गाजलेली कथा मूळ पंजाबी भाषेत आहे आणि याचे भाषांतर प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी केले आहे. 


या पुस्तकाच्या लेख मालिकेत थोड्या त्रुटी आहेत. मराठी भाषेतील कथा बघितल्यात तर वि.स. खांडेकर, किंव्हा ग.दि.माडगूळकर यांच्या कथांची कमतरता जाणविते. खांडेकरांच्या रूपक कथा येथे उचित झाल्या असत्या. तसेच ग.दि.मा यांच्या लघु कथा इथे चांगल्या गुंफल्या गेल्या असत्या. हिंदी भाषिक महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' किंव्हा मैथिली शरण गुप्त या दिग्गज लेखकांपैकी एकाची तरी कथा घेतली असती तर हा कथा संच अजून झळकला असता. 

पुस्तकाची परिशिष्ट विस्तृत आहे. त्यात लेखांचा परिचय आणि ज्या पुस्तकातून हि कथा घेतली त्याची माहिती दिली आहे. पण इंग्रजीतच का होईना पण कथेचे मूळ भाषेतील नावाची नोंद परिशिष्टेत करायला हवी होती. अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे नाव स्मशानातील सोने असे आहे. पण पुस्तकात कथेच्या नावाचे भाषांतर 'Gold  from  the Graves ' असे आहे. आता स्मशानाचे भाषांतर Grave थोडे त्रोटक जरी वाटत असले तरी वाचकाला परिशिष्टेत नोंदलेला पण इंग्रजीत लिहिलेला 'smashaan हा शब्द कळला असता. 

शेवट:

हे पुस्तक आणि लेख मालिका एका दमात वाचून संपवायला नाहीं. काही गोष्टी, त्यातील पत्रे आणि कथानक  प्रभावी आहेत आणि त्याचे पडसाद मनात बरेच दिवस रेंगाळतात. अमृता प्रीतम यांची कथा हृदयात घर करून बसते. आणि पुढली गोष्ट वाचण्याच्या ऐवजी आपण अंतर्मुख होतो. जरी या कथेतील काळ आणि जागा वेगळी असली तर प्रसंग चटका लावून जातो कारण आपल्या देशातला हा अनुभव, देशातील स्त्रियांची झालेली अवहेलना आपण सगळ्यांना ठाऊक आहे. पण गोष्ट वाचल्यावर हि दैन्यावस्था बदलायला हवी, त्याला समर्थन कुठल्याही मार्गाने व्हायला नको हा सूर प्रत्येक वाचकाच्या मनात नक्कीच उमटत असणार आणि हेच या कथेचे  यश. 

इतर ४९ कथा सुद्धा म्हणूनच ४९ रूपाने प्रभावी ठरतात. प्रत्येक कथेचे एक वैशिष्ट्य आहे. कथा जन्मायला यायचे एक कारण आहे. आणि कथेने जन्म घेण्याची आवश्यकता आहे. लेखकाने टिपलेले समाजाचे, त्याच्या सांप्रत काळाचे हे स्पंदन आहे. आणि इंग्रजी माध्यम का होईना पण या कथा वाचल्यावर आपल्या देशाची, समाजाची, संस्कृतीची आणि मानवी अस्तित्वाची ओळख नव्याने होते. जुन्या पैलूंची नव्याने ओळख होते आणि काही नवीन पैलूंची पहिल्यांदा ओळख होते. 

आणि निखळ आनंद तर नक्कीच मिळतो. 

आमच्या आजोबांना रबिन्द्रनाथ टागोरांचे साहित्य वाचायचे होते. त्यांनी अनुवादित इंग्रजी वाचायला सुरुवात केली पण त्यात त्यांना तेवढा आनंद मिळेना. म्हणून त्यांनी बंगाली शिकायला घेतले. आणि बंगाली वाचण्यात नैपुण्य मिळाल्यावर त्यांनी रबिन्द्रनाथ वाचले. कारण नाहीं म्हंटले तरी भाषांतर किंवा अनुवादनात मूळ भाषेत लिहिल्याचा मूळ आत्मा थोडा क्षीण नक्कीच होतो. पण जर का बंगाली किंव्हा मल्याळम हिंदी किंव्हा मराठीत भाषांतरित केले तर भाषेचा पाया भक्कम राहतो कारण बहुतांश भारतीय भाषा संस्कृतोद्भव आहेत. सरकारी उपक्रमाद्वारे किंव्हा प्रकाशन गृहांद्वारे पण आशा करू या कि भारतीय भाषा ते भारतीय भाषा असे भाषांतरित साहित्य आपल्याला उपलब्ध होईल. सध्या तरी सत्य परिस्थिती अशी आहे कि आज भारतीयांना एका धाग्यात बांधणारी भाषा इंग्रजी होत चालली आहे. अश्या परिस्थिती पुस्तकाच्या भाषांतरकरांचे आणि संपादकाचे हे पुस्तक लोकांसमोर ठेवल्या बद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. 

पुस्तकाबद्दलची माहिती:

'The Greatest Indian Stories Ever Told'

संपादक - श्री अरुणव सिन्हा

प्रकाशक -  अलेप बुक कंपनी ( Aleph Book  Company ) 

पृष्ठ संख्या - ५१२

प्रकाशन वर्ष - सन २०२३ 

मूल्य - रुपये ७७० (अमेझोन वरची किंमत)  

6/13/24

राग 'मंत्रमुग्ध'

आमच्या घरी माझी आई पंडित जसराज नेहमी ऐकत असे. मला लहानपणी शास्त्रीय संगीत प्रकार फारसे आवडत नसे. कोणी तरी काही तरी आळवीत बसलय आणि आपण ऐकत बसायचं? ९० च्या दशकात सिनेमाच्या गाण्यांचा ताल बदलत होता. धांगड-धिंगा, मोठं-मोठाले ड्रमस आणि नाचता येईल असे गाण्याचे सूर प्रसिद्ध होत होते. मला हि गाणी साहजिकच आवडायचीत. काही वर्षात माझ्या मोठ्या भावाने इंग्रजी गाणी घरी आणलीत. त्यामुळे घरी अजूनच धमाल. हि गाणी काही बेसुरी नव्हती. छानच होती आणि हिंदी चित्रपटात शास्त्रीय रागांवर आधारित अनेक गाणी आहेत. पण हे शास्त्रीय संगीत नव्हे. माझा मामा घरी आला कि पंडित भीमसेन जोशी लावीत असे. त्याचे ते फार आवडते आहेत. आजीने कधी कधी टेप लावली कि गीत रामायण हमखास लागे. ८० च्या दशकात दूरदर्शन वर 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे भारतीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवून राष्ट्रीय एकात्मीकरण साधण्याची भारत सरकारची कल्पना अतिशय प्रसिद्ध झाली. राग देश वर आधारित हे गान मलाही फार आवडत असे. हा एक राग माझा बहुधा त्यामुळेच आवडता आहे. तसेच सकाळी ८ ते ८:१५ च्या दरम्यान विविध भारतीवर मराठी नाट्यसंगीत लागे. 'वाद जाऊ कुणाला शरण' हे आशाबाई खाडिलकर यांचे गाणे किंव्हा 'घेई छंद मकरंद' हे वसंतराव देशपांडे यांचे नाट्यगीत मला खूप आवडत असे. प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेला आशालता वाबगावकर यांचे 'राजस राजकुमारा' या गाण्याची मी सदैव वाट बघीत असे.

लहान वयात विलंबित आळवलेले राग आवडणे कठीण आहे. निदान माझ्या अल्प बुद्धीला आणि स्वल्प कानांना तरी. पण पंडित जसराज यांचे राग भीमपलासी मध्ये गायलेले 'जा जा रे अपने मंदिरवा' मला फार आवडायला लागले होते. तसेच पंडित भीमसेन जोशींचे 'माझे माहेर पंढरी' पण आवडत असे. पण बाकी माझे लक्ष हिंदी चित्रपटाची गाणी आणि थोडी बहुत इंग्रजी गाण्यांकडेच होते. गंमत म्हणजे मला इंग्रजी गाण्यातील ओ का ठो समजत नसे. पण घरात चाललेल्या शास्त्रीय संगीताचे संस्कार कळत-नकळत माझ्यावर होत होते.  

शाळेत इयत्ता ५वी ते ७वी च्या वर्गांमध्ये आम्हाला संगीत म्हणून एक विषय असे. आमच्या बाई आम्हाला गाणी शिकवण्याचा प्रयत्न करीत आणि मी आणि माझे मित्र अथक कष्ट करीत न-शिकण्याचा प्रयत्न करीत असू. आमचे आवाज तेंव्हा फुटत होते. कंठात गुठळी दिसू लागली होती. त्यात आम्हाला आमच्या बाई  'गुनी गावत काफी राग' या पंक्तीने राग काफी शिकवीत असत. त्यांची काय चूक म्हणा, आमचे शंखा सारखे पोकळ आणि घोगरे गळे, त्यातून शिट्ट्याच वाजणार! 

शिक्षणासाठी परदेशात असतांना आमच्या कॉलेज च्या सांस्कृतिक भवनात पंडित जसराज यांचा कार्यक्रम होता. माझ्या मोठ्या भावाने माझ्या वाढदिवसा निमित्त मला या कार्यक्रमाची तिकिटे भेट म्हणून दिलीत. सोबत आई पण असणार होती. मला सुरुवातीला वाटले कि मला कळत नाहीं फारस त्यामुळे कंटाळा आला तर निघून येईन. लहानपणापासूनचे कानावर पडलेले सगळे सूर आणि ताल येथे एकत्रित माझ्यासोबत जणू बसले होते. सभागृहातील वातावरण वेगळेच होते. निदान मला तरी तसे भासले. त्यादिवशी पंडितजी सुद्धा भलत्याच फॉर्म मध्ये होते. इतके सुरेख गायलेत कि त्या आठवणीने अजूनही अंगावर काटा येतो. श्रीकृष्णाची भजन तर इतकी अप्रतिम होती. मध्यंतराच्या आधी त्यांनी कृष्ण-नामाचा जप केला. ८-१० मिनिटे फक्त कृष्णा-कृष्णा-कृष्णा चा गजरात संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. जप सुरु करायच्या आधी पंडितजी म्हणालेत कि "कृष्ण-जाप करते है. देखते है भगवान आते है कि नहीं" कृष्ण कधी येतो आणि कुठे येतो त्यालाच ठाऊक. पंडितजींची हाक श्रीकृष्णाने ओ देण्यायोग्य नक्कीच होती. माझ्या कानात आणि मनात त्या जपाचे नाद अजूनही आहे. या कार्यक्रमाच्या अनुभूतीने माझा भारतीय संगीताचा प्रवास अश्या प्रकारे सुरु झाला.

त्या नंतर मी पंडित जसराज यांची सगळी प्रसिद्ध भजने अक्षरशः दररोज ऐकू लागलो. त्यांचे 'गोविंद दामोदर माधवेती' हि बिल्वमंगल ठाकूर यांनी रचलेले भजन फार सुरेख आहे. त्याचे सभेत आळवलेली प्रत सगळीकडे उपलब्ध आहे. त्यांच्या साथीला पंडित संजीव अभ्यंकर आहेत. या व्यतिरिक्त पंडित जसराज यांनी आद्य शंकराचार्यांच्या अनेक रचना गायल्या आहेत. त्यांचे गंगा स्तोत्रम मला फार आवडते. स्तोत्र तर अर्थपूर्ण आणि रसाळ आहेच पण पंडित जसराज भक्तिपूर्ण गायले आहेत. जगन्नाथ पंडित लिखित गंगा लहरी हि अजून एक सुरेख रचना पंडित जसराज यांनी गायली आहे. 

अश्यातच मला कर्नटिक शास्त्रीय संगीताची ओळख अचानक झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया राज्यात आर्ष गुरुकुल आहे. गुरुकुलाची एक दिवसभराचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यात हॉटमेल चा शोधक - सबीर भाटिया याला बोलावले होते. सबीर भाटियाला बघायला मिळेल किंव्हा भेटायला मिळेल म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. त्याला भेटायला मिळाले पण तिथे तास-दोन तासाचा कर्नाटिक संगीताचा कार्यक्रम होता. ते वातावरण धार्मिक असेल म्हणून किंव्हा माझी मनस्थिती ते संगीत ऐकण्याच्या लहरीत असेल म्हणा पण मला ती गायकी फार भावली. दक्षिण भारतात अजूनही रूढ आणि दृढ असलेली हि प्राचीन गायकी पद्धती, उत्तर भारतीय शास्त्रीय किंव्हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळी नक्कीच आहे. पण कर्नटिक असो कि हिंदुस्तानी, मूळ भारतीय कला, नृत्य, शिल्पकारी, अभिनय आणि गायकीतच आहे. सामवेदांवर आधारित कर्नाटिक राग आहेत. यात गायकीला अधिक महत्व असते. यावर आधारित पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आहे. पण हिंदुस्थानी मध्ये गायकीला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व वाद्यांना (तबला, सितार, वीणा इत्यादी) सुद्धा आहे. राग आळविण्याचे अभिजात स्वातंत्र्य हिंदुस्तानी मध्ये अधिक आहे. त्यामुळे भीमसेन म्हणा किंव्हा किशोरी आमोणकर म्हणा, यांना हवा तसा तो राग सजविण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात, हा राग सजविणे सोपे नाहीं. भीमसेन जोशींचे हे आळविणे फक्त त्यांनाच जमेल. पण कर्नटिक मध्ये शिस्तबद्ध गावे लागते.

हिंदुस्तानी शास्त्रीय मध्ये मुस्लिम गायक पण बरेच आहेत. पण आपल्या नशिबाने इस्लाम धर्म इथे लुडबुड करीत नाही. आणि या मुस्लिम गायकांनी आणि गायकी घराण्यांनी हिंदुस्थानी गायकी पद्धत समृद्ध केली आहे. अगदी गुरु-शिष्य परंपरेतहि हिंदू गुरु आणि मुसलमान शिष्य किंव्हा मुस्लिम गुरु आणि हिंदू शिष्य हे दिसते. बहुधा याचे कारण कि यांचा सगळ्यांचा खरा धर्म शास्त्रीय संगीत आहे आणि सरस्वती, गणपती आणि श्रीकृष्ण हीच आराध्य दैवत आहेत. 

या दरम्यात कर्नाटिक संगीत ऐकण्याची माझी गाडी हळू हळू पुढे सरकत होती. त्यागराज स्वामी हे कर्नाटिक संगीताचे थोर संकल्पक, कीर्तनकार, भजनकार होते. (मराठी तंजोर राज्यकाळात यांनी आपले जीवन कंठिले) त्यांची 'गिरीराज सुधा' ही 'कीर्ती' फार प्रसिद्ध आहे. याची कीर्तीची नवीन काळातील वाद्यांना घेऊन एक नवीन संकल्पना 'रिमेम्बइरिंग शक्ती' नावाच्या एका वाद्यवृदांने (बँड) केलेली आहे. या वाद्यवृंदात संगीत क्षेत्रातील एक से एक धुरंधर आहेत. गायकीला शंकर महादेवन, तबल्यावर झाकीर हुसेन, मंडोलीन वर यु. श्रीनिवास, गिटार वर जॉन मॅकलौघालीं आणि घटकं व मृदंगम वर वी. सेल्वराज आहेत. या सगळ्यांचा 'गिरीराज सुधा' चा नवीन आविष्कार म्हणजे पंचपक्वांनाची मेजवानीच. कर्नाटिक संगीताचा वारसा जपत, तरी नवीन काळाच्या 'कानांना' रुचेल अश्या संगीतात एखाद्या दोनशे-तीनशे वर्ष जुन्या कीर्तीला गुंफणे हे सोपे नाहीं. पण संगीत क्षेत्रातील दिग्गज एकत्र येतात तेंव्हा काहीच कठीण नाहीं! 

कॉलेज च्या शेवटल्या वर्षी मला उस्ताद झाकीर हुसेन आणि श्री अनुप जलोटा यांच्या बैठकीचा अनुभव मिळाला. पहिल्या अर्ध्यात केवळ झाकीर हुसेन आणि मग दुसऱ्या अर्ध्यात अनुप जलोटा यांची भजने, आणि झाकीर हुसेन यांची साथ असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. झाकीर हुसेन यांनी केवळ तबला वादनच केले असे नाहीं. त्यांनी भारतीय संगीत, भारतीय वाद्ये आणि तबला या विषयांवर एक 'मास्टर क्लास' घेतला. भारतीय संगीत परंपरा किती जुनी आहे, आपल्या प्रत्येक देवाचे आणि देवीचे एक विशिष्ट वाद्य असते, तबल्याचा इतिहास कुठून सुरु होतो अश्या तऱ्हेची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रम तर उत्तम होताच पण कार्यक्रमानंतर मी त्यांच्या खोलीशी ताटकळत उभा होतो. तर त्यांनी आत बोलावले. मी रीतसर 'कार्यक्रम बहोत अच्छा हुआ' असं काहीसा म्हणालो आणि नमस्कार करायला खाली वाकलो तर त्यांनी एकदम हात धरलेत आणि "जवान हो, पैर नाहीं, दिल से मिलो" असा म्हणत मिठी मारली. इतका थोर माणूस पण त्यांच्यात विलक्षण नम्रता होती. संगीताचे आणि संगीत परंपरेचे ते खरे साधक आहेत.

या सगळ्या घडामोडीत वर्षे जात होती आणि मला शास्त्रीय संगीताचे नव-नवीन हिरे मिळत होते. मला कुठला राग आहे हे कधीच कळत नाहीं. माझ्या मामा ला राग कुठला आणि कुठला राग कधी गायला हवा हे माहिती आहे. मला अजूनही कळत नाहीं. पण चांगला पदार्थ, चांगलं चित्र, चांगलं वस्त्र यांच्यातील बारकावे कधी नाहीं कळले तरी ते उत्तम प्रतीचे आहे हे नक्कीच लक्षात येते. तसेच माझे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत होत होते. परदेशी असतांना मी तेथील मंदिरांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जात असे. दक्षिण भारतीय देऊळ असेल (तेलगू समाजाने अमेरिकेत अनेक मंदिरे बांधली आहेत) तर एकतर भरतनाट्यम किंव्हा कुचिपुडी नृत्यूचं कार्यक्रम असे किंव्हा कर्नटिक संगीत ऐकायला मिळे. कुठलीही नवीन रचना ऐकली किंव्हा नवीन राग ऐकलं कि मी त्यावर उगाच संशोधन करायला लागलो. गायक, घराणे, गान-पद्धती, त्या गायकाचे इतर आविष्कार, आणि गायलेले आवडले तर ते पाठ करायचे. पंडित जसराज यांच्यामुळे आदी शंकराचार्याच्या बऱ्याच रचनांची ओळख झाली. गंगा स्तोत्रम हे गंगा महिमा आहे. त्यातील ११ वे कडवे - "वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।" हे पंडितजी इतके काकुळतेने गातात कि त्यांनी गायलेले गंगा स्तोत्र ऐकून गंगा माई माझ्यासारख्या ऐकणाऱ्यावरही प्रसन्न होईल. 

नुकतीच मला कर्नाटिक पद्धतीत प्रस्तुत केलेली एक जुनी पण प्रसिद्ध रचना - 'कलिंगा नर्तन तिल्लन' ऐकण्यात आले. अरुण साईराम किंव्हा कुलदीप पै या सारख्या प्रसिद्ध गायकांनी  हि 'तिल्लना' प्रस्तुत केली आहे. तिल्लना म्हणजे तालबद्ध रचना. बैठकीच्या शेवटी या पद्धतीत रचना गायली जाते. साधारण या रचनेवर नृत्य केल्या जाते. माझी आवडती 'कलिंगा नर्तन तिल्लन' प्रस्तुती निदमंगलम कृष्णामूर्थी भागवतार यांची आहे. हि तिल्लना चे रचेते श्री उथकुडू व्यंकट कवी म्हणून आहेत. हे मूळचे तामिळनाडूचे कवी आहेत आणि यांचा कार्यकाळ अठराव्या शतकात होता. श्री व्यंकट कवींच्या प्रतिभेचे ठसे अजूनही तामिळ संगीत जगतावर दिसतात. या रचनेचा कल्पनाविलास म्हणजे श्रीकृष्णाने कालियामर्दनाच्या वेळेस कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य या तालावर केले असणार.  भागवत कीर्तन किंव्हा हरीकथेत, भागवतकार या रचनेला गात असत. नीट लक्ष देऊन ऐकलंत तर मधेच गायक 'हिस्स' असं स्वर काढतात. हा स्वर म्हणजे कालिया थकून आणि पराजित होऊन तलावातून निघून जातो आहे. 

काही महिन्यांपूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गातांना ऐकले. सोबत उस्ताद विलायत खान होते. आणि बिस्मिल्लाह खान स्वतः शहनाई पण वाजवीत होते पण मध्ये त्यांनी शहनाई बाजूला ठेऊन गाणे सुरु केले. खर्जातील त्यांचा आवाज वेगळा होता पण गाणे सुरेल आहे. मी त्यांच्या बद्दल वाचायला लागलो तर मागे त्यांनी एका मुलाखतीत त्यांना बाळकृष्ण  ट्रेन मध्ये अचानक कसा भेटला हा अनुभव सांगितला आहे. आणि बाळकृष्ण त्यांना एकदाच भेटला असे नाहीं. तर त्यांच्या लहानपणी त्यांच्या काकांसोबत ते घराजवळच्या बालाजी मंदिरात रियाज करीत असत. एकदा ते तल्लीन होऊन काही तास शहनाई वाजवीत होते. डोळे उघडले तर समोर गाभाऱ्यातील बालाजी बसललेला! अद्भुत प्रसंग आहेत. त्यांचा गुगल वर एक फोटो आहे. बिस्मिल्लाह खान त्यांच्या अंथरुणावर बसून आहेत. त्यात फोटोत समोर भिंतीवर बाळकृष्णाची फोटो आहे. म्हणजे सकाळी डोळे उघडून बसलेत कि त्यांना पहिले समोर बाळकृष्ण दिसत असणार. 

मधे राग देश वर आधारित रचना शोधतांना मला विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेली  'बाजत नगारे' हि रचना सापडली. या कवितेला ब्रिज भाषेतील 'कवित्त' असे म्हणतात. हे कवित्त मुबारक अली 'बिलग्रामी' यांनी लिहिलेली आहे. मला कवित्त हा प्रकार नव्याने कळला. शुभाबाईंनी हे कवित्त अत्यंत प्रसन्न गायले आहे आणि कवित्तेचे शब्द साधे असले तरी रसाळ आहे. कवित्त वाचतांनाऐकतांना पाऊस होतो आहे असा भास होतो. सगळे शब्द मला समजले नाहीं पण एक ओळ मला भावली - 'नीलग्रीव नाच कारी कोकिल आलाप चारी,'. यातील नीलग्रीव म्हणजे शंकर अपेक्षित आहे कि निळ्या मानेचा मोर? 

विविध तऱ्हेच्या कलांमध्ये संगीत कलेला वेगळ्या पंक्तीत बसवायला हवे. मनुष्य जेंव्हा झाडावरून उतरून वानराचा नर झाला तेंव्हा पासून तो शिट्टी वाजवून गुणगुणायला लागला असणार. आणि तेंव्हापासून कोणी तरी गाणं गातो आणि कोणी तरी गाणं ऐकतो. आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा याहून सोपा मार्ग बहुधा नसावा. भारतीय शास्त्रीय संगीताने या आनंदाला संस्कृतीची कोनशिला बनविली. पिढ्यानपिढ्या पुढे देता येईल असा ठेवा बनविला. सोळाव्या शतकातील मुबारक अली या मुसलमानाने ब्रिज भाषेत इतकी सुंदर कविता लिहिली आणि पाचशे वर्षांनी राग देश मध्ये शुभा बाई मृगाच्या पहिल्या सरी  सारख्या गायल्यात. या संगीताच्या भक्तीत बिस्मिल्लाह खान यांना बाळकृष्ण भेटून नवीन राग शिकवतो तर भारतापासून हजारो मैल दूर पंडित जसराज कृष्णाचा जप करून प्रेक्षकांना देवत्वाचा भास करून देतात. या हजारो वर्ष अखंड चालू असलेल्या संगीत परंपरेचा, संस्कृतीचा आणि संगीत मार्तंडांचा अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो हे माझ्या सारख्या पामराचे भाग्य.  

5/22/24

मराठी साम्राज्याचा ऱ्हास - मराठा सैन्यातील मराठेतर सैनिक

मराठी इतिहास वाचायला लागलो कि मनात विचारांची झुंबड उडते. हा लेख खरं मला पुढल्या महिन्यासाठी लिहायचा होता. पण डोक्यात आलेला विचार पानांवर उतरविणे आवश्यक आहे. मागचे काही लेख वाचले असतील तर वाचकांना माहिती असेल कि सध्या श्रेष्ठ आणि जेष्ठ इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी यांची पुस्तके वाचणे चालू आहे. आणि त्या निमित्ताने 'चंद्रप्रकाशी' लेख मालिका पण चालू केली आहे. पण कुठलाही इतिहास वाचतांना नवीन प्रश्न मनात निर्माण होतात. त्याचा हा मागोवा. (हा लेख 'चंद्रप्रकाशी' नव्हे.) 

मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर भगवा फडकवल्यापासून झाली. राज्याची सुरुवात केवळ जमीन किंव्हा किल्ले जिंकून होत नाहीं. पण राज्यस्थापनेची आवश्यकता काय? आणि आत्ताच का? आणि तसेच हा राजाच का आणि त्याच्यासाठीच का लढायचे या प्रश्नांची सुद्धा उत्तरे स्पष्ट हवीत. छत्रपती शिवाजींची किमया इथेसुद्धा प्रकर्षाने जाणविते. त्यांनी जोडलेली माणसे, त्यांनी प्रेरणा दिलेले सैन्य त्यांच्या निधना नंतरही शंभरहून अधिक वर्षे लढत राहिला. प्रत्येक साम्राज्य उदयास येते तसेच अस्तास पण जाते. साधारण कुठल्याही साम्राज्याचे शिखर ९० ते १०० वर्षे मानायला हरकत नाहीं. काही साम्राज्ये या कालावधीत इतकी शक्तिशाली होतात कि त्यांचा अस्त झाला तरी त्यांचा पगडा अजून अनेक दशके टिकून रहतो. मराठी साम्राज्याचा सुवर्ण काळ आपण साधारण सन १७१२ (जेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी मोगालंना चौथाई देण्यास भाग पाडले) ते सन १८१० ( जेंव्हा यशवंतराव होळकर यांचा मृत्यू झाला) मानू शकतो. त्याच्या आधीच काळ चढतीचा आणि त्याच्या पुढला उतरणीचा. पण जेंव्हा राज्य उतरणीला लागले तेंव्हा एकदम कोलमडलेच. काही सरदार घराणी शाबूत राहिलीत पण भारतावरचा मराठी राज्याचा पगडा एकदम उठला असे वाटते. ते का? 

याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ सन १७९५ ते सन १७९८ च्या कालावधीत अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या सगळ्यांचे मृत्यू होऊन मराठी राज्यात पुढाऱ्यांची एक मोठी फळी अचानक नाहीशी झाली. माधवराव पेशव्यानंतरचे राघोबादाद यांना पेशवा करायला हवे होते. पण त्यांना न करून पुढे झालेल्या भानगडींमुळे पेशवाई कोलमडली. भट घराण्याचा पेशवाई चा हक्क काढून दुसऱ्या सरदार घराण्यांमधून कोणाला तरी पेशवा केले असते तर?  या व्यतिरिक्त एक अजून कारण माझ्या अल्प-बुद्धीला जाणवते ते म्हणजे मराठ्यांनी भारतावर राज्य केले पण भारतीय कधी फारसे मराठी सैनिक झाले नाहीत. या मुद्दयाचा आपण थोडा विचार करूया. 

(मराठी घोडेस्वार)

मागल्या लेखात निझामाबाद्दल लिहितांना, निझामाचा थोडा अभ्यास झाला. पगडीकृत निझामावरचे पुस्तक उपलब्ध आहे आणि पुढे त्या अनुषंगाने अजून लिहिणे होईलच. पण एक मुद्दा मला प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे निझामाने मोठ्या कुशलतेने वापरलेली हिंदू प्यादी. निझाम मूळ औरंगझेबासारखा धर्मांध नव्हता. त्याचा प्रमुख अधिकारी वर्ग जरी मुसलमान असला तरी त्याला सत्ता प्रस्थापित करणे आणि सत्ता उपभोगणे अधिक महत्वाचे होते. आणि सत्ता क्षेत्र आणि सत्तांकीत बहुतांश हिंदू असल्यामुळे त्याने अनेक हिंदू आपल्या सैन्यात आणि प्रशासनात आणिले. त्याने मराठ्यांचे अनेक सरदार आपल्याकडे वळविले आणि तसेच प्रशासनात महसूल खात्यात किंव्हा जमीन संबंधित क्षेत्रात मराठी अधिकार वर्ग आणला. या अधिकारी आणि सरदारांना मानाच्या पदव्या दिल्यात आणि जमीनी-जहागिरी पण दिल्यात. त्यामुळे दोन गोष्टी झाल्यात, एक म्हणजे बहुसंख्य असलेला हिंदू वर्ग निझाम विरोधी राहिला नाहीं आणि दुसरा म्हणजे सैन्यात त्याला मध्य आशिया किंव्हा तत्सम प्रदेशातून मुसलमानी सैनिक आणायची आवश्यकता पडली नाहीं. अर्थात, असे धोरण करणारा निझाम पहिला नाहीं. या आधी आदिलशाही आणि निझामशाहीनेही हेच धोरण पत्करले होते. पण आदिलशाही किंव्हा निझामशाही हे परदेशी मुसलमान नव्हते. धर्मान्तरित भारतीय मुसलमान होते. या तुलनेत चिलकीच खान किंव्हा त्याचा बाप हे थेट परदेशी मुसलमान होते. 

निझामाचे हे धोरण त्याने बहुधा अकबराचे उचलले असणार. अकबर हा मोघली सत्तेचा तिसरा बादशाह. आणि सगळ्यात प्रसिद्ध पण. त्याने आपली पाळ-मूळ पक्की करायला एक नवीन धोरण आखले. जे त्याच्या आधीच्या कोणी मुसलमानी क्रूरकर्म्या हिंदू-द्वेष्ट्यांनी अंगिकारले नव्हते. अकबराने राजपुतांमध्ये फूट पाडली आणि जयपूरच्या अंबर घराण्याशी एकांगी रोटी-बेटी चे संबंध प्रस्थापित केले. (अंबर घराण्यातील पोरीबाळी मोघल बादशहाच्या हारेम मध्ये दाखल होऊ लागल्यात. जेंव्हा औरंगझेब मेला तेंव्हा १७०७ च्या अंबर घराण्याच्या राजाने ताबडतोब घोडे दिल्ली ला दौडविलेत आणि राजपूत स्त्रियांना मोघली घरातून सोडवून परत जयपूर ला घेऊन आला. त्यानंतर जयपूर घराण्याची कोणीही स्त्री पुन्हा कधी मोघलांकडे गेली नाहीं.) आणि हिंदूंना त्याच्या दरबारात मानाची स्थाने दिलीत. त्यामुळे त्याला राजपुतांचे आयते सैन्य लढाया करायला मिळाले आणि उत्तरेतील त्याच्या विरोधातील उठाव नाहीसे झाले. हेच धोरण औरंगझेबापर्यंत कायम राहिले. अर्थात, औरंगझेबाने मोगलाई बुडवण्यामागे बरीच कारणे होती. धर्मांधता, मूर्ख राजकीय चाली, आत्यंतिक द्वेष,आत्यंतिक अहंकार पण सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्या हिंदुविरोधी धोरणांनी त्याने स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेतला. 

(जयपूरच्या कछवा घराण्याचे राजचिन्ह)

वरील उदाहरणात एक गोष्टी स्पष्ट होतात. अल्पसंख्याक जर का सत्ताधारी झालेत तर बहुसंख्यांना सैन्यात आणि प्रशासनात घेणे हे आवश्यक धोरण आहे. म्हणजे मोगलाई फक्त मोघली रक्ताच्या सैन्यावर उभी नव्हती तर त्यात असंख्य राजपूत सामील होते. त्या व्यतिरिक्त शिपाई-गडी स्तरावरही अनेक उत्तर भारतीय हिंदू होते. पण हिंदू सरदारांना मान असला तरी त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे, कुठल्याही मोघलांच्या स्वारीत हिंदू सरदारासोबत एक त्याच्या पदाचा किंव्हा त्याच्याहून उंच पदावर असलेला एक मुसलमान, आणि बहुधा परदेशी मुसलमान, सरदार नेहमी असे. उदाहरणार्थ, मिरझा राजे जयसिंग सोबत दिलेरखान आला होता. मोगलांसारखेच इंग्रजांनीहि भारतावर राज्य करायला भारतीयांचाच पुरेपूर फायदा घेतला. बाकी जगात इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथल्या स्थानिक लोकांना त्यांनी कधीच सैन्यात घेतले नाहीं कि त्यांना कधीच प्रशासनात घेतले नाहीं. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात तर त्यांनी स्थानिक लोकांना नामशेष केले. पण भारतात मात्र अगदी सन १७५८ च्या इंग्रजी-फ्रान्स च्या युद्धातही इंग्रजांकडून भारतीयच लढत होते.  

मराठ्यांकडून कुठले मराठेतर समाज लढत होते? संपूर्ण भारतावर जेंव्हा राज्य पसरले तेंव्हा मराठे हे अल्पसंख्यांकच होते. मराठेतर हे भारतीय आणि हिंदूच होते पण छत्रपतींपासून मराठी समाजाने दाखवलेले धाडस, पराक्रम आणि जागृती हि मराठेतर समाजात नव्हती. त्यामुळे मराठ्यांना अल्पसंख्यांक मानायला हवे.  दोन उदाहरणे माझ्या पटकन ध्यानात आलीत, ती म्हणजे इब्राहिम गारदी जो पानिपतच्या युद्धात मराठ्यांकडून, भाऊसाहेबांच्या हुकुमानुसार लढला आणि जीव हि दिला. दुसरे म्हणजे, महादजी शिंदे यांनी फ्रेंच युद्धसैनिक विशेषज्ञ 'डी बोईन' याच्या प्रशिक्षण खाली अत्याधुनिक अशी एक तुकडी तयार केली होती. पण या तुकडीत शिपाई मराठीच होते. पण दिल्ली ते तंजावर आणि मुंबई ते कलकत्ता पर्यंत मराठी साम्राज्य जे पसरले होते त्यात सैन्याधिपती आणि सैन्य मराठीच होते. ओरिसा ला जाऊन नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी ओडिया समाजातून सैन्य उभे नाहीं केले. किंव्हा हैदर अली ला नामोहरम करून सवाई माधवरावांनी पुढे तामिळ किंव्हा कन्नड समाजातून सैन्य उभे नाहीं केले. थोरल्या बाजीरावांनी अख्खे  उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केले आणि दिल्ली सुद्धा लुटले पण तेथील पंजाबी किंव्हा जाट समाजाचे सैन्य किंव्हा सरदार मराठी दरबारात सामील झाले नाहीत.  

(विषयांतर होते आहे पण एक छोटी गोष्ट इथे सांगावीशी वाटते. थोरले बाजीरावांनी दिल्ली पर्यंत मजल मारली होती. मोघली सैन्य त्यांच्यापुढे तग धरू शकत नव्हते. त्यांनी दिल्लीच्या पालिका बाजार ला मुक्काम केला होता आणि बादशहा ला आपण आल्याचा निरोप पाठवला होता. या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी निरोप पाठवला कि त्यांनी हुकूम केला तर बादशहाला सिंहासनावरून खाली आणू आणि छत्रपतींना दिल्ली चा बादशहा म्हणून स्थापन करू. पण कोण जाणे पण छत्रपतींनी याला नकार दिला. पण जर तसे घडले असते तर मराठे दिल्लीपती झाले असते. दिल्ली तेंव्हा वाचले. आणि मोघली सिंहासन हि वाचले. त्या नंतर ३०-४० वर्षांनी महादजी शिंद्यांनी दिल्ली लुटले, आणि मोगली दरबार जाळला. असो.) 

(तुर्की जानिसारी सैनिक)

अजून एक उदाहरण येथे तुर्की साम्राज्याचे द्यायवेसे वाटते. या साम्राज्यात 'जानिसारी' म्हणून एक खास लष्करी तुकडी होती. हि तुकडी फक्त आणि फक्त सुलतानाला मानायची आणि त्याच्या थेट हुकूमाखाली येत असत. त्यावेळेस तुर्की साम्राज्य सध्याच्या पूर्व युरोप भागात पसरत होते. त्या भागातील ख्रिश्चन जनतेमधील हट्टीकट्टी, उमदी मुले सुलतान निवडीत असे आणि त्यांचे जानिसारी चे विशिष्ट प्रशिक्षण दिले जात असत. हि लष्करी तुकडी तुर्की रक्ताची नसत आणि मुसलमान पण नसत पण त्यांना तुर्की सैन्यात अत्यंत उच्च दर्जा होता. मराठी साम्राज्यात अशी राजपूत किंव्हा तंजोरची तामिळ तुकडी असल्याची नोंद नाहीं. (थोरल्या बाजीरावांचा हुजुरी पागा हे खास लष्करी तुकडी होती) 

मराठी सैन्यात पिंडारी आणि बारगी लोक काही काही लढयात असत. खासकरून इंग्रजां विरुद्धच्या लढयात पिंडारी लोक खूप होते. पण इतर समाज सैन्यात सामील झालेल्याची नोंद कुठे नाहीं. 

दुसऱ्या हिंदू समाजातून सैन्य उभे केले असते तर मराठ्यांना भारतीय हिंदूंचा विरोध कमी झाला असता. नवीन प्रदेश आणि नवीन समाजातून आलेले सैन्य नवीन कल्पना घेऊन येतात त्याचा उपयोग एकूण राज्याला होतो. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मियांची एकी झाली असती आणि मुसलमानी सत्ता खिळखिळ्या झाल्या असत्या आणि पुढे इंग्रजांना पाय रोवायला जागा मिळाली नसती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्या भारतभर महाराष्ट्र धर्म पसरला असता. 

5/15/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)- भाग २ - फितुरीच्या गाथा आणि निझाम परिचय

                                                           

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिला लेख इथे उपलब्ध आहे. 

--

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मराठी राज्य प्रमुख म्हणून फार पटापट बदल झालेत. महाराज सन १६८० स्वर्गवासी झालेत. त्या नंतर नऊच वर्षात छत्रपती संभाजी यांची अचानक मृत्युमुखी पडलेत आणि त्या नंतर दहा वर्षातच राजाराम महाराजांचा पण मृत्यू झाला. थोडक्यात वीस वर्षाच्या कालखंडात तीन छत्रपती होऊन गेलेत. आणि काही कमी असेल तर भावी छत्रपती शाहू महाराज औरंगझेबाच्या कैदेत होते. अश्या डळमळत्या परिस्थितीतही मराठ्यांनी संघर्ष केवळ चालूच ठेवला असे नाहीं तर त्या संघर्षाच्या ज्वाला अधिक प्रखर केल्यात.

पण तुम्ही एखादे जमीनदार किंव्हा छोटे सरदार त्या काळात असाल तर स्वजीव रक्षण किंव्हा स्व-कुटुंब रक्षणासाठी एखाद वेळेस वेगळे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? मराठ्यांकडून लढायचे कि मोघलांना जाऊन मिळायचे? आणि मोघलांना जाऊन मिळालो तर शेवट पर्यंत त्यांच्या सोबतच लढायचे कि पुन्हा माघारी घरी यायचे? कि सतत 'तळ्यात कि मळ्यात' खेळायचे, वाट बघत कि मराठे-मोघल संघर्षात शेवटी कोण जगतोय ते? असे अनेक प्रश्न तेंव्हाच्या अनेक साधारण मावळे आणि मातब्बर सरदारांना पडले असणार. बहुतांश मराठे मोघलांविरुद्ध संघर्षमय झालेत पण काही, क्वचितच वेळा, मोगालंनाहि जाऊन मिळालेत. नुसते एवढेच नव्हे तर सन १७०७, म्हणजे औरंगझेब नंतरहि काही मराठे सरदार उरलेले मोघल आणि उभरत्या निझामाला जाऊन मिळालेत. यांना आता फितूर म्हणायचे कि परिस्थितीचे बळी? 

फितूरच म्हणायचे. यात संदेह बाळगू नये. ही लोक फितूर होती. स्वजन, स्वधर्म आणि स्वराज्य विरुद्ध हि लोक परकीय, परधर्मीयांच्या बाजूने लढलीत. 

अर्थात फितुरी असली तरी त्या पैकी काहींच्या कथा/गाथा मनोरंजक नक्कीच आहेत.  

चंद्रसेन जाधव हा शूरवीर सेनापती धनाजी जाधव यांचा मुलगा. पण याने पेशवाईच्या उदयाच्या काळात निझामाची नोकरी पत्करली. हि फार आश्चर्याची आणि दुःखाची घटना मानायला हवी. पण स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी आणि जर का हवे ते मिळत नसेल तर जिथे ते मिळेल तिथली नोकरी पत्करावी अशी काहीशी विचारसरणी इथे दिसते. कारण धनाजी जाधव यांच्यासारखा ढाण्या वाघाचे, ज्याच्या नावाने मोघलांची घोडी पाणी पीत नसत अशी वदंता होती, वंशज निझामाची नोकरी का पत्करेल? पण असे घडले आणि एवढेच नव्हे तर छत्रपती शाहू आणि छत्रपती पदाचे दावेदार संभाजी यांच्या गृहकलहांत चंद्रसेन याने निझामाला मदत पण केली. यातून मराठेशाहीला नुकसान काही फारसे झाले नाहीं. पण चंद्रसेन आणि त्याची अपत्ये निझामाच्याच चाकरीत राहिलीत आणि पुढे नामशेष झाली. 

विठ्ठल सुंदर हे अजून एक विशेष व्यक्तिमत्व आहे. पुस्तकात विठ्ठल सुंदर आधी मराठ्यांकडून लढत होता आणि मग निझामाला मिळाला कि तो मूळ  निझामाच्या चरणी रुजू झाला हे नीटस कळत नाहीं. पण विठ्ठल सुंदर याने निझामाच्या पदरी बऱ्याच भानगडी, कारस्थाने आणि कामगिऱ्या केल्यात. जसे सन १७५८ ला फ्रेंच वकिलाला निझामाने ठार केले त्यात विठ्ठल सुंदरनेच तलवारीचा वार केला होता. तसेच इब्राहिमखान गारदी, ज्याने भाऊसाहेब पेशव्यांच्या पदरी पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम केला, तो मूळ निझामाच्या पदरी होता पण इर्षेने विठ्ठल सुंदरनेच इब्राहिमखान गारदीला हाकलून लावले. या विठ्ठल सुंदर चा फार राग मराठी आणि पेशव्यांना होता. उदगीर च्या लढाईत निझामाला पेशव्यांनी चांगलेच पाणी पाजले आणि साठ लाखांचा मुलुख निझाम कडून घेतला.  पण भाऊसाहेब पेशव्यांनी निझामाला विठ्ठल सुंदरला बडतर्फ करण्याची मागणी निझामाला केली होती. या उदगीर च्या युद्ध इब्राहिमखान गारदी चांगलीच कामगिरी बजाविली म्हणूनच बहुधा भाऊसाहेबांमार्फत त्याने विठ्ठल सुंदर वर सूड उगवण्याचा प्रयत्न केला असणार. पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेल्या पराभवाचा फायदा घेत निझामाने प्रचंड मोठा हल्ला मराठ्यांवर केला. सन १७६३ ला निझामाने थेट पुणे गाठले आणि शहर जाळले. सुरुवातीला मराठे गोंधळले असे दिसते. बहुधा निझाम इतकी धिटाई करेल अशी कल्पना मराठ्यांनी केली नसावी. पण लौकरच फळ्या उभारून मराठ्यांनी प्रतिकार सुरु केला आणि राक्षसभुवनीं मराठ्यांनी निझामाला गाठले आणि त्याचा दणदणीत पराभव केला. या युद्धात विठ्ठल सुंदर मारल्या गेला. विठ्ठल सुंदरची बुद्धी आणि तलवार अश्या प्रकारे शेवटपर्यंत निझामाच्या पदरीच जिझली. निझामाने सुद्धा त्याचे बरेच लाड केलेत. त्याला दिवाण बनविले होते आणि राजबहादूर व प्रतापवंत या पदव्या पण बहाल केल्या होत्या. 

वर उद्धृत केलेली दोन व्यक्ती केवळ उदाहरणे आहेत. मराठ्यांनी आक्रमकांची बाजू घेणे हे नवीन नाहीं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या घरभेद्यांशी झुंझावें लागले. खुद्द त्यांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी सुद्धा त्यांना येऊन मिळाले नाहीत. शिवाजी महाराज असोत, संभाजी महाराज असोत कि राजाराम महाराज असोत, त्यांच्यावर आणि स्वराज्यावर झालेल्या सगळ्या आक्रमणांमध्ये काही मराठे नेहमीच भागी असत. छत्रपती संभाजींना पकडले सुद्धा घरभेद्यांमुळेच. कारण स्वराज्य हि कल्पना आकलनी पडणे सोपे नाहीं. स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी नाहीं. हे कर्तव्य आहे, हा धर्म आहे आणि हे कार्य आवश्यक आहे. या भावनांनी भारावून जाऊन जीव झोकून देणे कठीण कार्य आहे. यासाठी कार्यावर आणि कार्य-नायकावर अढळ विश्वास हवा. आणि कार्यपुर्तीत जीव गेला तरी हे कार्य पुढे चालू राहील, अगदी शेवटच्या माणसापर्यंत, याची शाश्वती मनात हवी. सध्याची परिस्थितीत जिथे चार लोक एक विचार मनात ठेऊन एक सद्-आचार करू शकत नाहीत तेंव्हा तीनशे वर्षांपूर्वी लाखो लोक एक प्रतीक, एकच ध्यास आणि एकच लक्ष्य ठेऊन वर्षानुवर्षे लढले. हि एक अपूर्व घटना आहे आणि कामगिरी आपण साजरी करायला हवी. 

निझाम कोण होता - एक अति-संक्षिप्त परिचय:

मूळचा उझबेकीअसलेला गाझीउद्दीन खान हा दक्षिणेत औरंगझेबासोबत दाखल झाला होता. या गाझीउद्दीन खान चा मुलगा चिल्कीचखान, जो पुढे पहिला निझाम म्हणून उदयास आला. गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान लढवय्ये आणि हुशार होते. मैदानात त्यांच्या तलवारीला धार होतीच पण औरंगझेबआणि त्याच्या नंतरच्या दरबारातील डाव-पेच आणि कारस्थानात हे घराणे निपुण होते. गोवळकोंड्याच्या औरंगझेबाच्या वेढ्यात गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान या दोन पिढ्या सामील होत्या आणि लढल्यात. बहुधा तेंव्हापासूनच त्यांनी दक्षिणेची जहागीर आणि हा किल्ला हेरला असावा. कारण औरंगझेब मेल्या-मेल्याचं त्यांनी गोवळकोंडा आणि हैद्राबादेत बस्तान बसवले. आणि सन १७१० पासून १९४८ पर्यंत त्यांची अनभिषिक्त सत्ता हैदराबाद आणि तेलगू प्रदेशात होती. या घराण्याने, खास करून चिल्कीचखान ने मराठ्यांना हुसकावून लावायला बऱ्याच खटाटोपी केल्यात. अनेक डावपेच आणि कारस्थान रचलित. एक जमाना असा होता कि या घराण्याचाच एक जण दिल्लीला मोघल दरबारी वजीर म्हणून होता आणि स्वतः निझाम दक्षिणेत होता. थोडक्यात पडद्या मागून आणि पडद्या समोर असे दोन्ही बाजूनी मोघली राज्य निझामच चालवत होता. पण थोरल्या बाजीरावांनी या चिलकीचखान च्या चांगल्याच मुसक्या बांधल्या होत्या. आधी पालखेड च्या युद्धात आणि पुढे भोपाळ ला थोरल्या बाजीरावांच्या पुढे चिलकीचखानाचे काही चालले नाहीं. पुढे सवाई माधवरावांच्या कारगीर्दीत राक्षसभुवनाला राघोबादादांच्या पुढे चिलकीचखानाचा नातू मराठी सैन्यासमोर नतमस्तक झाला. 


पण शोकांतिका अशी कि इतक्यांदा पराजयी होऊन निझाम नामशेष झाले नाहीत. पुढे इंग्रजांच्या काळातहि ते नांदले आणि शेवटी सन १९४८ ला श्री वल्लभभाई पटेलांच्या ऑपेरेशन पोलोने हे घराणे नाहीसे झाले. पण पेशवे मात्र १८१८ ला नाहीसे झाले! 


4/30/24

माझिया मना

'माझिया मना' हे ऋतू हिरवा या अल्बम चे गाणे मी बऱ्याचदा ऐकत असतो. हा अल्बम बहुधा सन १९९९ ला आला असेल. तेंव्हा कॅसेट्स चा जमाना होता. श्री श्रीधर फडके, श्री सुधीर फडके यांचे सुपुत्र याचे संगीत आणि आशाताईंची स्वरात काही प्रसिद्ध कविता प्रस्तुत केल्या होत्या. हा अल्बम मराठी श्रोत्यांमध्ये अतिशय गाजला होता आणि आताच्या डिजिटल च्या काळातही माझ्या साऱखे असंख्य हि गाणी नित्य ऐकत असणार. यातील हि विशिष्ट कविता सुप्रसिद्ध कवी श्री सुरेश भट यांची आहे. आता सुरेश भटांच्या कविता आणि भावगीते म्हणजे भावना, विचार आणि शब्दांचे मोहक आणि नाजूक मिश्रण असते. त्यांच्या कवितांमध्ये दुःखाचे सूर जरी जाणवले तरी रडल्यानंतर जे दुःख उरते, लोक उठून आपापल्या कामाला लागल्यावर जे मागे थांबलेले असते, त्या दुःखाशी केलेला जणू हा संवाद. त्यांच्या कविता गेय असल्यातरी त्यांच्या शब्दांचा विचार करावा लागतो. आणि जसे वय वाढत जाते आणि जसे अनुभवांचे चटके व्रण सोडून जातात तसे त्यांच्या भावगीतातील भाव खऱ्या अर्थाने जाणवतात, त्या शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतो. माझिया मना कवितेत मन स्वतःशीच बोलू बघत आहे. धावत्या मनाचा वेध घेत थकायला झालेले मन  स्वतःचाच वेध घेण्याचा जणू निष्फळ प्रयत्न. 

या मनाच्या भानगडीत सारी दुनिया फसली आहे. मनाचा शोध, मनातील विचारांचा शोध, मनाला दिलेल्या अनेकविध उपमा, त्यावर लिहिलेली गाणी, कविता, भावगीते, श्लोक यांचा विचार केला तर मनुष्य जमातीच्या ७०-८०% साहित्य मनावरच असतील. 

भारतीय तत्वज्ञान आणि मुख्यतः अद्वैत सिद्धांत मन आणि त्याच्या खेळांबद्दल विस्तृत चर्चा करते. मन म्हणजे पाण्याचा तलाव आणि पंचेंद्रियांद्वारे आकलनि पडलेल्या घटनांचे तरंग म्हणजे आपण, आपले अनुभव आणि आपली जडण-घडण. आणि हे तरंग आपण शांत करू शकलो, या तरंगांना आपण आपल्या अधीन करू शकलो तरच आपले चित्त स्थिर होणार. आणि स्थिर चित्ती चक्षूच मोक्षाचा मार्ग बघण्याची क्षमता बाळगतात.

निर्वाण षटकं हे आद्य शंकराचार्यांची फार सुरेख रचना आहे. त्यात आचार्य म्हणतात "मनोबुध्य अहंकार चित्तानि नाहं| अर्थात, मी मन नाहीं, बुद्धी नाहीं, अहंकार नाहीं आणि चित्त हि नाहीं. पण मन नाहीं म्हणजे काय? 

अर्थात इथेच भानगडी सुरु होतात. कारण आपण मूळ पंचेंद्रियांच्या अधीन असतो आणि त्याद्वारे मिळालेल्या अनुभवांवर आपले विश्व मांडितो आणि मुख्य म्हणजे, स्वतःची ओळख आणि रूपरेषा आखतो. ते सगळे बाजूला कसे सारायचे? 

समर्थ रामदास स्वामींनी या मनाला जाणून वेसण बांधायला मनाचे श्लोक लिहिलेत. 

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

एकूण २०५ श्लोकात त्यांनी मनाला लागलेले वेध, मोह, सवयींचे वर्णन करून त्याच्यावरच जणू उपाय सांगितलं आहे. 

बहिणाबाईंनी मनाला त्यांच्या "मन वढाय वढाय"  कवितेत इतक्या सोप्या आणि समर्पक उपमा दिल्या आहेत कि मनाचे रोग सहज उलगडतात. त्या शेवटी साक्षात देवालाच प्रश्न विचारतात कि :

देवा, आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनीं तुले

आसं सपन पडलं !

अर्थात, मन म्हणजे फक्त दुःखाचे कारंजे नव्हे. आपल्या समोरचे जग हे मनाचेच प्रतिबिंब आहे. मग त्यात दुःखासोबत सुख आणि मुख्य म्हणजे प्रेम हे मनाचेच कवडसे आहेत. ("बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलाला")

या प्रेमाची चिन्हे संगीत, कला, नृत्य आणि शिल्पानमधून जन्म घेतात. आणि हि चिन्हे मनुष्य जीवन जगण्यासारखे करितात. किंबहुना आपल्या मनुष्यत्व यामुळेच प्राप्त होते! 

4/1/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  
--
छत्रपती संभाजी महाराजांना दैवाने जणू संकटे आणि विपरीत परिस्थितीचे ताट वाटून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या आक्रमणांचा प्रखर संघर्ष केला. जेंव्हा औरंगझेबाने औरंगाबादेत ठाण मांडले तेंव्हापासून मोघली साम्राज्याचा जवळपास शंभर वर्षांचा खजिना, सामर्थ्य, अनुभव आणि सैन्यबळ जणू फक्त आणि फक्त मराठ्यांना नामशेष करायला उतरले होते असे म्हणायला हरकत नाहीं. आपण या विषयावर चर्चा करतांना सहज म्हणतो कि शिवाजी महाराजांनंतरची पंचवीस वर्षे हा मराठी आणि हिंदू स्वांतत्र्याचे समर होते आणि त्यात शेवटी मराठ्यांनी औरंगझेबाला नामशेष केले. तीनशे वर्षांनी आपल्याला असे म्हणायला सोपे आहे. पण औरंगझेब जेंव्हा दक्खनी उतरला तेंव्हा त्याचा शेवट असा होईल असे म्हणता आले असते का? कल्पना करा कि आपण सन १६८५-८६ ल आहोत. लाखो मोघली सैन्य दक्खन मध्ये उतरले आहे. खुद्ध औरंगझेब आला आहे. त्याचा सामना करायचा तरी नेमका कसा? आणि कुठून आणि किती करायचा? मोघलांचा खजिना तेंव्हा म्हणजे कुबेराचा होता. उत्तर भारतातून त्यांना अखंड आणि अमाप पैसे मिळत असे. आणि भांडायला राजपूत अखंड शिपाई पुरवीत असे. गेली जवळ जवळ शंभर वर्षे हिंदू राज्ये बुडविण्याचा त्यांना अनुभव होता आणि त्यात ते नेहमीच यशस्वी ठरले होते. मोघली सैन्य म्हणजे साधारण नव्हते. त्यांचा पोशाख, चिलखते, शस्त्रात्रे, तोफा इत्यादी जणू अतुलनीय होते. काबूल आणि पुढल्या मुसलमानी सत्तांपासून त्यांचे भारतीय राज्य यशस्वीरीत्या टिकविले होते. आणि उत्तर भारतात त्यांची अनभिषिक्त सत्ता दीडशेहुन अधिक वर्षे होती. आणि दक्षिणेतील बहुतांश सत्ता वेळोवेळी मोघलांचे अंकित होते. घराणेशाही बघितली तर बाबर ने सन १५२६ साली स्थापिलेल्या मोघली सत्तेचा औरंगझेब सातवा वंशज होता. आसाम चे आहोम आणि छत्रपती शिवाजीनं व्यतिरिक्त मोघली सत्तेचा यशसवीपणे सामना हिंदुस्तानात कधीच कोणीच केला नव्हता. स्वतः औरंगझेब ला दक्खन हा भाग नवा नव्हता. त्याला सन १६५६ ला तो या भागाचा सुभेदार होता आणि बरीच वर्ष दक्षिण आणि दक्खन भागात तो वावरला होता.  

त्या तुलनेत मराठी राज्य लहान होते, शिपाई पण मराठेच होते आणि खजिना कसा पुरवायचा? सन १६४६ नंतरचा मराठी सत्तेचा अनुभव, म्हणजे फक्त पन्नास वर्षांचा. आणि संभाजी महाराज घराणेशाहीतील दुसरे आणि राजाराम महाराज तिसरे छत्रपती. पण तडफदारपण, डाव-पेच, युद्धकौशल्य, धडाडी आणि चाणाक्षपणा हा केवळ अनुभवांनीच येतो असे नाहीं. संभाजी महाराजांनी हे केवळ युद्धभूमीवर सिंह होते असे नाहीं तर त्यांची संघर्षाची धोरणे हि चाणाक्ष होती. त्यांनी संकटाचा बारकाईने अभ्यास केला होता.  ते अविरत आणि अखंड चढायांवर असत. त्यांनी महत्वाची ठाणी आणि किल्ल्यांवर भक्कम रसद आधीच पुरविली होती. त्यांनी हेरले होते कि औरंगझेबचे मुख्य लक्ष मराठे असले तरी त्याची इस्लामी अभिलाषा त्याहून अधिक विस्तृत आहे. उरलेली आदिशही, कुतुबशाही आणि दक्षिणेतील छोटी छोटी हिंदू राज्ये नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न होते. कुतुबशाही किंव्हा आदिलशाही हि मूळ धर्मांतरित हिंदूंची होती. त्यामुळे परदेशातून आक्रमक म्हणून आलेल्या मोगलांना आणि औरंगझेब ला हि भारतीय मुसलमान निम्न वाटत असे. या काळापर्यंत औरंगझेब धर्मान्ध आणि वयाने अजून क्रूर झालेला होता. इस्लामी सत्तेचा हिरवा झेंडा त्याला काबूल ते रामेश्वरम पर्यंत फडकवायचा होता. 

संभाजी महाराजांनी झपाट्याने बदलत्या परिस्थितीत खरे शत्रू कोण याचा आढावा होता. त्यांना ठाऊक होते कि मोगल हात-पाय पसरवायला लागलेत कि गोव्यातून पोर्तुगीज बाहेर पडून स्वराज्याचे लचके तोडायला लागतील. त्यांनी गोव्यावर आणि पोर्तुगीजांवर दोन चढाया केल्यात. महाराजांना पोर्तुगीजांना पूर्णपणे नामोहरम करता आले नाहीं तर त्यांना गोव्यात चांगलेच कोंडले. आदिलशाही आणि कुतुबशाही यासुद्धा मुसलमानी सत्ता होत्या पण मागे म्हंटल्या प्रमाणे शेवटी भारतीय रक्त होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील करार लक्षात ठेऊन संभाजी महाराजांनी कुतुबशाहीला मदत करण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त मोगलांचे लक्ष वेधायला त्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून ते ठाणे लुटले. त्यामागचे धोरण असे कि मराठे नर्मदे पर्यंत किंव्हा नर्मदा पार करण्याची भीती उत्पन्न झाली तर मोगलांना एकतर थोडी माघार घ्यावी लागेल किंव्हा निदान कुमक पुन्हा उत्तरेला पाठवावी लागेल. पण या कुठल्याच डाव- पेचात संभाजी महाराजांना हवे तसे यश मिळाले नाही. शेवटी नशीब हि पाठीशी लागत. गोव्यात समुद्र भरती आली आणि मराठी सैन्य गोव्यात जाऊ शकले नाहीं आणि पोर्तुगीज वाचलेत. आदिलशाही लौकरच मोडकळीत निघाली आणि कुतुबशहाने सुद्धा नीट लढा दिला नाहीं. सन १६८७ ला कुतुबशाहीत फितुरी माजवून, औरंगझेब ने गोळकोंडा किल्ला घेऊन कुतुबशाही संपविली. औरंगझेब आता निर्धास्तपणे थेट दक्षिणेत जाऊ शकत होता आणि तिथून अजून खजिना आणि रसद लुटू शकत होता. समुद्राला पाठीशी ठेऊन आता मोगल सगळ्या बाजूंनी स्वराज्याच्या सीमा मागे ढकलीत होते.

थोडक्यात, सन १६८२ नंतरच्या पाच-सात वर्षात मोगलांचे आणि औरंगझेबाच्या बळ अधिक वाढले होते. 

स्वराज्यातील बरीच मराठी मंडळी घाबरून औरंगझेबाच्या मिळायला लागलीत. शिवाजी महाराजांनी वतने काढून स्वराज्याची स्थापना केली होती. आणि वतन संस्थेच्या ते विरोधी होते. येथे मोगलांचे वाढते बळ बघून जुनी सरदार आपली वतने मोगल समंतीत करून घेऊ लागलीत. संभाजी महाराजांनी अनेकांना खरमरीत पत्रे लिहिलीत आणि देव-धर्माची आण दिली. पण या आघाडीवरहि परिस्थिती बिकट होत होती. दोन वर्षाच्या कालावधीतच संभाजी महाराजांचे खंदे समर्थक आणि अत्यंत शूरवीर असे सरसेनापती हंबिबराव मोहिते यांचा पण एका युद्धात मृत्यू झाला. हा संभाजी महाराजांना आणि स्वराज्याला हादरा बसला.

अश्या परिस्थितीत दगाफ़टक्याने छत्रपती संभाजी यांचे पकडल्या जाणे आणि मग मोगलांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांना सामोरे जाऊन त्यांचा मृत्यू होणे हि फार धक्कादायक घटना होती. संभाजी महाराजांची शेवटी जीवाची किती घालमेल झाली असेल याची कल्पना करणे कठीण आहे. शारीरिक यातना आणि आपल्या नंतर पुढे स्वराज्याचे काय होणार या विचाराने मानसिक यातना. पण येथेही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. मुसलमान होण्यास नकार देऊन आणि औरंगझेब समोर मस्तक न झुकावून त्यांनी हौतात्म्य पत्कारले कारण स्वराज्याला, मावळ्यांना, मराठी सैन्याला जणू ते शेवटले उत्स्फूर्त करू इच्छित होते. आणि नेमके तसेच झाले. 

औरंझेबाला वाटले कि संभाजी महाराजांनंतर मराठी राज्य संपलेच. आणि काही कमी असेल तर शाहू महाराज हि त्याच्या कब्ज्यात होते. पण या क्षणी औरंगझेबाने काही महत्वाच्या चुका केल्यात आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेल्या मराठ्यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू मुळे मराठे दिडमूढ झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती, कच खाल्ली नव्हती. छत्रपती राजाराम आणि मंत्रिमंडळाने ठरवले कि छत्रपतींनी महाराष्ट्रात रहाता काम नये. हि चाल राजाराम महाराज व मराठी लष्करी रणनीतीचा एक हिरा म्हणता येईल. महाराष्ट्रापासून खूप दूर, थेट दक्षिणेला जिंजी च्या किल्ल्यात राजाराम महाराज गेलेत. यात तीन गोष्टी साध्य झाल्यात. एक म्हणजे मोगलांचे वाढते बळ आणि वाढती फितुरी बघता, महाराष्ट्रात राहून पकडल्या जाण्याची शक्यता कमी झाली. राजाराम महाराजांना दगाफटका झाला असता तर स्वराज्याने दहा वर्षात आपला तिसरा छत्रपती गमावणे फार कठीण गेले असते. दुसरे म्हणजे राजाराम महाराजांना औरंगझेबाने आपलं एकुलते एक लक्ष्य बनविले असते. आणि त्यासाठी त्याने आणि मोगलांनी स्वराज्याची प्रचंड जाळपोळ केली असती. तिसरे म्हणजे,दूर दक्षिणेला राजाराम महाराज असणे म्हणजे  आता स्वराज्याचे सगळे किल्ले आणि जमिनी घ्याव्यात कि स्वराज्य नायकास पकडावे हे कोडे औरंगझेबाच्या सोडविणे आवश्यक झाले.  

या सोबत राजराम महाराज आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी मराठी सरदारांना त्यांची वतने देणे पुन्हा चालू केले. अनेक दशके मराठ्यांना लागलेले वतनदारीचे 'व्यसन' शेवटी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना काही सोडवता आले नाहीं. पण हातघाईची वेळ होती. स्वराज्य तगायला सरदार हवेत, सैन्य हवे आणि महाराष्ट्राचा भूभाग माहिती असलेले हवेत. वतनदारीच्या पुन्हा सुरुवातीच्या अनेक फितलेले सरदार परत आलेत आणि त्यांनी मोघली अंतापर्यंत स्वराज्याला साथ दिली. एवढेच नव्हे तर मोगलांनी जिंकलेल्या भूभागाची वतने पण छत्रपतींने सरदारांना बहाल केलीत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेले मराठी सैन्य आणि थोड्याबहुत प्रमाणात स्वार्थाने पुन्हा उभे राहिलेले मराठी सरदार एकत्र येऊन मोघलांनवर तुटून पडलेत. गेलेले किल्ले पुन्हा घेणे, गेलेली गावे पुन्हा जिंकणे, मोघलांची ठाणी लुटणे, गनिमी काव्याने ठिकठिकाणी मोघलांना धोपटणे, रसद तोडणे, उत्तरेहून येणारी रसद, खजिना लुटणे इत्यादी अनेक मार्गांनी मराठ्यांनी लढा अखंड चालू ठेवला. 

औरंगझेबाने त्याच्या अनेक चुकांपैकी एक महत्वाची चूक केली म्हणजे त्याने दोन आघाड्यांवर मराठ्यांना विरुद्ध लढायचे ठरवले. एक आघाडी म्हणजे जिंजीला वेढा देणे (जो सात वर्षे चालू होता), छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी  आणि दुसरी आघाडी म्हणजे स्वराज्यातला एक एक किल्ला लढवून जिंकणे. आता दुसरी आघाडी खऱ्यात अनेक आघाड्या होत्या. प्रत्येक किल्ला जिंकायला मोघलांना प्रचंड कष्ट पडलेत आणि त्यांनी या भानगडीत अगणित खजिना ओतला. आणि मोघलांनी जिंकलेला अक्षरशः प्रत्येक किल्ला मराठ्यांनी काही वर्षात पुन्हा जिंकला. अनेक किल्ले मराठे मोघलांकडून लाच घेऊन सोडून देत आणि वर्ष-दोन वर्षात पुन्हा जिंकीत. माझ्या माहिती प्रमाणे फक्त तोरणा किल्ला मोघलांनी लढून जिंकला होता. औरंगझेबाने किल्ल्याचे नाव बदलून फुतबुलपूर कि असे काही तरी ठेवले होते.

(क्रमशः) 
 


3/17/24

भाजप आणि श्री मोदी यांची तिसरी वारी

लोकसभा निवडणुकांचे वारे आता सोसाट्याने वाहायला लागले आहे. तारखा मागल्या आठवड्यात जाहीर झाल्यात पण तयारी मात्र सगळीकडे कधीचीच सुरु झालेली आहे. भाजप ने दोनशेच्या वर उमेदवारांची यादी जाहीर पण केली. काँग्रेसने सुद्धा ४०च्या आसपास उमेदवाऱ्या जाहीर केल्यात. हळू-हळू प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार याद्या जाहीर करू लागल्या आहेत. गठ-बंधनाच्या बोलण्या सगळीकडे चालू आहेत. यातील काही, जसे भाजप व आंध्र प्रदेशचा प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस आणि तामिळनाडूचा मुख्य पक्ष डीएमके याचे गठबंधंन पक्के झाले आहे. 

पण निवडणुका फक्त जागा-वाटप आणि गठबंधनांवर जिंकल्या जाऊ शकत नाहीं. राजकीय पक्षाला नवीन बाजू किंव्हा नवीन विचार लोकांसमोर मांडावा लागतो, ज्याचा विचार करून मतदार आपले मत देईल. विरोधी पक्ष हे भाजपच्या विचार-सरणीच्या विरोधात दिसत नाहीत. ना कुठला नवीन विचार, ना कुठली नवीन कल्पना. एक तर फुकटात गोष्टी वाटण्याची खोटी आश्वासने किंव्हा मोदी विरोधाचे रडगाणे. या विरोधी पक्षांचे नामकरण 'मोदी-विरोधी' दल असे करायला हवे.

जनता जनार्दन मात्र याकडे नक्कीच लक्ष देणार आणि त्याचे पडसाद जून मध्ये नक्कीच दिसणार. 

विरोधी पक्षांमध्ये किंव्हा त्यांच्या विचारांमध्ये जरी जंजाळ असले तरी भाजप आणि श्री मोदी यांनी एक राजकीय पक्ष म्हणून आणि एक सत्ताधारी पक्ष म्हणून देशा संबंधित प्रत्येक विषयावर, देशाला भेडसावणार्या प्रत्येक प्रश्नावर आणि देशाच्या भविष्याबद्दल  कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजपच्या वैचारिक रणनीतीच्या काही मुख्य पैलूंचा आपण इथे विचार करू. 

विकास, विकास आणि विकास: भारताचा विकास हि जणू प्रतिज्ञा श्री मोदी यांनी घेतली आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे पायाभूत सुविधा. रस्ते, विमानतळे, रेल लाईन्स, सागरी बंदरे या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व काम मोदी सरकारने केले. हि प्रगती भारत भर झालेली आहे. मुख्यतः उत्तर-पूर्व भारतात आणि जम्मू-काश्मीर भागात रेल लाईन्स चे काम झपाट्याने होते आहे. या व्यतिरिक्त उच्च शिक्षणाची तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र आणि तसेच वैद्यकीय अशी अनेक कॉलेजेस सरकारने स्थापन केलीत. थोडक्यात, एक नवीन भारत बघता-बघता आपल्या डोळ्या समोर उभा राहतो आहे. 

येथे अजून एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सरकारने भारतीय सेनेत अब्जावादी पैसे ओतला. यात परदेशातून अति प्रगत तंत्रज्ञान असलेली शस्त्रास्त्रे आणि विमाने आहेतच पण भारत सेने क्षेत्रात स्वतंत्र व्हावा या साठी मोदी सरकारने मजबूत पाया आणि पायंडा दोन्ही घातले आहे. 

सशक्त, प्रबळ आणि प्रगत हिंदुत्व: भाजप आणि त्या अन्वये श्री मोदी यांच्यावर केल्या गेलेली एक टीका किंव्हा आरोप असा कि पक्ष आणि पंतप्रधान हे हिंदुत्ववादी आहेत. आता यात काही नवल नाहीं आणि यात फारसे तथ्य पण नाहीं कारण पक्ष आणि श्री मोदी यांनी कधीच या गोष्टीचा नकार दिला नाहीं. पक्ष हिंदुत्वनिष्ठ म्हणूनच राजकारणात आला. पण हिंदुत्व म्हणजे मागासलेली विचार प्रणाली, हिंदुत्व म्हणजे नकारात्मक, स्त्री विरोधी, नवीन काळाचा आणि उद्याचा विरोध करणारी धर्मांध विचार प्रणाली अशी कल्पना भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी आणि डावे विचार सरणीच्या लोकांनी करून ठेवली आहे. आपण श्री मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या नीतींचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि या प्रत्येक भ्रामक समजुतीला त्यांनी तडा दिला आहे. हिंदुत्वास नवीन वलय प्राप्त करणे आवश्यक होते. पण नारेबाजी किंव्हा वादाचे भोवरे तयार करून चालणार होते. हिंदुत्वाला सशक्त करायला हिंदूंना आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या संधी उपलबद्ध करण्याची आवश्यकता होती. मोदी सरकारने याबाबतीत साधारण वाटणारी पण सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल आणण्याची क्षमता असणारी ठोस पावले उचलावीत. उदाहरणार्थ, प्रत्येक घरात सिलेंडर पोचविणे, नळाद्वारे पाणी, प्रत्येक घरी शौचालायची सोय व्हावी म्हणून सरकारी अनुदान देणे इत्यादी अनेक योजना सरकारने यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते उघडणे हि फार लहान बाब वाटते. पण यात दोन गोष्टी निष्पन्न झाल्यात. एक, कि तळा-गाळातील समाज घटक आर्थिक प्रणाली आणि त्यान्वये भारताच्या विकासाचे भागीदार झालेत, पण त्याहून आधीक या घटकांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे सरकार आता या जनतेपर्यंत थेट पोहचू शकते, मधल्या 'मिडल-मॅन' ची आवशक्यता नाहीशी झाली.  

श्री मोदी यांनी श्री बाबासाहेब आंबेडकरांना आत्मसात करून वंचित समाजासाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबविल्यात. उदाहरणार्थ, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत वंचित समाजाच्या होतकरू तरुणांना धंद्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यात आले. आरक्षण देणे किंव्हा श्री मोदी यांनी म्हंटले तसे फक्त 'रेवड्या' देणे हा विकास नव्हे. समाजाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत विकास आणि यातूनच आत्मविश्वास निर्माण होईल. स्व, स्व-राष्ट्र,स्व-धर्म या सगळ्या सामाजिक व्यक्तिमत्वाच्या अंगांचा पाय प्रत्येक व्यक्तीत रोवल्या जाईल. सरकारी यंत्रणा आणि उभारते तंत्रज्ञान याचा पुरेपूर उपयोग करून मोदी सरकारने सशक्त हिंदू समाज आणि हिंदुत्वाची घट्ट मुहूर्तमेढ केली आहे. 

राजकारण आणि चाणक्य नीती: भाजप आणि श्री मोदी सतत राजकीय खेळ्या खेळात असतात असा आरोप केला जातो.  राजकीय पक्ष किंव्हा राजकीय नेता राजकारण करणार यात काय नवल? सत्तेवर आल्यावर शांत बसून राज्य करणे आणि राजकारण हे पक्षावर सोडणे असल्या काहीतरी समजुतीत काँग्रेसेतर पक्ष असत. जी काँग्रेसेतर पक्ष केंद्रावर सत्तेवर आलीत ती दुसऱ्या वेळेस पुन्हा निवडून आली नाहीत. कारण काँग्रेस पक्ष कधीच राजकारण करणे सोडत नसत त्यामुळे सत्तेवर नसतील तरी काँग्रेस पक्ष सतत राजकीय खटपटी करीत. राजकीय पक्ष राजकारण करणारच आणि करायला हि हवं. पण राजकारण सत्तेसाठी आणि राजकारण देशासाठी यात बरेच अंतर आहे. सत्तापिपासू काँग्रेस सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला धजत नसे. मग त्यात समाजाचे किंव्हा देशाचे नुकसान झाले तरी चालेल. कारण सत्ता हेच ध्येय होते देश नाहीं. श्री मोदी आणि भाजप या मुद्द्यावर इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे उभे दिसतात. गेल्या दशकातील राजकारणाचे डाव बघता श्री मोदी आणि भाजप काही तरी ध्येय समोर ठेऊनच पावले उचलतांना दिसतात. काश्मीर मध्ये श्रीमती मुफ्ती यांच्या पक्षासोबत राज्यस्थापना केली तेंव्हा अनेक लोक चकितआणि नाराज झालेत. पण सन २०१९ जेंव्हा धारा ३७० नेहमीसाठी बरखास्त झाले तेंव्हा श्रीमती मुफ्ती यांच्या सोबतचे गठबंधं हि केवळ एक राजकीय खेळी होती हे लक्षात आली. या पाश्र्वभूमीवर श्री मोदी आणि भाजप सतत राजकारणाचे डाव-पेच लढत असतात. तिसऱ्यांदा सरकार निवडून येणे हि एक अभूतपुर्व घटना आहे आणि त्यासाठी भाजप आणि श्री मोदी प्रत्येक काळजी घेतांना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात त्यांनी आपली सगळी गठबंधना चाणाक्षपणे पक्की केलीत. 

खूप दशकांनंतर भारताला असा नेता आणि राजकीय पक्ष लाभला आहे जो ध्येयवादी आणि दूरदर्शी आहे. भारतात सध्या भाजप सोडले तर सगळे पक्ष हे प्रादेशिक कुप-मंडूक वृत्तीचे 'फ्यामिली बिझनेस' आहेत आणि हे उज्वल भविष्याचे द्योतक नाहीं. पण हे बदलायला या राजकीय डाव-पेच आवश्यक आहे. भाजप ला टक्कर द्यायची तरी आजच्या राजकीय पक्षांना त्यांचे स्वरूप बदलावे लागेल. नाहीं तर ते नामशेष होतील. येथे फक्त समाज आणि देशाचा विकास अपेक्षित नाही तर भारतीय राजकारणाचा विकास हे पण एक ध्येय आहे. 

श्री मोदी हे भारतीय राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पटलावर आलेलं झंजावात आहे. या तिन्ही अंगांचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्ती श्री मोदींमध्ये आहे. आशा करू या भारतीय मतदार हे समजेल आणि हे बारकावे समजून आपले मत देईल. 

3/7/24

स्वानंद ची चक्कर

गल्लीच्या टोकाशी 8-9 वर्षाचा स्वानंद उभा होता. दुपारची दोन ची वेळ होती.आजुबाजूला शुकशुकाट होता. दुरून स्टेडियम जवळच्या रहदारीचा आवाज येत होता. पण गल्लीच्या टोकाशी फारस कोणी नव्हत. स्वानंद रिकामटेकडा  उभा होता. जवळच्या ग्राउंड वर कुंभार टोळीतली मुले फुलपाखरे पकडत होती. काट्याच्या काटक्यांनी फुलपाखरांना फटकारून खाली पाडत आणि मग प्लास्टिक च्या पिशव्यात ठेवत. ती अर्धमेली फुलपाखरे स्वानंद ला बघावायची नाहीत. त्याचे नेहमीचे मित्र दुपारी खेळायला येत नसत. त्यामुळे एकदा शाळेचे होमी-वर्क झाले कि बहुतांश दुपारी तो एकटाच हुंदडत असे. त्या काळात टी.-वी. वर पण  काहीच नसे.  'तो करे भी तो क्या करे?' स्वानंद ची आई त्यावेळेस घरी उगाच कट-कट नको म्हणून स्वानंदला बाहेर पाठवून देत असे. मग स्वानंद गल्लीच्या टोकाशी असलेल्या कट्ट्यावर बसे, कधी टायर छोट्या काठीने फिरवत, कधी गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या गोठ्यातल्या बछड्याशी खेळत किंव्हा गायीच्या पोळ्याला खाजवीत वेळ काढीत असे. पण आता गायीचे बछडे हि मोठे झाले होते. खोंड झाला होता तो बछडा. मागल्या वेळेस चांगलीच जोरात ढुशी मारली त्या खोंडाने. त्याचे टायर हि कोणी तरी घेऊन गेलं होत. त्यामुळे नवीन काही तरी करायच्या शोधात स्वानंद होता. 

तेवढ्यात त्याच्याजवळ एक स्कूटर वाला आला. 

"इथे जोशी कुठे राहतात माहिती आहे का?"

"कुठले जोशी? तिसरी गल्ली कि सातवी गल्ली वाले?" स्वानंद ने विचारले. 

"माहिती नाहीं बा" 

स्वानंदच्या हातात छोटी काडी होती. न कळत स्कूटर च्या समोर च्या टायर वर तो काठीने हळूच टक-टक आवाज करीत होता. 

"एक काम करू या, तू माझ्या मागे बस. आधी तिसऱ्या गल्लीत जाऊ आणि ते जोशी नसतील तर सातव्या गल्लीतील जोश्यान कडे जाऊ या. माझ्या ओळखीतले जोशी मिळालेत कि मी तुला पुन्हा इथेच आणून सोडतो. तू याच गल्लीत राहतोस का?" स्कूटरवाल्याने विचारले. 

"हो, मी पहिल्या गल्लीत राहतो" स्वानंदने एकदम थाटात सांगितले. जणू पहिल्या गल्लीत राहणे म्हणजे काही मानाची गोष्ट होती. 

"चलतोस का मग?" 

स्वानंद विचार करू लागला. स्कूटरवाले काका तर सभ्य वाटत होते. तिसरी गल्ली आणि सातवी गल्ली अगदी जवळच होती. आणि स्कूटर वरून फिरायला हि मिळेल. 

"चला" असे म्हणत स्वानंद ने काडी फेकली आणि मागच्या सीट वर बसला. स्कूटर वाल्याने लगेच गियर टाकला आणि तिसऱ्या गल्लीच्या दिशेने निघाला. 

"आमच्या इथे दोन जोशी आहेत तसेच दोन देशपांडे पण आहेत. तिसऱ्या गल्लीत आणि सातव्या गल्लीत. त्यामुळे लोक त्यांना तिसरे जोशी किंव्हा सातवे देशपांडे म्हणूनच ओळखतात"

"हो का" स्कूटर वाल्याला पोराची बडबड ऐकून हसू येत होत. 

"मी पत्ता विचारतांना माहिती काढायला हवी होती कि तिसरे जोशी कि सातवे जोशी ते" तो म्हणाला. 

एवढा बोलतोवर दुसरी गल्ली कडे स्वानंद हात दाखवू लागला. पण तिसरे जोशी स्कूटर वाल्याच्या ओळखीचे नव्हते. मग स्कूटर वाल्याने पुन्हा स्कूटर ला किक मारली. 

"सातव्या गल्लीत कसे जायचे?" 

स्वानंद ने विचार केला कि पुढल्या मुख्य रस्त्याने गेलो तर दोन मिनिटात पोचू. त्याने मागच्या रस्त्याने जायचे ठरवले. कारण तिसऱ्या आणि सहाव्या गल्लीच्या मध्ये छोटे ग्राउंड होते. त्याला चक्कर मारून जावं लागत असे. म्हणजे अजून स्कूटर वरून फिरणं होईल. 

"असेच पुढे जाऊन डावीकडे वळू या"

स्कूटरवाल्याने तशी दिशा पकडली. 

"हे जे ग्राउंड आहे याला संघाचे ग्राउंड म्हणतो"

"हो का. पण असे का?"

"कारण इथे संध्याकाळी शाखा लागते संघाची"

"तू जातोस का दररोज?"

"हो, मी शिशु गणात आहे. काल तर मी अग्रेसर पण होतो"

स्कूटरवाल्याला अग्रेसर म्हणजे भानगड कळली नाहीं. 

"या ग्राउंड ला चक्कर मारा आणि मग सहावी गल्ली आणि मग सातवी" स्वानंद ने पुढली सूचना दिली. 

सातव्या गल्लीतले जोशी स्कूटर वाल्याचे जोशी निघालेत. स्वानंद उडी मारून स्कूटर वरून उतरला.

"थँक यु. काय नाव तुझं?" स्कूटर वाल्याने विचारले. 

"स्वानंद" 

"तुला पुन्हा सोडू का पहिल्या गल्लीशी ?" 

"नको नको, मी जाईन धावत. जवळच आहे" असा म्हणत उडया मारीत स्वानंदची स्वारी निघाली पण. 

पहिल्या गल्लीच्या टोकाशी पोचेतोवर त्याच्या डोक्यातली चक्र भिंगरी सारखी फिरायला लागली. मस्त आयडिया आहे हि. लोकांना पत्ते सांगायला मदत करायची, सोबत हिंडणं पण होईल. कोणाला कळणार पण नाहीं. काही दिवसांपूर्वीच त्याने रॉकेलवाल्या बैलगाडीवर हिंडण्याचा प्रताप केला होता. घरी पोचला तर घर भर रॉकेल चा वास. घरा मागे कडुलिंबाचे मोट्ठे झाड होते, एकदा लिंबोण्या पडायला छोटे छोटे दगड तो मारत उभा होता. गल्लीतून येणाऱ्या उपाध्याय आजींना नेमका लागला एक छोटासा गोटा. मग उगाच बोंबा-बोंब! नंतर एकदा घरासमोरून नित्यनेमाने जाणाऱ्या म्हशींवर बसला. त्या दिवशी त्याला दोन गोष्टी कळल्यात, एक कि म्हैस खूपच बेस्ट प्राणी आहे. गायी ढुश्या मारतात पण म्हैस एकदम लोड-लेस असते. दुसरं असे कि म्हैस चिखलात लोळते. म्हशीवरून 'चक्कर' मारून आल्यावर आई ने त्याला बाहेरच्या अंगणातच सगळ्यांसमोर आंघोळ घातली होती. 

इथे डबल-सीट वर हिंडण्यात असली कुठलीच भानगड नाहीं. 

एक नवीन उपक्रम स्वानंद ने सुरु केला. त्याच्या घरी याचा मुळीच पत्ता नव्हता आणि घरी यातील काही सांगायची गरज सुद्धा स्वानंद ला भासली नाहीं. फुल-प्रूफ प्लॅन!  

ज्या दुपारी वेळ मिळेल तेंव्हा स्वानंदची 'गाडी' गल्लीच्या टोकावर 'पार्क' असे, हिंडायला मिळेल या आशेने. 

मग एक दिवशी गम्मत झाली. चक्क एक कार येऊन थांबली त्याच्या जवळ. त्या काळात कार हा प्रकार तसा दुर्मिळ असे. स्वानंद जवळ एक फियाट येऊन थांबली. आधी स्वानंद ला कळले नाहीं कि फियाट का थांबली. त्याला वाटले कि तो कार च्या रस्त्यात येतोय. तो थोडा मागे सरकला. कार मध्ये एक काका-काकू समोर होते आणि एक आजी मागे बसल्या होत्या. काकूंची काच हळू हळू खालती सरकली. 

"हा समोर चा धंतोली पार्क आहे का?" तेंव्हा स्वानंद ला लक्षात आले कि हि  'हरवलेली' कार आहे. आता कार मधून चक्कर मारायला मिळते कि काय? या विचाराने तो हुरळला. 

"नाहीं, तुम्हाला कुठे जायचंय?" इतक्या दिवसात स्वानंद ने विचारायचे प्रश्न पक्के केले होते.

"धंतोली पार्क जवळ जावडेकर म्हणून रहातात. त्यांच्या कडे जायचे आहे" कार बोलली. 

"जावडेकर माहिती नाहीं पण धंतोली पार्क माहिती आहे. त्याचा पत्ता सांगू शकतो" 

"हा कुठला पार्क आहे समोर मग?"

"हे नुसताच क्रिकेट च ग्राउंड आहे. पार्क नाहीं. याला नाव नाहीं. आम्ही याला क्रिकेटच ग्राउंड असच म्हणतो" 

उत्तर ऐकून कार मधल्यांना गंमत वाटली. 

"बरं, मग धंतोली पार्क चा पत्ता सांगू शकतोस का?" 

"मी तुम्हाला तिथं पर्यंत घेऊन जाऊ शकतो." 

"अरे पण मग तू परत कसा येशील?"

"मी येईन पायी-पायी. जवळच आहे. मी जातो खूपदा खेळायला" आता खऱ्यात तो पार्कला एकटा कधीच गेला नव्हता. त्याच्या मोठ्या भावासोबत किंव्हा आजी-आजोबां सोबतच तो गेला होता. पण त्याच्या डोक्यात नकाशा पक्का होता - दुधाच्या दुकान समोरून चौकात, पुढे जाऊन उजवी कडे दयाल चे दुकान, मग थोड्या पुढे डावीकडे पोस्ट ऑफिस आणि त्याच्या पुढच्या छोट्या चौरस्त्याला उजवीकडे पार्क दिसेलच. 

पण भानगड इथेच सुरु झाली. आत्मविश्वास आणि त्याचे वय वर्ष ८ याची भेट या क्षणी झाली. 

स्वानंद मोठ्या ऐटीत कार मध्ये बसला. मागच्या सीट वरच्या आजींनी त्याला कौतुकाने जवळ घेतले. आता गाडी रिव्हर्स घेऊन मुख्य रस्त्याच्या दुधाच्या दुकान वरून घेण्या ऐवजी कारवाल्या काकांनी गल्लीतच गाडी घातली. 

"इथूनही सरळ पार्क लागेल असा वाटतंय?" त्यांनी विचारला आणि त्या विचारण्यात गाडीने वेगाने दोन गल्ल्या ओलांडल्या पण होत्या. इथे स्वानंदला जाम टेन्शन आलं कारण त्याच्या डोक्यातले होकायंत्र या भानगडीत पूर्णपणे गोंधळले होते. आता गाडी थांबवून माहिती असलेल्या रस्त्यावर कसे यायचे  याची मुळीच कल्पना त्याला नव्हती. एकच उपाय म्हणजे जिथे तो टाइम-पास करीत उभा होता तिथे परत जाणे. पण तसे सांगायला त्याला लाज वाटली. लहान वयात फारस काही कळत नसले तरी फजिती होण्याची भीती फार असते. मनुष्याला उपजतच असावी ती भीती. 

"कुठे वळायचं सांगशील बाळा?" कारवाले काका म्हणाले.  

"हो" स्वानंद कसा-बसा म्हणाला. 

"कितवीत आहेस स्वानंद तू?" आजींनी प्रेमाने विचारले

"तू असा कर मधून इतक्या दूर येतोस हे तुझ्या आई-बाबांना माहिती का रे?" समोरच्या सीट वर बसलेल्या काकू म्हणाल्या. 

इथे स्वानंद च टेन्शन वाढत होत. कोणी काही विचारलं नसत तर चाललं असत. मारुतीचे देऊळ पण मागे पडले. मारुती देवळासमोरून जातांना काकांनी कार हळू केली. रीतसर खिडकूतून त्याने नमस्कार केला. 

नेमका स्वानंद ला तिथे चिन्मय दिसला. चिन्मय चकित होऊन बघत होता कि स्वानंद एक तर कार मध्ये बसलाय आणि ते पण अनोळखी कार मध्ये बसलाय. 

"डब्या" त्याने हाक मारली. स्वानंद बडबड करण्यात वस्ताद होता म्हणून त्याचे मित्र त्याला प्रेमाने डब्बा म्हणत असत. 

स्वानंद ने कार च्या खिडकीतून बाहेर बघितलं. 

"कुठे चालला रे?" चिन्मय ने विचारलं. 

"धंतोली पार्क" 

"मग तिकडे कुठे?" पुढे काही तरी चिन्मय म्हणत होता आणि उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद ला वाटले कि ओरडून नेमकं कुठे ते विचारावा पण तो पर्यंत काकांनी  पुढचा गियर टाकून गाडीचा वेग धरला आणि दोन गल्ल्या अजून ओलांडल्यात. 

अजून एक छोटा चौरस्ता ओलांडून काकांनी गाडी हळू केली. "डावी कडे वाळू कि उजवीकडे बाळ?" काकांनी विचारला. त्यांना शंका यायला लागली होती कि या बावळूरामला रस्ता माहिती नाहीं.

"इथून अजून एक गल्ली सरळ जाऊ या. मग माझ्या लक्षात येईल. दिशा बरोबर आहे आपली"

"अहो, याला रस्ता माहिती आहे असं दिसत नाहीं या" काकू हळूच काकांना म्हणाल्यात. "याला पुन्हा सोडून यायचा का त्याच्या घरी? कोणाचा पोरग आहे माहिती नाहीं आणि आपण त्याला कार मध्ये घेऊन धंतोली पार्क शोधतोय!"

स्वानंदच इतका स्वच्छ बोलणं ऐकून आजी मात्र जाम खुश होत होत्या. त्यांनी त्याला अजून जवळ घट्ट घेतले. "फारच गोड आहेस रे तू? नाव सांगितलं नाहींस अजून तुझं?"

"स्वानंद" 

दोन गल्ल्यापूर्वी चिन्मय उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद च्या डोकयात कुठे तरी होतच  कि आपण पार्क च्या डाव्या बाजूला आहोत. म्हणजे उजवीकडे वळलं तर पार्कच्या दिशेने जाऊ. 

"काका उजवी कडे वळा"

"नक्की का रे स्वानंद? नाहीं तर एक काम करूया, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो किंव्हा तू ज्या गल्ली च्या टोकाशी उभा होता तिथे सोडतो. आम्ही पार्क नंतर आरामात शोधू."

"नाहीं नाहीं, उजवी कडे वळा येईलच पार्क" स्वानंद ने मनात देवाचे नाव घेतले. आता उजवी कडे पार्क नसेल तर त्याने ठरवलं होता कि गाडी हळू झाली कि दार उघडून उडी मारायची आणि घरी पळायचे. पण त्याला घर ते पार्क आणि पार्क ते घर रस्ता माहिती होता. किंव्हा त्याला असे वाटत होते! पण पार्क मिळालाच नाहीं तर घरी तरी कसा जाणार?

गाडी थांबवून मगाशी चिन्मय ला हि कार मध्ये बसवायला हवे होते. त्याच्यासोबत घरापर्यंत कसेतरी पोचलोच असतो. 

"अहो, तुम्ही पण ना, त्याला नाहीं माहिती रस्ता. विचारा बरं पानस्टॉल वर" काकू म्हणाल्यात. 

"हो ग, विचारतो. तू उगाच मागे लागते. काही तरी सांगतोय ना पोरगा" असं म्हणे पर्यंत ते पुन्हा एका छोट्या चौरस्त्यावर आलेत आणि अक्षरश चमत्कार झाला. समोर उजवीकडे धंतोली पार्क! 

स्वानंद पण चकित झाला. काय जादू आहे असा तो विचार करीत होता. खरंच उजवीकडे वळलो तर पार्क दिसतोय. त्याला हुश्श झालं.  

काकांनी चौरस्ता ओलांडला. गाडी हळू हळू पुढे नेली. आता पार्क तर मिळाला पण पार्कच्या समोर घर आहे असा पत्ता होता. त्यामुळे आता चौ बाजूंनी फेऱ्या माराव्या लागणार असा ते काहीतरी विचार करीत होते. 

"काका, मी उतरतो." काकांना एकदम जाग आली कि स्वानंद गाडीतच आहे. 

"सोडतो मी तुला" ते म्हणाले. 

"नको, नको, मी जातो इथून. जवळच आहे घर" अस म्हणत स्वानंद कार मधून उतरला पण. 

"हुशार आहेस हां तू स्वानंद. आमची सोय झाली तुझ्यामुळे" आजींनी निरोप दिला. 

"आणि अस कोणाच्याही गाडीत बसून जाऊ नकोस हां" काकूंनी पण निरोप दिला. 

बाहेर छान वार सुटलं होत. स्वानंद उड्या मारीत निघाला. त्या वयाची मजाच वेगळी असते. वार जास्त गार लागत, ऊन-धूळ लागत नाहीं. पार्क मधल्या उंच-उंच झाडांच्या पानांचा सळसळ आवाज येत होता. त्याला आज नवीन रस्ता कळला होता आणि फजिती पण झाली नव्हती. मुख्य म्हणजे कार मध्ये बसायला मिळाले. फियाट मध्ये.  आणि त्याने रस्त्याकडे नजर टाकली -  इथून सरळ गेला कि डावीकडे दयाळ च दुकान, मग पान डब्ब्यांचा चौक आणि मग उजवीकडे प्रधान डॉक्टरांचा दवाखाना आणि मग त्याच्या घराची गल्ली.