9/30/25

लिहिल्याने होत आहे रे...आधी लिहिले पाहिजे!

 

तीन वर्षांपूर्वी मी ठरवले कि दर महिन्याला मी एक मराठी आणि एक इंग्रजी लेख माझ्या ब्लॉग वर लिहून प्रकाशित टाकणार. सन २०२३ पासून ऑगस्ट २०२५ पर्यंत मी हे नियमाने केले. बहुधा या महिन्यात व्यत्यय येणार. हा लेख मी सप्टेंबर ३० ला लिहायला चालू करतोय. आज रात्री पर्यंत झाला तर ठीक आहे नाहीं तर मग? फारस काही नाहीं, ऑक्टोबर महिन्याचा म्हणून टाकीन. लेख लिहायला घेतला कि या वेळात संपवायचाच हे मला करणे साधारणपणे फार कठीण जाते. याचा संबंध वेळेशी नसतो. लेख किंव्हा गोष्ट कुठला रंग पकडेल, कुठल्या रस्त्यावर निघून जाईल मलाच माहिती नसते. खूपदा अर्ध्यातच लेख किंव्हा गोष्ट सोडावी लागते कारण मीच भ्रमित झालो तर वाचकाला तर नक्कीच काय चाललंय कळणार नाहीं. कधी कधी मात्र एक नवीन सूर मिळतो. नवीन विचार अचानक डोकावतो, नवीन भावना जाणवते आणि मग शब्द आपोआपच सुचतात. ज्यांना ज्यांना मी माझे लेख पाठवितो त्यांच्या कडून कौतुकाचे शब्द परतात. "प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते ॥" यातला मी काक (म्हणजे कावळा!) बनून मी मनातच प्रासाद बनवून त्याच्या शिखरावर बसतो! 

खरेतर बरेच लेख आणि गोष्टी लिखाणात आहे. एक 'लिमलेटची गोष्ट' म्हणून कथा कधी पासून लिहितोय. मग 'वाडा चिरेबंदी' म्हणून खूप पूर्वी ऐकलेली लोककथा लेखनात आहे. मग शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित नागपूरच्या भोसल्यांबद्दल एक लेख अर्धवट आहे. त्या घराण्याचे थोर श्री रघुजीराजे भोसल्यांची ओरिसा आणि बंगाल स्वारी, त्यातले बारकावे आणि त्या अर्धवट राहिलेल्या कार्यामुळे ब्रिटिशांना कसे पावले आणि काही दशकात पूर्ण बंगाल त्यांना विनासायास गिळता आले. मध्ये ऑर्बिटल नावाच्या पुस्तकावर आढावा लिहून झालाय. तो नोव्हेंबर साठी आहे. काही महिन्यांपूर्वी मित्रांसोबतच्या एका ट्रिप मध्ये पंढरपुरी श्री विठ्ठल-रुख्मिणी आणि मग पुढल्या ट्रिप मध्ये अयोध्येस श्रीरामाचे दर्शन झाले. त्या अनुषंगाने प्रवास वर्णन आणि श्रीराम मंदिरासंबंधित प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांच्या पुस्तकातील माहिती द्यायची आहे. त्या लेखासाठी पुस्तकातील माहिती काढलेली आहे फक्त लिहिणे बाकी आहे. कधी वेळ नसतो तर कधी सुचत नाहीं. माझ्यासारख्या क्षुल्लूक ब्लॉगर ची हि गत, मोठं-मोठाले लेखक कसे एवढे आणि ते पण दर्जेदार लिहू शकतात? 

मोठं-मोठाल्या लेखकांवरून आठवले, उद्या ऑक्टोबर १ ला स्व. श्री ग.दि. माडगूळकरांच्या जन्म दिवस. त्यांची आत्म-चरित्रपर दोन पुस्तके, 'मंतरलेले दिवस' आणि 'वाटेवरच्या सावल्या' वाचनात आलीत. त्या व्यतिरिक्त 'बांधावरच्या भाबळी' पण वाचले. त्यांची कला आणि लेखन अजरामर होतेच त्यांचे आयुष्य अद्भुत होते. नुकताच वासोट्याच्या किल्ल्याला जातांना गदिमांच्या माणदेशातून जाणे झाले. त्यांच्यावर एक लेख सुरु केला होता. पण जर तो लेख पूर्ण झालाच तर अजून तो संपायला बराच वेळ आहे. गदिमांकडे  शब्दांचे वरदान होते, डोक्यावर सरस्वतीचा हात होता, म्हणून त्यांच्याबद्दल जरी लिहायचे असले तर लेखक आम्ही आहोत...नो वरदान, नो हात डोक्यावर! 

दरवर्षी विचार करतो कि वाढदिवसाला काहीतरी लिहीन. चाळिशीला लिहिला पण होता काही तरी...४१ चा झाल्यावर. पण निदान लिहले तरी होते. आता हळू हळू नवीन भावना मनात प्रश्न येतो कि वय वाढले म्हणून लिहिण्यात अर्थ आहे का? वयानुरूप किंव्हा वयासोबत असा कायच अनुभव आहे कि जो वाचून वाचक म्हणेल कि वाह ...असा कधी विचारच केला नव्हता! चार-चौघांसारखे आयुष्य. प्रत्येकाचे आयुष्य वैयक्तिक दृष्टिकोनातून स्पेशल असतेच किंव्हा असावे. पण प्रत्येक आयुष्यातून शिकण्यासारखेच असते असे नाहीं. प्रत्येक घटना धडा असेलच असे नाहीं. आणि असला तरी तो धडा दुसऱ्यांसाठी असेलच याची शक्यता तर अजून कमी. असलेला आनंद घेत, येणाऱ्या सामन्यांना समर्थपणे सामोरे जात आले आणि हे करतांना तब्येत चांगली असले म्हणजे पावले. उगाच मी काय शिकलो याचे दिवे लोकांसमोर पाजळायचे आणि मग विचार करायचा कि त्या दिव्याच्या प्रकाश लोकांच्या डोक्यात पडतो आहे का? या वायफळ उलाढाली करायला उगाच लिहा-लिही नको. लोकांनी आपले दिवे शोधून स्वतःच्या डोक्यात हवा तसा आणि हवे तेंव्हा लक्ख प्रकाश पाडाव. बेस्ट ऑफ लक! 

असो. बघता बघता पाचशे शब्द खरडले पण. काय लिहितोय, काय लिहिणार आणि काय लिहायला नको इत्यादी उहा-पोह करण्यात एखादी गोष्ट किंव्हा लेख पूर्ण झाला असता. आता ९ वाजतायत रात्रीचे. हा लेख प्रकाशित करून महिन्यातून एक मराठी ब्लॉग लिहिणार हा हेतू पूर्ण झाला. सध्या यातच मी आनंदी आहे. 

आता इंग्रजी ब्लॉग राहिलाच आहे. त्याचे काय होणार देव जाणे. 

No comments: