7/22/09

रेखांकित भाग २

परतीच्या वाटेवर दोघीं पैकी कोणीच काहीच बोलत नव्हत. जसलीनला कळत नव्हत की स्वत:च्या लग्नाची चिंता करावी की मेघना बद्दल जे ऐकल त्या बद्दल तिच्याशी बोलाव. मेघना सुन्नपणे गाडी चालवत होती. तिला खर खुप रडावस वाटत होत, ओरडावस वाटात होत पण तिच मन दगडासारख निश्चल पडलेल होत. जे घडल, जे ऐकल ते सगळ एक अघोरी स्वप्न आहे आणि यातुन कधी जागं होउ अस तिला वाटत होत. बाबाने सांगितलेल सगळ खोट आहे अस ती सारख घोकत होती. पण बाबाला खोट बोलुन काय मिळणार होत?

मेघनाने जसलीनला घरी सोडल आणि ती आपल्या घरी आली तर कोणीतरी पाहुणे बसले होते.
"हि आमची मुलगी, मेघना" मेघनाच्या आईने ओळख करून दिली.

"माझ्या लहानपणी आम्ही शेजारी होतो. खुप खेळायचो. आज खुप वर्षांनी भेटतोय.

मेघनाने दोघांना नमस्कार केला आणि पटकन आत निघुन गेली.

"अग, चहा करतेस का?" आईने हाक दिली. मेघनाने काहीच उत्तर दिले नाही पण कपडे बदलुन चहाच आधण ठेवल. तिला खुप थकल्यासारख वाटत होत.

तेवढ्यात आई आत आली.

"अग, चहा कर म्हटलेल ऐकलस का?"

"हो"

"बर वाटत नाहीया का? ऊन लागल का?" तिचा पडलेला चेहरा बघुन आईने थोड काळजीने सुरात विचारल.

"नाही. बरं आहे" मेघना कसबस म्हणाली. तिला आता मळमळल्या सारख वाटत होत.

"चहा घेउन आलीस तर थोडी बस बाहेर थोडी. बोल त्यांच्याशी"

"मला कस तरी होतय" मेघना हळुच बोलली.

"बघ आत्ताच म्हणालीस बर वाटतय आणि आता म्हणतेस की बर नाही वाटत. चेहरा कोमेजुन गेला आहे. कशाला गेलीस उन्हात? थंडीतलही दुपारच ऊन बाधत बाळा"

आई बोलतच होती तर मेघनाला पाय जड झाल्यासारखे वाटायला लागल आणि अंगात थंडी भरली. तिने भिंतीचा आधार घेतला.

"मेघना" अस म्हणत आईने तिला सावरायचा प्रयत्न करू लागली. "अग काय होतय पोरी?"

मेघनाला सगळ भोवती गरगर फिरतय अस वाटु लागल. तिने थंडगार फरशीवर अंग टाकल. हात-पाय शिथिल पडले होते. शरीरापासुन दूर जातोय असा तिला भास व्हायला लागला. अंगात मुळीच म्हणजे मुळीच त्राण नव्हता. हळु-हळु कमी ऐकु येऊ लागला. कानात एकच असा कुं आवाज फिरु लागला. मेघनाला अचानक आठवल की कोणीतरी दूरच्या काकाला कमी ऐकु यायच आणि तो सगळ्यांना सांगायचा कि त्याला कानात ओमकारच ऐकु येतो. तिला मनात खुदकन हसु आल. आजु-बाजुच्या सगळ्या गोष्टी संथ झाल्या होत्या. आई सावरायचा प्रयत्न करत होती. बाहेरच्या पाहुण्यांना आईने हाक मारली असावी कारण त्या काकु वाटीतुन तोंडावर पाणी मारत होत्या. फारच थंड होत पाणी. तिला काय चाललय याची पूर्ण कल्पना होती पण शरीराने जणु साथ सोडायची झटापट लावली होती. तिने डोळे मिटले. तिला वाटल झोप लागेल पण झाल विपरीतच. दगडासारख निपचित पडलेल मन चुळबुळ करायला लागल. तिच्याशी भांडायची तयारी करायला लागल.

डोळ्यासमोर सारखा बाबा फिरु लागला. "जिसकी तुम परिणिता बनोगी उसकी मृत्यु अटल है।" याचा अर्थ काय? परिणिता म्हणजे नेमक काय? यातुन काहीच मार्ग निघु शकत नाही का? गोष्टींमधे तर नेहमी ऐकतो की व्रत-वैकल्य केलं की सगळ छान होत? मला वैकल्य म्हणजे काय हे सुद्धा नेमक माहिती नाही, मी कसली डोंबलाच व्रत-वैकल्य करतेय. पण त्याला काही तरी शब्द आहे. उ:शाप की अस काहीस म्हणतात. हो, बरोबर, उ:शापच. मला उ:शाप कोण देणार? गोष्टींमधे शाप देणाराच उ:शाप देतो. पण मला शाप कोणी दिला? काय चुकल माझ? कोणाच काय बिघडवल मी? मग कोणीच शाप न देता मी शापीत कशी?; तिला शापित शब्द नकोसा झाला. ज्वाळेसारखा तो शब्द तिला चटके देत होता.

ती डोळे उघडायचा प्रयत्न करू लागली. आपण नेमके कुठे आहोत ते तिला कळेना. आई अंधुकशी समोर दिसत होती आणि अंग भट्टीसारख तापल्याची तिला पहिल्यांदा जाणीव झाली. कपडे ओले-चिंब झालेले होते. घशाला कोरड पडली होती. तिने पाणी म्हणण्याचा बराच प्रयत्न केला पण तिला तोंडातुन भ्र काढण जमेना. आई काहीतरी बोलत होती पण ते तिला नीटस ऐकु येत नव्हत. अनिकेतच्या आठवणीने ती परत कासाविस झाली.

' अनिकेत कुठेय? जेंव्हा गरज असते तेंव्हाच तो नेहमी गायब होतो. किती आठवण येतेय त्याची. कुठेय तो? इथे मला जीव नकोसा झालाय आणि तो मस्त भटकत असेल. मित्रांसोबत चहा पित उभा असेल कुठल्य तरी चौकात. अस काय करतो तो? माझी काळजी नाहीया का त्याला?'


तेवढ्यात आईने चमच्याने पाणी पाजल. मेघना ने डोळे मिटले. अंगाचा ज्वर कमी झाल्यासारखा तिला वाटु लागल पण अनिकेतच्या आठवणीने मनातले निखारे आत्ता खरे शिलगु लागले होते.

'काय सांगायच त्याला? तो आधी थट्टेनी उडवुन लावेल मग त्याला सगळ पटवुन कस द्यायच? आणि समजावुन तरी काय सांगणार? त्याची झाले नाही तर मी जगु नाही शकणार आणि त्याची झाले तर तो नाही जगणार. कसला अभद्र खेळ मांडळाय दैवाने. दैवानेच शाप दिलाय मला, आता गार्‍हाण तरी कोणापुढे मांडणार?
'कालकूट विष को मन मे ही धारे रहो।" बाबा परत डोळ्यापुढे नाचु लागला.

'समुद्र मंथनातुन कालकूट विष निघाल म्हणतात आणि जगाला वाचवायच्या भानगडीत शंकर बळी चढला. पण त्यासाठी त्याला पार्वतीचा त्याग करावा लागला नाही. पार्वतीला सोड आणि कालकूट प्राशन कर अशी अट घातली असती तर त्याने काय केल असत?

कसले भन्नाट विचारांनी घोंगा घातलाय डोक्यात.'

तिला स्वतःपासुन कुठे तरी दूर पळुन जावस वाटत होत. 'तिला अनिकेत डोळ्यासमोर दिसु लागला.

'नेहमी खिशात हात घालुन फिरत असतो. स्मार्ट दिसतो अस त्याला वाटत, बावळट.'

"उसकी मृत्यु अटल है।" बाबाचे शब्द तिला परत आठवले. तिचा जीव कासाविस झाला. तिने डोळे उघडण्याचा परत प्रयत्न केला. समोर अंधार होता. ती अजुनच घाबरली. दिसण सुध्दा बंद झाल कि काय? मग तिच्या लक्षात आल की रात्र झाली असावी. समोर आई दिसत नव्हती. आता अंग तेवढ भाजत नव्हत पण घशाला कोरड पडली होती.

"आई" मेघनाने हाक दिली.

बाजुलाच बाकावर झोपलेली आई खडबडुन जागी झाली. तीने दिवा लावला.

"मेघना, कस वाटतय बाळा?"

दिव्याचा मंद प्रकाशही तिला असह्य होत होता. तिने त्रस्तपणे दिव्याकडे बघितल. आईने लगेच दिवा मालवला.

"पाणी हव का बाळा?"

मेघनाने डोळ्यानीच होकार दिला.

आई तिला चमच्याने पाणी पाजु लागली. तेवढ्यात नर्स खोलीत आली. तिने नाडी तपासली. खर्ड्यावर काहीतरी लिहिल.

"काळजी करु नका ताई. ताप उतरतो आहे. "

आपण हॉस्पिटल मधे आहोत हे मेघनाला आत्ता लक्षात आल.

'बराच घोटाळा केला म्हणजे आपण.' अस स्वत:शीच बोलत तिने परत डोळे मिटले.

"किती घोर लावलास मेघना" आई अस काहीस म्हणत होती पण मेघना मनाच्या गुहेत नाहीशी झालेली होती.

"जो होना है उसे होने दो, उससे खिलवाड मत करो" बाबा परत डोळ्यासमोर बाहुली सारखा नाचु लागला. 'अरे, अस कस होऊ देऊ? अस असत तर कधीच काहीच करायची गरज नको. सगळ विधिलिखित आहेच. अभ्यासही करायला नको कारण पास व्हायच तर पास होणारच आणि फेल व्हायच तर अभ्यास करुनही फेलच होणार. यातुन काहीतरी मार्ग काढावाच लागणार. वाट्टेल ते झाल तरी चालेल. दैव गेल खड्ड्यात! बघतेच काय करत दैव ते. त्याने त्याची चाल खेळली आता मी माझी खेळणार"

या विचाराने मेघनाला बर वाटल. तिल हळु-हळु शांत झोप लागली.

कोणीतरी हातावरून हात फिरवल्याचा तिला भास झाल. तिने डोळे उघडलेत समोर जसलीन बसली होती. दाराशी अनिकेत उभा होता. मेघनाने डोळे उघडलेले बघुन जिन्सच्या खिशात हात घालुन तो पलंगाजवळ आला. डोळे बारीक करत तो हसला.

"कस वाटतय?"

ते ऐकुन मेघनाला अजुनच छान वाटायला लागल. काहीतरी मार्ग नक्कीच निघणार याची तिला पक्की खात्री पटली.

"मला माहितीय सगळ. आपण काहीतरी विचार करु" तो शांतपणे म्हणाला. जणु तो तिच्या मनातलच बोलला. तिच्या मनात पेटलेल्या ज्वाळेत तो ही तितकाच होरपळला होता.