11/24/23

नेते हवेत, राजकारणी नको. देव हवेत, देवळं नकोत!

आमच्या घरामागे एक नवीन देऊळ बांधले गेले आहे. तशी आस पास बरीच देवळं आहेत. पण हे झगमगीत आणि भव्य आहे. त्यामुळे सहाजिकच त्यावरचे भोंगेहि मोठे आहेत आणि सकाळ संध्याकाळ नुसता गोंधळ चालतो भोंग्यांवर. त्यांना आवाज कमी करण्यासाठी बऱ्याचदा विनंती केली. पण इथल्या कोण्या 'दादा' च आहे.ते देऊळ हे आराधना करायला शांती स्थळ असावे असल्या 'चुकीच्या' कल्पना त्या दादाला नाहीत. दिवे, रोषणाई, मंडप आणि भोंग्यांवर आवाजाचे प्रदूषण यातच त्याला महात्म्य वाटते. पण विचार केला तर असल्या धांगड-धिंग्याच्या कल्पना या 'दादा' च्या आहेत असे नाहीं. बहुतांश समाजाच्या असल्या कल्पना होऊन बसल्या आहेत. देवाची आराधना हि एक अति-वैयक्तिक गोष्ट असावी यापॆक्षा या आराधनेचा भपका कसा करायचा यात लोक व्यस्त आहेत. देवळांचा जीर्णोद्धार होतो आहेच आणि त्याहून गतीने नवीन बांधली जात आहेत. आता तसे म्हणाल तर हि एक स्पृहणीय घटना मानायला हवी. पण नवीन देवळं हि वास्तुशिल्पाचा नमुने आहेत असही नाहीं आणि हे देवळं सामाजिक समारंभाचे व कार्यक्रमांचे, लहान मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, रंजल्या-गांजल्यांच्या साठी, लेखन, अभिनय, व्याख्यान, नृत्य इत्यादी कलेसाठी, मुसलमानी आणि ख्रिश्चन धर्मांचा प्रदुर्भाव थांबवण्यासाठीची केंद्रे सुद्धा नाहीं. हि सत्ताकेंद्रे, राजकारणाची केंद्रे, भारत सरकार किंव्हा राज्य सरकारने पैसे ढापायची केंद्रे होऊन बसली आहते. धर्म वृद्धिंगत व्हावा, स्थापन व्हावा, विकसित व्हावा, धार्मिकता वाढावी, श्रद्धा वाढावी व अंधश्रद्धा कमी व्हावी अश्या कुठल्याही हिंदू धर्माला आवश्यक घटना देवळांमध्ये जितक्या प्रमाणात व्हाव्यात तेवढ्या होतांना दिसत नाहीत.   

पण या बेभान श्रद्धेला किंव्हा श्रद्धेच्या देखाव्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवता येईल का? समाज अधिक शिक्षित होतो आहे, स्त्री-मुक्ती, दलित - हरिजन विकास या आघाड्यांवर समाज प्रगती मार्गावर आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात हि समाज प्रगती करतो आहे आणि सजग आहे. विज्ञानावर जनतेची संपुर्ण विश्वास आहे. मग 

नेमकं कारण कुठले? साधने आणि कृती अति वाटल्यात तरी हि श्रद्धा खोटी नाहीं. हि चिकित्सा हिंदू धर्मात आणि समाजातील देवळांच्या स्थानाची सुद्धा नाहीं. देवळे हवीत, डोके टेकवायला स्थान हवे आणि देव हवेत. अगदी जुनी आणि उध्वस्त केलेली देवळे पण पुन्हा बांधायला हवीत. समस्या ही वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या सीमा-रेषेवर आहे. 

माझ्या मते दोन मुद्द्यांचा इथे विचार करायला हवा. १) वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि त्यान्वये बिना शिडाच्या होडीसारखी भावना आणि दुसरं म्हणजे सामाजिक जीवनात मार्गदर्शन आणि मार्गदर्शनकर्त्यांचा अभाव.  

गेल्या काही दशकां मध्ये जीवन फार घडामोडींचे झाले आले. दबाव, तणाव, हे शब्द जणू प्रत्येकाची प्रतिनामे झाली आहेत. अगदी लहान वयापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे दबावात असतात, कुठल्या ना कुठल्या तणावात असतात. प्रत्येक काळ कुठल्या ना कुठल्या गतिविधीने, व्यक्ती किंव्हा घटनेने नावाजतो. सध्याचा काळ हा  विरोधाभासाचा काळ म्हणू शकतो. एकीकडे  आयुष्य सुखाचे, आरामाचे झाले आहे. पण या ऐहिक सुखाची किंमत आपण सतत वाढणाऱ्या अस्थिरतेने देतो आहोत. ही अस्थिरता नुसती नोकरी, पैसे इत्यादी साठी नसून मानसिक अस्थिरता फार झपाट्याने वाढते आहे. दृष्टीक्षेपात कुठे किनारा नाहीं की जिथे शांतपणा मिळेल, विचार करायला मुभा असेल. सगळीकडे जाहिरातींचा गदारोळ, जिथे प्रत्यक्ष जाहिराती नसतील तिथे पैसे घेऊन बडबड करणारे लोक. धुराळा, धुकं, कर्णकर्कश धुमाकूळ, अस्थिर वाटा, सतत बदलती लक्ष्य, अश्या भ्रमित परिस्थितीत कुठे तरी डोकं टेकवावे वाटणे सहाजिक आहे. बाहेर काहीही असो देव्हाऱ्यात देव तर स्थिर आहे! 

या बिंदूवर दुसरा मुद्दा पदार्पण करतो. अस्थितरते सोबत मला वाटते कि वाट दाखविणारे कमी होत आहेत. प्रत्येक मनुष्य  घर आणि समाज अश्या दोन रूपातून वावरत असतो.  घरातून मोठ्यांनी लहानांना वाट दाखवावी तसेच समाज स्तरावर नेत्यांनी पण वाट दाखविणे आवश्यक आहे. समाजाचा घटक म्हणून अनेक प्रश्न पडतात. काहींची उत्तरे मिळतात, काही प्रश्न जटिल असतात आणि आकलनी पडत नाहीं. काहीं प्रश्नांची उत्तर नको असतात फक्त वाट कळावी एवढीच अपेक्षा असते. हे नेते फक्त राजकारणातच नसतात. (सध्या राजकारणात नेते नाहीत आणि पुढारी पण नाहीत. बहुतांश पणे कौटुंबिक धंदे चालवणारी 'घराणी' आहेत)  कला, लेखन, औद्योगिक, समाजसेवेतून, अध्यापन क्षेत्रातून असल्या विविध क्षेत्रातून नेते हवेत. आता नेता म्हणजे नेमके काय यावर स्वतंत्र लेख हवा. पण थोडक्यात चांगल्या-बरोबरची सीमारेषा जो दर्शवू शकतो तो. आणि हे मार्गदर्शन करतांना वैयक्तिक स्वार्थ नसतो. आणि इथे स्वार्थ म्हणजे केवळ आर्थिक नव्हे तर अगदी कुठल्याही प्रकारचा नको. असा नेता (स्त्री किंवा पुरुष) त्या क्षेत्रातील नामवंत हवी, त्या क्षेत्रातील कर्तृत्ववान हवी आणि उपस्थित विषयावर केलेलं भाष्य किंव्हा कृती जरी समाजाला रुचणारी नसेल तरी स्थिरतेने सत्याची बाजू न सोडण्याचे धैर्य त्यांच्यात हवे. आणि जरी भाष्य किंव्हा वक्तव्य करणारे व्यक्तिमत्व नसेल तरी कृतीतून नेहमी चांगला मार्ग दाखवू शकण्याची कुवत असलेला नेता हवा. श्री प्रकाश आमटे हे कृतीतून मार्गदर्शन करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. औद्योगिक क्षेत्रात जे. आर. डी. टाटा, किंव्हा शंतनुराव किर्लोस्कर , वालचंद हिराचंद किंव्हा जुन्या काळातील नाना शंकरशेठ. वैज्ञानिक क्षेत्रात होमी भाभा, सी.वि. रामन किंव्हा शांतीस्वरूप भटनागर. 

असा नेता किंव्हा नेतृत्व आणि ते पण समाजाच्या कुठल्याही क्षेत्रात आज दिसत नाहीं. येथे 'दिसतात' या शब्दाकडे लक्ष द्यावे. कारण नाहींत असे नाहीं, पण जणू अदृश्य, सुप्त आहेत. लोकप्रिय आणि पुढारी याच्या व्याख्या धूसर झाल्या आहेत. थीमक्का या १०७ वर्षाच्या व्यक्ती बद्दल ऐकलंय का कधी? 

'दिसतात' ते फक्त राजकारणी. कुठल्याही सामाजिक किंव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटनाला (बहुतांशत:) एखादा राजकारणी असतोच. नगरसेवक किंव्हा खासदार किंव्हा आमदार किंव्हा कोणीतरी, कुठलातरी मंत्री. यांच्या हातात पैश्याच्या नाड्या असतात, सत्तेचे चाबूक असतात, या दोन बळावर यांना काहीही घडवता येते. साहित्य संमेलन? संगीत सभा? आणि जरी कुठल्या सेवाभावी संस्थेने हे कार्यक्रम आखले तरी यांना बोलावतात कारण पुढे मागे काही लागले, झाले तर यांचे पाय धरावेच लागतात. त्या राजकारण्याचा त्या कार्यक्रमाशी, किंव्हा त्या विषयाशी तिळमात्र संबंध नसतो पण समोर माइक असला आणि बसायला खुर्ची असली म्हणजे त्यांना पावत, तेवढंच लागत. रिबीन कापायला नाहीं मिळालं तरी व्यासपीठावर नक्कीच असतात. तेही नाहीं जमलं तरी सगळी कडे अगडबंब पोस्टर्स वर 'अभिनंदन' करीत आदळतात. डोळ्यांना, डोक्याला, बुद्धीला, कानांना नुसती गजबज करतात. आणि तेही नाहीं मिळालं तर स्वतःच्या (?) पैश्यांनी कार्यक्रम घडवतात आणि स्वतःच उभे रहातात. सोबत पाच-दहा गाड्या घोडे आणि पाच-पन्नास 'गाढव' सतत बाळगून नुसती हुल्लडबाजी करतात. समाजाचा जणू कुठला कोनाडा यांनी मोकळा ठेवला नाहीं  मार्गदर्शनास व्यासपीठ नाहीं, मार्गदर्शनकर्त्यास खुर्ची नाहीं आणि शांतपणे चर्चा करायला  सतरंजी पण नाहीं. उरतो तो गदारोळ, गोंधळ, नारेबाजी आणि भ्रमित समाज. 

अश्या परिस्थिती काय करायचे सामान्यांनी? देवाकडे वळणे साहजिक आहे. कुठेतरी श्रद्धा हवी. कुठेतरी आश्वासन हवे. कुठेतरी ठामपणा हवा. शाश्वती हवी. तेराव्या शतकानंतर संपूर्ण भारतभरात झालेल्या मुसलमानी आक्रमणांनी सगळी मंदिर उध्वस्त केलीत तेंव्हा देवळं नसली तरी भक्ती मार्गे लोकांनी देव शोधालाच. त्या शतकांमधील भारतभरातील विविध संत साहित्य अजूनही लोकांना मार्ग दाखवीत आहेत. कर्मकांडे करणे दुरापास्त झाले होते तरीही लोकांनी सर्व जातींनी आपल्या परीने चालीरीती आणि धर्म जपला. कारण येथे अंतिम लक्ष्य धर्म रक्षण, संस्थापन विकास होते. अर्थात सगळ्या भारत भर असे झालेच असे नाहीं. खूप साऱ्या जातिविशेष प्रथा टिकून राहिल्यात आणि त्याचे दुष्परिणाम हि आपला समाज अजूनही भोगतो आहे. थोडक्यात, संभ्रमित समाज हे काही पहिल्यांदा होतोय असे नाही. पण ह्यावरचे उपाय मात्र इतिहास थोडा समजून घेतला तर लगेच कळतील. समाजाने उचललेली चांगली पावले आणि कधी कधी घेतलेल्या चुकीच्या दिशा, याचा अभ्यास केला तरी पुरेल.

सद्य परिस्थितीत बहुतांश देवळांचे हि बाजारीकरण झाले आहे. साध्या दर्शनास जायचे तर लांब रांग असेल तर पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते. जिथे दर्शनास दहा सेकंद मिळत नाही, तिथे 'VIP’ आणि नेते लोकांना वैयक्तिक पूजा-अर्चा करायला आणि मग वरून फोटो हि काढायला वेळ मिळतो. ज्या देवळात गैर-हिंदूना परवानगी नसते तिथे हिंदू द्वेष्टे राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील नायक सहज जातात. बहुतांश प्रसिद्ध देवळे पैसे कमविण्याचे माध्यम झाले आहे. जिथे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्या जातो. आणि तरी लोक लांब लांब रांगा लावून उभे असतात. ह्याला दुर्दशाच म्हणावे लागेल.

ह्याला कारण असे की ह्या भक्तीला शक्तीचे सामर्थ्य नाहीं. अशी श्रद्धा आत्मविश्वास धैर्याचे द्योतक नाहीं. हि श्रद्धा संभ्रमित आणि भयाकुळ मनाच्या कुबड्या आहेत. तिथे मनाला दिलासा एक वेळेस मिळेल पण मार्गदर्शन मिळेलच असे नाहीं. सशक्त समाजाची ही लक्षणे नाहीत. स्वामी विवेकानंदांच्या प्रबुद्ध भारताची ही पहाट नाहीं.

यावर उपाय म्हणाल तर सोपा आहे. पुन्हा इतिहासात बघा. समाज भक्तीपर झाला पण लढणे सोडले नाही. मुसलमानांनी जमीन पादाक्रांत केली पण समाज धार्मिकच राहिला. अन्यायाच्या विरुद्ध लोक जमेल तसे लढत राहिलेत. व्यक्तीचा आणि समाजाचा आत्मविश्वास अतूट राहिला.

शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा ये धामानि दिव्यानि तस्थुः॥ (श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय , श्लोक )

आपण अमृत पुत्र आहोत. घाबरायची आवश्यकता नाहीं. शहामृगासारखी घाबरून डोकी जमिनीत खुपसायची आवश्यकता नाहीं तर सिंहासारखी गर्जना करणे गरजेचे आहे. श्रद्धा आहेच, विश्वास आहेच, याचे शक्तीत रूपांतर होणे आवश्यक आहे. पुढारी नाहीत, नेते नाहींत पण आपण एक उपयोगी, सशक्त अनुयायी तर बनू शकतो? भाषणे द्यायला नव्हे तर समर्थपणे, आत्मविश्वासाने जीवन आक्रमायला. शेवटी समाज हा प्रत्येक मनुष्यानेच घडतो, उभारतो, प्रगती करतो. पुढारी हा समाजातूनच पुढे येतो. मानसिक शारीरिक दृष्ट्या सशक्त होऊनच अंधश्रद्धा, बुवाबाजी, आणि तसेच सध्याच्या पुढाऱ्यांच्या दुष्काळ पडलेल्या संकटाचा समर्थपणे सामना करता येईल. श्रीकृष्णाची गीता हवी तर अर्जुन बनायाला हवे आणि शिवाजी महाराज हवेत तर आधी मावळा बनण्याचे सामर्थ्य हवे, नाही का?