6/28/07

रुद्र शक्ति

या ब्लॉगचे शीर्षक रुद्र शक्ति का आहे याचे मी कधीच विश्लेषण केले नाही. पण मी ज्या हेतुने मराठी ब्लॉग लिहिण्यास आरंभ केला होता त्याचे स्वरुप बर्‍‍याच प्रमाणात बदलेलय. त्यामुळे आता मी नक्की कुठल्या कारणांसाठी मराठीत ब्लॉग लिहितो, याचा मला पुनश्च एकदा विचार करावा लागणार आहे. या विषया बद्दल विचार करतांना अनेक नविन गोष्टी माझ्या ध्यानात आल्यात. त्या विचारांबद्दलचे हे स्फुट लेखन.

माझ्या ब्लॉगला 'रुद्र शक्ति' देण्या मागचा मूळ उद्देश किंवा विचार धारणा अशी की आजची तरुण पिढी अनेक क्षतींनी ग्रस्त आहे. आर्थिक विकास हे सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेले साधन आहे, अंतिम लक्ष नव्हे. पण बरोबर काय आणि चूक काय हेच कळेनास झालय. बरेच लोकं आजकाल ब्लॉगस द्वारे मत-प्रदर्शन करीत असतात. तरुण पिढीच्या आकांक्षांचे प्रतिबिंब जणु या ब्लॉगसद्वारे दिसते. पण हे प्रतिबिंब भीषण आहे. सत्ता-पिपासु राजकारणी आपल्या वैयक्तिक फायद्याच्या बेड्या तरुण पिढीच्या पायात बांधत असतांना, या ब्लॉगस च्या विश्वात तरुण सुशिक्षित पिढीने एकत्रित होउन विचार मंथना द्वारे आवश्यक रुद्र शक्तिची निर्मिती केली तरच उज्वल भविष्याची वाट अडवु बघणार्‍या राहु-केतुंवर मात करता येणे शक्य आहे असले खुळे विचार मी करतो. त्यामुळे उज्वल भविष्या कडे जाणार्‍या सेतु-निर्मितीस माझे खारीचे योगदान मी माझ्या मराठी ब्लॉगद्वारे द्वारे व्हावे अशी माझी सुप्त इच्छा होती.

या पार्श्वभूमी वर माझे मराठी ब्लॉगस ही सामाजिक प्रश्नांशी निगडीत असण सहाजिक होते. सुरुवात तरी तशीच झाली पण पुढे नाव थोड्या वेगळ्या दिशेस जाउ लागली.

मी इंग्रजीत जवळ जवळ दोन वर्षे नित्य्-नेमाने ब्लॉग लेखन करतो आहे. मला मुळातच राजकारण, सामाजिक घडमोडी, इतिहास व अर्थ-शास्त्र असल्या विषयांबद्दल प्रचंड आवड होती. अमेरिकेत शिकण्यास आल्यावर माझ्या विद्यापिठाच्या अवाढव्य वाचनालयां मुळे या विषयांबद्दलचे वाचन अधिक वाढले. तसेच राजकीय चर्चेसाठी मी विविध विद्यार्थि संघटनांचा सदस्य झालो. याच काळात अमेरिकेत ब्लॉगसचा सुळसुळाट वाढत होता त्यामुळे मी सुध्दा माझ्या मतांची पिंक टाकायला इंग्रजी ब्लॉगची सुरुवात केली.

तेंव्हाच खर मी मराठीत ब्लॉग लिहिण्याच खटाटोप केला होता पण इंटरनेट वर मराठी सुलभतेने लिहिण्याची सोय तेंव्हा उपलब्ध नव्ह्ती. काही महिन्यांपूर्वी मराठी सोप्या पध्दतीने लिहिण्याचे मार्ग ध्यानी आले व मी लगेच मराठीत ब्लॉगस लिहिण्याचा श्रीगणेश केला.

माझ्य लक्षात आले की गेल्या ५ वर्षात माझे राजकारण किंवा तत्सम विषयांबद्दलचे वाचन केवळ इंग्रजीतच आहे. त्यामुळे आंतर-राष्ट्रीय राजकारण किंवा अर्थशास्त्रा बद्दल मराठीत लिहिणे मला फार अवघड जाते. कारण, या बाबतीत माझे विचार मनात इंग्रजीतच चालू असतात. भारतीय राजकारणा बद्दल मला मराठीत लिहिणे थोडे कठिण असले तरी शक्य आहे. या उलट मी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या संबधित अनुभव भारतातील असल्यामुळे, त्या कथा मराठीतच लिहिणे सोपे आहे. त्या कथा इंग्रजीत जवळ जवळ अशक्य आहेत. थोडक्यात, भारतातील अनुभव मला मराठीत (किंवा हिंदीत) लिहिणे सोपे आहे तर अमेरिकेतील अनुभव मला इंग्रजीत लिहिणे सोपे आहे.

त्यामुळे माझ्या ब्लॉग वर सामाजिक प्रश्नांशी निगडीत लेखांच्या तुलनेत कथा/गोष्टींची संख्या वाढतेय. (या कथा किती वाचनीय आहेत, हा मुद्दा वेगळा!) तसेच बहुंताश कथा सामान्य जीवनाशी निगडीत असल्यामुळे ब्लॉगचे शीर्षक 'रुद्र शक्ति' थोडे विपरीत वाटते. पण सध्या तरी मला हे शीर्षक बदलवायची इच्छा नाही.

पण पुढे माझे सामजिक प्रश्नांबद्दलच्या लेखांची संख्या वाढावी यासाठी माझे प्रयत्न चालले आहेत. बघुया, यात किती यश मिळतय ते.

6/27/07

डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?

"हां, काय झालं हे नीट सांगा मला?"
"सकाळपासुन जीव घाबरतोय म्हणत होते. गॅसेस झाले आहेत म्हणालेत म्हणुन फारस लक्ष दिलं नाही. नेहमी सारख दुपारचं जेवले सुद्दा नाहीत. दुपारचा चहा घ्यायला बोलावलं तर खोलीतच धाडकन कोसळलेत. खुप जोराची धाप लागली होती. ताबडतोब घेउन आलो आपल्या दवाखान्यात. "
"आपण कोण यांचे? "
"मी यांचा मुलगा."
"ह्रदय रोगाची काही पूर्व तक्रार. आधीच्या डॉक्टरांनी लिहुन दिलेली काही कागद पत्र? "
"आज सकाळ पर्यंत चांगले ठणठणीत होते. आज पर्यंत कधी डॉक्टरांकडे वारी झाली नाही यांची."
"अच्छा. हार्ट-अटॅक आहे. नशीबच आहे कि एवढ्या अटॅकने सुद्धा वाचलेत ते. तुम्ही काळजी करु नका. अन्गीओप्लास्टी करावी लागेल. बहुतांश वेळा रुग्ण या प्रक्रिये नंतर बरा होतो"
"बरं." पण साहेब तुम्ही तर अजुन त्यांना नीट तपासले सुद्दा नाहीया. टेस्ट सुध्दा झाल्या नाहीयात"
"भिंतीवर जे प्रमाण पत्रक दिसतय त्यावर कोणाचे नाव आहे?"
" आपले"
"मग, ऐका मी काय उपचार सांगतोय ते. आज संध्याकाळी करु शकतो मी शस्त्रक्रिया. पन्नास हजार खर्च येइल."
"पण साहेब, लौकरात लौकर शस्त्रक्रिया केलेली बरी नाही का?"
"आत्ता टेबलवर पन्नास हजार ठेवा. मी ताबडतोब करतो शस्त्रक्रिया"
"एवढे पैसे कुठुन आणु मी एकदम".
"तुमची पैशांची सोय झाली की कळवा. आणि पन्नास हजार फक्त शस्त्रक्रियेचे लागतील. त्यांतर ई.क.उ. मधे ठेवण्याचे वेगळे व औषधांचे ही वेगळे"
"तरी साधारण खर्च किती येइल"
"एकुण खर्च एक ते दिड लाखाच्य घरात जाईल"
"साहेब, स्वतःला विकायला काढल तरी एवढे पैसे मिळणार नाही"
"अहो, शासकीय रुग्णालयात सुद्दा उपचार होतात. तिथे दाखल केले तरी चालेल"
"अस नका म्हणु. आपले फार नाव ऐकलय. हे २२००० ठेवा व लौकरात लौकर शस्त्रक्रिया करा. मी संध्याकाळ पर्यंत उरलेल्या पैशांची सोय नक्की करतो"
-- -- -- -- -- -- --

"डॉक्टर साहेब, कशी झाली शस्त्रक्रिया?"

"यशस्वी झाली. पण पुढले २४ तास थोडी काळजी आहे. हे २४ तास गेलेत म्हणजे झाले."

"म्हणजे पुढल्या २४ तासात जीव जाउ शकतो"

"शस्त्रक्रिया जरी मी करित असलो तरी कर्ता-करविता वरचा आहे"

"बरोबर आहे तुमचं. सकाळपासुनच घरचा गणपती पाण्यात कुडकुडतोय."

"बरं, उरलेले पैसे भरुन टाका लौकर."

"पैसे कुठे पळुन जातायत साहेब. बसा शांतपणे. थोडं खाजगी बोलायच होत"

"म्हणजे" डॉक्टर साहेब बुचकळयात पडलेत. " अहो, अजुन बरीच रुग्ण आहेत या दवाखान्यात" ते थोड खवचट पणे म्हणालेत.

"माहितीय साहेब. पण हा कागद वाचता का जरा?"

कागद वाचुन डॉक्टर साहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला.

"पाणी मागवु का साहेब?"

"आं....म्हणजे...."

"एक काळ होता की लोकं डॉक्टरांना देव मानित असतं. पण आता स्मशानातला जल्लाद बरा. पैश्यांसाठी मागे लागतो पण मुडदा तरी नीट जाळतो. वडीलांचा सकाळी घरीच मृत्यु झाला. शासकिय रुग्णालयात घेउन गेलो होतो तरी पण तेथे डॉक्टरांनी मृत्यु-पत्रक दिले. पण वडिलांच्या आजारपणात डॉक्टर या जमातीने आम्हाल इतके लुटले कि म्हटल कि हि लोकं अजुन कुठल्या थरा पर्यंत जाउ शकतात हे तरी बघु. पण खरच सांगतो कि तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा ही वरचढ ठरलात. मेलेल्या व्यक्तिला तुम्ही केवळ दाखल नाही केल तर त्या मढ्यावर शस्त्रक्रिया करण्याच ढोंग ही केलत. "
भिंतीवरच प्रमाण पत्रक शेवटच वाचुन घ्या. कारण आता ते लौकरच जप्त होणार आहे."

"अहो असं नका करु. इतक मोठं रुग्णालय चालविणे म्हणजे गंमत नाही. तसच मी बर्‍याच रुग्णांना विनामुल्या उपचार देतो. मग पैशांची चणचण भागवायला असलं काही करावं लागत. कृपया पोलिस कडे जाउ नका. आपण यातुन काही तरी मार्ग नक्कीच काढु शकतो."
"दहा लाख रुपये नगद तुम्ही टेबलवर ठेवलेत कि माझे वडिल अंतिम संस्कारास मोकळे" क्षणार्धात समोरुन उत्तर आले.
डॉक्टर साहेब चकितच झाले. काय चाललय हे डॉक्टर साहेबांना कळेनासे झाले. पण त्यांनी बँकेला घाईने फोन फिरवण्यास सुरुवात केली.

(अंशतः सत्य घटनेवर आधारित.)

6/20/07

अग्निवस्त्र

चर्रर्र !! कातड जळण्याचा आवाज येतोय. कातड जळण्याचा असा वास येतो हे माहिती नव्हत. बहुधा माझ दु:खपुर्ण व निराशाजन जीवन जळण्याचा हा वास असेल. पण मी इतकी पेटलीय तरी मला मुळीच चटके बसत नाहीया. जणु मी कातडीपासुन वेगळी झालीय. पण कातड जळत असल तरी मनातल्या पीडा तश्याच्या तश्याच आहेत. यांच्या पासुन दूर पळण्यासाठीच एक लीटर किटकनाशक प्यायले मी सात वाजता पण दहा वाजलेत तरी ढिम्म काही झाल नाही. शेवटी ओतल रॉकेल स्वतःवर आणि नेसलं हे अग्निवस्त्र.

मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात आशेचे किरण डोकवतायत. मेल्यानंतरचे नवीन जग कस असेल? लग्नाचा शालु नेसल्यानंतर असल्याच काहीतरी भावना मनात दाटल्याच अंधुकसं आठवत. पण मेलं औषधापुर्ती सुध्दा सुख लाभल नाही. लग्नानंतर माझी सारखी तब्येत खराब आणि जेंव्हा थोडी बरी असायची तेंव्हा हे दौर्‍यावर असायचे. मला माहिती आहे कि लोक यांच्या पाठीमागे यांनाच नाव ठेवतात पण शेवटी पुरुष माणसाची तरी काय चूक? दोन पोर झालीत आणि मी परत स्वप्न बघायला लागली की निदान ही तरी सुख देतील.

आत्ता दोघांपैकी कोणी पाणी टाकायला आलं नाही म्हणजे पावल.

हा देह जळायला इतका वेळ लागतोय तर माझ मन जळायला किती वेळ लागेल? पण मी यंदा ठरवलय कि आशेचे किरण मनाच्या कोठडीत शिरुच द्यायचे नाहीत म्हणुन. थोडी उब तरी मिळेल. थोडी जरी आशा वाटली तरी चटके बसतील आणि कोणी तरी पाणी टाकायला येइल.

इतकी वर्ष झाली हे अंगण बघतेय पण आज मोठ लख्ख दिसतय. मोठ्याच्या लग्नाच्या वेळी आठवत मला की मी स्वतः सारवल होत. तांदुळ ओलांडुन आत सुन तर इतकी गोड दिसत होती कि मलाच गलबलुन आल. मला मुलीची हौस पूर्ण नाही झाली तर सुन ती भरुन काढेल अशी आशा मनात पालवली. पण खोलीतुन वास येतोय अशी तक्रार करत तीने जेंव्हा खोलीत दोन बादल्या पाणी आमच्या खोलीत फेकले तेंव्हा मनात पालवलेला आशेचा अंकुर विष वृक्षाचे आहेत हे कळले. हे झाड फोफावायला एक महिनाही नाही लागणार अस नाही वाटल. वर्षभरात घर मुलाच्या नावे करुन झाले व वृध्दाश्रमाचा मार्ग धरायच ठरवल पण तेही नशिबात नव्हते. 'हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवभिवर्धते' हेच खर कारण यांच पेंशन मिळत रहाव म्हणुन आम्ही आमच्याच घरात कैद झालो. यांना शेवटल्या दोन वर्षात साधा गरम वरण-भात खायला मिळाला नाही. हे गेल्यावर मी ठरवलं कि माझ्या लाकडांचा खर्च हि मुलावर पडु द्यायचा नाही.

आत्महत्या करणे पाप असते अस आपला धर्म म्हणतो. सत्य असेल ते एखाद वेळेस. पण पाप आहे तर मला चटके कसे बसत नाहीयात ? या जन्माने मला इतके होरपळले आहे कि हा अग्नी अजुन काय बिघडवणारय माझ. पाप असेल तर असो पण मी मात्र माझ्य जन्मभराच्या तपश्र्चर्येचे फळ मानिते.

अरे, कोणीतरी दार उघडतय. नका दार उघडु. जळु द्या मला निवांतपणी. सुनेचे डोळे तर पांढरे पडले आहेत. पोलीस केस होउ शकते तसेच मला मिळत असलेल अर्ध पेंशन आत मिळण बंद होणार असले असंख्य विचार मी तीच्या डोळ्यात वाचु शकतेय. अरे, पाणी नको टाकुस माझ्यावर. मातृऋण फेडण्याची तुला सुवर्ण संधी मिळतेय तुला. ओतलच त्याने पाणी. आता मात्र आंग भाजतय. कोण बघतय खिडकितुन ? फार गोड आहे लहाना नातू. त्यालाच शेवटच बघायला बहुतेक अडकला होता जीव.

आता छान वाटतय अचानक. हलकं हलकं वाटतय. जणु मी हवा भरलेल्या फुग्या सारखी आकाशात भरकटते आहे. माझाच देह दिसतोय मला. मी मलाच मुळीच ओळखु येत नाहीया. बर आहे एक दृष्टीने. कोणीच ओळखायला नको ओळखायला नको मला. जशी आली तशीच गेलेली बरी.

6/15/07

नाईकच्या म्हशी

नामजोशी बाईं त्यांच्या शिकवणसाठी निवडक विद्यार्थ्यांनाच घेत असत. शिकवणीतील सर्व विद्यार्थी हे पहिल्या ईयत्तेपासुनच मराठी माध्यमातुन शिकलेले होते पण नामजोशी बाईंची मराठी विषयावर इतकी जबरदस्त पकड होती की मराठी म्हणजे नक्की काय याचा गंध वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना १०वीच्या वर्गाता पहिल्यांदा लागत होता. नागपूरातील प्रतिष्ठित सोमलवार शाळेत त्यांनी तीस वर्षे शिकविले होते. तसेच सोमलवार शाळेच्या रामदासपेठ शाखेच्या त्या मुख्याध्यापिका पण होत्या. स्पष्ट-वक्त्या आणी शिस्तबध्द या साठी प्रसिध्द असलेल्या मॅडमच्या करारी स्वभावाला शाळेतली अत्यंत नाठाळ आणी उनाड मुल ही घाबरायची. पण त्या जेंव्हा मुख्याध्यापिका होत्या तेंव्हा सध्याच्या शिकवणीतील विद्यार्थि प्रार्थमिक शाळेत शिकत असतील. त्यामुळे नामजोशी बाईंचा दरारा त्यांनी केवळ ऐकला होता, अनुभवला नव्हता. बाईंच वय सत्तरीच्या घरात होत पण शिकविण्याची उर्मी अजुन गेली नव्हती. म्हणुन त्या अजुनही शिकवणी घेत असत.

शिकवणी कधी घरातील बाहेरच्या खोलीत व्हायची तर कधी दुसर्‍या माळ्यावरी गच्चीच्या शेजारच्या खोलीत होत असे. आज दुसर्‍या माळ्यावर वर्ग भरला होता. त्या गच्चीच्या कडे जाणार्‍या दरवाज्या जवळ बसायल्या होत्या व विद्यार्थी त्यांच्या समोर खुर्च्या टाकुन बसले होते. त्यांचे घर वर्धा रोडला तोंड करुन होते. त्यामुळे त्या जीथे खुर्ची टाकुन बसल्या होत्या, त्याच्या मागे दरवाज्यातुन रस्त्यावरची वर्दळ व्यवस्थित दिसत होती. त्या दिवशी बाई थोड्या तापल्या होत्या. काही घरगुती कारणांनी तापल्या असतील. शिकवणीच्या आरंभीच खोलीत मागे बसणार्‍या व इतर विद्यार्थ्यांच्या पाठी मागे लपणार्‍या थत्ते ला रागवुन झालेल होतं. त्यामुळे खोली चिडिचुप होती.

बाईंच्या अगदी समोर आज नाईक बसला होत. 'अ' तुकडीत शिकणारा नाईक हा हुशार विद्यार्थी होता. आज बाई एक कठीण धडा शिकवित होत्या. या धड्यावर निदान एक प्रश्न तरी बोर्डाच्या परिक्षेत येत असे पण पाच पैकी तीन प्रश्नच सोडवायचे असल्यामुळे या कठीण धड्यावरील प्रश्न सोडला तरी चालत असे. धडा कळण्यास कठीण जात असेल तर उगाच त्याचे प्रश्न सोडवण्याचा उपद्व्याप करु नका असे बाईंनी आधीच सांगितले होते. नाईकच्या कानात हे एवढच वाक्य फसल कि पोटभर जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती कि त्याला खरच धडा कळत नव्हता हे कळण्यास मार्ग नाही पण तो बाईंच्या अगदी समोर बसुन दरवाज्यातुन बाहेरची वर्दळ मोठ्या तन्मयतेने बघत होता. बाईंनी एक-दोनदा नाईक कडे रोखुन बघितले पण नाईक रस्त्यावरुन जाणार्‍या म्हशींचा कळपात 'रमला' होता. बाई खुर्चीवर पाय वर घेउन बसत असत. त्यांनी पाय खाली सोडलेत व थोड्या समोर वाकुन त्या शांतपणे म्हणाल्या "नाईक, किती म्हशी आहेत रे कळपात?"

ज्यांना धडा कळत नव्हता त्यांना वाटायला लागले कि 'अच्छा धड्यात म्हशी पण आहेत!'। ज्यांना धडा कळतो आहे अस वाटत होते, ती मुले धड्यामधे म्हशी शोधायला लागलीत पण नाईक मात्र बर्फासारखा गार पडला. "अरे, इतक लक्ष देउन बाहेर बघत होतास तर म्हशी तरी मोजायच्या होत्या" आता वर्गातील मुलांना काय चाललय हे लक्षात आले. "नाही मॅडम, मी बाहेर बघत नव्हतो" नाईकने आपली बाजु मांडायचा बुळबुळीत प्रयत्न केला. "नाईक, तीस वर्ष झाली मी शिकवतेय. माझ लक्ष होत तुझ्याकडे आणि त्यातुन तू मुर्खासारखा माझ्या नाका समोर बसुन बाहेर बघत होतास" बोली भाषेत सांगायच तर नाईकची आता चांगलीच 'सटारली' होती. " तु तुझ नशीब मान की मी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे आणी तु माझ्या हाताच्या लांबी पासुन दूर बसला आहेस ते. नाही तर माझ्या हाताची पाचही बोटे तुझ्या गालावर आत्ता पर्यंत उमटली असती" हे ऐकुन खर सांगायच तर वर्गातल्या प्रत्येक मुलाचीच आता सटारली होती.

जणु काही घडलच नाही अश्या भावात बाईंनी शांतपणे पाय खुर्चीवर घेतलेत व परत धडा शिकवायला सुरुवात केली. ज्यांना धडा कळत नव्हता ती मुले आता अगदी सगळं कळतय असा आव आणुन माना डोलवायला लागलीत. नाईकला बराच घाम आला होता. रस्त्यावरच्या म्हशी हि कधीच पुढे निघुन गेल्या होत्या.

त्या दिवसानंतर नाईक कधीही बाईं समोरच्या खुर्चीवर बसला नाही.

6/8/07

'ब' तुकडीतील एक सामान्य दिवस

"रहाळकर, काय चाललय तिकडे?" काटे बाईंनी विचारले. रहाळकरला ताबडतोब त्याची चूक लक्षात आली. तो आज चूकुन तिसर्‍या बाकावर बसला होता. खर तर 'ब' तुकडीत 'रोटेशन' चा नियम होता. म्हणजे, दररोज एक एक बाक पुढे सरकत जायचे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातुन एकदा तरी पहिल्या बाकावर बसावेच लागायचे. रहाळकर, चांदे व सांबरे मात्र नेहमी शेवटच्याच बाकावर बसायचे. वर्गातील नियम जणु त्यांना लागु होत नसत. नियम हे उल्लंघन करण्यासाठीच असतात यावर रहाळकर व त्याच्या 'गॅंग' चा ठाम विश्वास होता.

त्या दिवशी कोण जाणे पण रहाळकरला तिसर्‍या बाकावर बसावे लागले.

काटे बाई आठवीच्या 'ब' तुकडीला नुकत्याच मराठी शिकवायला आल्या होत्या. त्यांची उंची पाच फुटही नव्हती व त्यांची वेश-भूषा इतर शिक्षिकेंपेक्षा थोडी निराळी होती. त्या दोन्ही नाकपुड्यांमधे नथी घालत. गळ्यात मंगळसुत्रा सोबत सोन्याच्या माळा होत्या व लांब वेणी होती. तसेच त्या थोड्या भारी साड्या नेसत असत. नवीन असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांवर जरब बसवायची होती. आता ८वीच्या विद्यार्थ्यांच्या, प्रामुख्याने मुलांच्या, कानात वार गेलेलं असत. एका सीमे पलीकडे त्यांना शिस्त लावणे शक्य नसते. शाळेतील अनुभवी शिक्षकांना याची जाणीव होती. काटे बाई चांगल्या शिकवत, पण चांगल शिकविणे आणि विद्यार्थ्यांना शिस्तित ठेवण या दोन फार निराळ्या गोष्टी आहेत. नुकताच शिक्षण क्षेत्रात प्रवेश केलेल्या काटे बाईंच्या विद्यार्थ्यांना हाताळायच्या काही पुस्तकी कल्पना होत्या. अर्थातच, 'ब' तुकडीतील वाह्यात विद्यार्थ्यांपुढे हे पुस्तकी ज्ञान फारसे उपयोगी येत नव्हते. त्यातुन त्या रागवल्या की त्यांच्या नाकपुड्या फुगायच्या व डोळे मोठे करुन त्या जोरात ओरडायच्या. अस झाल की मुलांना अजुन मजा यायची.

एवढी पार्श्वभुमी सांगण्य़ा मागचा हेतु असा की मुलांनी या नविन शिक्षिकेस जेरीस आणायचा बांध घातला होता. त्या दिवशी त्यानी नवीन धडा शिकविण्यास सुरुवात केली व रहाळकरने शांतपणे आपले उद्योग आरंभिले. समोरच्याला पेन टोच, बाजुश्याशी बोल, उगाच पाय आपट, खोटी शिंका दे, असले निरर्थक चाळे तो साळसुद पणे करत होता. पण त्याची मस्ती फक्त त्याच्या पुर्तीच सिमित नव्हती. 'डॉमिनो' परिणामानुसार, त्याने शिंका दिली की त्याच्या मित्र मंडळींपैकी अजुन तीघे खोटी शिंका द्यायचे. त्याने खाकरल की परत तेच. कधी कधी मागच्या बाकावरच्या पत्थरकिने आधी शिंका देत असत. पण या सगळ्या वात्रट उद्योगाचा उगम तिसर्‍या बाकापासुन होतोय हे कळायला शेरलॉक होम्सची आवश्यकता नव्हती.

"रहाळकर, उभा रहा" काटे बाईंनी हुकुम केला. तो निमुटपणे उभा झाला. बाईंनी जवळ येउन त्याचा कान पकडुन जोरात हलवण्याच्या प्रयत्न केला. "काय चाललय इथे? तुला 'प्रिन्सिपलकडे पाठवायला हव. मला काय माहिती नाही कि सगळी मस्ती तु आधी सुरु करतोस म्हणुन" पण कान पकडण्याचा फारसा फायदा होत नव्हता कारण बरीचशी मुले फिदी-फिदी हसायला लागली होती. व रहाळकर हसण्यात आघाडीवर होता. बाईंचा पारा अजुन चढला. त्यांनी रहाळकरला झापड मारण्याचा प्रयत्न केला. रहाळकरने नकळत खांद्याने चेहरा झाकला. त्यात खांद्याला लागुन बाईंची एक बांगडी फुटली व रहाळरने ती 'सुवर्ण' संधी हेरली. त्याने आपल्या चेहर्‍यावर हात धरुन आपल्या डोळ्यावर लागल्याच नाटक करायला सुरुवात केली. "मॅडम, तुमची फुटलेली बांगडी माझ्या डोळ्याला लागली बहुतेक. आह्ह्...दिसत नाहीया मला उजव्या डोळ्याने" रहाळकर कण्हला. बाजुला बसलेल्या चांदे नी ताबडतोब आपली भूमिका वठवायला सुरुवात केली. "मॅडम, काय केलत तुम्ही. रहाळकरच डोळा गेला बहुतेक. खुप दुखतय का रे? रक्त आल का बघु" वर्गातल्या बहुतांश मुलांना हे सगळ्या नाटकाची कल्पना होती. पण एक तर या गोंधळात बराच वेळ जात होता व दुसरं म्हणजे बाल-भारतीतल्या धड्या ऐवजी त्यांना वर्गात रंगत असलेला या 'धड्यात' अधिक रस होता. त्यामुळे वर्गातल्या मुलांनी 'हॉ...हॉ' चा गजर लावला.

बाई थोड्या चपापल्या. त्यांना रहाळकरला बांगडी न लागल्याची खात्री होती पण वर्गातील गोंगाटाचा त्यांच्यावर थोडा परिणाम झाला. "कुठे लागलय रहाळकर तुला? बघु तर" त्या म्हणाल्या. रहाळकर आपल्या चेहर्‍यावरचा हात काढायला तयार नव्हता. आणि रहाळकर जणु युध्दातच जखमी झालाय या भावनेने चांदे त्याचे सांत्वन करत होता. शेवटी काटे बाईंनी रहाळकरला डोळे धुउन यायला सांगीतले. तो व त्याला सोबत म्हणुन चांदे, सांबरे अशी सगळी वरात वर्गाबाहेर गेली. या सगळ्या गोंधळात मराठीची तासिका संपल्याची घंटा झाली. काटे बाईंनी आपली पुस्तके गोळा केलीत व हताशपणे पुढल्या वर्गाकडे चालू लागल्या. बाई वर्गाबाहेर जाताच वर्गात एकच कल्लोळ सुरु झाला. पुढल्या तासिकेत शिक्षकांना कसा त्रास द्यायचा याचे 'कट' वर्गातील मुलांच्या मनात शिजु लागलेत. अश्या प्रकारे 'ब' तुकडीच्या एक अजुन सामान्य दिवसाचा आरंभ झाला.

6/2/07

कविता, ऑक्टोपस व माझे वायफळ तत्वज्ञान

मला कविता वाचण्याची फारशी आवड नव्हती. आवड म्हणण्यापेक्षा कुठल्या कविता वाचाव्यात व कवितांचा रस कसा घ्यावा हे सांगायला कोणी नव्हत. थोडक्यात बाल-भारतीच्या पाठ्य-पुस्तका पलिकडे फारस कविता वाचन नव्हत. परिस्थितीत थोडा फरक १०वी च्या इयत्तेत पडला. मराठीच्या नामजोशी बाईंनी कविता कश्या वाचाव्यात हे शिकविले. त्यांनी कुसुमाग्रजांची कविता 'कोलंबसाचे गर्वगीत' इतकी सुंदर शिकवली की मराठी कवितांच खजिनाच जणु माझ्यासाठी खुला झाला. १२वी च्या परीक्षे नंतर मात्र कविताच काय, माझ्या मराठी वाचनालाच पूर्ण-विराम लागला. दोन वर्षांपूर्वी सुरेश भटांची ओळख झाली व मला मराठी वाचता येतं या बद्दल मी देवाचे आभार मानलेत. कुसुमाग्रजांचे 'विशाखा' वाचुन झाले. ग.दिं.च्या कवितात नाहुन झाले. सध्या भाऊसाहेब पाटणकर व विंदांशी गुफ्तगु चालु आहे. या सगळ्या काव्य-प्रवाहात पोहतांना मला कवित मुळीच म्हणजे मुळीच करता येत नाही याचे मात्र फार वाईट वाटते. अहो, साध्या दोन पंक्तीसुद्धा लिहिता येत नाही. 'प्राची' ला 'गच्ची' चे यमक जुळवण्याहुनही वाईट परिस्थिती आहे.

आयुष्यात नवीन अनुभव जरी येत असलेत तरी भावना व शब्दांचे खेळ काही सोपे नाहीत. खर तर तुमच्या-आमच्या सारखच आयुष्य कवि मंडळी कंठत असतात पण सामन्य घटनांकडे असामान्य दृष्टीक्षेपाने ते बघतात. व याच घटनांन सुंदर शब्दांमधे गुंफण्याची अदभुत शक्ति त्यांच्यात असते. लेखकही काही कमी नसतात. खांडेकर त्यांच्या तत्वज्ञानाने मनुष्याला मुळापासुन हलवुन सोडतात. मुन्शी प्रेमचंद यांच्या 'गोदान' मधील गरिबीच्या वर्णनाने अंगावर शहारे येतात. अर्थात कवि हे सर्व रस अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करतात. चित्रकार याहुन पलीकडची पायरी गाठतात. शब्दांचा मुळीच आधार न घेता ते केवळ रंगांद्वारे भावना प्रगट करतात. २०व्या शतकात छायाचित्रकारांनाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माणसाचा चेहरा अक्षरश: भावनांचा आरसा असतो. कॅमेरा निष्काम भावनेने (आता खर भावना निष्काम कश्या असतील !) माणसाच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब आपल्या समोर ठेवतो.

या कवितांच्या संदर्भात एक गोष्ट आठवली. कॉलेज मधे असतांना कॅलिफोर्निया विद्यापिठातील संगणक शास्त्राच्या प्राध्यापकाच्या व्याखानाला गेलो होतो. कमीत्-कमी सुचनांद्वारे संगणकाला कश्या गोष्टी समजतील व कसे कमीत्-कमी शब्दांद्वारे तो (संगणक) आपल्या गोष्टी समजावुन देऊ शकेल यावर प्राध्यापक महोदय बोलत होते. त्यांनी एक सुरेख उदाहरण दिले. ऑस्ट्रेलिया जवळच्या समुद्रात एका विशिष्ट जातीचे ऑक्टोपस निवास करतात. खोल समुद्रात जिथे सुर्य प्रकाशाचा अभाव असतो तेथे हे ऑक्टोपस अत्यंत प्रगत पद्धतीने संवाद करतात. आवाज किंवा स्पर्श-ज्ञाना ऐवजी त्यांचे संपूर्ण शरीर स्वयं-प्रकाशाने लखलखते. केवळ सेकंदात ते संवाद पूर्ण करतात. शब्द नाहीत, कविता नाहीत, चेहरे नाहीत की अंग-विक्षेप नाहीत व प्रत्येक वेळेस भावना मात्र शंभर टक्के समोरच्या पर्यंत पोचतातच. प्राध्यापकाच्या मते माणसांना असे जमले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

प्राध्यापकाचे म्हणणे बरोबर असेल. भावना प्रगट करण्याची एवढी साधने उपलब्ध असतांनाही गैर-समजुतीच्या रोगाने सर्व समाज ग्रस्त आहेत. ऑक्टोपसच्या पध्दतीने संवाद साधुन जीवन बरेच सुरळीत होइल. पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे 'माझ तुझ्यावर प्रेम आहे' हे म्हणण्यात व अळणी जेवण्यात काहीच अंतर रहाणार नाही. कवि व लेखक जे आपल्या आयुष्याल अर्थ देतात किंवा चित्रकार जो रंग देतात त्याची सर ऑक्टोपसच्या यांत्रिक पण संपूर्ण संवादाला कधीच यायची नाही.