कॉलेज सुटले आणि सगळे विद्यार्थी हळूहळू बाहेर पडू लागले. कॉलेज एवढ्यासाठीच म्हणायचे कारण इयत्ता वरच्या होत्या, पण शिस्तीत बघितले तर शाळाच होती. आणि तिथे ॲडमिशन मिळणेसुद्धा कठीण होते; त्यामुळे एकूण वातावरण अभ्यासू, होतकरू आणि महत्त्वाकांक्षी होते. पण सगळ्या राजहंसांमध्ये एखादे बदक असावे किंवा पांढऱ्या कबुतरांमध्ये एखादे कथ्या रंगाचे असावे, तसा रवी या कॉलेजमध्ये होता. मार्क चांगले होते म्हणूनच त्याला प्रवेश मिळाला होता; पण ना तो अभ्यासू होता, ना होतकरू, ना महत्त्वाकांक्षी. त्याला मार्क कसे मिळायचे, हे त्याचे त्याला माहिती नसे; कारण बहुतांश वेळा त्याचे लक्ष मुलींमध्ये आणि मुलींकडे असे. मुलींच्या बाबतीत तो नक्कीच महत्त्वाकांक्षी आणि होतकरू होता. सदैव, तत्पर, अविरत आणि अखंड.
लवकरच १४ फेब्रुवारी येणार म्हणून रवी थोडा बेचैन होता. अगदी लहानपणापासून त्याला या दिवसाचे भयंकर आकर्षण होते. त्याचे स्वप्न होते की, या दिवशी कुठल्यातरी मुलीला गुलाबाचे फूल द्यायचे. मुलगी कुठलीही चालेल, पण गुलाब देणे महत्त्वाचे. शाळेत होता तेव्हा असे करण्याची त्याची हिंमत दोन कारणांमुळे झाली नाही. एक, गुलाब आणण्याचे पैसे नव्हते. म्हणजे तो गरीब होता असे वगैरे मुळीच नव्हते; सुखवस्तू, सुशिक्षित घरातून तो होता. पण पैसे हवे असतील तर 'का हवेत?' असे विचारले जाई. मग ज्या घरात झेंडूशिवाय कुठलेही फूल कधी आले नव्हते, तिथे 'मला गुलाब घ्यायला पैसे हवे आहेत' सांगितल्यावर रागावण्यापेक्षा थट्टेने उडवून लावले असते. रवीला त्याची थट्टा केलेली चालत नसे. रागावलेले, मारलेले चालेल; पण त्याला हलक्यात घेतले की खूप राग येई. या भीतीनेच त्याने कधी कुठल्या मुलीशी बोलण्याचा किंवा अभ्यासाव्यतिरिक्त मैत्री साधण्याचा प्रयत्न केला नव्हता.
दुसरे कारण म्हणजे—नेमके कोणाला गुलाब द्यायचे? नाही म्हणायला मनातल्या मनात तो बऱ्याच मुलींशी गप्पा मारीत असे आणि मनातल्या मनात त्याचे कित्येक मुलींशी सूत जमले होते. खऱ्यात गुलाब द्यायची पाळी आली तर कोणाला द्यायचे?
रवीचे घर आणि कॉलेज फारसे दूर नव्हते. सायकलने वीस-पंचवीस मिनिटे आणि कधी कधी वडिलांची स्कूटर पळवायला मिळाली तर दहा मिनिटे. पण घर आणि कॉलेज हा प्रवास त्याचा अनेक मार्गांनी होत असे. ते कसे? तर सोमवारी त्याला हमखास स्कूटर मिळे; कारण वडील त्या दिवशी त्यांच्या मित्राच्या कारमधून ऑफिसला जात असत. खरे तर त्यांच्याकडे पण जुनी मारुती होती, पण ज्या मित्रासोबत रवीचे वडील ऑफिसला जात, त्याने सरकारी ऑफिसमध्ये बराच 'रवंथ' केला होता आणि अजूनही करीत होता. त्यामुळे त्याची कार नवीन तर होतीच, पण त्याच्या 'रवंथ' केलेल्या पैशांतून त्याने पेट्रोल खरेदी करावे आणि आपण ते अप्रत्यक्षरीत्या वापरावे, तरी कुठले पाप माथी लागू नये, अशी काहीतरी विचित्र मनोधारणा रवीच्या वडिलांची होती. त्यांच्या मित्राला काही फरक पडत नसे; त्याने जनाच्या आणि मनाच्या, दोन्ही लज्जेची स्टेशने त्याने कधीच मागे सोडली होती.
रवीचे घर शिवाजीनगरला होते आणि कॉलेज सदाशिवनगरला. सोमवारी सकाळी कॉलेजला घाई होत असे, पण स्कूटर असल्यामुळे घरून निघून तो सदाशिवनगरच्या आधी थोड्या उजव्या बाजूला दोन किमीवर असलेल्या शंकरनगरला जाई. तिथे मंजिरी राहत असे. फ्लॅट नव्हता, घर होते. मग तो तिच्या घरावरून चक्कर मारीत असे. तिची स्कुटी बघे; असली तर वेगाने निघून जाई—तिने बघितले तर? (तिने कधी रवीला बघितले नव्हते. म्हणजे त्याच्या घरावरून जाताना तर नाहीच, पण तिच्या दृष्टीच्या टप्प्यातही तो कधीच आला नव्हता. तिचे आई-वडील डॉक्टर होते आणि तिचा कलही त्याच दिशेने होता. रवी हुशार होता, पण डॉक्टर होण्याइतका वरच्या दर्जाचा हुशार नक्कीच नव्हता; त्यामुळे तिच्या दृष्टीने त्याचे अस्तित्वच नव्हते. अर्थात, याचा कसलाही फरक रवीला पडत नसे. भक्ती महत्त्वाची, देव बदलत असतात!). पण स्कुटी नसली तर मग तो पुन्हा एकदा घरावरून चक्कर मारी. का माहिती नाही? त्याला बहुधा तिचे टुमदार घर बघायलाही आवडे. समोर छान बाग होती आणि त्यावर लॉन होते. मग ते काम आटोपले की तो कॉलेजकडे कूच करीत असे.
पण रस्त्यात अगदी कॉलेजच्या आधी डावीकडे सदाशिवनगरचाच एक छोटेखानी भाग होता—खरे टाऊन. तिथे रवी स्कूटर घाले. तिथे फ्लॅटमध्ये राहत होती भक्ती—म्हणजे भक्ती नावाची मुलगी! ती खूपच कॉलेजची तयारी करून मग गॅलरीत उभी राहून न्याहारी करीत असे. बहुधा ती कुठलेतरी सँडविच खात असे. रवी आपला फोडणीची पोळी, फोडणीचा भात इत्यादी गोष्टी चरून येई. भक्ती फॅन्सी खात असे, असे रवीला वाटे. ती दिसली की तो हळूच हॉर्न मारून पुढे जाई, मग पुढल्या गल्लीतून मागे वळून पुन्हा परते. जर का भक्ती उभी असलेली पहिल्यांदाच दिसली, तर मग पुन्हा वर बघण्याची त्याला हिंमत होत नसे. भक्ती ही रवी कॅटेगरीची होती; त्यामुळे तिला रवी माहिती होता आणि तो आठवड्यातून असा इथे घरावरून भटकतो, हे तिला माहिती होते. पण तो असे का करतो, हे तिला कळत नसे. आता गंमत म्हणजे, ती गॅलरीत रवीसाठी उभी नसे, तर प्रकाशसाठी उभी असे. हे रवीला माहिती होते. प्रकाश हा वयाने, पैशाने, body ने (शरीरयष्टीने), हुशारीने आणि दिसण्याने त्याच्या फार पुढे होता! पण कोर्टात दावेदार बलाढ्य असला तरी केस लढवायची, हे रवीने ठरवले होते. बाय द्यायचा नाही!
मंगळवारी आणि बुधवारी तो बिझी असे. कॉलेजमध्ये लॅब्स असत आणि सायकलवर स्वारी असे; त्यामुळे कॉलेजच्या आवारातच तो 'फेरफटका' मारीत. शारदा, श्रद्धा वर्गातच होत्या, त्यामुळे त्यांच्या आसपास भटकणे. खरे तर त्यांची ओळख होती आणि अभ्यासासाठी वगैरे बोलणेही होई, पण रवीला साधे टाईमपास बोलणे जमतच नसे. रवीचे गणित एकदम पक्के होते; त्यामुळे शारदा आणि श्रद्धा नेहमी त्याला गणिताचे प्रश्न विचारत किंवा होमवर्कबद्दल विचारत. त्याची सुप्त इच्छा असे की, या मुली आपोआपच इम्प्रेस व्हाव्यात आणि स्वतःहून त्याच्याशी गप्पा मारायला याव्यात. पण गणिताने कोणी इम्प्रेस झालेले कधी ऐकले आहे का? रोमँटिक कथा-कादंबऱ्या लिहिणारा लेखकसुद्धा पाल अंगावर पडल्यासारखी हा सिनॅरिओ झटकून टाकेल. मुलींना काय अक्कल वगैरे नाही का? गणिताच्या थिअरेम्सने इम्प्रेस व्हायला?
गुरुवार ते शुक्रवार त्याच्याकडे कधी सायकल किंवा कधी स्कूटर असे; त्यामुळे त्याच्या वाऱ्यांचा (आणि वाऱ्याचा) रस्ता बदलत असे. कधी त्याची चक्कर माढवनगरला असे, तिथे संजीवनी राहत असे. 'आजच्या काळात संजीवनी नाव कोण ठेवते?' याचा तो विचार करत तिच्या फ्लॅट स्कीमसमोरून फिरे. हा नवीन 'मु.पो.' होता, कारण ती नेमक्या कुठल्या मजल्यावर राहते, याची त्याला अजून कल्पना नव्हती. मग कधी मराठी मध्यमवर्गीय भागातून दूर असलेल्या कराची कॉलनीला तो फिरून येई. तिथे दीक्षा होती; ती अग्रवाल होती. रवीचा जात-पात आणि भाषा वर्गीकरणावर मुळीच विश्वास नव्हता. पण दीक्षा अतिशय म्हणजे अतिशय श्रीमंत होती. तिचा बाप तिला कधी कधी मर्सिडीझमधून पाठवीत. बाप रे...! आश्चर्य म्हणजे दीक्षाला रवी माहिती होता. तिने एक-दोनदा त्याला परीक्षेसाठी नोट्स मागितल्या होत्या. रवीचे अक्षर वळणदार होते आणि तो नेमका महत्त्वाचा भागच टिपत असे; त्यामुळे जणू त्याच्या नोट्समधूनच परीक्षेत प्रश्न येत. पण दीक्षा त्याच्याशी बोलली, एवढेच रवीला पुरे होते. त्यामुळे आता त्याला कराची कॉलनीचा भार खांद्यावर उचलावाच लागला.
शनिवार व रविवारी कॉलेज नसे आणि रवी बिझी असे. आठवडाभर लफूटगिरी केल्यामुळे तो अभ्यास या दोन दिवसांत उरके आणि उरलेला वेळ बॅडमिंटन.
आहा.... बॅडमिंटन!
कॉलेजच्या दुसऱ्या वर्गात होती सारिका. या उंबरठ्यावर मात्र रवी हमखास धडपडे, कोलमडे, अडखळे. सारिका म्हणजे जणू रवीची ड्रीम गर्ल! ती कॉलेजमध्ये होतीच, पण आधी शाळेतही होती आणि त्यासोबत ती त्याच्या क्लबमध्ये बॅडमिंटनही खेळत असे. थोडक्यात, रवीच्या जगात ती अत्र-यत्र-सर्वत्र होती. तिचे हास्य रवीला माधुरी दीक्षितसारखे वाटे—१०० वॅट्स! आणि ती बॅडमिंटन खेळताना त्याला एखाद्या हरिणीसारखी वाटे. रवी बरीच वर्षे स्वतः बॅडमिंटन खेळत होता आणि त्याला चांगले खेळता येत असे. थोडा जोर लावला असता तर राज्यस्तरीय पातळीवर गेला असता; पण सारिका राष्ट्रीय पातळीवरसुद्धा खेळली होती. पण यात सगळ्यात मणी-कांचनयोग म्हणा की अंबाडीला केळी मिळणे म्हणा, सारिका आणि रवीची मैत्री होती. म्हणजे सारिकाला तो मित्र वाटत असे. ती त्याच्याशी नेहमी गप्पा मारीत असे आणि तिथेच रवीची 'त-त-प-प' होत असे. तिला ते कळत असे आणि ती त्याची मजा घेत असे. "Love in the Time of Cholera" या प्रसिद्ध पुस्तकात एक वाक्य आहे: "In reality, they were distracted letters, intended to keep the coals alive without putting her hand in the fire." तसेच काहीसे इथे लागू होत होते.
रवीला त्याची मजा घेतलेली आवडत नसली, तरी सारिका बोलायला लागल्यावर रवी जणू दुधात टाकलेला साखरेचा खडा. त्याला भीती वाटत असे की, त्याच्या हृदयाची धाड-धाड (धड-धड नाही) चुकून बाहेर कोणाला ऐकू यायची! त्याच्या नुकत्याच फुटत असलेल्या कंठाने तो सारखा आवंढा गिळे. ती काय बोलते आहे, याच्यावर तो लक्ष देण्याचा खूप प्रयत्न करीत असे; पण बोलायला नेमके शब्द त्याला मिळत नसत. कारण हृदयाच्या त्या धाड-धाडीत त्याला ती काय बोलते आहे, ते नीट ऐकूच येत नसे. तो उगाच काहीतरी विनोद करण्याचा प्रयत्न करी किंवा हो ला हो लावण्याचा प्रयत्न करी. ती इतकी नित्यनेमाची आणि जवळची वाटे, पण रवीसाठी सारिका म्हणजे जणू एक कोडे होती. हाफ पॅन्ट घालून तिला बॅडमिंटन खेळताना बघितले की, रवी त्याच्या हृदयाच्या खड्ड्यात कोलमडून पडलेला असायचा. कधी कधी रवी आणि सारिका प्रॅक्टिस गेम खेळत. गेममध्ये रवीला सारिका चांगलीच धोपटायची; पण तिचा खेळ बघून रवी स्वतःचा खेळ सोडून टाळ्या वाजवायचा. मग ती कंबरेवर हात ठेवून, "काय आयटम आहे!" अशा आविर्भावात रवीकडे बघायची. तिथे पुन्हा रवी क्लीन बोल्ड!
आता वार्षिक परीक्षा जवळ येत होती—पुढल्या ३-४ दिवसांत त्याला ठरवायचे होते की कोणाला गुलाब द्यायचे ते. हातघाईची वेळ येत होती. मंजिरी तर चान्सच नव्हता. भक्तीपुढे प्रकाश उभा आणि त्याचे आडनाव पण ठोसर होते! शारदा आणि श्रद्धा म्हणजे देवाची आरती केल्यासारखे वाटते; मुख्य म्हणजे त्यांना प्रश्न पडायचा की, दिलेल्या गुलाबाचे करायचे तरी काय? आणि रवीला वाटायचे की गुलाबापेक्षा झेंडू दिलेला बरा. त्याच्या सगळ्या हिरोइनींपैकी सारिका एकच होती जिच्याशी त्याची मैत्री होती, पण तिला गुलाब द्यायचे? तिने गुलाब फेकून दिले तर? किंवा थट्टा केली तर? मग मैत्रीपण राहणार नाही. पण ती रिस्क घ्यावीच लागेल. हुकमाचा एक्का होती सारिका! तिला रवीने दिलेले गुलाब मिळणार. कारण त्याने डोक्यात जो प्लॅन बनविला होता, त्यावरून त्याला माहिती होते की, यावेळेस सारिका क्लीन बोल्ड होणार! १४ फेब्रुवारी हा 'डी-डे'!
सकाळी उठून त्याने आंघोळ वगैरे केली. थोडा व्यायाम केला, दंड-बैठका काढल्या—छाती आणि हात थोडे कडक दिसायला. त्याचा आवडता शर्ट घातला. थोडे धाडस करून त्याने बाबांना स्कूटर मागितली आणि त्यांनी पण आपसूकच होकार दिला. त्याच्या आयडियाचा पहिला टप्पा म्हणजे गुलाबाची फुले! पण गुलाबासाठी त्याला कोणाकडे पैसे मागायची गरज नव्हती. त्याची एक मोठी आत्येबहीण जवळच राहत असे, तिच्याकडे गुलाबाचा बगीचा होता. तिथे जाऊन त्याने तीन रंगांची गुलाबे एकत्र केली. बाहेरचा वेढा लालचुणूक रंगाच्या गुलाबांचा, मग पिवळ्या रंगाच्या गुलाबांचा घेरा, मध्ये गुलाबी रंगाच्या तीन गुलाबांचा गुच्छ आणि या सगळ्याच्या मध्यभागी गवतातले एक पिवळेशार रंगाचे रानटी फूल. त्याच्या आत्येबहिणीने 'हे काय करतोयस?' असे मुळीच विचारले नाही. रवी स्वतः तयार केलेला फुलगुच्छ बघून खुश झाला. त्याने बाजारातून झेंडूची फुले कागदात आणली होती, त्यात त्याने तो गुच्छ लपवला. सुरुवातीला त्याचा प्लॅन कॉलेजमध्ये गुच्छ द्यायचा होता; पण त्यात बरीच रिस्क होती आणि असे अचानक तिला सरप्राईझ दिले तर तिला आवडणार नाही, असे त्याला वाटले. रवीच्या आयडियाचा दुसरा टप्पा अजूनच रोमँटिक होता. त्याने आपले बॅडमिंटनचे कपडे धुवायला टाकले आणि शूज ओल्या कापडाने स्वच्छ केले. आता तो आतुरतेने संध्याकाळच्या बॅडमिंटन क्लबला जाण्याची वाट बघू लागला.
संध्याकाळी तो सगळ्यांच्या आधी क्लबला पोहोचला. त्याने तो फुलगुच्छ अगदी सांभाळून, एका कोपऱ्यात स्वतःच्या बॅगेच्या मागे लपवून ठेवला. थोड्या वेळाने सारिका आली. तिने नेहमीप्रमाणे वॉर्म-अप सुरू केला. रवीला पाहताच तिने रॅकेट उंचावून दुरूनच 'हाय' केले. रवीने दुरूनच 'हाय' केले आणि तिला 'इकडे ये' असा हाताने इशारा केला; पण तिला त्याचा तो चोरटा इशारा कळलाच नाही. ती पुन्हा हसून म्हणाली, "अरे, कितीदा हाय करतोयस?" पहिला चान्स फेल! रवी पुरता फ्रस्ट्रेट झाला, पण खरा गेम आता सुरू होणार होता. रवीने एकदम जय्यत तयारी केली होती.
रवीने मनातली घालमेल लपवत वॉर्म-अप सुरू केला. रोजचे सेट्स झाले. सराव संपल्यावर मुलं-मुली एकत्र येऊन मॅच खेळू शकत, असा तिथला नियम होता. सराव संपताच रवी थेट सारिकाजवळ धावला. तो इतक्या घाईत जवळ आलेला पाहून तिने नेहमीच्या कुत्सित पण गोड अंदाजात म्हटले, "मला वाटलं आज फक्त 'हाय-हाय'च ऐकायला मिळणार की काय!"
"गेम खेळणार का?"
"तुला हरायला फार आवडतं ना?"
"तुझ्याकडून? हो!" स्वतःचे हे उत्तर ऐकून रवी स्वतःच खुश झाला आणि सारिकाला आश्चर्य वाटले. असे कडक उत्तर देणाऱ्यांपैकी रवी नव्हता.
दोघांनी गेम सुरू केला. रवी खूप आत्मविश्वासाने खेळत होता. सारिकाला नेहमीसारखा गेम खेळता येईना. पहिला सेट ती कशीबशी जिंकली. दोघांना घाम आला होता. ती नेहमी इतक्या सहजतेने जिंकत असे की, तिला कळेना कि काय चालले आहे आणि आज रवीला नेमके कशाने झपाटले आहे. दुसरा गेम अटीतटीचा होत होता. सारिकाने आपला गेम वरच्या पातळीवर नेला—आता नो टाईमपास! पण तिच्याने रवी काही मागे हटेना. ९-९ वरून त्याने पुढले सगळे पॉईंट्स जिंकत गेम जिंकला आणि जणू काही झालेच नाही अशा आविर्भावाने तो शांतपणे कोपऱ्यातल्या बागेकडे गेला, पाणी पिऊ लागला.
"चल, अजून एक गेम खेळू."
"अजून नको, मला घरी जायचं आहे."
"अरे, १-१ आहे, शेवटचा डिसायडिंग गेम खेळावाच लागेल."
"तूच जिंकशील, तू नॅशनल प्लेयर आहेस."
सारिकाला तो टोमणा थोडा झोंबला. तिला कळेना की, रवीशी गेम हारली म्हणून तिला राग येतोय, की त्याचा अचानक समोर आलेला आत्मविश्वास तिला फ्रस्ट्रेट करतोय.
"अरे ये रे... १० मिनिटांनी तुला उशीर नाही होणार," असे म्हणत ती त्याच्या जवळ आली.
"बरं, एका अटीवर," असे म्हणत त्याने बॅगेमागचा गुच्छ काढला. "हॅपी व्हॅलेंटाईन्स डे," म्हणत तिला तो गुच्छ दिला. तिला हे अगदीच अनपेक्षित होते. "माझा गुच्छ वेगळा आहे, दुकानातला नाही. बागेत जाऊन मीच फुले निवडली आणि मीच गुच्छ बनविला. चांगला दिसतोय ना?" त्याने विचारले. तिने मान डोलावली. अजूनही ती पहिल्या शॉकधक्क्यातून बाहेर आली नव्हती, पण तिला फुले मिळालेली फार आवडली होती.
"कारण दुकानातली सगळी फुले सारखी असतात; ना वेगळे रंग, ना काही वेगळ्या छटा. हा गुच्छ तुझ्यासारखा आहे. अभ्यास, खेळणे आणि काही कमी असेल तर दिसणे... या सगळ्यात तुझे एवढे रंग दिसतात आणि तरीही मधल्या पिवळ्या फुलासारखी तुझी निरागसता पण आहे." हे ऐकताना तिचा चेहऱ्यावरचा रंग कधीचाच लाल-गुलाबी झाला होता. कॉलेजमध्ये आणि क्लबमध्ये तिच्या मागे फिरणाऱ्या 'गुलाबरावांची' कमतरता नव्हती, पण तिच्या खेळापलीकडचे तिचे रंग इतक्या बारकाईने टिपणारा हा पहिलाच माणूस होता. तिचे हृदय धाड-धाड कोकलून लागलं आणि तिला भीती वाटू लागली की, बाहेर कोणाला ती धाड-धाड ऐकू यायची. आवंढा गिळत ती काहीतरी बोलणार होती, तेवढ्यात रवी उड्या मारीत कोर्टवर गेला. आपला प्लॅन एकदम तंतोतंत आणि अचूक पार पडला म्हणून तो भलताच आनंदात होता. बहुधा गुलाब देण्यातून जास्त आनंद त्याला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून होत असावा. त्याने सारिकाला कधी लाजताना बघितले नव्हते आणि आत्ताही त्याने ती संधी हुकवली—अस्सल बावळूराम!
"चल, तिसरा गेम खेळायचाय ना."
सारिकाला भरून आले होते. ती तशीच बॅगेजवळ उभी होती, रवीकडे बघत.