1/17/24

महाराष्ट्र कुणाचा?

जवळपास दहा वर्षांपूर्वी मी 'महाराष्ट्र कुणाचा?" या मथळ्याचा लेख या ब्लॉग वर लिहिला होता. तेव्हा हि राष्ट्रीय निवडणूक झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप ला भरगोस यश प्राप्त झाले होते. पण शिव-सेनेने घेतलेल्या डळमळत्या पावित्र्याने भाजप सरकार डळमळीत पायावर उभे होते. मी तो लेख, राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र कोणाचा अश्या आशयाचा लेख लिहिला होता. आज एका दशकाने मी पुन्हा याच मथळ्याचा लेख लिहितोय पण आशय वेगळा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांनी राजकारणाचा इतका उच्छाद मांडला  आहे कि महाराष्ट्रातील जनतेचा जणू कोणीच तारणहार उरलेला नाहीं असे मला वाटू लागले आहे. 

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्यात. आणि नेहमीचे डावपेच मान्य केलेत तरी राजकारण जेंव्हा केवळ सत्तेसाठी उरते किंव्हा सत्तांधळे बनते तेंव्हा समजायचे कि कुछ तो घोटाला है| सततची राजकीय अस्थितरता ना प्रजातंत्राच्या तब्येतीस बरी ना हि प्रजे साठी. बर, महाराष्ट्राच्या राजकारणाला अस्थिरता माहिती नाहीं असा भाग नाहीं. राज्य स्थापनेपासून केवळ दोनच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाळ एकसंध पूर्ण केला आहे. पहिले होते श्री वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्याचे पद म्हणजे घंटा-खुर्ची चा खेळ आहे. पण राजकारण्यांचे 'आय राम - गया राम' आणि राजकीय पक्षांची लपा-छुपी यात खूप अंतर आहे. आधी निवडणूक आल्यात कि कुठला राजकारणी कुठे उड्या मारणार याची चर्चा होत असे पण आता तर कुठला राजकीय पक्ष कुठे उडी मारणार याची चर्चा होते. सध्याच्या जनगणनेत एक भाजप, दोन सेना, दोन राष्ट्रवादी आणि अजून तरी एकच काँग्रेस आहेत. राष्ट्रवादी आणि सेनेने हम दो-हमारे दो थोडा जास्तच गंभीरतेने घेतले आहे असे दिसते. 

पण लोकतंत्र म्हणले कि अश्या घडामोडी व्ह्यायच्यातच पण राजकीय पक्ष इतके सतत बदलायला नकोत. प्रत्येक पक्ष एक भूमिका घेतो आणि त्या प्रकारे काम करतात किंव्हा निदान तसे दाखवतात तरी. मतदाता त्या हिशोबाने आपले मत देतो. उदाहरणार्थ, कम्युनिस्ट पक्ष हा मूळ प्रजातंत्र विरोधी पक्ष असून त्यांच्या प्रमाणे कार्ल मार्क्स चे सिद्धांत लागू केलीत तरच भारताचा (किंबहुना मनुष्य जातीचा) विकास होईल. आता या थोतांडावर कोणी विश्वास ठेवायचा तो वैयक्तिक मुद्दा झाला पण त्यांच्या या भूमिकेवर ते मत मागणी करतात. पण अचानक उद्या कम्युनिस्ट पक्ष म्हणाला कि आम्हीच राम मंदिर बांधू किंव्हा मथुरेला श्री कृष्ण मंदिराची मागणी ते करू लागले तर अक्खा समाज संभ्रमित होईल. तसलीच काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे. 

छत्रपती शिवाजींच्या नावाने चालवणार पक्ष अत्यंत हिंदू विरोधी अश्या काँग्रेस सोबत उभा आहे. जातीवादाचा परकोटी करणाऱ्या पक्षाचा एक मोठा भाग आज हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या भाजप सोबत उभे ठाकला आहे. सेनेचा एक भाग, ज्या भागास आता कायदेमान्य खरी सेना म्हणावे लागेल, या जातीवादी पक्षासोबत सत्ता चालवतो आहे. जनतेने २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत ज्या राजकीय पटलावर कौल दिला ते पटल आज अस्तित्वात नाहीं. मग आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदात्याला फसवल्याची भावना येत असेल तर ते योग्यच आहे. 

पण मला सगळ्यात जास्त वाईट भाजप चे वाटते. किती चुका करायचा कोणी? अखंड आणि अविरत कष्ट करून भाजप जणू जनतेचा कौल नाकारतो आहे. बाकी सगळे राजकीय पक्ष हे 'फॅमिली बिसिनेस' आहेत. पण भाजप तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे. मग त्यांनी गेले दहा वर्षे महाराष्ट्राच्या जनतेने सतत दिलेल्या कौलाचा जो विनोद केला आहे त्या साठी त्यांना यंदाच्या निवडणुकीत जनता शिक्षा तर नाहीं करणार? सेने बिना-बुडाच्या लोट्या सारखं अखंड वागत असतांनाहि भाजप ने त्यांची साथ घ्यायची ठरवलं. स्वतःसाठी कमी जागा ठेवल्यात आणि अस्थिरतेचे शिडे उभारलीत. तरी जनतेने त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. पण मुळातच 'दानवीर कर्ण' बनून जास्त जागा शिवसेनेला दिल्या मूळे भाजप ला स्वतःला असे बहुमत मिळाले नाहीं. शिवसेना आणि श्री संजय राऊत यांनी त्यानंतर जे वर्तन केले ते पुन्हा सांगण्यात अर्थ नाहीं, ते सगळ्यांना ठाऊकच आहे पण तरीही भाजपला वाटले कि थोडा शंखपणा कमी केला आहे. त्यांनी सरकार श्री अजित पवार यांच्या सोबत बनवले. ते सरकार दीड दिवसाचा गणपती ठरले. श्री अजित पवार साळसूद पणे पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले आणि त्यानंतर आले सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस चे 'माविआ' सरकार. श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि भाजप व श्री फडणवीस 'ठण-ठण' गोपाळ करीत बसले. आता हे माविआ सरकार जनतामान्य नाहीं असा जरी ठणाणा भाजप करीत बसले तरी सामान्य मतदाता हेच म्हणेल कि भाजप मतदारांना ' गण्या -गंपू' समजतो आहे. आणि मला सांगा आपल्याला दुसरा कोणी तरी 'गंपू' समजतो आहे हि भावना आपल्याला आवडेल का?

'माविआ' सरकार अडीच वर्षे रखडले आणि मग सेनेत बंड झाला आणि श्री एकनाथ शिंदे सेनेतील बहुसंख्य विधान सभा सदस्यांना घेऊन बाहेर पडले. श्री शिंदे यांनी बंड केला म्हणणे चुकीचे आहे कारण आता कायदेमान्य आहे कि खरी शिवसेना (सध्या तरी) श्री शिंदे यांची आहे आणि यांच्यासोबत आहे. एवढी खटाटोप करून आतातरी भाजपचे श्री फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटले तर काहीतरी अगम्य राजकीय डाव-पेच खेळत भाजप ने ठरवले कि श्री शिंदे मुख्यमंत्री होतील. श्री शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यास विरोध नाहीं. किंबहुना त्यांच्यासारखे शिवसैनिकच पुढे कधीच यायला हवे होते. पण सत्य परिस्थिती अशी आहे कि लोकांनी कौल भाजपला दिला होता आणि जनतेची अपॆक्षा अशी होती कि भाजपचे सदस्य (श्री फडणवीस) पुढे मुख्यमंत्री होतील पण पायावर धोंडे पाडून घ्यायला जो धोंडे शोधत फिरतो त्याला कोण काय म्हणणार?

बरं पायावर धोंडे पडून घेतलेत तो पर्यंत ठीक आहे. भाजप ने ठरवले कि डोक्यावर पण धोंडे पाडायचेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून श्री अजित पवार बाहेर पडलेत. त्यांचे अभिनंदन करून गुपचूप बसायचे सोडून, भाजपने ठरवले कि त्यांनाहि आपल्यात सामील करायचे. राजकीय बाण बोथट असतात हे मान्य पण काहीच वर्षांपूर्वी भाजप आणि श्री फडणवीसांनी विधानसभेत आणि बाहेर धारधार शब्दात श्री अजित पवार यांच्या भ्रष्टाचारी वर्तनावर टीका करीत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार श्री अजित पवार असण्याची संभावना नाकारता येणार नाहीं आणि त्यान्वये त्यांच्यावर खटले पण दाखल झाले होते. भाजप नेहमीच स्वतःला राष्ट्रवादी, प्रगतिशील आणि स्वच्छ प्रतिमेची पार्टी मानीत आली आहे मग त्यांना हे वर्तन शोभा देत का?

या प्रश्नाचे उत्तर लोक असं देतील कि राजकारणात कोणी मित्र नसतो ना कोणी मित्र असतो. पण भाजपचे एक राजकीय पक्ष म्हणून काय विचार आहेत? काय लक्ष्य आहेत? भारत विकास सध्या करायला जेवढे राजकारण करणे आवश्यक आहे तेवढे करणे मी समजू शकतो पण या भानगडीत निव्वळ राजकारणासाठी म्हणून आणि सत्तेसाठी म्हणून तर भाजप राजकारण करीत नाहीं या? आणि जर का जनता तुम्हास पुन्हा पुन्हा त्यांचे मत देते आहे तर मग हे राजकारण करण्याची काय आवश्यकता? उद्या निवडूणुकीत भाजप कुठला चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार? तुमचे मत घेतले कि आम्ही वाट्टेल ते करणार हे सांगणार जनतेला? जनतेने दिलेल्या मताचा वाट्टेल तसा अपमान करणार, हे सांगणार लोकांना?  

या सगळ्याचा शेवट काय होणार मला माहिती नाहीं. मला माझे मत हिंदुत्ववादी, विकासशील, राष्ट्रधर्मवादी, मुसलमानांचे समर्थन न करणाऱ्या पक्षाला द्यायचे आहे. मला असा पक्ष सत्तेत हवा आहे जो फॅमिली बिझनेस नाहीं. मला आत्ता तरी महाराष्ट्रातील राजकारणात असा पर्याय दिसत नाहीं.