8/13/07

श्री गणेश खाणावळ

श्री गणेश खाणावळीत एक फाटकासा दिसणारा मनुष्य आला. वयाने जास्त नसावा पण कुठल्यातरी चिंतेने माणुस खंगुन जातो तसा तो दिसत होता. दाढी दोन्-तीन दिवस केलेली नसावी. केस थोडेसे पांढरे झाले होते. कपडे जीर्ण झालेले होते पण स्वच्छ होते. कंबरेवर पट्टा विजारेला घट्ट धरुन बसला होता. शर्टावर एक बटन गळलेला होत. तिथे पिन लावली होती. बांध्याने तो अगदी सडपातळ होता. एकुण त्याचे व्यक्तीमत्व म्हणजे तो कुठे आला काय गेला काय कोणाच्याही लक्षात फारस येणार नाही. पण तो आज विशेष आनंदात दिसत होता. विजार वर करत त्याने खाण्याची ऑर्डर दिली. तेवढ्यात त्याचे लक्ष खाणावळीतील कुटुंबाकडे गेलं. खास करुन गर्भवती मुलीकडे. तो सारखा तिच्याकडे बघु लागला.

एक जोडपं आणि त्यांच्या सोबत मुलीचे आई-वडील असावेत. मुलगी गर्भवती होती. सगळे कुटुंब तिच्या प्रत्येक हालचाली कौतुकाने बघत होते. नवरा विशेष काळजी घेत होता, किंवा तसा निदान प्रयत्न करत होता. जेवायला काय हवं नको सारख विचारित होता. मुलीची आई हे नको खायला, हे खायला हवं अश्या सुचना करत होती. एकंदर कुटुंब स्वतःतच गुंग होत. खाणावळीत फारसं कोणी नव्हत. मालक माश्या मारत बसला होता. म्हणजे खरच, अक्षरश: माश्या मारत होता.

सुरुवातीला त्या मुलीने म्हातारा बघतोय याकडे फारसे लक्ष दिले नाही पण म्हातारा आता सरळ सरळ तीच्या कडे टक लाउन बघु लागला. त्यामुळे तीची थोडी चुळबुळ सुरु झाली. तेवढ्यात वेटर अन्न घेउन आला. म्हातार्‍याचे लक्ष विचलित झाले. त्याचेही अन्न घेउन वेटर आला होता. त्याला फार भुक लागली असावी कारण त्याचे हात थरथरत होते. पण गरम गरम अन्न समोर ठेवले होते तरी तो अन्नाला हात न लावता नुसताच एकटक बघत होता. जणु अन्नाच्या सुवासाने त्याची भूक पार उडुन असावी. त्याने अन्न थोडं चिवडल आणि एक घास कसा-बसा तोंडात टाकला. त्याचा घास तोंडातच घोळत होता कारण त्या पोरीकडे परत बघुन त्याचा कंठ दाटुन आला होता. पोरीने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातारा तीच्याकडे बघुन केविलवाणा हसला. झालं, ते म्हातार्‍याच हसण म्हणजे पोरीच्या सहनशक्तीचा जणु अंत होता. तीने नवर्‍याच्य मनगटावर हात ठेउन त्याचे लक्ष म्हातार्‍याकडे वेधले. नवर्‍याने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातार्‍याची तंद्रि लागली होती. नवरा उठुन तरातरा चालत म्हातार्‍याच्या टेबल जवळ गेला.

"का हो, काही लाज-बिज नाही का तुम्हाला?"

म्हातारा थोडा भांबावला व वेड्यासारखा उगाचच परत हसला.

"कळतय का मी काय बोलतोय ते? की सकाळी सकाळी टुन्न होउन आला आहात? तरुण पोरी-बाळींकडे बघण्याचा छंद दिसतोय तुम्हाला?"

"अहो, काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय?" म्हातारा जणु त्याच्या विचारांच्या दुनियेची खर्‍या दुनियेसोबत सांगड घालण्याचा घाई-घाईने प्रयत्न करत होता.

"वरुन चोराच्या उलट्या बोंबा" पोरीचे वडील टेबल जवळ येत उदगारले.

"काय झाल साहेब?" दुकानाचा शेठने पृच्छा केली.

"हा मनुष्य इथे बसुन सारखा माझ्या बायको कडे बघतोय. थोडीही सभ्यता नाही या माणसात"

आत्ता म्हातार्‍याच्या डोक्यात दिवा पेटला. " नाही नाही. मी त्या नज़रेनी कसा बघिन. मला मुलीसारखी आहे तुमची बायको. खर सांगायच तर तुमची बायको माझ्या मुलीसारखी दिसते अगदी म्हणुन मी कौतुकाने बघत होतो एवढच. चुकलं साहेब. माफ करा"

"वा वा, अरे हरामखोरा, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. हे सालं असल्या लंपट लोकांना चौकात उल्ट टांगुन बडवायला हवं" पोरीचा बाप खवळुन बोलु लागला.

"साहेब, तुम्ही काळजी करु नका. मी हाकलतो या नालायकाला. अरे, विनायक, याला बकोट धरुन काढ बाहेर" शेठ गरजला.

म्हातार्‍याला हे सगळं असह्य होउ लागला. कॉलरच्या बटन लावण्याचा-उघडण्याचा काहीसे चाळे करत तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला. पण संतापाने त्याला श्वास लागला होता. त्याची छाती भात्यासारखी वर-खाली होत होती व तोंडातुन शब्दां ऐवजी नुसताच फस-फस, सुं-सुं असले काहीसे आवाज येत होते.

"साला, नाटक बघा कसा करतोय. तुझ्या तर..." अस म्हणत नवरा म्हातार्‍यावर तुटुन पडला.

"अहो, राहु द्या" बायको घाबरुन मागुन ओरडली.

शेठने व पोरीच्या बापाने नवर्‍याला कस-बस धरुन मागे खेचले. या भानगडीत टेबलवरचे अन्न म्हातार्‍यावर सांडले व तो खुर्चीला अडखळुन मागे पडला.

"मला काय अडवताय. पोलिसांना बोलवा" नवरा खेकसला.

"बोलवितो साहेब. तुम्ही शांत व्हा" मालक म्हणाला

म्हातारा उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला धड उठता ही येइना. त्याचा पिन लावलेला शर्ट फाटला होता. फार केविलवाणी स्थिती झाली होती त्याची. जमिनीवरच तो गुडघ्यावर डोक ठेउन तो रडु लागला. 'किती अंत बघायचा कुणाचा' असं काहीस तो पुटपुटत होता.

त्याचं रडण बघुन नवरा अजुन पेटला. "असं पोरी-बाळींकडे बघण्याच सोडा. बोगारओळीत जायला मी पैशे देतो"

हे ऐकुन म्हातार्‍याने अजुन मान टाकली. टेबलला धरुन कस-बसं उठत तो म्हणाला "कोणाला सांगताय बोगारओळीत जायला? देवाने सुखी समृध्द आयुष्य दिलय म्हणुन एवढ माजायच!"

"कसा वटावटा बोलतोय बघा" पोरीच्या आईने भांडणात आपल योगदान दिलं.

म्हातार्‍याचं त्याकडे लक्ष नव्हत. "माझी लेक अगदि अशीच दिसायची" म्हातार्‍याने काकुळतेने परत पोरीकडे बघितल. "सहा महिन्याची पोटुशी होती जेंव्हा तीच्या सासरच्यांनी तीला जाळल"

जाळल या शब्दाचा परिणाम खोलीभर जाणवला. नवराही थोडा चपापला.

"लग्नानंतर दिड वर्ष झाल तरी हुंडा पोचला नव्हता आणि गर्भ चाचणीत पोटात मुलगी आहे हे कळले. ही दोन कारणं पुरेशी होती."

"बरं बरं उगाच थापा मारण बंद करा" पोरीचा बाप बोलला. " गोष्टी तर तयारच असतात."

म्हातार्‍याने फाटक्या शर्टाच्या खिशातुन कागदाचा जुना तुकडा काढुन नवर्‍यासमोर ठेवला.
' हुंडा-बळीची अजुन एक दारुण घटना. गर्भवती सुनेला जाळल्याचा सासु-सासर्‍यांवर आरोप'
ते वर्तमान पत्राच कात्रण जणु किंचाळत होते.

"तीला मारण्याच्या एक आठवडा आधी भेटलो होतो. 'मला इथुन घेउन चला' अशी गयावया करत होती बिचारी. मी विचार केला बाळंतपणाला महिन्याभरात घेउन जाईनच घरी"
म्हातारा खिन्नपणे हसला. "तुमचं बरोबर आहे. मी नालायकच आहे. पोटच्या पोरीला आगीत ढकलुन आलो"

हे सगळ अनपेक्षित होत. नवरा चांगलाच ओशाळला. " माफ करा साहेब. पण तुम्हाला कल्पना आहे की जमा़ना किती खराब आहे आज काल"

"तुमचं काही चुकल नाही. माझं नशिबंच फुटक आहे त्याला तुम्ही काय करणार?"

"मग पोलिसांनी अटक केली का ?" नवर्‍याने विचारले.

"केली ना आणि लगेच सोडुनही दिले. पुरावा नाही म्हणे. माझ्या पोरीचा कोळश्यासारख झालेला देह पुरेसा पुरावा नव्हता त्यांच्यासाठी. मी कोर्टात गेलो. गेली ५ वर्षे कोर्टाच्या पायर्‍या घासुन ही परिस्थिती झालीय. आज शेवटी निकाल लागला व त्या सगळ्यांना शिक्षा झाली. म्हणुन मी जेवायला ईथे आलो. "

मग पोरीकडे बघुन तो म्हणाला "पण यांच्याकडे बघुन मला माझ्या पोरीची इतकी आठवण येत होती कि घशाखाली घास जाईना. पण मी माझ्या पोरीची आठवण काढलेली सुध्दा देवाला मंजुर नाही."

खाणावळीत कोणाला काय बोलावे सुचेना. म्हातारा रडत रडत आपला शर्ट विजारी खोचण्याचा प्रयत्न करत बाहेर निघुन गेला. नवरा जागेवर थिजल्या सारख स्तब्ध होता. म्हातार्‍याला थांबवण्याच सुध्दा कोणाला सुचल नाही.

8 comments:

Vaidehi Bhave said...

Gost Avadali. Apali lihanyachi shailihi chan ahe. keep it up!

अनु said...

Jabardast.
Hope that this is not a true story.

Vidya Bhutkar said...

Really as Anu said hope this is not a true story. But it is very well written and i couldnt stop the tears while reading last few paragraphs. Very well written.
-Vidya.

Nandan said...

Gosht chhan aahe. pan var mhatalyapramane tee keval 'gosht'ch asavi ashee aasha karato. Keep writing.

Chinmay 'भारद्वाज' said...

हि कथा संपुर्णतः काल्पनिक आहे.

अर्थात, या गोष्टीत हुंडा-बळीची भाग कोणासाठी फारसा आश्चर्यकारक नसावा. त्रासदायक मात्र नक्कीच आहे.

या कथेद्वारे माझा केवळ हुंडाबळीची भीषणता वाचकांपर्यंत पोचवण्याचा उद्देश नाही. पण काही लोकांचे आयुष्य त्यांच्यासाठी किती निर्दयी असु शकते ते दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. या गोष्टीत तसे पहाता कोणाचीच चुक नाही. अगदी गैरसमज असला तरी आपल्या बायकोच्या संरक्षणास धावणे हा प्रत्येक नवर्‍याचा धर्म आहे. तसेच आपल्या पोटच्या पोरीचा असा करुण मृत्यु झाला असता, त्या वयाच्या प्रत्येक गर्भवती मुलीत आपल्या मुलीला शोधणे हे ही तितकेच सहाजिक आहे.

पण या कठ-पुतलीच्या खेळात दैवाच्या दोर्‍यांच्या कश्या विचित्र गाठी पडतात व त्याचे परिणाम किती केविलवाणे असु शकतात हे वाचकांना गोष्टीद्वारे जाणवेल अशी मी आशा करतो.

आपण सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

Unknown said...

Too Good. I am reading you for first time and liked it a lot. your though process is very nice and this story is one example of that.

comment:

I feel that "vijar" and "belt" doesn't go together well. Just a thougt, not a big thing.

-Rahul

abhijit said...

Dolyat paani aala rao.

Anonymous said...

tooooooooooooo heart touching