3/18/12

एका म्हातारीची गोष्ट

'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.

ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.

कळावे. लोभ असावा.

आपला,

चिन्मय भारद्वाज

http://prabhune.com/ArunP/Arun.htm

=====

बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्‍या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.


"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"


त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.


"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"


"कुठली?"


"चार ची"


"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.


तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.


"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"


"कुठल?"


"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.


"हो पण कुठल?"


"ते..ते वाल दे"


त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.


"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"


"आधी नाही का सांगायच"


"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."

तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.


"लौकर दे रे"


"दहा रुपये द्या अजुन"


"अजुन दहा रुपये कसले?"


"दुसर्‍या डब्ब्याचे"


"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.


"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.


तेवढ्यात दुकानाचा मालक आला.


"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.


एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्‍यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.


मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.

म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.


"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.


बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.


म्हातारी हातात वितळणार्‍या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्‍या ट्रेनला बघत उभी होती.

'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्‍याच्या ढिगात भिरकाउन दिल.


भिकार्‍याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.