3/10/09

धुक्यातील मृगजळ

The young have aspirations that never come to pass, the old have reminiscences of what never happened.
- Saki

जवळ जवळ तीन वर्षांनी भारतात जायचा योग आला. तीन वर्षांनी मी आई-बाबांना भेटणार होतो, मित्रांना भेटणार होतो. परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आलीत पण घरची ओढ तितकीच आहे. आता घर म्हटल म्हणजे ओढ असणारच नाहीतर त्याला घर म्हटल नसत! पण तीन वर्षात इतक्या गोष्टी बदलल्या होत्या की नेमक्या कुठल्या भावना मनात होत्या ते कळत नव्हत. संदर्भ बदलले होते. माझे इतरांकडे बघण्याचे आणि इतरांचे माझ्या कडे बघण्याचे दृष्टीकोण बदलले होते. मी मागल्या दिवाळीला भारतात गेलो होतो. मला परतुन तीन महिने होउनही गेलेत पण त्या प्रतिसादांचे आणि पडसादांची चाहुल मी अजुनही घेतो आहे. त्या सुरांचे नाद मला लागत नाहीत.

परदेशात जायची मी कधीच स्वप्न बघितली नाहीत आणि इतकी वर्ष झालीत तरी माझ्या स्वप्नातुन माझ घर, माझे आप्तजन अजुनही जात नाहीत. म्हणुन मला प्रश्न पडतो की ही सगळी उठाठेव कशासाठी? हे सगळं कुठे घेऊन जाणार आहे? यातुन काय सिध्द होणार आहे? पुरुषार्थ? कि भरपुर पैसा? मला संधी मिळाली आणि मी स्वतःला झोकुन दिल. याच मला यत्किंचतही दु:ख नाही. परत तशी परिस्थिती मिळाली तर मी तेच निर्णय घेईन. पण मनात संदेहाचे काटे जे रुततात त्यासाठी रुईची पान शोधतो आहे. कधी कधी वाटत की उगाचच शुंभासारखा इतका विचार करतो. काही आवश्यकता नाही. बरं रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असला प्रकारही नाही. श्वास घ्यायला फुरसत नाहीया पण थोडाही वेळ मिळाला की मन परत गुढ विचारांशी शिवा-शिवी खेळायला लागत. शांता शेळके यांची एक कविता आठवते.

काळजातले अनेक अज्ञात प्रदेश
ज्यांचे अस्तित्वही ठाऊक नव्हते आजवर,
हलके हलके दिसत आहेत मला
पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर.

हररोज हरघडी अचानक नवे प्रश्न समोर
जुन्या संबंधांची तेढीमेढी अतर्क्य वळणे
चक्रव्यूहात आपले आपल्याला जपणे जोपासणे
अनेक गोष्टींचे अर्थ आयुष्यात प्रथमच कळणे

माझा मीच आता किती शोध घेते आहे
अज्ञाताशी जुळवते आहे रोज नवी नाती
आतल्या आत घडत, मोडत, पुन्हा घडत
अपरिचीत रुपे घेत आहे माझी माती.

मागे म्हटल्या प्रमाणे खरच माझी सगळी स्वप्न अजुनही माझ्या घरचीच असतात. आई-बाबा, दादा, आजी-आजोबा हेच दिसतात. मी शाळेत पराग, बहार, तेजस सोबत मस्ती करतोय हेच दिसत. बास्केटबॉलचे सामने जिंकतोय हेच दिसत. जाग आल्यावर आठवणींच्या धुक्यातुन बाहेर पडायची मुळीच इच्छा होत नाही. त्या आठवणी आहेत त्यामुळे परत कधीच येणार नाहीत हे माहिती असतांना हा मनाला खेद कसला? बहुतेक तसल्या निर्मळ आठवणी पुढे कधीही येणार नाही याची जाणीव होत असावी. माझ लहानपण चार-चौघांसारखा गेल. कर्तबगार आणि प्रेमळ आई-बाबा, पाठीराखा मोठा भाऊ आणि गोष्टीतल्या सारखी आजी. मी खुप मस्ती केली. मारही बराच खाल्ला. अगदी माझ्या आजी कडुनही. माझी मित्र-मंडळीहीदांडगी होती. ठरवुन अभ्यास नाही केला आणि त्याचे परिणामही भोगलेत. पण या सगळ्यांनी मला संदर्भ दिले होते. यशा-अपयशाचे माप-दंड या सगळ्यांमुळे यांनी बांधले होते. या धाग्यांनी मला विणल होत. आता मनाचा गुंता सुटत नाहीया. तीन वर्षांनी भारतात जाऊन तो गुंता सुटेल अशी आशा करत होतो.

मैत्री असो कि नाते-संबंध, ते टिकवायला सोबतीची गरज असते. माझ्या सगळ्या मित्रांना नोकर्‍या लागल्या होत्या आणि बहुतांश मुंबई-पुण्याला निघुन गेले होते. बर्‍याचश्या मैत्रिणींची लग्न झाली होती किंवा होण्याच्या मार्गावर होती. दिवाळीच्या निमित्ताने बहुतेक मित्र गावी आले होते म्हणुन ओझरती का होईना भेट झाली पण काही तरी विचित्र वाटत होत. त्या सगळ्यांमधे मी माझ्या जुन्या मित्रांना शोधत होतो. अर्थात हा माझा खुळेपणा होता. तीन वर्षाचा हा काळ सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचा आणि घडामोडींचा होता. अनुभवांच्या छिन्नीचे घाव प्रत्येक मुर्तीला वेग-वेगळा आकार देते. माझी मित्र-मंडळीही आशा-आकांक्षांच्या ओझ्या खाली वाकायला लागली होती. आणि हा फरक फक्त तीन वर्षांचा नव्हता. मला परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आली आहेत. अर्ध्या दशकाहुन अधिक या काळात स्वभाव बदलणे किंवा सवयी बदलणे सहाजिकच आहे. आमचे दृष्टीकोणही संपूर्णतः निराळे झाले होते. मैत्री सोबत घेतलेल्या अनुभवांच्या पायावर भक्कमपणे उभी असते. पण सोबत संपली कि रहाते केवळ ओळख. पतंगाची भरारी मांजाच्या लांबी पूर्तीच सिमित असते तस आमच्या मैत्रिच झाल होत. जुन्या आठवणींना किती वेळा ऊत येणार? भांड्यात आता काही उरलच नव्हत!

यातुन दोन गोष्टी समोर येतात. एक, काळ पुढे जाणार आणि नदीच पाणी वाट काढुन वहातच रहाणार. आठवणींच गाठोड बांधुन पुढे चालत रहाण्याशिवाय गत्यंतर नाही. हे तत्त्वज्ञान काही नवख नाही. ज्या आठवणींच्या आल्हाददायक पाण्यात मी आजतोवर न्हात होतो त्या पाण्याच मृगजळ झाल होत. आणि माझ मन वेड्यासारख त्याचाच मागोवा घेतय. एक दिवस असा येईल कि या आठवणीही घडलेल्या घटना या सदराखाली मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दफ्तरबंद होतील. वयाने मोठं झाल्यावरच्या आठवणी काही वाईट मुळीच नाहीयात पण त्या प्रखर आणि रुक्ष वाटतात. त्याच तेवढ्या रहातील याची धास्ती वाटते. आणि दुसर म्हणजे की याचा अर्थ असा तर नव्हे की मला जी हुरहुर लागली होती ती माझ्या मायदेशाशी तुटत चाललेल्या संबंधांचीच तर नव्हती? आई-बाबा आहेत आणि ते पुरेशे आहेत पण बाकी देशात जाउन काय करायच? सोबतीचे सगळे वेग-वेगळ्या मार्गानी दिसेनासे झाले आहेत. प्रवासात जसे पांथस्थ अचानक भेटतात, गप्पा होतात, हसण होत आणि जसे भेटलेत तसेच ते नाहीसे होतात.

गुंता सोडवायच्या नादात आता लक्षात येतय कि सगळे धागेच नाहीसे झालेत आणि राहिलो मी एकटाच! काळाच्या लाटांनी माझी परतीच्या पाऊलखुणाच नाहीश्या केल्या आहेत. समोर जाण्याशिवाय पर्याय नाही माहिती आहे पण आता मागे वळुन बघण्याचीही मुभा उरली नव्हती त्याची खंत.