2/15/10

गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)

मला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्‍यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळी उन्हात आरसा समोर ठेउन दाढी करत असत. त्यांच्या दाढी करण्याला एक वेगळीच नजाकत होती. आधी सगळी तयारी करायची मग चहा प्यायचा. जणु काही दाढीच सामान भिजत ठेवलय आणि मग सतरंजीवर बसुन दाढी करायची. माझ्या वडिलांना भरघोस मिश्या आहेत. मुच्छाकडा मिश्या नाहीत पण अनिल कपूर सारख्या. त्यांना छान दिसते मिशी. मला ही तसलीच मिशी हवी होती. बाबा दाढी वाढवत नसत. पण मला माहिती होत कि मला दाढी कोणासारखी हवी होती ती - शेखर कपूर. बास, मॅटर सेटल्ड! पण आयुष्यात नेहमीच हव्या असलेल्या गोष्टी होत नाही. नाहीतर माझ्यावर हा लेख लिहायची वेळ आली नसती. तुम्ही मला दिगजाम च्या जाहिरातीत बघितल असत. बर, एखाद वेळेस तेवढ नाही पण तरी माझ्याकडे बघुन, दाढी हो तो ऐसी अस नक्कीच मनातल्या मनात म्हटल असत. लहानपणी दूरदर्शन वर रात्री ओल्ड स्पाईस ची चाहिरात येत असे. त्यात सुदृढ (!) शरीरयष्टीचे पुरुष समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करतांना दाखवत असत. 'the best man can get' . माझ्या मामाने त्याच्या ओल्ड स्पाईस ची रिकामी बाटली दिली होती. त्यात पाणी घालुन मी गालाला लावत असे. ते बघुन त्याने सल्ला दिला की मी मिश्यांच्या ठिकाणी तेल लावल तर लौकर मिशी येईल. मी आपला तेल लाऊ लागलो. घरातल्यांच्या फिदीफिदी हसण्याकडे मी मुळीच लक्ष दिलं नाही. कधी एकदा शेविंग करुन ओल्ड स्पाईस चेहर्‍यावर थोबकाळीन अस मला होत असे. पण शेविंग केली आणि ओल्ड स्पाईस लावल तरी दिगजाम च मॉडेलिंग करता येण कठीण होत. पण ती भानगड नंतरची नंतर बघु. आधी मिसुरड फुटण आवश्यक होत.

माझा मोठ्या भावाला, सहाजिकच आता मोठा असल्यामुळे, माझ्या आधी मिसुरड फुटल. मला त्रास द्यायला त्याला अजुन एक साधन मिळाल.
'चिन्मय इकडे ये लौकर'
"काय आहे?"
"ये तर, गंमत आहे"
मी आपला घोड्यावर स्वार होऊन मागल्या अंगणात पोचत असे. खरतर 'गंमतीच्या' कुतुहलापुढे माझ्या वयाचे घोडे गेले होते.
मग तो बाबांच शेविंग क्रिम लाउन त्याचे गालावरचे केस शोधत शेविंग करण्याच्या उद्योगात असे.
"बघ"
"मलाहि आहेत तेवढे केस" मी तोंड वेंगाडत म्हणायचो.
"फक्त पुरुषांना येते दाढी आणि मिशी. मर्दा-ने-जंग"
मग मी पाण्याचा तांब्या घेउन त्याच्या मागे धावत असे. त्याची चांगली करमणुक होत असे.

मला हा प्रकार असह्य झाला आणि शेवटी मी म्यानातुन तलवार काढली. एक दिवशी तोंडाला शेविंग क्रिम लाउन वस्तरा फिरवला. मग बाबांची नक्कल करत आरश्याच्या जवळ जाउन दाढी नीट झाली का ते बघितल. फारसा फरक जाणवला नाही आणि दादाने मल हे धंदे करतांना मात्र पकडल. संध्याकाळी आता बाबा बत्ती देणार याची खात्री होती पण झाल उलटच. ते मला म्हणालेत की आता तुला खुप दाढी येणार. आणि अशी नको असतांना दाढी केली म्हणुन केस राठ येतील. हत्तीच्या केसांसारखे टोचतील तुलाच.
मार पडला असता तरी परवडला असता कारण पुढला आठवडाभर मी फार टेंशन मधे होतो. मला रात्री स्वप्नात मला स्वतःचे केस टोचायला लागलेत. सुदैवाने तस काही झाल नाही.

११वी नंतर माझ्या ओठांवर केस लाजत-गाजत entry मारु लागलेत. माझ्या बर्‍याच मित्र मंडळीला दिवसातुन दोनदा दाढी करायची वेळ आली होती. मी मात्र दररोज सकाळी आज कुठे आणि किती उपटालेयत याच्या नोंदी घ्यायला लागलो. वर्षभराने बर्‍यापैकी मंडळी जमली होती. दुरुन बघितल तर याला मिशी आहे की नाही असा प्रश्न लोकांना नक्कीच पडत असणार. याला मिशी मूळीच नाही या ऐवजी निदान आता शंकेस वाव आहे हि प्रगतीची चिन्ह होती. दाढीची दशा मात्र केविलवाणी होती. दाढा जिथे असतात त्या गालाच्या भागावर थोडे बहुत केस डोकवायला लागले होते पण तेवढेच. बाकी मैदान साफ चका-चक था। पण आता तर कुठे सुरुवात होती. काहीच वर्षात पूर्ण शिवाजी. यावरुन एकविचार डोक्यात आला , शिवाजी महाराजांच्या जमान्यात विशिची पोरं लढत असत. त्यात जर का कोणची गत माझ्या सारखी असेल तर त्याची काय दशा होत असेल. विचार न केलेला बरा! दुरुन मी तलवार घेउन घोड्यावरून येतांना बघुन कोणाला प्रश्न पडायचा की हा पोरगा लढायला येतोय की माझी spare तलवार पोचवायला येतोय. इज्जतचा टोटल भाजी-पाला!

कॉलेज मधे असतांना मला बर्‍यापैकी दाढी आणि मिशी येउ लागली होती. पण वस्तुस्थिती केविलवाणीच होती. भरघोस या शब्दप्रयोगाच्या फार म्हणजे फारच दूर अंतरावर माझ्या दाढी-मिशीने पडाव टाकला होता. इतकी वर्ष वस्तरा फिरवुन केस राठ झाले होते एवढीच प्रगती होती. आणि आठवडाभर दाढी करण्यापासुन संन्यास घेतला तर झोपतांना केस टोचत असत. पण मी हार न मानता विविध प्रयोग करू लागलो. एकदा मी अनुवठीवरचे केस वाढु दिलेत. काही महिन्यांनी चिनी लोकांसारखे खुंटा एवढे केस लोंबकळायला लागलेत. (आई च्या मते मी बोकड दिसत होतो पण मी न ऐकल्या सारख केलं.) पण सगळ्या विमानतळांवर माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला लागल्यावर माझ्या लक्षात आल की मी चिनी सोडुन 'भलत्याच' लोकांसारखा दिसतोय. मी लगेच कापणी केली.

पण जोरदार, मर्दानी दाढी मिशी येण हा सुध्दा नशिबाचा भाग असतो हे मला हळु हळु उमगायला लागल. माझ्या एका मित्राच म्हणण की मनुष्याच्या मेंदुचा विकास २२ व्या वर्षानंतर थांबतो तस माझ्या दाढी-मिश्यांची गत झाली आहे. मला अशी सुक्ष्म शंका आहे की तो मला दाढी-मिश्यांच्या व्यतिरिक्त टोमणा मारत होता. त्या विषयावर नंतर बोलुया. मला मनाजोग्या दाढी मिश्या कधीच येणार नाही हे मी मान्य करायला लागलो होतो एवढ खर. पण शेवटचा प्रयत्न म्हणुन ठरवल की फ्रेंच कट ठेवायचा. आता नाचता येइना आंगण वा़कड याच ज्वलंत उदाहरण अजुन दुसर शोधुन सापडायच नाही. केसांचा पत्ता नाही, चाललो मी भांग काढायला.

तब्बल दोन महिन्यांनंतर बोकडाची दाढी आणि अमोल पालेकरची मिशी अस काहीसा विचित्र प्रकार उगवला. दाढीचे ते काळ्या रंगाचे कापसाच्या गाठींसारखे पुंजके हास्यास्पद दिसत होते की केविलवाणे हा अभ्यासाचा विषय ठरेल. लोक मला मी आजारी आहे का विचारायला लागलेत. पण हे सगळे तत्सम वार मी आधीही झेलले होते पण मला एका पोरीनी माझ्या वयाचा कयास तिशीच्या बराच पुढे लावल्यावर मात्र मी शेवटली हार मानली. म्हणजे एवढा अट्टहास करुन मी आजारीच नाही तर वयाचाही दिसतो?

शेखर कपूरची तर ऐसी का तैसी!

आताशा मी दररोज सकाळी उठुन दाढी करुन चिकना-चिट्टा बनुन कामाला जातो. जास्त विचार करत नाही. पण आरश्यात बघुन अजुनही मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटत की...

2/7/10

सरस्वती वंदना

वीणा वादिनी वर दे, वर दे॥
प्रिय स्वतंत्र-रव अमृत मंत्र नव
भारत मे भर दे, वरदे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

काट अंध उर के बंधन स्तर
बहा जननी ज्योतीर्मय निर्झर
कलुष भेद तम हर प्रकाश भर
जगमग जग कर दे वर दे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

नवगति, नव लय, ताल छंद नव,
नवलकंठ, नव जलद मंद-रव;
नव नभ के नव विहग वृंद को
नव पर नव स्वर दे वर दे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

टीप -: या रचनेचे रचनाकार कोण आहेत हे मला माहिती नाही.