2/6/23

बाजीप्रभूंच्या निमित्ताने अजून थोडे





महिना झाला पण पावनखिंडीच्या भेटीचा प्रभाव कमी झाला नाही. एक लेख हि लिहिला पण मनात अजून विचारांची गर्दी कायम आहे. मागल्या लेखाचा शेवट बाजीप्रभू आणि मावळे प्राण अर्पण करायला इतक्या सहज पणे पुढे कसे आलेत या प्रश्नाचे  उत्तर शोधण्यात झाला. पावनखिंड असो कि प्रतापगड, शाइस्तेखान मोहीम असो की आग्र्यातून पलायन असो, महाराजांना पदो-पदी हे नरवीर मिळालेत. आग्र्याला मदारी मेहेतरे महाराजांचे कडे घालून त्यांच्या जागी झोपला होता! केवढी हि जोखीम. 

महाराजांच्या उदया आधी हि लोक कुठे होती? कान्होजी जेधे किंव्हा बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांहुन वयाने मोठे होते. त्यांनी महाराजांच्या आधी मराठ्यांची बादशहाची चाकरी बघितली होती. मराठ्यां मधील भाऊबंदकी बघितली होती. मुसलमानी सत्तांच्या दृष्टिकोनातून मराठी भाषिक व प्रदेशाला असलेले नगण्य स्थानाची कल्पना होती. मराठी समाजच नव्हे तर एकूणच हिंदू समाजाची झालेली दयनीय अवस्थेचे हे लढवय्ये भाग होते. विजयानगर हिंदू साम्राज्याच्या विध्वंसा नंतर धर्मान्ध मुसलमानांची अनभिषिक्त सत्ता होती. जयपूरचे राजपूत म्हणवणारे घराणे तर त्यांच्या घरातील बायका मोघलांना पुरवीत होते. मग अचानक सोळा वर्षाच्या मुलाने स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा चेतने वन्ही कसा पेटविला?  

हा प्रश्न औरंग्याला हि नेहमी पडत असे. शिवाजी महाराजांचा लढा, त्यांचे यश आणि त्यांना लाभलेली लोक बघून औरंग्या नेहमी चकित होत असे. त्याला नेहमी एक गहन प्रश्न पडे कि या हिंदू लोकात अचानक लढण्याची स्फूर्ती कुठून आली? हि लोक फितूर कशी होत नाहीत? त्याच्या मते हिंदू लोक फक्त मुसलमानाची चाकरी करायला आहेत आणि भारतात राज्य करण्याचा हक्क फक्त मुसलमानांना आहे. हि मानसिकता आपण आत्ताच्या पाकिस्तान मध्ये पण बघतो.  

रायगड लाच देऊन औरंग्या ने जिंकल्यावर असा म्हणतात कि त्याने रायगड जाळला. त्यात शिवाजी महाराजांच्या राजवटीची सगळी कागदपत्रे हि नष्ट झालीत. त्यांनी लिहिलेली पत्रे, त्यांना आलेली पत्रे तसेच इतर महत्वाची कागदपत्रे सगळे गेले. त्यामुळे महाराजांनी मावळ्यांना एकत्रित कसे केले याचा आपण फक्त अनुमान लाऊ शकतो. ते एक प्रभावी पुढारी होते यात काही शंका नाही. पण नुसते पुढारी होऊन भागात नाही. लोकांना आपल्या पाठी पुढे न्यायला पुढाऱ्याला त्याची दृष्टी सगळ्यांपर्यंत पोचवायला लागते. नवा विचार, त्या विचाराचा उद्देश्य, त्याची आवश्यकता, त्या विचारांची अनुयायांकडून अपेक्षा, त्याची ऐतिहासिकता, त्यातले बारकावे, त्यातल्या युक्त्या, अपेक्षित वर्तन, त्या संबंधित उद्योग, त्या विचाराचे भविष्य आणि मुख्य म्हणजे त्या विचारांची भविष्यात होणारी उत्क्रांती हे सगळे जनतेत हळू हळू रुजवायला लागते. महाराजांच्या स्वराज्याचे विचार, आचार व बांधणीत वरील सर्व घटक दिसून येतात. व मावळ्यांकडून त्याची कल्पना व स्वीकृती पण दिसते. अर्थात शिपाई गडी पासून ते सरनौबता पर्यंत किंव्हा शेतावरच्या गडी माणसापासून ते पंत-प्रतिनिधी पर्यंत सगळेच हिंदवी स्वराज्य किंव्हा हिंदुधर्म संरक्षण इत्यादी विषयांवर प्रगाढ विचार करीत होते असे नाही पण या विचाराचा नाद सगळ्यांनाच लागला होता. प्रत्येक घटक त्याला पुरेसा विचार करून स्वराज्य बांधणीत आपला वाटा अर्पण करीत होता. इथे भक्ती संप्रदायाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. संत ज्ञानेश्वरां पासून ते संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास स्वामीं पर्यंत सगळ्यांनी वेग-वेगळ्या मार्गांनी, वेग-वेगळ्या प्रकारे संत समाजाने समाजात निष्काम कर्म सेवा, देवभक्ती, आणि राष्ट्र व धर्मा साठी प्राण अर्पण करण्याचे मनोबल बांधून ठेवले. मुसलमानी सत्तेचे ऐन मध्यरात्रीसुद्धा संतांनी समाजाच्या ऐक्य, जाती निर्मूलन, धर्म जागृती आणि गीतेचा मूळ संदेशाचा नंदादीप तेवत ठेवला. गावा-गावात होणारी प्रवचने, कीर्तने आणि पंढरीची वारी या ठोस स्तंभावंर मराठी समाज उभा राहिला आणि महारांच्या हाकेला धावून गेला. 

पण राज्याचा सकारात्मक अंग बनणे आणि मरणाच्या द्वारात सिद्दी ला ठणकावणे, यात बरेच अंतर आहे? 

शिवा काशीद सरदार घराण्याचे नव्हते, सुभेदार किंव्हा मोठे जमीनदार नव्हते. या प्रखर ज्वालेचा ना आगा-ना पीछा. स्वयंभू अग्निच जणू. वयाने फारसे मोठे हि नसणार कारण महाराज स्वतःच जेमतेम तिशीच्या होते. पण तरीही या साधारण घरातल्या, सामान्य शिवा काशीद ला एवढे धाडस झेपले कारण त्यांना हा लढा स्वतःचा वाटला. 

आधीच्या परिच्छेदातील विचार बांधणीचा पाय इत्यादी बाष्कळ बडबड बाजूला ठेवा. महाराजांच्या हाकेला साथ देत हजारो शिवा काशीद आलेत कारण त्यांचा ठाम विश्वास होता कि हे राज्य श्रींचे आहे. हे राज्य त्यांचे - शिवा काशीद चे आहे. मुसलमानी आक्रमक देशाच्या काना-कोपऱ्यात धर्मांध थयथयाट करीत आहेत. हिंदू असण्याचा जिझिया कर द्यावा लागतो आहे. आपल्या देशात आपलीच भाषा दुय्यम ठरतेय. आपल्याच चाली-रीतींची हेटाळणी होते आहे. हा लढा घरातल्या अंगणापासून ते देशाच्या सीमे पर्यंतचा आहे, घरातल्या देव्हाऱ्यापासून ते देवळातल्या गर्भगृहापर्यंत आहे. आणि हा लढा आपल्यालाच लढायला हवा. हा कानमंत्र महाराज हजारोपर्यंत पोचवू शकलेत. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक माणूस झगडणारच मग स्वराज्यालाच कुटुंब म्हणून बघण्याची विशाल दृष्टी महाराजांनी मावळ्यांना दिली. पण नुसत्या उंटावरून शेळ्या हाकल्यासारखे नव्हे. महाराज स्वतः लढ्यात दाणपट्टा घेऊन उभे होते. गरज पडली तर घर-दाराची आणि स्वतःच्या जीवाची तमा बाळगणार नाही याची प्रचिती महाराजांनी मावळ्यांना दिली. असे निमित्त आणि असा राजा हेच स्वराज्य स्थापनेचे गुपीत आहे. 

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्‌ । 

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ (गीता, २.३७)

समाजाच्या सर्व स्तरातून व घटकातून आलेली हि साधी माणसे, परिस्थितीला स्थितप्रज्ञतेने सामोरी गेलीत. सूर्यजाळ झालीत. भक्ती आणि शक्तीचे सार कोळून प्यायलेली हे लोक जीवाची तमा ना बाळगता यज्ञकुंड रुपी झालीत. म्हणूनच महाराजांच्या अचानक निधना नंतर लढा चालूच राहिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठी उभे राहून जमेल तितकी स्वराज्याची वात तेवत ठेवली. त्यांच्या औरंग्याने केलेल्या घृणास्पद हत्येनंतर मराठे अजून चेकाळले आणि छत्रपतींच्या या अवहेलना करणाऱ्या औरंग्याला शेवटी दक्खन मधेच दफनावले.

इंग्रजीत जशी म्हण आहे - अँड रेस्ट इस हिस्टरी..

पावनखिंड म्हणजे एक साधी भौगोलिक जागा पण या दगड-धोंड्यानी भरलेल्या तीन-चार की.मी. बोळीला अजरामरच नव्हे तर तब्बल साडे-तीनशे वर्षांनीही स्फूर्तिस्थान ठरेल असा पराक्रम महाराज आणि मावळ्यांनी केला. त्या संस्कृतीचा, इतिहासाचा, भाषेचा व धर्माचा वारसा मला प्राप्त झाले हे माझे अहोभाग्य.