1/28/09

निर्माल्य - भाग ५ (अंतिम भाग)

माई हॉस्पीटल मधे पोचल्यात तर त्यांना वातावरण तंग होत. सुनेचे वडिल, भाऊ आणि एक तीशीचा तरूण खोलीबाहेर उभे होते. तिघांपैकी कोणीही माईंशी काहीच बोलल नाही. आई आत सुनेपाशी बसली होती. माई घाई-घाईनी खोलीत गेल्या. विजय बाहेरच थांबला. सुन निपचिप पडली होती. तिला सलाईन लावलेली दिसत होती. पण कुठे दुखल्या-खुपल्याच दिसत नव्हत. माईंना थोड हुश्श झाल.
"काय झाल पोरी?" माईंनी प्रेमाने विचारल.
सुनेनी काहीच उत्तर दिल नाही. तिने डोळे मिटुन घेतलेत आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागलेत.
"रडु नकोस बाळा. मी आहे ना सोबतीला"
तरी सून काहीच बोले ना! सुनेची आई सुध्दा काही बोलायला तयार नव्हती.
"काय झाल पोरी? सांगशिल का?" माईंनी पुन्हा विचारल.
"श्रीकांतला विचारा" सूनेची आई रागाने म्हणाली.
"श्रीकांत?" माईंनी आश्चर्याने बघु लागल्या. "श्रीकांत आहे इथे" माईंनी पुढे विचारल.
"हे जे सगळं दिसतय ना ती सगळी श्रीकांतची करणी आहे" सुनेची आई गरजली.
माई थोड्या ताठरल्यात. त्या मनातल्या मनात काय झाल असेल याचे घाई-घाईने हिशोब करू लागल्यात.
पोलिस स्टेशनात पाहुणचार चालला असेल त्याचा. पहिली फेरी नक्कीच नसावी त्याची" सुनेची आई पुढे म्हणाली.
"अहो काय बोलताय? श्रीकांत पोलिस स्टेशनमधे? पोरी, बोल ग!." माईंनी काकुळतेनी सुनेकडे बघितल. सुनेच्या आईचे शब्द त्यांना नकोसे झाले होते.
"ती काही बोलणार नाही. मी सांगते तुम्हाला काय झाल ते. तुमचा श्रीकांत फार नावाजलेला आहे तुम्हाला माहितीच असेल. पण त्याची इतकी मजल जाइल अस कधी वाटल नव्हत. घरच्या बायका-पोरींवरच नजर टाकायला लागला? इतक पडाव माणसाने?"
"असं नका बोलु. श्रीकांत थोडा बिघडला असेल पण त्याची नजर वाईट नाही. आणि घरच्या पोरी-बाळी म्हणजे कोण? सुनेबद्दलच बोलताय ना तुम्ही? तो फार आदर करतो सुनेचा. अविनाश गेल्या पासुन तोच पाठीराखा आहे तिचा" माईंना बोलतांना श्वास लागत होता. हे सगळ अनपेक्षित होत. नेमकं काय घडलय हे माईंना अजुनही कळेना.
"पाठीराखा! पुत्र-प्रेम आंधळ असत हेच खर."
"अहो वहिनी, स्पष्ट पणे सांगा काय झाल ते. कुत्सित बोलण पुरे झालं"
आतापर्यंत सुनेचे वडिल आणि भाऊ खोलीत आले होते. तो तिशीचा पुरुष दाराशी ताटकळत उभा होता.
"श्रीकांतने पोरीशे छेडखानी केली" सुनेचे वडिल शांतपणे म्हणालेत. त्यांच इतक शांत वागण विपरीत होत.
माई वीज पडल्यासारख्या स्तब्ध झाल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांना काय बोलाव ते कळेना. श्रीकांतची इतकी हिंम्मत? दारू-काडी इतक तर आपल्याला माहिती होत. स्वतःच्या सख्ख्या वहिनीवरवाईट नजर टाकण्या इतका बिघडला असेल यावर माईंचा विश्वासच बसेना.

"त्याला दादरच्या पोलिस स्टेशन मधे दिलय"

"हे अशक्य आहे. श्रीकांत कधीही अस करणार नाही. मला माझा श्रीकांत पूर्ण माहिती आहे. आई आहे मी त्याची. तुम्हाला काही तरी गैरसमज झालाय. पोरी, सांग मला की खरच अस झालय का ते." त्या कश्या-बश्या बोलल्यात.
"माई, हे असलं बोलायला हा काही चित्रपट नाही. तो आत्तापर्यंत काय करत होता हे तरी तुम्हाला नेमक ठाऊक होत का? मग तो इतका पडु शकतो हे तुम्हाला कस कळणार?"

"पोरी, बघ माझ्याकडे. उत्तर दे मला. मी काय विचारतेय" माईंनी सुनेकडे रोखुन बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रु संथपणे वहात होते.

"आणि सुमा काही तुम्हाला उत्तर देणार नाही या. ती तुमची कोणीच नाही."

माईंनी असाह्यपणे खोलीत नजर फिरवली. पण त्यांना कुठुनही कसलीही मदत मिळणार नव्हती. सुनेचे वडिल हात पाठीमागे बांधुन माईंना बघत होते.

"निघा आता" सुनेची आई गरजली. "लग्न लावायला निघाल्या होत्या"

सुनेचे हुंदके आता वाढायला लागले होते पण तिच्या तोंडुन एक शब्द बाहेर पडायला तयार नव्हता.

माईंना आजु-बाजुच ऐकु येण बंद झाल. कानात सुं आवाज येऊ लागला. त्यांच्या तोंडुन रडण्याचा आवाज मुळीच येत नव्हता जणु हंबरडा फोडायला त्यांना भीती वाटत असावी.

माई भग्न अवस्थेत खोलीतून बाहेर पडल्यात. त्यांचा पदर पडल्याचाही त्यांना पत्ता नव्हता. माईंना अस बघुन विजय चांगलाच थिजला. त्याला आतला आरडा-ओरडा ऐकु येत होता पण त्याला संदर्भ लागला नव्हता. तो तरूण अस्वस्थपणे माईंकडे बघत होता.

विजय माईंच दंड पकडुन बाकाकडे नेण्याचा प्रयत्न करु लागला पण माईंनी विजयला झिडकारले. त्यांच्या अंगात अचानक अवसान आल.

"दादरच्या पोलिस चौकीत चल" त्या विजयला त्वेषाने म्हणाल्यात आणि तरातरा इस्पितळातून बाहेर पडु लागल्यात.


विजय माईंमागे धावला. "माई, तुम्हाला माहितीय का कुठेय चौकी?"

माईंनी मान हरवली.

"जवळपासच असेल. मी पटकन कोणालातरी विचारून येतो. तुम्ही आत बसा तो पर्यंत"

"नको, मी इथेच उभी ठिक आहे"

विजय पत्ता विचारून येईपर्यंत माईंनी स्वतःला सावरल होत.

"मला वाटलच जवळपास असेल. इथेच गोखले रोडवर आहे" विजय बोलला. मग थोडा चाचरत तो पुढे म्हणाला " श्रीकांत दादा.."

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्यांनी विजयकडे शांतपणे बघुन नुस्ता चलायचा नुसता इशारा केला. त्यांचे डोळे लाल झाले होते.दादरच्या पोलिस चौकीवर बरीच गर्दी होती. विजय किंवा माईंपैकी कोणी कधीच असल्या वाटेला गेल नव्हत त्यामुळे चौकीत नेमक कोणाला आणि काय विचारायच ते कळेना. पण तेवढ्यात चौकीतून एक तीशीचा इंस्पॅक्टर धावत बाहेर आला.

"माई, या"

"ओळखल नाहीत का तुम्ही मला"

" श्रीराम?"

"नाही मी त्याचा लहान भाऊ अशोक"

" मी आत्ता तुमच्याकडेच येणार होतो श्रीकांतल घेऊन. तुम्ही इथे याव अशी माझी मुळीच इच्छा नव्हती"

"आत या तुम्ही"

"ए, पाणी आण रे लौकर"

"काळजी करू नका. श्रीकांतला इथे आणल्या बरोबरच मी त्याला ओळखल. त्याला आत केलच नाही"

माईंना काय बोलाव ते कळेना. "आत करण" म्हणजे मारहाण करण तर नव्हे या विचाराने त्यांच्या अंगावर काटा आला.

"फार लहान असतांना बघितल होत पण अविनाश सारखाच दिसत"

"अविनाशच ऐकुन फार वाईट वाटल"

माई आत आल्या तर श्रींकांत खोलीच्या टोकाशी बाकावर मांडी घालुन बसला होता. तोंडात रंगलेला खर्रा आणि वरच्या गुंड्या उघड्या टाकलेला तो शर्ट बघुन माईंचा पारा सणसण तापला. त्या तरातरा त्याच्याकडे चालत गेल्या.

माईंना बघुन श्रीकांतने मान खाली टाकली. माईंनी त्याच्या जवळ जाऊन त्याला सणसणीत झापड मारली. श्रीकांत बाकवरून कोलमडुन खाली पडला. तो आश्चर्याने माईंकडे बघु लागला.

"आई, तु मला मारतेयस?" तो कसातरी बोलला.

"नालायका, अविनाशच्या ऐवजी तू त्या बसमधे का नव्हतास" त्या श्रीकांतला अजुन मारण्याचा प्रयत्न करू लागल्यात पण पहिली झापड मारण्यात त्यांचा सगळा त्राण निघुन गेला होता. श्रीकांतला मारण्यात त्यांच्याच हाताल लागत होत पण अंगातल्या त्वेषाला तर आत्त कुठे ऊत येत होता.

"नुस्ता बसुन तुकडे तोडतोस आणि बाहेर उनाडक्या. हे असल काही करण्या आधी मीच मारून टाकायला हव होत"

श्रीकांतही रडत होता पण तो माईंना अडविण्याचा मुळीच प्रयत्न करत नव्हता. तो निमूटपणे मार खात होता. माईंचा आवेश बघुन इतर कोणी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत नव्हत.

माईंच्या बांगड्या फुटत होत्या आणि त्यांची मनगट रक्ताळली होती. त्यांनी शेवटी थकुन जमिनीवर फतकर मारल.

पोलिस चौकीत असल प्रकरण नविन नसाव कारण पोलिस अधिकारी, विजय आणि एक महिला अधिकारी माई पडल्या वगैरे तर सावरायच्या तयारीत असलेली सोडली तर बाकी कारभार संथपणे चालू होता.

श्रीकांतने शेवटी माईंचे दोन्ही हात घट्ट धरले आणि केविलवाण्या सुरात त्याने विचारले "आई, काय चुकल माझ?

"तुला काय वाटत मी काय केलय ते?"

"वहिनीकडे असं बघण्याची तू हिम्मतच कशी केलीस? कोणी शिकवल तुला हे सगळ? तू असल काही करणार आहेस माहिती असत तर तू पोटात असतांनाच विहिरीत जीव दिला असता. किती छळशील. मोठ्याने जाऊन छळल आणि लहाना राहुन छळतो" अस म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.

श्रीकांत माईंकडे रोखुन बघु लागला. त्याच्या डोळ्यातुन अश्रु वहाण थांबल.

"आई, असा वाटलो का मी तुला?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्या रडतच होत्या.

"आई, वहिनीला दुसर्‍या पुरुषासोबत बघुन मी काय कराव अस वाटत तुला" श्रीकांतनी कडक शब्दात विचारला.

श्रीकांतने माईंचे दंड पकडुन गदागदा हलवल. "आई, मी एकदा नाही तीनदा त्या माणसा सोबत तीला वेगवेगळ्या जागी बघितल"

"लक्षात येतय मी काय म्हणतोय?"

"शेवटी आज मला सगळ असह्य झाल आणि मी पुरुषाला मारायला धावलो. त्या भानगडीत वहिनीला लागल असाव पण पोलिसांनी मलाच धरल"

माईंना कळेचना की श्रीकांत बोलतोय ते खर मानायच कि सुनेच! पण सुन तर काहीच बोलली नाही. त्या विस्मित होऊन श्रीकांतकडे बघु लागल्यात.

"नंतर सुमा वहिनीचे वडिल आले होते चौकीत. तक्रार नोंदवायला पण अशोक दादानी त्यांना परतावुन लावल. पण जाता-जाता त्यांनी मला धमकावल की ते त्यांच्या मुलीच लग्न माझ्याशी कधीच होऊ देणार नाहीत"

"आई, ऐकतेयस का? तु वहिनीच लग्न माझ्याशी लावणार होतीस अस त्या लोकांना वाटलच कस? इतके नालायक लोक आहेत ते. तिच्या माहेरचे वहिनीच लग्न लावायला निघालेयत. आपल्याला न विचारता! वहिनी आपल्या घरची सुन ना?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही.
"पण सुमा च्या आई-वडिलांशी लग्ना बद्दल कधी बोललेच नाही" अस काहीस पुटपुटत माईं स्तब्ध झाल्यात. प्लॅस्टिक च्या बाहुली सारख्या त्या शुन्यात दृष्टी लाउन तश्याच बसुन राहिल्यात.

(समाप्त)

हि माझी पहिली दिर्घकथा वाचकांना आवडेल अशी मी आशा करतो. आपले अभिप्राय अवश्य कळवावेत हि नम्र विनंती.

शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत पण वाचकांनी त्या पदरी घ्यावात. आणि चुका दुरुस्त करण्याची सोपी पध्दत माया-जाळावर उपलब्ध असेल तर कृपया मला कळवावे.
1/21/09

निर्माल्य - भाग ४

काळ कधी सरकतो कळत नाही. झाडांवरची गळलेली पान आणि चेहर्‍यावरच्या वाढत असलेल्या सुरकुत्या जणु फक्त साक्षीला असतात. अविनाश ला जाऊन पहाता-पहाता दीड वर्ष झाल. डोळ्यातून अश्रुंची रहदारी थांबली असली तरी डोळे कोरडे झाले नव्हते. जाणारा नेहमीच सुखात असतो कारण मृत्यु जे मागे राहिले त्यांनाच छळतो. माईंना शाळेची बरीच कामं असत. त्या व्यापात त्या मग्न असल्या तरी विषण्णता त्यांच्या हृदयात माहेरी आलेली होती. रंग उडालेल्या सुनेला बघुन त्यांचा जीव थोडा-थोडा होत असे. सुनेच्या आयुष्याची पहाट होता-होताच काळरात्र झाली हा विचार त्यांची दुसरी सावली बनला होता.


त्यांचा स्वतःचा संसार तर सावळा गोंधळच होता पण नावाला का होईना नवरा तर होता. शिवाय दोन सोन्यासारखी पोर होती. माईंच्या मनात नेहमी द्वंद्व चालू असे. अण्णांच जे काही झाल ते काहे व्हायला नको होत. नियतीचा खेळ वगैरे तत्त्वज्ञान ठिक आहे पण अण्णांनी आणि माईंनी कोणाचही कधीही वाईट केल नव्हत तर दोघांची आयुष्य अशी भेसूर का व्हावीत या प्रश्नांशी माई भांडत असत. त्यांच्या थंडगार संसारात अंतरीच्या घालमेलीची त्यांना उब मिळत असे. पण स्वतःच्या पोराचा असला करूण अंत आणि समोर जिवंत शरीरात निर्जिवतेनी वावराणारी सून बघुन त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या दु:खाच्या भाराखाली त्यांच स्वतःशीच बोलण बंद झाल होत. तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की जीवनातल्या दु:खांची उत्तरे तत्त्वज्ञान्यांकडे मुळीच नसतात. म्हणुन जग मिथ्या आहे आणि हे दु:ख दु:खच नाही किंवा ही सगळी देवाचीच करणी आहे असली बाष्कळ बडबड करत असतात. मी मी म्हणणार्‍या तत्त्वज्ञानी माणसाला तरूण मुलाच्या देह बघावा लागणार्‍या आई समोर उभ कराव आणि विचाराव की मृत्युनंतरच्या अनंत सुखासाठी जगण्याचे दु:ख देणारी ही कसली माया? आणि हा खेळ दाखवणारा असा कसला हा देव? कढत अश्रुंचा खारटपणा काढायची 'माया' जो करून दाखविल तो खरा देव! पण त्या भानगडीत देव पडायचा नाही. आणि या प्रश्नाची उत्तर देण्याच्या वाटेला तत्त्वज्ञानी मंडळी मुळीच भटकायची नाही. या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कारण हे प्रश्नच प्रश्न नाहीत. हे तर केवळ दु:ख आहे. अनंत आणि अथांग. समुद्रासारख. कुठल्या काठा पासुन आरंभ झाला ते माहिती नाही आणि कुठे अंत होणार याचीही कल्पना नाही. सतत येणारी वादळ गिळंकृतही करत नाहीत. प्रत्येक वादळ मनाचा एक-एक टवका फाडुन घेउन जात. वादळ गेल की हे मन परत स्वप्न बघायला लागत आणि सत्र पुन्हा सुरु.


माईंना मरायचीही भीती वाटु लागली होती. मेल्यानंतर भूत होऊन इथेच अडकुन राहिलो तर? त्यामुळे त्या सगळ्यांची काळजी घ्यायची पराकाष्ठा करीत असत. त्यांना सारखा वाटे वाफेने धुसर झालेल्या आरश्यावर काही लिहाव तस त्यांच आयुष्य गेलं. क्षणभंगुर, एकाकी, उदास, श्रांत. वाफ उडुन गेल्यावर आरश्यावर लिहिल्या पैकी काहीच उरत नाही. उरतो फक्त प्रतिबिंब बघवत पण नाही आणि त्या प्रतिबिंबाला टाकुन कुठे दूर जाताही येत नाही.


अविनाश गेल्यानंतर दोन महिन्यातच माईंनी सूनेला जोरा करून शाळेत परत नोकरीला धाडल. माई स्वतः शाळेत असतांना सून घरी वठत चाललेल्या लाकडासारखी पडली आहे याची माईंना फार काळजी लागलेली असे. शाळेत परत नोकरी सुरु झाल्यानंतर सुनेत थोडा-थोडा बदल होऊ लागला. आजकाल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाक्यांमधे यायला लागली. आधी तर फक्त हो किंवा नाही यातच संवादाची घडी होत असे. अण्णांनी "अविनाश आताशा दिसत नाही" अस परवा विचारल. त्यामूळे अविनाश गुडुप झालाय याची नोंद त्यांनी दिड वर्षांनी का होईना घेतली.


श्रीकांतच गाड अजुनही चालूच होत नव्हत. बाहेरुन माईंना बर्‍याच गोष्टी ऐकु येत असत. उनाडक्या करण्यातच त्याचा वेळ जात असे. मग त्याच तोंड पानाने रंगलेल दिसु लागल. सिगारेटचा वास मधे मधे येत असे. त्यासाठी तो पैसे कुठुन आणत होता ते मात्र कळत नसे. हा जुगार वगैरे खेळतो का अशी शंका माईंना येऊ लागली. वडिल भाऊ गेल्यावर त्यात फारसा बदल झालेला नव्हता. घराबाहेर तो काय काय करत होता तोच जाणे पण त्याचं वागण बेदरकार किंवा मुजोर कधीच नव्हत. तो घरी सुता सारखा सरळ वागत असे. विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देत असे. अविनाश असे पर्यंत तो अविनाशचही ऐकत असे. नुकतच कॉलेज पूर्ण केल्याच त्याने माईंना सांगितल. सर्टिफिकिटही दाखवल. तो त्या दिवशी बराच वेळ देवघरात बसुन माईंशी बोलत होता. आता तो नोकरी शोधतोय आणि लौकरच नोकरी लागेल त्याला. तो आपणहुन अविनाश च्या कामावर जाऊन आला होता. काय खर काय खोट माईंना कळत नव्हत.माईंचा त्या सर्टिफिकिटवरच मुळी विश्वास नव्हता. पण त्यांनी श्रीकांतला काही उलट प्रश्न विचारले नाहीत. अंतरी त्यांना भीती होती की त्यांच्या श्रीकांतबद्दलच्या शंका खर्‍या निघाल्यात तर? त्यांच हे वागण श्रीकांतच गाड रुळावर नसण्याच कारण होत की त्यांचा स्वतःला जपण्याचा प्रयत्न होता कोण जाणे.

श्रीकांतच जे व्हायच ते होईल. त्यांना सध्या सुनेची काळजी होती. त्यांच्या डोक्यात एक नविन विचार पिंगा घालत होता. सुन एवढी तरणी आहे तर तिच पुन्हा लग्न लाउन द्यायच. आताशा समाजहि पुढारला होता. आणि पहिला नवरा मेला म्हणुन तिने का उरलेल आयुष्य कुढत काढाव? म्हणुन त्यांनी एकदा ठरवुन सुनेजवळ तो विषय काढला. पण काहीही न उत्तर देता ती खोलीत चालली गेली. जखम झाली असली तरी मलम लाउन पुढे जाणच भाग असत. तिला ते समजावुन सांगण कठिण होत. सुनेच्या लग्नाच्या विचाराने त्यांच्या मनाला हुरहुर लागली. तीचा संसार परत चालू होणार याचा त्यांना आनंद होत असला तरी घरची पोरगी परघरी जाणार याची त्यांना काळजी वाटत होती. कुठली मुलं विधवेशी विवाह करायला तयार होतील किंवा विधुर मुलंच बघायला लागतील का इत्यादी बरेच गोष्टींवर त्या विचार करू लागल्यात. त्यांच्या ओळखीत विधवा विवाह झाला नव्हता. मग त्यांनी विचार केला की सुनेच्या आई-वडिलांशी या बद्दल बोलाव. त्यांना काही आक्षेप नसणार याची माईंना खात्री होती तर होतीच पण एकाहुन तीन डोकी बरी!


माई नुकत्याच शाळेतून आल्या होत्या. शनिवारी म्हणुन दुपारची शाळा भरत असे. सून आज संध्याकाळी दिवेलागणीला येणार होती. ती सकाळीच माहेरी गेली होती. पुढे मुंबईत कोणा नातेवाईका कडे त्या सगळ्यांना जायचे होते. आल्यावर माईंनी अण्णांसाठी चहा केला व त्या वर्‍हांड्यात विश्रांती घेत बसल्या होत्या. स्वयंपाक काय करायचा असला काही त्या विचार करत होत्या.


"अहो, आज कसली भाजी करू?" माईंनी अण्णांना विचारल.

पुढुन काहीच उत्तर आल नाही. माईं मोठ्ठा उसासा सोडत उठल्या. असला एकला संवाद काही नविन नव्हता मग उसासा सोडायला काय झाल या विचाराने माईंना थोडं हसु आल. तेवढ्यात शेजारचा विजय "माई, माई" ओरडत धावत आला.

"काय झाल रे बाळा?"

"माई, चला लौकर तुम्ही?"

"हॉस्पिटल मधे"

"अग बाई, काय झाल रे?" माईंनी चकित होऊन विचारले. त्यांच्या पोटात खड्डा पडला. श्रीकांतचा दोन दिवस झाले पत्ता नव्हता पण त्याच अस गुडुप होण काही नविन नव्हत.

"चला तर तुम्ही"

"माई, वहिनीला दाखल केलय?" विजय घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला.

"कोण वहिनी?" माईंना कळेचना.

"सुमा वहिनी"

माईंनी डोळे विस्फारले. ते बघुन विजय अजुन घाबरला.

"बर तुम्ही आधी इथे बसा"

"अरे, चला काय, बसा काय? काय झाल नीट सांग विजय. इथे कोणी लहान नाही या" माईंनी स्पष्ट शब्दात विचारल.

"मला काय झाल नेमक माहिती नाही. मी शाळेतून परत येतांना वहिनींचा भाऊ दिसला. त्यानी तुम्हाला निरोप द्यायला सांगितल की वहिनींना दादरच्या हॉस्पिटलात दाखल केलय. तो म्हणाला काळजीच कारण नाहीया पण तुम्हाला तातडीने बोलावल आहे"

"काळजीच कारण काय नाही डोंबल. हॉस्पिटलात काय गंमत म्हणुन जातात का लोक?"

विजयला काय उत्तर द्याव कळेना.

माईंनी घाई-घाईने वहाणा चढवल्यात व त्या स्टेशन कडे चालू लागल्यात. विजय त्यांच्या पाठी मागे येत होता.
(क्रमशः)

1/17/09

॥जागृहि जागृहि॥

आशया बध्दते लोकः कर्मणा परिबध्द्यते।
आयुक्षयं न जानाति तस्मात् जागृहि जागृहि॥१॥

जन्मदु:खं जरादु:खं जायादु:खं पुनः पुनः ।
अंतकाले महादु:खं तस्मात् जागृहि जागृहि॥२॥

काम क्रोधौ लोभ मोहौ देहे तिष्ठन्ति तस्करा:।
ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृहि जागृहि ॥३॥

ऐश्वर्यं स्वप्न संकाशं यौवनं कुसुमोपमम्।
क्षणिकं जलमायुष्च तस्मात् जागृहि जागृहि ॥४॥