4/28/26

पुस्तक परिचय - What Do You Care What Other People Think?

पार्श्वभूमी: 

श्री रिचर्ड फेनमन यांच्या "What Do You Care What Other People Think? " या शीर्षकाच्या पुस्तकाचं आढावा आपण यंदाच्या अंकात घेणार आहोत. वैज्ञानिक म्हणजे फक्त गंभीर आणि हुशार असतात हे मिथक हे पुस्तक मोडते. हे पुस्तक आत्मचरित्रपर असून रिचर्ड फेनमन यांच्या लेखांचा, त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा आणि त्यांच्या आठवणींचे, फेनमन यांनी काढलेली रेखाचित्रे आणि काही दुर्मिळ छायाचित्रे यांचे संकलन आहे आणि सन १९८८ साली हे प्रकाशित झाले होते. फेनमन यांच्या विविध रंगी आणि विविध अंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन होण्यासाठी या संकलित गोष्टींना पुस्तकाचे रूप श्री राल्फ लिटोन यांनी दिले आहे. पुस्तकातील प्रत्येक शब्द मात्र फेनमन यांचाच आहे. 

व्यक्ती विशेष - फेनमन कोण?

हे पुस्तक म्हणजे फेनमन यांचे संपूर्ण चरित्र नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव व घटना त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि  गमतीदार व मिश्किल पद्धतीने टिपलेल्या आहेत. या पुस्तकाचा आढावा घ्यायचा म्हणजे फेनमन यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणे अपरिहार्य आहे. साधारण जनमानसात वैज्ञानिक म्हणजे अत्यंत हुशार पण गंभीर अशी समजून असते. फेनमन हुशार होतेच पण त्यांचे व्यक्तिमत्व रसरशीत होते आणि त्यांचे जीवन धमाल होते. असला माणिकांचनयोग दुर्मिळच. असामान्य बुद्धिमत्ता, विचारांची सुस्पष्टता, जगाकडे बघण्याचा आणि जन्मभर जपलेला निरागस दृष्टिकोन जाणवतोच, त्या व्यतिरिक्त त्यांची विचारांची प्रगल्भता, परखडता, विज्ञाननिष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोनातून जग तपासायची अनोखी पद्धती वाचकाला विस्मित करते.

रिचर्ड फेनमन हे अमेरिकेचे भौतिकशास्त्राचे (सैद्धांतिक भौतिकशास्त्र -" Theoretical Physics ")  वैज्ञानिक व त्या विषयाचेच अत्यंत प्रसिद्ध प्राध्यापक होते. अमेरिकेतील विज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या  MIT व Princeton या विद्यापीठांमधून त्यांनी आपले शिक्षण आणि PhD केली. तरुण वयातच त्यांना Manhatten Project मध्ये, अमेरिकेच्या पहिल्या अणु बॉम्ब वर वैज्ञानिक म्हणून नेमण्यात आले. या प्रकल्पावर काम करायला मिळणे यातच त्यांच्या भौतिकशास्त्रावरच्या प्रभुत्वाची कल्पना येते. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपले संशोधन पुढे चालूच ठेवले आणि त्यांनी केलेल्या शोधांसाठी त्यांना सन १९६५ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले.  हा झाला त्यांचा जीवनाचा संक्षिप्तात परिचय. पुस्तक वाचल्यावर त्यांच्या खुसखुशीत जीवनाचा खरा परिचय होतो. 

विषय प्रवेश:

फेनमन यांचे लहानपण - फेनमन यांच्या वडिलांनी फार लौकरच हेरले कि रिचर्ड हे हुशार आहेत. विविध मार्गांनी त्यांनी छोट्या रिचर्ड मधील कुतूहल जागृत केले. चोहोबाजूची सृष्टी अद्भुत आहे आणि त्यातील गुपित जाणून घेण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी रिचर्ड मध्ये निर्माण केला. 

"Not having experience with many fathers, I didn't realize how remarkable he was. How did he learn it, and principles of science and the love of it, what's behind it, and why it's worth doing? I never really asked him, because I just assumed that those were things that fathers knew"

रिचर्ड आणि त्यांचे वडील अनेक विषयांवर गप्पा मारीत आणि उत्तरांची अपेक्षा न करता रिचर्ड चे वडील त्यांना गहन विचार करायला उद्युक्त करीत, तसे करण्याची सवय त्यांनी रिचर्ड ला लावली. जसे रिचर्ड मोठे होऊ लागले, रिचर्डच्या वडिलांनी नकळत रिचर्ड ला जाणीव करून दिली कि या बुद्धिमत्तेचा उपयोग करणे रिचर्डचे कर्तव्य आहे. केवळ कॉलेज शिक्षित होणे नव्हे तर विज्ञानात आणि ते पण त्या विषयातील सर्वोच्च विद्यापीठातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. कुठल्या एका विषयाचा भार न टाकता, कुठलाही विषय कसा उलगडायचा आणि कुतूहलातून तो विषय कसा शिकायचा याचे बाळकडू  रिचर्ड यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. 

फेनमन यांचा आत्माच वैज्ञानिक होता. किंव्हा वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर त्यांच्या प्रत्येक अणु-रेणूत, किंव्हा कणा-कणात ते वैज्ञानिक होते. ते जरी पुढे प्रख्यात भौतिकशास्त्री झाले नसते तरी त्यांनी आपले आयुष्य वैज्ञानिक दृष्टीनेच घालविले असते. हा एक महत्वाचा फरक लक्षात घेतला तर फेनमन यांच्याकडून केवढे शिकायला का आहे याची प्रचिती येते. वस्तुनिष्ठता, स्वतःवर व स्वतःच्या विचारप्रणाली वर आत्मविश्वास आणि चूक ठरण्याची मुळीच तमा न बाळगता ठरविलेल्या मार्गात बदल करीत करीत शेवटी पुराव्यानिशी मुक्कामाला पोचणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे का? आणि हे आपण कुठेही वापरू शकत नाहीं का? 

फेनमन यांची पहिली बायको - अर्लीन, लग्नाच्या आधीपासूनच दुर्धर रोगाने ग्रस्त होत्या. आजाराच्या सुरुवातीला त्यांना नेमके काय होते आहे हेच डॉक्टरांना कळेना. फेनमन यांनी स्वतःच मेडिकल पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि अर्लीन ला होणाऱ्या पीडा कुठल्या कुठल्या रोगांमुळे होऊ शकतात याचा अभ्यास करून डॉक्टरांना कुठला आजार असण्याची शक्यता आहे हे सांगितले. अर्थातच डॉक्टरांनी फेनमन यांच्या सल्ल्याकडे फारसे लक्ष दिले नाहीं आणि फेनमन यांनी पण मग मेडिकल पुस्तकांचा नाद सोडला. पण काही काळाने आणि अनेक टेस्ट नंतर फेनमन यांनी सुचविलेला रोग हिच चिकित्सा निघाली. फेनमन फार बेचैन झाले. कारण या भानगडीत निदान आणि औषध उशिरा सुरु झाली. त्यांनी ठरविले कि आता मागे हटवायचे नाहीं आणि पुन्हा जोमाने त्यांनी मेडिकल पुस्तके वाचायला सुरु केले. अर्लीन यांना औषधांनी थोडे बरे वाटले खरे पण दुर्दैवाने त्यांचे खरे नव्हते आणि याची पूर्ण कल्पना फेनमन आणि अर्लीन दोघांना होती. तरीही फेनमन यांनी त्यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या दोन-तीन वर्षातच अर्लीन यांचे निधन झाले. फेनमन तेंव्हा मॅनहॅटन प्रोजेक्ट - अमेरिकेच्या पहिल्या अणु-बॉम्ब प्रकल्पावर होते. त्यांच्या दुःखाबद्दल त्यांनी थोडक्यातच लिहिले आहे. "One night I had a dream, and Arlene came into it. Right away, I said to her, “ No, no, you can’t be in this dream. You’re not alive!”

Then later, I had another dream with Arlene in it. I started in again, saying, “You can’t be in this dream!”

“No, no,” She says, “I fooled you. I was tired of you, so I cooked up this ruse so I’ve come back.” My mind was really working against itself. It had to be explained in a goddamn dream, why it was possible that she was still there!

I must have done something to myself, psychologically. I didn’t cry until about a month later, when I was walking past a department store in Oak Ridge and noticed a pretty dress in the window. I thought  “Arlene would like that, “ and then it hit me. “ 

प्रत्येकाचे दुःख वैयक्तिक असते आणि व्यक्त करताच येते असे नाहीं. पण त्यांच्या तर्कनिष्ठ व्यक्तिमत्वामागे मृदू मन समोर येते. हृदयाच्या या मिलापा पुढे तर्क निष्पभ्र ठरला आणि त्यांनी ते सहजतेने स्विकारुन अर्लिनची शेवटपर्यंत साथ दिली व तिचे अल्पसे आयुष्य प्रेमाने आणि सुखाने भरले. 

जाणारा पुढे जातो म्हणून मागे राहिल्याचे आयुष्य थांबत नाहीं. फेनमन यांची पुढे दोन लग्न झालीत. तिसरे लग्न त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकले. दोन मुलं हि झालीत. त्यांच्यावर फेनमन यांचे फार प्रेम होते. प्राध्यापकी करायला आणि लेक्टर्स द्यायला त्यांना जगभरातून बोलावणी येत. त्यांनी त्यांच्या बायकोला - ग्वेनेथ ("Gweneth ") लिहिलेली पत्रे पण पुस्तकात आहेत. पत्रांमधून प्रेम, आपुलकी आणि आयुष्यातील प्रत्येक अनुभव तिने पण घ्यावा, तिला मिळावा हि उत्कटता दिसते. पुस्तकात त्यांची, त्यांच्या कुटुंबाची छायाचित्रेसुद्धा आहे. तसेच फेनमन हे वयाच्या चाळीशीत रेखाचित्रे काढायला शिकलेत. त्यांची काही रेखाचित्रे पण पुस्तकात आहेत. 

फेनमन यांच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक मृदुता जशी दिसते, तशीच त्यांची वैज्ञानिक कठोरता चॅलेंजर दुर्घटनेच्या तपासात प्रकट होते. या पुस्तकाचा अर्धा भाग फेनमन यांनी या प्रकरणाला दिला आहे. 

फेनमन व चॅलेंजर ("Challenger disaster ") दुर्घटना:

सन १९८६ साली अमेरिकेचे चॅलेंजर नावाचे अंतरिक्ष यान उड्डाणानंतर लगेच फुटले. यानातील ७ अंतरिक्षवीरांना सद्गती प्राप्त झाली. या घटनेने तेंव्हाच्या अमेरिकेत मोठे वादळ निर्माण झाले. सरकार आणि नासा (" NASA ") यांच्यावर प्रश्न उभे राहिले. या दुर्घटनेची शहनिशा करायला तत्कालीन अमेरिकन सरकारने एक समिती नेमली आणि त्यात फेनमन यांना भौतिकशास्त्री म्हणून समाविष्ट करण्यात आले. या पुस्तकाचा जवळ जवळ अर्धा भाग फेनमन यांनी या विषयाला दिला आहे. हे लेखन अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, अंतराळ संबंधित तंत्रज्ञान संबंधित व्याख्या व संकल्पनांनी भरगच्च आहे. या विषयांचा गंध नसणाऱ्याला एखाद वेळेस एकदम आकलन होणे कठीण जाईल. पण हा भाग तांत्रिक दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न न करता, एखादे कोडे कसे सोडवायचे या दृष्टीने वाचायला हवा. या समितीचा अभ्यास सुरु होताच, सुरुवातीचे काही पेपर्स वाचून आणि टीम शी बोलून,  फेनमन यांना या अपघाताचे मूळ कारण काय असेल यांचा अंदाज आला होता. पण फक्त अंदाज बांधून चालत नाहीं तर तो पडताळून बघायला हवा. त्यांचा अंदाज शेवटी खरा ठरला पण त्या निष्कर्षाप्रत पोचायला त्यांनी जे कष्ट केलेत व ज्या पद्धतीने केलेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला वाचायला द्यायला हवे. प्रेस कॉन्फरेन्स मध्ये त्यांनी त्यांचा निष्कर्ष अत्यंत सोप्या भाषेत व सोप्या पद्धतीने सामान्य जनतेपुढे मांडला. त्यांनी समजावलेले लोकांना पटकन समजले आणि यात त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. या चॅलेंजर दुर्घटना समितीचे स्वरूप वैज्ञानिक होतेच पण सरकारी - राजकारण पण त्यात येणारच. त्यामुळे एका वैज्ञानिकाचे निष्कर्ष आणि नासा बद्दलचे मत समिती च्या शेवटच्या अहवालात येईना. तेंव्हा फेनमन यांनी  स्पष्टपणे समिती अध्यक्षाला सांगितले कि त्यांचे मत व निष्कर्ष जर का अहवालात ठेवला नाहीं तर त्यांचे नाव समिती व अहवालातूनच काढून टाकावे. शेवटी तसे काही झाले नाहीं. पण या प्रकरणात त्यांची तर्कनिष्ठ आणि सत्यनिष्ठ भूमिका त्यांच्या एकूण व्यतीत केलेल्या जीवनाशी बरोबर मेळ राखते. 



"The only way to have real success in science, the field I am familiar with, is to describe the evidence very carefully without regard to the way you feel it should be. If you have a theory, you must try to explain what’s going and what’s bad about it equally. In science, you learn a kind of standard integrity and honesty”

पुस्तकाचा शेवटचा लेख "The value of science” आहे. हा लेख म्हणजे त्यांनी १९५५ साली National Academy of Science येथे दिलेले भाषण आहे.  यात विज्ञान, विज्ञानाचे समाजातील स्थान, त्याचे उपयोग व दुरुपयोग इत्यादी विषयांवर फेनमन यांनी चिंतन केले आहे. हा लेख एकदा वाचून होणार नाहीं. दोन तीनदा वाचायला हवा. विज्ञान म्हणजे नेमके काय, वैज्ञानिक म्हणजे काय, विज्ञान आणि वैज्ञानिकांची समाजासाठी कुठली कर्तव्ये आणि उत्तरदायित्वे का आणि कुठली इत्यादी गहन प्रश्नांवर फेनमन यांनी आपले विचार प्रकट केले आहेत. सन १९५५ म्हणजे दुसरे महायुद्ध आटोपून आणि अणुबॉम्बच्या विध्वंसाला केवळ दहा वर्षे झाली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनन्वित नरसंहार शक्य झाला होता. विज्ञानाकडे लोक भीतीने बघत होते. फेनमन यांनी जनमानसातील हि प्रतिक्रियासुद्धा मोठ्या कौशल्याने हाताळली आहे. 

“Why is this? Why can’t we conquer ourselves?

Because we find that even great forces and abilities do not seem to carry with them clear instructions on how to use them. As an example, the great accumulation of understanding as to how the physical world behaves only convinces one that this behavior seems to have a kind of meaningfulness. The sciences do not directly teach good and bad.” 

वरील वाक्याचा गंभीरपणे विचार केला तर आपल्याला, भारतीयांना, लक्षात येईल म्हणूनच आपले तत्वज्ञान मानवी मानसिकतेला वर आणण्याच्या अखंड प्रयत्नात असते. मनुष्यच अंतरंगातून प्रगत झाला तर बाह्य जगातील प्रगती - वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानिक, मनुष्य आपल्या कह्यात ठेऊ शकतो. फेनमन यांची विचारप्रणालीत आणि  आपल्या न्याय तत्वज्ञानात बरेच साम्य आहे.  

शेवट:

फेनमन यांचे हे पुस्तक आणि तसेच "Surely You're Joking, Mr. Feynman! " पुस्तक वाचणे एक अनोखा अनुभव आहे पण यातून बरेच शिकण्याजोगे आहे. त्यांची कार्यपद्धती हा लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांना शिकवायला हवा. फेनमन यांची पुस्तके आणि त्यांची लेक्चर्स शाळेतील पाठ्यक्रमात हवीत.  विज्ञाननिष्ठा म्हणजे केवळ धर्म - रूढी परंपरा विरोध अशी भूमिका सध्याच्या भारतात घेतल्या जाते. आणि त्याची परिणीती पुढे वायफळ, बाष्कळ आणि नाठाळ राजकारणात होते. विज्ञान म्हणजे सत्याच्या शोधात मांडलेला सिद्धांत आणि मग पुढे, हा सिद्धांत पुराव्याने पडताळून बघण्याची पद्धतशीर कार्यप्रणाली. वैज्ञानिक मानसिकता केवळ विज्ञानाचे शोध लावायलाच वापरायला हवी असे नाहीं तर वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात वापरू शकतो. किंबहुना वापरायला हवा. श्री फेनमन एवढे नाहीं जमले तरी थोड्याफार प्रमाणात ते जमले तरी फार उपयुक्त ठरेल. 


What Do You Care What Other People Think?

लेखक (संकलक) - राल्फ लिटोन

प्रकाशक - W. W. नॉर्टन

पृष्ठ संख्या -  २५६

मूल्य - ऍमेझॉन वर उपलब्ध असलेली किंमत 

3/21/26

इंग्रज - एक नार्को स्टेट, अँग्लो-मराठे युद्ध आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे उपकार


(अफू चे बिहार मधील गोदाम - ब्रिटिश काळातच काढलेले एक चित्र. Source

(नेहमीप्रमाणे विषय हाताबाहेर गेला आणि लेख खूप लांब झाला. पण कृपया अवश्य वाचावा, टप्प्या-टप्प्यात वाचावा हि विनंती. सध्याच्या जगात जेथे १२८ शब्द वाचायला लोकांना जीवावर येत, तिथे मी १८०० शब्दाचा लेख लिहितो आहे. माझं डोकं तपासायला हवे!) 

पार्श्वभूमी:

मराठी साम्राज्याचा सन १૭५० नंतरचा काळ धामधुमीचा होता. तसे म्हंटले तर थोरल्या बाजीरावांच्या काळापासूनच मराठी साम्राज्याची धामधूम चालू झाली पण सन १૭५० नंतर स्थित्यंतरे खूप झालीत. नानासाहेबांच्या उत्तरेतील राजकारणाला रंग येतच होता तर पानिपतचे युद्ध झाले. मराठी राज्य अस्तास गेले अशी समजून पानिपत नंतर झाली असेल तर माधवरावांनी पूर्ण कसर भरून काढली आणि खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ 1760 च्या दशकात आला. पण मग माधवराव तरुण वयात गेलेत मग राघोबादादांच्या भानगडी, मग नाना फडणवीस इत्यादी अनेक घटना एका पाठोपाठ होत गेल्या. या दरम्यान उत्तरेत महादजी शिंदे आणि होळकरांनी घट्ट पाय रोवून मराठी राज्य बळवंत आणि स्थिर केले. पण आता शत्रूचे रूप बदलत होते. मुसलमानी सत्ता नामोहरम झाल्या होत्या. आणि पश्चिमेतून युरोपीय देशांची जहाजे  घिरट्या मारू लागली होती आणि त्यातीलच इंग्रजांनी चांगलेच पाय रोवले होते. नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी अगदी कलकत्त्याच्या सीमे पर्यंत धडक जरी मारली असली तरी दूरदृष्टीच्या अभावी आणि काही चुकीच्या धोरणांमुळे  एक तर ओडिसा आणि बंगाल मध्ये मराठयांना पाय रोवता नाहीं आलेत आणि मराठ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे इंग्रजांचा खूप फायदा झाला. तिथले मुघली राज्य मराठ्यांमुळे आपसूकच खिळखिळे झाले आणि बंगाल आणि बिहारचा सुपीक भाग इंग्रजांना गिळता आला. 

या काळाचा जर का इतिहास आपण सध्याच्या पुस्तकांमधून वाचायला गेलो तर दोन गोष्टी मांडल्या जातात : १) मुघली साम्राज्य लयाला जाऊन इंग्रजांनी भारत जिंकला. यात मराठ्यांचा फारसा उल्लेख केल्याचं जात नाहीं. जणू मराठे मधल्या शंभर वर्षात गिल्ली-दांडू खेळात होते! २) इंग्रज इतके बलाढ्य होते कि त्यांनी भारत जिंकणे अगदी  सहाजिकच  होते . भारत अगदी गलितगात्र झाला होता. किंबहुना भारत हि संकल्पनाच कधी नव्हती आणि इंग्रजांनी हा उपखंडीय भाग जिंकून उपकार केले आणि भारत जन्माला घातला. याहून पुढे जाऊन इंग्रज-फ्रांस मधील सेवन इयर्स वॉर (Seven Years War)  म्हणून प्रसिद्ध असलेल्या संघर्षात ( सन १૭५६ ते १૭६३) इंग्रज जिंकल्यावरच त्यांचे संपूर्ण भारतावर राज्य स्थापित झाले. 

या दोन्ही गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या आणि पुरावे बघता खऱ्या नाहीत. इतिहास कधीच सरळ रेघत जात नाहीं आणि इतिहास नेहमीच रंगेबिरंगी असतो -  एकदम इस्टमन कलर! 

विषय प्रवेश:

मागे मी भारतात अगदी सन १८०३ पर्यंत मराठे कसे बलाढ्य होते आणि अगदी बंगाल, बिहार आणि पूर्वी उत्तर प्रदेश (सध्याचे) इंग्रजांकडे असले तर ते भारतावर राज्य करतील असे कुठलेही संकेत सन १८०० पर्यंत नव्हते या विषयावर दोन-तीन लेख लिहिले होते. त्या श्रुंखलेतील हा पुढला लेख समजावा. या लेखात आपण इंग्रज आणि त्यांनी मांडलेल्या अफूच्या व्यापाराबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यान्वये इंग्रज-मराठा युद्धात मराठे कसे बलाढ्य होते याची दखल घेऊ. आणि शेवटी, जरी मराठा साम्राज्याचा १८१० पर्यंत अस्त झाला तरी अफूच्या व्यापाराने जशी बिहार, बंगाल आणि पूर्वांचल भागाची दयनीय अवस्था केली तशी अवस्था मराठा साम्राज्याच्या भूमीची का झाली नाहीं हे जाणून घेऊ.  

इंग्रज - एक नार्को-स्टेट (Narco State): 

सन १૭६० नंतर दोन गोष्टी इंग्रजांच्या बाजूने होत्या १) त्यांची वेस्ट इंडिज मधील कॉलनी फार लाभकारक ठरत होती. मुख्यत्वे त्यांचा आफ्रिकेतून लोकांना पकडून गुलामगिरीत विकण्याचा धंदा चांगलाच जोरात चालू होता. २) गुलामगिरीच्या व्यतिरिक्त त्यांनी अफू चा धंदा चालू केला होता आणि त्यात बंगाल-बिहार मध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. तिथून अफू उगवून ते पुढे चीन मध्ये प्रचंड नफ्यात विकत होते.  थोडक्यात इंग्रजांकडे प्रचंड प्रमाणावर पैसे येत होते. आणि असे असूनही मराठे त्यांना भारी पडत होते. 

(Indian Express: Opium: The drug that gave colonialism a real high)

सध्या श्री अमितव घोष यांचे स्मोक अँड आशेस (Smoke and Ashes) हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक म्हणजे इंग्रजांनी सन १૭૭० ते सन १८५० च्या काळात    मांडिलेल्या अफूच्या व्यापाराबद्दलचा लेखाजोखा आहे. इंग्रजांनी हा व्यापार का सुरु केला, आणि मग तो कसा वाढविला आणि तो जपायला काय काय अत्याचार त्यांनी भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि चीन वर केलेत हे या पुस्तकात सोप्या भाषेत दर्शविले आहे. इथे व्यापार हा शब्द जरी वापरीत असलो तरी हा केवळ व्यापार नव्हता. सध्याच्या दक्षिण अमेरिकेतील काही देशांना, जिथे कोकेन नावाच्या अवैध उत्तेजक ड्रग चे उत्पादन होते, 'नार्को-स्टेट ' असे म्हंटल्या जाते. म्हणजे या देशात या अवैध ड्रग (Narcotics)  चे उत्पादन आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे (Gangs) इतके वर्चस्व आहे कि या देशांचे अस्तित्व धोक्यात आहे. इंग्लड हे जगातील पहिले नार्को स्टेट म्हणायला हवे. कारण स्लेव ट्रेडिंग आणि अफूवर इंग्लंड साम्राज्य झाले. तेंव्हाचे इंग्लंड आणि आत्ताच्या नार्को स्टेट मधील फरक असा कि सध्याच्या नार्को स्टेट मध्ये फक्त गँग्स श्रीमंत होतात पण देशाचा सत्यानाश होतो. इंग्रजांनी 'सत्यानाश' हा भाग आऊट-सोर्स केला होता - भारताला आणि चीन ला!  आपल्या देशाचे वाटोळे झाले  पण इंग्लंड गर्भश्रीमंत झाले. थोडक्यात इंग्रजाकडे १७व्या शतकाच्या शेवटी-शेवटी अफाट पैसे होते. त्यामुळे त्यांनी बंगाल-बिहार जिंकल्यावर उर्वरित भारताकडे नजर रोखली. आणि आता त्यांच्या भारत पादाक्रांत करण्याच्या मार्गात फक्त मराठे उरले होते. 

अँग्लो-मराठे युद्धे:

सन १८०३ मराठा आणि इंग्रजांमध्ये आसइ (सध्याचा जालना जिल्हा) येथे  घनघोर युद्ध झाले. यात इंग्रजांचे जगप्रसिद्ध सेनानी आर्थर वेल्सली इंग्रजांचे सेनापती होते तर विरोधात मराठा शिंदे, नागपूरचे भोसले आणि होळकर होते.  या युद्धाबद्दल वेल्सली चे सैनिक काय म्हणतात बघा: 

"The military historian Randolf Cooper writes:The memoirs of the British officers who witnessed the Maratha Artillery in action leave no doubt about its level of sophistication. At the time of the Second Maratha War (1803), France was considered to have the finest artillery in the world. When British officers saw the volume of fire produced by the Maratha gruns, some asserted incorrectly that they were manned by Frenchmen but all agreed the effect was devastating. Another false assumption was that Frenchmen were responsible for the production of artillery and its accoutrements in India, when in fact the French mere provided the most modern example to be copied.   (P 102, Smoke and Ashes)"

 

 पुढे जायच्या आधी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे - आर्थर वेल्सली ने १૭९९ ला टिपू ला मैसूर च्या युद्धात मारले. मग त्याची बदली पुन्हा इंग्लंड मध्ये झाली. तिथून पुढे त्यांनी सन  १८१५ ला नेपोलियन चा पराभव वॉटरलू च्या युद्धात केला. दोन खंडामध्ये तेथील साम्राज्ये एकाच माणसाने युद्धात पराभवीत करण्याचे हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी एकच उदाहरण असेल. असो. 

(Wikipedia

या अँग्लो-मराठा युद्धांमध्ये पुढले युद्ध दिल्ली जवळ जनरल लेक याने दौलतराव शिंदे यांच्या विरुद्ध केले. यातही मराठ्यांचा पराभव झाला. पण जनरल लेक ने या युद्धाबद्दल काय म्हंटले आहे ते वाचा: 

"In a letter to the Governor General, Lake, who lost his son on the battlefield, wrote:

These (Maratha) battalions are the most uncommonly well appointed, have a most numerous artillery, as well served as they possibly can be, the gunners standing to their guns until killed by the bayonet. All the sepoys of the enemy behaved exceedingly well...i never was in so severe a business in my life and pray God I never may be in such a situation again. Their army is better appointed than ours; no expense is spared whatever, and they have three times the number of men to a gun we have...These fellows fought like devils, or rather heroes...I verily believe, from the position they had taken, we migh have failed. (P 105,  Smoke and Ashes)

हा जनरल लेक सुद्धा वेल्सली सारखाच शूर होता. त्याने आयर्लंड मध्ये इंग्रजांकडून फार मोठा पराक्रम गाजविला होता आणि म्हणून त्याला पुढे भारतात पाठविले होते. थोडक्यात इंग्रजांच्या अतिप्रसिद्ध आणि शूर सेनापतींना मराठ्यांनी पाणी पाजलेच होते.


  (Wikipedia)

लेख पुढे नेण्याआधी एक नमूद करावेसे वाटते. एक म्हणजे इंग्रज अफूच्या आणि स्लेव्ह ट्रेडिंग मध्ये पैसे कमावून बलाढ्य होत होते. त्यामुळे या युद्धांमध्ये जरी मराठे जिंकले असते तरी इंग्रजांनी माघार घेतली नसती आणि ते येन-तेन-कारणेन हल्ले करीतच राहिले असते. दुसरे म्हणजे मराठ्यांमध्ये फूट पडत होती. पेशवाई नाममात्र उरली  होती. मूळ पेशवाऱ्यांशी रक्ताने  किंव्हा शौर्याने १८०३ च्या पैश्यांचा काहीच संबंध उरला नव्हता. त्यामुळे हिंदवी साम्राज्याची भारताला व्याप्त करणारी दृष्टी नामशेष होत होती. शिंदे -होळकर कधी एकत्र लढले तर कधी मूग गिळून गप्प बसून दुसऱ्याचा नाश बघितला. नागपूर भोसले कधी एकत्र आले आणि नाहीं तर इंग्रजांशी करार करून गप्प बसले. वेल्सली तर पेशव्यांकडून लढत होता! आता काय म्हणचे? जो घडला तो इतिहास पण त्यांचे पडसाद आणि प्रतिसाद दूर पर्यंत ऐकू येत गेलेत. मराठा साम्राज्य नाहीसे झाले तरी दिल्ली, माळवा - मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचे त्यांनी जाता - जाता भलेच केले. ते कसे पुढे बघूया. 


(The Opium Wars in China)

ईस्ट Vs. वेस्ट: 

भारतात अफूचे उत्पादन इंग्रजांनी का सुरु केले हा एक स्वतंत्र विषय आणि लेख आहे. पण थोडक्यात, इंग्रज भारतातील अफू चीन ला विकून तेथील गोष्टी इंग्लंड किंव्हा इतर जगात विकत. हळू हळू, भारतातील अफूचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवून इंग्रजांनी अफूचा जणू पूर  चीन मध्ये आणला आणि चीन च्या अनेक पिढ्यांचे भविष्य उध्वस्त केले. बर, भारतात जी लागवड झाली त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला का? अर्थातच नाहीं. इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांना - मुख्यत्वे सध्याच्या बंगाल, बिहार आणि पूर्वांचल (पूर्वी उत्तर-प्रदेश) भागातील शेतकऱ्यांना त्यांनी घाणीला लावून जणू पिळून घेतले. अफुचीच लागवड करायची, ती अफ़ू इंग्रजांना ठरलेल्या भावातच विकायची, नुकसान झालं तरी इंग्रजांना नुकसान भरपाई करून द्यायची. 

"The farmers' contracts stipulated that they were to transport their harvest, in its entirety and at their own cost, to an official collection center, where, after weighing and quality control, they were, in principal, meant to be paid the price set by the Opium Department. This rate remained stagnant at Rs. 3.50 for a seer (a little more than a kilogram) of raw opium through much of the earlynineteenth centruy and rose only slightly thereafter. So low was the rate that it did not even cover the farmers' expenses." (P 57, Smoke and Ashes) 

प्रत्येक गावात एक अधिकारी, एक गोदाम आणि अत्यंत क्रूर पोलीस वर्ग उभा करून इंग्रजांनी या भागातील लोकांना जर्जर करून ठेवले. १૭९० ला बंगाल मध्ये दुष्काळ आला आणि त्यात दश - लाखात लोक अन्नावाचून हाल-हाल होऊन मेलीत पण इंग्रजांनी उलटा कर वाढवला. जमिनीचा कस निघून गेला, इतर कुठलीही पिके, हवी असली तरी उगवेनाशी झालीत. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या  अफूच्या उत्पादनाची मागणी वाढतच गेली. 

अफूचा व्यापार फक्त इंग्रजांपुरतीच सीमित होता. फार म्हणजे फार कमी भारतीयांना (बंगाल, बिहार मधील) या व्यापारात भाग घेता आला. एक मोठे उदाहरण म्हणजे श्री रबिन्द्रनाथ टागोर (ठाकूर) यांच्या पूर्वजांनी यात प्रचंड पैसे कमविला. पण असल्या दुर्मिळ उदाहरणाव्यतिरिक्त अफू ने फक्त इंग्रज व्यापारी धनाढ्य झाले. कलकत्त्याच्या बंदरातून चीन ला जाणारी जहाजे सुद्धा इंग्रजांचीच होती. थोडक्यात शेतकरी होरपळले आणि व्यापारी बुडाले, राहिले मागे काहीच नाहीं. आजही बघाल तर भारतातील सगळ्यात मागासलेला आणि गरीब भूभाग पूर्वांचल, बिहार आणि बंगाल आहे. गंगेच्या काठी वसलेली हि राज्य अजूनही इंग्रजी लुटीचे व्रण अजूनही घेऊन हिंडतायत. 

या अफूच्या उत्पादनाचे दोन भौगोलिक विभाग झाले.  १૭૭० साली इंग्रजांच्या हातात गेलेले बंगाल आणि बिहार आणि अगदी १८१८ पर्यंत हातात ना आलेला माळवा, गुजरात, महाराष्ट्र - जो प्रामुख्याने मराठ्यांकडे होता. अगदी १८१८ च्या पेशवाईच्या अस्तानंतरही हा भाग पूर्ण इंग्रजी बुटाखाली नव्हता. आणि मराठी राज्यकर्त्यांनी या भागावर उत्तम राज्यकारभार असल्यामुळे या भागातील व्यापार, व्यापारीमार्ग, सावकारी दळण-वळण इत्यादी सुरळीत आणि लागलेले होते. या भागातील व्यापारांना पूर्वेला चाललेल्या अफू व्यापाराचा गंध लागला होता. पण इंग्रजांनी या भागातून अफूचा व्यापार करायला बंदी आणली होती. अर्थात, हि बंदी कशी अंमलात आणणार? माळव्यातील शेतकऱ्यांनी ताबडतोब अफू ची लागवड सुरु केली. पण हि लागवड स्वनिर्णयाने  केली. त्यामुळे पीक बदलणे किंव्हा लागवडीत कमी-जास्त करणे, जो किंमत जास्त देईल त्यालाच विकणे आणि नाहीं विकल्या गेला तर स्वतःच्या गोदामात साठवून ठेवणे इत्यादी स्वातंत्र्य माळवा, गुजरात मध्य प्रदेश भागातील शेतकऱ्यांना आणि व्यापारांना होते. 

या भागातील राजे, इंग्रजी सत्तेचे अंकित असले तरी, स्वतंत्रपणे ते व्यापार करू शकत होते, त्यांनी अफू व्यापारात पैसे घातला. मुंबईहून हि अफू चीन मध्ये जायला लागली. आणि मुंबईत निर्यातीच्या व्यापारात पारशी आणि गुजराती/मारवाडी व्यापाऱ्यांनी अगदी घट्ट जम बसविला. सुरुवातीला इंग्रजांनी याला आळा घालायलाच प्रयत्न केला पण काही वर्षांनी इंग्रज स्वतःच मुंबईहून होणाऱ्या व्यापारात शामिल झाले. पूर्व भारतातील अफू व्यापार आणि पश्चिम भारतातील अफू व्यापारातील महत्वाचा आणि निर्णायक फरक असा कि पश्चिमेतील उतपादन आणि व्यापारातील पैसे समाजातील विविध गटात आणि स्तरापर्यंत पोचत होता. आणि आजही  महाराष्ट्र, गुजरात, माळवा भाग इतर उत्तर भारताच्या तुलनेत संपन्नच आहे. मराठे, मराठा साम्राज्य आणि मराठा घराणी कधीच अफूच्या व्यापारात नव्हती. अफूचा व्यापार इंग्रजांनी सुरु केला आणि ते पाप त्यांच्या माथीच  पण मराठ्यांचा प्रतिकार, त्यामुळे इंग्रजांनी पश्चिम भारतात जनतेला आणि व्यापारांना दिलेली सूट आणि त्यामुळे पुढे व्यापारात तरी मिळालेले स्वातंत्र्य या शृखंलेमुळे पश्चिम भारत इंग्रज निदान सुरुवातीला तरी पूर्व भारतासारखा ओरबाडून लुटू शकले नाहीं आणि  मराठा साम्राज्याची शेवटची भेट मानायला हवी. 

"But the real reason to be learnt from the commercial world of western India is that political and military support have always been crucial to the flourishing of business and enterprise in the modern era. If private enterprise was able to thrive in wester India, but not in the east, it was ultimately because the Maratha kingdoms were able to fight off the predatory colonial power for much longer than the states of theGangetic plain. The credit for western India's entrepreneurial prowess is ultimately due not only to the financial acumen of its businessmen but also to the foresight and acuity of the political and military leadership of the Maratha states." (P 115, Smoke and Ashes) 

शेवटचा धडा: 

इतिहास वाचन माझी आवड आहे. कारण इतिहासात वर्तमानातील व्रण समजतात आणि भविष्याचे खुळखुळे ऐकू येतात. इंग्रजांची एक 'भेट' म्हणजे त्यांनी आपल्याला मिंधे केलं. आपल्याला आपलीच लाज वाटू लागली, आपल्या इतिहासालाच आपण धुडकारून दिलेआणि आपल्या ऐतिहासिक पराक्रमांना आपण विसरलो. हे सगळे इंग्रजांच्या आणि सध्याच्या पश्चिमी देशांच्या पथ्यावर पडणारे आहे. स्वत्व विसरलो, स्वाभिमान हरवलो आणि आरश्यात ओळखूनासे झालो कि आपण सशक्त आणि एकात्म कधीच होणार नाहीं. आणि असे झाले कि संघर्ष कधी करणार नाहीं. मराठे शेवटी शेवटी एकजूट राहिले नाहीत, त्यांची जाणकार पिढी अचानक, थोड्या कालावधीतच वर गेली. (अहिल्याबाई, महादजी शिंदे आणि नानासाहेब फडणवीस). शेवटच्या दशकांमध्ये मराठ्यांनी असंख्य चुका केल्यात, पेशव्यांनी इंग्रजांची कास धरली, यशवंतराव होळकरांना पाठिंबा दिला असता, आणि त्यांच्या मागे सगळे उभे राहिले असते तर भारत कधीच इंग्रजांना मिळाला नसता. पण असे असूनही, मराठे शेवटपर्यंत लढलेत. संघर्ष अविरत चालू ठेवला. आणि जरी शेवटी मराठे हरले तरी त्यांच्या संघर्षाची फळे आणि फुले भावी पिढ्यांपर्यंत पोचलीत. त्यांनी कमावलेली पुण्याई आपण पुढली शंभर वर्षे उपभोगलीत.    

इतिहासाचा अभिमान हवा पण त्या अभिमानाने अंतरंग घडत नसेल, त्या छिन्नी ने आत्मरंगास रूप येत नसेल तर तो अभिमान व्यर्थ आहे. आज आपल्यासमोर वेगळी आव्हाने आहेत. त्यामुळे मराठ्यांकडून काही शिकायचे तर आपण या आव्हानांना समजून आणि प्रयत्नपूर्वक सामोरे जायला हवे. समाजविन्मुख होणे बरोबर नाहीं. कारण मराठ्यांनी संघर्ष केला म्हणून आपल्याला मागे बघायला काही आहे. आपण आपल्या पिढीचा, आपल्याला जमेल तसा, संघर्ष नाहीं केला तर येणाऱ्या पिढ्यांना मागे वळून बघायची मुभाच नसेल! 

--

2/24/26

श्रोते व्हा!

(हा लेख बऱ्यापैकी लांब आहे. पण आरामात का होईना पूर्ण वाचावा हि विनंती.)

गेल्या काही महिन्यात भुवनेश कोमकली - जयतीर्थ मेवुंदी, संदीप नारायण, तौफिक कुरेशी अशा कलाकारांचे कार्यक्रम ऐकता आले- आणि नवीन पिढी शास्त्रीय संगीताची परंपरा किती समर्थपणे पुढे नेते आहे हे स्पष्ट होते.  एकूणच गेल्या वर्ष भरातच एकूण बरीच सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती देता आली. 

या संगीत बैठकीत बसल्यावर मला माझ्यातील एक उणीव जाणवली ते म्हणजे मी श्रोता म्हणून कमी पडतो. मला गायकीचे आणि सुरांचे, रागांचे ज्ञान नाहीं. या गायकांच्या गाण्याचे माहात्म्य म्हणजे कि माझ्यासारख्याला (आणि माझ्या सारख्याच अजून असंख्य लोकांना) ते सुरांद्वारे वर नेतात पण त्यांना दाद देण्यासाठी मी तोकडा पडतो. आता पंडित भीमसेन जोशी यांची हि प्रस्तुती -  पावसाळी ढग मनात आणतात. भाव आणि शब्द कमी पडतात. माझ्या संगीत प्रवासाबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. पुन्हा पुनरावृत्ती नको. पण थोडक्यात खूपदा शब्द अनावश्यक असतात. किंव्हा अनावश्यक हवेत. पण स्वतःला, उदाहरणार्थ, पंडीत भीमसेन जोशींनी आळवलेला राग मिया कि मल्हार समजायला कुठली तरी भाषा हवी, स्वतःच्या मनातले शब्द हवेत

कवितांच्या कुशीत:

गाण्यांचा प्रभाव तर लगेच मनावर बिंबवतो पण कविता वाचल्यावर लगेच कळतातच असे नाहीं. कुठे तरी कवितेचे बीज मनात रुजते मग कधी कधी पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्याला अंकुर फुटतात किंव्हा जुन्या आठवणींच्या सिंचनाने त्याचा गर्भार्थ उमलतो किंव्हा कवितेच्या शब्दांनी जुन्या आठवणींचे कपाट नकळत उघडते.  

कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून 

मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून 

मधली वर्षे गळुन पडतात, कालपटाचा जुळतो धागा

पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा…  

('पैठणी', कवियत्री शांत शेळके)  

खूपदा कविता समजायला वयाचे टप्पे गाठावे लागतात. अनुभवांचे चटक्यांनी मन अंतर्मुख होते. मग कवितेचे शब्द साधारण असले तरी मनाला भिडतात कारण त्यात साध्य शब्दातच स्वतःचे साधारणपण 

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना

कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा

तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

('मी मोर्चा नेला नाही', श्री संदीप खरे) 

लहानपणीची आठवण म्हणून मी खालील कवितेच्या ओळी दिल्यात तर वाचकाच्या मनात आल्हादायक झुळूकेला भास होईल. 

दसऱ्याच्या आदल्या दिनी, जाई पाचांसह घेऊनी

फिरू आम्ही आरास बघत, साऱ्या खात्यांतून हुंदडत

किती मजा म्हणून सांगू, शब्दासाठे झालेत पंगू

भिंगऱ्या पेपेटे घेऊन, फुग्यांचे पतंग झोकून

जात असू पक्षी होऊन.

पण श्री नारायण सुर्वे यांच्या कविता ज्यांनी आधी वाचल्या आहेत त्यांना पोटात पुढे खड्डा पडणार याची जाणीव असते. आणि मग एकदम पोटात कोणी गुद्दा मारावा तसे पुढले कडवे येते. 

एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले

होते तिचे उघडे डोळे, तोंडातून रक्त भळभळे

जोडीवालीण तिची साळू, जवळ घेत म्हणाली बाळू

मिटीमिटी पाहात होतो, माझे छत्र शोधीत होतो

आम्ही आई शोधीत होतो.


त्याच रात्री आम्ही पांचानी, एकमेकास बिलगूनी

आईची मायाच समजून, घेतली चादर ओढून

आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही

अश्रूंना घालीत अडसर, जागत होतो रात्रभर

झालो पुरते कलंदर.

('माझी आई', श्री नारायण सुर्वे) 

किंव्हा विल्यम ब्लॅक नावाच्या इंग्लिश कवीची कविता दारिद्र्य आणि १९ व्या शतकातील इंग्लंड मधील औद्योगिकीकरणाची भीषणता थोडक्यात दर्शविते. तापलेले  भांड माहिती नसतांना आपण उचलायला गेलो कि कसा चटका बसतो तसे या कवितेतील शब्द चटका देतात 

When my mother died I was very young,

And my father sold me while yet my tongue

Could scarcely cry " 'weep! 'weep! 'weep! 'weep!"

So your chimneys I sweep & in soot I sleep. (1) 

And by came an Angel who had a bright key,

And he opened the coffins & set them all free;

Then down a green plain, leaping, laughing they run,

And wash in a river and shine in the Sun. (3) 

(The Chimney Sweeper , William  Blake )


किंव्हा हिंदी चे सुप्रसिद्ध कवी श्री दृश्यांत कुमार यांच्या एका कवितेतील हि पंक्ती गरिबीने त्रस्त जीवनाच्या धामण्यात स्फूर्तीचे रक्त रगरगवते:

आपके कालीन देखेंगे किसी दिन

इस समय तो पाँव कीचड़ में सने हैं!

('बाढ़ की संभावनाएँ सामने हैं', दुष्यन्त कुमार)  

पण कविता कळायला, त्याचा आनंद घ्यायला, शिकाव्या लागतात. शिकवणारे लागतात. माझे मराठी शाळेपासून चांगले होते. पण मी फारसा अभ्यास न करता मराठी पेपर चांगला सोडवीत असे म्हणून मला मराठी येत होते का? १०वी च्या वर्गात मी मराठी ची ट्युशन लावली. या मॅडम आमच्या शाळेच्या अत्यंत प्रसिद्ध मुख्याध्यापिका होत्या पण माझ्या वेळेपर्यंत त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या कडे मला मराठी समजले. अर्थ, भावार्थ, गर्भार्थ उमजला. सगळ्यात छोटा धडा का सर्वात कठीण आहे हे कळले. त्या एका वर्षाच्या ट्युशन चे पडसाद अजूनही माझ्या वाचनात आणि लेखनात (मला) ऐकू येतात आणि त्यांनी शिकविलेल्या पाऊलखुणांवर मी अजूनही शब्द गिरविण्याचा प्रयत्न करतो. हे माझे नशीब पण असेच भाग्य संगीतात किंव्हा कलेत लाभले नाहीं. 



हनुमंताशी हितगुज:

कवितेसारखेच, कलेतील बारकावे समजायला अभ्यास हवा. पण मला मात्र तसा अनुभव MET मधला हनुमंत बघून आला नाहीं. अमेरिकेत न्यू यॉर्क शहरात मेट्रोपॉलिटिन म्युसीअम  ऑफ आर्टस् ('MET ) नावाचे संग्रहालय आहे. जगभराच्या गोष्टी, चित्रे, मुर्त्या तिथे आहेत. (या बहुतांश चोरलेल्या आहेत. अर्थात असा आरोप सिद्ध होऊ शकत नाहीं कारण चोरांकडून त्यांनी विकत घेतल्यामुळे मुर्त्या फक्त ट्रान्सफर होतात, चोरीचा आरोप ट्रान्सफर होत नाहीं!)  त्यात 'Conversing Hanuman ' नावाची सुरेख कास्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीबद्दल फारच अल्प माहिती आहे. हनुमान रामाशी बोलताना, एक हात नमस्कारात, दुसरा हात संवादाच्या मुद्रेत. ती पाहताना मनात भक्तीचा, निष्ठेचा, संवादाचा आनंद उमटतो. पण त्याचा इतिहास, चोल काळातील कलेची सूक्ष्मता, रामायणातील संदर्भ हे सगळं समजण्यासाठी वाचन, ऐकणे, अभ्यास लागतो. तो कुठून मिळणार? आणि कसा मिळणार? पण या अभ्यासाशिवाय समोर फक्त एक विलोभनीय मूर्ती उरते. हनुमान मिळत नाहीं. 

कधीकधी अचानक नशीब फुलते. मूर्तीतील देव म्हणतो, 'चल तुला गम्मत दाखवितो' आणि मग इतिहास, कला व संस्कृतीच्या अलौकिक त्रिवेणी संगमात न्हायला मिळते. कुटुंबासोबत संभाजीनगराला जायची संधी मिळाली. अर्थात, कैलास देऊळ बघणे आलेच. आधी आम्ही चक्कर मारल्यासारखे फिरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरकारी अधिकृत गाईड समोर आलेत. मागे लागलेत कि मी तुम्हाला दाखवतो जे तुम्हाला दिसत नाहीं या ते. त्यांची फी होती. मी उगाच नको नको म्हणत होतो. ते म्हणाले (त्यांचे नाव आठवत नाहीं) कि 'साहेब, पैसे शेवटी द्या. नाहीं आवडला तर एक हि पैसे घेणार नाहीं. पण तुम्हाला नक्की आवडणार माझा टूर आणि तुम्ही स्वतःहून जास्त पैसे द्याल'. आणि अगदी तसेच झाले. सगळं परिसर जणू जिवंत झाला. सगळे शिल्प जागृत झालीत. शंकर-पार्वतीचे लग्नाचे शिल्प म्हणजे भास होतो आपणच तिथे उभे आहोत. कारण ते शिल्प 'फोटो' नव्हते. ते जिवंत होते. त्यात पार्वतीच्या पायातील एक दागिना कुठे तरी पडलेला असतो. आणि एक हात शंकराच्या हातात आणि दुसरा हात पार्वती तिच्या पायाकडे दाखवीत असते, तिचे एक पाऊल उचललेले आहे आणि तिच्या सखीला ती हाताने इशारा करतेय कि 'हा दागिना हरवलाय'. अजून एक शिल्प आहे कि शंकर-पार्वती द्यूत खेळतायत आणि शंकर त्यात हारतोय. तर शिल्पाच्या कोपऱ्यात पार्वतीची पोर नंदीची शेपटी ओढतायत, त्याला चिडवत कि बघ 'तुझा शंकर हारतोय'. अजून एक बारकावा म्हणजे, शंकर बसलेली गाडी जास्त दबलेली आहे तर पार्वतीची कमी दबलेली आहे. हे सगळं दगडात कोरलय! आम्हाला हे बारकावे कळले नसते, शिल्प उमजले नसते. वास्तुशिल्पाचा कौशल्याचा अंदाज आला नसता. शंकर-पार्वती भेटले नसते ना नंदीला चिडवणारी त्यांची पोर!



शेवटी नटराजाच्या चरणी:

फार वहावत गेलो. पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. आनंद घेता येणे म्हणजे कळणे नव्हे. कळल्या शिवाय आनंद घेताच येत नाहीं असे नाहीं पण जाणीव झाल्यावरचा जो आनंद आहे त्याला शब्द नाहीत. कारण स्वरांचा, शब्दांचा, रेखाटलेली किंव्हा शिल्पिलेली कला हृदयाचा ठाव घेणार अनुभव असतो. कलाकार किंव्हा शिल्पकार होणे जसे सोपे नसते, त्यामागे तपांची तपस्या असते तसे रसिक किंव्हा श्रोता होणे सोपे नाहीं. उपस्थिती देऊन वाह-वाह करणे श्रोता होणे नाहीं. सादर केलेली प्रस्तुती समजायला मेहेनत करायला हवी. 

श्रद्धाभक्तिसमायुक्ता नान्यकार्येषु लालसा: ।

वाग्यता: शुचयश्चैव श्रोतार: पुण्यशालिन: ॥

(योग्य श्रोता तोच आहे, ज्याच्या जवळ श्रद्धा आणि भक्ती आहे. या श्रोत्यांचा हेतू फक्त ज्ञान प्राप्ती आहे. ज्यांचे आपल्या वाणीवर ताळा आहे. (उगाच वाह वाह नाहीं!) आणि ज्याचे मन शुद्ध आहे) 

हे शिकणे कंटाळवाणं नाही — उलट, ते आनंदाचं नवं द्वार उघडतं. कारण कला — संगीत असो, कविता असो, मूर्ती असो — फक्त कलावंतांची नाही. ती आपल्या सर्वांची आहे. आणि तिचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर आपण चांगले श्रोते, चांगले वाचक, चांगले दर्शक व्हायला शिकलं पाहिजे.

वानर आणि नरांमध्ये मूळ भेद फक्त अंगठ्याचा नाहीं तर नरांमध्ये कला निर्माण करण्याची आणि ती कला उपभोगण्याची दैवी देणगी हा आहे. बहुतांश आपण या क्षेत्रात उपभोगी आहोत मग त्यातच उच्चतम पातळी गाठणे आपले कर्तव्य नाहीं का? 

1/28/26

Orbital - समान्था हार्वे - पुस्तक आढावा


गेल्या शंभर -दीडशे वर्षात साहित्यिक क्षेत्रात "sci - fi " (साय-फाय) किंव्हा वैज्ञानिक लेखनाचा एक नवीन प्रवाह उदयास आला. त्या कालावधीत वैज्ञानिक प्रगतीचा तीव्र वेग बघता, या क्षेत्राशी निगडित लिहिल्या जाणे साहजिकच आहे. चित्त-चक्षु चमत्कार किंव्हा जादुई जगाची कल्पना करणे आणि  वैज्ञानिक लिहिणे यातील महत्वाचे अंतर म्हणजे वैज्ञानिक लेखन हे साधारणतः विज्ञाननिष्ठ असते. आणि प्रतिभेच्या भराऱ्या भविष्यात प्रगत होणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चौकडीत बांधल्या असतात. मुख्यत्वे भौतिकशास्त्राच्या रिंगणात बहुतांश कथा कल्पिल्या जातात. म्हणूनच आंतररिक्षीय प्रवास, टाइम ट्रॅव्हल इत्यादी फार प्रसिद्ध कथानक आहेत.  

समान्था हार्वे ( Samantha Harvey ) यांनी लिहिलेले 'ऑर्बिटल' ( Orbital ) या पुस्तकाला एक विशिष्ट श्रेणी द्यावी लागेल. पुस्तकाची कथा वैज्ञानिक नक्कीच आहे पण हे कथानक काल्पनिक आणि वैज्ञानिक आहे. कथा भविष्यातली नाहीं आणि भविष्यातील तंत्रज्ञान किंव्हा भौतिकशास्त्राच्या परिसीमेवरची सुद्धा नाहीं. सहा अंतरिक्षवीर पृथ्वीच्या घिरट्या घालीत आहेत. एका वैज्ञानिक प्रकल्पासाठी आणि पुढे चंद्रावरोहणासाठी  विविध देशातील हे अंतरिक्षवीर अंतराळात पृथ्वीला घिरट्या मारणाऱ्या मानव निर्मित अंतरिक्ष स्थानकावर  वास्तव्य करीत असतात. यात जपान, अमेरिका, रशिया, इंग्लंड, इटली चे अंतराळवीर असतात आणि चार पुरुष आणि दोन स्त्रिया असतात. हे पुस्तक एका चोवीस तासाच्या कालक्रमातील आहे. या चोवीस तासात हे अंतरिक्षस्थानक, जे खरे तर स्थानक नाहीं कारण हे एकाच स्थानावर स्थित नाहीं, पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेत १६ वेळा चकरा मारते. म्हणजे दार ९० मिनिटात पृथ्वीची एक चक्कर पूर्ण होते  हि कक्षा म्हणजे दक्षिणेकडून-उत्तरेकडे आणि मग पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला उत्तरेकडून-दक्षिणेकडे अशी दिशा आहे. पुस्तकात एकूण १६ भाग आहेत. थोडक्यात, एका अंतराळयानाचा दिवस आणि त्यात पृथ्वीवरचे घडत असलेले 'अनेक' दिवस आणि त्या 'अनेक' दिवसात दिसणाऱ्या पृथ्वीच्या विविध छटा. आणि त्या छटांचे या सहा अंतराळवीरांच्या मनात पडणारे प्रतिबिंब हे पुस्तकाची मूळ कल्पना आहे.  

" They feel space trying to rid them of the notion of the days. It says: what's a day? They insist it's twenty -four hours and ground crews keep telling them so, but it takes their twenty-four hours and throws sixteen days and nights at them in return." (पृष्ठ १३) 

पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीचे सूक्ष्मपणे केलेले वर्णन. हे लिहिण्यासाठी लेखिकेने अमेरिकेची अंतरिक्ष संघटना NASA (नासा) यांची मदत घेतली होती. तिने कॅमेरातून स्वतः हे दर्शन घेतले आणि निरीक्षण केले आणि मग अत्यंत बारकाईने ते पुस्तकात टिपले. वाचणाऱ्याला आपणच जणू अंतरिक्ष यानात आहे अशी भावना येते. खाली एक परिच्छेद थोडा लांब असला तरी मुद्दाम प्रस्तुत करतोय कारण त्यानेच लेखिकेच्या कष्टाची कल्पना येते.

The hundred-cymbal clang of sudden daylight. A few minutes later they come in off the ocean where the Maldives, Sri Lanka, the tip of India are ripe with morning. The shallow shoals and sandbanks of the Gulf of Mannar. Off to starboard are the shores of Malaysia and Indonesia where the sand algae, coral and phytoplankton make the water luminous with a spectrum of greens - except now there's tumbled broken-up storm cloud and the usually tranquil view is weary and troubled. As they ascend India's east coast the clouds are thinning; morning strengthens, is briefly stark, and then a haze moves in at the Bay of Bengal, the clouds wispy and numerous add the Ganges silt estuary opens into Bangladesh. The umber plains and ochre rivers, burgundy valley of a thousand-mile ridge. The Himalayas are creeping hoar frost; Everest as indiscernible blip. Everything beyond them, which caps the earth, is the rich fresh brown of the Tibetan Plateau, glacial river-run and studded with sapphire frozen lakes." (पृष्ठ १२३) 

येथे लेखिकेच्या भाषेवरचे प्रभुत्व झगमगते. पृथ्वीचा प्रत्येक भूभाग विशिष्ट शब्दाने तिने रंगविला आहे. "Ochre" हा शब्द जास्त लोहयुक्त मातीचा रंग दर्शवितो. बांगलादेश मधील गंगा किंव्हा बिहारच्या छोटा नागपूर भागातील गंगेची माती लोहयुक्त असते त्यामुळे त्या मातीचा रंग अवकाशातून गंजलेल्या लोखंडासारखा दिसत असणार. हिमालयाची विशालता दर्शविताना लेखिका "Indiscernible " हा शब्द वापरते. मराठीत या शब्दाचा अर्थ अस्पष्ट असा होतो. अर्थात, हिमालय अस्पष्ट कसे? तर त्याची विशालता एवढी आहे कि कुठे सुरु होतायत आणि कुठे संपतायत आणि लांबी-रुंदी नेमकी केवढी याचा आराखडा बंधानेच अशक्य असल्यामुळे इतके अनंत कि जणू अस्पष्ट असा विचार लेखिकेला मांडायचा असावा. पुढे हिमालय ओलांडून तिब्बत चे पठार आहे. लेखिका याला " which caps the earth " असे म्हणते. लेखिका पठाराला " Cap  of  the  earth " असे म्हणत नाहीं. तिब्बत चे पठार इतक्या उंचीवर इतका सपाट भूभाग म्हणजे पृथ्वीची जणू टोपी आणि या कल्पनेला वेगळ्या दृष्टीने मांडतांना तिब्बत ' Caps the earth " असा करून एक वेगळा सूक्ष्म भाव समोर ठेविते. तब्बल ३००-४०० किमी अवकाशातून पृथ्वीवर मनुष्य अदृश्य होतो पण भूभाग जिवंत होतो. हा जिवंतपणा लेखिकेने नाविन्यपूर्ण शब्द संचालनाने अचूक टिपले आहे. 

आता वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर अंतराळात ना उत्तर ना दक्षिण आणि ना पूर्व ना पश्चिम. या दिशा आणि दिशांवरून बांधलेला दिवस-रात्र, आणि त्यानुसार आखलेली वेळ आणि कालगणना आणि त्या अनुषंगाने आखलेला आपला जीवनक्रम. पृथ्वीवरच आपण नसू तर हे धागे-दोरेच नाहीसे होतील. पण मग उरेल काय? अचानक मानवी आयुष्याची नगण्यता, क्षुल्लूकता प्रकर्षाने जाणविते. नाती-गोती, देव-धर्म, देश सगळे मातीचे मनोरे सगळे. पण आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा आधार घेतला तर वेळ किंव्हा काळ हीच कल्पना मुळात मानवी मनाची संकल्पना आहे. आणि त्यानुसार आखलेले जग सुद्धा आपण मनाच्या संकल्पनेचेच प्रतिबिंब आहे. आणि तेच आपण सगळीकडे घेऊन हिंडतो. त्यामुळे पुस्तकातील आपले अंतराळवीर  सूर्य-पृथ्वीच्या लपंडावामुळे निर्माण झालेल्या दिवस-रात्रीच्या खेळापासून दूर गेले असले तरी त्यांच्या मनातील त्यांचे जग तसेच कायम आहे. 

जपानची अंतराळवीर 'ची' (" Chie ") ची आई ती अवकाशात असतांना वापरते. मातृवियोगाचे दुःख, आईसोबतच्या आठवणी, तिला कधीही पुन्हा न भेटू शकण्याची खंत आणि तिच्या अंतिम संस्कारास नसण्याचा खेद या भावनांशी झगडतांनाही ती आपली कर्तव्ये निगुतीने पार पाडीत असते. रशियाचा रोमन ("Roman ")  त्या अंतराळस्थानावर तब्बल ४३४ दिवस असतो. अमेरिकेचा शॉन (" Shaun ") याचा देवावर विश्वास असतो. विज्ञानाच्या परिसीमेवर आणि विज्ञानाच्या सर्वोच्च उपलब्धीचे स्वरूप असलेले हे अंतरिक्षस्थान आणि अंतराळयान सामोरे असतांना एका अज्ञात आणि अनकालनीय 'देव' या संकल्पनेवर शॉन कसा विश्वास ठेऊ शकतो हे इंग्लंड च्या नेल (" Nell ") ला मुळीच कळत नसते. रशियाचा अँटोन (" Anton  ") चा पृथ्वीवरचा संसार तेवढा सुखाचा नसतो. आणि त्याची बायको आजारी पण असते.  

अवकाशात फिरत असलीत तरी त्यांची नाळ अजूनही पृथ्वीलाच बांधलेली आहे. त्यांच्या अडचणी, त्यांच्या आशा आणि आकांशा, त्यांच्या मनातील भीती या सगळ्या आपल्या सामान्यांसारख्याच आहेत. कुटुंबियांचे विचार, आठवणी, आई-वडिलांच्या आठवणी, लहानपणीच्या आठवणी, भविष्याची भीती किंव्हा बघितलेली स्वप्ने या सगळ्यांची घोंगडी करून, त्यात आपले अंतराळवीर स्वतःला गुरफटून घेत असतात. जणू फुलपाखरू होण्याची स्वप्ने बघत असलेला सुरवंट.  

इंग्रजी भाषेत वैज्ञानिक काल्पनिक (किंव्हा काल्पनिक-वैज्ञानिक) पुस्तके आणि लेखक अनेक आहे. भाषा या क्षेत्रात समृद्ध आहे. साहजिकच आहे कारण गेल्या दोनशे वर्षात वैज्ञानिक प्रगती सगळ्यात जास्त याच भाषेत झाली. मेरी शेली (Mary Shelley ) यांचे फ्रँकीस्टाईन ( "  Frankenstein ") हे इंग्रजीतील पहिली काल्पनिक वैज्ञानिक कादंबरी मानल्या जाते. या पुस्तकाचा मराठीतही अनुवाद झालाय आणि वाचल्या गेला आहे. पुढे जुल्स वन (" Jules Verne ") हे फ्रेंच कादंबरीकार फार प्रसिद्ध झालेत. इंग्रजीत हर्बर्ट वेल्स (H G Wells ) किंव्हा आर्थर सी. क्लार्क (" Arthur C Clark ") यांनी अनेक अति-प्रसिद्ध पुस्तके लिहिलीत. अमेरिकेचे आयसक असिमोव ( Issac Asimov ) यांनी शेकडो पुस्तके आणि गोष्टी लिहिल्यात. त्यांची रोबोट आणि फौंडेशन सिरीज अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यावर सिनेमे सुद्धा बनले आहेत. मी असिमोव खूप वाचला आहे. विज्ञान, मानवी जीवनाच्या संकल्पना आणि कल्पनाशक्तीची परिसीमा याच्या संगमावर असिमोव यांनी लिहिले आहे. रोमांचक आणि कल्पक अश्या त्यांच्या कथा मानवी वस्तुस्थितीपासून दूर नसतात. हाच एक गमतीदार भाग आहे. कितीही वैज्ञानिक प्रगती झाली किंव्हा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीबद्दल आज कितीही कल्पना रेखाटल्यात तरी मानवी जीवनाला केंद्रबिंदू ठेवल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आधी म्हंटले तसे, कल्पनेच्या भराऱ्या असो कि भौतिक दृष्ट्या पडताळून बघू शकतो असे विज्ञान असो हा सगळा मनाचा किंव्हा कर्त्याचा खेळ आहे. आणि या पुस्तकाचे आणि लेखिकेच्या यशाचे गुपित नेमके हेच आहे. 

मागल्या वर्षी अंतराळयान आणि अंतराळवीर या क्षेत्रात भारताच्या दृष्टीने दोन महत्वपूर्ण घटना घडल्यात. एक तर भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अंतराळयानात तब्बल ९ महिन्या अडकल्या होत्या. तांत्रिक बिगाडामुळे त्यांचा परतीचा प्रवास विस्कळीत झाला आणि मग त्यांना परत घेऊन यायला नवीन अंतराळयानसुद्धा नीट मिळेना. दुसरा म्हणजे, श्री राकेश शर्मा नंतर भारताचे श्री शुभांषु शुक्ला यांना अमेरिकेन अंतराळयानातून अवकाशात जायला मिळाले. हे पुस्तक वाचल्यावर सुनीता विलियम्स आणि श्री शुक्ला यांना काय दिसले असेल आणि त्यांचे अनुभव कसे असतील याची प्रचिती येते. रसग्रहण या शब्दाचा वापर आपण साधारण कलेचा आस्वाद घेण्याबद्दल वापरतो. पण या पुस्तकाद्वारे विज्ञानाचे आणि अंतराळाचे रसग्रहण करता येते असे म्हणायला हरकत नाहीं.  

या पुस्तकाला सन २०२४ चा इंग्रजी भाषेतील सर्वोच्च असा बुकर (" Booker " ) पारितोषिक मिळाले आहे. पुस्तक पारितोषिकास पात्र नक्कीच आहे. ज्या वाचकांना या विषयात आस्वाद असेल त्यांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे.