स्वानंद फार खुशीत होता. अचानक धनलाभ झाल्यासारखा त्याला आनंदाचा अचानक लाभ झाला होता. झाले असे कि, काही महिन्यांपूर्वी त्यांनी लहर आली म्हणून एक गोष्ट लिहिली होती. पण लिहिण्याची लहर काही गेली नाही. त्यांनी अजून एक गोष्ट लिहीली आणि मग लेख लिहिला मग एक आठवण लिहिली. मग एक अनुभव लिहिला. वाह....तो स्वतःच चकित झाला कि त्याच्याकडे इतके लिहायला होते. त्याने हळू हळू लिहिलेले मित्रांमध्ये आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवायला सुरु केले. कोणीतरी त्याला एका ऑनलाइन दिवाळी अंकाची लिंक पाठवली. त्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी संपादक लेख किंवा गोष्ट मागत होते. स्वानंदने त्याच्या लिहिलेल्या दोन-तीन गोष्टींपैकी त्याची सगळ्यात आवडती गोष्ट पाठवली. पाठवायच्या आधी थोडे बदल केलेत, काही संवाद अजून घातले. शेवटात थोडा बदल केला. थोडी उत्कटता वाढवली. त्याच्या मते ती गोष्ट प्रकाशित व्हायला हरकत नव्हती. पण त्याला माहिती होते कि प्रकाशित होणार नाही. कोणीतरी पहिल्यांदा लिहितो आहे हे त्या लेखनातून प्रकर्षाने जाणवत होते. होतकरू लेखकाची होतकरू गोष्ट.
“लिमलेट सदु
रवी गर्दीतून वाट काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. समोरचा रस्ता ओलांडतांना त्याच्या डाव्या बाजूनी एकदम एक छोटा टेम्पो आला. रवी थबकला. ‘टेम्पोचा वेग कमी होता म्हणून वाचलो, नाहीतर आज स्वतःच 'डिलिव्हर' झालो असतो’ असा विचार त्याच्या डोक्यात आला. स्वतःचाच ‘डिलिव्हर’ शब्द ऐकून त्याला हसू आले. तेवढ्यात पुढे जाऊन त्या टेम्पो ने कुणालातरी ‘प्रेमे आलिंगन’ दिलेच. एकदम गोंधळ उडाला. रवी पण तिथे धावला. एक तेरा-चौदा वर्षाचा मुलगा जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. लोक त्या टेम्पो वर आरडा-ओरडा करीत होते. गर्दीतून एक माणूस एकदम त्वेषाने पुढे आला त्याने त्या मुलाला बकोट घरून उभे केले. त्याच्या पाठीवरून धूळ झटकली. “लागले का रे बाळा?” असे म्हणत त्याने त्याच्या हातावर काहीतरी ठेवले. “मी ठीक आहे. एकदम हा टेम्पो कुठून आला कळलेच नाही” तो पोरगा म्हणाला. “होत, असे कधी कधी.” असे म्हणत त्या माणसाने लोक आणि त्या टेम्पोच्या मध्ये उडी मारली. “ रहेने दो, रहेने दो| बच्चा ठीक है|” असे हिंदी वजा मराठीत बोलत तो प्रत्येकाच्या हातात काही तरी देऊ लागला. रवी पण गर्दीत होता तर त्याच्या हातात पण त्या माणसाने काही तरी ठेवले. रवीने बघितले तर लीमलेट ची गोळी. एकदम रवीच्या डोक्या दिवा लागला. ‘हा सदा तर नाही?’ लहानपणी सुद्धा हा सदा नेहमी लिमलेट च्या गोळ्या खिशात घेऊन हिंडत असे. त्याला सगळे लीमलेट सदु म्हणूनच ओळखत.
लोक पांगलीत. टेम्पो पुन्हा हळू हळू गर्दीतून पुढे जाऊ लागला. रवीने हाक मारली “सदा!” त्या माणसाने मागे बघत ओ दिली. “अरे, सदा, ओळखले का मला? मी रवी? टिळक विद्यालय प्रायमरी शाळा?”
—-
स्वानंदने नुकतेच “व्यक्ती आणि वल्ली” दहाव्यांदा वाचले होते. सखाराम गटणे, परोपकारी गंपू आणि नारायण या पात्रांच्या आधारावर त्याने ‘लिमलेट सदु’ गोष्ट लिहिली होती. रवी त्याचे प्रतिबिंब होते, त्याची प्रतिकृती होती. निदान स्वानंदचा तसा प्रयत्न होता.
दिवाळीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याला संपादकांचा अभिनंदनपर ई-मेल आला कि गोष्ट ते प्रकाशित करणार. ‘काय? खरच?’ स्वानंदला आनंद झालाच पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, या दिवाळी अंकाचा दर्जा नेमका काय आहे? अस तर नाही कि अंकासाठी त्यांना पुरेसे साहित्य मिळाले नाही त्यामुळे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ सारख माझी गोष्ट प्रकाशित केली नसेल ना? या सगळ्या विचारामागे एक नवीन आणि अनोखी भीती स्वानंदच्या मनात डोकावली होती. ‘आता अनोळखी लोक सुद्धा आपल लिहिलेलं वाचणार’ या विचाराने तो थोडा बेचैन झाला. ‘काय रटाळ लिहिले आहे अस कोणी म्हणाले तर?’ पण त्याने तो विचार झटकून टाकला.
त्याने ठरवले कि आता लेखन सातत्याने करायचे. तो आता अजून काय काय लिहायचे, कोणावर लिहायचे किंवा कशाबद्दल लिहायचे, याचा विचार करू लागला. पण डोक्यातले, मनात आणि मग मनातले लेखणीतून कागदावर फार कमी उतरत असे. कल्पना जणू धुक होते. जो पर्यंत धुंद असे तो पर्यंत त्याला कल्पना विलासात मजा येई पण लिहायला शब्दांचा प्रकाश टाकल्या कि, सगळ्या कल्पना गायब.
गोष्ट प्रकाशित व्हायच्या आधी फारसा काही विचार न करता त्याने ४-५ गोष्टी, लेख, मनोगते लिहिली होती आणि आता विचार करून करून अर्धे पान सुद्धा भरत नव्हते.
दिवाळी अंकातील गोष्ट प्रकाशनाच्या दोन आठवड्यात एका रात्री संपादकांचा ई-मेल आला. त्यांच्या दिवाळी अंकाला भरगोस प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी आता नव-वर्षाचा एक अंक काढायचा ठरवले होते. त्यांना स्वानंदने अजून एक गोष्ट लिहायला हवी होती. ‘उभरते, उगवते लेखक, आजच्या जगाच्या नवीन क्षितिजांच्या नवीन गोष्टी’ असे ई-मेल मध्ये लिहिले होते. स्वानंदने ते वाचून आवंढा गिळला. ‘गोष्टी नवीन असू शकतात पण क्षितिजे नवीन कशी असतील?’ तो मनात पुटपुटला. संपादकांना डिसेंबर १५ पर्यंत गोष्ट हवी होती. म्हणजे अजून किमान दीड महिना होता काही तरी लिहायला, ‘आत्ता झोपायला हरकत नाही’ असे म्हणून स्वानंद झोपायला गेला. पण त्याची झोप अस्वस्थ होती. त्याचे मन त्याच्या भोवती रिंगण घालू लागले- तो विचार करू लागला कि त्याला नवीन गोष्टी का लिहिता येत नाही. कल्पना तर आहेत बऱ्याच. त्याला अचानक खूप पूर्वी कुठेतरी ऐकलेली कुठलीतरी लोक-कथा आठवली. या लोककथेवरच आधारित गोष्ट लिहायला हरकत नाही, असा त्याने विचार केला. अर्धवट झोपेतच त्याने गोष्ट रचायला सुरु केले.
सकाळी उठून त्याने चहा केला आणि कॉम्प्युटर वर रखडायला सुरु केले. भराभर दोन परिच्छेद लिहिले.
मसुदा
वाडा चिरेबंदी
गावात चिंतेचे वारे वहात होते. खरं तर नुकतीच कापणी झाली होती. पीक छान आले होते. शेतकऱ्याच्या खिशात पैसा खळखळणार होता. आणि शेतकरी आनंदी म्हणजे गाव आनंदी कारण पैसे शेतकऱ्याच्या खिशातून सगळीकडे वाहणार, गावाच्या प्रत्येक घरात रिचणार. राज्याच्या राजधानीतहि युवराजचा जन्म झाला होता. खूप वर्षांनी आणि खूप प्रयत्नांनी झालेले बाळ, आणि ते पण युवराज, राजा-राणी फार खुश होते. राजाने त्याच्या पुत्रप्राप्तीचा आनंद सगळ्यांपर्यंत म्हणून त्याने लोकांची कर्जे ५०% माफ केली होती आणि सगळ्यांचा कर पण ५०% माफ केला होता. मग काय विचारता, सगळे राज्यच शरदाच्या चांदण्यात न्हात होते.
पण पोळ्यात खूप मध जमला कि अस्वलं भिरकु लागतात. राजाला गुप्तहेरांकडून कळले होते दूरदेशातून आक्रमक, राज्याच्या दिशेने येण्याची तयारी करीत आहेत. राज्य जरी समृद्ध असले तरी लहान होते. आणि राजा जरी चांगला असला तरी चांगुलपणानी सैन्य उभे करता येत नाही किंवा चांगुलपणानी युद्ध लढत येत नाही. राजा चिंतेत पडला. पुत्र जन्माच्या आनंदाला गालबोट लागले. राज्य प्रशासनात एकदम धांदल उडाली. धावपळ सुरु झाली. राज्य छोटे असले तरी शिस्तबद्ध होते. सगळ्या नगर-गावांमध्ये राजाचे दूत गेलेत. प्रत्येक गावातील पाटील-मामलेदाराला परिस्थितीची जाणीव करून द्यायला. आणि गावाच्या, शहराच्या स्वरक्षणाची तयारीला लागायला.”
—-
कल्पनेची घोडी पुन्हा अडली. गोष्टीची सुरुवात चांगली होती (त्याने काही महिन्यांपूर्वी भरपूर ‘ग.दि.मा’ वाचले होते) आणि गोष्टीचा शेवटहि साधारण त्याच्या डोक्यात पक्का होता. पण गोष्टीचे मुख्य पात्र कसे रंगवायचे ते त्याला कळेना. त्याने गोष्टीचे वातावरण गावाचे घेतले होते पण स्वानंद कधी स्वतः गावात राहिला नव्हता. त्याचाच काय त्याच्या वरच्या चार पिढ्यांचा गावाशी संबंध नव्हता. संपूर्णपणे शहरी जीवन. मग गावातील पात्रांची मूर्ती करायची कशी?
मसुदा
“गावाच्या पाटलाने गावसभा बोलावली. गावातील मामलेदार, वैद्य, वकील, मुख्य शिक्षक असली मातब्बर मंडळी हळू हळू जमायला लागलीत. यातील एकालाही युद्ध, गावाचे संरक्षण इत्यादी गोष्टींचा गंध नव्हता पण एकदा मातब्बर मंडळीत नाव दाखल झालं कि सगळीकडे बोलावणं येणारच. सगळी माणसे वर्तुळात बसली. विचार करू लागली कि काय काय करायचे आणि कसे कसे करायचे. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता कि राजदूताने सांगितलेला घरभेदी आपल्या गावातला तर नाही ना? तेवढ्यात नामा तोतड्या पण आला. नामाला खरेतर कोणी बोलावलं नव्हतं. पण त्याला कोणी नाही पण म्हणू शकत नव्हते. एका काळात त्याचे घराणे मोठे होते. पण आता फक्त गळत्या भिंती राहिल्या होत्या. गावातील ग्रामदेवीचे देऊळ नामाच्या पूर्वजांनी बांधले होते आणि अजूनही तिथला मान नामाला वारसा हक्काने मिळत असे. या व्यतिरिक्त कुठल्याही तऱ्हेचा काम-धंदा नामाने कधी केला नव्हता. दिवसभर पाय वर करून बसायचे आणि उंटावरून शेळ्या हाकायचा हाच याचा छंद होता. त्याच्या हाती पुस्तक मात्र नेहमी असायचीत. काय वाचायचा कोण जाणे आणि का वाचायचा ते पण कोण जाणे. पण असल्या पाटलाने बोलावलेल्या बैठकीची माहिती तो ठेवत आणि तिथे नेहमी पोचत. आणि नामा, तोतड्या पण नव्हता मग त्याचे नाव असे का पडले, देवास ठाऊक.
किंवा नाम्यालाच माहिती.”
—-
इथून पुढे त्याला लिहिता येईना. त्या बैठकीचा चित्रण लिहिण्यात तो दोन पाने पुढे गेला पण गोष्ट मात्र फारशी हलली नाही. ती ‘बैठक’ ही गोष्ट नव्हती. अजून तर बऱ्याच घटना व्हायच्या होत्या. अजून बरीच पात्रे आणायची होती. त्याच्या कल्पनेतील गोष्ट त्याच्या डोक्या बाहेर जाऊ लागली. त्याच्या आधीच्या गोष्टींमध्ये एक किंवा दोन पात्रे होती. आणि घटनाही बहुतांश वेळा वर्तमानात होत. थोडक्यात त्याच्या गोष्टी वहीच्या पानांसारखी पुढे पुढे जात होत्या. त्यात वेगळी पत्रे, वेग-वेगळ्या काळात अवतरीत होतायत, आणि तरी गोष्ट सरळच विणल्या जाते आहे, हे त्याला लिहिणे जमेना! नामा गावातून गायब होणार होता. आणि मग त्याचे आणि आक्रमकांचा संबंध आणि संवाद, त्या वेळात गावातून नामा लढाईचे प्लान्स घेऊन पळून गेल्याचे कळते आणि एकच धांदल उडते, राजा पर्यंत ते प्रकरण जाते आणि आता शत्रूवर मात करणे कठीण आहे कारण इतक्या कमी वेळात प्रतिकाराची घडी पुन्हा बसवणे कठीण या विचाराने गावात आणि राज्यात हतबलता पसरते, इत्यादी अनेक घटनाक्रम समांतर चालू असतात. सांगतांना हि गोष्ट सोपी होती, पण लिहायची कशी?
त्याने गोष्टीची रूपरेखा विसरायला नको म्हणून थोडक्यात वहीत लिहिली. आणि ‘विषय’ तात्पुरता संपविला.
संध्याकाळी पुन्हा एक नवीन कल्पनेचा परिच्छेद लिहिला. आधी प्रयत्न केलेल्या गोष्टीशी या परिच्छेदाचा काहीच संबंध नव्हता. हि एक अनुभव वजा गोष्ट असणार होती. मागल्या वर्षी महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना शाळेचे जोडे देण्याचा कार्यक्रमाला तो गेला होता. शाळेतील वातावरण, लहान पोरे आणि त्या पोरांचे लुकलुकते डोळे त्याच्या मनात कुठेतरी घर करून होते. वातावरण निर्मितीची सुरवात स्वानंद ने या परिच्छेदाने केली.
मसुदा
“पाऊस थयथयाट करीत पडत होता. शाळेतला गोंगाटही पावसाच्या आवाजात दबला होता. तस आज फक्त दोनच वर्ग भरले होते आणि त्यात जेमतेम तीस-चाळीस विद्यार्थी असतील पण त्या पोरट्यांचा आवाज भक्कम होता. काही मुले वर्हांड्यात पाऊस बघत बसली होती. काही शिवा-शिवी खेळत होती. काही अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत होती. त्या अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच खर कौतुक करायला हव. पूर्ण शाळेत शिक्षक दोनच आणि त्यातल्या शिक्षिका बाई सध्या बाळंतपणासाठी सुट्टीवर. म्हणुन एक दिवसा आड वर्ग भरीत असत. एका दिवशी तिसरी आणि चौथीचा एक-एक वर्ग आणि दुसर्या दिवशी पहिली आणि दुसरीचा एक-एक वर्ग. सगळ्यांना एकच मास्तर. गावातली शाळा त्यामुळे ना सरकारचे लक्ष, ना पालकांचे. थोडक्यात आनंदी आनंद होता. आज मास्तरांना जवळच्या शहरात जायचे होते. त्यामुळे सकाळी शाळा भरवुन, गणित सोडवायला देउन मास्तर शहरी रवाना झाले होते. जी मुले अभ्यास करीत होती ती बहुधा गणितच सोडवत बसली असणार.”`
—-
पण या अनुभावामागे कुठली विशिष्ट गोष्ट त्याच्या डोक्यात नव्हती. गावातल्या शिक्षकांची तारांबळ आणि तिथले विद्यार्थी जीवन असे काहीसे त्याला दर्शवायचे होते. थोडे ‘बनगरवाडी’ सारखे काहीतरी. थोडे विनोदी, थोडे भीषण. पण हि सगळी त्याच्या डोक्यातली वाफ होती. त्याच्या या कल्पनेला ना कड नव्हती ना धार होती. त्याने त्या परिच्छेदाचा नाद सोडून दिली.
स्वानंद ला लहान पणापासून पाऊस खिडकीतून बघायला आवडत असे. मागल्या आठवड्यात ऑफिस मधे बसून तो बाहेरचा पाऊस बघत होता. त्याने ते चित्र रंगवायला घेतले
मसुदा
“रवी ने मोठ्ठा उसासा सोडला आणि खुर्ची वळवून तो ऑफिस च्या भिंतीवजा काचेच्या खिडकीतून बाहेर बघू लागला. बाहेर मुसळधार पाऊस सुरु होता. वार सुटलेले वाटत नव्हते कारण पाऊस नळासारखा पडत होता. त्याने पुन्हा उसासा सोडला. त्याला पाऊस बघत बसायला खूप आवडायचे. लहानपणी तो खिडकीच्या गजातून बाहेर पाऊस बघत बसे. जोरात असेल पाऊस तर तुषार आत येत, त्याला खूप मजा वाटे. लहानपण नेहमीसाठी नसत, पण तेंव्हा त्याला वाटलं नाही कि कधी अशी स्थिती येईल कि तो AC त बसून, काचेआडून तो पाऊस बघेल. घरात रेनकोट घालून बाहेरचा पाऊस बघतोय अशी भावना त्याला आली. त्याने पुन्हा उसासा सोडला"
—-
आणि इथे स्वानंदाने हि मोठ्ठा उसासा सोडला. पाऊस मग त्यातून रवीची गोष्ट याची काही संधी होईना. उगाच काहीतरी टाईप केल्यासारखे ते शब्द पावसात ओल्या झालेल्या कागदासारखे केविलवाणे लोंबकळत होते.
‘अरे, या रवी चा प्रोब्लेम काय आहे लाईफ मधे?’ स्वानंद ने पुटपुटत लॅपटॉप बंद केला.
नुसते परिच्छेदावर परिच्छेद लिहिल्या जात होते. जुन्या काळात जेंव्हा शाई आणि कागद महाग असायचे तेंव्हा असे टाईमपास म्हणून लिहिता आले असते का? आता लॅपटॉप आहे म्हणून मजा आहे, स्वानंदच्या मनात विचार आला. स्वानंद ने ठरवले कि लिहायचे कसे याचा थोडा अभ्यास करायला हवा. त्याला लक्षात येत होते त्याचे लेखन आधीच्या वाचालेल्याचे प्रतिबिंब होते. नक्कल करायला हरकत नाही. पण तेवढ्या ऐपतीची नक्कल जमली नाही तर गढूळ पाण्यातल्या प्रतिबिंबा सारख ते वास मारत. पण स्वानंद कडे अभ्यास करायला वेळ नव्हता. दिवस भराभर जात होते. डिसेंबर मध्ये गोष्ट द्यायची होती.
काही वर्षांपूर्वी मुंबईच्या २६ नोव्हेंबरच्या मुसलमानी हिंसक हल्ल्याला धरून त्याने काही लिहिण्याचा प्रयत्न केला होता. पण गोष्ट त्या हल्ल्याबद्दल नव्हती. तो हल्ला त्याच्या कथानायकाच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेचा नाट्यमय शेवट होता. धूळ खात पडलेली एखादी जुनी वही झटकून उघडावी तसे त्याने या गोष्टीवरची धूळ झटकली. स्वानंदला वाटले कि या गोष्टीत ‘दम’ होता.
मसुदा
एक होता विदुषक
आरंभ
“खूप वर्षांनी मला शांत वाटत होते. मनात फारशी हालचाल नव्हती. आजूबाजूची गर्दी जणू स्तब्ध झाली होती. त्या दलदलीतल्या कीड्यांपैकी मी अजून एक. माझ्या किटाणू अस्तित्वाला मी अवास्तव महत्व देत होतो. जाळून गेलेल्या मृतवत कातडीवर उगाच फुंकर मारत होतो या जाणीवेने मन पहुडले होते. आपण म्हणतो जगायला गेंड्याची कातडी हवी. मी म्हणतो सापाची हवी. कातळ टाकले कि चकाचक नवीन वस्त्र नेसायचे.
मुंबईचा घाई गडबडीचा अजून एक दिवस संपला होता. संध्याकाळ झाली कि मुंबई वेगळेच रूप घेते. हि गोष्ट लिहिणे फार कठीण जाणार आहे. जे काही घडले आणि जितक्या झपाट्याने घडले , त्या बद्दल विचार करणे मला अशक्य होते आहे. गंमतीचा भाग म्हणजे जिथे गोष्ट सुरु झाली तिथेच संपली. ”
—
स्वानंद ला लक्षात आले शब्द जरी त्याचे असलेत तरी प्रतिकृतीच दुसऱ्याची असल्यामुळे त्यात त्याची गोष्ट ‘फिट’ होईना. त्याने कधी मुंबईला वास्तव्य केले नव्हते ना त्याच्या आयुष्यात असे काही घनघोर झाले होते कि त्याला किटाणू सारखे वाटावे. मागे त्याने खूप जी.ए. वाचले होते, त्यातल्या छटा त्याच्या या गोष्टीत दिसत होत्या. स्वानंदने लिहिलेले थोडे बुळबुळीत होते. शब्द जणू नुसते घसरत होते. उतारावर सोडलेल्या गोट्यांसारखे! शेवटला शब्द वाचे पर्यंत, हे का लिहिले आहे या विचार पेक्षा, याच्या आधी काय लिहिले आहे हे वाचकाला विसरायला होईल.
पण आता स्वानंद ला गोष्टींच्या दगडावर डोक आपटून आपटून कंटाळा यायला लागला होता. त्याने विचार केला कि एक काम करू, गोष्ट डोक्यात ‘सेट’ आहे. मग शेवट आधी लिहून ठेऊ. सुरुवात केलीच आहे, दोन्ही तीर पक्के केलेत कि मधला ‘पूल’ बांधायला सोपा जाईल.
आणि मधला ‘पूल’ डळमळीत असला तरी काही हरकत नाही, निदान सुरुवात आणि शेवट चांगला आहे असे लोक म्हणतील. आणि नाही आवडली गोष्ट आणि संपादकांनी गोष्ट छापली नाही तर बरेच आहे. डोक्याला ताप नको. स्वानंद आता पुरता फ्रस्ट्रेट झाला होता ‘हवे तेंव्हा, हवे ते लिहावे. वाचणाऱ्यांनी वाचावे, आणि ज्यांना नाही आवडले, त्यांना पण नमस्कार. उडत गेले सगळे. वाचक, संपादक आणि लेखक पण.’
खास करून लेखक पण !
डोक्याचा ताप वाढत होता पण तरी त्याने कल्पनेची ‘लोकल’ पुढे नेली.
शेवट “ सी एस टी वर नेहमीसारखी गर्दी होती. मुंग्यांचे वारूळ. मला फारशी घाई नव्हती. मी जागा मिळेल तसा पुढे जात होतो. तेवढ्यात खाट-खाट आवाज आला. इतक्या कोलाहलात तो आवाज घुमला. क्ष्णाभरासाठी सगळे स्टेशन पॉज झाले. कोणीतरी आरोळी ठोकली ‘बंदूक.....भागो!!’ खाट-खाट-खाट आवाज एकदम वेगाने येऊ लागला. सगळे अस्ताव्यस्त पळू लागले. आवाज कुठून येतो आहे कळेना. तेवढ्यात माझ्या बाजूचे दोन-तीन लोक धाडकन जमिनीवर कोसळले. रक्ताचे थारोळे क्षणात जमा झाले. मला हि कंबरेवर काहीतरी जोरात लागून गेले. धक्का लागल्यासारखा मी खाली पडलो. कंबरेला हात लावला तर तर थोडे रक्त येत होते. मला एकदम जाणवले कि गोळ्या मारत आहे कोणीतरी. मान वर करून बघितले तर मगाशी माझ्यावर खेकसणारा मुलगा हातात मोठ्ठी बंदुक घेऊन गोळ्या अंदाधुंद मारीत होता. कण्हण्याचेआवाज ऐकू येत होते. कोणी तरी ओरडले “उधार देखो, कोई जिंदा ही क्या?” मी लगेच मान खाली टाकली. न कळत आणि न ठरवता, मी मेल्याचे ढोंग करू लागलो. अजून एक मुलगा बंदूक घेऊन जवळ आला. बंदुकीच्या टोकाने तो जमिनीवर पडलेल्यांना टोचून बघू लागला कि कोणी जिवंत आहे का. माझ्या मनातील सगळे धुके नाहीसे झाले. तत्वज्ञान एका बाजूला पण जीव जाण्याची वेळ आली तर जीव सुटेना. एक एक करीत तो मुलगा जवळ येत होता. मी ठरवले कि मरायचेच असेल तर मारून मरू. बिना आवाज करता मरणार नाही. तो जवळ आला कि मी त्याची बंदूक घेण्याचे ठरवले.
“एक जिंदा है”
“काफिर है तो छोडना नही”
मी ते ऐकत होतो. जवळ येण्याची वाट बघत होतो. थोडे डोळे किलकिले करून बघण्याचा प्रयत्न करू लागलो तर समोर त्या मुलाचे खुनशी डोळे दिसले. मी काही करण्याच्या आतच फक्त ‘ख्याट’ आवाज आला आणि सगळी कडे अंधार पसरला.”
—-
स्वानंदला शेवट आवडला. पण मधली गोष्ट जमेना, पूल काही बनेना! पात्रे रंगेना, डोक्यातल्या कल्पनांचे आता कोळ्याचे जाळे झाले होते आणि स्वानंद त्यात फसला होता. गोष्टीचा आरंभ फारच प्रखर आणि टोचणारा झाला होता. आणि शेवट उत्कंठावर्धक. या मध्ये वैफल्यग्रस्त नायक अचानक होतकरू का होतो हे त्याला दाखवणे आवश्यक होते. त्यासाठी काही घटना नायकाच्या आयुष्यात झालेल्या हव्यात. पण नेमक्या कुठल्या घटना?
या सगळ्या भानगडीत महिना दीड-महिना गेला आणि संपादकांचा ई-मेल आला. ‘गोष्ट तयार आहे ना? तुमच्या मागच्या गोष्टी ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे, तुमच्या पुढल्या गोष्टीची उत्सुकता वाचकांमधे आहे’
ई-मेल मध्ये संपादकांनी एक लिंक दिली होती. ज्यात नव-वर्षाच्या अंकात गोष्टी लिहिणाऱ्या लेखकांची नावे संपादकांनी आधीच प्रकाशित केली होती. आणि अर्थातच, त्यात स्वानंदचे नाव होते.
आता स्वानंदने दोनदा आवंढा गिळला. नको त्या भानगडीत पडल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने झाली. लेखन करणे सोपे नाही. लेखक बनणे सोपे नाही. शब्दांची जमलेली थोडीबहुत चंची घेऊन तो उड्डाण करू बघत होता. लहान पोर लाकडाच्या घोड्यावर जरी पुढे मागे करून खुश होत असले तरी ते पोर पुढे जात नसते. पण आता वेळ अगदीच हातघाईची झाली होती. काही तरी लिहिणे आवश्यक होते. कोण्या मोठ्या लेखकाची लघु कथा मराठीत लिहून पाठवायची का असा दुष्ट विचार त्याच्या मनात आला पण त्याने लगेच अंगावर पडलेली पाल झटकावी तसा तो विचार झटकला - कोरे पान देईन पण असे करणार नाही.
कोरे पान देण्याचा विचार करून स्वानंद मनातल्या मनात हसला. त्याने वही उघडली आणि एका कोऱ्या पानाच्या शेवटी एक ओळ लिहिली - “माझी गोष्ट म्हणजे तुमची गोष्ट. हे कोर पान घ्या आणि तुम्हीच तुमच्या कल्पनेचे घोडी हाका!”
‘माझी गोष्ट म्हणजे तुमची गोष्ट’ हे वाचून स्वानंद विचार करू लागला. ‘माझी गोष्टच माझी गोष्ट का नाही?’ त्याने पुन्हा वही उघडली आणि कोऱ्या पानाकडे बघू लागला. कोकणाच्या चिकट उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक यावी तसा तो हळूवारला. ‘वाह ....काय आयडिया आहे?’ त्याने विचार केला. लगेच लॅपटॉप उघडला. वर व्यवस्थित ‘श्री’ लिहिले. मनातल्या मनात त्याने रवी ला हाक मारली. ‘ये रे, दादा, तुला माझेच किरदार निभवायचे आहे.’
गोष्ट
“रवीने लिहिलेली एक गोष्ट नुकतीच एका मराठी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. त्याने नुकतेच काही तरी रखडायला सुरु केले होते. त्यामुळे कोणीतरी आपले लिहिलेले प्रकाशित करेल हे रवीला अनपेक्षित होते. तो विचार करू लागला कि दिवाळी अंकाला पुरेसे साहित्य मिळाले नसेल म्हणून तर आपली गोष्ट प्रकाशित केली, असे नाही ना? त्याने त्याच्या गोष्टीची गुणवत्ता चाचणी करायला त्याच्या हाय-स्कूल च्या मराठीच्या बाईंना गोष्ट पाठवली. रवीच्या मते त्याला जे काही मराठी येत होते शाळेच्या बाईंची कृपा होती. बाईंनी अभिप्राय दिला - ‘एकदा वाचण्या योग्य नक्कीच आहे. मुख्य म्हणजे रटाळ नाही’ बाईंना रटाळ वाटली नाही म्हणजे पावले. रवी आता खरच खुश झाला. त्याने ठरवले कि आता अधिक नियमित लिहायचे. पण लगेच असे लिहिणे त्याला जमेना.
दोन आठवड्यांनी त्याला दिवाळी अंकाच्या संपादकांचा ई-मेल आला. ‘आमचा नवीन वर्षाचा एक अंक काढण्याचा मनसुबा आहे. तुम्ही नवीन गोष्ट नक्की द्या’.
‘हो, नक्कीच’ रवीने फारसा विचार न करता आपण नवीन गोष्ट लिहणार हा मनसुबा जाहीर केला. पण त्याला हळू हळू लक्षात आले कि त्याला काही सुचत नाही. ....”
—-
स्वानंदाने फटाफट गोष्ट पूर्ण केली. गेले दीड-दोन महिन्यात अर्धवट सोडलेले सगळे मसुदे अर्धवट गोष्टींची उदाहरणे म्हणून या गोष्टींच्या गोष्टीत घातलीत. गोष्ट थोडी लांब झाली होती पण छान रंगली होती असे त्याला वाटले. संपादकांना गोष्ट ई-मेल पण केली..
ई-मेल मध्ये त्याने संधी दिल्याबद्दल संपादकांचे आभार मानले आणि शेवटी लिहिले - ‘या वर्षी कामात फार व्यस्त असेन. त्यामुळे लेखन नीटसे होणार नाही. पुढल्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी काही लिहिता येण्याची शक्यता कमी आहे. ”
तेंव्हाच अजून एका नवीन गोष्टीची कल्पना त्याच्या डोक्यात घर करू लागली. मोठ्ठा श्वास सोडून त्याने कॉम्प्युटर बंद केला.
(समाप्त)