9/22/10

घराच्या सान्निध्यात

अमेरिकेच्या उत्तर-पूर्वेला मेन (Maine) नावाचे राज्य आहे. उन्हाळ्यात हा प्रदेश फार सुंदर होतो. सगळीकडे हिरवीकंच चादर पसरली असते आणि त्यातुन रस्ते असे जातात की वाटत झाडांसोबत रस्ते ही जमिनीतुन उगवले आहेत. मागल्या आठवड्यात माझा कॉलेजचा मित्र भेटायला आला होता. इथे उन्हाळा संपत आलाय त्यामुळे शेवटले काही दिवस मुठीतून सुटायच्या आधी म्हणुन आम्ही दोघांनी ठरवल की मेन ला चक्कर मारायची. माझ्या एका मैत्रिणिच लेक-हाउस मेनच्या उत्तरेस आहे. नशिबानी ती तेंव्हा तिथेच होती त्यामुळे आम्ही तिच्याकडेच जायच ठरवल. इथे, अमेरिकेत, उच्चाभ्रु लोकांची उन्हाळ्यासाठी खास अशी वेगळी घर असतात. त्या घरांना समर हाउसेस म्हणतात. बहुधा करुन ही घर समुद्र पट्टीवर असतात किंवा, माझ्या मैत्रिणीच, लॉरा च जस होत तस एखाद्या तलावाच्या काठावरही असतात. उन्हाळ्यात मुला-बाळां सोबत ही कुटुंबे एखाद-दोन आठवडे या घरात घालवितात.

लॉराच घर मेनच्या उत्तरेला चायना लेक नावाच्या तलावाच्या काठावर होत. या तलावाल चायना लेक का म्हणतात हे नका विचारु कारण तिथल्याही कोणाला या नावाच्या उगमा बद्दल माहिती नव्हत. घराची बांधणी संपूर्णपणे लाकडाची होती. घराच्या आजुबाजुल अंगण आणि समोर थोड उतरून तलाव. होड्या लावायला आणि पाण्यात उड्या मारायला तलावात २० फुटाच लाकडाचा धक्का बांधलेला होत. लॉरा घरची फारशी श्रीमंत नाहीया. हे घर तिच्या पणजोबांनी सन १९०० ला बांधलेल आहे. तिचे पणजोबा फोर्ड मोटारींना कार्बोरेटर पुरवित असत. अर्थातच, पणजोबांनी बराच पैसा कमविला असणार. कार उद्योगाने जगभरात क्रांती घडवली आणि त्या क्षेत्रात फोर्ड उद्योग समुदाय अग्रगण्य मानल्या जातो. झपाट्याने प्रगती होत असलेल्या उद्योगात तिचे पणजोबा आघाडीवर असणार आणि ते बरेचदा हेन्री फोर्डला भेटले असणार. शंभर वर्षांपूर्वी जग केवढ वेगळ होत. शंभर वर्ष जुन्या बर्‍याच वास्तु अजुन उपयोगात आहेत पण एकाच कुटुंबात असलेल्या आणि अजुनही रहात्या घरात रहाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. आजही अमेरिकेच्या या भागात लोकसंख्या इतकी कमी आहे कि सगळ्या रस्त्यांवर दिवे लावले नाहीयात. त्यामुळे सूर्य मावळला कि सगळीकडे गुडुप अंधार होतो. रात्री आठ ला बहुतांश व्यापार बंद होतो. दळण-वळणाची साधने आणि घरात वीज हे बदल वगळता, घर बांधल्याच्या काळापासुन या भागात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

पण शंभर वर्षात बाहेरच्या दुनियेचा चेहरा मोहरा न ओळखता येण्या जोगा बदलला आहे. शंभर वर्षांपूर्वी न्यू-यॉर्क शहरात वेग प्रतिबंध ८ मैल प्रति तास होता. पहिल महायुध्द व्हायच होत. तुर्की साम्राज्य शाबुत होत. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व लोकमान्य टिळकच करत होते. गांधीजी दक्षिण अफ्रिकेतच होते. जग अजुनही प्रामुख्याने घोड्यांवरुनच फिरत होत. या सगळ्या घटनांचा एकामेकांशी फारसा संबंध नाही. माझ्या आजोबांचा जन्म ही १९०५ चा आहे आणि त्यांच्या संदर्भातही या घटनांचा उल्लेख केल्या जाउ शकतो पण माझ्या आजोबांचा किंवा माझ्या ओळखीतल्या कुठल्याही आजोबांचा हेन्री फोर्ड सारख्या तत्सम काळ बदलविणार्‍या व्यक्तीशी नव्हता. काही बिघडल अस नाही पण त्या घरात रहातांना उगाच गंमत वाटत होती.

फोर्ड कंपनीला कार्बोरेटर पुरविणार्‍या कुटुंबाची प्रगती पुढे मोठ्या उद्योग समुदायात होणे सहाजिक होते पण तस काही झाल नाही. लॉराच्या आजोबांनी जमिनीचा धंदा केला पण पणजोबांनी बांधलेल घर मात्र पुढल्या पिढ्यांनी जतन करुन ठेवल. त्या घरात वर्षानुवर्ष ही लोक एकत्र येतात. लॉराच मूळ गाव या घरा पासुन २४ तासाच्या अंतरावर आहे तरीही ती आणि तिच कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात एक आठवडा या घरात घालवित असत. घर मोठ असल तरी बांधणी साधी आहे. कारण तिथे थंडी इतकी भयंकर असते की थंडीत त्या घरात रहाणे अशक्य आहे. पण घरात जुजबी सगळ्या गोष्टी आहेत. तलावात होडी (कनु) आहेत आणि काठापासुन काही अंतरावर दहा फुट उंचीची लाकडाची बुर्जणासारख मुलांना पाण्यात उड्या मारायला बांधलेल आहे. इतकाल्या उन्हाळ्यांमधे येणार्‍या जाणार्‍यांची छायाचित्र सगळीकडे लाउन ठेवली आहेत. त्यात लॉराच्या पणजी आणि पणजोबांच छायाचित्र आहे. त्यांच्या साखरपुड्यापासुन ते लग्नापर्यंतच्या ९० दिवसात पणजोबांनी पणजीला ९० पत्र लिहिलीत. लॉरानी ती पत्र अजुनही जपुन ठेवली आहेत. इतक्या वर्षात येणार्‍या-जाणार्‍यांनी, हसण्यांनी, गप्पांनी आणि जेवणांनी त्या घराला आलेल्या विशिष्ट व्यक्तीमत्वाची जाणीव होते. आणि त्या व्यक्तीमत्त्वाने पणजोबां पासुनची चौथी पिढीचे त्या घराशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ती वास्तु दगड-विटांची, लाकडाची न रहाता जिवंत होते. आणि त्या वास्तुचे ठसे रहाणार्‍यांवर नेहमी साठी उमटतात.

त्या घराचा परिणाम म्हणा कि खुप दिवसांनी फुरसत मिळाली म्हणा पण घरा बद्दल माझ्या डोक्यात बरेच विचार एका-मेकांशी गप्पा मारतायत. आमच सध्याच घरही शंभर वर्ष जुन असेल. पण माझ्या आजोबांनी ते सन १९७२ ला विकत घेतल. या वर्षी ते घर आम्ही विकतोय. बरीच कारण आहेत. आम्हा सगळ्यांना वाईट वाटतय. काही लोक म्हणतात कि आठवणी महत्त्वाच्या. ते मला मान्य आहे. पण ते झाल घरातल्या आठवणींच, घराच्या आठवणींच काय?


माझ्या आजीच्या अस्थि विसर्जनाला आम्ही जबलपूरला, नर्मदेच्या काठी, गेलो होतो. माझी आई आणि तिची भावंड सगळी जबलपूरला वाढली. ती तिच्या लहानपणीच्या खुप गोष्टी सांगते. त्यांच जुन घर अजुनही उभ आहे. त्यात आता दुसर कुटुंब नांदतय. आईला अजुनही आठवणी काढायच्या तर घर आहे. मला तस चालल असत.

आमच्या घराची बांधणी जुन्या पध्दतीची आहे. माझ्या लघुकथांपैकी "घर" कथेत मी माझ्या घराच वर्णन केलय. ती कथा म्हणजे मला पडलेल खर स्वप्न होत. (आता मला असली स्वप्न का पडतात देवच जाणे) पण त्या स्वप्नातील विचित्रपण व्यतिरिक्त मला घामेघुम करणार दृश्य म्हणजे आमच्या घराची झालेली तोडफोड होती. घराची ती दूर्दशा मला स्वप्त्नातही सहन झाली नाही. उद्या ते घर खर्‍यात अस अवशेष होत नाहीस होणार या कल्पनेनी शहारे येतात.

लॉराच्या कुटुंबानी घराच्या हिस्स्यांवरुन भांडण व्हायच्या आधीच घराच्या नावाचा ट्र्स्ट स्थापन केला आणि ते घर जतन केल. आम्हाला तसल काही करण शक्य नाही. त्यातुन नविन फ्लॅट इतकाले महाग झाले आहेत की जुन घर विकल्या शिवाय गत्यंतर नाही. आणि तसही मी आणि दादा परत कधी घरी येणार सांगण कठीण आहे. दादा त्याच्या सुखी संसारात रुळला आहे आणि मी गृहस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दृष्टीने विचार केला तर त्या घरात आम्हा सगळ्यांची भरभराट झाली. त्या घरानी आमची भरभराट केली. पंख पसरवुन बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही बाहेर पडलो, जग हिंडलो पण संध्याकाळी घरी परतायची आस अजुनही जात नाही.