12/27/23

'दिठी' - एक प्रवास

"मरतांना पण आम्ही विठ्ठल, विठ्ठल करतच मरणार, पण माझ्या लेकाला हे पण बोलायचं अवसर मिळाला नाहीं" 

तरुण पोराचा अचानक झालेल्या मृत्यूने कावलेल्या, जीव कासावीस झालेल्या, दुःखाने जर्जर बापाचे हे बोल हृदय कातरत जातात. दुःख माणसाला अनेक असतात पण आपल्या अपत्याचा अंतिम संस्कार करणे हि दुःखाची परिसीमा मानल्या जाते. 'दिठी' सिनेमात या त्रासाची भीषणता बोचते. पण हा चित्रपट एकांगी  नाहीं. केवळ पुत्रवियोगाच्या घटनेचे चित्रण नाहीं. हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासाचा एकच रस्ता पण नाहीं. विठ्ठल भक्तीचा, त्याच्यावरच्या भाबड्या प्रेमाचा, त्याच्यावरच्या रागाचा, रागापोटी विठ्ठलास  विचारलेल्या प्रश्नांचा, अद्वैत सिद्धांताचा, जीवनाविषयीच्या तत्वज्ञानाचा, अश्या अनेक मार्गांनी प्रवास करीत रामजी शेवटी पुन्हा विठ्ठल चरणी लीन होतो. त्या प्रवासात त्याचे सखे सोयरे त्याची साथ सोडीत नाहीं. त्याला उगाच शिकवायला, सांत्वना करायला जात नाहीत. गावातली साधी माणसं हि, या दुःखी बापाला सांगायला यांच्याकडे कुठले तत्वज्ञान नाहीं, ना त्यांच्या कडे मोठे शब्द भांडार आहे. पोथी सुरु केली आहे तर ती संपवायला हवी आणि ज्यांनी सोबत सुरु केली तीच लोक  संपवायलासुद्धा हवीत या ठाम विश्वासाने हि सगळी लोक तटस्थपणे रामजीची वाट बघत बसतात. त्याच्या प्रवासाचे सहप्रवासी बनतात. कारण साथ देणे सोडून अजून काहीच करणे शक्य नाहीं. विठ्ठल भक्तीत लीन झालेली हि लोक रामजी जेंव्हा विठ्ठलाला प्रश्न विचारतो, त्याच्यावर प्रक्षोभित होतो तेंव्हा चिडत नाहींत. रामजीला थांबवीत नाहीत, टोकत नाहीत. निव्वळ प्रेमापोटी नाहीं पण हि लोक खऱ्या अर्थाने भक्तियोगी झालेली आहेत. 

त्या दरम्यान गावातली पारुबाई आणि गोविंदाच्या गर्भवती गायीचा - सगुणेचा, गर्भ अडकलेला असतो. रामजी हा स्वतः लोहार पण गायीची बाळंतपणे करणे हे कौशल्य पण त्याच्याकडे असते. रामजीवर दुःखाचा पहाड कोसळलेला आणि इथे गाय अडकलेली, गायीचा त्रास गायीच्या गरीब 'आई-बापाला' सहन होत नसतो पण रामजी ला कसे बोलवायचे? ते आपले वाट बघत बसतात, एकतर रामजी येण्याची किंव्हा वासरू होण्याची. 

जगातील जे मुख्य धर्म आहेत त्यात कोणी एक व्यक्ती तारणहार किंव्हा प्रेषक असतो आणि तो सगळ्यांना मुक्ती देतो. आणि त्याच्यावर श्रद्धा न ठेवणे पाप मानल्या जाते. पण आपल्या सनातन तत्वज्ञान याच्या विरुद्ध आहे कारण आपल्या धर्मात मोक्ष किंव्हा मुक्ती आपल्याच हाती असते. हा एकाकी प्रवास आहे. त्यात गुरु मिळाला, त्याने मार्ग दाखविला तर अहोभाग्य पण नाहीं तर आपण अंधारात चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. पण जरी हा प्रवास एकाकी असला तरी मदत सगळीकडे मिळते. आदी शंकराचार्यांच्या ज्ञान योगाच्या मशाली मार्ग दाखवितात. या मशालींच्या दाह जर का सहन होत नसेल तर संत ज्ञानेश्वरांच्या भक्तियोगाच्या आल्हाददायक पणत्या मार्ग दाखवितात. पण या मार्गावर आपणच आपले चालायचे असते. कोणी पाठीवर घेऊन जाणार नाहीं, कोणी काठी बनणार नाहीं, पालखी नाहीं कि घोडे नाहीं. रामजी हा प्रवास जन्मभर करीत होता पण नशिबाने असा काही फटका दिला कि त्याचा भक्तीचा मार्ग डळमळला. मार्गावरच्या पणत्या त्याला दिसेनाश्या झाल्यात. आणि रामजी स्वतःला हरवून बसला. विठ्ठलावरच्या संतापाने त्याला इतके व्यापले कि घरातल्या विधवा सुनेला तो बाहेर काढायला निघतो. दुःखाच्या भ्रमात रामजी जणू चुकांच्या गर्तात फसत जातो. अद्वैत कळणे कठीण पण त्याहून अधिक कठीण म्हणे अद्वैत जगणे होय. 'शीतोष्ण सुखदुःखेषु, समसंग विवर्जित' असे श्रीकृष्ण गीतेत म्हणतो. पण प्रत्यक्षात हे कसे उतरवायचे? शीत, उष्ण, सुख आणि दुःख याला शांत चित्ताने सारखेच सामोरं जायचे. पण तरुण मुलाचा मृत्यू हे काय साधे दुःख आहे पचवायला?

आपल्या धर्मातील मोक्षमार्ग कठीण असला तरी त्या मार्गी लागल्यावर हरविणे पण कठीण आहे. जागोजागी मदत मिळते आणि रामजीच्या रक्षणास जणू ज्ञानेश्वर माऊलीच धावून येतात.   

आता आमोद सुनासि आले। श्रुतिशी श्रवण निघाले।

आरसे उठले। लोचनेशी॥

आपलेनी समीरपणे।वेल्हावती विंजणे।

किं माथेंचि चाफेपणें। बहकताती॥

अमृतानुभव या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथातील हा अभंग. जसा आरशातील प्रतिबिंब आणि प्रतिबिंबित हा एकच तसेच दुःख आणि दुःख भोगणारा एकच, ऐकणारा आणि ऐकलेले एकच हा स्वानुभवे उमजले कि अद्वैताचे कोड सुटले. रामजी आलेल्या दुःखास स्वतःपासून वेगळे बघत होता. तीस वर्षे वारी करून हे नशिबी आले याचा त्याला राग येत असतो आणि या अवास्तव भ्रमात रामजीचा जीव कासावीस होत होता. या दरम्यान सगुणा गायीचा जीव धोक्यात आलेला असतो. रामजी शेवटी तिथे धावत जातो. गायीचा वासरू गर्भात वाकडं झालेलं असतं त्यामुळे वासरू न बाहेर येऊ शकत आणि आत राहण्याची मुभा संपलेली असते. अनुभवाची शर्त करून मोठ्या कष्टाने रामजी वासराला बाहेर काढतो. गाईचा पण जीव वाचतो, पारुबाई आणि गोविंदाला हुश्श होते आणि रामजीला एकदम या मायेच्या खेळाची उत्पत्ती होते. एकीकडे मृत्यूची पीडा तर दुसरीकडे जन्म आणि जीव वाचविण्याचा आनंद. आपले अस्तित्वच मुळी बुडबुड्याचे. पण त्यापायी आपण केवढी उठाठेव करतो. सुखी होतो आणि दुखी होतो. दुखी झालो कि दोष देतो आणि सुखी झालो तर स्वतःचे कौतुक करतो. पण सत्यात यातले काहीच टिकणारे नाहीं मग का म्हणून एवढे जिव्हारी लावून घ्यावे? रामजीला हि दृष्टी (दिठी) अनुभवांती येते. डोळ्यातून अश्रूंची धार लागते आणि हृदयातील पाषाणाव्रत घट्ट होत चाललेलं दुःख मोकळं होत आणि रामजीची सुटका होते. हे तत्वज्ञान कळायला सोपे नाहीच पण वळायला तर महत कठीण आहे. पण हा प्रवास महत्वाचा आणि तो एकट्यानेच करणे प्रत्येकाच्या भाळी असते.  

लेख लिहायला घेतला तर चित्रपटाचे परीक्षण हा हेतू होता पण लिहिण्याच्या भरात चित्रपटात मांडलेल्या तत्वज्ञावरच लिहिल्या गेलं. मूळ विषयच असा आहे कि विचार करायला भाग पाडतो. या लेखाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभाची थोडी ओळख झाली आणि त्यान्वये थोडे वाचन झाले. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग कळायला अजून बरीच वर्षे असावीत तरी ते वाचणे हा स्वतःच एक 'अमृतानुभव' आहे. याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. अमृताची चव घ्यायला हवी, सांगून कसे कळणार? असो. 

या चित्रपटाची मूळ कथा - 'आता आमोद सुनासि झाले' दि.बा. मोकाशींची आहे. आणि त्याचे चित्रपटात रूपांतर आणि दिगर्दशन सुमित्रा भावे यांचे आहे. भावे बाईंची हि अंतिम  निर्मिती होती. चित्रपटातील कलाकार म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक से एक म्हणावे लागतील. दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, अमृता सुभाष, उत्तर बावकर यांनी आपल्या छोट्या छोट्या भूमिका फार प्रभावीपणे वठवल्या आहेत. रामजी लोहार, आपल्या चित्रपटाचा मध्यबिंदू,  भूमिकेत श्री किशोर कदम यांनी अभिनयाचा एक नवीन उच्चांक  गाठला आहे. त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे तितके कमी. 

चित्रपटाचे दिग्दर्शन, सादरीकरण, प्रस्तुती, लायटिंग आणि कॅमेरा अँगल अप्रतिम आहे. प्रेक्षका पर्यंत दुःख पोचविणे सोपे नाहीं. आणि चित्रपटाच्या कथानका सोबत  संत ज्ञानेश्वरांनी मांडीलेले अद्वैत तत्वज्ञान हा विषय चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोचविणे हि महत कठीण कार्य आहे पण सुमित्रा भावे यांनी फुलांचा सुरेख हार बनवावा तसा चित्रपट गुंफला आहे. आपल्या मराठी चित्रपट जगात असे सिनेमे अजूनही निर्मित होतात हे आपले अहोभाग्यच. 

---

हा लेख वाचल्याबद्दल आभारी आहे. या विषयावर आणि चित्रपटावर खालील लेख अवश्य वाचावेत हि विनंती. 

१) दिठी - चिनुक्स : https://www.maayboli.com/node/78907

२)  आतां आमोद सुनांस जाले - आनंद मोरे :  https://aisiakshare.com/node/५४०४

३) आतां आमोद सुनांस जाले - नंदन : http://marathisahitya.blogspot.in/2006/06/blog-post_28.html