12/13/08

घर

मी आणि बाबा अमरावतीहुन येत होतो. अमरावतीला माझी आत्या रहात असे. बाबांची सगळ्यात मोठी बहिण. अमरावतीचा रस्ता फारच दळिद्री होता. बर्‍याच वर्षात रस्त्याची डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे साधारण चार तासाच्या प्रवासाला सहा तास आरामात लागत असत. आम्ही सकाळची बस पकडली होती. पण सकाळची बस पकडली की माझ पोट नेहमी खराब होत असे. माझ पोट बस सुरु झाल्यापासुन ढवळायला लागल. पेट्रोल चा तो जळका वास आणि रस्त्यातील खड्डे म्हणजे मला कधी घरी पोचू अस झाल होत. प्रत्येक खड्डा जणु आमची प्रेमाने विचारपूस करत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझा डावा डोळा फडफडत होता.. अस कधी होत नसे. मी आपला परत खड्डे मोजु लागलो. शेवटी रडत-खडत आमची बस शहरात पोचली. अंगावर थोड सामान होत म्हणुन आम्ही रिक्षा केली. माझी सारखी चुळबुळ चालू होती. कधी घरी पोचीन अस झाल होत. आम्ही गल्लीत आलो तर गल्लीत सामसूम होती. आमच्या घराच फाटक सताड उघड होत. आमच्या घराच्या बाहेरच्या अंगणात सीताफळाच झाड होत. पोर कधी कधी फळांमागे सरळ फाटक उघडुन आत येत असत. तसलीच काही तरी भानगड असावी. मी उतरुन दारापाशी गेलो, बाबा रिक्षेवाल्याला पैसे देत होते. मी दाराजवळ पोचलोच तोच माझा हृदयाचा ठोका चुकला. दाराला कुलुप नव्हत आणि घराचे दार किलकिल उघड होत. मी हळुच सामान खाली ठेवल. बाबा माझ्या मागे येऊन उभे होते. माझ पोटं ढवळण स्विच बंद कराव तस थांबल होत. मी दार ढकलायला हात पुढे नेला तेवढ्यात घरातुन वीट पडण्याचा आवाज आला. माझा हात दारापर्यंत गेलाच नाही. काही क्षण असेच गेलेत. मी वळुन बाबांकडे बघितल. बाबा बारकाईने घराच्या खिडक्यांच निरिक्षण करत होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरल होत. खिडक्या सगळ्या घट्ट बंद होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितल. आम्हा दोघांच्या लक्षात आल कि घरातून कोणी तरी आमची चाहूल घेतय. बाबा माझ्या जवळ येऊन कानात कुजबुजले. " चिन्मय, एक काम कर. मागच्या गल्लीत जा आणि तिथुन भिंतीवरून चढुन गच्चीत ये. मी तो पर्यंत शेजारच्या आणि आपल्या घरामधल्या भिंतिवरुन चढुन पुढल्या बाजुनी गच्चीत येतो. आजुबाजुला इतकी शांतता होती की त्यांच कुजबुजण गल्लीच्या टोकाशी ऐकु गेल असेल. मी हळु-हळू एक पाऊल मागे टाकत अंगणाबाहेर आलो आणि मागच्या गल्लीकडे मी धूम ठोकली. बाबा तो पर्यंत समोरून भिंतीवरून चढण्याचा प्रयत्न करत होते.

आमचं घर फारस मोठ नाही. प्रशस्त होत पण मोठ नव्हत. शेजारच्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी मिळुन ते घर घेतल होत. शेजारच्या आजोबांचा वाटा मोठा होता. आमच्या घरात मध्यभागी अंगण होत आणि तिन्ही बाजुंनी घराच्या खोल्या अंगणात उघडत असत. चौथ्या बाजुला न्हाणीघर होत. डाव्या अंगानी गच्चीवर जायला जिना होता. वरच्या मजल्यावर अजुन दोन खोल्या आणि गच्ची होती. घराच्या मागल्या बाजुला एक लहानशी बोळ होती. तीत बरीच झाडी आणि गवत वाढल होत. माझा बेत त्या गल्लीतून घराच्या मागल्या बाजूनी वर चढण्याचा होता. एक मजलीच घर होत त्यामूळे चढता येण शक्य झाल असत. मी मागल्या बोळात उभ राहून नेमक कुठुन आणि कस चढायच याचा विचार करत होतो. काहीतरी धाडसी कृत्य करणार या विचारानी माझ्या अंगावर रोमांच आला होता. चढायच्या आधी मी भिंतीला कान लाऊन आडोसा घेतला तर घरातून अगम्य असा थड-थड असा आवाज येत होता. मी पाईपला धरून वर चढु लागलो तर तो आवाज वाढत गेला. मी गच्चीवर पोचलो तर घरभर विचित्र वातावरण होत. थड-थड आवाज तर येतच होता आणि कसला तरी जळण्याचा वास येत होता. सगळी कडे जळमट लागली होती. भिंतींवरून काहीतरी ठिकठिकाणी लोंबकळत होत. मी निरखुन बघितल तर कोणीतरी पोपडे खरचचवून काढले होते.आम्हाला जाऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यात घराची एवढी अवदशा ? वरच्या दोन खोल्याच्या दारांवर व खिडक्यांवर गडद पोपटी रंगाचे फुलाफुलांचे पडदे घट्ट लावले होते. त्यामागे गाद्या असाव्यात. बहुतेक आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन असाव. म्हणजे फक्त खालच्या घरात नव्हे तर वरच्या खोल्यांमधेही कोणीतरी आहे या विचारानी मी सावध झालो. पण घरात अस कोंडून घेऊन ही लोक नेमक काय करतायत ते कळत नव्हत. बाबा समोरून चढून येणार होते ते अजुन पोचलेच नव्हते. खरतर घराच्या समोरच्या बाजुनी चढण सोप होत. त्यांना समोरून धरल तर नाही या विचारानी मला घाम फुटला. तसेही ते गच्चीत भेटणार होते की मधल्या चौकात ते त्यांनी सांगितलच नव्हत. वाट तरी किती बघायची? गंमत-जंमत थोडीच चालली होती.

मी मांजरीच्या पावलांनी जिना उतरत मधल्या चौकात आलो. थड-थड आवाज घड्याळाच्या काट्याप्रमाणे येत होता. मधल्या चौकातला पाळणा काढून ठेवला होता. कुंडीतली झाड जळून गेली होती. रॉकेल टाकुन जाळली होती. बहुधा तोच वास असावा. रॉकेल टाकुन झाड जाळावी या कल्पनेनी माझ्या अंगावर काटा आला. च्यायला चालल काय आहे? मला घरातून पावलांची आवाज ऐकु येऊ लागले. सिमेंटच्या पोपड्यावर कसलीतरी खरखरीत पाऊल पडत होती. न्हाणीघराच्या दरवाज्यांना मोठ्ठ कुलुप लावल होत. स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा बाहेरच्या दरवाज्यासारखा किलकिला उघडा होता. संरक्षणासाठी हातात काहीतरी हव म्हणुन मी शोधाशोध करू लागलो. पण काहीच मिळेना. माझ्या अचानक लक्षात आल कि घरातून येणारे आवाज थांबले आहेत. थड-थड आवाजही थांबलाय. माझ्या शोधा-शोधीत माझी चाहूल आतल्यांना लागली असावी. आता मात्र जास्त वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. मी तडक स्वयंपाकाघराच्या दरवाज्याकडे सरसावलो. क्षणभर मी दरवाज्यापुढे रेंगाळलो. आत काय असेल? कोण असेल? हे सगळ गुढ काय आहे? बाबा कुठेयत? उगाच शिवाजी बनुन इथे आलो. आधी दोन-चार लोकांना एकत्र करूनच यायला हव होत. पण आता मागे फिरण नव्हत एवढ नक्की. आता आर-या-पार!
डोंबल आर-या-पार. हातात शंख आणि चाललो मी चोरांना पकडायला. पण घरात चोर आहेत कशावरून? विक्षिप्त विचारांनी डोक्यात पिंगा घातला होता.
शेवटी मी किलकिला दरवाजा हळुच ढकलला. घरात अंधार होता. पण अर्धवट उघड्या दरवाज्याच्या प्रकाशात भिंतींच्या वीटा दिसत होत्या. मी डोकावून उजवीकडे नजर टाकली तर देवघराच्या दारातून कोणीतरी माझ्याकडे डोकावून बघत होत. ती नजर स्थिर होती आणि इतक्या दूरून मला त्या खुनशी नजरेनी थंड केल. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी भीतीनी फडफडु लागली पण ती नजर स्थिरच होती. मी खालती बघितल तर मला त्या आकृतीच्या हातातली कुर्‍हाड पुसटशी दिसली. माझा मेंदू गुंग झाला होता आणिहृदय छातीतून उडी मारून पळून जायची तयारी करत होत. माझ्या पायाला काहीतरी ओल लागल. रक्त होत ते! मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण भीतीनी घशातून आवाजच फुटेना. तोंडाला कोरड पडली होती. तेवढ्यात कुठुनतरी चिन्मय चिन्मय हाक ऐकु येऊ लागली. म्हणजे बाबा आलेत की काय?

"काय झाल बाळा?" बाबा मला हलवुन उठवत होते.

मी खडबडुन जागा झालो. अजुन बस नागपूरला पोचायचीच होती. हे सगळ स्वप्न होत या विचारानी मला हायस वाटल.
पाणी हवय का बाळा?" बाबांनी विचारल. आजुबाजुची बरीच मंडळी माझ्याकडे बघत होती. सगळ्यांसमोर बाबा मल 'बाळ' म्हणत होते त्याची मला थोडी लाज वाटत होती.
"काही तरी विचित्र स्वप्न पडल होत" मी म्हटल.
"नशिबवान आहेस. खड्ड्यातून इतक अंग घुसळत असतांना तुला बरी स्वप्न पडतात!" बाबा हसत म्हणाले.
परत थड-थड आवाज येऊ लागला. समोरच्या सीटवर बसलेल्या कोणाचा तरी स्टील चा डब्ब्याचा तो आवाज होता. त्या डब्ब्यातून तेल गळुन माझा पाय माखला होता.