7/19/10

मला काय आठवत

* खुप लहान असतांना आमच्या आईंनी साड्या विकण्याचा धंदा काही वर्ष केला. मी बालक मंदिरातुन दुपारी परत आल्यावर झोपत असे (मी तीन-चार वर्षांचा होतो) आणि भर दुपारी नेमक्या काही बायका साड्या घ्यायला आल्यात तर मल खुप राग येत असे. मी झोपेत कुरकुर करायचो. लहानपणी किती मुर्ख होतो हे आठवुन आता हसु येत आहे.

* पाच-सहा वर्षाचा असतांना मी सायकल नुकताच शिकलो होतो. आणि लगेच स्वतःवरच खुश होउन मी एक हात सोडुन सायकल चालवत फिरायला लागलो. पण स्टाईल मारायला (कोणावर स्टाईल मारत होतो कोण जाणे!) मी दोन हात सोडुन चालवायचा प्रयत्न करायला लागलो पण सायकलीच हँडल काही सरळ राहिना. मग विचार केला कि हात सोडुन द्यायचेत आणि बघायच की सायकल कुठे जाते. लहानपणी सगळेच हुशार असतात, मी त्याला अपवाद नव्हतो. घराबाजुच्या मोठ्या रस्त्यावर मी सायकल जोरात हाणली आणि हात सोडलेत. कानात सुर् वार वहात होत. काही वेळ सायकल सरळ गेली. मग ती वाकडी वाकडी जायला लागली. सायकलच्या सीट ला जोर लावुन मी सायकलीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करु लागलो पण ढिम्म् काही होईना. त्या भानगडी रस्त्याच्या बाजुला कचर्‍याचा जो ढीग होता त्या दिशेनी भरधाव जातो आहे या कडे लक्षच गेल नाही आणि जेंव्हा लक्षात आल तेंव्हा तीर निशाने की और बढ चुका था। कचर्‍याच्या ढिगात आमच्या मोहोल्ल्यातला कचरा साफ करणारा बावाजी उभा होता. "बावाजी बाजु हटो।" अशी मी जोरात आरोळी ठोकली. आता म्हातारा असल्यामुळे त्याला ऐकु आल नाही की तो कचर्‍याच मग्न होता माहिती नाही पण त्याने वर बघितल तेंव्हा मी त्याच्या फुटक्या चष्म्याच्या काचांपासुन दोन इंचांवर होतो. नशिबानी मी तेवढाच त्याच्यावर आपटलो आणि सायकल सरळ कचर्‍याच्या ढिगात घुसली.
"दिखता नही क्या?" एवढच तो म्हणाला आणि रागानी हातातला खराटा माझ्या पायावर मारला.
मी घाई-घाईनी सायकल कचर्‍यातुन काढली आणि घराकडे पळालो. पुढली बरीच वर्ष मी एक हात सोडुनच स्टाईल मारत होतो.

* मला बालक मंदिरात सोडायला कधी-कधी लिलाबाई येत असे. बिचारीचे हात भांडी घासुन खरखरीत झाले होते. मी फुदकत फुदकत चालायचो म्हणुन ती माझ मनगट घट्ट धरुन तरा-तरा नेत असे. तिचे ते खरखरीत हात मनगटाला टोचायचेत. "लिलाबाई हात नको पकडुस, तुझे हात टोचतात" तिला काय बोलाव सुचत नसे. नुसतच ती माझ्याकडे बघायची. तिचं ते बघण मला अजुनही आठवत.

* दादाला तेंव्हा एक नविन शर्ट मिळा होता. सायकलनी जातांना तो शर्ट वार्‍यानी मागुन फुगायचा. पण माझ्या जर्सीच काही तस होत नसे. मग मला राग यायचा आणि मी त्याच्याशी भांडायचो. सायकलीने त्याच्या मागे बसुन जातांना मी त्याच्या पाठीवर गुद्दे मारायचो, तो फुगलेला शर्टाचा भाग दाबायला.
तरी तो बिचारा मला डबल-सीट बसवुन सगळीकडे फिरवायचा.

*आमच्या घरा जवळ मोठ्ठ मैदान होत आणि त्यापलिकडे नदी. आता त्या नदीचा नाला झाला होता. पण पावसाळ्यात नदीला उत येउन मैदानाचा काही भाग चिखलमय होत असे. मी त्या चिखलात पहुडलेल्या म्हशींवर बसुन फिरत असे. असच एकदा म्हशीवर बसलो असतांना वरचे ढग उघडलेत तर सुर्याची किरण डोकावत होती. मला दादानी सांगितल होत की सुर्य प्रकाश कोणाला दिसु शकत नाही पण सुर्याच्या प्रकाशात सगळ दिसत. मला ते फारस झेपल नव्हत. पण डोकावणार्‍या किरणांचा झोत बघुन मला वाटल की सुर्य प्रकाश बघणारा मी पहिला माणुस आहे. मी आनंदाने म्हशीकडे बघितल. पण तिच्या डोळ्यात "हे पोट्ट घरी जाउन मार खाणार आहे" एवढेच भाव होते.

*आमच्या बालक मंदिराच्या (मी अहिल्या मंदिर - बालक मंदिरात जात असे) प्रमुख रजनी ताई होत्या आणि पोरांना शिकविणार्‍यां पैकी कुसुम ताई होत्या. कुसुम ताई कधीच रागवत नसत. खेळण्याच्या सुट्टीत (आता खर तर दिवसभर खेळच चालायचेत. पण 'खेळण्याच्या' सुट्टीत आमच्यावर कोणाच लक्ष नसे.) आम्ही कुसुम ताईंना आळी-पाळीने मिठ्या मारायचो. आणि त्या प्रत्येकाला गोंजारायच्या.
पण दुसर्‍या वर्षी त्या परत आल्या नाहीत. लग्न झाल असाव.

* पहिलीत मला घरा जवळच्या टिळक विद्यालयात घातल होत. तिथे कुबडे आणि कुथे हे माझे जिगरी दोस्त होते. पण पुढल्या वर्षी मला दुसर्‍या शाळेत गेल्या वर मला ते कधीच भेटले नाहीत. नविन शाळेत सुरुवातीला मला त्यांची खुप आठवण येत असे. कुबडे हाडकुळा होता. तो हातात सतत एक रुमाल बाळगत असे आणि बोलतांना तो तोंडावर सतत रुमाल लावायचा. कुथे थोडा जाडा होता आणि ठेंगणा होता पण तो हातात रुमाल वगैरे घेउन हिंडत नसे.
मल त्या दोघांना एकदा तरी भेटायच आहे.

* लहान असतांना चंद्रपूरला मामाकडे दिवाळीला गेलो होतो. एकदा जेवणा नंतर सिताफळ खातांना मी काही बिया गिळल्या. झाल, मला सगळे चिडवायला लागलेत की आता माझ्या पोटातुन झाड उगवणार आणि तोंडातुन ते बाहेर येणार. सुरुवातीला मी धीर धरला. फक्त मामी मला समजावत होती की अस काही होणार नाही म्हणुन. पण मग मामा म्हणाला कि ते झाड माझ्या तोंडातुन उगवणार म्हणजे मलाच त्या झाडाला लागलेली सिताफळ खाता नाही येणार. मग मात्र माझा धीर सुटला.
सगळ्यांची बरीच करमणुक झाली.

* एकदा मी आणि आजोबा श्रीराम मामांकडे जात होतो. सायकल रिक्षातुन. मला नीट रस्ता माहीती होता. घरापासुन सुरुवातीच रस्ता रिक्षेवाल्याला सांगितल्यावर मला रिक्षात गाढ झोप लागलेली. एवढ्या रणरणत्या उन्हात झोपणारा मी एकलाच नग असणार पण दुपारची वेळ होती त्याला मी तरी काय करणार? सहाजिकच मला जाग आली तेंव्हा आम्ही भलत्याच ठिकाणी पोचलो होतो.
पुढे काय झाल सांगायची गरज नाही. आजोबांनाच विचारा!

* आम्ही लहानपणी जवळच्या मैदानावर सायकलच्या शर्यती लावायचो. मागच्या गल्लीतल्या एक मुलासोबत, ज्याच नाव आता आठवत नाही पण चेहरा अजुनही आठवतो, मी शर्यत लावली . त्याने मला हरवल. मी त्याला म्हटल की त्याची सायकल नवीन आहे म्हणुन तो जिंकला. त्यानी परत शर्यत लावली. पण यंदा मी त्याची नवीन सायकल चालविणार होतो. आणि तो माझी जुनी.
मी परत हारलो. त्या नंतर बरीच वर्ष मी माझ्या मनात त्याला धोपटायची इच्छा सुकत ठेवली होती.

* आमच्या वडिलांनी खुप वर्ष शहरातल्या कापडाच्या गिरणीत नोकरी केली. गिरणीच्या मालकीच एक गेस्ट हाउस होत आणि गिरणीतल्या लोकांची तिथे वर्षातुन एक-दोनदा तरी गेट-टुगेदर होत असत. मला एकदा आई-बाबा घेउन गेले. बुफे होता आणि जेवण उशीरा होत असे म्हणुन आईने माझ ताट वाढुन दिलं. आता इतक्या सगळ्या लोकांसमोर, गर्दीत मी 'वदनी कवळ घेता' कस म्हणु ते कळेना. लाज वाटत होती. मी बराच वेळ तसाच बसलो होतो. थोड्या वेळानी खुप भूक लागली पण ' वदनी कवळ' म्हटल्या शिवाय जेवणार कस?
शेवटी मी टेबला खालती, कोणाला दिसणार नाहीत असे, हात जोडलेत. डोळे किलकिले मिटलेत. फटीतुन मी बघत होतो कि कोण आपल्या कडे बघतय ते. (कोणी म्हणजे कोणी सुद्दा बघत नव्हत!) आणि सुपर-फास्ट गतीने -
'वदनी......श्री हरीचे.....सहज.....जीवन .....ब्रह्म.....उदर.....कर्म....ओम....राम....ओम्...सहना......वही....तेज.....वही.....शांति: शांति: शाति:.... म्हटल आणि जेवायला लागलो.

*मी तीन-चार वर्षांचा असतांना खामगावला एका लग्नाला गेलो होतो. लग्न रविवारी असाव कारण त्याच दिवशी रामायण प्रक्षेपित होणार होत. आणि नेमका तो भाग कुंभकर्ण वधाचा होता. मी सकाळ पासुन आईच्या मागे लागलो होतो की मला कुंभकर्ण वध बघायच आहे. आता खामगाव सारख्या गावात (त्या गावाच्या नावतच गाव आहे!) आणि लग्नाच्या मांडवात टि.वी. कुठुन मिळणार. आणि अगदी टि.वी. असता तरी नवरा-नवरीने हार हातात घेउन काय कुंभकर्ण वध बघायचा का? पण माझ्या बालबुध्द्दीला असले प्रश्न झेपणारे नव्हते. कोणी ऐकत नाहीय बघुन मी शेवटी मांडावा बाहेर पडलो आणि हिंडत एका घरासमोर टि.वी. बघत उभा राहिलो. चांगले कपडे घातलेला गोरा-गोमट पोर बाहेर उभ आहे बघुन त्या लोकांनी मला आत घेतल. मी मनात म्हटल की ' उत्तम, आता कुंभकर्ण वध नक्कीच बघायला मिळणार'. इथे मांडवात माझ्या नावाचा गजर झाला. मला शोधण्याच्या धावपळीत कोणाला तरी मी त्या घरात टिवी बघतांना दिसलो. सगळ्यांनी रागवल. चार-चौघांसमोरे चांगल दिसत नाही म्हणुन आई-बाबांनी बत्ती दिली नाही. रामाची कृपा!
नवरा-नवरी विचार करत असतील की आमच लग्न लागत होत आणि मांडव चिन्मयला शोधत होता.