9/30/08

वायफळ बडबड

मला या महिन्यात तीन लेख टाकयचे होते. निर्माल्य कथा पूर्ण करायची होती आणि शिवराज्यारोहणाचा पुढला भाग ही लिहायचा होता. पण मी एक अक्षर सुद्धा लिहिलेलं नाही. आळशीपणाची पण सीमा असते. आणि या सिमोलंघनाचा पराक्रम करण्याची मला लहानपणा पासुन आवड आहे. असो.

गेल्या शनिवारी एका प्रख्यात इतिहासकाराच्या सांनिध्यात वेळ घालविण्याची संधी मिळाली. बर्‍याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यांच्या सारख्या थोरा-मोठ्यांनी माझ्या सारख्या पोरा-टोरांना वेळ द्यावा ही थोडी नवलाईची गोष्ट वाटते. कोणाला भेटाव आणि कोणाला भेटू नये यातून थोरपणा सिध्द करणारे राजकीय नेत्यांच्या जमातीत मोडतात. याला मी भाड्याचा थोरपणा म्हणतो. खरे थोर हे त्यांच्या कार्यामुळे ठरतात. एका ध्येयासाठी आपले आयुष्य वेचण हि काही सोपी गोष्ट नाही. कुठला तरी लेख, भाषण किंवा चित्रपट बघुन भारावून सगळेच जातात पण दुसर्‍या दिवशी ये-रे माझ्या मागल्या सारख आपण आपल्या आयुष्यात परत गुरफटुन जातो. थोडक्यात आपण आपले सामान्यत्व दुसर्‍याच घटकेला सिध्द करतो. पण काही 'वेडगळ' लोक असतात जे नुसते भारावून न जाता त्या विचारसरणीत स्वत:ला झोकुन देतात. समाजाच्या प्रगतीसाठी झटत रहातात. या मार्गातील कठिण परिस्थितीतून ते असामान्य होउन बाहेर पडतात. राजकीय नेते ज्यांचे पुतळे सगळी कडे दिसतात, ते फक्त पुतळ्यांच्याच रूपात समाजाचा एक अर्थहिन भाग बनतात. तर हि असामान्य लोक समाजाला समृध्द करून अमर होतात. असली लोक फार अल्प संख्येत आढळतात. ती लोकं पटकन ओळखुही येत नाही. या लोकांना शोधाव लागत. सध्य-परिस्थितीत या लोकांची आपल्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

भारतात सध्या दिवाळीच्या आधीच धमाक्यांची माळ लागलीय. लोकांचे जीव जातायत आणि आपले शिवराज पाटील मात्र त्यांच्या खुर्चीत स्थिर आहे. एका परदेशी बाईचे पाय चाटण्यात भूषण मानणार्‍या या मराठी माणसाची कीव येते. आणि असल्या शंख माणसाला निवडूण दिल्याबद्दल भारतीय समाजाचा राग येतो. पण काही मार्ग दिसत नाही. समाज जातींच्या विभाजनाने पोखरलेला आहे. प्रत्येकाला आरक्षणात हिस्सा हवा. भारतीय समाजाचे विभाजन करण्याचे इंग्रजी सत्तेने चालू केलेले कार्य आजचे नेते धडाडीने पुढे करतायत. त्यातूनच विश्वनाथ प्रताप सिंह किंवा अर्जुन सिंह सारखे अत्यंत घृणास्पद आणि गलिच्छ व्यक्ति देशाचे भविष्य अंधारात ढकलतात. तरीही कुंभकर्ण रूपी समाजाची निद्रा चळत नाही हे आश्चर्यच आहे. घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजु शकत नाही. तस सगळ्या गोष्टी समजुनही समाज त्यावर काही कृती करण्यास नकार देत असेल तर खुदा बचाए!

बर्‍याच गप्पा झाल्यात. तिसरा लेख लिहिला गेला हे बरं झाल. त्यातून काही फारस निष्पन्न होणार आहे अश्यातला भाग नाही पण मनाला खोटा दिलासा मिळणार एवढच.

9/16/08

शिव-राज्यारोहण - भाग १

मराठी जन-मानसात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विशिष्ट महत्त्व आहे. भारताच्या गेल्या हजार वर्षाच्या गडद इतिहासात फार थोड्या घटना भारतीयांच्या कपाळावर विजयाचा टिळा लावतात. विजयानगरचे साम्राज्य, असाम मधील अहोम राजघरण्याचा अपराजित इतिहास आणि राजांचे राज्यारोहण त्यातील प्रमुख मानल पाहिजेत. विजयानगरच्या हिंदुशाहीबद्दल सगळ्यांना महिती आहेच. असामच्या अहोम राजघराण्याबद्दल मी वेगळा लेख लिहितो आहे. पण मग आधी म्हटल तस की महाराजांच्या राज्याभिषेकाला मराठी मनात विशिष्ट स्थान आहे तर त्यांबद्दल लिहिण्याची काय गरज? त्याच सोपं कारण अस कि मराठी लोकांना या राज्याभिषेका बद्दल काय वाटत त्याल फारसा अर्थ उरलेला नाही. मागल्या लेखात महाराजांना चोर-दरोडेखोर का म्हटल्या जात याचा संक्षिप्तात आढावा आपण घेतला, या लेखात त्यांच्या राज्याभिषेका मागच्या कारणांचा विचार करु या.

मी अक्षरशः दर दोन ओळींमागे महाराजांनी स्वार्थासाठी स्वतःचे सिंहासन स्थापन केले नाही अस म्हणतो आहे. कारण या राज्यारोहणामागे स्वार्थ असता तर त्यांनी १६७४ उजाडण्याची वाट बघितली नसती. १६६८ मधेच तो कार्यक्रम त्यांनी उरकला असता. पण त्यांनी हा लढा स्वतःचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मांडला नव्हता. त्या हिशोबानी चाणक्य शिष्य चंद्रगुप्त मौर्य सोडुन भारतीया परंपरेतील कुठल्याही राजाशी त्यांची तुलना होत नाही. त्यांच्या आधिच्या प्रत्येक राजाचा लढा स्वकियांशीच होता. स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी हे राजे आपापसात लढत असत. चंद्रगुप्तानी नंदाचा नाश जरी केला असला तरी त्याचे (आणि त्यान्वये चाणक्याचे) मुख्य लक्ष अलेक्स्झांडरची सत्ता उलथण्याचा होता. त्याच प्रमाणे महाराजांचे मुख्य लक्ष परकीय मुसलमानांची सत्ता उलथण्याचा होता. म्हणुन त्यांनी स्थापित केलेल्या राज्याला स्वराज्य म्हणायचे. त्यांना अत्याचारी मुसलमानी सत्ता उलथवायच्या होत्या हे तर जगजाहिर आहे पण या मुसलमानी सत्तांमधेही आपापसात एक वेगळे राजकारण चालत असे. दख्खनी बादशाह्या या धर्मांतरीत मुसलमानांच्याच होत्या. त्यामुळेच मुघली सत्ता या दख्खनी बादशाह्यांना निम्न दर्जा देत असत. या 'नविन' मुसलमानांच्या सत्ते ऐवजी 'स्वच्छ' मोघल रक्ताची आणि सच्च्या मुसलमानांची सत्ता अधिक उपयुक्त अशी मुघलशाहीची धारणा होती. त्यापायी त्यांनी दख्खनी शाह्यांवर अनेक आक्रमणे केली. औरंगझेब स्वतः दख्खन मधे दोनदा आला. पहिल्यांदा आला. पहिल्यांदा १६५७ मधे जेंव्हा महाराज जावळी घेण्याच्या उद्योगात होते. आणि दुसर्‍यांदा १६८२ मधे तो खास मराठ्यांना भेट द्यायला आला. मराट्यांनीच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली.

एक गोष्ट मात्र नक्की की मोघल असो किंव्हा नुकतेच धर्मांतर केलेले मुसलमानांच्या सत्ता असो, कोणा हिंदुनी राज्य प्रस्थापित केलेले कोणीच खपवुन घेणार नव्हते. ९व्या १० व्या शतकात इराणी आणि अरब मुसलमान अफगाणीस्थानातील खोकर राज्याशी वर्षानुवर्षे भांडुन त्या राज्याचा पडाव केला. तीच स्थिती गुजरातेतील सोळंकी किंवा देवगिरीच्या रामदेवरायाची झाली. बंगालमधील सेन घराण्याचीही तीच कथा. दख्खनेतील मुसलमानी सुल्तान शतकानुशतके दक्षिणेतील लहान लहान हिंदु राजघराण्यांना नष्ट करण्याच्या मागे होते.मोघलांनी आसाम मधल्या अहोम राज्याला नष्ट करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतलेत. विजयानगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आपापसात भांडणार्‍या पाच मुसलमानी सत्ता एकत्र आल्यात. आणि तालिकोटाच्या विजया नंतर विजयानगरातील प्रत्येक इमारत या आक्रमकांनी जमिनदोस्त केली. प्रत्येक पुरुषाला ठार केले आणि प्रत्येक बाईला बाजारात विकले. या सगळ्या मागचा मुख्य उद्देश हिंदु मनात उठाव करण्याचा विचारच कधी यायला नको हा होता. हिंदु लोक सत्ता चालविण्यास कुचकामी आहेत. ते लढवय्ये मुळीच नाहीत. पळपुटे, भ्याड आणि धर्महिन असली ही हिंदु जात फक्त नोकरशाही करण्यापलिकडे फारशी उपयोगी नाही असली समजुत या मुसलमानी लोकांची होती. हिंदुंना स्वतः बद्दलच लाज वाटावी हा मुख्य उद्देश. .गंमतीचा भाग असा की या मुसलमानी बादशाह्यांच्या चाकरीत लढवय्ये असे बरीच हिंदु मंडळी होती पण हि सगळी लोक गुलामीलाच भूषण मानित असत. मिर्झा राजे जयसिंह हे त्या मिंधेपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. अर्थात, यात काही नविन नाही. सगळे विजेता आक्रमक असच करतात इंग्रजांनीही तेच केले. पण अश्या परिस्थितीत या आक्रमकां विरुध शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणातच यश संपादन केले नाही तर मुत्सद्देगिरीत आणि राज्य व्यवस्थापनेतही ते या परकियांपुढे सर्वस्वी वरचढ ठरलेत. त्यांनी केवळ धर्म रक्षणच केले नाही तर धर्म संवर्धनासाठी हि ते झटले. त्या काळात राज्य हि धर्माच्या आधारावरच ठरवली जात असत. मुसलमानी आक्रमकांच्या राज्यांमधे बहुतांश लोक हिंदु असले तरी हि आक्रमक राज्यकर्ते मुस्लीम धर्म वाढविण्यासाठीच झटत असत. पण इथेही राजे त्यांच्या सांप्रत काळाहुन पुढे होते. ते स्वतःला हिंदु धर्म संरक्षक जरी मानत असले तरी त्यांनी इतर धर्मांना मुळीच त्रास दिला नाही. अगदी चढाया करण्याच्या वेळेसही कुठल्याही धार्मिक स्थळांना हात लाविण्याची परवानगी सैन्यास नव्हती. सुरत लुटण्याच्या वेळेस तिथल्या एका ख्रिश्चन पाद्रीच्या इमारतीस मराठ्यांनी मुळीच त्रास दिला नाही.

१६७४ साला पर्यंत महाराजांनी आदिलशाहीस नेस्तनाभूत केले होते. पोर्तुगीज लोक महाराजांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेउ बघत होते. इंग्रजांची शक्ति थोडा-फार उपद्व्याप करण्या पलिकडे फारशी नव्हती. निजामशाही तर कधीच मोडकळीस आली होती. उत्तरेस बागलकण्यापर्यंत (रामनगर आणि कोळी राज्या पर्यंत. म्हणजे सुरतेपासुन दोन-तीन तासाच्या अंतरापर्यंत) तर दक्षिणेस गोव्या पर्यंत महाराजांची अनभिषिक्त सत्ता होती. पूर्वेस ते अहमदनगर पर्यंत आरामात फेर-फटाका मारून येऊ शकत असत. अहमदनगर तेंव्हा मुघलांचे फार महत्त्वाचे सैन्य विभागाचे ठिकाण होते. मुख्य म्हणजे या सर्व भागातील कर मराठा सत्तेस मिळत असत. तसांच मराठी न्याय या भागात कार्यरत होता. तिथे कुठल्याही बादशहाचा अंमल चालत नसे. या प्रदेशातील कुठलाही भाग जिंकण्यास बादशाही सैन्यास मराठा सैन्याशी टक्कर द्यावी लागत असे. पुणे भागात मिळालेल्या लहानश्या जमिनीच्या तुकड्यापासुन महाराजांनी एवढे मोठे राज्य स्थापन केले. त्यांची शासन व्यवस्था, सैन्य मांडणी तसेच राजा आणि राज्याची कर्तव्ये इत्यादी कारभाराची सर्व अंगे हि प्रस्थापित मुसलमानी सत्तेच्या तुलनेत क्रांतिकारी होती. थोडक्यात सार्वभौम राजा बनण्यासाठी आवश्यक कारणे आणि आवश्यक पराक्रम त्यांनी केलेला होता. राज्य व्यवस्था, धर्म संस्थापन आणि संवर्धन आणि स्वराज्य स्थापन हि सर्व कामे त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केलेली होती. त्यामुळे राज्यारोहण हे खर्‍या दृष्टीने यशाचा मुकुटमणी होता. ही केवळ औपचारिकता नव्हती, ती आवश्यकता होती. काळाची गरज होती. या समारंभाचे प्रतिसाद भारतभर उमटणार होते. मानसिक हार मानलेल्या हिंदु समाजात कणा उत्पन्न करण्याचे कार्य या राज्यारोहणाने केले. स्वातंत्र्यतेचे बीज जरी आधी रोवल्या गेले असले तरी हिंदुंमधे स्वातंत्र्याचा होमकुंड यशस्वीपणे पेटविण्याची शक्ती आहे हे या सोहळ्याने सिध्द केले. पृथ्वीराजा नंतर स्वतःचा बळावर राज्याभिषेक करणारे महाराज हे केवळ तिसरे शूरवीर होते. (हरिहर राय आणि बुक्का हे विजयानगर सत्तेचे संस्थापक सिंहासनधीश होते. तसच 'विक्रमादित्य' हेमू हा दिल्लीत फार थोड्या काळासाठी सत्ताधीश होता.) तर तीन आघाड्यांवर लढा देऊ शकणारे ते फक्त दुसरे लढवय्ये होते. पंड्या किंवा चोला राज्यांनंतर नौदल स्थापन करणारे ते पहिले दूरद्रष्टे होते. या सगळ्या कारणांचा विचार करुनच महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

एवढी पार्श्वभूमी ठळकपणे दिसत असली तरी मागे म्हटल्या प्रमाणे मुघली सत्ता १८५७ पर्यंत चालली असे का मानतात? त्यामागच्या राजकारणाचा विचार पुढल्या लेखात करू या.

9/5/08

निर्माल्य - भाग ३

माईंच्या डोळ्यातील अश्रुंचीच जणु पाऊस वाट बघत होता. एकसंथ पावसाची रीघ लागली. इतका वेळ गद्द झालेली हवा लगेच मोकळी झाली. बघता बघता हवेत गारवा आला. माई उठल्या, त्यांनी डोळे पुसले आणि माजघरात आल्या. सून रडून रडून झोपून गेली होती. दिवे लागणीची वेळ व्हायला आली होती. माजघरातल्या बायकांना माईंना बघुन नेमक काय बोलायच किंवा काय करायच कळत नव्हत. खर सांगायच तर माई इतक्या कमी रडल्या होत्या त्याचीच सगळ्यांना काळजी वाटत होती.

"माई या बसा" म्हणत कोणीतरी खुर्ची आणुन दिली.

माईंच लक्ष नव्हत.

"काय करताय अक्का?" माईंनी स्वयंपाकघरात गॅसपाशी उभ्या असलेल्या बाईला विचारल. एका शेगडीवर दूध ऊतू जात होत. अक्का गॅसशी झटापटी करत होत्या. गावात दोन-तीन घरांमधेच गॅस होता. अविनाश ने नुकताच घरी सिलेंडर लावला होता.

"चहा करत होते सगळ्यांसाठी पण या शेगडीची मेली भानगड कळत नाही." अक्का उत्तरल्या. माईंनी दुसर्‍या शेगडीकडे नजर टाकली. दुसर्‍या शेगडीवर काहीतरी खदखदत होत.

"पिठल करत होते. लोक येतीलच, जेवायच तर लागेलच ना" अक्कांच्या चेहर्‍यावर अपराधी भाव उगाच होते.

"बरं सुचल तुम्हाला" अस म्हणत माई वर्‍हाड्यांत पुन्हा आल्या आणि अण्णांच्या आरामखुर्चीवर अंगाची घडी करून बसल्या. घरात पिठल शिजतय या विचाराने त्यांना हसु आल. जो जायचा तो जातोच पण मागे राहिलेले भूकेच्या पछाड्यातून थोडीच सुटतात. भूकेला काही भावना नसतात. त्यांनी पदरात स्वतःल गुरफुटुन घेतल आणि चुकलेल्या गणितांचे हिशोब त्या करू लागल्या. पण कुठे हातचा चुकला त्यांना परत कळेनास झाला. ती संध्याकाळ त्यांच्या घशाशी आली होती. त्या परत आठवणींच्या गुहेत नाहीश्या झाल्या.

कोणाचही कोणावाचुन आणि कशावाचुन अडत नाही. रहाटगाड चालूच रहात. बघता बघता पोरं मोठी झाली. श्रीकांत लहाना आणि अविनाश मोठा. दोघांमधे चार वर्षाच अंतर होत. दोघांमधे पण त्यांच्या स्वभावात जमिन-आस्मान चा फरक होता. परिस्थिती छन्नी प्रत्येक मनुष्यावर निर्-निराळ्या तर्‍हेनी आकार देते. आईची होणारी सततची तक-तक आणि वडिलांची होत असलेली दुर्दशा बघुन अविनाश स्वभावाने विचारी आणि शांत झाला. घरची जवाबदारी लौकरात लौकर खांद्यावर घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असे. त्यांने आपले शिक्षण नीट पूर्ण केले. त्या काळात उठ-सुट सगळे इंजिनिअर होत नसत तेंव्हा त्याने मुंबई महाविद्यालयातून मेकानिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मुंबईलाच टाटा कंपनीत तो नोकरीला लागला होता. तो वडिलांवर गेला होता. अत्यंता हुशार आणि परिस्थितीमुळे कष्टीक. आईची काळजी त्याला सतत लागलेली असे. त्यामुळेच माईंची मदार अविनाश वर असे. श्रीकांतची काही फारशी शाश्वती नव्हती. तो लौकीक दृष्ट्या वाया गेला होता अस म्हणता येणार नाही पण निकम्मा जरूर होता. त्याने शिक्षण पूर्ण केल तरी पावलं अशी परिस्थिती होती. बुध्दु होता अश्यातला भाग नाही पण उनाडक्या करण्यातचा त्याचा बहुतांश वेळ जात असे. घरी बापाचा धाक नाही आणि आईला तो जुमानित नसे. त्याचाही आईवर जीव होता पण त्या पलिकडे आपली काही जबाबदारी आहे असे त्याला वाटत नसे एवढच. अविनाश ला नोकरी लागल्याच्या दोन वर्षाच्या आत माईंनी त्याला बोहल्यावर चढवला. गावातलीच मुलगी होती. तीनेही बी.ए. पूर्ण केल होत आणि माईंच्या शाळेत नुकतीच शिक्षिका म्हणुन लागली होती.

अण्णाच्या आजारपणाला सुरुवात झाल्यापासुन पुढल्या वीस वर्षाचा काळ इतक्या झपाट्याने गेला की माईंना फारसा विचार करायला फुरसत मिळाली नाही. सुरुवातीची देव-देवके थंडावली होती. अण्णा असेच रहाणार हे माईंनी मान्य केले होते. नवर्‍याचे सुख त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्ष सोडलीत तर कधीच लागले नाही. अण्णांचे व्यक्तीमत्व गेल्या वीस वर्षात सप्तरंग दाखवुन आता पांढरे फटक पडले होते. कुठल्याही भावनांचा लवलेश त्यांच्यात उरला नाही. फिटस मधुन मधुन येत असत. घरच्यांना नेमकं काय करायच हे पक्क माहिती होते. फिटस येउन गेल्यावर थोडं बहुत बोलणारे अण्णा अजुन गडद होत असत. परत पूर्ववत यायला दोन आठवडे लागत. पूर्ववत येण म्हणजे खायला दे किंवा चहा कर एवढ्या पूर्तीच त्यांची बौध्दीक क्षमता सिमित झाली होती. सुख-दु:खाच्या पलिकडे ते जणु गेले होते. आल्या -गेल्यांची विचारपूस नाही किंवा घरात होत असलेल्या गोष्टी मधे रस नाही. लाकडाची मूर्ती जणु घरात फिरत असे. पेपर मात्र दररोज वाचत असत. सकाळचा पेपर संध्याकाळ पर्यंत ते रात्रीपर्यंत पेपर त्यांच्या हातात असे. काय कळायच त्यात त्यांना देवच जाणे. थोडक्यात ते आहेत काय आणि नाही काय एकच होत.

दोन पोरांपैकी एक तर मार्गी लागला होता. संसारी पुरुष झाला होता. लहान्याची चिंता होती. पण अविनाश ओळखीनेच टाटाच्याच कुठल्या कारखान्यात श्रीकांतला लावण्याच म्हणत होता. रावसाहेबा शिक्षण पूर्ण कधी करतात त्यावर सगळ अवलंबुन होत. एकुण माईंच्या जीवनातील वादळ शांत होण्याच्या मार्गावर होतं. त्यांच्या शुष्क मनावर कर्तव्य पार पाडल्याचा भावनांची सावली पडत होती. खुप वर्षांनी त्यांना समाधान वाटत होत. शाळेतून घरी आल्या की त्यांना शांत वाटत असे. खुप वर्षांनी त्यांना स्वस्थता मिळत होती. अविनाशच नुकतच झालेल लग्न आणि घरात खुप वर्षांनी अजुन एका स्त्रीचा वावराने माईंच मन हुळहुळत होत. लौकरच नातू येणार घरात आणि घर परत खेळत होणार. नातवाला धडधाकट आई-वडिल असणार या विचाराने माईंना आनंद होत असे.

मुंबईहुन बसने अविनाश जा-ये करत असे. आणि एके दिवशी परत येतांना बस मोकळी होती म्हणुन तो पाय लांब करून झोपला. रात्रीची वेळ होती. अविनाश घरी उशीरा येत होता. बस वेगाने जात होती. मधेच कोणी तरी आल म्हणुन चालकाने करकचून ब्रेकस दाबले. अविनाश गाढ झोपला होता तो सीटवरून घसरला आणि त्यांच डोक दाणकन विरूध्द दिशेच्या सीटच्या लोखंडी भागाला आपटले. निमिषार्धात सगळ घडल आणि झोपेतच काही कळायच्या आत अविनाश मृत झाला. बस-चालकाला सुध्दा काही कळल नाही. बस जेंव्हा डेपोत गेली तेंव्हा हा कोण वेडा-वाकडा माणुस पसरलाय म्हणुन बस चालक बघायला गेला तेंव्हा सगळ त्याच्या लक्षात आला. सकाळी नेहमी सारखा कामावर गेलेला अविनाश फक्त देहरुपीच परतला.


काळ कुणासाठी थांबत नाही अस म्हणतात. न थांबायला काळाला जायच तरी कुठेय? काळ पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. तो तसाच असतो. स्थिर, चिरंतन चिराकाल. पुढे रेटत जात ते माणसाच घोंगड. दुसरा पर्यायही नसतो. दैव फासे खेळायला बसवतो पण फासे फक्त दैवच टाकत. फक्त भोगण आपल्या हातात असत. माईंच्या मनात असल्या काहीश्या विचारांचा फडफडाट होत होता. पण मग त्या निश्चयाने उठल्या. आधी डाव उलटला तेंव्हा त्यांनी हार मानली नव्हती आणि आत्ताही त्या धडाडीनेच पुढे जाणार होत्या. सुनेला सावली देणार होत्या. त्यांनी मनात पुढचे आराखडे बांधायला सुरुवात केली. तीचं शिक्षण कस पुढे चालू करायच. तिचा जीव कसा रमवायचा. कधीही न भरणार्‍या जखमेवर हात ठेउन त्या पुढे जाणार होत्या. त्यांच्याकडे अजुन कुठला पर्यायही नव्हता.