8/20/12

निवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १

कालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंना झेपणार नव्हत. सकाळी उठुन कामाला जाण्याआधी अर्धा तास वाचायची अस ठरवल. मागे आमच्या आईने "सुबोध ज्ञानेश्वरी" हा श्रीधर भास्कर वर्णेकरांनी लिहिलेला ग्रंथ दिला होता. माझ्या सारख्या अनभिज्ञ जनांसाठी 'प्रज्ञाभारती'  वर्णेकरांनी ज्ञानेश्वरी आजच्या मराठीत रचली. 

महिन्याभरात मी चौथ्या अध्यायावर पोचलो. अर्थात हि कुठली शर्यत नव्हती पण माझ्या आवडीच्या काही निवडक ओव्या मी इथे प्रस्तुत करु इच्छितो.
---
अर्जुनाची विमनस्क मनस्थिती (२.७)

जैसे होता तिमिरग्रस्त। दृष्टीचे तेज होते लुप्त।
जवळचे ही वस्तुजात। मुळी न दिसे॥

तैसेच देवा मज झाले। हे मन भ्रान्तीने ग्रासले।
आता काय आहे हित आपले। तेही न कळे॥

तरी कृष्णा तू करी विचार। योग्य तेच आम्हा सांग सत्वर।
तूच सर्वस्व आणि इष्ट-मित्र। आम्हास आता॥

तू गुरुबंधु पिता।तूच आमची इष्टदेवता।
तूच संकटी रक्षणकर्ता। सर्वदा आमचा॥

जैसा शिष्याचा गुरुवर। सर्वथा न करी अव्हेर।
सरितांचा त्याग सागर। करील कैसा?॥

किंवा अपत्यास सोडून माता। जरी जाईल अच्युता।
तरी सांग ते सर्वथा। जगेल कैसे॥

तैसा सर्वतोपरी आम्हास। देवा तूच एक आहेस।
पूर्वी बोललो जे तुम्हास। ते न रुचेल जरी॥

तरी आम्हास काय उचित। आणि जे नाही धर्मविपरीत।
तेच आता सांग त्वरित। पुरुषोत्तमा॥
---

आत्म्याचे अमरत्व - (२.२१)

किंवा पूर्ण कुंभ उलंडला। तेथे विंवाकार दिसतो लोपला।
परी तो सूर्य नाही गेला। त्याच्यासह॥

किंवा मठामध्ये आकाश जैसे। मठाकार मात्र असे।
मठ भंगताही अभंग असे मठाकाश॥

तैसे शरीराचा होता लोप। नाश न पावे स्वरूप।
म्हणून हे भ्रांतीचे पाप। सोड बापा॥

(२.२२)
जुने वस्त्र टाकून। नवे करावे धारण।
तैसा एक देह सोडून। आत्मा दुसरा स्वीकारी॥

(२.२३, २.२४)

हा अनादि नित्यसिध्द। निरुपाधि विशुद्ध।
म्हणून श्स्त्रादींनी याचा विच्छेद। होत नाही॥

हा प्रलयजळात नाही बुडत। अग्नीनेही नाही जळत।
वायुसुद्दा नाही शक्त। शोष याचा करण्यास॥

अर्जुना हा नित्य। अचल आणि शाश्वत।
सर्वत्र असे सदोदित। परिपूर्ण हा॥

---


पापातून सुटण्याचा उपाय- (२.३७)

दुधाने तेव्हाच येईल मरण। जेव्हा विषासह होईल सेवन।
तैसे सहेतुकपणे धर्माचरण। करिता दोष लागती॥

म्हणून हे पार्था। हेतु सोडून सर्वथा।
तुज क्षात्रवृत्तीने झुंजता। पाप नाही॥

(२.३८)
सुखात संतोष मानू नये। दु:खात खेद मानू नये।
इच्छा मनी धरू नये। लाभालाभाची॥

येथे आपणास विजय मिळेल। किंवा सर्वथा देह जाईल।
हे आधीच काही पुढील। चिंतू नये॥

आपला स्वधर्म जो उचित। तदनुसार असता वर्तत।
जे लाभेल ते निश्चिंत। सहन करावे॥

ऐस सुदृढ असता मन। न लागे दोषबंधन।
म्हणून आता निभ्रांत होऊन। युध्द तू करावे॥

--
(क्रमशः)

3/18/12

एका म्हातारीची गोष्ट

'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.

ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.

कळावे. लोभ असावा.

आपला,

चिन्मय भारद्वाज

http://prabhune.com/ArunP/Arun.htm

=====

बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्‍या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.


"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"


त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.


"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"


"कुठली?"


"चार ची"


"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.


तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.


"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"


"कुठल?"


"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.


"हो पण कुठल?"


"ते..ते वाल दे"


त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.


"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"


"आधी नाही का सांगायच"


"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."

तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.


"लौकर दे रे"


"दहा रुपये द्या अजुन"


"अजुन दहा रुपये कसले?"


"दुसर्‍या डब्ब्याचे"


"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.


"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.


तेवढ्यात दुकानाचा मालक आला.


"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.


एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्‍यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.


मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.

म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.


"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.


बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.


म्हातारी हातात वितळणार्‍या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्‍या ट्रेनला बघत उभी होती.

'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्‍याच्या ढिगात भिरकाउन दिल.


भिकार्‍याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.