4/4/23

नायपॉल - एक प्रवास

श्री विदयाधर सीप्रसाद नायपॉल यांचा मृत्यु ऑगस्ट ११, २०१८ ला लंडन येथे झाला. त्रिनिनाद आणि टोबागो येथील मूळ निवासी श्री नायपॉल हे १८व्या वर्षी इंग्लंड ला दाखल झालेत. तेंव्हा पासून ते ब्रिटिश नागरिक होते. इंग्रजी भाषेतील गेल्या शंभर वर्षातील सर्वश्रेष्ठ लेखक मानलेल्या श्री नायपॉल यांना सन २००१ ला साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिल्या गेले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत ३० हुन अधिक पुस्तके लिहिलीत. यात कादंबऱ्या, प्रवासवर्णने आणि बरेच निबंध लेखन ही होते. मिस्टिक मसूर ही त्यांची पहिली कांदबरी सॅन १९५६ ला प्रकाशित झाली तर मॅजिक सीड्स ही त्यांची शेवटली कादंबरी सन २००७ ला प्रसिद्ध झाली. तब्बल  पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विविध विषय हाताळलेत. त्यांच्या लेखनाचा सूर अत्यंत वैयक्तिक होता पण त्याची पात्रे मात्र जगाच्या विविध टोकाला वावरत. वेस्ट इंडीज, आफ्रिका, भारत आणि इंग्लड येथे बेतलेली त्यांची पात्रे, त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात रेखाटलेल्या विविध प्रांत, देश, समाज आणि संस्कृतीचे प्रतिनिधी होते.

नायपॉल हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते ही अतिशयोक्ती ठरणार नाही. मुख्यतः त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने प्रकाशित झाल्याच्या क्षणापासून वादाच्या भोवऱ्यात फसली होती. पण त्यांची प्रवास वर्णने ही केवळ वर्णने नसून त्यांच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवीत. त्यांची लेखन शैली, वाक्यप्रचार करण्याची एक विशिष्ट पद्धती (त्यांची एक-एक वाक्य एका परिच्छेदा एवढी लांब असत), आणि शुष्क दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याचा कल खासकरून दुसऱ्या जागतिक युद्धानंतर उभे राहू बघण्याऱ्या जगाला पारखण्याचा दृष्टिकोन वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. मला वाटतं सगळी लोक स्वतः चा विचार करायला तयार नसतात. स्वतंत्र्यपणे  विचार करणे हे कठीण कार्य आहेच पण स्वविचार ही मुळत:च अस्वस्थ करणारी प्रक्रिया आहे. नायपॉल नेमके समाजाच्या याच मर्मावर बोट ठेवतात.

माझी नायपॉल याची ओळख प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णने वाचून झाली. त्यांच्या लेखनाची सवय करावी लागते. ओघवती भाषा किव्हा मोठे शब्द हीच भाषेची कसोटी नसते हे त्यांच्या लेखनाची सवय झाल्यावर लक्षात येत. त्यांची विचार करण्याची एक विशिष्ट असममित, अ - कालक्रमीत पद्धती होती,  आणि त्याच पद्धतीने त्याचे शब्द लिहिल्या गेलेत. ते एका वाक्यात १८९८ च्या गांधींबद्दल बोलायाला सुरुवात करून, मध्ये १९४८ च्या गांधी बद्दल बोलून, शेवट १९१५ ला गांधी परत दक्षिण अफ्रीकेला का परतलेत हे सांगतात. येथे गांधींच चरित्र सांगायचं हेतू नसतो तर गांधी या व्यक्तीमत्वाचे पैलू हे कसे विविध काळी जाणवतात (चमकतात?) आणि त्यामुळे गांधी ही व्यक्ती कशी समजू शकते हे नायपॉल दर्शवितात.  वाचकाला वाचायला, कळायला सोपं जाईल असे लिहावे वगैरेच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. वाचकाला त्याच्या विचारांची झेप आणि प्रगल्भता जणू एक आव्हान होते. पण एकदा का वाचाकास त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कळला की इतिहास आणि भविष्य जणू नावीन्याने अवतरते. त्यांची प्रवास वर्णने जगाच्या विविध भागात, विविध विषयांना धरून लिहिलेली असून, दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धातील चाळीस वर्षांचा कालखंडावर दृष्टीक्षेप टाकतात. या सगळ्या प्रवासात आणि विचारातील धागा शोधायचा तर दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाचा, प्रामुख्याने इंग्रजी साम्राज्याचा झपाट्याने झालेल्या ऱ्हासा नंतर उदयास आलेल्या देशांचे, समाजांचे परिक्षण होय. इंग्रजी साम्राज्य सन १९२० च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. (इंगलंडच्या राणीच्या साम्रज्यावर कधी सूर्यास्त होत नसे!) पण केवळ तीस वर्षातच हे साम्राज्य उन्मळुन पडले. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, मलेशिया इत्यादी जी राष्ट्रे या मंथनातून उदयास आलीत, ते समाज जणू या बदलाला सामोरं जाण्यास सज्ज नव्हती. पण गंमत म्हणजे, हा अचानक घडलेला बदल आकलनाच्या बाहेर आहे आणि झपाट्याने बदललेल्या जगात स्वातंत्र्य मिळणे म्हणजे नेमके काय याची कल्पना आपल्याला नाही हे सुद्धा मानायला हे देश, आणि देशांचे राज्यकर्ते तयार नव्हते. यातुन निष्पन्न काय झाले? तर इंग्रजी सत्तेची व राज्यकर्त्यांची केविलवाणी नक्कल. आपल्या प्रवासवर्णनांमध्ये नायपॉल या कुंठित समाजाची परिस्थिती दर्शवितात. त्यांची वाक्ये चाबकाच्या फटक्यां सारखी भासतात. कुठल्याही राष्ट्राबद्दल टीकेचे आसूड ओढणे म्हणजे विवादांना आमंत्रण देणे हे सांगायला नकोच. पण त्यांचे विचार बोचणारे असलेत तरी नाकारण्या साऱखे नव्हते. स्वतः च्या घरात बसून त्यांनी मतांच्या पिंका टाकल्या नव्हत्या.  उदाहरणार्थ, भारतावर  त्यांनी तीन पुस्तके लिहिलीत. आणि त्यासाठी ते अख्खा भारत हिंडलेत. सामाजिक, राजकीय आणि या सीमारेषेवर वावरणाऱ्या त्या त्या दशकातील दिग्गज लोकांना ते भेटलेत, मुलाखती घेतल्यात. ते नामदेव ढसाळ यांना भेटलेत, शिवसेनेच्या उदया बद्दल लिहिले, दक्षिणेत द्राविडी चळवळी बद्दल लिहिले, ६० च्या दशकात चारू मुजुमदारांना भेटलेला, नक्षलवादी चळवळीचा आढावा घेतला, सन १९७५ ला विनोबा भावे यांच्या आश्रमात राहिलेत. दिल्लीत नामांकित राजदूतां सोबत गप्पा मारल्यात तर ७० आणि ८० च्या दशकातील प्रख्यात मानसशास्त्रज्ञांशी  वाद-विवाद केलेत. त्यांनी लिहिलेलं पटो वा न पटो पण वायफळ म्हणून वाचक त्यांच्या विचारांना बाजूला सारू शकत नाही.

भारत आणि हिंदू धर्म हा त्यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि लेखनाचा अभिन्न भाग होता. नायपॉल यांचे आजोबा हे भारतातून (बिहार राज्य), १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्रिनिनाद या वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालेत. त्या काळात इंग्रजी सत्ता साखरेचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत. इंग्रजांनी फार पूर्वीच सांप्रत वेस्ट इंडीज ही बेटे बळकावली होती. तिथे इंग्रजांनी उसाची लागवड  सुरु केली. पण त्यांना शेतांवर कामगार मिळेना. आणि इंग्रजी संसद ने सन १८३२ ला गुलामगिरीची पध्द्तही अवैध केली होती. यावर उपाय म्हणून इंग्रजी व्यापारांनी इंग्रजी अधिपत्या खाली असलेला देशामधून कामगार वेस्ट इंडीज मध्ये आणायला सुरु केले. कामगारांसोबत करार सोपा होता. पाच वर्षे शेतांवर मजुरी करायची, त्याचा भत्ता मिळेल. आणि पाच वर्षा अंती मायदेशी जायचे तिकीट मिळेल किंव्हा जमिनीचा एक तुकडा इंडीज मध्ये मिळेल, स्थायिक व्हायला. बिहार आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर लोक अश्या तऱ्हेनी वेस्ट इंडीज मध्ये दाखल झालीत, आणि स्थायिक झालीत. नायपॉल त्यांच्या या स्थलांतराला ऐतिहासिक महत्व देतात. कारण या स्थलांतरीत लोकांची जणू एक अजब संस्कृती उभी राहिली.  समुद्राच्या लाटांवर भरकटत शहाळ्या सारखी ही लोक, आपली ओळख आणि अस्मिता टिकवायला सतत धडपड करीत. पण हे प्रयत्न म्हणजे वैफल्य आणि हास्यास्पद या सीमेवरचा तळ्यात-मळ्यातला खेळ होऊन बसला. अश्या पार्श्वभूमीवर नायपॉल यांचा जन्म सन १९३२ ला झाला. लहानपणा पासून हिंदू धर्मात वाढविलेल्या नायपॉलांवर भारतापासून हजारो मैल दूर असूनही भारताची सदैव सावली होती. त्यांच्या कुटुबांची भारताची नाळ तब्बल शंभर वर्षांपूर्वी तुटली असली तरी ते वेस्ट इंडीज मध्ये आणि पुढे इंग्लंड मध्ये नेहमी भारतीय म्हणूनच ओळखल्या जात. ना जन्मस्थळाचा, ना कर्मस्थळाचा आणि ना ही पितरांच्या भूमीचा, असल्या त्रिशंकू परिस्थितीच त्यांनी आपल्या लेखन प्रवासाचा आरंभ केला. 'हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास' ही त्यांची पहिली कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली. त्यांच्या वडिलांच्या आयुष्यावर थोडी बहुत बेतलेलया या कादंबरीचा नायक - मोहन बिस्वास हा त्रीनिनाद येथील एक भारतीय मुळाचा हिंदू. कादंबरी मोहनच्या स्वतःचे घर बांधण्याच्या ध्यासाची गोष्ट. भारतापासून दूर असूनही रूढी -परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजाचे चित्रण आणि स्वत्वाची ओळख म्हणून घराचा ध्यास घेतलेल्या मोहनची गाथा हि एक सुरेख कथा आहे. कथा सुरेख आहे, सुरस नव्हे. नायपॉल यांची पात्रे कधी सुरस आयुष्य जगात नाहीत. कथेचा अंत सुखी किंव्हा दुखी असावा असा नायपॉल यांचा आग्रह नसतो. त्यांचे लेखन कल्पित पात्रांच्या प्रवासाचा लेखा-जोखा असतो. मग तो मोहन बिस्वास असो कि 'काँगो' या अजून एक प्रसिद्ध कादंबरीचा नायक असो. प्रवास म्हणलं की गोष्ट केवळ पात्रां पुरतीच असू शकत नाही. पात्रांच्या आशा- अभिलाषा व्यतिरिक्त पात्रांची काळ-वेळ, समाजस्थिती, समाज बंधने, इतिहासाची ओझी हे सगळंच महत्वाचे ठरतात. नायपॉल जणू चित्र रेखाटतात. त्यांच्या या निरीक्षण शक्ती आणि लेखनाच्या खुबीमुळे त्यांच्या कादंबऱ्या आणि ललीत अतिशय प्रसिद्ध झाले. त्यांचे मिगुल स्ट्रीट, मिस्टिक मसूर, द एनिग्मा ऑफ आरएव्हल , गुरिल्ला या कादंबऱ्या इंग्रजी भाषेतील श्रेष्ठ लेखना मध्ये गणल्या जातात. त्यांच्या इन फ्री स्टेट या कादंबरीला इंग्लंडच्या इंग्रजी सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या मॅन -बुकर पारितोषिकाने सन्मानित केल्या गेले.

मागे आपण त्यांच्या प्रवासवर्णनांचा थोडक्यात आढावा घेतला. नायपॉल यांनी त्रिनिनाद-टोबॅगो, अर्जेटिना, संयुक्त राज्य अमेरिका, व्हेनेज्युएला, काँगो, इराण, पाकिस्तान, भारत, मलेशिया, इंडोनेशिया या देशांच्या वर्तमान आणि इतिहासाचा आढावा घेत, भविष्याचा वेध घेतला. ही प्रवासवर्णने या देशांच्या समाजाचे निरीक्षण आणि अवलोकन होते. ही सगळी राष्ट्रे  साम्राज्यवादाची फळे आहेत. या सगळ्या राष्ट्रांच्या सीमा आणि इतिहास विस्कळीत आहेत. देशाचे व्यक्तिमत्व, स्व-ओळख याची संपूर्ण कल्पना या देशामध्ये अजूनही रुजलेली नाही. आणि ही सगळी राष्ट्र अजूनही इतिहासाच्या ओझ्या खाली दबलेली आहेत. दक्षिण अमेरिकेत मूळ निवासी यांचा सर्वनाश करून उभे राहिलेला समाज (स्पॅनिश व पोर्तुगाली) आणि राष्ट्रांनी आपल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती करणे जणू सोडलेच नाही. अमेरिका (U.S.A) हा गुलामांच्या पाठी तोडून आणि घोंगडं शिवाव तस  जमिनी विकत घेऊन उभा केलेला हा देश, अजूनही  गुलामीगिरीच्या साखळ्यांच्या खणखणात सैरभैर होतो. इराण, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया हे देश मूळ मुसलमान नाहीत. धर्मान्तरीत हे राष्ट्रे आज जगातील सगळ्यात मोठी मुसलमान राष्ट्रे आहेत. मूळ अरबी मुसलमानां पेक्षा गैर-अरब मुसलमानांची संख्या अधिक आहेत आणि नायपॉल यांच्या मते स्वतःला सर्वाधिक  शुद्ध (पाक) मुसलमान म्हणून सिद्ध करण्याच्या सतत धडपडीत असतात. हा प्रयत्न स्फोटक आणि गैर-मुसलमान जगाला घातक ठरेल हे त्यांचा १९९० च्या दशकातील भाष्य अत्यंत विवादास्पद ठरले.

नायपॉल पहिल्यांदा सन १९६० च्या दशकात भारतात आलेत. त्यांच्या अनुभवांवर आणि प्रवासावर त्यांनी An Area of Darkness हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक त्यांच्या भारतावर लिहिलेलया त्रयी पुस्तकां मधील पहिले पुस्तक. पुस्तकाचे नाव च बहुधा लोकांना पचण्यासारखे नव्हते कारण भारत सरकार ने या पुस्तकावर लगबगीने बंदी आणली. अर्थात बंदीमुळे हे पुस्तक वाचल्या गेले नाही अस नाही.  नायपॉल या पुस्तकात पुर्वग्रहदूषित म्हणून समोर येतात.

“It is well that Indians are unable to look at their country directly, for the distress they would see would drive them mad. And it is well that they have no sense of history, for how then would they be able to continue to squat amid their ruins, and which Indian would be able to read the history of his country for the last thousand years without anger and pain? It is better to retreat into fantasy and fatalism, to trust to the stars in which the fortunes of all are written”

बऱ्याचश्या वाचकांच्या मते केवळ मूळ भारतीय आहे म्हणून भारताबद्दल असा काही लिहिण्याचा अधिकार  नायपॉलांना कसा? पण मुद्दा अधिकाराचा नाही. त्यांच्या दृष्टीत अतिशयोक्ती आहे हे खर पण हे विचार भारताबद्दलच्या असलेल्या आत्यांतिक प्रेमातून लिहिल्या गेले आहेत. जीव कासावीस होऊन लिहिल्या गेले आहेत. जवळपास शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जे भारताईचे वेस्ट इंडीज मध्ये स्थलांतरीत झालेत, त्या लोकांनी तिथे एक नवीन समाज निर्माण करण्या ऐवजी जुना भारतच जगाच्या दुसर्या टोकाला बसविण्याच्या प्रयत्न केला. अगदी जाती-व्यवस्था सुद्धा जणू जहाजातून जतन करून, वेस्ट इंडिज मध्ये पुनः जणू रुजवली. भारताशी नाळ तुटू नये म्हणून लहानपणा पासून पोरांना भारतीय संस्कार केल्या जात. यात वावगं काहीच नाही. (जाती व्यवस्था सोडून!) पण जो व्यक्ती परदेशी स्थलांतर करतो तो स्व देशाचे एक चित्र मनात कोरून बाहेर बडतो. ते चित्र जुनं होत जाते, अधिक रम्य होत जाते पण सहाजिकच मुळीच बदलत नाही. शेवटी स्वदेश स्मृती पटला तून नाहीसा होतो आणि रहाते फक्त एक कल्पना.  नायपॉल भारताबद्दलच्या आणि हिंदू धर्मा बद्दलच्या रम्य कल्पनेत वाढलेत. हा भारत त्यांची जणू वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यांचा वारसा-हक्क होता. पण जेंव्हा भारत - एक कल्पना आणि सत्य परिस्थितीतील भारत, खास करून १९६० च्या दशकातला भारत, याचा सामना झाला तेंव्हा नायपॉल यांच्या मनात जे भीषण वादळ आले असणार त्याचे पडसाद An Area of Darkness मध्ये उमटतात. त्यांचे भारताबद्दलचे विचार असह्य वाटतात पण ते विचार लागु होतात की नाही हे पडताळण्या पेक्षा, त्यांच्या भारताबद्दलच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवेत. कारण त्यांनी हा प्रवास एक पुस्तक लिहून संपविला नाही. त्यांनी सन १९७६ ला India: A Wounded Civilization हे पुस्तक लिहिले.

"“India is old, and India continues. But all the disciplines and skills that India now seeks to exercise are borrowed. Even the ideas Indians have of the achievements of their civilization are essentially the ideas given them by European scholars in the nineteenth century. India by itself could not have rediscovered or assessed its past. Its past was too much with it, was still being lived out in the ritual, the laws, the magic – the complex instinctive life that muffles response and buries even the idea of inquiry.” - India: A Wounded Civilization

आपादकाल लागु झालेल्या भारत बद्दल त्यांचे विचार पहिल्या पुस्तका एवढे तीक्ष्ण नव्हते. त्यांची द्र्ष्टी थोडी मवाळली होती. भारतीय  समाज गर्तातून बाहेर पडायला जी धडपड करीत होता त्याची जाणीव त्यांना झाली होती. पण भारता बद्दल, भारताच्या इतिहासा बद्द्दलची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे भारत बद्दलच्या त्रयी मधी शेवटले India: A Million Mutinies Now हे पुस्तक. पुस्तकाचे शीर्षक मला फार आवडले. १९८० च्या दशकात लिहिलेलं हे पुस्तकात नवीन, तरुण भारताचा, जुन्या भारता विरुद्धचा 'ऊठाव' नायपॉल टिपतात.

“Independence was worked for by people more or less at the top; the freedom it brought has worked its way down. People everywhere have ideas now of who they are and what they owe themselves. The process quickened with the economic development that came after independence; what was hidden in 1962, or not easy to see, what perhaps was only in a state of becoming, has become clearer. The liberation of spirit that has come to India could not come as release alone. In India, with its layer below layer of distress and cruelty, it had to come as disturbance. It had to come as rage and revolt. India was now a country of a million little mutinies. - India: A Million Mutinies Now

खर सांगायचं तर १९८० च दशक हे भारता साठी फार वाईट होत. समाजवादाच्या विषवृक्षाची मुळे जणू अख्ख्या देश पादाक्रांत करीत होती. सरकार कडे  पैसा नाही, जनते कडे नोकऱ्या नाहीत, बंद पडणारे उद्योग आणि कारखाने आणि काँग्रेसी राज्यकर्त्यांना सत्तेचा आलेला किळसवाणा हुरूप यात देश फार विचित्र फसला होता. जागतिक स्तरावर चीनचा प्रभाव जाणायवाला लागला असतांना, भारत मात्र पुनः इतिहासात गुरफटतो की काय अशी शंका येऊ लागली होती. पण या सगळ्या धुमश्चक्रीत नवीन भारताची तृणें उभरत होती. भारत सरकार भारत चालवीत नाही, भारतीय भारत चालवतात आणि या भारतीयांच्या मेहनतीला, औद्योगिकतेला तोड नाही हे नायपॉल यांनी बरोब्बर ताडले. १९९० नंतरची भारताची प्रगती स्पृहणीय आहे आणि हे पुस्तक त्याचे द्योतक होते. त्यांच्या कल्पनेतील भारत त्यांना जणू क्षितिजावर पुनः दिसू लागला.

कल्पित आणि कल्पिताचा प्रवास नायपॉलांनी  विनासायस पणे जन्मभर केला. उत्तर भारतात जन्म झालेल्या अर्भकाची नाळ मूळ गावात पुरतात. ते अर्भक पुढे कुठेही जातो पण त्याच मूळ कधीच बदलणार नाही ही  त्या मागची कल्पना आणि ते अर्भक पुन्हा मूळ गावी परतेल हे इच्छा. नायपॉल  कादंबऱयांमध्ये निःशब्द, स्थलांतरीत, नाळ तुटल्या पात्रांना बोलक केल तर प्रवासवर्णनात जणू स्वतः ची नाळ पुरायाला जन्मभर जागा शोधत फिरलेत. अनुभवांनी त्यांच्या शब्दांना धार आली तर स्वतः ला शोधण्याच्या कष्टप्रद प्रयत्नांनी त्यांच्या शब्दांना जडत्व प्राप्त झाले. वडिलांनी ठेवलेल्या विद्याप्रसाद नावाचे सार्थक करीत या सरस्वतीपुत्राने इहलोकाचा प्रवास ११ ऑगस्ट, २०१८ ला संपविला.

नायपॉल यांना इंग्रजी भाषेत उपलब्ध सगळी पारितोषिके मिळालीत, इंग्लंड च्या राणी कडून 'सर' ही पदवी प्राप्त झाली पण हे सगळे मान-सन्मान केवळ नोंदी पुरते. त्यांनी शब्दांकित केलेले जग त्यांनी आपल्याला दिलेला खरा वारसा आणि त्यांचे शब्द पुढे नवीन वाचकांच्या द्वारे त्यांच्या विचारांचा प्रवास अखंड चालू ठेवतील हे त्यांचे खरे यश.