4/29/08

एक नम्र विनंती

प्रिय वाचक वृंद,
माझी जुन च्या पहिल्या आठवड्यात एक महत्त्वाची परीक्षा आहे। त्यामुळे मला लेखन करण्यास फारस वेळ मिळत नाहीया. मी दोन-चार लेख व एक्-दोन गोष्टी अर्धवट लिहुन ठेवल्या आहेत पण परीक्षा संपल्यावर लिखाण पूर्ण करुन लगेच मी त्या रुद्र शक्तिवर प्रकाशित करीन.


हे संकेतस्थळ जुन पर्यंत कृपया आठवणीत ठेवावे ही आपणांस नम्र विनंती।


तसदीबद्दल क्षमस्व.

आपला,
चिन्मय 'भारद्वाज'

4/13/08

जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे। विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे आहेत. आपल्या समाजात सध्या कुठलाही विवाद चूक किंवा बरोबर याच दोन दृष्टीकोनातून बघण्याची पध्दत रुढ आहे. काही विवाद जरी या पठडीत मोडत असले तरी बरेचशे मुद्दे चूक किंवा बरोबर यामधील लक्ष्मण रेषेत वावरतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले दंगे-धोपे निषेधार्थ आहेत यात काही वाद नाही. गजबजलेल्या राजकीय पडद्यावर आपल्या पक्षाची केवळ जाहिरात करण्या हेतु कोणी जर सामाजिक संपत्तीचे नुकसान करत असेल किंवा कोणास जीवे मारत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना सरळ कारागृहाचा रस्ता दाखवायला हवा. अर्थात, दु:खदायक गोष्ट ही की अनेकदा या पध्दतीचा वापर आपल्या समाजात झाला आहे. व कारागृह तर दूर पण आपल्या समाजाने असल्या राजकीय नेत्यांना निवडुन सुध्दा दिले आहे.

महाराष्ट्र गेले साठ वर्ष औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे। सुरुवातीला मुंबईचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा झाला. पण पुढे मराठी नेते मंडळीने पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास कौतुकास्पदरित्या केला. सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि थोड्या बहुत प्रमाणात नागपुर अशी विकसित औद्योगिक केंद्रे आहेत. उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्रासारखे राज्य अजुन कुठे सापडणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा सुरळीत चालते व बहुतांश ठिकाणी रात्री ११ नंतरही पोरी-बाळी घराबाहेर हिंडु शकतात. स्त्री-मुक्ती व दलितांची प्रगती या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवरच आहे. थोडक्यात, इतर राज्यांच्या तुलनेत (गुजरात वगळता) महाराष्ट्रात नोकर्‍या आहेत, सुरक्षितता आहे व सामान्य जनांसाठी कष्ट करुन पुढे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. अजुन काही कमी असेल तर मुंबई हे हिंदि चित्रपट उद्योगाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे इतर राज्यातुन जर का महाराष्ट्रात येणार्‍या लोकांची रीघ लागत असेल तर त्यात नवलाईची गोष्ट काही नाही.

लोकतंत्राच्या अंतर्गत भारतीय कुठल्याही राज्यात जाउन स्थायिक होउ शकतात। त्यामुळे बिहार मधुन कोणी मुंबईस येत असेल तर तसे करणे त्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांतर्गत मोडते. तसेच या स्थलांतरास विरोध करणे ढेकुण पणा तर आहेच पण त्यापेक्षाही अधिक असली विचार सरणी ही भारत-विरोधी मानायला हवी.

अर्थात, दिसत तसं नसत म्हणुनच जग फसत। गोष्टी इतक्या सोप्या असत्या तर राज ठाकरेंना कोणाचाही पाठींबा मिळाला नसता. अजुन निवडणुका दूर आहेत पण माझ्या मते हे असले सगळे धिंगाणे करुनही त्यांना बर्‍यापैकी जागा मिळतील. कारण त्यांनी उठविलेले मुद्दे विचार करण्यायोग्य नक्कीच आहेत. फक्त त्या मुद्द्यांचे निदान मूर्खपणाचे आहे. बिहारी लोक मुंबईत येउन हिंदी अवश्य बोलु शकतात पण त्यांनी मराठी शिकण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्यांनी छट पुजा दादर मधे करायला हवी पण गणेश उत्सवात तेवढाच भाग घ्यायला हवा. आणि बहुतांश प्रमाणात अस होत याची मला खात्री आहे. पण राज ठाकरें सोबतच समाजवादी पक्षा सारख्या मतांचा धंदा मांडणारे पक्ष पाणी गढुळ करुन टाकतात.

माझ्या संकेतस्थळावर मागे मी "मराठी माणुस कुठे हरवला?"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा "भूक लागली" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्‍याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे? मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्यक्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार? बिहारी?.

या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार राज ठाकर्‍यांनी केला असणार हे मी अगदी मानायला तयार आहे. या प्रश्नांचा कोणी तरी विचार करायलाच हवा, उत्तरे शोधायलाच हवीत. थोडक्यात, राज ठाकरे पूर्ण चूक नाहीत व पूर्ण बरोबर नाहीत. खेदजनक वस्तुस्थिती अशी की सगळ्यांना सोबत घेउन प्रगतीच्या दिशेनी जाण्या ऐवजी, सगळ्यांना सळो का पळो करुन समाज विभाजनाकडे त्यांची वाटचाल झपाट्याने सुरु आहे

इथे अजुन एक लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे ज्या मराठी माणसाबाबत बोलतात तो मराठी माणुस फक्त खर्‍यात मुंबई निवासी आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रात रहाणारा मराठी माणुस आहे? (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो?) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात। मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रा बाहेर येत सुध्दा नाहीत. राज ठाकरेंच्या मते मराठी माणुस दिसत नाही यात जरी तथ्य असलं तरी यावर उपाय महाराष्ट्रातून बिहारी-उत्तर प्रदेशींना काढुन टाकणे हा नक्कीच नव्हे. मुंबईत बिहारी भैय्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टॅक्सी चालकां पासुन ते दुधवाल्यां पर्यंत तीच लोक सगळीकडे दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लोकं मराठी लोकांच्या नोकर्‍या हिरावुन घेतायत. मुंबईत सगळ्यांना पुरुन उरेल इतक काम आहे व त्यामुळेच ही लोक मुंबईला येतात.

खर सांगायचं पर-राज्यीय लोकांचा या भानगडीशी काही संबंध नाही. स्वतः शिवसेना सत्तेत असतांना (तेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते) त्यांनी काय दिवे लावले? कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किंवा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात? दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर राज ठाकर्‍यांना सापडले की मगच आपण मराठी भाषिकांच्या विकासाबद्दल विचार करण्यास मोकळे होऊ.

* कृपया माझे या विषया संबंधीत "येथे मराठेचिया नगरी" आणि "मराठी माणुस कुठे हरवला?" हे दोन लेख अवश्य वाचावेत. *