9/3/07

सावल्यांचा खेळ

गावात शुकशुकाट झाला होता. बहुतांश मंडळी झोपण्याची तयारी करत होती. अधुन-मधुन बोलण्याचा-खाकरण्याचे आवाज येत होते. वेशीपाशी भल्या मोठ्या वडाच्या झाडा खाली दोन म्हातारे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या समोर काही अंतरावर गावातला डोंब्या पागल स्वता:शी गुणगुणत वेगाने येर-झारा घालत होता. "दिसतय मला सगळं" अस काहीसं तो बडबडत होता. ती दोघी म्हातारी त्याच्याकडे शुन्य भावनेने बघत होती.

"तुमचा भुतांवर विश्वास आहे का?" पहिल्याने विचारले.

दुसर्‍या म्हातार्‍याने उत्तर लगेच दिले नाही. दिर्घ सुस्कार टाकला "मगापासुन बिडी शिलगवायचा प्रयत्न करतोय पण च्या मारी तर शिलगतच नाहीया" त्याच्या तोंडातुन शब्द कडमडत बाहेर पडलेत.

पहिला म्हातारा डोंब्या पागलाकडे निरखुन बघु लागला.

"डोंब्या तुम्हाला भुत वाटतो का?" दुसर्‍याने विचारले.

"छे छे. आपण वडाच्या पारावर बसलोय म्हणुन उगाच मनात पाल चुकचुकली. "

"भाईसाहेब आज तरी येणार आहेत का?" दुसरा त्रस्तपणे उदगारला. पहिला म्हातारा काय बोलतोय याच्याकडे त्याचं लक्ष होत की नव्हत, माहिती नाही.

पोर्णिमेच्या चंद्राचा ढगांसोबत लपंडाव चालु होता. पाऊस पडण्याची चिन्हे इतक्यात दिसत नव्हती. मंद-मंद गार वारा वहात होता. दोन्ही म्हातारे आता मांड्या ठोकुन बसलेत.

"डुम डुम...डल डल..हुम हुम" डोंब्या पागलाच्या या अवकाळी अंगात आली होती. त्याने नाच करायला सुरवात केली होती.

"मला वाटत असतात" दुसर्‍याने उत्तर दिले.

"परदेशात गेला होता तेंव्हा तिथली भुत गोरी होती का?" पहिल्याने विचारले.

दुसरा म्हातारा जोरात हसला. "तिथे सगळीच लोकं भुत असतात. सुखाच्या शोधात, ती मेणाचे पुतळे दु:खी जीवन कंठत असतात"

"सगळीकडे तीच राम कहाणी" पहिला म्हणाला.

"तुम्हाला वाटत का की स्वर्ग-नरक असतो म्हणुन? आणि जन्मभर जी कामे करता त्यावर माणुस कुठे जाईल हे ठरत म्हणुन?" दुसर्‍याने प्रश्न केला.

आता उत्तर न देण्याची पहिल्याची पाळी होती. दोघे परत डोंब्या पागलाचे धिंगाणे बघु लागलेत. त्याने कचरा गोळा करुन शेकोटी पेटवली होती.

"याच्या अंगात आली वाटत." अस म्हणुन पहिला म्हातारा जोरात डोंब्या पागलावर खेकसला " ए..असा भूतासारखा काय तांडव करतोय विस्तवा समोर?"

डोंब्या पागलाने न ऐकल्यासारख केलं.

"स्वर्ग-नरक अस काही नसाव. आपली शास्त्र भुता-प्रेतांबद्दल फारस काही बोलत नाहीत. आत्मा आहे अस म्हणतात आणि त्या आत्म्याचे अंतिम लक्ष ब्रह्मांडात विलिन होणे आहे अस आपला धर्म मानितो. " मग खिन्नपणे हसुन म्हणाला "तसही या भूतलावर जगल्यावर ना स्वर्ग सुखावणार ना नरक दुखावणार. "

"मला नेहमी वाटायचं की आरश्यातील प्रतिमा आपल भुत असत म्हणुन. ही प्रतिमा आपली साथ कधीच सोडत नाही. मेल्यावर शरीर नाहीस होइल पण प्रतिमा कायम राहिल. " पहिला म्हातारा म्हणाला.

आताशा चंद्र काळ्या ढगांच्या पांघरुणात गुडुप झाला होता. ऊकाडा वाढत होता.

"पण हि प्रतिमा खरी असते की लोकांनी आपणास कस बघाव या चौकडीत बांधलेल ते एक चित्र असत?" दुसर्‍याने विचारले.

"म्हणजे?"

"म्हणजे असं की आपल्या मनातील भावनांचे रंग त्या प्रतिबिंबात उमटतात. आपण सुंदर आहोत अशी समजुत केली की आपली प्रतिमा आपणांस सुंदरच दिसते. थोडं गमतीदार वाटेल मला वाटत की आपली सावली आपलं भुत असतं. कारण, एक तर ती आपली साथ कधीच सोडत नाही आणि आपण जे खरे आहोत तश्शीच अगदी सावली पडते. जणु आपल्या कर्माची ती प्रतिमा असते. काळीभोर आणि गुढ. " दुसरा उत्तरला.

"पण आपण हे बोलतांना एक तपशील विसरलो की मेल्यावरच माणसाचं भुत होउ शकत. आरश्यातील प्रतिबिंब काय किंवा सावली काय, मेल्यावर सगळंच नाहीस होणार." पहिल्याने स्वत:चं म्हणण खोडुन काढल.

"कोण म्हणत की मेल्यावरच भुत होतं म्हणुन. मी तर म्हणतो की अर्धी दुनिया भूत आहे. जिता तर माणुस आणि मयत तर भूत ही व्याख्या मानली तरी या दोन परिस्थितीं मधे तिळमात्र फरक नाही. गेली २६ वर्षे जमिनीच्या तुकड्यावरुन माझ्या भावंडांशीच भांडतोय. ना मी सोडायला तयार ना ते माघार घ्यायला तयार. आता सांगा माझ्यात आणि भुतात काय फरक? आम्ही दोघेही अतृप्तच!" कोर्ट-कचेर्‍याच्या आठवणींनी दुसर्‍या म्हातार्‍याच्या डोळ्यात कटुता, द्वेष आणि रागाच्या विचित्रश्या छटा उमटल्यात.

तो पुढे म्हणाला "तुमचं सांगा? पोरानी आणि सुनेनी छळ-छळ, छळल तुम्हाला. पण भेसळीच्या प्रकरणात पोरगा पकडल्या गेला तर तुम्हीच गेला होतात ना धावत, मामलेदाराचे पाय धुवायला. आणि एवढ करुन, जेलातुन बाहेर येउन काय व्यवहार केला तुमच्या सोबत त्याने?"

पोराचे नाव ऐकुन पहिल्या म्हातार्‍याच्या डोळे काकुळतेने पाझरु लागलेत. " ही बाळंतपणातच गेली. आई-विना पोरं म्हणुन त्याचे खुप लाड केलेत. काय मिळालं? ती जाब विचारेल तर काय उत्तर देऊ?"

कुठे तरी पाऊस पडला असावा. आसमंतात मातीचा सुंगध दरवळत होता.

"शेवटी आपल्या संचित कर्माची फळ भोगावीच लागतात. ती सावलीत जमा होवो किंवा आरश्यात प्रतिबिंबाच्या मागुन डोकावित असतील, भोग कोणाचेही चुकायचे नाहीत. पण दु:ख भोगणे हेच जेंव्हा कर्म होते तेंव्हा मनुष्य भुत होतो. मनुष्य जिवंत असो किंवा मेला असो. " दुसरा म्हातारा दिर्घ श्वास टाकत उदगारला.

दुसरा म्हातारा हळु-हळु उभा राहिला व शत-पावली घालु लागला. पाऊस भुरट्यासारखा पडु लागला होता. डोंब्या पागलाची, पेटवलेली शेकोटी, वाचविण्याची धांदल उडाली. तो आगीला कागदाने किंवा प्लास्टिकने झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. आग मिळेल ते भस्म करित होती.

"तुम्हाला खात्री आहे का की भाईसाहेब येणार आहेत?" पहिल्याने विचारले.

"वाटत तर आहे असं. भारी चिवट आहेत ते. जाउन जाउन कुठे जाणार, इथेच येणार.
पण मी आपण बोलतोय त्या विषयाचा विचार करत होतो" दुसर उत्तरला.

थोड़ा विचार करुन तो बोलला " आपली शास्त्र भुतांबद्दल बोलत नाहीत असे तुम्ही म्हणालात. आत्म्याची ब्रह्मांडात विलिन होणे हे अंतिम लक्ष आहे हे सुध्दा खरं. पण त्यासाठी संचित कर्मांचा हिशोब करावा लागतो आणि त्या अन्वये अनेक जन्म घेणे निश्चित आहे. पण यात मला थोडा घोटाळा वाटतो. या जन्मातील इच्छा, आकांक्षा, दु:खांचा हिशोब करायला, पुढला जन्म याच घरात, याच परिसरात घ्यायला नको का? जीथे कचरा आहे तिथेचा सफाई व्हायला हवी. दुसरी कडे सफाई करुन काय उपयोग?" दुसरा म्हातार्‍याने आपली बाजु मांडली.

"तुमचं म्हणण काय की पुर्नजन्म नसतोच?" पहिल्याने आश्चर्याने विचारले.

"असतो ना. पण मला असं वाटत की जर का कोणाचं चित्त कशात फसल असेल तर त्या व्यक्तीचा पुर्नजन्म होईलच कसा?" दुसर्‍याने उत्तर दिले.

हें ऐकुन पहिला म्हातारा हसायला लागला. त्याचं हसण वाढतच गेलं.

" विनोद करत नव्हतो मी" दुसर्‍याला थोडा राग आला.

"विनोद केला अस माझ म्हणण नाही" पहिल्याने उत्तर दिले. क्षणभर थांबुन तो अडखळत म्हणाला "विनोद नाही तर काय? इथे तुमच्याने कोर्टाचे खटले झेपले नाहीत व पोराला शिस्त लावण्यात माझी हयात निघुन गेली. आणि तुम्ही मला सांगताय की पुर्नजन्म आपल्यावर अवलंबुन असतो!" एवढ म्हणुन तो परत हसु लागला.

"मला एक सांगा की आपल्या शास्त्रात आत्मशक्तिला किती महत्त्व आहे?" दुसरा म्हातारा आता पेटला होता.

"खुप" पुढुन उत्तर आले.

"मनावर विजय प्राप्त करुन माणुस आमुलाग्र बदलु शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो."

"आपण भुतांबद्दल बोलतोय" पहिला खवचटपणे बोलला.

"ऐका हो थोडं. हां तर माझा मुद्दा असा की नुसता जगण्यावर नाहीतर तर आत्मबलावर मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो" आता तुम्हीच सांगा, मनात कुठलीशी तीव्र इच्छा असेल किंवा तीव्र दु:ख असेल तर मन आत्म्याला पुर्नजन्म घेऊ देइल का? मोक्ष प्राप्त होउ देइल का? ते आपल्याला आपल्या पूर्वायुष्याशी बांधुन ठेवणार नाही का? मग शरीर जीवंत असो वा नसो"

हे ऐकुन पहिला म्हातारा बराच अस्वस्थ झाला. पाउसही थांबला होता आणि गारवा परत जाणवु लागला होता. शेकोटी विझली म्हणुन डोंब्या पागल हुंदके देउन रडत होता.

तेवढ्यात अचानकपणे गावातल्या एका वाड्यात धाव-पळ सुरु झाली. काही वेळातच रडण्याचे सुर उमटु लागलेत.

दोघे म्हातारे उत्सुकतेने गावाच्या दिशेनी बघु लागलेत.

भाईसाहेब दुरुन चालत येत होते.