5/16/11

शुन्यातून शुन्याकडे

भ्रष्टाचारावर लेख लिहायला घेतला पण कानात वारं गेलेल्या खोंडा सारख मन विचित्र उधळतय. संथ गतीनी चालणार गाड जणु उतारावर भरधाव गडगडायला लागलय. किंवा मला आता ते आत्ता जाणवायला लागलय. लहानपणी आजुबाजुच काहीच बदलणार नाही ही भावना कळत-नकळत रूढ होते. पण मोठ झाल्यावर जवाबदार्‍यांच ओझ घेऊन चालायला लागल्यावर काहीतरी बदलत. कोण सुखी किंवा कोण दु:खी याबद्दल मी बोलत नाही. पण नोकरी, नोकरीतील ताप, पोर-बाळ, त्यांना मोठ करण, त्यांच्या काळज्या, रुढी-परंपराचे दोर, पैसा कमविणे, साठविणे, घर बांधणे इत्यादी कार्यात किंवा त्यांच्या ध्यासात अर्थशुन्यता कुठे तरी डोकावते. हा खेळ एकतर, मांडुन निघुन जायच किंवा विस्कटुन निघुन जायच. थोडक्यात निघुनच जायच तर खेळ मांडायचाच कशाला?

वल्कल बांधुन हिमालयात गेलेल बर.

कर्मयोगानुसार
सांसारीक कर्तव्ये करणे धर्म आहे तर त्याच्या फलप्राप्तीत मला फारसा अर्थ वाटत नाही. अलेक्झांडरला एक बैरागी भेटला. एक ज्ञात जग जिंकण्या साठी तहानलेला तर दुसर्याला संध्याकाळच जेवण कुठे मिळणार याचा पत्ता नाही. अलेक्झांडरने भारतातल्या बैराग्यां बद्दल खुप ऐकल होत म्हणुन त्या अर्ध-नग्न बैराग्याला थांबवुन त्याच्या निकम्म्या जीवनाचा अर्थ विचारला.
"लोक म्हणतात की तू जगज्जेता आहेस?" बैराग्याने त्याला उलट प्रश्न विचारला
"हो" अलेक्झांडर आश्चर्य वाटल की बैराग्याने उलट प्रश्न विचारण्याची हिम्मत केली बघुन.
"म्हणजे तू शूरवीर आहेस, महत्त्वाकांक्षी आहेस, मुत्सद्दी आहेस पण तू भ्रमात आहेस हे तुला माहिती आहे का?"
अलेक्झांडरने कपाळावर आठ्यांच जाळ विणल.
बैरागी जंगलात गेला आणि झाडाच साल घेउन आला. ओल्या सालपटीचा वास तंबूत पसरला.
"एवढाल्या ढाला-तलवारी तुझे बाहु पेलतात. ही सालपटी हाताने सरळ करुन दाखव"
अलेक्झांडरला हसु आल. त्याने विचार केला की काय वेळ घालवण चाललय. पुढल्या चढाईची तयारी करायची आहे.
मग पुढला अर्धा तास त्याने सालपटी सरळ करण्याची खटपट लावली. शेवटी थकुन अलेक्झांडर घामेघुम झाला पण सालपट तशीच्या तशीच होती.
जगज्जेत्या अलेक्झांडरची ती दूर्दशा बघुन तो बैरागी खुप हसायला लागला.
"तुला वाटल की सालपट सरळ करण पोरखेळ आहे?"
"पोरखेळ नाहीया हेच सिध्द करायच होत?" अलेक्झांडरने रागात विचारले.
"चूक, पोरखेळच आहे. तेवढच महत्त्व आणि तेवढाच अर्थ आहे" अस म्हणुन तो बैरागी निघुन गेला.

अलेक्झांडर ने त्या घटनेचा काय अर्थ लावल कोण जाणे कारण त्याच्या चढाया पुढे चालूच होत्या पण अस म्हणतात की त्याची अंतिम इच्छा अशी होती की त्याचे हात त्याच्या कफनीतून बाहेर काढलेले असावेत. त्याला जगाला हे दाखवायच होत की त्याच्या सारखा जगज्जेताही रिकाम्या हातीच मेला.

ग्रीस पासून ते सिंधु पर्यंतचा भूमीराजाला शेवटी सहा फूटाचीच कफन हक्काची मिळाली.

आपण आपल विश्व आधी आखतो, सजवतो आणि सुखी असण्याचा भास निर्माण करतो. विहिरीतल्या बेडकासारख. म्हणुनच शंकराचार्यांनी याला मिथ्या म्हणत असावेत. कारण हे सगळ निरर्थक आहे. झोपल्यावर बंद डोळ्यांच्या कप्प्यांमधे जस वेगळच विश्व निर्माण करतो, रडतो-हसतो, ओरडतो, भांडतो, प्रेम करतो, अगदी तसलच जग डोळे उघडे ठेउनही निर्माण करण्याची तडफड करतो. असाध्य साध्य करणासाठी, अचिंत्य चिंतण्याची, निरर्थ सार्थ करण्याचा तडफडाट करतो.

तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की ती बडबड मनात आशा निर्माण करते. या जीवनाला अर्थ नाही पण मेल्यानंतरच्या अवस्थेच्या जाळ्यात आपण फसतो. मेल्यावर मला प्राप्त परिस्थितीत ज्ञात असलेले मीत्व उरत नाही तर तेंव्हाच्या वस्तुस्थितीची कल्पना या 'मी' ला कशी येणार? जे नाही त्याची असतांना अनुभूती कशी होणार? आणि जेंव्हा केंव्हा हे मीत्व नाहीस होईल तेंव्हा 'असण्याचा' विचार कसा करता येणार? किंव्हा त्याहुनही महत्त्वाच की तो विचार का करणार?

वीर्यवत अस्तित्वाचा आपण जन्म घेतल्यावर कधी तरी करतो का? किंव्हा करु शकतो का? लाखो-करोडो वीर्यातून एकाला जीवनाची प्राप्ती होते. एका दृष्टीने हा चमत्कारच मानावा लागेल. तुम्ही आस्तिक असा किंव्हा नास्तिक, जन्माची प्रक्रिया थक्क करते. पण यातुन काय निष्पन्न होत याचा विचार केला तर हातात फारस काही लागत नाही. जन्म घेतल्या क्षणापासुन आपण काही तरी निर्माण करण्याचा आटापिटा करतो पण खर्‍यात समुद्र किनार्‍यावरचे रेतीचे किल्ले बांधण्याहुन अधिक काहीच साध्य करत नाही. नागडे येतो आणि नागडेच जातो.

प्रवास शुन्याच्या या बाजुनी त्या बाजुला. बेरीच नेहमीच शुन्यच.