9/23/09

जगाच्या पाठीवर

लोकांकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा माझ मन एक वेगळाच खेळ खेळत असत. हा जो मनुष्य माझ्या समोर उभा आहे तो या स्थितीत कसा पोचला. समोर भिकारी असेल तर तो भिकारी कसा झाला? त्याचे आई-बाबा पण भिकारीच होते का? त्याच लहान पण कस गेल असेल? भिक मागण्यातच का? तो लहान असतांना समाज स्थिती कशी होती? समोर चांगल्या पोषाखात कोणी उभा असेल तर त्याने तरूणपणात कुठले निर्णय घेतले असतील? की तो श्रीमंत घरात जन्मला होता आणि आयुष्यभर एक काडी इकडची तिकडे न करता तो ऐष करत जगला? अर्थात मी प्रत्येकाला जाऊन "तुम यहां पर कैसे पोहोचे?" अस विचारत नाही. तसं करण थोड विनोदीच ठरेल पण अश्या दृष्टीने बघायला लागल की जग वेगळ्याच रंगात दिसायला लागत. माझ्या आजोबांच बालपण १९१० च्या दशकात गेल. तेंव्हा वीज नव्हती, विमान नव्हती आणि इंटरनेटही नव्हत. पण त्यांच्या मृत्युच्या आधी त्यांनी सगळं बघितल. त्यांच्या लहानपणी लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व करत होते तर ते जायच्या वेळी कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याची वैयक्तीक मालमत्ता झालेल होत. त्यांच्या लहानपणी जात-पात मानल्या जात असे तर त्यांच्या हयातीत दलित व्यक्ती भारताचा राष्ट्रपती झालेला होता. वैयक्तीक तसच सामजिक पटलावर एवढा प्रचंड बदल घडलेला होता की जर का त्या पिढीला बोलत केल तर इतिहासाच एक आगळ-वेगळ दालन उघडेल.

सामाजिक बदलांना आपण सध्या बाजुला ठेउया. तो वेगळा विषय ठरेल. वैयक्तिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ति स्वतःतच एक कथा असते. काही कथा रोमांचक असतात तर काही भीषण असतात. काही अगदीच सपक असतात तर काही स्फुर्तीदायक असतात. पण या कथाच जगाला रंग देतात. जगात करोडो लोक निवास करतात. मला नेहमी वाटत की कृष्णाने विश्वरूप म्हणजे नेमक हेच दाखवल आणि अर्जुनासारखा पुरुष ते बघुन घाबरला. आपण सामान्य जन हे भीषण रूप बघण्याच्या लायकीचे नसतो आणि अनभिज्ञपणे आपल आयुष्य कंठत असतो. जगाच सोडा, आपल्या आजु-बाजुला, ओळखीचे आणि नुसते तोंड देखले ओळख असलेल्यां पैकी किती लोकांबद्दल आपल्याला माहिती असते. काही यशस्वी असतात आणि अपयशी. पण कुठलाच व्यक्ती अपयशाची अपेक्षा ठेवत नाही. आणि प्रत्येकातच यशस्वी होण्याची कुवत नसते. म्हणुनच व्यक्तीमत्वे प्राप्त आकार घेतात. प्राप्त परिस्थितीत आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांच्या चौकडीत प्रत्येक मनुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. मूळ स्वभाव बदलत नाही हे जरी मान्य तरी मनुष्य स्वभावाच्या ज्या विविध छटा दिसतात त्यात सोबतीच्या लोकांचे पडसाद आणि आजुबाजुच्या जगाची छायेतच वावरतो.मनुष्य घडविण्यात इतक्या सार्‍या घटना सामिल असतात की त्या व्यक्तिला सुध्दा बर्‍याचश्या गोष्टींची कल्पना नसते. पण लोकांना बोलत केल तर त्यांच्या आयुष्याचीच नव्हे तर त्यांच्या आजु-बाजुच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत.

आपण आपल्यातच इतके गुंग असतो की जगाला आपण एका विशिष्ट चौकडीत बांधुन टाकतो. ज्या आकलनी पडतात त्यांना आपण स्वतःला मध्यबिंदु ठरवुन विभाजित करतो. हा व्यक्ती माझ्या पेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याच यशस्वी होण सहाजिकच आहे. तो जर का अपयशी ठरला तर आपण हसतो. या व्यक्ती पेक्षा आपण हुशारच होतो त्यामुळे आपल यशस्वी ठरण सहाजिकच आहे आणि जर का तो यशस्वी ठरला तर नशिब साल्याच! ज्या गोष्टी आकलनाच्या पलिकडे असतात त्याचा आपण विचारच करत नाहीयात यशापयाशाच्या व्याख्या सुध्दा स्वतःला माप-दंड ठरवुन आपण आखतो. या सगळ्या खेळात मी महत्त्वाचा. शिवा-शिविच्या खेळात मीच दाम देणार आणि मीच पळणार. गमतीदारच प्रकार आहे थोडा पण सगळेच खेळत असतात म्हणुन कोणी कोणाला विचारत नाही.

आपण समाजात राहुन, स्वतःला सामाजिक प्राणी म्हणवतो आणि आयुष्यभर समाज विन्मुख जगतो.

यावर उपाय काय मलाही माहिती नाही. जागतिकीकरणाच्या अर्थशास्त्रानुसार आज जग एकामेकांवर अधिकाधिक अवलंबुन रहाणार आहोत. थोडक्यात आपल्याला एकामेकांच्या आयुष्यात डोकावुन बघावच लागणार. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरितच आहे. बारकाईने बघितलत तर आपण एकामेकांपेक्षा अजुन दूर जातो आहोत हेच ध्यानात येत. खरतर आजच्या काळात प्रसारण माध्यमांचा इतका सुळसुळाट झाला आहे की जगाच्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक लहान्-मोठ्या घटनेला जगभर प्रक्षेपित केल्या जात. जग लहान होण्याचे परिणाम मात्र विपरीतच होतो आहे. पराकोटीला गेलेली प्रत्येक वस्तु धुळीसच मिळते त्या प्रमाणे अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्याचे परिणाम, माहिती मुळीच उपलब्ध नसण्यासारखेच आहे. जगात असलेल्या पीडांचा, ज्यांच्यावर गुजरत नसते त्यांना मुळीसुध्दा फरक पडत नाही, किंवा ती लोक मुळीच फरक पडुन घेत नाहीत. यात प्रसार माध्यमांची सुध्दा बरीच चूक आहे. उपलब्ध बातम्यांतुन जणु ही माणुसकीच गाळुन टाकतात आणि रहाते फक्त बातमी. इतके-इतके मेलेत, मग ते वाहुन गेलेत काय किंवा बंदुकीनी कोणी मारलेत काय किंवा सगळ्यांनी आत्महत्या केली काय, एकच आहे.सगळ्यांनी उठुन बाबा आमटे बनाव अस माझ म्हणण मुळीच नाही पण जगाकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातुन थोडं मायेने बघितलआणि संवाद साधला तरी पुरेसे आहे.

9/14/09

रेखांकित भाग ३

ताप उतरल्यावर लगेच मेघनाला घरी आणल. ताप सोडला तर बाकी सगळ ठीक होत पण तिने ताप चांगलाच अंगावर काढला होता. तिल घरी येऊन एक आठवडा व्हायला आला होता तरी तिचा थकवा काही जायच नाव घेत नव्हता. घरच्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तिला अचानक एवढा फणफणुन ताप यायला झाल काय? डॉक्टरांनाही काहीच कळेना. शहरात कुठली साथ वगैरे सुध्दा सुरु नव्हती. अजुन काही कमी असेल तर घरी आणल्यापासुन मेघना पहिल्यासारखी वागत नव्हती. नुसती शांत बसुन असायची. तशी ती फार बोलकी होती अस नाही पण तिने आता एकदम अबोला धरला. तिच तापातल असंबंध बोलण बघुन डॉक्टरांनी काही मानसिक तर दुखण नाही ना याची चौकशी केली होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांची काळजी अजुन वाढली
जसलीनच जाण-येण वाढल होत. एकदा मेघनाच्या आईने तिला विचारल की काय चाललय म्हणुन पण तिच्याकडुनही फारस काही बाहेर आल नाही.

"अनिकेत कुठे असतो आजकाल?" मेघनाने विचारल.

"माहिती नाही मला पण तुम्ही दोघेही अमेरिकेला जायची तयारी करताय ना? त्यातच गुंग असेल तो." जसलीन उत्तरली.

जणु काही घडलच नाहीया अस त्या दोघी बोलत होत्या.

"का ग तुझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही या का? कि मी देउ तो?" उगाच खौटपणे ती पुढे बोलली.

थोडा वेळ कोणीच काही बोलल नाही. मेघना नख खात होती आणि जसलीन पुस्तक चाळायला लागली. "खुप उकडतय. पाऊसही पडत नाहीया. पावसाची चाहुल लागताच वीज जाते. पंखे बंद" जसलीन गरमीने त्रस्त झाली होती. आकाशात ढगांनी गर्दी केंव्हाची केलेली होते. मुहुर्ताची वाट बघत त्यांनी वार्‍याचा व्यवहार थांबवला होता.

"फोनवरही तो इतका तुटक-तुटक बोलतो की काही न बोलल्यासारखच असत. जे विचारल तेवढ उत्तर देतो. 'कसा आहेस?' तर उत्तर येत. 'छान' आणि मग शांतता. 'मी कशी आहे विचारणार नाहीस का?' तर उत्तर येत की 'कशी आहेस?'

आता काय करू सांग" मेघना म्हणाली.

"त्याच्या डोक्यात काय चाललय मला नाही माहिती पण विचार कर तुला कोणी सांगितल की तुझा मृत्यु अटळ आहे वगैरे तर काय बितेल तुझ्यावर? मला तर कल्पना करणही अशक्य आहे" जसलीन म्हणाली.

" आणि माझ्यावर काय बितते आहे हे तुल दिसत नाही हे बरय. माझ्य नशिबि तो मरणार आहे. माझ नशिब फत्थर आहे. मी नाट आहे. मी नसती तर तो सुखात असता. मी नसती त्याच्या आयुष्यात तर त्याला..." मेघना एकदम शांत झाली.

"...तर त्याला आयुष्य होत" अस म्हणत ती रडायला लागली. "पण तो भेटत का नाहीया? मला आता राग येतोय त्याचा"

"किती वेळा सांगितल की तोच-तोच विचार मनात घोळवु नकोस. म्हणुनच तू बरी होत नाहीयास. तुझा थकवा जात नाहीया. आणि वा, तुला त्याचा राग येतोय! छान! " मग काही क्षण थांबुन जसलीन पुढे म्हणाली.

"मला माहिती नाही की मी हे तुला सांगायला हव की त्यानीच तुझ्याशी बोललेल बर पण तु हॉस्पिटल मधे असतांना मी त्याला बाबा बद्दल सांगितल. त्या नंतर तो बाबा ला स्वतः भेटायला गेला होता. बाबाने त्याला काय सांगितल मला नाही माहिती पण तो त्यांनंतर अजुन काही भविष्य सांगणार्‍यांकडेही गेला होता."

"मग?"

"मला त्याने फारस सांगितल नाही. पण तो एवढच म्हणाला.." जसलीन बोलायच थांबुन गेली

मेघना डोळे विस्फारुन करुन तिच्या बोलण्याची वाट बघत होती.

"तोच सांगेल तुल पुढच"

"आत्ता पर्यंत का लपवलस? सांग काय म्हणाला तो"

"मेघना" अस म्हणत जसलीननी मोठ्ठा श्वास सोडला.

"तो एवढच म्हणाला की कोणीच त्याला भविष्य सांगायला तयार नाही. सगळ्यांनी त्याला परतावुन लावल."

तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.

"अनि येतोय"

"बर, त्याला सांगु नकोस की मी तुला काही सांगितल म्हणुन"

"हो"

"मी निघते. काळजी घे. काकु विचारत होत्या सारख की मेघनाच काय चाललय म्हणुन"

"तु काय सांगितलस?"

"मी काय सांगणार. पण तू त्यांना अनिकेत बद्दल सांगुन टाक लौकर. अजुन उशीर करून काय होणार."

"काय सांगणार, दगड" मेघना पुटपुटली.

"बघ, झाली सुरुवात परत. इतक्या दिवसांनी भेटतोय तर थोडा प्रसन्न चेहर्‍याने स्वागत कर त्याच. तो चांगल्या मुड मधे नसणार॑"

"जसलीन, तू अजुन काही तरी लपवतेयस माझ्यापासुन" मेघना भुवया वर करत म्हणाली.

"काही गोष्टी मी न सांगितलेल्या बर. आणि काही गोष्टी त्यानेच तुला सांगितलेल्या बर्‍या, मी मधे पडण बरोबर नाही"

मेघना काहीच बोलली नाही. अनिकेत आल्यावर काय बोलाणर होणार या विचारात तिच मन धाव-पळ करत होत.

जसलीन गेल्यावर दहा मिनिटातच दाराची घंटी वाजली.

"घरी कोणी नाहीया का?" अनिकेतने घरात पाऊल ठेवताच विचारल.

"नाही"

तो खिडकीजवळ जाऊन बाहेर बघु लागला. त्याने नेहमीप्रमाणे खिशात हात घातले होते. "कुठे गेलेत सगळे?"

"घरातल्यांना भेटायच असेल तर नंतर ये. आत्ता फक्त मीच भेटु शकते" ती त्रस्तपणे उत्तरली.

अनिकेतने घरात जणु डाव्या पायाने आला होता. आल्यापासुन अनिकेतच तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हत हे बघुन मेघना आतल्या आत धुमसायला लागली होती.

"मी काही खाणार नाहीया तुला" ती फणकारली.

"किती गोड स्वागत करतेयस माझ. मला एकदम छान वाटतय बघुन" अनिकेत तुटक्या आवाजात मागे वळुन म्हणाला.

"इतक्या दिवसांनी भेटलास, विचारल तरी का की मी कशी आहे ते"

"किती वेळ झाला मला घरात पाऊल ठेवुन?" अनिकेत मनगटावरच घड्याळ तिच्या समोर नाचवत म्हणाला. तोही पेटला होता. " जेमतेम चार मिनट झाली असतील. आणि तुझा सुंदर मुखडा बघुन कुठुन इथे आलो अस झालय मला"

"मग आलाच कशाला? फोनवरच तुझ बोलण पुरत मला"

"मेघना, डोक चरायला गेलय तुझ" अनिकेत दात-ओठ खात म्हणाला.

"अस बोलायच असेल तर जा तू इथुन"

अनिकेत ने काहीच उत्तर दिल नाही. तो खिडकीतुन परत बाहेर बघायला लागला. काही क्षण असेच गेलेत.

"नको ना भांडुस असा" मेघना काकुळतेने म्हणाली.

दोघांनांही असली भेट अपेक्षित नसावी. कसल्यातरी विचारात दोघेही मग्न झालेत. कोणीच काहीच बोलेना. इतक्या दिवसांची भेट अस रूप घेइल अस तिला वाटल नव्हत. तिला अनिकेतला घट्ट मिठी माराविशी वाटत होती. त्यानी आपल्याला कुशीत घ्याव आणि लाड करावे अशी तिची अपेक्षा होती. पण तस काहीच घडल नाही. अवघडल्यासारखे दोघे भेटलेत आणि एकामेकांवर निखारे बरसवत होते.

मगापासुन मुहुर्ताला खोळंबलेला पाऊस शेवटी पडायला लागला. इतका वेळ दाटुन आल होत पण पाऊस जोरात पडत नव्हता. थेंबांची एकच रीघ संथपणे पडत होती.

मेघनाकडे न बघताच त्याने विचारले, "राणी तू कधी आरश्यात स्वतःला बघितल आहेस का?"

मेघनाला कळेना तो थट्टा करतोय कि खरच विचारतोय.

"म्हणजे?" तिने चाचपडत विचारल.

"वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि तुझ लग्न शुभ मंगल सावधान" तो हसत म्हणाला.

"काय बोलतोयस अनि?" मेघनाला तो काय बोलतोय अजुनही कळेना. त्याच ते हसण विक्षिप्त होत.

"तुला मातीचा वास येतोय का?" अनिकेत तंद्रि लागल्यासारखा बोलत होता. "पाऊस पडायला लागला की लोक वेगळेच वागयला लागतात. एकदम ताजे-तवाने दिसायला लागतात. त्यांच्या नकळत. आणि पावसा नंतर सगळीकडे चिखल आणि घाण होत असली तरी पाऊस निदान आधीची घाण वाहुन घेऊन जातो. नाहितर नविन घाणीला जागा कशी मिळणार? हे चक्र सदैव चालू असत. कधीही न संपणारा शिवा-शिविचा खेळ. निसर्गाच्या प्रत्येक चालीत हा खेळ दिसतो."

काही क्षण तसेच गेलेत. मेघनाच्या मनात शुन्य होत तर अनिकेतच्या मनात विचारांची धांदल उडाली होती.

"तुला मातीचा वास आवडतो का सांगितल नाहीस?" तो अजुनही मेघनाकडे बघायला तयार नव्हता.

"हो"

"मला खुप-खुप आवडतो. नव-निर्मितीचा वास असतो तो" त्याने पहिल्यांदा मेघनाकडे वळुन बघितल. "बाकी माझी बडबड सोड, पण मी हा वास खुप मिस करणार आहे"

मेघनाला त्याच्या अगम्य बोलण्याचे चटके जाणवायला लागले होते. अनिकेतला तत्त्वज्ञान वाचण्याची आवड होती आणि तो बर्‍याचदा आपल्याच धुंदित बोलत असे. पण असल आत्यंतिक आणि अधांतरी तो कधी बोलला नव्हता. तो हळु-ह्ळु निखारे शिलगवत होता.

"अस काय बघतेस?, भूत बघितल्या सारख."

"मला घाबरवु नकोस अनि"

त्याच्या बोलण ऐकुन आपण गेले आठवडाभर मी-मी चा घोष लावलाय आणि आपल्या नशिबिचा खरा भोग अनिकेतला आहे या जाणिवेचा साप तिला पहिल्यांचा डसला. परिस्थिती अजुन बिकट होत होती.

"तुला माझी भीती वाटायला लागली. मी अजुन भूत झालो नाहिया राणी!" अस म्हणुन तो जोरात हसायला लागला. "पण लौकरच"

तो परत उठुन खिडकी जवळ गेला. त्याच्या अंगात कसल तरी भूत संचारल होत.

"सुर्यास्त बघायला तुला आवडतो का? मी पण मगापासुन हे आवडत का ते आवडत का, अस बावळटासारख विचारतोय. सगळ्यांनाच सुर्यास्त बघायला आवडतो. पण का आवडतो माहितीय? कारण, सगळ्यांना माहिती असत की दुसर्‍या दिवशी सुर्योदय होणार आहे. अस समज की सुर्योदय होणारच नाहीया आणि आत्ताचा समोरचा सुर्यास्त शेवटला आहे, मग कस वाटेल? डोळे भरून सुर्यास्त बघशील की डोळे भरून रडशील?"

"अनि, अस विचित्र नको बोलुस. मला भीती वाटतेय. अस काहीही होणार नाहीया. आपण यातुन मार्ग काढणार आहोत ना? अस काय करतोस? तूच तर म्हणाला होतास ना हॉस्पिटल मधे की काही तरी करू म्हणुन मग आता अस का बोलतोयस?"

अनिकेत नी पहिल्यांदा तिच्या कडे वळुन बघितल. "तू जसलीनशी बोललीस ना मगाशी. परत सांगु का काय झाल ते?"

"नको. माहितीय मला. मला नाही इच्छा ऐकायची."

"तुझ्या लक्षात येतय का मेघना की तू अशी वागतेयस की त्रास फक्त तुलाच होतोय"

"नाही अनि, अस नको म्हणुस, प्लीज" ती रडवेल्या सूरात म्हणाली. "तुझ्यावर का बितते आहे याची मला कल्पना.."

"मेघना, मला मीच आरश्यात दिसत नाही." मेघनाच वाक्य कापत तो तिच्या जवळ आला. त्याचे डोळे भरून आले होते. ते बघुन मेघनाला भडभडुन आल. तिने केविलवाणा असह्य हुंदका दिला.

" मला माझ प्रतिबिंब दिसत पण त्यात बिंब नसत. जणु शरीराची प्रतिमा आहे पण त्यात जीव नाही. मी कितीही आरडा-ओरडा केला तरी ते तसच निश्चल आणि निर्जिव उभ रहात. माझ बिंब शेवटल मावळतांना बघण्याची अगतिकतका माझ्या नशिबी आलीय" अस म्हणुन तो उठला.

" नको जाऊस कुठे आत्ता" तिने त्याचा हात घट्ट धरला.

"मला खुप भीती वाटतेय मेघना. पण यातुन काही मार्ग नाही. मला एकट सोड आणि तू तूझ्या मार्गाने जा. तुझ्या समोर मार्ग आहेत. माझे संपलेत."

"अनि, तु हॉस्पिटल मधे खोट बोललास माझ्याशी"

"मेघना, काय खर आणि काय खोट? बोललो मी खोट, काय करणार आहेस? कोणी माझ काही बिघडवु शकत नाही"

"पण तू म्हणालास की काही तरी मार्ग काढु" मेघना खुळ्यासारखा तो पदर काही सोडत नव्हती.

"तुला परिस्थिती कळतेय का मेघना? काय मार्ग-मार्ग लाउन बसलीयस. तो शब्दसुध्दा थोडा कॉमेडीच वाटतोय. कुठल्या जगात वावरतेयस राणी? जागी हो. बघ माझ्याकडे एकदा. नंतर दिसणारसुध्दा नाही.

मार्ग, डोबंल मार्ग, त्याची तर..." अस म्हणत त्याने शिवी हासडली.

बघ, माझे हात? बघ..." अनिने हाताचे पंजे तिच्यासमोर नाचवले. "पांढरे फटक आहेत. काहीच रेखाटलेल नाहीया. रस्त कड्यावरून कोसळुन नाहीसा व्हावा तसा मी माझ्या हातावरच्या रेषांच्या गर्तात नाहीसा होणार."

त्याने मान टाकली. "मला मरायच नाहीया मेघना. अजुन काहीच केल नाही, काहीच बघितल नाही. असा कसा चालला जाउ. आई-बाबांना, मित्रांना, तुला टाकुन कसा जाऊ. हा कसला घाणेरडा खेळ चाललाय.." त्याच्या तोंडुन शब्द फुटेनासे झालेत.

विसर मला..." अस तो कस तरी म्हणत धावत निघुन गेला.

मेघना उशीत डोक घालुन एकटीच असह्य रडत बसुन राहिली. पण तिच्या डोक्यात अचानक काही तरी पेटल. ती दार उघडुन धावत खाली अनिकेत ला थांबवायला गेली.

"अनि"

"मेघना, काय करतेयस, लोक बघतायत" तिचा अवतार अणि आवेश बघुन अनिकेत म्हणाला.

"तु चल वर परत"

अनि काही बोलायच्या आधीच ती म्हणाली "माझ्याकडे एक आयडिया आहे"

(क्रमशः)
श्री अंबरीश यांनी हा भाग लिहिण्यास मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.