मला बसल्या बसल्या झोप लागू शकते. खुर्चीवर, बाकावर, कुठेही. आणि बरं खूप वेळ झोपतो असेहि नाहीं. १० मिनिटे पुरतात. पण मी अगदी गाढ 'घोडे बेच के' झोपतो. या डुलक्या पॉवर नॅप्स वगैरे भानगडी पण नाहीत. पण गंमत अशी कि मला तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वप्न हि पडतात. काही स्वप्न विचित्र असतात, काही गमतीदार. काही आठवतात, काही नाहीं. दोन-तीन दिवसापूर्वी एका लग्नात दुपारी जेवल्यानंतर मी खुर्चीवरून स्वप्न नगरीत आरोहण केले. स्वप्ने (स्वप्ना नाहीं!) जणू वाटच बघत असावीत. मी स्वप्नात पालकाची पातळ भाजी-भात खात होतो. मला पातळ भाजी खूप आवडते. खास करून नागपूर भागात कोरड्या खोबऱ्याचे तुकडे आणि लाल मिरच्यांची फोडणी घातलेली. पण मला भाजीत सारखी कचकच लागत होती. मी अस्वस्थ होत होतो. पातळ भाजी भात, किंव्हा वांग्याचे भरीत आणि फुलके अशी काही कॉम्बिनेशन्स आहेत ज्याची मी वाट बघतो. (अशी अजून बरीच कॉम्बिनेनशन आहेत. त्याचा एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. आदल्या दिवशीची मुगाची खिचडी आणि त्यावर दूध, अगदी सायी सकट, कधी न्याहारीस खाल्ले आहे का? नसेल तर जरूर खा. हे वाचून नाक मुरडणाऱ्यांना गा. गु. च. का.!) पण अगदी स्वप्नात का होईना, ती कचकच मला त्रास देत होती. मी विचारले कि "कोणी केलीय पातळ भाजी? मेथी नीट धुतली नाहीं का?" "मेथी नाहीं, पालक आहे ( मलाच गा. गु. च. का.!). पण कोणी उत्तर दिले ते समजेना. स्वप्ने आपली असतात पण हवी ती लोक त्यात येत नाहीं. आणि जी येतात ती आपण बोलावलेली हि नसतात. उगाच एक वात्रट विचार - आपल्याला हव्या त्या व्यक्तीला स्वप्नात बोलावता आले असते तर मी ऐश्वर्या राय ला पातळ भाजी वाढायला नसते का बोलावले? असो मी स्वप्नात करीत होतो कि स्वयंपाकघरातून हे कोण बोलतय. तेवढ्यात पुन्हा दाढेखालती कच झालं. मी अगदी फ्रस्ट (" frustrated ') झालो. "अरे यार पातळ भाजीत कचकच म्हणजे लाईफ ला अर्थच नाहीं". पण पातळ भाजीचा माझ्या लाईफ वरचा प्रभाव नेमका काय इत्यादी विचार यायच्या आधीच जाग आली. बाजूला सौ. (आमच्या) बसल्या होत्या. त्यांना माझी अशी डुलक्या मारण्याची सवय आहे. "अरे, केवढे दात कचकच करत होतास" म्हणजे मी झोपेत दात घासत होतो म्हणून माझ्या मेंदूने एवढ्या धक्कादायक घटनेचे चित्र रंगविले?
मग मी विचार करू लागलो कि नेमकी कुठल्या प्रकारची स्वप्ने मला पडतात. स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. आणि माझी स्वप्ने सर्वसाधारणच असणार पण माझ्या साठी ती वैशिष्ट्यपूर्ण नक्कीच आहेत. यातून मला जीवनाचे कोडे (किंव्हा कोडी!) उमगते इत्यादी ठोंबेपणा माझ्यात नाही. उठल्यावर जर कधी कुठली स्वप्ने आठवलीत तर मला बहुतांश वेळा हसू येते कि काय वेडगळ आहे माझा मेंदू असे वाटते. (माझ्या काही मित्रांची मीच वेडगळ असल्याची ठाम समजूत आहे. त्यांनी तसे निसंकोच पणे मला बोलून दाखविले आहे.)
अगदी लहानपणाची आठवण आहे. मला स्वप्नात दुधाचे धबधबे दिसायचे. मी दुधात पोहोतोय आणि धबधब्यात खेळतो आहे असे दिसायचं. तान्हा असतांना मला दुधाची ऍलर्जी होती. अर्थात ते मला आठवत नाहीं. पण चांगलं ५-७ वर्षांचा असतांना पर्यंत मला हे स्वप्न पडत असे. मी सकाळी एकदम आनंदात उठायचो आणि मग उठल्या-उठल्या ताबडतोब, अगदी अंथरुणातच, दूध न मिळाल्याने ठणाणा करायचो. माझे आई-वडील नक्कीच confuse होत असतील कि या पोट्ट्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते! त्या दरम्यान मला झोपेत वाघ हि दिसत असे. (दुधाचे धबदबे आणि वाघ, वाह ..कमाल आहे!) आमचे घर खरं नागपूरला नाग नदीच्या काही अंतरावरच होत. स्वप्नात नाग दिसायला हवे. बरं, लहानपणी वाघ पण कधी बघितला नव्हता. लहानपणीच काय, आजगयत ताडोबा, नागझिरा, कान्हा, पेंच....कुठे म्हणजे कुठे मला वाघोबा दिसला नाहीं. (प्रत्येक वेळेस 'कांदे-पोहे' खायला जाणाऱ्या होतकरू तरुणासारखा मी सफारी ला जातो आणि ग़ज़ब बेइज्जती होऊन परत येतो. एकदा गाईड ने आम्हाला एका भल्यामोठ्या झाडाच्या बुंध्यावर वाघाच्या नखांचे ओरखडे दाखविले. मी उत्साहात विचारलं कि आज सकाळचे ओरखडे आहेत का, थोडक्यात 'ताजे' ओरखडे आहेत का? तो म्हणाला नाहीं...खूप वर्ष जुने आहेत. चायला...ओरखडे पण शिळे-पाळे बघायला मिळालेत.) पण स्वप्नात मात्र वाघोबा दिसायचा. पूर्व जन्मी मी वाघ असेंन किंव्हा शेळी, वाघाने खाल्लेली! म्हणूनच असा वाघ दिसायचा मला स्वप्नांत.
अजून एक स्वप्न जे मला सातत्याने पडते, ते म्हणजे माझे आकाशात उडणे. विमानात नाहीं. पक्षासारखा आकाशात भराऱ्या मारतो. मला पंख पण नसतात. एकदा तर मी सोफ्यावर बसून उडत होतो. सोफ्याला गिअर्स पण होते. आता हवेत उडायला गिअर्स का हवेत पण मी आपला खटखट करून गिअर्स बदलवित होतो आणि वर-खाली, मागे-पुढे होत होतो. हे सोफ़्याचे स्वप्न मला खूप म्हणजे खूप वर्षांपूर्वी पडले होते. पण स्वप्नात मी जेवढा हुरूळलो होतो तशीच भावना मला त्या बद्दल इतक्या वर्षांनी लिहितांना येते आहे. माझ्या घराजवळ एक मोट्ठे मैदान होते. त्यावर घारी घिरट्या मारीत असत. आकाशात गोल-गोल त्या फिरत असत. निळ्याशार आकाशात त्यांच्या कथ्या प्रतिकृती बघायला मला फार आवडायचे. जमिनीवरच्या रस्त्यांच्या, पाऊलवाटांच्या जाळ्यात ते फसलेले नसतात. स्वच्छंदपणे ते भूमीला आपल्या पंखात बांधतात.
स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनि,
क्षणाधी सुटे पाय निडांतूनि अन,
वीज खेळती मत्त पंखातुनि ||२||
अशी झेप घ्यावी, असे सूर गावे,
घुसावे ढगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली भुरे केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखापरी ||३||
- आकाशवेडी, पद्मा गोळे
"पक्षांना काय माहिती जमिनीवर धावण्याची मजा?" असा प्रश्न जमिनीवर वजनाचा भार टाकीत जाणाऱ्या मनुष्याला कधी पडणार नाहीं. उडण्यात काही वेगळीच मजा असणार. पंख पसरविले कि उडण्याची स्वप्ने मला नेहमी लक्षात रहातात. मी एकदा काही तरी जेट-पॅक सारखे पाठीला बांधून उडत होतो. त्या स्वप्नात खूप वेगाने मला उडता येत होते. मी आकाशात, ढगात, जमिनीलगत अश्या भराऱ्या मारीत होतो. काय मजा येत होती! अवर्णनीय!
सगळीच स्वप्ने दुधाचे धबदबे आणि सोफ्यावरून उड्डाणाची नसतात. काही गडद आणि खोल असतात. मी ज्या घरात वाढलो ते घर सोडून दोन तप उलटून गेलीत पण स्वप्नात मी बहुतांश वेळा त्याच घरात असतो. मी मागे माझ्या एका गडद स्वप्नावर आधारित "घर" गोष्ट लिहिली होती. हि गोष्ट स्वप्नातील सत्य-घटनेवर आधारित होती. आता स्वप्नावर आधारित गोष्ट सत्य घटना कशी काय? कारण स्वप्नात असतांना मला माहिती नव्हते कि हे स्वप्न आहे. आणि घाबरून घामघूम होऊन मी उठलो. देवाच्या दयेने असली स्वप्ने मला कमी पडतात. किंव्हा पडली तरी दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत.
सुप्रसिद्ध गणितकार श्री रामानुजन यांना स्वप्नात त्यांची कुलदेवी गणित सोडवायला मदत करायची असे ते म्हणत. इथे मला गणिताचा पेपर बघून घेरी येऊन स्वप्न पडायची. मला स्वप्नात कधी मी IIT पास झालो आहे किंव्हा मोठा निष्णात डॉक्टर झालोय असे कधीच दिसले नाहीं. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार! सगळीच स्वप्ने यशाची किंव्हा प्रेरणादायी असावी असे मुळीच नाही. प्रेरणा उघड्या डोळ्यांनीच आत्मसात करावी आणि उघड्या डोळ्यांनीच यशाच्या पायऱ्या चढाव्यात. स्वप्ने, स्वप्नेच राहू द्यावीत. ठरवून स्वप्ने पडत नाहीं हे एकादृष्टीने वरदानच आहे. नाही तर मला कुठून दुधाच्या धबदब्यात न्हायला मिळणार? पक्ष्यासारखे उडायला मिळणार आणि कुठे खऱ्यात वाघाची साथ मिळणार?
देवाची कृपा. आणि अशीच मला झोप लागत राहो हीच प्रार्थना.
---
**वाघाचे चित्र - Image rights : Rose Corcoran - https://sladmore.com/artworks/tiger-in-my-dreams/ )
No comments:
Post a Comment