8/29/23

माझे लेखन - (माझाच) एक आढावा.

मराठीत ब्लॉग्स लिहायला सुरुवात करून बरीच वर्षे झालीत. माझे मराठी शाळे पासून चांगले होते आणि मी उच्च मराठी माध्यमातून दहावी पर्यंत शिकलो. त्यामुळे निबंध लिहिण्याची सवय फार आधी पासून होती. पण पुढे जाऊन गोष्टी, लेख इत्यादी मी लिहीन याची कल्पना मला नव्हती. पुढे शिक्षण इंग्रजीत आणि परदेशातून झाले त्यामुळे साहजिकच इंग्रजीशी संबंध फार वाढला पण माझे मराठी वाचन चालूच होते. कॉलेज मध्ये असतांना इंग्रजीत ब्लॉग सुरु केला. तेंव्हा ब्लॉग हा प्रकार नव्याने उदयास येत होता. माझे इंग्रजीतील ब्लॉग्स फक्त सामाजिक, राजकीय आणि राजकारणावर असतात. गोष्टी मी कधी मराठीत सुद्धा लिहिल्या नव्हत्या त्यामुळे इंग्रजीत लिहिण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तसेच इंग्रजीतील ललित-कादंबऱ्या मी फारसे कधी वाचले नव्हते.मी लहान असल्यापासून राजकारण आणि इतिहासच वाचीत असे. त्यामुळे कॉलेज मध्ये असतांना या विषयांवर इंग्रजीत लिहिणे नैसर्गिक होते. ब्लॉग्सचे विश्व जेंव्हा उदयास आले तेंव्हा ते फक्त इंग्रजी आणि इंग्लिश भाषेपुर्ती सीमित होते. गुगल ने इंग्रजीतर भाषा कधी उपलब्ब्ध केली याची मला कल्पना नाही पण मला २००७ ला अचानक दिसले कि आता मराठीत पण ब्लॉग्स प्रकाशित केल्या जाऊ शकतात. मी लगेच मराठीत ब्लॉग सुरु केला. आणि त्यावेळेस मराठी लिहिणे गैरसोयींचे होते म्हणा पण त्यात झपाट्याने बदल झाला. माझे टायपिंग उत्तम असल्यामुळे इंग्रजी कि-बोर्ड वर मराठी टाईप करणे मला फार सोपे जाई. इंग्रजी ब्लॉग प्रमाणे मी मराठीत सुद्धा राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर लिहिण्यास आरंभ केला. कोण वाचेल किंव्हा कोणी वाचेल पण का या प्रश्नांमध्ये मी सुदैवाने गुंतलो नाही. जे सुचेल ते लिहिण्यास सुरु केले आणि सन २००७ च्या मे महिन्यातच पाच लेख लिहिलेत. मला तेंव्हा बराच वेळ हि होता हे सांगायला नकोच! सुरुवातीच्या लेखांमध्ये मी शाळेतल्या आठवणी, एक-दोन राजकारणावर आणि दोन तत्वज्ञानावर तडाख्याने लेख लिहिलेत. पण लिहिण्याचा खरा आनंद अजून मिळायचा होता. मला त्या आनंदाची ना चाहूल होती ना मी वाट बघत होतो. 

आता माझ्या लघु-कथा किती वाचण्याजोग्या आहेत हे मला सांगणं कठीण आहे. पण कोण वाचतय आणि त्या वाचकांना किती आवडत आहे या पेक्षा मला त्या कथा लिहिण्यात फार मजा येते. नुसते लिहिणेच नव्हे, पण त्या गोष्टीचा विचार करणे, त्या पात्रांचा आविष्कार करणे, त्यांना नावे देणे, त्यांची व्यक्तिमत्वे रेखाटणे, त्यांना भाषा देणे, त्यांना संवाद देणे आणि मुख्य म्हणजे गोष्टीला रूप-रेषा देणे हा सगळं प्रकार, हा अनुभव, हा प्रवास, मला वैयक्तिक पातळीवर फार फार आवडतो. दैनंदिन धुमश्चक्रीत अचानक मला एखाद पात्र समोर दिसत. त्याचे व्यक्तिमत्व झळकते. आणि एक नवीन विश्वच डोळ्यासमोर भरभर उभं होत. आधी अनुभवलेली, खऱ्या जीवनातील व्यक्तित्व आणि वैयक्तिक अनुभव आपला छाप घालतात आणि संपूर्ण गोष्ट एखाद्या चित्रपटासारखा मला क्षणार्ध साठी दिसते. आणि मग सगळी पात्रे पांगतात. एकदा का रूपरेषा पक्की झाली कि प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजे शब्द शोधणे. त्या कल्पनेला शब्दांकित करण्यास खूप मेहनत करावी लागते. मला रचनेचा हा भाग हि फार सुखावतो.  शब्द शोध, शब्द-रचना, वाक्य रचना, शब्दांचे अलंकार, कोट्या हि जणू खेळणीच मला उपलब्ध होतात, खेळायला. अशीच मला माझी पहिली लघुकथा सुचली. मी तेंव्हा कामाला ट्रेन नी जात असे. मी सकाळी कामाला निघालो होतो, घाई नव्हती त्यामुळे माझा सगळा कारभार संथपणे चालू होता. आणि 'अग्निवस्त्र' ची घटना खूप वर्षांपूर्वी खरी घडलेली होती. पण त्या घटनेला खूप वर्षे झाली होती आणि माझ्या ध्यानीमनी तो विषय कधी रेंगाळला नव्हता पण अचानक माझ्यासमोर क्षणार्धासाठी अंगण, कोपर्यात एक झाड आणि त्या खाली अग्नीने वेढलेली एक स्त्री समोर आलं. आता आत्महत्या करणे फार कठीण आहे. त्या परिस्थितीला ती व्यक्ती का आली असेल याचा विचार मी करून त्या अग्नीने वेढलेल्या व्यक्तीला मी बोलते केले. घटना सत्य होती त्यामुळे त्या व्यक्तीची परिस्थिती आणि मनोस्थिती मी गुंफली. लग्नाचा शालू नेसून नवीन आयुष्याची वाट आनंदाने धरणारी हि व्यक्ती शेवटी अग्नीचा शालू नेसून ते आयुष्य मागे सोडायला तयार झाली. जरी हि कथा शोकांतिका वाटली तरी तो माझा विचार किंव्हा हेतू नव्हता. जन्मभर त्या बाईचे आयुष्य तिच्या हातातुन निसटत राहिले पण शेवटच्या क्षणी ते घट्ट धरण्यात तिला यश आले. ती एक गोष्ट तिच्या मनाजोगी झाली.   

सारख्या सारख्या मला गोष्टी सुचतात असे मुळीच नाही. गोष्टी सुचायला डोकं मुख्य ताळ्यावर हवं. विचार करायला फुरसत हवी. डोळे पण उघडे हवेत. दैनंदिन जीवन आपल्या सगळ्यांचेच धामधुमीचे असते. पुढली कामे आणि मग त्यापुढली कामे मग पुन्हा उरलेली काम आणि मग वेळ मिळाल्यावर, वेळ मिळाल्यावर करण्याची, कामेच. असंख्य, अविरत आणि अखंड. पण हि खेळणी जणू जिवंत असतात. कधी कधी रुसून बसतात. लिहायला एक शब्द सापडत नाहीत. जे लिहिल्या जात ते सगळं मिळमिळीत आणि बुळबुळीत लिहिल्या जात. मग अक्षरश: ती गोष्ट भिजत ठेवावी लागते. कधी कधी वर्षानुवर्षे. नुकतीच लिहिलेली 'सदा' लघु कथा मला २०१८ ला सुचली होती आणि त्याची रूपरेषा तेंव्हा लिहिली होती. अजून अशीच एक कथा 'बुशकू' २०२० पासून पानां मध्ये पहुडली आहे.'हर हर' म्हणून एक दीर्घ कथा तर २०१० पासून लिहितोच आहे!  प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कथा विधिलिखित वेळीच जन्म घेणार हेच खरे. 

या संकेतस्थळास मी वेग-वेगळ्या आभूषणांनी सजविण्याचा प्रयत्न करतो. नुसत्या लघु कथा नाही तर सामाजिक आणि तात्त्विक विचार सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ कथा किंव्हा वाढत्या वयाचे अनुभव लिहितो. शाळेतील आठवणी किंव्हा लहानपणाच्या आठवणी. आमचे जुने घर, रहता भाग, शाळा, शाळेतील मित्र, मैत्री. कधी जसे आठवेल तसे तर कधी आठवून आठवून काही तरी. अनुभव किंव्हा अनुभवानंवर आधारित असं  मला माझा दाढीवरचा लेख चांगला जुळून आला होता. तसेच, 'धुक्यातील मृगजळ' हा लेख सुद्धा मला स्वतःला आवडला. एखादा लेख किंव्हा कथा किंव्हा विचार चांगला जुळून आले आहे याची जाणीव हि सुखाची संवेदना आहे. अजून कोणाला आवडो ना आवडो पण स्वतःला आधी आवडायला हवे. अर्थात नेहमीच असे होत नाहीं. पण कधी कधी शब्द आपोआपच लिहिल्या जातात. उत्कट भावनांना वाट सहजतेने शब्द देतात. मागल्या वर्षी डिसेंबर मध्ये पावनखिंडीला डोकं टेकून यायची संधी मिळाली. तिथे जीप च्या टपावर बसून आम्ही सगळे खिंड जिथे मोकळी होती ते निरीक्षण करीत होतो. हॉटेल चा गाईड आम्हाला घटनेचा वर्णन करीत होता. तिथे शिवा काशीद बद्दल सांगितले. आता इतकी वर्ष मी शिवाजींच्या इतिहासावर इतकं वाचलंय पण मला कधी प्रश्न पडला नाही कि शिवा काशीद यांचे पुढे काय झाले? मी गाईड ला विचारला कि शिवा काशीद कसे सुटलेत? तो म्हणाला, सुटेल कसा, त्यांना तिथेच ठार केले सिद्दी ने. चाळीस वर्षांचा मी, माझ्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. रडूच थांबेना. सोबतीच्यांना कळेना याला अचानक काय झाले ते. माझी फार वाईट अवस्था झाली. समोर खिंड मोकळी होतेय ती जागा आज हि चालणे कठीण आहे आणि ३०० वर्षांपूर्वी हि लोक तिथे लढतीत आणि धारातीर्थी पडलीत या कल्पनेने मला भरून आले. ती भावना मनात घरी येईपर्यंत कायम राहिली आणि 'आम्ही सगळे बाजीप्रभू' हा लेख भर्रकन लिहिला गेला. 

मधल्या काही वर्षात माझे मुळीच लेखन झाले नाहीं. कागदावर काही काही लिहिले होते पण ते टाईप करायला वेळ मिळाला नाहीं किंव्हा मनापासून प्रयत्न पण केला नाहीं. अगदी वायफळ असेही काही लिहिले नाहीं. म्हणून या वर्षी ठरवले कि प्रत्येक महिन्यात काही तरी लिहायचे. सुचेल ते लिहायचे, आधी सुरु केलेलं पण नंतर रखडलेले पूर्ण करायचं. नवीन विषय शोधायचे, नवीन गोष्टी लिहायच्यात. प्रवास वर्णनं, ऐतिहासिक, इतिहासावर, मराठा साम्राज्यावर, छत्रपतींवर, मराठा इतिहासाच्या बारकाव्यांवर, राजकारणावर, राजकारण्यांवर, भारताच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या इतिहासावर, जमेल तर थोडा विनोदी लिहिण्याचा पण प्रयत्न करायचा. एक प्रक्रिया म्हणून लिहायचे. या वर्षीचे ८ महिने हा पण टिकला आहे. पण अजून ४ महिने उरले आहेत! 

मला खूपदा भीती वाटते कि जसे अचानक लिहायला सुचले, गोष्टी, पात्रे समोर आलीत, तसेच अचानक सगळं नाहीस झालं तर? पात्रे दिसणार नाहीत, गोष्टी सुचणार नाहीत आणि शब्द लिहिल्या जाणार नाहीत? विचार करून खरंच भीती वाटते. माझा देवावर ठाम विश्वास आहे आणि गेली बरीच वर्षे मी सरस्वतीची आराधना करतो. घरा जवळ सरस्वतीची सुंदर देऊळ आहे. तिथे मी नित्य नेमाने डोकं टेकून येतो. तिची कृपा असेल तर असे होणार नाहीं या आशेने. 

कोणाला हे वाचून असे वाटायचे कि मी कोणीतरी मोठा लेखक आहे. किंव्हा मला असे वाटायला लागले आहे कि मी मोठा लेखक आहे. दोन्ही गोष्टीत तथ्य नाही. अर्ध-एक पानापूर्ती का होईना, एक नवीन विश्व निर्माण करण्यात जे सुख आहे, मराठीत लिहिण्याचे जे सुख आहे, हे सध्याच्या धुमश्चक्रीतला (जी सगळ्यांचीच असते) एक कोनाडा आहे जो आल्हाददायक वाटतो, स्वतःचा वाटतो. स्वतःचा आनंद निर्माण करण्याचा हा अनुभव हवा-हवासा वाटतो. तो टिकाव हि आशा आणि सरस्वतीस प्रार्थना.