8/24/07

एक अमेरिकन कैफि़यत

ही व्यथा म्हणावी तर व्यथा नाही कारण मी लौकिक दृष्ट्या सुखात आहे. ही कथा म्हणावी तर कथाही नव्हे कारण याची सुरुवात कुठे झाली आणि संपणार कुठेय याचा मुळीच थांगपत्ता नाही. हा वैयक्तिक अनुभव म्हणता येईल पण मला खात्री आहे कि या भावनांचे सुर अनेकांच्या मनात उमटतात. हा चूक-बरोबर किंवा चांगल-वाईट याचा मागोवा ही नव्हे. मी काही तरी महत्त्वाच हरवलय ही भावना सारखी मनाल टोचते आहे.

हे मनोगत काय हरवलय या शोधाचं आहे.

माझ अमेरिकेत येणं सहाजिक होते. मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातला मी, भारताबद्दल नको त्या कल्पना करुन आणि अमेरिकेबद्दल हव्या त्या कल्पना करुन, इंजिनिअरिंगच्या वर्गात असतांनाच परदेश गमनाची स्वप्ने बघत असे. माझ्या सोबतची बहुतांश मुले तर मनाने अमेरिकेत पोचली सुध्दा होती. इंजिनिअरिंग झाले व मी धोपट मार्गाने उच्च शिक्षणासाठी अमिरिकेत दाखल झालो. शिक्षण पुर्ण करायचे, वाणि़ज्य किंवा आर्थिक क्षेत्रात नोकरी धरायची. बस्स, मग लाल स्पोर्टस कार, बंगला, थोडक्यात नुसती ऐष. माझे सगळे आराखडे अगदी तयार होते. या सर्व गोष्टी साध्य करतांना मला किती मेहनत लागणार होती तसेच हे सगळ साध्य केल्या नंतर काय, हे असले प्रश्न मला कधी शिवलेही नाहीत. आणि असले प्रश्न पडावेत तरी का? म्हणजे, कुठल्याही तर्‍हेची मेहनत करण्याची तयारी होती. तसेच माझ्या आधी आलेली भारतीय यशस्वी होत होते. त्यामुळे माझा अपयशी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. पण यश-अपयश याचा सबंध केवळ लक्ष-भेदाशी नसतो. खुपदा लक्ष्या पर्यंत पोचण्यच्या प्रवास माणसात आमुलाग्र बदल आणितो.

आता मी काही वर्षांपुर्वीच्या भोळ्या आणि मूर्ख अश्या माझ्याकडेच बघतो तेंव्हा संमिश्र भावनांच वादळ मनात उमटत. अनेक प्रश्नांची मनात इतकी गर्दी होते कि उत्तर शोधण्याच्या ऐवजी मी प्रश्नांची मोजदाद करण्यातच रमुन जातो. मी पाहिलेली बहुतांश स्वप्ने, थोडी उशीरा का होईना, सत्यात आली आहेत. पण प्रत्येक गोष्टीची किंमत असते. अगदी श्वास घेण्याची किंमत या दुनियेत जगुन द्यावी लागते. अमेरिकेत 'यशस्वी' होण्याची किंमत कराव्या लागणार्‍या कष्टांमधे नुसती मोजता येत नाही. स्वप्ने सत्यात आणण्यासाठी करावी लागणारे कष्ट सुध्दा मी आनंदाने केलीत. पण हे सगळं करण्यात मी स्वतः स्वता:पासुनच दुरावलो. स्वता:लाच हरवुन बसलो. मी कोण होतो आणि मला काय करायचे होते या सोबत मी काय मिळविले आणि कोण झालोय याची सांगड लागत नाही.

शिक्षण चालू असतांना बरीच कष्ट पडलीत. प्रोफेसर ढंगाचा मिळाला नाही. थिसिस वेळेवर झाला नाही त्यामुळे शिक्षण वर्षभर लांबले. आता या 'अधिक' वर्षाची फी कुठुन येणार म्हणुन कॉलेज मधल्या नोकरी व्यतिरिक्त काही हॉटेमधे भांडी धुण्यापर्यंत काम करावी लागलीत. अर्थात, याबद्दल मला मुळीच तक्रार नाही. बरीच लोक हे सगळ करतात. पण या सगळ्या भानगडीत भारतात दोन वर्षे जाता आल नाही. सगळ्यांच्या बाबतीतच अस थोडं-फार होत की फक्त माझ्यासोबतच अस झाल मला माहिती नाही. पण घरापासुन इतकं दूर राहुन आणि अनपेक्षित तर्‍हेचे कष्ट करुन मी मनातुन कोरडा पडत गेलो.

घरी राहुन बर्‍याच गोष्टी आयत्या मिळतात. आईच्या हातचं सुग्रास अन्न खायला मिळत या बद्दल मी बोलत नाहीया. पण आपलं व्यक्तिमत्व, आपण जसा विचार करतो, जसं बोलतो-चालतो, आपले वैयक्तीक दृष्टीकोण इत्यादी पैलु बर्‍याच गोष्टींवर निर्भर करत. या गोष्टींवरच मानसिक दृष्ट्या आपण अवलंबुन असतो. आई-वडिल, नातेवाईक, मित्र-मंडळ, शेजार-पाजार हे सगळे चांगल्या-वाईट दोन्ही दृष्टींनी आपल्य व्यक्तीमत्वाला रुप देत असतात. आपण जे स्वता:ला आरश्यात बघतो त्यात या सगळ्यांची प्रतिबिंबे असतात. पण अमेरिकेत गेल्यावर हे सगळे धागे-दोरे अदृश्य होतात. अचानक आरश्यात फक्त आपणच उरतो. दोर तुटलेल्या पतंगासारखी गत होते. हे सगळं मला लगेच जाणवल नाही. पण हे परिणाम हळु-हळु अंगात भिनत गेले.

तरुण वयात परदेशात जाउन मर्दुमुकी गाजवणार नाही तर कधी करणार? अस कोणी म्हटल तर ते बरोबरच आहे. तसेच त्यासाठी नविन व्यक्तिमत्व बनवाव लागत असेल तर ते ही आवश्यकच आहे. खर सांगायच तर स्वता:चा भुतकाळ विसरुन, वर्तमानात परत जन्म घेण्यास कोणी तयार असेल तर त्याने कराव पण हे फार कठीण आहे. कळत-नकळत स्वतःला देशापासुन, संस्कृतीपासुन, आप्नजनांपासुन तोडुन जर का मी केवळ लाल गाडी आणि लॉन असलेलं मोठ घर मिळवत असीन तर माझे हिशोब चुकले आहेत असं मला वाटतं. जुनी हिंदी गाणी, जी विविध भारतीवर लागायचीत, ती ऐकुन आठवणींच्या असंख्य सुया जेंव्हा टोचतात तेंव्हा अस वाटत की जे कधीही हरवु शकत त्यासाठी मी जे आता परत कधीच गवसु शकत ते हरवलं. मला माझ्याशी जोडणारी नाळ नेहमी साठी तोडल्याच्या अगतिक दु:खाची जाणीव होते.

सगळे माझ्यासारखा विचार करतात का? की मनाच्या, मनाला रुचेल अश्या, समजुती पाडुन निवांतपणे जगतात. सांगण कठीण आहे. मी चूक-बरोबर, चांगल-वाईट याबद्दल काही मतं मांडत नाहीया. पण मला इथे सुबत्तेची व श्रीमंतीची झापण बुध्दीला लाउन व सुखी असल्याचे मुखवटे बांधुन लोक हिंडतांना दिसतात. पैसा कमविणे आवश्यक आहे पण ते अंतिम लक्ष नव्हे. छान घर, गाडी, तगडा बँक बॅलेन्स असणे चांगली गोष्ट आहे पण तेच सुख आहे अस वाटण चुक आहे. हे सगळ मिळविण्या साठी जर का स्वता:ला हरविणे आवश्यक असेल तर ती दु:खी कल्पना आहे.

गंमत म्हणजे भारतात रहाणारे बहुतांश आणि अमेरिकेत रहाणारे बरीच लोकं मला हे वाचल्यावर वेड्यात काढतील. काही लोक असेही म्हणतील कि एवढ देश-प्रेम होत तर अमेरिकेत गेलाच कशाला? पण इथे मुद्दा देश-प्रेमाचा नाहीया. हि कैफियत आहे मनाची. हे तक्रारीचे सूर नव्हेत. ही कहाणी आहे मनाला बसणार्‍या डागण्यांची. मी केलेल्या कष्टांची यादी मला इथे मांडायची नाहीया पण मनातल्या धुक्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे.

परदेशात जाउ नये अस माझ मुळीच म्हणण नाही. आर्थिक सुबत्तेचा शोध करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किंबहुना, मला परत भूतकाळ जगायला मिळाला तर मी परत अमेरिकेत येण्याचाच निर्णय घेइन. फक्त स्वता:ला घट्ट धरुन ठेवण्याचा प्रयत्न करीन. असही शक्य आहे की मला आता इथे राहुन भारत जास्त रम्य वाटत असेल. जसं भारतात असतांना अमेरिका दिसत होत. माझ म्हणणे एवढेच आहे कि परदेशात जाण्याची किंवा तिथे स्थायिक होण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते हे माहिती असणे आवश्यक आहे. दुरुन डोंगर साजरे हेच खरं.

या धुक्यातुन बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? मला तरी काही अजुन सुचलं नाहीया. पण मी बुध्दीला झापण लावायला तयार नाही. काही लोकं याबद्दल विचारही करत नाहीत. ती लोकं खरच सुखी आहेत. फार विचार करायला लागल कि नको असलेल्या गोष्टींना हव्या त्या तत्त्वांच्या वेष्टणात बांधुन मन मान्य करत.

अमेरिकेत राहुन आता मला बरीच वर्ष झाली आहेत पण मी ती तत्त्वे अजुनही शोधतोय.

(काल्पनिक)

8/23/07

असाही एक खेळ

आज तो सकाळी साडे-पाच ला आपणहुन उठला. नाहीतर रोज आई साडे-सातला उठविते तरी त्याला उठायच नसत. पण आजचा दिवस विशेष होता. गेला महिनाभर तो या दिवसाची वाट बघत होता. आजच्या दिवशी तो कस आणि काय करणार आहे याची तो स्वप्न बघत होता. काल रात्री त्याल नीट झोपसुध्दा आली नाही. दोन-तीनदा त्याने उठुन घड्याळात किती वाजले आहेत ते बघितले. सरांनी सकाळी सात वाजता मैदानावर हजर रहाण्याची सक्त ताकीद दिली होती. जो उशीरा येइल त्याला खेळायला मिळणार नव्हते. लहान वयाच्या मुलांना शिस्त लावणे आवश्यक असते पण शिस्त लावणे आणि आपली मर्जी चालविणे यात फरक आहे. सरांना तो फरक कधीच लक्षात आला नाही.

सुरुवातीला त्याला बास्केटबॉल खेळण्याची फारशी आवड नव्हती. त्याचा मोठा भाऊ बास्केटबॉल खेळायला नियमित जात असे. शेजार-पाजारच्या मुलांसोबत उनाडक्या करण्यापेक्षा थोडी नियमितता आणि शिस्त लागावी म्हणुन त्याच्या आई-वडिलांनी त्याला मोठ्या भावासोबत जबरदस्ती बास्केटबॉल खेळावयास पाठवु लागले. सुरुवातीला बरीच आदळ-आपट करुन झाली पण त्याल हळु-हळु खेळाची गोडी लागली. वयाने बराच लहान असल्यमुळे त्याला सुरुवातीला कुठल्या प्रतियोगितेत भाग घेणे शक्य नव्हते. त्याला नुकतेच ११ वे लागले होते. सरांनी क्रिडा मंडळात त्या वयाच्या मुलांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्याचा खेळ इतका चांगला होता की त्याला उत्तम खेळाडुचे पारितोषिक मिळाले. त्यामुले १४ वर्ष वयोगटाच्या चमूत त्याची निवड झाली होती. पण क्रिडा मंडळातील आपल्याच मित्रांसोबत खेळणे वेगळे आणि इतर क्रिडा मंडळातील मुलां विरुध्द खेळणे वेगळे. त्यामुळे तो शहर-स्तरावरील प्रतियोगितेत भाग घेण्यास उत्सुक होता. त्याला खात्री होती कि तो त्याच्या चमूला जिंकवुन देइल म्हणुन.

सकाळी उठुन त्याने कामे भराभर उरकली. आपल सोंग खेळासाठी इतकी धडपड करतय बघुन त्याच्या आईला फार कौतुक वाटत होते. निघायच्या वेळी आजीने पोटाशी धरुन आशिर्वाद दिले व हातावर दही ठेवले. सकाळी ६ वाजता एकट नको जायला म्हणुन तो सायकल वर आणि त्याच्या मोठा भाऊ पाठोपाठ स्कुटर वर, सोबत म्हणुन, अशी स्वारी निघाली. (वडिलांना त्याने सकाळीच नमस्कार केला होता. ते पहाटेच कामावर जात असत.)

सव्वा सहाला तो क्रिडांगणावर हजर झाला. बरीचशी मुले जमा झाली होती. नोव्हेंबर ची थंडी होती. सगळी मुले कुडकुडत होती. पण सरांचा पत्ता नव्हता. ते सात नंतर उगवलेत. मग सगळ्यांची वरात घेउन ते ज्या क्रिडांगणावर सामना होता तिथे त्यांनी कुच केली.

सगळ्या चमूने वॉर्म-अप केला. बास्केटबॉल च्या खेळात प्रत्येक संघाचे एका वेळेस फक्त पाच खेळाडु खेळतात. त्यातल्य कुठल्याही खेळाडु ला कधीही 'चेंज' करता येते. पण पहिले पाच मधे खेळणे विशेष मानल्या जाते. एवढी मेहनत केली असता आणि पारितोषिक मिळाले असता, त्याला खात्री होती तो पहिल्या पाच मधे नक्की खेळणार म्हणुन. पण पहिल्या पाच निवडतांना सरांनी त्याच्या कडे ढुंकुनही बघीतले नाही. वाईट वाटण्याऐवजी तो चकित झाला. कारण पाच पैकी दोन मुलांना मुळीच खेळता येत नव्हते. तो बिचार आपलं काय चुकल आणि सर का रागावलेत याचा विचार करु लागला.

सामना सुरु होउन १५ मिनिटे होउन गेली होती. (बास्केटबॉलच्या सामन्याचा कालावधी ४० मिनिटे असतो) सरांनी त्याच्या कडे साधी नज़रही टाकली नाही. तो अगदी कावुन गेला होता. सामना जिंकण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. सर घसा खरडुन, अस खेळा-तस खेळा सांगत होते. पण दोन टायर पंक्चर झालेली गाडी कशी नीट चालणार!

"सर, मी जाऊ का आत, खेळायला" त्याने धीर करुन विचारले.

सरांनी त्याच्यावर रागाने कटाक्ष टाकला. " कोच मी आहे कि तू?"

त्याचा चेहरा अजुन पडला व नजर खाली गेली.

"परत मी खेळु का विचारल तर लक्षात ठेव" सरांनी खडसावले.

इथे सामन्यात खेळता न येणार्‍या दोन मुलांपैकी एक मुलगा संघाची अक्षरशः वाट लावित होता पण सर त्याला काहीच म्हणत नव्हते. हाफ-टाइम नंतर तरी खेळायला मिळेल अशी त्याला आशा होती. पण तस घडणे नव्हते.

३२ मिनिटे होउन गेलीत आणि समोरच्या संघ बर्‍याच अंकांनी आघाडीवर होता. आता सामना जिंकणे जवळ-जवळ अशक्य होते. तेवढ्यात सरांनी त्याचे नाव घेतले व चेंज म्हणुन त्याल खेळात घातले. त्याला एकदम स्फुरण चढले. काहीही झाल तरी सामना जिंकुन द्यायचा चंग त्याने बांधला. त्याच्याकडे बॉल आला. त्याने बघितले तर त्याच्या आणि रिंगमधे विरुध्द संघाचा एकच खेळाडु होता. त्याने सफाइने विरुध्द संघाच्या खेळाडुला चकविले आणि रिंगच्या दिशेनी झेप घेतली व शॉट कनर्वट केला. त्याच्या आयुष्यातील पहिले दोन अंक त्याने नोंदविले. गेल्या महिनाभर गाळलेल्या घामाचा मोबदला मिळाल्याच्या भावनेने त्याला हुश्श झाले. त्याची चपळता बघुन जे थोडे-फार प्रेक्षक जमा झाले होते त्यांनी टाळ्या वाजविल्यात. त्याचा उत्साह द्विगुणित झाला. पण सरांनी त्याला परत हाक मारली आणि अवघ्या दोन मिनिटांमधेच त्याला परत बोलाविले. त्याला कळेचना की अंक नोंदविले असतांना सरांनी त्याला चेंज म्हणुन सामन्यातुन बाहेर का बोलाविले. पण त्याच्या नकळत त्याने फार मोठा अपराध केला होता.

" नालायक, तुला पास नव्हता देता येत का? तो मुलगा तिथे फ्रि उभा होता ना?" सरांनी रागात विचारले आणि जोरात टप्पल मारली.

सरांची अंगठी डोक्याला चांगलीच जोरात लागली.

"पण सर त्याला चांगले खेळत येत नाही आणि तो रिंग पासुन बराच दूर उभा होता"

झाले, सरांचा तोल सुटला. कारण ज्याला पास नव्हता दिला तो सरांच्या बॉसचा मुलगा होता. आपल्या कथा-नायकाला याचा मुळीच गंध नव्हत.

"मुजोरी करतोस" अस ओरडत सरांनी त्याला झापड मारली.

त्याच्या कानात सुं आवाज येउ लागला. सर पुढे काय ओरडत होते त्याला ऐकु येइना. तो गुमान बाकावर जाउन बसला. फारस कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हता.

अपेक्षितरित्या त्याचा संघ सामना हारला.

घरी येउन तो "आम्ही हरलो" एवढच तो कसं-बसं म्हणाला व आंघोळीसाठी गायब झाला. आईला आणि आजीला वाटले कि सामना हारला म्हणुन त्याचा चेहरा रडवेला झाला असावा. पण त्याच्या गालावर दोन बोट कोणाची हे त्या दोघींना कळेना.

8/13/07

श्री गणेश खाणावळ

श्री गणेश खाणावळीत एक फाटकासा दिसणारा मनुष्य आला. वयाने जास्त नसावा पण कुठल्यातरी चिंतेने माणुस खंगुन जातो तसा तो दिसत होता. दाढी दोन्-तीन दिवस केलेली नसावी. केस थोडेसे पांढरे झाले होते. कपडे जीर्ण झालेले होते पण स्वच्छ होते. कंबरेवर पट्टा विजारेला घट्ट धरुन बसला होता. शर्टावर एक बटन गळलेला होत. तिथे पिन लावली होती. बांध्याने तो अगदी सडपातळ होता. एकुण त्याचे व्यक्तीमत्व म्हणजे तो कुठे आला काय गेला काय कोणाच्याही लक्षात फारस येणार नाही. पण तो आज विशेष आनंदात दिसत होता. विजार वर करत त्याने खाण्याची ऑर्डर दिली. तेवढ्यात त्याचे लक्ष खाणावळीतील कुटुंबाकडे गेलं. खास करुन गर्भवती मुलीकडे. तो सारखा तिच्याकडे बघु लागला.

एक जोडपं आणि त्यांच्या सोबत मुलीचे आई-वडील असावेत. मुलगी गर्भवती होती. सगळे कुटुंब तिच्या प्रत्येक हालचाली कौतुकाने बघत होते. नवरा विशेष काळजी घेत होता, किंवा तसा निदान प्रयत्न करत होता. जेवायला काय हवं नको सारख विचारित होता. मुलीची आई हे नको खायला, हे खायला हवं अश्या सुचना करत होती. एकंदर कुटुंब स्वतःतच गुंग होत. खाणावळीत फारसं कोणी नव्हत. मालक माश्या मारत बसला होता. म्हणजे खरच, अक्षरश: माश्या मारत होता.

सुरुवातीला त्या मुलीने म्हातारा बघतोय याकडे फारसे लक्ष दिले नाही पण म्हातारा आता सरळ सरळ तीच्या कडे टक लाउन बघु लागला. त्यामुळे तीची थोडी चुळबुळ सुरु झाली. तेवढ्यात वेटर अन्न घेउन आला. म्हातार्‍याचे लक्ष विचलित झाले. त्याचेही अन्न घेउन वेटर आला होता. त्याला फार भुक लागली असावी कारण त्याचे हात थरथरत होते. पण गरम गरम अन्न समोर ठेवले होते तरी तो अन्नाला हात न लावता नुसताच एकटक बघत होता. जणु अन्नाच्या सुवासाने त्याची भूक पार उडुन असावी. त्याने अन्न थोडं चिवडल आणि एक घास कसा-बसा तोंडात टाकला. त्याचा घास तोंडातच घोळत होता कारण त्या पोरीकडे परत बघुन त्याचा कंठ दाटुन आला होता. पोरीने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातारा तीच्याकडे बघुन केविलवाणा हसला. झालं, ते म्हातार्‍याच हसण म्हणजे पोरीच्या सहनशक्तीचा जणु अंत होता. तीने नवर्‍याच्य मनगटावर हात ठेउन त्याचे लक्ष म्हातार्‍याकडे वेधले. नवर्‍याने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातार्‍याची तंद्रि लागली होती. नवरा उठुन तरातरा चालत म्हातार्‍याच्या टेबल जवळ गेला.

"का हो, काही लाज-बिज नाही का तुम्हाला?"

म्हातारा थोडा भांबावला व वेड्यासारखा उगाचच परत हसला.

"कळतय का मी काय बोलतोय ते? की सकाळी सकाळी टुन्न होउन आला आहात? तरुण पोरी-बाळींकडे बघण्याचा छंद दिसतोय तुम्हाला?"

"अहो, काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय?" म्हातारा जणु त्याच्या विचारांच्या दुनियेची खर्‍या दुनियेसोबत सांगड घालण्याचा घाई-घाईने प्रयत्न करत होता.

"वरुन चोराच्या उलट्या बोंबा" पोरीचे वडील टेबल जवळ येत उदगारले.

"काय झाल साहेब?" दुकानाचा शेठने पृच्छा केली.

"हा मनुष्य इथे बसुन सारखा माझ्या बायको कडे बघतोय. थोडीही सभ्यता नाही या माणसात"

आत्ता म्हातार्‍याच्या डोक्यात दिवा पेटला. " नाही नाही. मी त्या नज़रेनी कसा बघिन. मला मुलीसारखी आहे तुमची बायको. खर सांगायच तर तुमची बायको माझ्या मुलीसारखी दिसते अगदी म्हणुन मी कौतुकाने बघत होतो एवढच. चुकलं साहेब. माफ करा"

"वा वा, अरे हरामखोरा, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. हे सालं असल्या लंपट लोकांना चौकात उल्ट टांगुन बडवायला हवं" पोरीचा बाप खवळुन बोलु लागला.

"साहेब, तुम्ही काळजी करु नका. मी हाकलतो या नालायकाला. अरे, विनायक, याला बकोट धरुन काढ बाहेर" शेठ गरजला.

म्हातार्‍याला हे सगळं असह्य होउ लागला. कॉलरच्या बटन लावण्याचा-उघडण्याचा काहीसे चाळे करत तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला. पण संतापाने त्याला श्वास लागला होता. त्याची छाती भात्यासारखी वर-खाली होत होती व तोंडातुन शब्दां ऐवजी नुसताच फस-फस, सुं-सुं असले काहीसे आवाज येत होते.

"साला, नाटक बघा कसा करतोय. तुझ्या तर..." अस म्हणत नवरा म्हातार्‍यावर तुटुन पडला.

"अहो, राहु द्या" बायको घाबरुन मागुन ओरडली.

शेठने व पोरीच्या बापाने नवर्‍याला कस-बस धरुन मागे खेचले. या भानगडीत टेबलवरचे अन्न म्हातार्‍यावर सांडले व तो खुर्चीला अडखळुन मागे पडला.

"मला काय अडवताय. पोलिसांना बोलवा" नवरा खेकसला.

"बोलवितो साहेब. तुम्ही शांत व्हा" मालक म्हणाला

म्हातारा उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला धड उठता ही येइना. त्याचा पिन लावलेला शर्ट फाटला होता. फार केविलवाणी स्थिती झाली होती त्याची. जमिनीवरच तो गुडघ्यावर डोक ठेउन तो रडु लागला. 'किती अंत बघायचा कुणाचा' असं काहीस तो पुटपुटत होता.

त्याचं रडण बघुन नवरा अजुन पेटला. "असं पोरी-बाळींकडे बघण्याच सोडा. बोगारओळीत जायला मी पैशे देतो"

हे ऐकुन म्हातार्‍याने अजुन मान टाकली. टेबलला धरुन कस-बसं उठत तो म्हणाला "कोणाला सांगताय बोगारओळीत जायला? देवाने सुखी समृध्द आयुष्य दिलय म्हणुन एवढ माजायच!"

"कसा वटावटा बोलतोय बघा" पोरीच्या आईने भांडणात आपल योगदान दिलं.

म्हातार्‍याचं त्याकडे लक्ष नव्हत. "माझी लेक अगदि अशीच दिसायची" म्हातार्‍याने काकुळतेने परत पोरीकडे बघितल. "सहा महिन्याची पोटुशी होती जेंव्हा तीच्या सासरच्यांनी तीला जाळल"

जाळल या शब्दाचा परिणाम खोलीभर जाणवला. नवराही थोडा चपापला.

"लग्नानंतर दिड वर्ष झाल तरी हुंडा पोचला नव्हता आणि गर्भ चाचणीत पोटात मुलगी आहे हे कळले. ही दोन कारणं पुरेशी होती."

"बरं बरं उगाच थापा मारण बंद करा" पोरीचा बाप बोलला. " गोष्टी तर तयारच असतात."

म्हातार्‍याने फाटक्या शर्टाच्या खिशातुन कागदाचा जुना तुकडा काढुन नवर्‍यासमोर ठेवला.
' हुंडा-बळीची अजुन एक दारुण घटना. गर्भवती सुनेला जाळल्याचा सासु-सासर्‍यांवर आरोप'
ते वर्तमान पत्राच कात्रण जणु किंचाळत होते.

"तीला मारण्याच्या एक आठवडा आधी भेटलो होतो. 'मला इथुन घेउन चला' अशी गयावया करत होती बिचारी. मी विचार केला बाळंतपणाला महिन्याभरात घेउन जाईनच घरी"
म्हातारा खिन्नपणे हसला. "तुमचं बरोबर आहे. मी नालायकच आहे. पोटच्या पोरीला आगीत ढकलुन आलो"

हे सगळ अनपेक्षित होत. नवरा चांगलाच ओशाळला. " माफ करा साहेब. पण तुम्हाला कल्पना आहे की जमा़ना किती खराब आहे आज काल"

"तुमचं काही चुकल नाही. माझं नशिबंच फुटक आहे त्याला तुम्ही काय करणार?"

"मग पोलिसांनी अटक केली का ?" नवर्‍याने विचारले.

"केली ना आणि लगेच सोडुनही दिले. पुरावा नाही म्हणे. माझ्या पोरीचा कोळश्यासारख झालेला देह पुरेसा पुरावा नव्हता त्यांच्यासाठी. मी कोर्टात गेलो. गेली ५ वर्षे कोर्टाच्या पायर्‍या घासुन ही परिस्थिती झालीय. आज शेवटी निकाल लागला व त्या सगळ्यांना शिक्षा झाली. म्हणुन मी जेवायला ईथे आलो. "

मग पोरीकडे बघुन तो म्हणाला "पण यांच्याकडे बघुन मला माझ्या पोरीची इतकी आठवण येत होती कि घशाखाली घास जाईना. पण मी माझ्या पोरीची आठवण काढलेली सुध्दा देवाला मंजुर नाही."

खाणावळीत कोणाला काय बोलावे सुचेना. म्हातारा रडत रडत आपला शर्ट विजारी खोचण्याचा प्रयत्न करत बाहेर निघुन गेला. नवरा जागेवर थिजल्या सारख स्तब्ध होता. म्हातार्‍याला थांबवण्याच सुध्दा कोणाला सुचल नाही.