7/9/16

जियेंगे शान से, मरेंगे शान से|

सकाळीच बिल्डिंग मध्ये अंतयात्रा होती.. आमची बायकोच्या मैत्रिणीचे वडील गेलेत. आजारांनी त्रस्त होते, शेवटला महिना त्यांचे बरेच हाल झालेत. एका दृष्टीने सुटलेत अस म्हणायचं. खालती आप्तेष्टांनी मंडप घातला होता. अंत्यविधीस ब्राह्मण आले होते. बरीच गर्दी जमली होती. तेलुगु लोकात एक पद्धत असते. प्रत्येक घरातून एक माणूस तिरडी समोर नारळ फोडतो. मी कधी असली पद्धत ऐकली नव्हती. साधारण हिंदू लोकांमध्ये नारळाचा संबंध चांगल्या कार्याशी असतो. पण अंत्यसंस्कार चांगली विधी नाही अस तरी कसा म्हणायच? मागले दु:खात असले तरी जाणारा तर पुढे सुखात निघून गेला. जाणार्याच्या पुढल्या प्रवासाचा म्हणून नारळ फोडत असावेत. पुढे रामनामाचा घोष होऊन अंत्ययात्रा  निघून गेली. वाजंत्री वगैरे नव्हती. मला लहांपणी अंत्ययात्रेत वाजंत्री बघून गमंत वाटायची. लग्नात बेंड-बाजा ठीक आहे पण स्मशानात जातांना? पण आता वाटत की लग्नात असो की नसो पण अंत्ययात्रेत मात्र वाद्य जरूर वाजवावीत. जीवनाचा संघर्ष आटोपून जाणारा पुढल्या वाटेला लागला आहे, त्याचा कौतुक नको? 

बंगाली लोकांमध्ये मी अंत्ययात्रेचे फोटो काढतांना बघितल आहे. मला तो प्रकार थोडा अती वाटतो. फोटो हा प्रकार नवीन आहे, त्याच्यात शास्त्रोक्त किंव्हा भावनिक असा काही प्रकार नाही? आणि तुम्ही सुखद क्षणाचे फोटो सारखे सारखे बघाल, अंत्ययात्रेचे फोटो कधी बघणार? आणि फोटो माणसाच्या व्यक्तीमत्वाचा असतो. मृताचा फोटो म्हणजे केवळ पोकळ शरीराचा फोटो नव्हे का? भावहीन?  शरीराला माणूस मानणे शेवटी मनुष्य स्वभाव आहे. शंभर-दीडशे वर्षापूर्वी पश्चिमी देशांमध्ये मृता सोबत फोटो काढणे ही एक प्रथाच होऊन बसली होती. पुढे ती नामशेष झाली.

माणूस जगतो तेंव्हाही परंपरा, चाली रिती, रुढी, धर्म इत्यादी धाग्यांमध्ये गच्च बांधला असतो. आणि मेल्यावरही त्याची सुटका होत नाही. हिंदू संस्कृती शरीराला महत्व नसतं, आत्मा गेल्यावर 'शरीर-वस्त्राचे' दहन करतात. पण मुसलमान किंव्हा ख्रिस्ती अनुसार कयामत तक किवा जजमेंट डे पर्यत आपण - मेल्यावरही - या पृथ्वी तलावर असू म्हणून मृत शरीराला सजवून, छान कपडे घालून जमिनीत पुरतात. पारशी संस्कृती अनुसार मेल्यावरही शरीर उपयोगी ठरू शकते म्हणून मृत शरीराला पारसी लोक 'टॉवर ऑफ  सायलेंस' मध्ये म्हणजे एका विहिरीत टाकून देतात. ते प्रेत खाऊन गिधाड आणि जीव-जंतूंच पोषण होते. वरून जरी हा प्रकार थोडा किळसवाणा वाटत असला तरी मनुष्य जगतांना इतक्या पशु-पक्ष्यांच्या जीवावर जगतो की मेल्यावर थोडी परतफेड करता येत असेल तर ते एका दृष्टीने सकारात्मक विचार आहे.उत्तर युरोपात हजार-दीड हजार वर्षांपूर्वी वायकिंग नावाची जमात रहात असे. ती लोक मुळात समुद्री नाविक होती. त्यामुळे समुद्राला फार महत्व. मृत देहाला एका नावे वर ठेऊन समुद्रात सोडल्या जात असे आणि मग नाव थोड अंतर गेली की अग्नी-बाणांचा वर्षाव करून त्या नावेला आग लावल्या जात असे. थोडक्यात समुद्रात दहन. जियेंगे शान से, मरेंगे शान से|