5/17/09

रेखांकित भाग १

ऊन विचित्र तापल होत. थंडीतल ते दुपारच ऊन नकोस वाटत होत. रविवारी आणि ते पण या उन्हात कॉलेजच तोंड बघायची मेघनाची मुळीच इच्छा नव्हती पण जसलीन बर्‍याच दिवसांची मागे लागली होती की बाबाच दर्शन घ्यायला म्हणुन ती पाय रेटत डोंगरीच्या पायथ्याशी आली होती. डोंगरीच्या माथ्यावर एक देऊळ होत आणि त्याच्या बाजुला कॉलेज. हा बाबा मात्र डोंगरीच्या पायथ्याशी, कॉलेजच्या मागल्या बाजुला बसत असे. तिथे एक औदुंबराच वृक्ष होत. डोंगरीच्या भोवताली मोहोंजोदाडोच्या अवशेषां सारखे भिंतीचे तुकडे पडलेले होते. बर्‍याच वर्षांपुर्वी डोंगरीच्या भोवताली भिंत बांधण्याचा उद्योग महानगरपालिकेनी केला होता. पण औदुंबराच्या झाडाला हात लावायची कोणातच हिंम्मत नव्हती. झाड तोडल तर तोडणारा निर्वंश होतो म्हणे. खरं काय आणि खोट काय ते औदुंबरच जाणे पण डोंगरीच्या वळखा घालणारी भिंत औदुंबराला वळसा घालुन बांधली होती. बाबा त्या वृक्षा खाली का बसायचा हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हत. खर सांगायच तर त्या बाबा बद्दलच कोणाला काही ठाऊक नव्हत. त्याला रामटेकच्या बसमधे चढतांना कोणी तरी बघितल होत पण तेवढच.

मेघना आणि जसलीन त्यांच्या डीओ वरून कुटकुट करत पायथ्याशी पोचलेत.

"या बाबा बद्दल तुला कोणी सांगितल?" मेघनानी विचारल

"चार वर्ष झाली कॉलेजची, तुला माहिती नव्हत?"

" माहिती होत मला पण मी कधी फारसा विचार केला नाही."

"तुझ बरय, तुला काय!" अस काहीस पुटपुटत जसलीन ने स्टँड लावला.

"माझा या भानगडीची थोडी भितिच वाटते" मेघना म्हणाली.

"भिती काय वाटायची त्यात आणि भानगड का म्हणतेस? तु कधी कुंडली किंवा हात दाखवला आहेस का?" जसलीनने विचारल. मेघना काहीच बोलली नाही.

"मग एकदा दाखव आणि बघ काय होत ते"

त्या दोघी बाबाच्या दिशेनी चालु लागल्यात.

"भविष्या जाणुन करायच काय? बदलता थोडीच येत ते. जे व्हायच तेच होणार. आगोदर माहिती करून घ्यायची आणि मग जिवाला घोर लावुन घ्यायचा. " मेघना म्हणाली.

"आणि तसही सध्या सगळ व्यवस्थित चालु आहे. विचारयला काहीच नाही. पण बाबानी सांगितलेलं सगळ खरं ठरत का? "

जसलीनच मेघनाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत. ती बाबा आपल्याला काय सांगणार याचा विचार करत असावी.

जसलीनच लग्न तिच्या घरचे गावातल्याच एका मुलाशी ठरावयला बघत होते. जसलीनला तो पोरगा मात्र मुळीच पसंद पडत नव्हत. तिच अजुन कोणावर प्रेम वगैरे नव्हत पण हा मुलगा तिला काहीतरी खोटा वाटत होता. तिची रहाणीमान साधी होती. पंजाबी असुन मराठी मैत्रिणींमधे राहुन ती मराठी जास्त वाढली होती तर हा पोरगा लहाण पासुन घरचा धंदा बघत असे आणि मस्तवाल हिंडत असे. त्याला एकदाच ती भेटली होती पण त्या एकाच भेटीत तिनी धास्ती खाल्ली. तिला पुढे शिकायच होत. लग्न झाल्यावर उच्च शिक्षण घेण अशक्य होत. घरचे आपल ऐकणार की नाही, लग्न याच मुलाशी कराव लागणार कि काय आणि करावच लागल तर पुढे काय या प्रश्नांशी ती झगडत होती. बाबा काहीतरी जादु करेल अशी काहीशी तिनी भाबडी समजुत करून घेतली होती.

बाबा औदुंबराच्या झाडाखाली सतरंजी घालुन बसला होता. त्याची वेशभूषा अनपेक्षित होती. वापरलेला पण स्वच्छ झब्बा-पायजमा, चष्मा लावलेला, त्याच्या कपाळावर धगधगीत लाल रंगाच गंध होत. बाबा म्हटल कि ज्या ठराविक गोष्टी डोक्यात येतात त्याच्या विपरीत हा बाबा होता. याला यशवंतराव हाक मारली असती तरी चालल असत. मेघना आणि जसलीन बाबापासुन काही अंतरावर उभ्या होत्या. बाबा कोणाशी तरी बोलण आवरत घेत होता. एक तरूण मुलगी घळाघळा अश्रु गाळत होती आणि तिच्या सोबत तिचे आई-वडिल असावेत, ते स्तब्ध होउन बाबाच बोलण ऐकत होते. ते बघुन या दोघी थोड्या चरकल्या. प्रकरण गंभीर दिसत होत पण बाबा शांत चेहर्‍यानी बोलत होता.

आधीचे आलेले लोक जायला लागलेत. मेघना त्या लोकांकडे वळुन वळुन त्या लोकांकडे बघत होती. इतकी कुठली वाईट परिस्थिती त्यांच्यावर गुदरली होती हे तिला माहिती करून घ्यायच होत. जसलीन च लक्ष मात्र आता बाबावर होत.

"आओ बेटी।" बाबा जसलीन ला बघुन बोलला.

"नमस्ते बाबाजी।" म्हणत जसलीन बाबाचे पाय शिवायला पुढे झाली.

"अरे बेटी मेरे पैर छुं क्या मिलना है? पैर तो उसके छुंओ जो पर्वत के माथे पे बैठा है।" बाबा हसत म्हणाला. तरी जसलीन ने नमस्कार केलाच. मेघना थोडी अवघडुनच उभी होती.

बाबा सूर्य प्रकाशा कडे पाठ करुन बसला होता. त्यामुळे समोर बसलेल्याच्या चेहर्‍यावर स्वच्छ प्रकाश पडत असे.

"मेरे पास मेरी जनम-कुंडली नही है।" जसलीन म्हणाली.

"कुंडली की कोई आवश्यकता नही है बेटी. तेरे माथे पर सब कुछ लिखा हुआ है।" अस म्हणत बाबाने जसलीनच्या कपाळावर नजर रोखली.

जसलीन काही बोलणार तर हातानी इशार करून बाबानी तिल थांबवले.

"अब पुछो जो पुछना है।"

"मेरी शादी तय हो रही....

"उसिसे तुम्हारी शादी होनी है।" बाबा निर्विकारपणे मधेच तिच वाक्य तोडुन म्हणाला.

जसलीन स्तब्ध झाली.

"पर मुझे और पढना है। और मुझे वो लडका पसंद भी नही है"। ती कसतरी बोलली. तिचा गळा भरून आला होता. पूर्ण गोष्ट न ऐकता बाबा एकदम फटक्यात निकाल लावेल अस तिला वाटल नाही.

"बाबाजी, आप कुछ तो कर सकते हो?"

"देखो बेटी, मैं कोई जादुगर नही हुं। जो लिखा है वो भगवान कि कृपा से मैं पढ सकता हुं। जो होना है वही होना है और जो ना होना है वो कभी ना होना है। पर तुम्हारे भाग मे अच्छा ही लिखा है। जैसा तुम समजती हो वैसा वो नादान नही है। हां पर शुरुवात मे परेशानी दोनो को होनी है। उसके पश्चात भगवान कि कृपा तुम दोनो पर होगी।"

अजुन काय बोलाव ते जसलीनला सुचेना.

"बेटी, तुम्हारे नसिब मे आगे पढना लिखा है।"

कोणी अजुन काहीच बोलेना.

"तुम्हे इतना सोचने की या चिंता करने की कोई आवश्यकता नही है।" बाबा पुढे म्हणाला.

"अब बेटी तुम सामने युं बैठो।" बाबा मेघना कडे बघुन म्हणाला.

"मला काही विचारयचा नाही या" मेघना पटकन म्हणाली. आपण मराठीत बोललो हे तिला लगेच कळल पण मग काहीतरी विचार करून ती बाबा समोर जाऊन बसली.

बाबाच्या कपाळावर आठ्या जमल्या. त्याने मोठ्ठा निश्वास टाकला. त्याचे डोळे गंभीर झालेत.

"पुछो अब क्या पुछना है।"

"मुझे नही पता मुझे क्या पुछना है।" मेघनाला हे म्हणतांना आपण खुपच बावळटा सारख बोलतोय अस वाटत होत.

"बेटी, बिना पुछे मैं कुछ बता नहीं सकता।"

मेघना काहीच बोलली नाही पण तिच्या डोक्यात विचार आला की पुढे काय घडणार हे विचारण्या ऐवजी मागे काय घडल हे विचाराव.

"बाबाजी, आप मुझे मेरा भूतकाल बता सकते हो" तिला वाटल की बघु तरी बाबात किती दम आहे ते.

"बेटी, भूतकाल बता कर क्या होना है। जो बित चूक है वो तो तुम्हे पता हि है। जिस प्रश्न का उत्तर पता हो, उसे प्रश्न नही कह्ते।"

मेघना परत विचार करु लागली.

"मेरी शादी कब होगी?" काहीतरी विचाराव म्हणुन तिने विचारल.

"इसी साल तुम्हारी शादी होनी है।" बाबा फारच गंभीर झाला.

मेघना चांगलीच चमकली. कॉलेज संपल्यावर ती अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची तयारी करत होती. अनिकेत सोबत. तिथे मास्टर्स संपल्यावर अनिकेतशी लग्न. पण अजुन दोन-तीन वर्ष तरी दोघांचा लग्नाचा विचार नव्हता. तिच्या डोक्यात विचारांची झुम्मड उडाली.

"और पुछो बेटी" बाबाला अजुन काहीतरी महत्त्वाच सांगायच होत पण विचारल्या शिवाय काही न सांगण्याचा त्याचा नियम दिसत होता. मेघना काहीच बोलत नव्हती म्हणुन तो सारखा तिला डिवचत होती.


"बेटी, कुछ बाते ऐसी होती है जो जानने पर जिना कठीन कर देती है। इसका अर्थ ये नही की वो बाते पता न हो तो बेहेतर है। क्योंकी सत्य कालकूट विष समान होता है। न जानो तो मुश्कील और जानो तो भी मुश्कील।"

बाबा हे अगम्य काय बोलत होत हे तिला कळेना. ती आता चांगलीच घाबरली होती. तिच्या मनात प्रश्नांच काहुर उठला होता. बाबा ज्या शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलत होता ते बघुन तो खोटं बोलतोय अस तर वाटत नव्हत. त्यातुन त्याची ख्याती तिला आधिपासुन माहिती होती. तो भविष्य सांगण्याचे पैसेही घेत नसे किंवा हे करा-ते करा असल काहीसुध्दा सांगत नसे. पण बाबाच्या बोलण्याचा संदर्भच लागत नव्हता.

"इसलिये उस विष को मन के भितर समा कर, आत्मसात करना यही एक उपाय है। होनी को कोई टाल नही सकता। स्वयं भगवान भी कुछ नही कर सकते। इसलिये जो होना है उसे स्विकार करे आगे बढो।" बाबा बोलतच होता.

"मेरी शादी अनिकेतसे ही होनी है ना?" मेघना नी चाचरत विचारल.

अनिकेत कोण हे बाबाला अर्थातच माहिती नव्हता.

"बेटी, ध्यान से सुनो। तुम जिसकी परिणीता होगी उसकी मृत्यु होनी है।"

मेघना थंड पडली. आपण कुठल्या भानगडीत पडलो अस तिला झाल. ती डोळे मोठ्ठे करून बाबा कडे बघत होती. खुप जोरात तिथुन पळुन जावस वाटत होत. पण बाबा पुढे काय बोलणार, काय सांगणार हे तिला ऐकायच होत.

"काही तर करू शकतो? यावर काहीच उपाय नाही हे कस शक्य आहे? तुम्ही खर बोलताय हे कशावरून?" मेघना कावुन बोलत होती.

"मैं सच बोल रहा हुं या झुठ ये तो समय हि बताएगा। वैसे भी मुझे झुठ बोल के क्या मिलना है।" बाबाने शांतपणे उत्त्तर दिलं मग तो पुढे म्हणाला " जो होना है उसे होने दो। उससे खिलवाड मत करो।"

काही क्षण असेच गेलेत.

"तुम्हारा घर-संसार बसेगा और तुम बहोत सुखी होगी। पर उसके लिए तुम्हे इस कालकूट विष को मन मे धरे रखना होगा।"

मागे कोणीतरी अजुन येउन उभ होत. आणि तसही बोलायला आणि ऐकायला काहीच उरल नव्हत.

मेघनाची नजर शुन्यात होती. काय झाल हे तिला अजुन झेपल नव्हत. जसलीन ला काय बोलाव सुचत नव्हत. तिनी मेघनाचा हात हात घट्ट धरला आणि त्या दोघी गाडी कडे चालू लागल्यात.

(क्रमशः)

5/2/09

शिव-राज्यारोहण भाग २

छत्रपतींच्या राज्याभिषेकाला भारतीय ईतिहासात अनन्यसाधारण महत्त्व का आहे याचा संक्षिप्तात आढावा आपण मागच्या लेखात घेतला. या लेखात त्यांच्या राज्याभिषेकाला सध्य काळात फारस महत्त्व का दिल्या जात नाही याबद्दल चर्चा करणार होतो. पण त्या आधी मला राज्याभिषेकाचे महत्त्व सिध्द करणारे अजुन काही मुद्दे सुचले. ते मी इथे प्रथम प्रस्तुत करतो.

मागल्या लेखात शिव-राज्यारोहणाच्या वेळीस भारतीय उपखंडात मुसलमानी सत्तांची स्थितीची चर्चा मागल्या लेखात केली पण या मुसलमानी सत्तां व्यतिरिक्त पोर्तुगित, इंग्रज आणि फ्रेंच या तीन युरोपियन सत्ता भारतात जम बसविण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील ब्रिटिश पुढे राज्यकर्ते झालेच. पण शिवा-जी राजांच्या वेळी सगळ्यात अधिक धोका पोर्तुगिज लोकांकडुन होता. १४व्या शतकाच्या अंतिम भागात नविन जग पादाक्रांत करण्यास युरोपियन देशांनी आरंभ केला. यात स्पॅनिश आणि पोर्तुगिज लोक आघाडीवर होते. अर्थात, जग पादाक्रांत करायला ही लोक निघाली नाहीत. भारताला जाण्याचा समुद्री मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचा या युरोपिय देशांनी पुरेपुरे फायदा उठवला. मुसलमानी अंमल अरबी आणि पर्शिया प्रांतावर स्थापित झाल्यापासुन भारताशी आणि चीनशी व्यापार करण्याचे सर्व मार्ग मुसलमानी प्रांतातुन जात असत. मुसलमान आणि ख्रिश्चनांमधील धार्मिक युध्दांना १४ व्या शतकात ऊत आला होत त्यामुळे भारतात जाण्यासाठी समुद्री मार्ग शोधणे आवश्यक झाले होते. भारत शोधण्याच्या मार्गातच दोन्ही अमेरिका खंडांचा शोध लागला. साम्राज्यवादाचा पायंडा इथे पडला. पृथ्वी गोल आहे या वर विश्वास ठेउन कोलंबस पश्चिमेला निघाला. पश्चिमेला जात गेलो तरआपण जगाच्या पूर्वेला पोचु आणि त्या अन्वये भारताच्या पूर्व किनार्‍याला पोचु असे त्याला वाटले. पण तो मधे अमेरिका खंड लागलेत. पण तो वेगळा ईतिहास आहे.

त्या काळात वास्को-द-गामा अफ्रिका खंडाला वळसा घालुन सन १४९८ ला कालिकतला पोचला. तेथुन तो पुढे गोव्याला पोचला. तेंव्हा पासुन पोर्गुगिज लोकांच प्रस्थ वाढत गेल आणि सन १५४३ लात्यांनी गोव्यात सत्ता प्रस्थापित केली. याच दरम्यान पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतही सत्ता प्रस्थापित केली. या भागाला आपण आज ब्राझिल म्हणुन ओळखतो. त्यांच्या स्पर्धेत स्पॅनिशही होते. त्यांनी मध्य व दक्षिण अमेरिकेत हैदोस मांडला आणि संपूर्ण खंडच गिळंकृत केला. या दोन्ही सत्त क्रूर पणात मुसलमानी सत्तांच्या एक पाऊल पुढेच होत्या. यातील स्पॅनिश भारताच्या दिशेनी कधीच आले नाहीत. पण शिवशाहीच्या उदयाच्या वेळेस पोर्तुगिज मात्र भारतावर राज्य करण्याची स्वप्न रंगवित होते. माझ्या मते त्यांच्या मनसुब्यांना खरा सुरंग मराठ्यांनीच लावला. हे खर की मराठ्यांना गोवा कधीच जिंकता आल नाही. (पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी गोवा जिंकलच होत. त्या चढाईच्या शेवटी पोर्तुगिज सत्ताधिशांनी पळुन जाण्यासाठी अक्षरशः बोटी तयार ठेवल्या होत्या. पण काही तरी भानगड झाली आणि हाता-तोंडाचा घास गेला.) पण मराठ्यांमुळे पोर्तुगिजांना गोव्याबाहेर पाऊलच ठेवता आल नाही. जंजिरा, मराठा आणि सिद्दी यांच्यामधे अक्षरशः तळ्यात-मळ्यात करत होता. पण हे सिद्दी पोर्तुगिजांपेक्षा वेगळे.

ब्रिटिश हे साम्राज्यवादाच्या आणि भारत शोधण्याच्या खेळात खुप उशीरा उतरलेत. त्यांनी हात पाय पसरायला सुरुवात केली तेंव्हा पोर्तुगिज आणि स्पॅनिश सत्तांनी जग अक्षरशः आपापसात वाटुन घेतल होत. पोपने पूर्व भाग पोर्तुगिजांना तर जगाचा पश्चिम भाग स्पॅनिश लोकांना दिला होता. त्यामुळे प्रस्थापित परिस्थितीत लुडबुड करून आपली जागा करण्यात इंग्रजांना बरीच वर्ष लागलीत. पण १६व्या शतकात त्यांने उत्तर अमेरिकेत पाय रोवले होते. या भागाला आपण कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिका म्हणतो. तसच वेस्ट इंडिज या बेटेही इंग्रजांनी लौकरच स्पॅनिशांकडुन जिंकली. बोस्टन (या भागाला अजुनही न्यु इंग्लंड असेच संबोधिल्या जात.) भागात तर इंग्रजी लोकांनी महाविद्यालये ही स्थापन केली होती. जगप्रसिध्द हार्वड महाविद्यालयाची स्थापना सन १६३६ची आहे. तेंव्हा शिवाजी राजे सहा वर्षाचे होते! राजांनी भारताच्या राजकीय पटलावर पदार्पणाच करणाच्या वेळी इंग्रजांच्या सुरत आणि मुंबई येथे वखारी कार्यरत होत्या. त्या काळात मुघली सत्ता इतकी शक्तिशाली होती की त्यांच्याशी टक्कर देण्याची हिंम्मत कोणातच नव्हती. त्यामुळे सुरतेतले आणि मुंबईतील इंग्रज फक्त व्यापारा निमित्ताने तिथे बसले होते अस मानणे सुद्धा चुकीचे ठरेल. कारण व्यापारा अतिरिक्त त्यांनी इतर जे उद्योग मांडले होते त्याकडे बघता आज ना उद्या मोघलांची शक्ति कमी होईल आणि तेंव्हा आपण आपली सत्ता प्रस्थापित करू अशी इंग्रजांची धारणा अरण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिकेत ही लोक तेच करत होते.

मधे मला सन १६३० चा डच लोकांनी तयार केलेला जगाचा नकाशा मिळाला. त्यात भारतीय उपखंड सोडला तर उर्वरीत जगात युरोपिय सत्ता झपाट्याने पाय पसरित होत्या. त्यामुळे लौकरच या सत्ता भारतावर नजर रोखणार होत्या हे सांगायला ब्रह्मदेवाची आवश्यकता नाही. भारताबाहेर बलाढ्य असल्यात तरी भारतात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कुठल्याही युरोपिय सत्तेकडे पुरेसे मनुष्यबळ किंवा आवश्यक माहिती नव्हती. माझ्याकडे असलेल्या या नकाशात भारताच्या भागात बर्‍याच चुका दिसतात. थोडक्यात युरोपिय सत्तांना भारतीय भूगोलाचीही पुरेशी माहिती नव्हती. पण त्यांच्याकडे अनोळखी भूभागवर जाऊन अपरिचित जनसमुदायावर राज्य करण्याचा चांगलाच अनुभव होता. यासाठी अमेरिका खंडाचा रक्ताने माखलेला ईतिहास सगळ्यांनी अवश्य वाचायला हवा.

राजांना जगाच्या दुसर्‍या टोकाला युरोपिय सत्तांनी थैमानाची कल्पना असण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त वरून ताक-भात. त्याप्रमाणे ते गोव्याच्या पोर्तुगिजांच्या मागे हात धुवुन लागले होते. या समुद्री चाच्यांना कायमच नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतलेत. चोला राजां नंतर नौदल स्थापन करणारे ते पहिलेच दूरदृष्टे होते. ही या युरोपिय लोक समुद्रावर राज्य करतात हे त्यांनी हेरले होते. समुद्री विज्ञानात आणि जहाज बांधणी तंत्रज्ञानात युरोपिय सत्ता फार अधिक प्रगत होत्या. जादुनाथ सरकार यांच्या नुसार युरोपिय जहाजांपुढे मराठ्यांच्या अक्षरशा नाव्हाड्या होत्या. पण राजांनी एक मुत्सद्दी चाल खेळली. एका हातानी त्यांनी युरोपिय लोकांकडुन तंत्रज्ञान शिकुन घेण्याची खटपट चालु केली (महाराजांची इंग्रजी व्यापार्‍यांशी चाललेली बोलणी अवश्य वाचावी) तसच कमी तंत्रज्ञानाच्या असल्या तरी संख्येनी अधिक होड्या आणि जहाजे बांधण्याचा राजांनी सपाटा लावला. राजांना हे माहिती होते कि युरोपिय लोकांनी कितीही मोठी जहाजे बांधलीत तरी त्यांना समुद्रपट्टीवर तर लागावेच लागेल. त्यामुळे समुद्रपट्टीच जर का सशक्त केली तर ही युरोपिय लोकांशी टक्कर देणे शक्य आहे हे त्यांनी अचूक ताडले.त्यामुळे त्यांनी कोकण किनारपट्टीवर किल्ले बांधायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे राजांचा मुकुटमणी होता.

सन १६व्या व १७व्या शतकाच्या पूर्वाधात शतकात भारतीय उपखंडात तसेच नव्याने शोध लागलेल्या जगाच्या काना-कोपर्‍यात काय चालले हे ध्यानात घेता महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला एक वेगळे तेज प्राप्त होते. १७ व्या शतकात हिंदु समाज या नविन आक्रमकांच्या तुलनेत अशक्त होता. अत्यंत वेगाने बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत स्वतःचे स्थान स्थापन करणे तर अशक्यप्राय होते. तसेच मुसलमानी आणि ख्रिश्चन धर्मांधांनी जो भारतीय उपखंडावर पिंगा घातला होता त्याचा सामना करण्यासही असमर्थ होता. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यावर महाराजांच्या मुत्सद्दीपणा आणि शौर्य अधिक झळाळु लागत. राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक केला त्यामुळे युरोपिय सत्तांचे पसरणे खुंटले. पोर्तुगिज तर गोव्यातच जणु बंदिस्त झालेत आणि राजां नंतर जवळपास दिडशे वर्षां नंतर ब्रिटिश सत्ता जी प्रस्थापित झाली ती बंगाल प्रांतात, महाराष्ट्रातुन नव्हे.

या सगळ्या प्रसंग बांधणीत कुठल्या राजकीय मुद्द्यामुळे राजांच्या छ्त्रचामर अभिषेकाला कमी लेखल्या जाते याची चर्चा राहुन गेली. त्यासाठी मुख्यत्वे १९ व्या शतकातील आणि थोड्याफार प्रमाणात स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय परिस्थिती वर विचार करायला हवा. तो आपण पुढील लेखात करू या.