6/28/08

तो मी नव्हेच!

टिप-: हा लेख लिहायला मी मार्च महिन्यातच सुरुवात केली होती. पण परीक्षेच्या भानगडीत लेख पूर्ण करायला जून महिन्याचा शेवट उजाडला. या दरम्यान माझ्या संकेतस्थळावर येणार्‍या वाचकांची संख्या सहा हजाराच्या घरात पोचली. वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी त्यांचा मनापासुन आभारी आहे. वेळ काढुन आपण या संकेतस्थळावर येता आणि मी लिहिलेले शब्द वाचता यातच सगळं पावत. मी देशापासुन बरीच वर्ष झाली दूर रहातो आहे. या लेखनाद्वारे आणि मिळणार्‍या प्रतिसादामुळे मला ते अंतर कमी जाणवत. या आनंदाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे.

माझ्या ब्लॉगवर उजवीकडे 'स्टॅट काउंटर' नावाचे वाचकांच्या संख्येची नोंद करणारे यंत्र आहे. त्याचा फारसा काही उपयोग नाही पण उगाचच फुशारकी मारायला हे यंत्र सोयीचं आहे. "माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत २ हज्जार लोक येउन गेलेत" असं म्हटल की कॉलर वर करायला बरं पडत एवढच. दोन आठवड्यापुर्वीपर्यंत भेट दिलेल्या वाचकांची संख्या २ हजारच्या घरात होती. दररोज बहुधा पाच ते दहा लोक चुकुन-माकुन येउन धडकतात. बहुतांश वेळा मराठीब्लॉग डॉट नेट वरुन ही लोक माझ्या संकेतस्थळावर पोचतात. जर का मी एखादी नविन गोष्ट टाकली तर पाहुण्यांची संख्या तीस-पस्तीसच्या घरात जाते पण ते तात्पुरतीचं.


दोन आठवड्या पुर्वी अचानक या संकेतस्थळावर एकाच दिवसात ३०० लोक येउन गेलेत. मी थोडा चरकलोच. मी या संकेतस्थळाची जाहिरात कुठेच करत नाही.माझ्या बर्‍याचश्या मित्रांना मी काही लिहितो हे माहिती सुध्दा नाही. काही खास मित्र मात्र नियमित वाचुन मला प्रोत्साहन देतात. मग ही अनोळखी ३०० मंडळी कुठुन आली? पण ही नुसती सुरुवात होती. दुसर्‍या दिवशी ७५० लोकांनी संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद स्टॅट काउंटरनी केली. (मी माझ्या संगणकावरुन संकेतस्थळावर गेलो तर त्याने भेट-नोंदीचा आकडा वाढत नाही) मला वाटायला लागल की काही तरी तांत्रिक गडबड असणार. मी लगेच स्टॅट काउंटरच्या प्रशासकीय विभागाला ई-मेल केला. पण त्यांचे उत्तर आले की यंत्रणा व्यवस्थित आहे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक संकेतस्थळावर येउन गेले आहेत. बघता बघता चार दिवसात १८०० लोक येउन गेलेत. मग मी थोडी 'तहकिकात' करायची ठरवली. माझा ब्लॉग कोणी अजुन व्यक्तीने त्याच्या ब्लॉगवर तर टाकला नाही? किंवा कोणी माझ्या ब्लॉगबद्दल प्रतिक्रीया अजुन कुठे व्यक्त तर केली नाही? कारण तस असेल तर अपरोक्षरित्या माझ्या संकेतस्थळाची जाहिरात होइल आणि वाचकांची संख्या वाढेत. मी माझं नाव (भारद्वाज माझ आण्णाव नाही. ते आमचं गोत्र आहे) किंवा संकेतस्थळाचा पत्ता गुगल करुन बघितला पण माझ्या हातात फारस काही लागेना. स्टॅट काउंटरच्या नोंदींमधे मला लोकसत्ताचे संकेस्थळाची नोंद मला अचानक आढळली. मी माझ्या ब्लॉगचे संकेतस्थळ व लोकसत्ता अश्या शब्दांना गुगल केल्यावर मला लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत माझ्या ब्लॉगचा उल्लेख असलेला लेख मला आढळला. लोकसत्तेच्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराने इंटरनेटवर वाढत असलेल्या मराठी ब्लॉगस् विश्वाबद्दल लेख लिहिला होता. या लेखात त्यांना आवडलेल्या काही ब्लॉगस् मधे माझ्या ब्लॉगचा उल्लेख प्रामुख्याने झाला होता. ते बघुन अनेक वाचकांनी माझ्या संकेतस्थळाला भेट दिली. ती संख्या बघता बघता अडीच हजाराच्या घरात गेली.

खर तर माझे लेखन कोणी वाचावं या हेतुने मी लिहित नाही. लिहिण्याजोगं काही तरी माझ्या कडे आहे असं मला वाटत म्हणुन मी माझा की-बोर्ड बदडतो. अर्थात, संगणकावर मराठी लिहिणही फार सोपं झालेल असल्यामुळे गोष्ट लिहायला फारश्या उठाठेवी करव्या लागत नाहीत. माझं लेखन कोणाला आवडलं तरी उत्तम आणि नाही आवडल तरी उत्तम. माझा शब्दांच्या सामर्थ्यावर ठाम विश्वास आहे आणि माझ्या शब्दात फारस सामर्थ्य कुठल्याच दृष्टीने नाही यावरही माझा तितकाच विश्वास आहे. पण नाही म्हटल तरी अचानक मिळालेल्या प्रसिध्दीनी मी हुरळुन गेलो. मी लेखक झाल्याचा भास होऊ लागला. आता घरा बाहेर पडलो तर लोकं ओळखणार तर नाही ना अशी मला भीती वाटु लागली. मी उगाच टोपी घालुन हिंडु लागलो. खर मी पिक्चर मधे काम करत नव्हतो कि लोकं ओळखतील! अजुन काही कमी असेल तर मी परदेशात रहातो आणि तिथे मराठी भाषेचा गंधही कोणाला नाही. पण ही माझी 'लाईम-लाईटची' वेळ होती. आणि तिथेच माझी लेखणी घसरली. राज-महालाच्या मनोर्‍यावर बसल्यामुळे कावळ्याला कोणी गरुड म्हणत नाही.

लेखन बरेच लोकं करतात किंवा करु शकतात. प्रसिध्दीस येणं हा मुद्दा थोडा बाजुल ठेवला तर प्रतिभाशाली लेखक किंवा कवीं आपल्याला का आवडतात? सगळेच लेखक-कवी आवडतात अस नाही किंवा आवडत्या साहित्यिकाने लिहिलेलं सगळंच आवडत असही नाही. पण श्रेष्ठ साहित्यिकांचे शब्द, विचार, भावना आपल्या मनाला कुठे तरी जाउन भिडतात. त्यांनी शब्दबध्द केलेल्या अनुभवांशी आपण नातं जोडु शकतो. आपल्या सोबत अस काही घडु शकत किंवा आपल्या ओळखीतील कोणा सोबत तस घडलेलं असत हे आपल्या लगेच लक्षात येत. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींनाही तसंच वाटत असत पण साहित्यिक त्या भावना शब्दांमधे अचूक पकडतात. आपल्या मूक जीवनाला बोलत करतात.

पु.लं नी लिहिलेल्या व्यक्तिचित्रां मधील अंतु बर्वा किंवा नारायण आपल्याला कुठे ना कुठे भेटले असतात. वि.स. खांडेकरांनी रेखाटलेल्या ययाती-देवयानीतील मनुष्य वृत्ती आपल्याला आपल्याच आयुष्यात नज़रेत येतात.कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत किंवा कोलंबसाचे गर्वगीत यात प्रगट होणार्‍या उंत्तुंग कल्पनाशक्तीनी मन भरुन येतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते गीत वाचल्यावर शब्दांमधे समाजाची अस्मिता जागृत करण्याचे सामर्थ्य आहे याची प्रचिती येते. दु:खाच्या विविध छटा सुरेश भटांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतात. बा. भ. भोरकर किंवा कवी अनिल यांचे सृष्टी-सौंदर्यावरची पद्य मन प्रफुल्लीत करतात. बहिणाबाई चौधरी किंवा भाऊसाहेब पाटणकरांच्या कविता आयुष्याकडे बघण्याचा एक नविन दृष्टीकोन देतात. इंदिरा संत किंवा शांताबाई शे़ळके शब्दांशी जणु लडिवाळ करुन मनाच्या अनभिज्ञ काना-कोपर्‍यांची सैर करुन आणतात. ग. दि. माडगुळकरांच्या कविता म्हणजे सुग्रास अन्नाची मेजवानीच. 'एक तळ्यात होती बदके अनेक' असो किंवा जोगिया असो, सरस्वतीच त्यांच्या घरची पाहुणी होती. गीत-रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. जणु रामाचा पुनर्जन्म महाराष्ट्रात झाला. आपल्या प्रतिभेने समाजाची करमणुक करणे हेच केवळ साहित्यिकांचे कार्य नव्हे. समाजासमोर ते सध्य परिस्थितीचा आरासा ठेवतात. गोमांतक किंवा महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्र्यांच्या लेखणीला तलवारीहुन अधिक धार होती. जाती संस्थेच्या आणि समाजाच्या पराकोटीच्या कर्मठपणाची विष-फळे विजय तेंडुलकरांनी रेखाटलेली व्यक्तिमत्वे आपल्याला चाखवतात. मरगळलेल्या समाजाला दंडुक्यानी मार बसल्याचा भास 'एक तुतारी द्या मजला आणुनी' या केशवसुतांच्या कवितेनी होतो.

जितकी नावे लिहावित तितकी कमी आहेत. आणि त्यांच कौतुक करण्या इतपत माझ्याकडे शब्दांच भांडार नाही. मी अजुन महाराष्ट्रातील संत परंपरेच्या साहित्याबद्दल काहीच लिहिलेलं नाहिया! तेवढी माझी पात्रता नव्हे.थोडक्यात साहित्यिकांना समाजाचे मानबिंदु मानायला हरकत नाही. ते समजाच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. समाजाच्या अस्तित्वाला साकार करतात. समाजाच्या अनुभवांना बोलत करुन ते इतिहासाल जन्म देतात. त्यांच्या कल्पनाशक्तिला वाचा देणारी ही मराठी-माउली धन्य आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा मराठी समाज धन्य.

माझ्या सामान्य जीवनात मला जे काही दिसत त्याला शब्दात बांधतांना मला धाप लागते. इंटरनेटच्या माया-जाळात मला थोडी प्रसिध्दी मिळाली तर मला नाकाखाली पारंब्या लोंबकळल्याचा भास होऊ लागला. अश्या साहित्याच्या उत्तुंग राज-महालाच्या पायथ्याशी मला जागा मिळाली तरी पुरेसे आहे. पण मी तिथेही सध्या पोचु शकत नाही हीच वस्तुस्थिती आहे या विचारानी मला थोडं वाईट वाटल. मला येणार्‍या यत्किंचित अनुभवांनाही जी भाषा प्रेमाने कवटाळते आणि प्रोत्साहन देते त्या भाषेत माझा जन्म झालाय हे काही कमी आहे?

6/18/08

॥प्रलोभनं॥

आयुष्याच्या यज्ञाची। मोक्षा हीच फलप्राप्ती॥
या यज्ञाची ईष्टदेवता। कान्होबाची भक्ती॥१॥

कुंड धर्माचा बांधुनी। अर्पिल्या कर्माच्या काष्ठा॥
देवून भक्तीचे तूप। पेटविला हा यज्ञाग्नी॥२॥

बुध्दी ज्ञानपर। हृदय भक्तीपर॥
अवयव कर्मोत्सुक। करावे रे ॥३॥

या देहातच चक्रपाणी। तोच शोधूनी॥
मोक्ष अवघाची। प्राप्त झाला रे॥४॥

मोठी मोठी निरूपणे वाचुनी। घेतले हे हातात कार्य॥
या पामरात नसे शक्ती। नेण्यास पूर्णत्वास हे यज्ञकर्म॥५॥

प्रारब्ध कर्माची फळे। भोगण्यास असमर्थ॥
करूनी चुकांची पुनरावृत्ती। दुष्फळ संचित कर्म॥६॥

सांगतात तुकोबा आम्हास। देहात वसे चक्रपाणी॥
हा देहच षड्-रिपुंच्या तावडीत। सांगावी काय राम-कहाणी॥७॥

यात भर कलियुगाची। प्रलोभनांचा नसे तुटवडा॥
या षड्-भुतांची शक्ती अचाट। गिळंकृत करिती भू-मंडळा॥८॥

या षड्-भुतांची वाढे शक्ती। या देहाची जर्जर दशा॥
जैसे राहू-केतू ग्रासती। खग्रास ग्रहणे सूर्या॥९॥

विझविती यज्ञाग्नी। या षड्-भुतांचा अंधःकार॥
भक्ती विफल कर्मे निष्फळ। वाढे सर्वत्र बुभु:कार॥१०॥

या कलियुगात। मनाच्या व्यथेस ना ठाव॥
मन मनालाच फसवुन। प्रलोभनांचे शोधी गाव॥११॥

प्रलोभन-ग्रस्त मनास। औषध काही ना मिळे॥
प्रलोभनांच्या ताटव्यात। पुनर्जन्माचा साप दंश करे॥१२॥

प्रलोभनांच्या जंजाळात। अजून किती गुंतायचे॥
देवघराच्या उंबरठ्यावर। किती जन्म ताटकळायचे?॥१३॥

या चेष्टेचा। अंत कधी ना कळे॥
या जिवा-शिवाच्या खेळाचा। हेतू काय ना उमजे॥१४॥

चिन्मय करी सर्वांस विनंती। हे किंतु नाही नवखे॥
अंतरी केशव-प्रीतीची बांसरी। शब्द केवळ भौतिक रूपे॥१५॥

6/14/08

फिनिक्स

तुमच्या सारखं अजुन बरेच लोक विचारतात की गुजराती असुन मी कंम्प्युटर मधे काय काम करतोय? धंदा-पाणी कसा नाही माझा. आमचा होता मोठा दुकानं. कपड्याचा. आम्ही एकुण तीन भाई आहोत आणि बाबा असे सगळे धंदा बघायचो. भेंडी बाजार मधी मोठ्ठा दुकान होता. हाताला नोकर-चाकर होते. बाबांनी टाकलं होत दुकान त्यांच्या जवानीत आणि रक्ताचं पाणी करुन वाढवलं होत. आता ते फक्त गल्ल्यावर बसतात आम्ही पोरच सगळी काम करतो. कपडा कुठला आणायचा, किती माल हवा, किंमत केवढी हवी इथ पासुन तर कपड्याची मांडणी कशी करायची आणि नोकरांचे पगार असा सगळा बराच कामं असायचा. त्यातुन नोकर सोडुन जाणार तो डोक्याला वेगळा ताप असायचा. पण तीन नोकर खास होते. बर्‍याच वर्षांपासुन आमच्याच कडे होते. आम्ही सगळं कुटुंब एकत्रच रहातो. दोन फ्लॅट जोडुन आहेत. बाबा म्हणत होते की धंदा वाढावायला हवा. तीन भाई किती दिवस एकच दुकान सांभाळणार. आमच्या पत्नी गर्भवती होत्या. माझ्या डोक्यात अजुन एक दुकानं उघडण्याचं होत. मुंबईला कुठे काही स्वस्त असत. आणि नवा धंदा टाकायचा म्हणजे भांडवलाचा मुख्य प्रश्न असतो. तेंव्हाच्या जमान्यात बँका साल्या माजलेल्या होत्या. प्रायवेट बँका येण्याच्या आधीचा जमाना होता. मी अजुन काही शेठ मंडळींशी भेटी-गाठी करत होतो. एक चालतं दुकान असलं म्हणजे पैसा देणार्‍याला धास्ती कमी वाटते. पैसा एका दुकानात खेळता आहे त्यामुळे दुसर्‍या दुकानासाठी पैसा दिला तर बुडीत खात जाणार नाही. पण असली कामं हळु-हळु होतात।

गोष्टी कधी कश्या बदलतील हे सांगण नेहमीच कठीण असत. खुपदा असही होत की आपली काही चूक नसते तरी बराच त्रास अंगावर पडतो. खुप तमाशे केले तरी काही फरक पडत नाही. आगीत पडल की नाचुन थोडीच अंगाला चटके लागण थांबत. आमचं दुकान भेंडी बाजारात होत तरी आम्हाला कधी कशाची भीती वाटली नाही. आजु-बाजुला मुसलमानच होते पण आमच्या दुकानांच्या लाईनीत सगळ्या हिंदुंचीच दुकान होती. आमच्या कडचे बरेचशे पोरे मुसलमानच असत. भेंडी बाजा़र तसा भाई लोगचाच इलाका आहे. आम्ही छोटा शकील, दाउद इब्राहिमला आमच्या डोळ्यांनी बघीतल आहे. तेंव्हा पण तेंव्हा त्यांच्या सारखे बरेच भाई लोक तिथे हिंडत असत. एका जमान्यात हाजी मस्तानचा खुप वचका होता. पण तो बाबांच्या जमान्यात. दाऊद इब्राहिम सारख्या घाणेरड्या लोकांपुढे हाजी मस्तान काय किंवा वरदराजच काय, देव माणुस होता. स्मगलिंग करा किंवा हातभट्टीची दारु विका पण खाल्ल्या थाळीत छेद तर नका करु. ज्या देशात रहाता त्याच्याशी तर गद्दारी करायला नको. अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जेंव्हा पेटायला लागला तेंव्हा आमच्या दुकानाच्या इलाक्यात माहोल तंग होऊ लागला. डिसेंबर मधे ती इमारत पडली त्याच्या भूकंप आमच्या बुडाखाली आला. मुंबई सोबत आमची जिंदगीपण पेटली. आजु-बाजुला मुसलमानच असल्यामुळे आमच दुकान सहाजिकच लॉक-डाउन झाल. हळु-हळु दंगली वाढत गेल्या. आमच्या मुलुंडमधे शांतता होती पण दुकानच्या चिंतेनी मन रमत नव्हत. जानेवारीच्या शेवटाला दुकाना पर्यंत पोचता आल. दुकानात काहीच वाचल नव्हत. व्यवस्थितरित्या दुकान उघडुन सगळा माल चोरुन घेउन गेले होते. कुर्‍हाडीने लॉक तोडल. मग दिवसा-ढवळ्या माल हलवत होते. नंतर सगळीकडे रॉकेल टाकुन आग लावली. आमच्या कडे काम करणार्‍या पोर्‍यानी हे सगळं सांगितल. वीस-तीस वर्ष जुनं फर्निचर, बुकं, सगळ-सगळं जळुन गेल. भिंतीवर धमक्या लिहिलेल्या होत्या. हे सगळं बघुन बाबांच्या छातीत दुखायला लागल म्हणुन त्यांना आधी हॉस्पीटल मधे घेउन गेलो पण नशिबानी हार्ट-अटॅक वगैरे काही नव्हता. आजु-बाजुची सगळीच दुकानं जाळुन टाकली होती. तेंव्हा आगीचे इंन्शुरंस होत पण ते लोक म्हणाले की दंगलीमधे झालेल्या नुकसानाची भरपाई ते करत नाहीत.

दुकानात अक्षरशः काहीच शिल्लक राहिल नव्हत. काय कराव सुचतच नव्हत. धंदा म्हणला म्हणजे पैसा सतत खेळता असतो. आमचं सगळ्यांच जे काही बचत होती त्यावर किती दिवस काढायचे. आमच्या नुकसानी बद्दल सरकार कडुन पंचवीस हजार मिळालेत. लाखो रुपयांच्या मालाची होळी झाली आणि शिमग्याला पंचवीस हजार मिळाले. परत डागडुजी करुन करुन माल भरायच म्हटल तरी गिर्‍हाईक कधी परत येणार माहिती नव्हत .घरचा धंदा असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे आम्ही भावांनी फारस लक्ष दिलं नव्हत. आम्ही आम्ही दोघे मोठे भाई बी. कॉम होतो पण त्याल कोणी भीक घालत नाही. मी आमच्याच अकांउटंट कडे नोकरी धरली. महिन्याला अडीच हजार पगार होता. काही दिवसांपूर्वीच मी नवा दुकान टाकायच्या खटपटीत होतो आणि आता दाण्याला मोताद झालो होतो. पण परिस्थिती नुसार बदललो नाही तर मोडुन जातो. त्या घडीला घरी दोन्ही वेळेसच जेवण सगळ्यांना मिळायला हव हे महत्त्वाच होत. माझ्या भावानी सेल्समनची नोकरी मिळविली. कपडा मार्केट शी संबंधीतच होती.

पण आम्हा सगळ्यांच्या डोक्यात दुकानच घोळत होत. हाताशी काहीच पैसा नाही. बरं मागची थक-बाकी राहिली होती ती वेगळीच. ज्यांची देणी होती ते पाठीशी लागली होती व ज्यांच्याकडुन घेणी होती ती ओळख दाखवीत नव्हती. हळु-हळु लक्षात येत होत की पुन्हा दुकान चालु करायच तर भेंडी बाजारात ते करण अशक्य होत. जळलेल्या दुकानात आता पहिले सारख सुरक्षितही वाटेनास झाल. एक नविनच गेम सुरु झाला. कोणी तरी येउन दुकान विकता का विचारणार. नाही म्हटल तर धमक्यांचे फोन येणार. काहे दिवसांनी साले पोट्टे लोक येउन दम द्यायला लागले. चाकु-सुरे तर खिशात कंगव्या सारखे ते लोक बाळगत होते. शेवटी एकानी येउन पोटाशी नवी रिव्लॉवर लावली. विषाची परीक्षा कशाला करावी? सर बचा तो पगडी पचास म्हणुन एका बाटग्यालाच दुकान विकुन टाकलं. मातीला जास्त किंमत मिळाली असती. महिन्याच्या आत सगळा ठणठणाट झाला.

कपड्याचा सोडुन अजुन कुठल दुकान टाकयची हिंमत होत नव्हती. दुसर्‍या तर्‍हेची दुकान चालविण्याचा मुळीच अनुभव नव्हता. आणि इलेक्ट्रोनिक्स सारख दुकान टाकायला भांडवल कुठुन आणणार? मुंबईत नवी जागा विकत घेउन नवा धंदा टाकायचा म्हणजे लाखो रुपये लागणार. माझ्या सासुरवाड गुजरात मधे होत. ते लोकं मला म्हणत होते गुजारत मधे येउन त्यांच्या धंद्यात हात-भार लावायला. पण इथे आई-बाब आणि भावंडांना एकदम टाकुन जाणं अशक्य होत. त्यातुन एका भावाच अजुन शिक्षण व्हायच होत.

बुकं सांभाळण्याची काम करण्यात फारसा काही अर्थ नव्हता. पण अजुन काय कराव सुचत नव्हत. डोळ्यासमोर नुसताच अंधार होता. जुन्या ओळखींनी नोकर्‍या मिळत होत्या पण त्या अकांउटंट सारख्याच होत्या. अशीच काही वर्ष गेलीत. पोरग बालवाडीत जायची वेळ आली. खर्च वाढत होते, महागाई वाढत होती आणि उत्पन्न मात्र तेवढच होत. तेंव्हा कंप्युटर क्षेत्राचं वारं थोड-थोड वाहु लागली होती. मी घरा जवळच्या एका इंस्टीट्युट मधे छोटे कोर्सेस करायला सुरुवात केली. ते साले लोक लुबाडत होते. मायक्रोस्फॉट वर्ड शिकविण्याचे हजार रुपये घेत होते. अर्थात हे कळायलाही काही दिवस लागले. मी आपला कोर्सच सर्टिफिकीट घेउन मारे नोकर्‍या शोधायला जायचो आणि जास्तीत जास्त सेक्रेटरीच्या नोकर्‍या उघडायच्यात. कंप्युटर क्षेत्रातील कंपन्या फक्त इंजिनिअर लोकांनाच नोकर्‍या देत असत. खर सांगायच तर इंजिनिअर झालेल्या पोरा मधे आणि माझ्यात काहीच फरक नव्हता. या मोठ्या कंपन्यात नोकर्‍या मिळाल्यात कि तिथेच सगळं शिकविल्या जात. पण मी आत इंजिनिअर नाही त्याला कोण काय करणार? शेवटी मी ठरवलं कि कितीही कठीण गेलं तरी कोडिंग शिकायच. मी परत क्लासेस सुरु केले. पण कोडिंग गम्मत थोडीच असते. मला चांद-तारे दिसायला लागले. लॉजिक काय ते कळेना, लँग्वेज कशी लिहायची ते जमेना. लुप काय हे साध कळायला महिना लागला. क्लास मधे शिकविणारा साला ढ माणुस होता. थोड पुस्तकाबाहेरच प्रश्न विचारले कि त्याची त्-त्-प्-प् व्हायची. दिवसभर काम करुन मी संध्याकाळभर इंस्टीट्युट मधे कंप्युटर समोर बसुन असे. तासोघंटी स्क्रीनकडे बघत बसायचो. पण जागवरुन हलायचो नाही. इथे बुडाखाली आग लागलेली असली आणि डोळ्यासमोर शुन्य अंधार असला म्हणजे काय स्थिती होते हे सांगण अशक्य आहे. हळु-हळु गोष्टी कळु लागल्या. न-कळुन होणार कस! बिल्डिंग मधल्या इंजिनिअर होत असलेल्या काही मुलांचीही मी मदत घेतली. जमिन-आस्मान एक केल आणि कोडिंग मागुन-पुढुन शिकलो.

इंस्टीट्युटची परीक्षा झाल्यावर मला अचानक खुप छान वाटु लागल इतका अभ्यास केल्यावर ती परीक्षा म्हणजे टाईम-पास होता. पण मला कॉन्फीडंट वाटु लागल. पुढे जायला माझ्यात बळ आल. अजुन हवी तशी नोकरी मिळाली नव्हती पण ती न मिळण्याच्या कारणांवर मी मात केली होती. कंप्युटर मला येत नाही किंवा येऊ शकत नाही असं कोणी म्हणु शकत नव्हत. मी सगळ्या मोठ्या कंपन्यांमधे अर्ज करायला सुरुवात केली. अर्थात, कोणीच भीक घातली नाही. बाबांनी सल्ला दिला कि कुठल्यातरी लहान कंपनीत आधी अनुभव घे. मी मग लहान कंपन्यांमधे अर्ज करु लागलो. पण नशिब अजुन साथ देत नव्हत. नशिबाला बोल देउन काय फायदा? एवढ भरलेलं घर,साथ देणारी बायको आणि मेहनत करण्यासाठी धड-धाकट शरीर. अजुन काय हव माणसाला?

मी डोक शांत ठेवल। जे करायला हव ते सगळं मी केल होत आणि करत होत. आता पुढे काय होणार ते होणार. आमच्या दुकानाचा असा सत्यानाश होइल अस कुणी स्वप्नातही बघितलं नव्हत. पण तस घडल. काहीही घडल तरी पुढे जाण्या शिवाय काही मार्ग नसतो. बाटग्यांचा राग करत आणि झालेल्यावर रडत बसलो असतो तर पोरं-बाळ उपाशी पडली असती. कोणी मदतीला येइल याची वाट बघण्यातही फारसा अर्थ नसतो. स्वतःच किंवा स्वतःच्या कुटुंबाच आपल्यालाच बघाव लागत. मी आणि माझ्या मधल्या भावानी घर चालत ठेवण्यासाठी धड-पडाट चालविला होता. तो महत्त्वाचा.

शेवटी दुबईतल्या एका लहान भारतीय कंपनीत ओळखीनी मला नोकरी लागली कोडिंगच काम होत. पगार फार नव्हता पण तीथे टॅक्स नसतो आणि रहाण्या-खाण्यासाठी पगारा व्यतिरिक्त भत्ता मिळणार होता. थोडक्यात, मिळालेला पगार घरी पाठवता येणार होता. ओळखीनी नोकरी मिळाल्याचं मनात खटकत होत. माझ्या कडे स्कीलस् होते. ओळखीची गरज नव्हती. पण आता या बद्दल विचार करण्याची मुभा मला नव्हती. मुंबईतच नोकरी शोधा अस पत्नी म्हणत होत्या पण अजुन वाट बघण शक्य नव्हत. संधी, मग ती कुठल्या का रित्या असो, सारखी मिळत नाही. काही वर्ष जरी अनुभव मिळाला तरी मग मोठ्या देशी कंपनीत नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढणार होते.

आज घर स्थिर आहे. पोरगा कॉलेज मधे जाइल पुढल्या वर्षाला तर त्याच्या फी चे पैसे मी देउ शकतो. धाकट्या भावाचही शिक्षण नीट झाल. मधल्या भावालाही दुबईत चांगली नोकरी मिळवुन दिली. सेल्स च्या संबंधीतच होती. कमिशन बेसिस मधे टक्केवारी जास्त होती त्यामुळे पैसा जास्त मिळणार होता. त्याचाही संसार नीट मार्गाला लागला.

या सगळ्या घटना थोड्या पिक्चर मधल्या सारख्याच झाल्यात. थोडी नाच-गाणी असती तर मजा आली असती! शेवटही गोड झाला. नेहमीच होतो अस नाही. माझ नशिब अजुन काही नाही. अजुनही आठवण येते आणि परत धंदा करावासा वाटतो. पण ते कधी जमणार माहिती नाही. फारसा विचार करण्यातही अर्थ नाही पण झालेल्या गोष्टींचे चटके मधेच जाणवतात. आमच्या कुटुंबा पैकी कोणाचच काही चुकल नव्हत की त्या साथी एवढी शिक्षा का मिळावी? आयुष्यात आपल्या हातात किती कमी गोष्टी असतात हे मात्र लक्षात आल. शेवटी जेवढं जमेल तेवढ करायच.

मी सगळी शक्ती पणाला लावली होती आणि अजुनही लावतो आहे. बाकी सगळ वरच्याच्या हवाली.

6/7/08

गीता-माऊली

सनातन संस्थेत तत्त्व अनेक। जणु मोगर्‍याच्या फुलांची रास॥
यावर थोरांची निरुपणे। दरवळे चोहिकडे याचा सुवास॥१॥

पाय फुटले कि अर्भक। धावु लागती वाट फुटेल तिथे॥
तशी स्थिती होते। वाचु लागताच हि निरुपणे ॥२॥

या पामराची मती कुंठित। कळण्यास हा गुढार्थ।
झाकलेली हि शिवज्योती। षड्-रिपुंच्या घोंगडीत*॥३॥

माझ्या सख्या कान्होबास। आहे आमुची काळजी॥
आम्हा प्रश्नांकितांचे शंकानिवारण। करतो युध्दारंभी॥४॥

ऐन युध्दक्षेत्री। कृष्ण अर्जुनास सांगी॥
कर्म-भक्तिचे ज्ञान। भगवद्-गीते रुपी॥५॥

भ्रांत मिटली। युध्द क्षेत्राचे धर्म क्षेत्र झाले॥
कौरवांचे पतन झाले। गीतार्थाने॥६॥

गीतार्थाचे मूळ कठोर कर्मपर। रुप ज्ञानमय गोजिरे॥
गंध भक्तिपर गोड। दरवळे चोहिकडे॥७॥

या गीतेचे रुप काय वर्णावे। जणु आईचे प्रेम कथावे॥
शब्दांचे घडेच्या घडे भरावे। तरी ते अपुरेच॥८॥

या गीता वृक्ष-वल्ली। श्रांत-जन अनेक येती॥
धर्म-मोक्षाचे चिंतन करिती। ईप्सित फळे चाखुन॥९॥

युगा मागुनी युगे गेलीत। गीतार्थ गंगा वाहे अखंड॥
सर्वजन यात नाहुन। सत् चित् नित्य आनंदघन॥१०॥

कान्होबाची भक्ति ऊतु आली हृदयी। लिहिले हे शब्द प्रेमापोटी॥
अन्यथा या अर्भकाची बुध्दी जडभारी। थोरांनी हे साहस घ्यावे पदरी॥११॥

माझ्या राया भगवंता। धन्य झाला चिन्मय जन्मुन भारता॥
मोक्ष होतो जीथे प्राप्त। श्रवुन निव्वळ श्रीकृष्णा उधृत भगवद्-गीता॥१२॥