8/15/13

चुक-भूल देणे घेणे

सध्या लिहित असलेला एक लेख चुकुन प्रकाशित झाला. ते लक्षात येउन आणि लेख ब्लॉगवर अप्रकाशित करण्या आधीच मराठीब्लॉगस. नेट च्या बॉट ने तो लेख त्यांच्या संकेतस्थळावर जाहिर केला. बरीच लोक तो लेख वाचायला रुद्र शक्ति वर येतांना दिसतायत. क्षमा करा पण लेख अजुन पूर्ण झालेला नाही. लौकरच तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन.

आशा करतो की रुद्र शक्ति वरचे इतर साहित्य वाचण्याजोगे असेल.  

धन्यवाद

8/6/13

पेशवाई आणि शिवशाही - एक संक्षिप्त आढावा (भाग १)

पेशवाईवर वाचतांना एक माझ्या लक्षात आले की पेशवाईबद्दल एकलच बोलण म्हणजे त्या राज्यसत्तेला नीट मान न देण्यासारख आहे. नुसती पेशवाईच नाही तर शिवशाहीला ही त्या काळातल्या भारतातील सत्ता आणि भारतेत्तर सत्तांच्या तुलनेत बघण आवश्यक आहे. तुलनेशिवाय थोरवी ध्यानात येत नाही. ही कल्पना डोक्यात घेउन पेशवाई, छत्रपतींचा राज्यकारभार आणि सांप्रत जागतिक परिस्थिती या तीन सुयांनी वेगळ कापड विणण्याच धाडस करतो आहे. यातील पेशवाई आणि छत्रपतींच्या राजकारभारावर ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत आणि अजुनही या विषयांवर बरच काही लिहिल्या जात. पण या दोन कालखंडांवर तुलनात्मक अभ्यास केल्याच माझ्या वाचनात आलेल नाही. या व्यतिरिक्त १७व्या आणि १८व्या शतकात भारत खंडात या आमुलाग्र बदल होत असतांना भारतेत्तर जगात, प्रामुख्याने युरोपिय, तुर्की साम्राज्य आणि अमेरिका खंडातही महत्त्वाचे बदल झालेत. त्याचे परिणाम आज आपल्य आयुष्यावर प्रकर्षाने जाणवतात. उदाहरणार्थ संयुक्त राज्य अमेरिकेची स्थापना. पण आज भारतात ४ जुलै ला अमेरिकेची स्थापना झाली हे माहिती असेल पण थोरल्या बाजीरावांनी दिल्ली कधी पादाक्रांत केली तर थोरले बाजीराव कोण असा प्रश्न पडेल. जर आपण काल्पनिक दुनियेत स्वतःला सन १७५० मधे उभ केलत वर उधृत केलेले बदल समानात्मक होते. म्हणजे त्या काळातले मराठी साम्राज्य जगातील इतर कुठल्याही सत्तेला काट्याची झुंज देण्याची ऐपत बाळगत होत. पण आपल्या दुर्दैवाने मराठा साम्राज्य झपाट्याने लयाला गेल तर युरोपिय सत्ता तेवढ्याच झपाट्याने बलशाली झाल्यात आणि आज आपला देश मराठी बोलायच्या ऐवजी इंग्रजी बोलतो.

अर्थात, या ऐतिहासिक घटना इतक्या सोप्या तर्‍हेने समजणे चुकीचे ठरेल. यातले बारकावे लक्षात घेतलेत तर खर चित्र स्पष्ट दिसत. सध्य परिस्थितीत तर प्रत्येक घटना - ऐतिहासिक असो की सांप्रत, जातीय दृष्टीकोणातूनच बघण्याची हौसच जणु आपल्या समाजाला लागली आहे. त्या ऐवजी मराठी कालखंडाचा अभ्यास त्या काळातील इतर जागतिक घटनांच्या अनुषंगाने केला, व त्या कालखंडावर तटस्थ दृष्टीक्षेप टाकला तरच मराठा वैभवाची आणि सामर्थ्याची खरी कल्पना येउन त्यातुन काही शिकण्यायोग्य मिळेल. आपल दुर्दैव अस की इतिहासातील घटना विसरणे, त्यातुन काहीही न शिकणे, स्वतःच्या पूर्वजांना नाव ठेउन पायावर धोंडा मारुन घेण्यातच आपला समाज पटाईत आहे. असो.

छत्रपतींचा काळ आणि पेशवाईत जवळ-जवळ ४० वर्षांचा प्रचंड घडमोडींचा काळ होता. मी पेशवाईची खरी सुरुवात थोरले बाजीराव पेशवे झाल्यापासुन मानतो. (यापुढे मी छत्रपतींचा उल्लेख राजे असा करेन. लिहायल सोप जात आणि खरा राजा तोच!) राजांच्या मृत्युसमयी मराठी राज्य पश्चिम महाराष्ट्र, कोंकण कर्नाटक आणि तमिळ भूमीत तंजावर पर्यंत पसरल होत. सन १६८० ला राज्याची घडी व्यवस्थित बसलेली होती. सैनिक-सरदार आपापल्या जागांवर दृढ आणि सजग होते. राज्य चालवायला लागणार्‍या पैश्यांची सोय नीट केल्या गेली होती. किल्ले भक्कमपणे रक्षित होते आणि आरमारावर राजे लक्ष केंद्रित करत होते. राजांना युरोपिय सत्तांची कितपत माहिती होती, अमेरिक इत्यादी खंडांबद्दल कितपत ज्ञान होते हे सांगणे कठिण आहे. पण या सत्तांना टक्कर द्यायची तर आरमार सशस्त्र हवे हे त्यांनी हेरले होते. आणि पुढे-मागे मोघलांना आटोक्यात आणल्यावर युरोपिय सत्तांशी संघर्ष निश्चित होता याची जाणीव त्यांना नक्कीच होती. पण आरमार आणि इंग्रजांशी व्यवहार या दोन्ही बाबतीत पेशव्यांनी फार मोठ्या चुका केल्यात. आपली सत्ता मजबुत करण्यामागे त्यांनी महाराजांनी अत्यंत कष्टाने रुपास आणलेल्या आरमाराचा नाश केला. इंग्रजांशी शेवटी झुंज समुद्रावर न होता जमिनीवर झाली पण आरमार सशक्त असते तर पुढील काळात पेशव्यांनाच त्याचा उपयोग झाला असता. तसच इंग्रजाचा मुघलांसारखाच नाश पेशव्यांनी करायला हवा होता. बहुधा त्यांना (सवाई माधवराव पर्यंतच्या पेशवाईला) इंग्रजांची खरी ओळख झाली नाही किंवा इतर युध्दापायी इंग्रजांच्या हालचालींचा फारसा विचार केल्या गेला नाही. यात एक बाब लक्षात घेण्याजोगी अशी की मूळ इंग्रज मुंबई किनारपट्टीवर १६व्या शतकात लागलेत. त्यांचे सुरतेत आणि मुंबईत वखारी होत्या. पण मराठ्यांचा वचक त्या भागात इतका वाढत गेला की शेवटी इंग्रजांना भारतात शिरायाला जाग कलकत्त्यातूनच मिळाली. नागपूरच्या भोसल्यांना कलकत्ता जिंकायची संधी होती पण मोक्याच्या वेळी शंखपणा केल्यामुळे हा भाग अनायसे इंग्रजांना मिळाला. पुढे नागपूरच्या भोसल्यांनी पेशवाईच्या विरोधात पहिले निजामची साथ देण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे इंग्रजांची. पेशवाईच्या उत्तरार्धात होळकरांसोबत नागपूरच्या भोसल्यांनी करारीची झुंज दिली पण तो पर्यंत उशिर झाला होता आणि त्याची परिणिती मराठी साम्राज्याच्या अस्ताने झाला.

आढाव्याची सुरुवात चुकांनी करायचा मानस नव्हता पण इंग्रज आणि आरमार या दोन्ही बाबतीत झालेल्या चुकांच मला फार वाईट वाटत.

मागे म्हटल तस पेशवाई आणि शिवशाहीत ४० वर्षांच अंतर होत. साधारण काळातही ४० वर्षात तफावत जाणवते तर सन १६८० ते सन १७२० मधला काळ तर प्रचंड घडामोडींचा काळ होता. राजांच्या मृत्युनंतर दोन घटनांची या ४० वर्षांवर फार मोठी सावली होती. एक म्हणजे औरंगझेबाची सन १६८२ ची दख्खनी स्वारी आणि दुसर म्हणजे छत्रपती संभाजींचा सन १६८९ चा अवेळी आणि बिभत्स मृत्यु. या दोन्ही घटना एका पाठोपाठ घडल्यात अस म्हणायला हरकत नाही. या दोन्ही अघटीतांनी मराठा राज्यावर प्रचंड तणाव पडला. संभाजी राजांनंतर शूर आणि मुत्सद्दी छत्रपती परत काही राज्याला मिळाला नाही. (शाहु महाराज नक्कीच मुत्सद्दी होते.) त्यामुळे संभाजी राजांच्या मृत्युनंतर नेतृत्वाची कमतरता जाणवायला लागली. या काळात औरंगझेबाच बळ वाढतच गेल. पहाता-पहाता मराठी राज्य केवळ कोकण पट्टी पर्यंतच सिमित राहिल. यात काही कमी असेल तर राजघराण्यातला कलह. मराठी राज्य या परिस्थितीतून तगल हा चमत्कारच मानावा लागेल. मला वाटत की या सगळ्या घटनांनी पेशवाई आणि शिवशाहीतला धागा तुटला. राजांच्या दरबारतला कोणीही मातब्बर सन १६९० नंतर दिसत नाही. त्यामुळे बाळाजी विश्वनाठ जेंव्हा दिल्लीला मुघलांशी करार करायला गेलेत तेंव्हाचे डावपेंच, राजकारण इत्यादी घटनांवर शिवशाही विचारधारांचा कितीसा प्रभाव होता हे सांगणे कठीण आहे. मराठा राज्यविस्तार आणि मुघलांचा नायनाटा करणे ही दोन ध्येय फक्त एक जिवंत धागा होता. हे राज्य श्रींची इच्छा आहे असले विचार पेशवाई पर्यंत काळापर्यंत टिकले होते अस म्हणता येणार नाही.

या सगळ्या उहपोहाचा उद्देश असा की पेशवाईचा जमाना शिवशाहीपेक्षा फार वेगळा होता. सह्यांद्रिच्या आडोश्याची गरज उरली नव्हती आणि किल्ल्यंचे महत्त्व राहिले नव्हते. उत्तर हिंदुस्तानातील सपाट मैदानावर लढण्यासाठी नविन तर्‍हेची युध्दसंस्थेची आणि कौशल्याची आवश्यकता होती.गेली साठ वर्ष डोंगर-कपार्‍यात लढा देण्यात निपुण असलेली मराठी पोरं अचानक दिल्लीपर्यंत कशी पोचलीत हे देवालाच माहिती. खुद्द राजांनाही इतक्या लौकर दिल्ली गाठण्याची स्वप्न बघितली नसणार. मी या लेखात आणि बाकीच्या लेखांमधेही दिल्ली गाठली, दिल्ली गाठली असा सारखा घोष करतो आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे आणि तेंव्हा मोघलाईचीही राजधानी होती हे खर पण दिल्लीवर स्वारी करण्याच्या मनसुब्या मागे फार मोठा इतिहास दडला आहे. मला त्यावर थोड लिहायला आवडेल. पण सध्या हा लेख हाताबाहेर जातो आहे अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. म्हणुन इथेच पूर्णविराम द्यायला हवा. शेवटच म्हणुन एक मागे ऐकलेली गाथा सांगतो आणि लेख संपवतो.

थोरल्या बाजीराव नुकतेच पेशवा झाले होते. ते जेंव्ह पेशवा झालेत तेंव्हा ते अवघे वीसचे होते. छत्रपती शाहुंच्या दरबारात सगळी सरदार मंडळी आणि तरुण पेशवा पुढल्या कामगिर्‍या, मनसुबे इत्यादींवर चर्चा करीत होते. सगळ्यांच म्हणण अस होत की पुढली कामगिरी दक्षिणेवर व्हावी. तिथल्या प्रदेशावर परत सत्ता दृढ करावी आणि उत्तरेला जशी परिस्थिती निर्माण होईल तशी कार्यवाही करावी. असले विचार ऐकुन भर दरबारात तेंव्हा बाजीराव कडाडला की दिल्ली गाठायची सोडुन आपण दक्षिणेला का जातो आहे. तो पर्यंत दिल्ली गाठण्याच मानसिक बळ कोणातही निर्माण झाल नव्हत. तरुण बाजीरावाचा असला धाडसी पण बघुन शाहु महाराज खुश झालेत आणि त्यांनी बाजीरावांना उत्तरेला जाण्याची मुभा दिली.

ही गाथा किती आणि सत्य किती हे सांगण कठिण आहे. पण वीस वर्षात थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झाले होते. महाराजांच स्वप्न शेवटी सन १७३९ ल अंशतः का होईना साकार झाले.

(क्रमशः)


ता.क. - या तुलनात्मक अभ्यासाचा अवाका फार मोठा आहे. महत्त्वाची पुस्तक मला उपलब्ध सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे 'आढावा' या शब्दाचा अर्थ थोडा मोकळेपणाने घ्यायला हवा. ऐतिहासिक घटनांच्या, नोंदींच्या आणि तारखांच्या सांगाड्याला मी मूर्त रुप देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तारखा आणि घटनांमधे काही चूका असतील तर कृपया कळवाव, मी लगेच बदल करेन.