वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
1/2/21
चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - बालगंधर्व
8/29/20
सायकलवीर
मी नुकताच सायकल चालविणे शिकलो होतो. मी जिथे वाढलो तो भाग आणि गल्ल्या एकदम व्यवस्थित आखलेल्या होत्या. आमच्या गल्लीच्या एका बाजूला मोठा रस्ता होता. रहदारीचा. पण माझ्या लहानपणी तिथे फारशी रहदारी नसे. सायकल समोरच्या मॉरिस कॉलेज मैदानावर शिकायची. तिथेच प्रॅक्टिस करायची आणि मग काही दिवसांनी मोठ्या रस्त्यावर चालवायची. अशी ग्रॅड्युएशन प्रथा होती. दादाची सायकल घेऊन, चालत, चालत मी ग्राउंड वर जात असे आणि मग प्रॅक्टीस करीत असे. पण पंख आहेत म्हणून उडायचं की पंखात ताकद असल्यावर उडायचं? हा फार मोठा गहन प्रश्न आहे. मी ठरवलं की पाईडल मारता येत म्हणून मोठ्या रस्त्यावर चालवायच. रविवारी सकाळ च्या वेळी मी घोडी हाकली. आता त्या रहदारी वाल्या रस्त्याला थोडा उतार होता. त्यामुळे सायकलीने मस्त वेग घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीच्या मध्ये कचरा टाकायची जागा असे. आणि त्यात बाबू कचरा गोळा करीत उभा होता. आता बाबू कोण या बद्द्ल नंतर बोलूया. पण रविवारी सकाळच्या वेळी तो आदल्या दिवशीचा कचरा गोळा करीत उभा होता. आणि मुख्य म्हणजे त्याची पाठ माझ्या उतारावर वेग पकडलेल्या सायकली कडे होते. ही बाब महत्वाची. कारण एका होतकरू सायकल-शिक्या सायकल चालविण्याची प्रक्टिस करीत असतांना त्या कडे कोणीही पाठ फिरवू नये. आता रस्त्याला उतारच नव्हे तर किंचित वळणही होते. आणि उतार, वेग, वळण आणि सायकलीचा ब्रेक याची सांगड मला काही झेपत नव्हती. माझ्या छोट्या पंज्यात ब्रेक च येईना. म्हणून मी दोन्ही हातांनी एक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यात सायकालीन कन्ना खाल्ला. आता सायकल वेगाने, वळणावर वळण्याच्या ऐवजी सरळ जाऊ लागली - खर सांगतो, भूत आल होता सायकलीत. तिने जणू ठरवून (माझी चूक नसतांना) कचऱ्याच्या ढिगाकडे झेप घेतली. बाबू कडे. मी बाबू अशी कोवळी हाक ही मारली. आणि ... खडखडाट करीत त्याची गळा -भेट घेतली! त्याची मुळीच इच्छा नसतांना! त्याच्या पायाला लागलं असणार बिचार्याच्या. 'बाबू कहीं पे भी खडे रहेते' अस काहीस बडबडत मी सायकल उचलून धावत पळ काढला.
सायकल शिकून आता बरीच दशके झालीत पण सायकल जेंव्हा पहिल्यांदा शिकलो, स्वतः पायडल मारून, नीट सांभाळून चालवली, तो आनंद अजूनही ताजा आहे. वेगाने, मस्त वार लागतंय आणि बाकी पायी चालणार्या पेक्षा विनासायस पणे पुढं जातोय हा आनंद अप्रतिम होता. वेगाने जाण्याची इच्छा ही मनुष्यात मूळच असावी. म्हणून आधी आपण बैल माणसावळले असणार. मग घोडे. मग घोड्यावर हजारो वर्षे भागलीत. आणि मग वहाने. नशिबाने मला पुढे बरीच वेगवान वाहने चालविण्याची संधी मिळाली पण पहिल्यांदा सायकल यायला लागण्याची आठवण अजूनही अवीट आहे. काही आनंद असे असतात की त्याचे पुढले टप्पे गाठलेत तरी पहिला टप्पाच लक्षात राहतो, मनात मला माझ्या मोठ्या भावाचीच सायकल वारसा-हक्काने मिळाली. बिना दांड्याची (लेडीज), लाल रंगाची सायकल होती. तेंव्हा जुन्या भैय्या सायकल व्यतिरिक्त नुकत्याच नवीन फैशन च्या सायकली येऊ लागल्या होत्या. स्ट्रीट कॅट नावाच्या सायकलीची जाहिरात फार प्रसिद्ध झाली होती. काहीतरी इंग्रजीत होती जाहिरात. कळायचं नाही तेवढं इंग्रजी तेंव्हा.
(क्रमश:)
6/4/17
बाजीरावांची गाथा
7/9/16
जियेंगे शान से, मरेंगे शान से|
10/5/14
महाराष्ट्र कोणाचा?
सेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मुद्द्यावरुनच बहुतांश राजकीय युत्या तुटतात पण सेना-भाजप युती हि केवळ राजकीय युती मानता येइल का? गेल्या पंधरा वर्षात 'सेक्युलारिजम्' या वाह्यात आणि भ्रष्ट विचारसरणीच जे स्तोम माजले आहे, याला वैचारिक, बौध्दीक आणि त्यान्वये राजकीय पातळीवर सातत्याने विरोध करणारे आणि जन-मानसाचा पाठिंबा असणारे केवळ दोनच पक्ष भारतात नजरेत येतात, शिवसेन आणि भाजप. त्यामुळे त्यांची युती हि केवळ राजकीय पटलावरची नसुन ती एका भ्रष्ट आणि भारतविरोधी विचारप्रणालीला विरोध करायला एकत्रित आलेल्या शक्ति होत्या. त्यामुळे निव्वळ जागा-वाटपावरुन ही युती तुटणे आणि हिंदुंची मते परत फुटुन त्याचा फायदा काँग्रेस किंवा शरद पवारांना होणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणे नव्हे तर काय?
2/10/14
पेशवाईचा र्हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)
सेवन इयर्स वॉर सन १७५६ ते सन १७६३ या कालावधीतले युध्द होय. हे एक युध्द नव्हत आणि एका ठिकाणीही घडले नाही तसेच हे केवळ दोन राजवटी किंवा राष्ट्रां पर्यंत सिमीतही नव्हते. याला पहिले जागतिक युध्द म्हणायला हरकत नाही कारण हे ज्ञात जगाच्या तीन खंडांमधे लढल्या गेल. इंग्रज आणि फ्रेंच या राजवटींना ज्ञात जगावर सत्ता प्रस्थापित करायची होती आणि मुख्य म्हणजे जागतिक व्यापारवर कब्जा करायचा होता. हे युध्द म्हणजे या दोन राजवटींच्या महत्त्वाकांक्षेची परिणीती होय. या युध्दात अनेक राजवटी सामिल होत्या. युरोपमधे ऑस्ट्रीयन, हॅनोवर, प्रुशियन, रशियन आणि स्पॅनिश सत्ता तर भारतात बंगालचा नवाब आणि उत्तर अमेरिकेत इंग्रजांची १३ संस्थाने (कॉलनी) तसेच अमेरिका खंडातले मूळ-निवासी (रेड इंडियन) राज्ये, या सगळ्यांनी या युध्दात भाग घेतला आणि त्याचे परिणाम भोगलेत. युध्दा अंती मात्र, नशिबाचाच भाग म्हणावा लागेल, फक्त इंग्रजच विजयी ठरलेत. या युध्दाचे परिणाम आणि त्याची सावली कुठपर्यंत पडली याचा विचार आपण पुढल्या लेखात करु. या लेखात नेमके काय घडले याचा आढावा घेउया.
सेवन इयर्स वॉरची सुरुवात, सहाजिकच, युरोप खंडात झाली.त्या काळातील युरोपिय राजकीय नकाशा आज पेक्षा वेगळा होता. इंग्लंड आणि फ्रांस, स्पेन आणि रशिया ही आजच्या काळातली राष्ट्रे तेंव्हा राजवटी होत्या तसेच हॅनोवर, प्रुशिया, ऑस्ट्रिया या इतर प्रमुख राजवटी होत्या. सन १७५६ ला प्रुशियाच्या फ्रेडरिक द ग्रेट ने ऑस्ट्रीया आणि सॅक्सोनी राज्यावर हल्ला केला. खर सांगायच तर जगातील इतर महाराज्यांच्या तुलनेत हे युध्द म्हणजे लुटपुटीचे युद्ध मानायला हवे पण लौकरच या युध्दाचे रुपांतर युरोपिय युध्दात झाले आणि पुढे जागतिक युध्दात. इंग्लंडने प्रुशियाची बाजु घेतली तर फ्रांस, रशियाने ऑस्ट्रिया आणि सॅक्सोनीची बाजु घेतली. युरोपात इंग्रजांनी आपले भूदल कधीच उतरविले नाही. युरोपीय भूमीवरची युध्दे फ्रेडरीक दि ग्रेटच्या सैन्याने जिंकलीत. इंग्रजांनी सगळे लक्ष उत्तर अमेरिकेतील धुमश्चक्रीवर केंद्रित केले.
उत्तर अमेरिकेचा रंगमंच:
कोलंबसाने दक्षिण अमेरिकेचा शोध लावल्यापासुन युरोपिय राष्ट्रांमधे तो भूखंड गिळंकृत करण्याची स्पर्धा सुरु झाली. सुरुवातीला स्पेन आणि पोर्तुगल या शर्यतीत पुढे होते. या दोन राष्ट्रांनी दक्षिण अमेरिक आणि मध्य अमेरिका वाटुन घेतले. स्पेन या जमिनी हडपण्याच्या आणि तिथल्या मूळ निवास्यांना अत्यंत भीषण रितीने मारण्यात अग्रेसर होत. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल प्रांत सोडला तर इतर सर्व प्रदेश तसेच मध्य अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया प्रदेशावर स्पेनचे अधिपत्य होते. पण पुढे, म्हणजे १६व्या शतकात स्पेन कडे लोक कमी आणि जमिन जास्त असे झाले त्यामुळे त्यांना इतक्या मोठ्या भूभागा कडे लक्ष देणे अशक्य होते. या पार्श्वभूमीवर इंग्रज, फ्रेंच आणि डच (सध्याचे नेदरलँड) या राजवटी उत्तर अमेरिका खंडांमधे लुडबुड करु लागल्यात. लौकरच आज ज्याला आपण संयुक्त राष्ट्र अमेरिका (यु. एस.) म्हणतो त्याचा उत्तर-पूर्व भाग इंग्रजांनी घेतला तर त्याच्या उत्तरेला म्हणजे सध्याच्या कॅनडा भाग फ्रेंचांनी घेतला. अर्थात, फ्रेंच आणि इंग्रज दोघांनाही संपूर्ण उत्तर अमेरिका स्वत: साठी हव होत त्यामुळे त्यांच्या संघर्ष उत्पन्न होणे स्वाभाविक होते.
या दरम्यान उत्तर अमेरिकेत फ्रांसने कॅनडा परिसरातुन इंग्रजांच्या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केली. सन १७५० चे दशक उजाडे तोवर इंग्रजांच्या १३ संस्थाने (कॉलनी) उत्तर अमेरिकत दृढ झाल्या होत्या. (जग प्रसिध्द हार्वड युनिवर्सिटीची स्थापना सन १६३६ ची आहे) या संस्थानांच्या द्वारे इंग्रज फ्रेंचांशी भांडू लागलेत. (अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युध्दाचे बाळकडू हे इंग्रजांचे सैनिक बनुन फ्रेंचांशी केलेल्या युध्दात घेतलेत) सन १७५६ ला फ्रेडरिक दि ग्रेटने युरोपात युध्द चालू केल्यावर अमेरिकेच्या सागरी किनारपट्टीवर इंग्रजी आरमार फ्रेंच आरमार आणि व्यापारी गलबतांच्या मागे लागू लागलेत. अश्या प्रकारे युरोपातील युध्दाचा दुसरा रंगमंच उत्तर अमेरिकेत उघडला. सन १७४६ (म्हणजे सेवन इयर्स वॉरच्या आधी) ला फ्रेंचांनी भारतीय उपखंडातील मद्रासचे पोर्ट इंग्रजांकडुन जिंकले त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच भारतीय उपखंडातही भांडू लागलेत. पुढे प्लासी (पळशी) च्या युध्दात इंग्रज जरी बंगालच्या नवाबाशी लढलेत तरी या नवाबाल फ्रेंचांचा पाठिंबा होता. थोडक्यात प्लासीची लढाई फ्रेंच आणि इंग्रजांमधल 'प्रॉक्सी' युध्द म्हणायला हरकत नाही. युरोप आणि उत्तर अमेरिकेतल हे युध्दाचा वन्ही आता भारतीय उपखंडात पसरु लागला.
त्या काळात इंग्रजांचे आरमार फ्रेंचांच्या तुलनेत बलाढ्य होते तर फ्रेंचांचे भूदल इंग्रजांपेक्षा अधिक शक्तिशाली होते. पण या दोन राजवटींचे खजिने फार सिमित होते. इतक्या मोठ्या समुद्री आणि भू प्रदेशात एकाच वेळेस युध्द करण्याचा ताण या दोन्ही राष्ट्रांना जड जाउ लागला. ही युध्द अजुन किती वर्ष चालाणार याची कल्पना कोणाला नव्हती पण जादूची कांडी फिरवल्या सारख तिन्ही खंडातील युध्द इंग्रजांनी जिंकलीत तसेच समुद्रावर आपली अनभिषिक्त सत्ता प्रस्थापित केली.
तेथे त्यांच्या कडे संस्थानांच्या द्वारे भूदलही होते आणि किनारपट्ट्यांवर त्याचे आरमारही सुसज्ज होते. सेवन इयर्सच्या काळात या भागात बर्याच चकमकी झाल्यात आणि त्यावर फारस लिहिण्याचा मानस नाही पण या सगळ्या युध्दात इंग्रजांनी फ्रेंचांचा कडक पराभव केला. कॅनडा फ्रेंचांन सोडावे लागले. (कॅनडा जरी आज स्वंतत्र राष्ट्र असले तरी इंग्लंडची राणी त्यांची राष्ट्रप्रमुख मानल्या जाते) तसेच वेस्ट इंडिज ची बेटे आणि तिथला उभरता गुलामांचा व्यापार आणि उसाच्या साखरेचा व्यापार इंग्रजांचा झाला.
भारतात प्लासीच्या युध्दाचा अंत आणि त्याचे परिणाम सर्वश्रुतच आहेत.
सन १७६३ ला चारही मुंड्या चित झालेले फ्रेंच नरम होउन इंग्रजांसोबत करार करायला राजी झाले. त्याला करार म्हणणे विनोद ठरेल कारण उत्तर अमेरिकेचा भूभाग, वेस्ट इंडिज मधला व्यापार आणि भारतात हात-पाय पसरविण्याची शक्यता असे सगळेच्या सगळे फ्रेंचांनी गमवले. भारतात आता फक्त इंग्रज हीच एक युरोपिय सत्ता उरली होती.
युरोपिय राजवटींनी अमेरिकेत दोनशे वर्ष प्रचंड विध्वंस केला. तेथिल मूळ निवास्यांना कापून काढले किंवा जबरदस्तीने लग्न करुन त्यांची ओळख बदलवुन टाकली. पण आशिया, अफ्रिका किंवा मध्य आशिया भागात असे करणे युरोपियन सत्तांना अशक्य होते. या भागातील लोक, त्यांचा इतिहास घट्ट बसलेला होता आणि या भागातील लोकसंख्या इतकी होती की इतक्या लोकांना कापून काढणेही शक्य नव्हते. अश्या परिस्थिती व्यापाराद्वारे युरोपिय लोक आधी रुजले आणि हळु-हळु त्यांनी आशिया आणि अफ्रिका खंडांना गुलाम बनविले.
सेवन इयर्स वॉरचा अंत म्हणजे युरोपिय साम्राज्यवादाच्या वर्जन २.० ची सुरुवात मानायला हरकत नाही.
(क्रमशः)
सेवन इयर्स वॉर च्या युध्दाचे क्षेत्र आणि प्रमुख स्थाने
युरोप (सन १७७०)
या युध्दाबद्दल अजुन माहितीसाठी खालील संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी:
1)http://faculty.marianopolis.edu/c.belanger/quebechistory/encyclopedia/SevenYearsWar-FrenchandIndianWar-AGreatImperialWar.htm
2) http://www.ushistory.org/declaration/related/frin.htm
3) http://stutzfamily.com/mrstutz/independence/seven.html
4) http://www.kronoskaf.com/syw/index.php?title=Political_Consequences_of_the_Seven_Years_War
5) http://history.state.gov/milestones/1750-1775/french-indian-war




.jpg)