
माझे नाक फेंद्रे आहे अशी मला शंका आहे. माझ्या रुपात नाक सरळ असते तरी फारसा फरक पडला नसता. मी काही ह्रितिक रोशन नाही. म्हणजे, रुपात साम्य असेलही पण मला त्याच्यासारखे नृत्य येत नाही हा महत्वाचा भाग! असो. पण गेले काही वर्षे मी जाहिराती किंवा चित्रपटातील नट्या किंवा तत्सम सुस्वरूप युवत्यांची नाके बारकाईने बघतोय आणि माझ्या लक्षात आले कि सगळी नाके एकाच कारखान्यातून छापून निघाली आहेत. मी आमच्या भार्येस हा प्रश्न वजा शंका विचारली. “तुला बरी बायकांची नाके बघायला वेळ आहे?” तिचाही प्रश्न बरोबर होता. तसा मी मुळातच चिकित्सक वृत्तीचा इसम आहे. पण इंग्रजीत म्हणतात “Curiosity kills the cat”, तसे या बोक्याने हा प्रश्न विचारून चुकीचा बिळात पंजा तर नाही ना घातला? आता मागे वळणे नव्हते, “ अग, चित्रपटाची गाणी, रस्त्यावरील जाहिराती फलक, युट्युब वरील जाहिराती, टीवी वरील जाहिराती आणि मग उरलेला वेळात इन्स्टा, सगळी कडे जर का सुस्वरूप युवत्यांचा भडीमार होत असेल तर माझ्या सारख्या बापुड्याने करायचे तरी काय?”

(अर्थात, फक्त सिनेमातील नट्याच या भानगडी करतात असे मुळीच नाही! सुप्रसिद्ध नट पण उद्योगी आहेत)

इन्स्टा म्हटल्याचा उपयोग झाला. कारण हि नाक तिच्याही नजरेस आली होतीच. भार्येने शंका निरसन केले. “सगळे आजकाल प्लास्टिक सर्जरी करतात. बहुतेक या सगळ्या बायका एकाच प्लास्टिक सर्जन कडे जात असतील.”
चित्रपट सृष्टीतील नट-नट्या हे सगळे करीत असतील तरी ठीक आहे. आपल्याला काय माहिती त्यांच्यावर दिसण्याचे किंवा असलेले रूप जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा केवढा दबाव असेल. आपण तेल-भांग आणि लग्नाला जायचे असेल तर पावडर लावणारे. शेवटी त्यांचा चेहरा त्यांची पुंजी आहे. चेहऱ्यावरच त्यांची बहुतांश कमाई होत असते. अडचण खरी सुरु होते जेव्हा हे लोण त्यांच्या पर्यंतच सीमित रहात नाही.
केवळ जाहिराती आणि टीवी, सिनेमातील युवक-युवत्यांच्या चेहरे कृत्रिम झाले नाहीत आता हळू हळू अपेक्षा होते आहे कि जन-सामान्यांनी पण आपले चेहरे कृत्रिम करून घ्यावेत! हैद्राबाद आणि बंगलोर सारख्या शहरांमध्ये स्कीन केअर, Face Sculpting इत्यादि जाहिरातींचा भडीमार होत असतो. (यात मी डोक्यावरचे केस पुनर्जीवित करण्यासाठीच्या जाहिरातींचा समावेश करीत नाही. माझ्या डोक्यावरचे झपाटीने माघार घेणारे ‘सैन्य’ बघता, मला केसांच्या जाहिरातीबद्दल सहानुभूती वाटते!) या चेहरा सौदर्यीकरणाच्या जाहिरातीत ‘आधीचा’ चेहरा आणि मग उपचारा ‘नंतरचा’ चेहरा दाखवितात. काय काय नवीन शब्द आणि व्याख्या वापरतात हो?

‘Hydra facial’, ‘Body Contouring’? हे contouring पणा करून डायरेक्ट सर्कशीत कि काय? गंमतीचा भाग वगळला तरी या बोकाळणाऱ्या क्लिनिक आणि जाहिरातींमुळे- आपल्या आस-पासचे इतकी लोक कुरूप आहेत? या प्रश्नापासून एक विचार प्रवास सुरु होतो आणि मग आरश्यात बघून आपण स्वतःच कुरूप तर नाही? या अपायकारक विचारांनी हा प्रवास संपतो. जाहिरातींच्या भडीमाराने या वैचारिक प्रवासावर किती लोक जात असतील? या जाहिराती आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अविचारांचे वैयक्तिक आणि सामाजीक मानसिकते वर काय परिणाम होत असेल? ‘मुलगी सावळी आहे’ हे अजूनही लग्नाच्या जाहिरातीत लिहिणारा आपला ‘काळ्या’ मतीचा समाज, आता मुलगी ‘प्लास्टिक सर्जरी करायला तयार आहे’ हे लिहायची वेळ येणार कि काय?
—
नाकाच्या शस्त्रक्रियेचा सर्वात पहिला उल्लेख दोन-तीन हजार वर्षांपूर्वी भारताचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक सुश्रुत यांच्या संहितेत येतो. पण सुश्रुतांची ही शस्त्रक्रिया निव्वळ 'पुनर्रचनात्मक' (Reconstructive) होती. युद्धात झालेली जखम, एखादा अपघात किंवा कुष्ठरोगासारख्या व्याधीमुळे जेव्हा चेहरा विद्रूप होई, तेव्हाच सुश्रुतांकडे शस्त्रक्रिया केली जाई.
थोडक्यात सांगायचे तर, देवाने आणि आई-वडिलांच्या कृपेने मिळालेला चेहरा हेच दुर्दैव समजून त्यात हेराफेरी करायला सुश्रुतांच्या दारी कोणी फिरकत नसावे. त्या काळात आजच्यासारखे प्रगत भूलशास्त्र (Anesthesiology) नव्हते. त्यामुळे निव्वळ 'दिसणे अधिक आकर्षक करण्यासाठी' भयानक वेदना सहन करण्याचे धाडस टाईमपास म्हणून तरी कोणी नक्कीच केले नसेल!
गेल्या शंभर वर्षात जगाची जशी आर्थिक प्रगती होऊ लागली तसे या शल्यक्रियेची प्रसिद्धी वाढू लागली. आज जगात दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि कोलंबिया हे देश प्लास्टिक सर्जरी मध्ये अग्रगण्य आहेत. दक्षिण कोरियाच्या राजधानीत – सोल, मधील ८०% हून अधिक स्त्री वर्ग नोस जॉब किंवा त्यांच्या पापण्या मोठ्या करण्याची शस्त्रक्रिया करितात. कोलोम्बिया आणि ब्राझिल मध्ये स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणावर स्तन किंवा पार्श्वभाग मोठा आणि गरगरीत करण्याच्या शस्त्रक्रिया करितात. हि टक्केवारी शहरी भागात जास्त आहे. कोरियाच्या लोकांचा चेहरा असा असतो कि त्यांना डोळ्यावर आणि भुवइच्या मध्ये जो भाग असतो तो फार सपाट असतो. थोडक्यात, त्यांच्या मते, त्यांचे डोळे रेखीव नसतात. म्हणून प्लास्टिक सर्जरी करून तिथे भाग कापून, रेखीवपणा आणल्या जातो. याला Double Eye Lid surgery असे नाव आहे.
ब्राझील किंवा कोलोम्बियातील प्लास्टिक सर्जरी बद्दल अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. पण काही मूलभूत प्रश्नांचा विचार करणे आपल्याला बाध्य आहे कारण सत्य परिस्थिती अशी आहे कि हे प्रकरण येथून पुढे जगभर वाढतच जाणार आहे. पहिला प्रश्न किंवा परिस्थिती अशी - कोरियाची संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. इतकी पुरातन संस्कृती म्हणजे सौंदर्य याची परिभाषा व परिकल्पना या समाजात रूढ असणार. बर, आता चेहराच पूर्ण नवा करीत आहेत ते पण मान्य केले, तरी या नवीन चेहऱ्यांची मापदंडे कोरियन किंवा भारतीय आहे का? हि विशिष्ट नाके, फुललेले ओठ, उंचावलेली गालाची हाडे, आणि गुळगुळीत गाल, इत्यादी सौंदर्याच्या नवीन (आणि घातक) परिभाषा कोण ठरविते आहे आणि कुठून या लंपास होऊन येत आहेत?
पाश्चिमात्य देशांनी जगावर जेव्हा राज्य केले तेंव्हा त्यांनी युरोपियन सौंदर्याची मापदंडे जिंकलेल्या जगावर लादण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले त्यामुळे इंग्रजी सौंदर्याची व्याख्या त्यांनी आपल्यावर लादली. इंग्लंड किंवा इंग्रजी लोकांमधे इतर कुठल्याही देशात किंवा समाज एकूण लोकसंख्येत सुस्वरूप लोकांची जेवढी टक्केवारी असते, तेवढीच इंग्लंडमध्येही असणार. पण इंग्रजी गोरा रंग म्हणजे सौंदर्य असा भ्रम पसरवला गेला, पण प्रत्यक्षात ब्रिटीश सौंदर्याचे मापदंड हे केवळ सत्ता आणि वसाहतवादी वर्चस्वामुळे आपल्यावर लादले गेले.गोरी मेमसाब म्हंटले सगळे विरघळून गायब. मग गोरी मेमसाब चा रंग हा खरा, तिचा चेहरा फक्त सुंदर. या पांढऱ्या रंगामागे आपली कॉस्मॅटिक इंडस्ट्री आणि वृत्तपत्रांतील वधु-वर विभाग अजूनही धावते आहे. सौंदर्याची ही मापदंडे तेव्हा इंग्रजांनी लादली आणि आताच्या काळात?
आधुनिक काळातील एक तऱ्हेचा नवीन वसाहतवाद हॉलीवूडमधून जगावर लादला जातो आहे. हॉलीवूड चे सौंदर्य, तिथला रंग, नाके, गाल, ओठ, कृत्रिम निमुळते चेहरे आणि पुन्हा, गोरा रंग! सिनेमे, जाहिराती, इन्स्टाग्राम, थोडक्यात, संगणकीय अल्गोरीदमच्या सामर्थ्याने आणि हजारो करोडो रुपये असलेल्या कॉस्मॅटिक इंडस्ट्रीच्या जोरावर हा सांस्कृतिक न्यूनगंड पद्धतशीर रित्या जगावर थोपवला जातो आहे.

वरील सगळ्या छायाचित्रातील चेहऱ्यावरील नाके अमेरिकेतील हॉलीवूड च्या नट्यांची नक्कल आहे हे स्पष्ट दिसते. आणि आता तर सर्रास चेहऱ्याचा रंग पण तसाच करण्याचा प्रयत्न असतो! अजून एक महत्वाची बाब म्हणजे, बहुतांश बदल करून घेणारा वर्ग, स्त्री वर्गच आहे. एकीकडे आपल्याकडे इस्रो मध्ये स्त्रिया विज्ञान आणि अंतराळ विज्ञानात अग्रगण्य आहेत तर दुसरीकडे सिने जगतातील अग्रगण्य नायिका आणि अभिनेत्या नवीन चेहरे धारण करीत आहेत. सध्याच्या ‘influencers’ च्या काळात लहान आणि तरुण मुलींवर प्रभाव कोणाचा जास्त पडत असेल?
सुंदर मी होणार!
येथे दुसरा प्रश्न समोर येतो - विडंबना अशी कि या प्रकाराला personal choice किंवा व्यक्तीस्वातंत्र्य हे गोंडस नाव दिले जाते. पण नक्कल करणे हे व्यक्तिस्वातंत्र्य नाही. इम्पोर्टेड सौंदर्याची ही मापदंडे स्वीकारणे हा personal choice नाही, ही एका प्रकारची गुलामगिरीच झाली. सगळे जर का एकाच साच्यातून काढल्या सारखे दिसत असतील तर ते सौंदर्य कसले? त्या बाहुल्या झाल्यात!
एक युक्तिवाद असाही केला जाऊ शकतो कि टक्कल पडलेल्यांनी केस कृत्रिमपणे उगवणे किंवा दात सरळ करून घेणे हे सुद्धा पण या श्रेणीतच मोडते का? वरकरणी विचार करता असे वाटू शकते वेडे-वाकडे दात सरळ करणे आणि पाश्चिमात्य नटा सारखे दात करायला सगळे दात पाडून खोटे लावणे हा मुख्य फरक आहे. गेलेल्या केसांच्या जागी कृत्रिम केस लावणे पण असलेले नैसर्गिक केस काढून ब्रॅड पिट सारखे करणे हा मुख्य फरक आहे.
आता काय करायचे?
आपण आरश्यात कसे दिसतो हा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. आपण कसे दिसायला हवे यासाठी बहुतांश जन कमी-जास्त धडपड करीत असतो. कपडे, केस, विविध लेप इत्यादी वापरीत स्त्री-पुरुष वर्ग स्वतःचे अधिक चांगले रूप जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. ही मानवी वृत्ती आहे. मग याच्या पुढचे पाउल चेहऱ्याची शस्त्रक्रिया करणे सहज उपलब्ध असेल तर त्यात काय चूक? सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात असते यात तथ्य आहे. कोण कोणाला सुंदर दिसणार आणि का दिसणार याचे गणित नाही. आणि हे गणित नाही यातच प्रेमाचे बहुतांश वेळा गुपित असते. अर्थात काही चेहरे सुरेख असतात, नीट-नेटके असतात, आकर्षक असतात. पण सौंदर्याचे हे मापदंड गूढ असतात. शाहरुख खान मुळीच दिसायला चांगला नाही पण लुकलुकणारे डोळे घेऊन त्याने सिने जगत पादाक्रांत केले. ऐश्वर्या राय या सौंदर्याची साक्षात व्याख्या आहेत पण शाहरुख आणि ऐश्वर्या तेवढेच सुप्रसिद्ध आहेत. प्रत्येकाचे सौंदर्य त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणात असते. मग देवदत्त रूप प्लास्टिक सर्जनच्या कारखान्यातील साच्या सारखे करण्याची एवढी जीवघेणी चेष्ठा का?
माझे नाक फेंद्रे आहे. पण ते माझे आहे. आणि जरी मी हृतिक रोशनसारखा दिसत नसलो तरी त्याच्यासारखे नृत्य शिकून थोडा-बहुत का होईना त्याच्यासारखा नक्कीच होऊ शकतो. नाही का?
No comments:
Post a Comment