मोतीने डोळे किलकिले करून बघितले. गल्ली सामसूम झाली होती.नुकतीच थंडी सुरु झाली होती. गवताचा वास बदलला होता आणि झाडाची पाने गळू लागली होती. थंडीचा सुद्धा विशिष्ट वास दरवळतो. तो फुलांचा नसतो. तो वास नाकाला आणि कातड्यालाही जाणवतो. शहारे आल्यासारखे मोतीचे केस गारठ्याने उभेच असत.गल्लीत नवीन घर बनत होते. त्याची रेती, विटा इत्यादी सामान पडले होते. संध्याकाळी सिमेंटची छोटी मेढी बनवून मजूर निघून गेले होते. त्यात मुटकुळी करून मोती पहुडला होता. त्याला राजाचा दूरून वास आला म्हणून त्याची अर्धवट झोप चाळावली. त्याने मोठ्ठी जांभई दिली आणि अंग झटकून तो उठला. राजा ने दुरूनच शेपटी हलवून ‘राम राम’ ठोकला. मोती तुरुतुरु त्याच्याकडे गेला. एकमेकांचे वास घेऊन झाल्यावर, मोतीने आपल्या मागच्या पायावर उभे राहून, पुढल्या पायांनी उडी मारीत राजा सोबत खेळण्याचा प्रयत्न केला. पण राजा काही आज मूडमध्ये नव्हता. त्याने मान फिरवली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. मोतीने इकडे-तिकडे बघितले. पुन्हा जांभई दिली. एकदम सुटलेल्या वाऱ्याच्या झुळुकेने त्याला हुडहुडी भरली. गल्लीतली एक काकू थंडीत रात्री शेकोटी लावत असे. मोती आणि तत्सम रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी. पण तिने अजून शेकोटी लावणे सुरु केले नव्हते. मोती शेकोटीच्या नेहमीच्या जागेवर नाक फिरवून आला. तेवढ्यात राजाने शेपटी ताठारली आणि मान उंच करून टक लाऊन एका झुडूपाकडे बघू लागला. मोतीने लक्ष दिले नाही. गल्लीतली मांजर होती झुडूपात. मोतीला ते माहिती होते. ती मांजर, राजा आला की मुद्दाम या झुडुपातून त्या झुडूपात करीत असे. राजा आपला मग ताठरत उगाच झुडूपांमध्ये उडी मारे. त्याला वाळलेल्या काटक्या टोचत आणि मग राजाच्या घरातली गोड बोलणारी मैना राजावर ओरडत.
“दररोज ती मांजर तुझी खोडी काढते. तुला ठोंब्या तरी कळत नाही” यावेळेसही मैना राजाला हसत म्हणाली.
राजाला फक्त ठोंब्या शब्द कळे. आणि मोतीलाही.पण मांजरीची हि खोडी मोतीला ठाऊक होती आणि राजाची ताठारलेली शेपटी बघून राजा आजही स्वतःला खर्चटवून घेणार हे मोतीला स्पष्ट होते. मोतीने राजाच्या मानेला थोडे दात लावले. राजा गुरुगुरु लागला.
“अरे, जाऊ दे रे. ती मांजर पण इथलीच आहे. आणि कधीही ती तुझ्या तोंडाला लागायची नाही.”
“गल्ली आपली आहे. इथे आपल्या मर्जीने सगळ होणार.” राजा गुरकून असे म्हणत होता.
मोतीने राजाच्या पुढल्या पायाला दात लावले जणू तो त्याला म्हणत होता कि “तुला तुझ्या मर्जीने फाटकाबाहेर सू करायला सुद्धा येता येत नाही”
राजाने पाय बाजूला केला आणिमोती कडे दुर्लक्ष केले. त्याचे पूर्ण लक्ष झुडूपाकडे होते.
“ए राजा, सोड तिला.” मैना ओरडली. “मोती बघ मगापासून तुझ्याशी खेळायचं म्हणतोय. त्याच्याशी खेळ.”
राजाला फक्त मोती हा शब्द कळला.
मोतीलाही फक्त मोती शब्द कळला. तो मैना जवळ गेला. तिच्या पायाला त्याने अंग घासले.
“अरे, तू कुत्र आहेस कि मांजर. तुझ सिमेंट, रेतीने माखलेले अंग मला नको घासुस” ती म्हणाली. पण ती इतक्या गोड आवाजात म्हणाली कि मोती खुश झाला. त्याने तिचे पाय चाटले.
“चल, दूर हो बर”
मोतीने मग मागच्या पायांवर उभे राहून पुढचे पाय मैनाच्या हातावर ठेवण्याचा प्रयत्न केला
“अरे” मैनाने आवाज थोडा चढवला.
मोती थोडा दूर झाला आणि मग मागल्या पायावर बसून शेपटी जोरजोरात हलवीत तो मैना कडे बघू लागला.
मैना विरघळली. “ये” म्हणत तिने मोतीचा चेहरा गोंजारला. मोतीची स्वारी एकदम खुश. उड्या मारीत त्याने मैना भोवती फेरी मारली.
“रस्त्यावर राहून तू इतका कसा खुश असतो रे मोती” म्हणत खाली बसत मैनाने मोतीचे अजून लाड केले.
मोतीला फक्त मोती हा शब्द कळला. पण लाड करायला भाषा लागत नाही.
राजाचे लक्ष विचलित झाले. तो पण मैना जवळ आला आणि तिला ढुशी मारली.
“गेली वाटत मांजर. मोतीचे लाड केले कि लगेच पोटात दुखत राजाच्या.”
मोती हळू आवाजात भुंकला. राजाने खेळीने मोतीला मागल्या पायावर चावायचा प्रयत्न केला.
मग त्याने मोतीच्या कानाला दात लाउन दूर पळाला. मोती त्याच्या मागे धावला. एका-मेकांच्या अंगावर उड्या मारीत ते गल्लीत खेळू लागले.
“गाडी बघ रे.”
मैना काय म्हणाली दोघांना कळले नाही पण काय म्हणतेय म्हणून दोघे थांबले. तेवढ्यात बाजूने वेगाने स्कूटर गेली.
दोघेही कधीच निघून गेलेल्या स्कूटर वर भुंकले जणू काही गल्लीचे मालक आपण आहोत दाखवून देण्यासाठी! त्यांच्या भुंकण्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीतल्या कुत्र्यांनी भुंकून साथ दिली. वस्तीत काही वेळ नुसता भुंकण्याचा आवाज आदळत होता.
“कधीच निघून गेला तो. आता काय भुंकतात बावळट” मैना हसत म्हणाली. तिचे हसणे ऐकून दोघे धावत तिच्याजवळ येऊन उड्या मारू लागले.
“चला, पुरे झाले. घरी जाऊ या.”
घर शब्द दोघांना कळला. मोती असलेल्या जागेवरच थांबला.
मैना घराकडे जाऊ लागली. राजा तो पर्यंत फाटकापाशी पोचलासुद्धा होता.
मागे वळून मैना म्हणाली “मोती, ए मोती....चल, घरापर्यंत. बोलावणं लागत तुला दररोज.”
आपले नाव ऐकू येताच मोती शेपटी हलवत मैना च्या मागे मागे जाऊ लागला.
मैनाने फाटक उघडताच राजा घराच्या उबेत सावलीसारखा क्षणार्धात नाहीसा झाला.
“बाय मोती...जा तू झोपायला. मी काकूला शेकोटी लावायची आठवण देते. थंडी वाजायला लागली असेल तुला.” असे म्हणत मैनाने पुन्हा मोतीला गोंजारले. मोती जीभ काढून ‘ह्या ह्या’ करत होता. आणि घशातून आवाज काढत होता. फाटक अर्धवट उघडे होते आणि आतले आंगण, घर दिसत होते. अंगणाच्या एका कोपऱ्यात हिरवेकंच गवत होते, फुललेली फुलझाडे होती. मंद दिवे सगळीकडे लागले होते. गवतात आराम खुर्च्या आणि टेबल होते. घरातून जेवणाचा मंद सुगंध मोतीच्या नाकात गेला, त्याने कान टवकारले. मैनाच्या गोंजारणाऱ्या हातालाही असाच स्वयंपाकाचा गोड वास येत असे.कधी कधी मालकीण बाई मोतीला अंगणात बोलावीत असे. राजाच्या समोर गोड काही तरी असे आणि मेणबत्त्या लागलेल्या असत. त्यादिवशी मोतीची चंगळ असायची.
“घरात तुला घ्यायच्या आधी आंघोळ घालायला हवी तुला कोणीतरी” असे म्हणत मैनानेफाटक लावले. “कोणी म्हणजे मीच आंघोळ घालायला हवी” असे पुटपुटत ती आत निघून गेली.
मोती थोडावेळ फाटकापाशी घुटमळत होता. मग तिथे तो मागल्या पायावर बसून फाटकाकडे बघत शेपटी हलवत बसला. कोण जाणे, राजा परत बाहेर येईल. मैना पण मग पुन्हा बाहेर येईल. आपले लाड करेल.
पण तसे काही झाले नाही. फाटक बंदच होते. राजासोबत केलेल्या मस्तीवर आणि मैनाने केलेल्या लाडांच्या उबेवर त्याला रात्र काढायची होती.
मग त्याने पुन्हा अंग झटकले, मोठ्ठी जांभई दिली आणि सिमेंटच्या मेढी कडे तो जाऊ लागला. जातांना शेकोटीच्या जागेचा पुन्हा वास घेतला. पण तिथे अजूनही काहीच नव्हते. जुन्या राखेचा उगाच वास आल्यासारखा त्याला भास झाला आणि पुन्हा हुडहुडी भरल्यासारखे झाले. सिमेंटच्या मेढी भोवती त्याने गिरक्या मारल्या. रात्रीसोबत आता सिमेंटहीथंड पडू लागले होते आणि त्यातली उब कमी-कमी होऊ लागली होती. शेपटी पोटाशी घेत मोती सिमेंटच्या मेढीच्या मध्यात बसला आणि मान पोटात घुसवीत, मुटकुळी करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. सिमेंटचा रखरखीतपणा त्याला पोटाला बोचू लागला होता.
—

No comments:
Post a Comment