11/10/26

काजळीने काळवंडलेले बालपण - विल्यम ब्लेक यांची The Chimney Sweeper


 

इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ कवींच्या पंक्तीत विल्यम ब्लेक (William Blake) यांचे स्थान अग्रगण्य आहे. त्यांनी सन १७८९  च्या दरम्यान प्रसिद्ध केलेली The Chimney Sweeper ही कविता माझ्या गेल्या वर्षी वाचनात आली. तेव्हापासून ही कविता पुन्हा पुन्हा वाचली. प्रत्येक वेळेस अर्थ, गर्भार्थ आणि संदर्भ नव्याने कळत गेले; अन् प्रत्येक वेळेस पोटात तेवढाच खड्डा पडला, गळा भरून आला आणि डोळ्यात पाणी आले.

When my mother died I was very young,

And my father sold me while yet my tongue

Could scarcely cry “’ ‘weep! ‘weep! ‘weep!‘weep! 

So your chimneys I sweep & in soot I sleep. (१)

कवितेची पार्श्वभूमी अशी की औद्योगिक क्रांती इंग्लंड मधे जेंव्हा झाली तेंव्हा कोळशावर चालणाऱ्या अनेक गिरण्या किंवा घरातही धूरासाठी मोठाल्या चिमण्या बांधल्या गेल्या. त्या चिमण्यांची साफ-सफाई करणे आवश्यक होते. पण तेंव्हा हि सफाई करायला कुठल्याही तऱ्हेची यंत्रे नव्हती. कोणालातरी दोरीने त्या चिमण्यांमध्ये उतरून, बहुतांश वेळा उलटे टांगून वरून खालती लोंबकळत या चिमण्यातील काळी काजळी काढून स्वच्छ करावे लागे. या चिमण्या फार निमुळत्या असत त्यामुळे अंगाने मोठ्या माणसाला हे काम शक्य नव्हते त्यामुळे लहान मुलांचा वापर प्राधान्याने केला जात असे. ही मुले ५-७ वर्षे ते अंगाने मोठी व्हायला लागे पर्यंत म्हणजे १०-१२ वर्षापर्यंत हि कामे करायला चिमण्यांना ‘जुंपल्या’ जात.

येथे ‘weep, weep, weep’ या शब्दप्रयोगाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. ही पोर-टोर गल्ल्यांमध्ये जोर-जोरात ‘sweep, sweep, sweep’ असे ओरडत फिरत. पण वयाने एवढी लहान असल्यामुळे त्यांच्या बोबड्या जिभेला  Sweep मधील ‘Sw’ म्हणता येत नसे. त्यामुळे ‘weep, weep, weep’ असे जोरात ओरडत फिरत. येथे weep चा अर्थ रडणे, किंवा,  कवितेच्या संदर्भात, आक्रोश करणे असा घेऊ शकतो. थोडक्यात ‘sweep’ आणि ‘weep’  या शब्दांचा वापर फार कुशलतेने कवीने करून भीषण वास्तविकता समोर ठेवतो.  कामासाठी मारलेली हाक हीच मुळात त्या निष्पाप जीवांचा करुण आक्रोश बनून बाहेर पडत होती, हा गर्भार्थ इथे काळीज पिळवटून टाकतो.

 


अनाथ मुले किंवा अत्यंत दरिद्री घरातील मुले किंवा दारिद्र्याने गांजलेले आई-बापच पोरांना या कामाला विकून टाकत. बहुतांश मुले धुराच्या काजळीचा श्वास घेऊन घेऊन लवकरच मृत्युमुखी पडत. आधीच अंगाने लहान त्यातून सिगारेटी ओढाव्यात तसे वर्षानुवर्षे धूर आणि काजळी श्वासात घेतल्या जाणार तर काय होणार? ही कविता आहे अश्या एक आई-विना लहान पोराची, ज्याला वडिलांनी सुद्धा टाकून दिले आहे तो उद्धृत करतो आहे. तो सांगतोय की त्याला जेंव्हा बोलताही  येत नव्हते तेंव्हा त्याला वडिलांनी या कामाला विकून टाकले. तो इतका लहान होता की त्याला नीटसे रडताही येत नव्हते. 

There’s little Tom Dacre, who cried when his head

That curled like a lamb’s back, was shaved, so I said

“Hush, Tom! Never mind it, for when your head’s bare,

You know that the soot cannot spoil your white hair”(२)

या कवितेतील नायकाचे नाव आपल्याला माहिती नाही पण त्याचा अनुभव त्याने त्यांच्या ‘काळवंडलेल्या’ सवंगड्यांच्या द्वारे आपल्यासमोर मांडला आहे. Tom Dacre (टॉम डाक्रे) नावाचा लहान मुलगा नुकताच चिमणी साफ करण्याच्या  कामाला लावलेला दिसतो आहे आणि त्याचे केस सोनेरी किंवा पांढरे आहेत. त्या काळ्या सुटात काम करायचे तर केस घाण होणार म्हणून मेंढराची लोकर काढावी तसे त्याचे केस कापून त्याचे टक्कल केले असणार. ना आई ना बाप न कोणी घरचे. एवढेच नाही तर, समजावणारे, मायेने जवळ घेणारे सुद्धा कोणी नसलेला, आपला Tom, हुमसून-हुमसून रडला असणार. पैश्याच्या मागे धावणारे जग, औद्योगिक क्रांतीत झपाट्याने माघारी घेणारी माणुसकी या कैचीत फसलेली सगळ्यांनी टाकून दिलेली ही पोरे म्हणजे पोरकेपणाची परिसीमा! आपला कवितेचा नायक त्याला समजावतो की ‘अरे, कापून टाकले बरे आहे. इतके तुझे सुंदर केस, आता काळेकुट्ट पडून खराब तर होणार नाहीत! ते ऐकून छोटा Tom आणि त्याचे मित्र, आपला कवितेचा नायक असे सगळे झोपले.

And so he was quiet, & that very night,

As Tom was a-sleeping he had such a sight!

That thousands of sweepers, Dick, Joe, Ned, & Jack,

Were all of them locked up in the coffins of black; (३)

 

And by came an Angel who had a bright key,

And he opened the coffins & set them all free;

Then down a green plain, leaping, laughing they run,

And wash in the river and shine in the Sun (४)

आपल्या Tom ला त्या धुळीने माखलेल्या जागेत, फाटलेल्या गादित आणि मुख्य म्हणजे धुराच्या काजळीत (black soot) बुडलेल्या शरीरात असूनही स्वप्न पडते. त्यात त्याच्यासारखे असंख्य अनाथ, अगदी देवही ज्यांना विसरला आहे, अशी पोर थडग्यात झोपली आहेत. आणि एक देवदूत परी (ख्रिश्चन धर्मात त्यांना देवाचे एंजेल (Angel) असे म्हणतात) सगळी थडगी उघडून सगळ्याना मुक्त करते. आणि सगळे पोरे हसत, खिदळत हिरव्या मऊ-मऊ गवतात उधळलेली आहेत. नदीत न्हात आहेत आणि मुख्य म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशात ही पोरे झगमगत आहेत.

यातील ‘leaping’ हा शब्दाने माझे हृदय पिळवटून निघाले. मला आवंढा गिळता येईना. माझे डोळे भरून आले. तुम्ही लक्ष देऊन बघितले तर कुठलेहि  ५-७ वर्षाचे पोर कधीही नुसते एका रेषेत चालत नाही. बहुतांश वेळा ती उधळलेली असतात आणि उड्या मारीत, फुदकत असतात. जणू गायीचे पारडू! पण इथे मात्र न हिरवे गवत होते, ना सोनेरी सूर्यप्रकाश. सतत ढगाळलेले आकाश, थंड फरशी आणि काजळीचा वास. चिमण्या साफ करण्यात या मुलांचे केवळ कपडे काळे आणि  भविष्य अंधारे नाही तर त्यांच्या निरागस लहानपणाचे अस्तित्वसुद्धा त्यांच्यापासून हिरावून घेतले आहे. आणि त्यांची मुक्तता फक्त थडग्यातूनच आता शक्य आहे.

Then naked & white, all their bags left behind,

They rise upon clouds, and sport in the wind

And the Angel told Tom, if he’d been a good boy,

He’d have God for his father & never want joy. (५)

Tom चे स्वप्न पुढे जाते. स्वच्छ आणि आपल्या घाणेरड्या साधन-सामुग्री ठेवण्याच्या पिशव्या मागे टाकून, हे सगळी पोरे उंच आकाशात अलगद वर उचलल्या जातात. तिथे एन्जेल Tom ला सांगते की तो जर का एक चांगला मुलगा असेल तर स्वतः देवच त्याला जवळ घेईल आणि त्याच्यावर कधीच दुःखाची सावली पडणार नाही.  वरील कडव्यात दोन गोष्टी लक्ष देऊन समजून घेण्यासारख्या आहेत.  कडव्यातील ‘Naked & white’ हे शब्द फार महत्वाचे आहेत. कारण धुराचा वास, त्या सूट चा काळाकुट्ट रंग, त्यात माखलेले कपडे आणि शरीर आणि जिवंतपणे त्या काळ्या रंगाने या लहान जीवांचे आत्मे सुद्धा जणू काळवंडले आहेत. आणि आता जेंव्हा त्यांना ‘एन्जेल’ मुक्त करते आहे तेंव्हा त्या पोरांना पहिल्यांदा स्वच्छ वाटतंय. अंगावर घाण, काळे कपडे नाही. आणि दुसरे म्हणजे, पोरांच्या या विधीलिखितात त्यांची काहीच चूक नसली तरी देवाचे  ‘एन्जेल’ म्हणते की देव त्याच मुलांना जवळ घेईल जी पोरे चांगली वागतात, थोडक्यात, जी मुले आपसूकच आपली कामे करतात. येथे समाजाचीच नव्हे तर चर्च या संस्थेची दांभिकता प्रखरपणे दर्शवितात.

औद्योगिक क्रांतीच्या आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या काळात गरिबी अचानक बोकाळली. समाजाचे बहुतांश घटक ज्यांच्याकडे भांडवल नव्हते किंवा यंत्रयुगाला लागणारे कौशल्य नव्हते, ते अचानक दारिद्र्याच्या दरीत फेकल्या गेले. खूप मेहेनत करूनही पोट भरत नव्हती. वाढती महागाई, कमी होत जाणाऱ्या संधी आणि एकूणच हतबलता बघून इंग्लंड मधील चर्चेस ‘या परिस्थितीला  देवाची देण आहे. आणि आपण याचा स्विकार करून, आपले कष्ट चालूच ठेवायला हवे कारण शेवटी कष्ट करणाऱ्यालाच देव प्राप्त होईल.’ आता या विचारसरणीत वरवर बघता काही चूक नाही. पण या मागील सत्य असे की  शोषित वर्गाने उठाव करता कामा नये. गुपचूप सगळे सहन करीत दारिद्र्य सहन करीत, जणू ‘कमवीत’ कामे करीत भांडवल असलेल्या वर्गाला अधिकाधिक श्रीमंत करीत रहायला हवे. 

ही कविता दोनशे वर्षे जुनी आहे. तेंव्हा चर्च या धार्मिक संस्थेची समाजावर, सरकारी यंत्रणेवर आणि तसेच एकूण जागतिक घडामोडींवर प्रचंड प्रभाव होता. इंग्लंड चे चर्च हे रोमन कॅथोलिक चर्च हून वेगळे आणि स्वतंत्र होते. पण तरीही या संस्थेचे भांडवलशाही, औद्योगिक क्रांती तसेच सत्ताधारी वर्गाप्रती धोरणे दुटप्पी आणि सामान्य आणि रंजल्या-गांजल्या सामाज घटकांच्या विरोधी होते. अश्या काळात एवढ्या शक्तिशाली संस्थेवर ताशेरे ओढणे धाडसी काम होते. कवी फक्त येथेच न थांबता पुढे म्हणतात:

And so Tom Awoke; and we rose in the dark

And got with our bags & our brushes to work.

Through the morning was cold, Tom was happy & warm;

So if all do their duty, they need not fear harm. (६)

चर्च आणि देवानेच सांगितल्या प्रमाणे की चिमणी स्वच्छ करूनच देव खुश होणार आहे या विचाराने बिचारा टॉम भल्या पहाटे आपली पिशवी आणि झाडू – ब्रश घेऊन पुन्हा कामाला निघतो. कारण त्याच्या डोक्यात भूल भरलेली आहे की त्याने त्याची कर्तव्ये नीट पार पाडली तर त्याला कशाचीही भीती असण्याची गरज नाही. ना वरून खाली डोक्यावर पडण्याची भीती, न काळ्या धूराने बेशुद्ध पडण्याची भीती, ना त्या धुराच्या काजळीचा श्वास घेऊन गुदमरण्याची भीती, ना केस आणि कपडे काळे पडण्याची भीती, ना बेवारशीपणाची, अनाथपणाची, अर्धपोटी ग्लानीची, ना हाडांना सतत टोचणाऱ्या, बोचणाऱ्या, नाक व छाती लाल करणाऱ्या थंडीची!

न जाणे कित्येक इवलीशी आयुष्ये काळवंडत जगली आणि मग कोमेजून, पायदळी तुडवल्या जाऊन संपून गेली. मेल्यावरही कोणी परवा करू नये अशी दुर्दशा कोणाची होऊ नये. समाजाची ही षंढता, ही क्रूरता, ही अमानवता, मन सुन्न करते. कधी कधी हे असे का, या प्रश्नाचे उत्तर नसते, आणि शोधायला जाऊही नये. देवानेही टाकून दिलेल्या या पोरांच्या किंकाळ्या इतिहासाने दाबून टाकल्या आहेत. या निष्पाप, अश्राप, व निरागस छोट्या जीवांना मूक अश्रूंची श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.