5/27/26

पोपटपंची

नोकरीच्या निमित्ताने बंगळूरला  वास्तव्य चालू आहे. बंगळूरला कबन पार्क नावाचा खूप मोठा बगीचा प्रसिद्ध आहे. मी जमेल तसे त्या बगिच्यात चालायला-धावायला जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या बगीच्यात पोपटांचे थवे वास्तव्य करतात. एक-एक भाग वाटून घेतला आहे बहुधा पोपटांनी. आणि हौशी लोकांनी पोपटांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासाठी शेंगदाणे, तांदूळ ठेवलेले असतात. तिथे पोपटांचा हल्ल-कल्लोळ चालू असतो. मला बघायला मजा येते. या पोपटांच्या जातीचे भारतातील नाव  'करण' पोपट आहे. संपूर्ण भारतीय उपखंडात हे 'करण' मिठू निवास करतात. तिथे एक आजोबा शेंगदाणे पोपटांना देत होते. मी त्यांना विचारले कि मी पण देऊ का? त्यांनी आनंदानी मूठभर शेंगदाणे मला दिले. अगदी मांडीला मांडी लावून आजोबा बसले होते आणि आजोबांच्या खांद्यावर, त्यांच्या पायाशी, त्यांच्या बाकाच्या हातावर येऊन एक एक शेंगदाणा पोपट घेऊन जात होते. एकही पोपट माझ्याकडे भिरकेना. मग आजोबांनी शेंगदाणे देणं थांबविले. तेंव्हा कुठे एक पोपट हळू हळू चाचपडत माझ्याकडे आला. हिरवाकंच रंग, लाल-लाल चोच, गळ्याला काळा आणि गुलाबी रंगाचा पट्टा, आजूबाजूला कावळे आणि राखाडी- कथ्या रंगाच्या कबुतरांमध्ये हे पोपट फारच सुंदर दिसत होते.  मान वाळवून त्याने माझा निरीक्षण केले, त्यांच्या नेहमीच्या आजोबाच्या बाजूला  बसलेला ठोंब्या भरवश्याचा आहे का? पण शेंगदाण्याचे आकर्षण अनावर झाले, पटकन शेंगदाणा माझ्या हातातून घेतला आणि फुर्रर झाला. परत मात्र भटकला नाहीं माझ्याकडे. मला आमच्या घराच्या पोपटाची आठवण आली. 

पोपटांना स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, त्यांचे भिन्न स्वभाव असतात, त्यांच्या आवडी-निवडी असतात. पोपट चेहरे पण ओळखतात आणि त्यांना ओळखही लागते. मला माहिती आहे हे सगळं, माझ्या लहानपणी आमच्या कडे होता पोपट. वीस वर्ष होता तो आमच्याकडे. आणि त्याला मी कधी म्हणजे कधीच आवडलो नाहीं. मी आवडायचो नाहीं हे मला कसे माहिती? माझ्या नाकाला आणि बोटांना विचारा! 

अखिलेषु विहङ्गेषु हन्त स्वच्छन्दचारिषु।
शुक-पञ्जर-बन्धस्ते  मधुराणां गिषां फलम्॥
(अर्थात, आकाशात स्वच्छंद विहार करणाऱ्या पोपटालाच पिंजऱ्यात ठेवतात कारण तो अत्यंत गोड बोलू शकतो आणि त्याचेच त्याला हे फळ मिळते) 

आमच्या पोपटाची गोष्ट थोडी वेगळी होती. कारण आम्ही ना त्याला पकडले होते ना कुठून विकत आणला होता. आमचा पोपट माझ्या जन्माच्या आधीपासूनच घरी होता. माझ्या मोठ्या भावाच्या जन्मा आधी तो कुठून तरी उडून आला होता. त्याच्या पंखाला इजा झाली होती. कुणाचा तरी पाळीव होता कारण त्याला बोलता येत होते. पट्ठ्या हिंदी बोलायचा. (आईचा स्वयंपाक सुरु झाला कि तो "माँ रोटी दो" चा घोष सुरु करीत असे)  माझ्या आजोबांनी त्याची काळजी घेतली, त्यांना वाटले कि इजा बरी झाली कि उडून जाईल. पण तसे झाले नाहीं. मिठू-मिया ला कळले कि इथे दाणा-पाणी व्यवस्थित होतो आहे, उगाच दिवसभर इकडे उडा  - तिकडे उडा, कशाला हव्यात त्या खटाटोपी! लोक आजच्या काळात 'पेट्स' दत्तक घेतात. आमचा पोपट हुशार होता, त्याने आम्हाला दत्तक घेतले. माझे आजोबा त्याला मराठी बोलायला शिकवायला लागले. एकही अक्षर शिकला नाहीं. मंडन मिश्राच्या दारचा पोपट म्हणे वेदांच्या अमरत्वाचा तात्त्विक वाद-विवाद करीत असे. आमच्या अंगणीचा मांजरीचा आवाज काढायला तेवढा शिकला. पण माझ्या आजोबा सकाळी म्याँव - म्याँव  करायला शिकवीत असतील असे वाटत नाहीं. बहुधा घरात ये-जा करण्याऱ्या असंख्य मांजरींनीच शिकविले असावे. 

आमच्या घरी मध्यवर्ती अंगण  होते, त्याच्या एका कोपऱ्यात त्याचा पिंजरा टांगलेला असे. तिथून जणू तो सगळ्यांवर नजर ठेवीत असे. पोपट कसा पाळायचा वगैरे ट्रैनिंग आम्हाला कोणाला नव्हते त्यामुळे घरातील अजून एक व्यक्ती म्हणूनच त्याची देखभाल होत होती. सकाळचा नास्ता म्हणजे बहुधा दूध-पोळी, पण त्यावर साखरेचे दाणे पेरलेले हवेत. नाहीतर त्याला राग येत असे.  पोळीचे छोटे-छोटे तुकडे करायचे आणि त्यावर दूध घालायचे आणि मग वर साखर पेरायची. पोळीचे  तुकडे मोठे झालेत तर तो तो तुकडा सरळ उचलून खाली टाकायचा. पण बाकी पूर्ण वाटी साफ करायचा. साखरेचा एक एक दाणा कडं-कडं आवाज करीत खायचा. पाण्याची वाटी वेगळी. पाणी पिऊन भटोबा तृप्त. दुपारी वरण-पोळी, पण वरण फोडणीचे हवे. त्यावर फोडणीतली हिरवी मिरची असली म्हणजे मेजवानीच.  दुपारी कधी कधी बाबांच्या चहासोबत त्याचा चहा पण होत असे. लोकांना नवल वाटत हे सांगितलं कि पण मला लहानपणी वाटायचं कि सगळेच पोपट चहा घेतात. रात्री परत वरण-पोळी, कधी थोडी भाजी आणि पाणी. 
आता आकाशात उडणारे पोपट काय दररोज स्नान-संध्या करतात का? पण आम्ही मात्र याला दररोज आंघोळ घालीत असू. अंगणाच्या दोन्ही बाजूंना दोन नळ होते. त्यातल्या उजवा  नळ त्याचा आंघोळीचा. नळ चालू करून त्या खालती त्याचा पिंजरा ठेवायचा. मग पिंजरा स्वच्छ  करायचा आणि थोडा फिरवून त्याच्यावर पाणी पडू द्यायचे.  रविवारी वेळ असेल तर त्याची आंघोळ राजेशाही  व्हायची. एकतर धूण -भांडीवाली बाई  येऊन जात असे त्यामुळे घाई नसायची. पण हि आंघोळ त्याची तो करीत असे. पिंजरा आडवा करून नळा खाली ठेवायचा पण नळ अगदी बारीक उघडायचा म्हणजे अगदी बारीक पाण्याचा थेंब-थेंब त्याच्या पिंजऱ्यावर पडून त्याचे तुषार उडत. त्यातच तो मनसोक्त आंघोळ करीत असे. 

आता आमच्या मिठू ला मी का आवडलो नाहीं माहिती नाहीं. म्हणजे त्याची कारणे आहेत म्हणा, नाहीं असे नाहीं. त्याला दादा फार आवडत असे. तो त्याला मित (अमित) म्हणून हाक हि मारत असे. दादा ला तो मस्त हात लावू द्यायचा. पण मी हात लावायला गेलो कि चावायला धावायचा. उगाचच. मग मी पण त्याला त्रास द्यायचो. झोपला असला कि उगाच जोरात ओरडून त्याला भेदरवायचो. बाजूनी जाताना त्याचा पिंजरा जोरात हलवायचो. माझी प्रेम करण्याची पद्धत थोडी रानटी होती यात वाद नाहीं. बिचारा छोटासा जीव तो, नक्कीच घाबरत असणार . मी असा काही उच्छाद मांडले कि तो  जोरात ओरडायचा, मग घरातून कोणी तरी मला ओरडायचं.  

एकदा मी दुपारी रिकामा हिंडत होतो. तर विचार केला कि मिठूशी थोडं हितगुज करावे. मी स्टूल वर उभा राहून त्याच्या पिंजऱ्याला मिठी मारली आणि नाक पिंजऱ्यात खुपसून त्याच्याशी प्रेमानी बोलू लागलो. 'मिठू, मला हात लावू देत जा. मी तुला जेवायला देतो, आंघोळ घालतो, तुझा तरट स्वच्छ करतो, सगळं तर करतो. मग तू मला हात का नाहीं लावू देत?" त्याची दुपारची झोप मोड झाली असावी. तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या टोकाला डोळे बारीक करून माझ्या कडे बघत होता. पोपटांना राग आला कि त्यांची भुबुळे लहान होतात. माझ्या ते लक्षात यायला हवे होते. मग अचानक तो माझ्या दिशेने धावला आणि माझ्या नाकाचा टोकाला कचकन चावला. नाकाला अक्षरश: मिरच्या झोंबल्यात. लाल नाक घेऊन आठवडाभर हिंडत होतो. बहुधा म्हणूनच माझ नाक फेंद्र आहे, असे माझे मत आहे. 
बंगलोर ला मी ठरवले कि या पोपटांशी मैत्री करायची. मी अर्धा किलो शेंगदाणे मागवलेत आणि सकाळी उठून नेहमीच्या ठिकाणी गेलो. पण त्या दिवशी नेमके आजोबा आले नाहीत. मी त्या बाकावर बसून शेंगदाणे पसरलेत, काही माझ्या हातातच्या तळव्यावर घेऊन वाट बघू लागलो. दोन-तीन पोपट डोक्यावरून गेलेत. मला वाटलं कि हेरगिरी करून गेले असतील पण बहुधा ते कुठून तरी, कुठे तरी जात असावेत. पोपट असले म्हणून काय झाला, काम तर सगळ्यांनाच असतात. पोपट-पोपटी (Mr. and Mrs. पोपट) हि जन्मभराचे जोडीदार असतात म्हणे. माझ्या डोक्यावरून गेलेले भाजी-बीजी आणायला जात असतील. असो. एकही पोपट न आल्याने, शेंगदाणे हातात घेऊन वाट बघणाऱ्या माझा पोपट नक्कीच झाला. 

दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो तर आजोबा भेटलेत. ते म्हणालेत कि कच्चे शेंगदाणे चालत नाहीत. भाजलेले हवेत. च्यायला तर...पोपटांची ऐशी कि तैशी! पुन्हा त्यांच्या सोबत बसून मी त्यांनी आणलेले शेंगदाणे देऊ केले. "हररोज आना, एक दिन आये, फिर नहीं आये, ऐसा नहीं करना" बंगलोर चा तो कानडी माणूस, माझ्याशी बंबैय्या हिंदीत का बोलत होता माहिती नाहीं. पण त्यांच खर होत. रागीट असले तरी पोपट प्रेमळ असतात. त्यांना सोबत हवी असते. नित्य सहवास हवा असतो. मनुष्यापेक्षा फारसे वेगळे नसतात. माझी कितीही इच्छा असली तरी नित्य-नेमाने येऊन त्यांच्याकडे लक्ष कसा देणार? सध्यातरी पोटा-पाण्यासाठी मी स्वतःच एक उडता जीव आहे. पोपटांना सुद्धा ते कळले असावे. असो. बगिच्यातला त्यांचा कलकलाट ऐकून आणि त्यांचे उडणारे थवे बघून मीच खूप खुश होतो. अगदी यासुद्धा पोपटांना मी आवडत  नसलो तरी! 

आमचा पोपट १९-२० वर्षे आमच्या कडे होता. मग एक दिवशी त्याने खाणे सोडले. ना नास्ता, ना जेवण, ना चहा, ना हिरवी मिरची, ना पेरू, काही काही नाहीं. हळू हळू त्याची पीस झडू लागलीत. दादा त्याला डॉक्टर कडे घेऊन गेला पण डॉक्टर म्हणालेत कि पक्ष्यांना फारशी औषध नसतात. पोपटाने हळू हळू बोलणे सोडले. "मित" नाहीं कि "माँ रोटी दो". शिळा हि मारल्या नाहीत आणि मांजर आसपास असेल तर  म्याँव - म्याँव नाहीं. जणू काही कोणी ध्यानस्थ व्हावे.  कशाची तरी वाट बघीत तो पिंजऱ्यात कोपऱ्यात बसून राही. दादा त्याला सारखे बाहेर काढे आणि जवळ घेऊन बसे. आठवडाभर त्याने असा काढला. त्या आठवड्याभरात आमचा जीव जणू पिंजऱ्यात होता. शेवटी दादाच्या हातातच त्याने शेवटाला श्वास सोडला. सगळे खूप रडलो. माझी मोठी आत्या-आतोबा (आम्ही गावाला गेलो कि त्यांचा कडे ठेवीत असू) लगेच घरी आलेत. मधल्या अंगणातल्या जास्वंदीच्या आळ्यात त्याला पुरले. फुले वाहिले, हिरवी मिरची ठेवली. 

आमच्या पोपटाला मुळात कोणी पकडले, तो पकडला कसा गेला, तो मग कसा सुटून आमच्या कडे आला माहिती नाहीं. तो कधी पकडलाच नसता गेला आणि पूर्ण जीवन त्याने स्वच्छंद आकाशात भ्रमण केले असते तर? देवाची तशी इच्छा नव्हती. पण त्याने आमचे घर निवडले बरे झाले. आम्हा सगळ्यांची आयुष्य समृद्ध झाली. त्याच्यानंतर आम्ही कोणी कधी पोपट पाळला नाही. एकच पुरे.  पक्ष्यांना, पोपटांना स्वर्गप्राप्ती होते का माहिती नाहीं.  (त्यांचा स्वर्ग वेगळा असेल तर त्यात आमच्या मिठू ला चहा कोण करून देणार?) पण तो जिथे कुठे असेल तिथे पिंजर्यात नसेल आणि निळ्या आकाशात एक हिरवाकंच आणि लालचुटुक चोचीचा ठिबका स्वच्छंद पणे  उडत आनंदच पसरवीत असेल हीच आशा. 

No comments: