काही दिवसांपूर्वी श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांचा जुना विडिओ मला यु-ट्यूब वर दिसला. इतिहासाची एक गोष्ट रंगवून ते सांगित होते. तो विडिओ बघून माझ्या श्री पुरंदऱ्यांच्या काही आठवणी जाग्या झाल्यात. माझ्या लहानपणी म्हणजे ९०च्या दशकाच्या पूर्वार्धात बाबासाहेबांचे 'जाणता राजा' हे नाटक नागपूरला आले होते. यशवंत स्टेडियम वर ते नाटक होणार होते. माझे घर यशवंत स्टेडियमहुन हाकेच्या अंतरावर होते. शो च्या जवळपास एक महिना आधी पासूनच नाटकाची धामधूम सुरु झाली होती. स्टेज चे विविध भाग एक एक करून येऊ लागले होते. एक भव्य किल्ला आणि त्याचे द्वार आणि प्रचंड मोठे स्टेज उभे राहिले. स्टेज च्या समोर पटांगणाएवढी जागा सोडून मग प्रेक्षकांच्या ओळी सुरु होत होत्या. आठवडाभर आधी घोडे आणि मुख्य म्हणजे हत्ती येऊन दाखल झाला. दररोज शाळेत जायच्या आधी आम्ही स्टेडियम च्या लोखंडी दारातून आम्ही आत डोकावून बघत असू. हत्ती आल्यापासून तर माझी उत्सुकता कंठाशी आली होती. पण नाटक हा माझा शिवाजींच्या इतिहासाचा किंव्हा जीवनाचा परिचय नव्हता. नाटक यायच्या कालावधीतच माझ्या आत्याने मला राजा शिवछत्रपती पुस्तक भेट दिले होते. मी ते हपापल्यासारखे ते पुस्तक वाचले आणि तेंव्हापासून त्या पुस्तकाची अनेक पारायणे पण केलीत. आमच्या चौथीच्या पाठ्यक्रमात त्या संपूर्ण वर्षाचा इतिहास फक्त शिवाजी महाराजांचाच इतिहास होता. आमच्या प्रार्थमिक शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एखादा प्रसंग रेखाटलेला होता. फार सुंदर चित्र काढली होती. जेंव्हा शिवछत्रपती वाचले तेंव्हा लक्षात आले कि त्या पुस्तकातील श्री दलाल यांनी रेखाटलेली चित्रेच शाळेच्या भिंतीवर होती. पण सगळं इतिहास जरी माहिती असला आणि सगळ्या गोष्टी जरी ऐकल्या असतील तरी श्री पुरंदऱ्यांनी एक भव्य-दिव्य दृष्टी जाणता राजा द्वारे प्रेक्षकांसमोर ठेवला ते शब्दात पकडणे कठीण आहे. यशवंत स्टेडियम च्या पायारांवर, अगदी मागे, बसून मी जणू तीनशे वर्ष मागे गेलो आणि संपूर्ण इतिहास घडतांना बघितला. नाटकाचे कथानक, त्यातील संवाद, त्यातील पात्रे, मावळे आणि त्यांचे पोशाख, हत्ती, घोडे, उंट, मागे आई भवानीची प्रचंड आकृती, आणि काय ते छत्रपतींचे सिंहासन! डोळ्याचे, आणि मनाचे पारणे फिटले. हा अनुभव घेतल्याशिवाय नाटकाची भव्यता जाणवायची नाहीं.
नाटकाचे किती शो होते मला आठवत नाहीं. पण कुठून तरी ओळखी निघून मला नाटकाच्या प्रॅक्टिस च्या वेळेस श्री पुरंदरे यांना भेटण्याची संधी मिळाली. मी माझी शिव-छत्रपती ची प्रत घेऊन गेलो. ते खुर्चीवर बसलेले होते. स्वच्छ पांढरा झब्बा आणि पायजमा आणि वर अर्ध्या बाह्यांचा जाकीट. बटण न लावलेला. लांब पांढरी दाढी आणि पांढरे केस. एकदम भारदस्त व्यक्तिमत्व. तेंव्हा ते साठीच्या घरात असावेत पण त्यांचा त्या भल्यामोठ्या स्टेज वर पण 'प्रेझेन्स' जाणवत होता. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला. काय बोलणे झाले मला आठवत नाहीं. पण पुस्तकात त्यांनी "राजमान्य राजश्री चिन्मय राव, यांना अनेक शुभाशीर्वाद" असे लिहून दिले. मला अगदीच लाजल्यासारखे झाले. हाफ चड्डीत मी ९-१० वर्षाचा त्यांच्या समोर उभा होतो आणि आता अचानक 'राजमान्य राजर्षी '? पण छत्रपतींचे पुस्तक मी वाचले होते. म्हणजे मी एक मावळा झालेलो होतो. आणि छत्रपतींचा मावळा, त्यांचा पाईक म्हणजे 'राजमान्य' नाहीं का?
इतिहासाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन प्रामुख्याने दिसतात. काही लोकांना इतिहास नकोसा असतो.
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका| (तुतारी, केशवसुत )
अर्थात केशवसूत इतिहास च जाळून टाका असे म्हणत नव्हते. पण पायाला जखडलेले दोरखंड तोडा हा त्यांचा संदेश होता. इतिहास जाळून टाकणारे पुढे आलेत, कम्युनिस्ट रूपाने. हि कम्युनिस्ट अत्यंत शंख, रक्तपिपासू आणि वाह्यात लोक.
काही लोकांना इतिहासाचं जिव्हाळ्याचा वाटतो. इतिहासच सुवर्ण आणि सद्य परिस्थिती हि केवळ अधोगती! अर्थात, असे तेंव्हाच वाटते जेंव्हा भविष्य काळोखात असते. म्हणून साहजिकच आहे कि समाज पुढे बघायला काहीच नसल्यामुळे मागे बघण्यातच रमतो. हे पण धोकेदायकच आहे.
बाबासाहेब पुरंदऱ्यांचा इतिहास या दोन्ही पठडीत मोडणारा नाहीं. कारण हा इतिहास जिवंत आहे, रोमांचक आहे, आणि रोचक आहे. त्यांचा इतिहास हि लेखणी आहे ज्याद्वारे ते राष्ट्रजागृती आणि समाजजागृती अखंड करीत होते. छत्रपती शिवाजी हे गतकालीन नाहीत. छत्रपती शिवाजी हे एक धुमसत अग्निकुंड आहे आणि त्याला धगधगते करून समाजाची चेतना आणि समाजाचे आत्म-बळ त्यांना वाढवायचे होते. आणि त्या साठी ते जन्मभर अखंड कष्ट करीत होते.
मी दहावी-अकरावीत असतांना दोन-चार दिवस पुण्याला गेलो होतो. माझ्या मोठ्या मामे भावाची बाईक मला फिरायला त्याने दिली. मग काय मी कानात वारं गेलेल्या खोंडासारखा पुणं भर हिंडत होतो. तेंव्हा मी श्री शिवाजी सावंत यांना भेटण्याचा प्रयत्न केला. (ती गोष्ट पुन्हा कधी सांगेन. पण माझ्या सारख्या पोरा-टोराला एवढं आपुलकीने त्यांने वागवले!) आणि मराठी पुस्तकाच्या दुकानातून चौकशी करून करून श्री पुरंदऱ्यांच्या घरी सुद्धा पोचलो. दोन-तीनदा चक्कर मारली पण भेट झाली नाहीं. आणि होणे कठीण होते. त्यांचे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर होते कि ते सतत फिरतीवर असणार. मी राजा शिवछत्रपती ची नवीन प्रत घेतली होती, पुन्हा त्यांची स्वाक्षरी घ्यायला. ती तशीच बॅगेत राहिली. थोर-मोठ्यांना भेटायला नशीब लागत. आणि पुण्यात त्यांच्या वाड्याच्या खेपा मारतांना मला हे माहिती नव्हते कि माझ्या नशिबी त्यांची भेट पुन्हा आहे.
पुढे अमेरिकेत शिक्षण आणि नोकरी साठी बरीच वर्षे होतो. तेंव्हा हि मराठा इतिहास, शिवाजी महाराजांचे चिंतन, मनन आणि जमेल (आणि झेपेल) तेवढे लेखन चालूच होते. कॉलेज च्या ग्रंथालयात मी इतिहासाची पुस्तके वाचीत खूप वेळ घालावीत असे. नेमके वर्ष आठवत नाहीं पण सन २००७-०८ असावे. श्री पुरंदरे अमेरिकेला भेट देत होते. त्यांचे वेग-वेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होते. माझ्या एका वाहिनीचे वडील त्यांचे जुने स्नेही होते. त्यांनी विचारले कि भेटायचे आहे का? अर्थात, भेटायचे आहे. बाबासाहेबांशी पुन्हा भेटायची संधीला नाहीं कसे म्हणणार? मी आणि माझा वडिल भाऊ त्यांना भेटायला गेलो. माझे मामा-मामी, मामे भाऊ पण होते. यावेळेसच्या भेटीला थोड्या गप्पा झाल्यात. इतिहासाबद्दलही बोलणे झाले. मी जरी खूप इतिहास वाचीत असलो तरी इतिहासाचार्यांसमोर माझी बोलती बंद झाली. उगाच काही तरी बोलून आपल्या बाळ-बुद्धीचा परिचय का करून द्यायचा? महाराष्ट्रातील शिवाजी महाराज, किंव्हा छत्रपती संभाजी किंव्हा दादाजी कोंडदेव यांच्या नावाने चाललेल्या गालीच्च राजकारणाचा ऊत तेंव्हा आला होता. जातीभेद दूर करून महाराजांनी समस्त समाजाला एकत्र केले आणि स्वराज्य स्थापन केले. आणि आता आपला देश आणि समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे तर जाती-पातीचे राजकारण करून पुन्हा समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न म्हणजे शोकांतिका आहे. बाबासाहेब या विषयावर बोलले नाहीं. त्यांना उचित वाटले नसणार. किंव्हा बोलून काही उपयोग नाही असे वाटले असेल. त्यांच्या शब्दांमधून, वर्तनातून कधीच कटुता जाणवली नाहीं. तळमळ होती पण नैराश्य नव्हती. आगतिकता होती पण इजा करणारी धार नव्हती.
मी त्यांना विचारले कि सद्य परिस्थिती बघता भारत कधी सशक्त, संपन्न आणि समृद्ध होणार? ते हसून म्हणाले "अजून २०० वर्षे तरी नाहीं" मी खरे विचारायला हवे होते कि २०० वर्षे का? १९४७ नंतर भारताची प्रगती बघता त्यांनी दिलेला वर्षांचा आकडा थोडा विस्मित करणारा आहे. मी विचारले नाहीं. त्यांनी त्यावर पुढे काही विश्लेषण दिले नाहीं. एखाद विचारायला हवे होते. एखाद वेळेस त्यांनी उत्तर दिले असते आणि मला ते कळले नसते. एकाद वेळेस उत्तर दिली हि नसते. आता वीस वर्षांनी मला वाटते कि खरोखरच २०० वर्षे लागतील. एखादवेळेस आपला देश समृद्ध पुढल्या काही दशकातच होईल. पण समृद्धी म्हणजेच प्रगती नव्हे. पैसे म्हणजेच श्रीमंती नव्हे. आधुनिक आणि प्रगत सैन्यच म्हणजे सशक्तता नव्हे. पैसे, आधुनिक शस्त्र आणि संपन्नता हवीच. त्यात वाद नाहीं. पण तो अंतिम टप्पा नव्हे. उद्या रस्त्यावरून एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतांना रस्त्याला आपण गाव म्हणत नाहीं, ते एक साधन झाले. पैसे एक साधन झाले, शस्त्र हे साधन आहे. मग आपल्या समाजाचे, देशाचे, संस्कृतीचे अंतिम लक्ष्य कुठले? माझ्या स्वतःकडे याचे उत्तर नाहीं. आणि बाजारात विचारायला गेलात तर हजारो उत्तर मिळतील. लक्ष्य हे अनेकार्थी असू शकत नाहीं. अर्जुनाला पोपटाचा एकच डोळा दिसला. तेच त्याचे लक्ष्य होते. अक्खा पोपट, झाड-पाने, मागील आकाश हे त्याचे लक्ष्य नव्हते. गोची इथेच आहे.
बाबासाहेबांच्या त्या दौऱ्यात मला अजून काही भाषणे ऐकायला मिळाली. त्यानंतर त्यांची भेट व्हायचा योग मला मिळाला नाहीं. त्यांना जवळून बघण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याची अपूर्व संधी मिळणे हे माझ्यासारख्याच अहोभाग्य. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ जिवंत ठेवला एवढेच नाहीं. त्यांनी तो प्रत्येक मराठी मनात रुजवला. केवळ पुस्तक लिहून प्रकाशित करून आणि मिळेल तशी भाषणे करून त्यांना प्रचार करता आला असता. पण केवळ व्यासपीठावर न थांबता रंगमंचाचा पण आधार घेतला. जाणता राजा नाटक हि एक भव्य लोककथाच होती. लोककथेचे आयुष्यमान अखंड असते हे बाबासाहेब जाणून होते. ते इतिहासाचार्य होते पण तेवढेच निपुण शाहीर होते. त्यांनी केलेलं कार्य काळाच्या पटलावर या कारणांनीच टिकणार. आज आपल्याला कोणाला लक्ष्य माहिती नाहीं पण या इतिहासाचार्य शाहिरांमुळे पुढल्या पिढी पर्यंत शिवाजी महाराजांच्या इतिहासाची वाट तेवत राहणार. आणि दोनशे वर्षांनी का होईना पुन्हा एक महाराजांच्या नावानी सूर्यजाळ देशाला आणि संस्कृतीला झपाटून घेईल?
No comments:
Post a Comment