या मथळ्याचा पहिला लेख मी २०१४ ला लिहिला होता. तेंव्हाचे भाजप आणि मूळ शिवसेनेतील द्वंद्व आणि त्याचा काँग्रेसला आणि श्री पवार यांना होणाऱ्या फायद्याची शक्यता हा त्या लेखाचा सूर होता. जनतेच्या कृपेने तसे झाले नाहीं. आणि भाजप आणि मूळ शिवसेना यांचे सरकार आले. पुढे श्री फडणवीस यांनी मोठ्या शर्थीने राज्य राखले आणि जोपासले. सन २०१९ च्या लोकसभेत भाजप ची ओटी मराठी जनतेने काठोकाठ भरली. त्या वर्षीच्याच विधानसभेत पुन्हा भाजप आणि मूळ सेनेचे सरकार येणार हे नक्की होते. पण नेमके तेंव्हाच श्री फडणवीस यांच्या कानात वारे गेले. आणि भाजप ची अक्कल चरायला गेली. पण स्वतःसाठी त्यांनी कमी जागा ठेऊन भाजप ने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जणू ठेचकाळयाला धोंडे भाजप आणि श्री फडणवीस शोधत होते. तरी जनतेने त्यांना तब्बल १२२ जागा दिल्यात. मूळ सेनेचे मुख्य श्री ठाकरे यांनी घातलेला गोंधळ बघता, भाजप वेळेत हि गाठ कापून मोकळे होऊन २०० होऊन अधिक जागांवर लढले असते तर भाजप ला स्वतःच्या बळावरच पूर्ण बहुमत मिळाले असते. श्री ठाकरे आणि 'सेना धुरंधर' श्री संजय राऊत यांनी पायाखालून पाट काढे पर्यंत भाजप ने वाट बघितली. आता अंगठे ठेचकाळलेत तो पर्यंत ठीक होत पण भाजप आणि श्री फडणवीस यांनी ठरवले कि धोंडे शोधून त्यावर डोकी आपटायचीत. ३ दिवसांसाठी श्री अजित पवार यांचा पदर धरून त्यांनी घाई-घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. लग्नातली पोरगी कधीच पळून गेली आणि घोड्यावर बसलेले भाजप मात्र त्या नंतर लग्नाचा हिशोब चुकवीत बसलेत. मग भाजप आणि श्री फडणवीस यांनी शक्कल लढवली आणि मूळ सेनेच्या बुरुजांखाली सुरुंग लावले. आणि श्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून पुन्हा सत्तारूढ झालेत. शांतपणे राज्य करून, विकासाची दारे उघडणे सोडून, भाजप आणि श्री फडणवीस यांनी श्री अजित पवार यांच्यासाठी दारे उघडावीत, या शंखपणाला काय म्हणायचे? त्यांच्या या कृतीचा उपयोग नेमका कोणाला झाला हे मला अजूनही उमगले नाहीं. सन २०१९ च्या निवडणुकीत श्री पवार आणि त्यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा आणि मते मिळाली असतांना बुडत्याला हातची वल्ही देऊन हाताने होडी ढकलण्यात भाजप ला नेमके काय मिळाले?
गेल्या दशकातील आणि मुख्य करून २०१९ च्या या महाराष्ट्रातील राजकारणाचा हा संक्षिप्त आढावा देण्यामागचे कारण असे कि या सगळ्या कोलांट्या उड्यात जनतेचे नुकसान झाले. जनतेने आपला कौल २०१४ पासून एकाच पक्षाला देत असतांना त्यांनी (म्हणजे भाजप आणि श्री फडणवीस) एका पाठोपाठ एक नव-नवीन राजकीय चुका कराव्यात हि खेदाची बाब आहे. आणि म्हणूनच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि श्री फडणवीस यांच्या डोक्यावर जनतेने सणसणीत टोला हाणला असे म्हणायला हरकत नाहीं.
राज्यात गेले पाच वर्षे राजकीय अस्थिरता होती त्याचे पडसाद आणि प्रतिसाद राज्यकारभार आणि प्रशासनावर नक्कीच पडले असणार. केवळ राजकीय किंव्हा निव्वळ निवडणुकीसाठी फायदा होईल अशी पावले न उचलता दूरदृष्टीने राज्य विकासासाठी पावले उचलल्या गेल्याची किती शक्यता आहे? आणि असे आवश्यक निर्णय घेतल्या गेले नसतील कारण त्या साठी फुरसत नसेल किंव्हा लक्ष फक्त येत्या निवडणुकांकडेच असेल तर या साठी जवाबदार कोण? याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
अशी प्राप्त परिस्थिती असली तरी भाजप आणि श्री फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे पण तेवढेच सत्य आहे. श्री फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी आहेतच पण उत्तम राज्यकारभारी पण आहेत. त्यांना प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. नागपूरचे ते सगळ्यात तरुण महापौर होते. मग गेले पंचवीस वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद फार उत्तमरीत्या निभावले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात श्री वसंतराव नाईक यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद टिकविणारे दुसरेच मुख्यमंत्री आहेत.
आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतका अनुभव असतांना आणि तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळाला असतांना भाजप ने श्री फडणवीस यांना पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करून जनतेवर कृपा करावी. अडीच वर्ष एक आणि मग दुसरा इत्यादी दिवाळखोरी विचार पक्षाने करू नये. श्री फडणवीस यांच्या सारखा अनुभवी राज्यकर्त्यांची राज्याला फार आवश्यकता आहे. पाच वर्षे आता फक्त विकास एवढाच मुद्दा समोर ठेऊन भाजप आणि श्री फडणवीस राज्य करतील हि आशा.
No comments:
Post a Comment