12/23/24

'Bird By Bird


परदेशी आणि परभाषिक भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांच्या आढावा घेण्याच्या या मालिकेत दुसरे पुस्तक म्हणजे 'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ') हे  ऍन लमोट (Ann Lamott ) यांचे पुस्तक आहे. मागल्या लेखात आपण प्रसिद्ध भारतीय लघुकथेचें भाषांतर केलेल्या पुस्तकाचा आढावा घेतला. यंदाचे पुस्तक आणि त्याचा विषय थोडा वेगळा आहे. एक, कि पुस्तक खऱ्या अर्थाने विदेशी आहे, म्हणजे, अमेरिकेत प्रकाशित झालेले आणि अमेरिकन लेखकाचे आहे. आणि दुसरे असे कि, तब्बल तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झाले असले तरी हा विषय आपण चिरायू म्हणू शकतो. पुस्तकाचे नाव वाचून पुस्तकाचा विषय नेमका कुठला असेल हा कयास करणे कठीण आहे. पुस्तक पक्ष्यांबद्दल नाहीं! लेखन कसे करावे हा पुस्तकाचा विषय आहे. 'कदम कदम बढाये जा' या वाक्प्रचाराचे एका अर्थाने इंग्रजीत भाषांतर आपण 'बर्ड बाय बर्ड' असे करू शकतो. लेखन म्हणजे काय, लेखनाकडे कसे बघावे, लेखन का करायला हवे, लेखन का केल्या जाते अश्या विविध अंगांनी विचार करीत ऍन लमोट हा गहन विषय अगदी सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडतात. येथे त्यांच्या लेखनाचे कौतुक करायला हवे. शाळेतील शिक्षकाने एखादा विषय शिकवावा तश्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकीत मनातील विचारांना किंव्हा विषयाला लेखनकृती कशी द्यायची हे त्या शिकवितात. जरी विषय थोडा धीर-गंभीर असला तरी विनोदाचा आधार घेत ऍन लमोट वाचकांना लेखन करायला उद्युक्त करण्यात यशस्वी ठरतात. 

मनुष्य प्राण्याच्या कंठातून जेव्हापासून शब्दरुपी ध्वनी बाहेर पडू लागले तेंव्हापासून तो काही तरी लिहिण्याची धडपड करितो आहे. आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला लिहिलेले शब्द आवश्यक असतात. तसेच शब्दांचे आयुष्य मनुष्यपेक्षा नक्कीच अधिक असते. मनुष्याचे विचार, अनुभव, उपदेश, कल्पना इत्यादी जिवंत रहावे म्हणून अक्षर व शब्दांना प्रमाणबद्ध केल्या गेले आणि त्यातूनच भाषेचा उदय झाला. बोली भाषा आणि लिहण्याचे अक्षर याचे एकीकरण होऊन संस्कृतीचा उदय झाला. मग संस्कृतीचे जतन करायला नव-नवीन शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादीचा उदय झाला आणि जगभरात विविध संस्कृती नांदायला लागल्यात. सनातन भारतीय संस्कृती या पायावर तर गेले हजारो वर्षे उभी आहे. बोलण्याचे आणि लिहिण्याचे एवढे महत्व असतांना आणि मनुष्य जातील एवढा अनुभव या क्षेत्रात असतांना समस्त मनुष्य जात लिहिण्यात आणि बोलण्यात निष्णात असणार किंव्हा असायला हरकत नाहीं? 

अर्थात असे नक्कीच नाहीं. बडबड करणे म्हणजे बोलणे नाहीं आणि लिहिल्या गेलेले लेखन नाहीं. बहुतांश बोललेले वायफळ आणि बाष्कळ असते! आणि आजच्या काळात बहुतांश लिहिल्या गेलेले नोकरी-धंद्या साठी असते. (सध्याच्या इराक देश असलेल्या भागात केलेल्या उत्खननात किमान पाच हजार वर्ष जुने दगडाचे 'टॅबलेट' सापडलेत. त्यात लिहिले होते त्याचा उलगडा करायला बरीच कष्ट लागलीत. शेवते कळले कि एका ग्राहकाने दुकानदाराविरुद्ध केलेली तक्रार या टॅबलेट मध्ये कोरली होती!) कारण लेखन - मग ते प्रासंगिक असो कि मनोगत किंव्हा ललित असो- हे फार कठीण काम आहे. शब्दांना नेमका असा आकार द्यायचा कि वाचणाऱ्यांना ते शब्द रोचक, अर्थपूर्ण वाटतील, किंव्हा खटपट करून शब्दांना गर्भित अर्थ प्राप्त करावा कि वाचकांना अभिप्रेत उमजेल. किंव्हा शब्दांमध्ये आपले अनुभव असे गुंफावे कि वाचणाऱ्यांना तो अनुभव आपलासा वाटेल. सूक्ष्म भावनांच्या उत्कटतेला शब्दांनी आकार देणे, प्रतिभेच्या उत्स्फूर्ततेला वाक्यांनी उत्तुंग बनविणे, हे काम सोपे नाहीं.  पण मग काय करायचे? लिहायची इच्छा आहे पण लिहिता येत नाहीं, कुठून 'श्री' करायचे हे कळत नाहीं, कुठे नेमके संपवायचे? कोणाबद्दल, कशाबद्दल, कुठल्या काळाबद्दल, कुठल्या घटनेबद्दल लिहायचे? हे कोडे काही केल्या  उमजत नाहीं. अश्या स्थितीत बर्ड बाय बर्ड पुस्तक हाताशी येते. 

लिहिता येत नाहीं माहिती आहे पण ते का, या प्रश्नाच्या  भानगडीत पडण्यापेक्षा, लिहायला कशी सुरुवात करायची या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या लेखिका ऍन लमोट स्वतःच्या आयुष्यातील काही घटनांना गोवून आणि थोर-मोठ्या इंग्रजी लेखकांशी या विषयी केलेल्या संवादाद्वारे, लेखनाकडे नव्हे तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन पुस्तकाद्वारे देतात. लेखन हा गंभीर प्रकार नाहीं. अगदी जरी गंभीर विषयांवर लिहायचे असेल तरी! लेखन हा अनुभव हा स्वतःला आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे. हि एक कला आहे. आणि कलेचे पहिले लक्ष्य स्वानंद असते. अमूर्त विचारांना, भावनांना, कल्पनेला, एका स्वतः घडवलेल्या नवीन विश्वाचा आविष्कार करून वाचकांसमोर ठेवणे हि एक उपलब्धी याची जाणीव हे पुस्तक देते. या पुस्तकाचा सूर आणि स्वर एकूण आनंदी आहेत. हे पुस्तक वाचून लिहायला स्फूर्ती मिळते. लेखन हे जगण्यापेक्षा वेगळे नाहीं आणि त्यामुळे त्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाहीं. छोटे छोटे टप्पे गाठून एकादी लघु-कथा आज आपल्या प्रत्येकात आहे. 

पुस्तकाची अनुक्रमणिका बघाल तर लांब आहे पण पुस्तकाचे पृष्ठसंख्या फार नाहीं. पुस्तकाचे चार मुख्य भाग आहे - १) Writing , २) The Writing Frame of Mind , ३) Help Along the way , ४) Publication  - and  Other  Reasons  to  Write .आणि पुढे हे चार मुख्य भाग अजून छोट्या छोट्या धड्यांमध्ये भागले आहे. लेखिका ऍन लमोट या अमेरिकेतील कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन ( creative writing ) हा अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. पण एका अभ्यासक्रमाप्रमाणे शिकून लिहिण्याचे ठरविले तरी लिहिण्याचा कुठला जादुई मंत्र नाहीं हे त्या लगेच स्पष्ट करतात. 

"I wish i had  a secret  i  could  let  you  in  on , some  formula  my father  passed to  me  in  a  whisper  just  before he  died , some  code  word  that  has  enabled  me  to  sit  at  my  desk  and  land  flights  of  creative  inspiration  like  an  air -traffic controller . But I don 't " 


त्यांच्या मते पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया हि लिहूनच सुरु होते. कोंबडी पहिले कि अंड पहिले? कल्पना नाहीत तर लिहायचे कसे आणि लिहिले नाहीं तर कल्पना कुठून येणार? या भानगडीत पडण्यात,  याचा ऊहापोह करण्यात वेळ घालविण्यात फारसा अर्थ नाहीं. आधी लिहायला लागा, लिहिता लिहिता लिहिण्याची प्रगती होईल. सोबत सतत वाचा, वाचून वाचून लिहिण्याची संयुक्तता साधेल. खुर्चीवर बसून भिंतीकडे (किंव्हा आकाशाकडे!) बघून शब्द सुचत नाहीं, वाक्य जमून येत नाहीत, आणि कल्पना भराऱ्या घेत नाहीत. कल्पनेचे 'विलास' बांधायचे तर अक्षरशः दगड-धोंडे ढोहुन नेण्यासारखी ढोर मेहेनत करायला हवी. आता कल्पना विलासाचा पाय असो कि गोष्टीची बांधणी, सुरुवात नेहमी लहानच केलेली बारी. एकदम गोष्ट लिहिण्याचे धाडस होत नसेल तर गोष्ट थोडी बाजूला ठेवा आणि अनुभवाचा एकदा परिचछेद लिहा. हा अनुभव कुठलाही असू द्या. वैयक्तिक किंव्हा ऐकलेला. चित्र काढायच्या आधी वहीच्या मागल्या पानावर पेन्सिल ने काहीतरी हलकेच रेखाटल्या सारखे. बरं, काही तरी सखोल, तात्त्विक, किंव्हा शिकवून जाईल असे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीं. सकाळी भाजी आणायला म्हणून निघालेल्या 'अहो' आणि 'अग' मधील 'सुखद' संवाद? घरून ऑफिस मध्ये जाण्याच्या प्रवास? त्यात नित्यनेमाने दिसणार, भेटणारी पात्रे? या नित्यनेमाच्या अनुभवांमध्ये इतके रंग आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीचे धडे वाचून लिहायचा 'श्री' केला कि पुढच्या धड्यांमध्ये या साधारण अनुभवांना   गोष्टीत कसे रूपांतरित करता येईल हे शिकता येते. पात्रांना स्वभावगुण कसे द्यावेत, परस्परसंवाद, भाषा कुठली वापरायची? कथानक कसे हवे? एक एक धडा वाचत गेलो कि रेखाचित्राची अजून एक रेघ आणि कथानकाचा अजून एक छटा रंगवीत येऊ शकते. 

पुस्तकातील हा धडा तर होतकरू लेखकाने त्याच्या सान्निध्याचा सूक्ष्म परीक्षण करायला शिकवितो. हे परीक्षण कसे करावे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि त्याचा सुद्धा सराव करायला हवा. अनेक थोर लेखक त्यांच्या घराचा, गावाचा, परिसराचा, लहानपणी त्यांच्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा किंवा मित्रांचा ठसा आपल्या लेखकात ठळकपणे उमटवतात. ग.दि. माडगूळकर त्यांच्या 'मंतरलेल्या दिवस' या आत्मचरित्रपर पुस्तकात या बद्दल म्हणतात " अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर साहित्यकार कितीही प्रगत झाला, तरी बाल्यातील संस्कार व ऋणानुबंध त्याच्या साहित्यकृतीत वारंवार डोकावत रहातात. माझं खेडेगाव, त्या खेड्यातील चालीरीती; तिथलं वातावरण, तिथला झाड-झाडोरा, माती-पाषाण, असेच माझ्या स्मरणात टिकून राहिले आहेत. खेड्यातल्या माणसांच्या आकृती आणि स्वभावरेखाई अशाच मनावर ठासून गेल्या आहेत. नाव वाङ्मय लिहीत असताना त्यातील अनेक दुर्श्य, अनेक प्रसंग आणि अनेक स्वभावच्छटा माझ्या लिखाणात येतात; सदैव येतात." (मोहोरलेला कडुलिंब, मंतरलेले दिवस )

वी.एस. नायपॉल हे इंग्रजी भाषेतील दिग्गज लेखक होऊन गेलेत. सन २००१ चे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे मूळ भारतीय रक्ताचे असलेत तरी त्यांचे पूर्वज काही पिढयांपूर्वी सध्या ज्याला वेस्ट-इंडिज म्हणतो या देशात स्थलांतरित झाले होते. तिथल्या छोट्याश्या गावात नायपॉल यांचा जन्म झाला. त्यांनी पुढे त्यांच्या जन्म इंग्लंड मध्ये काढला तरी आयुष्याची पहिली १८-१९ वर्षे, जी वेस्ट-इंडिज मध्ये कंठिलीत, त्याचे पडसाद त्यांच्या लिखाणात नेहमीच दिसतात. त्यांचे मिगुल स्ट्रीट (Miguel Street ) हे पहिले लघु-कथांचा प्रकाशित संच अतिशय प्रसिद्ध झाला. या पुस्तकातील पहिली लघु कथा कशी सुचली याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. एका दुपारी ते लंडन मध्ये त्यांच्या टाईप-रायटर वर शून्यात बघत बसले होते. काय लिहायचे, कशावर लिहायचे याचा विचार करीत. अचानक, शून्यात, त्यांना त्यांच्या लहानपणाचे घर दिसले, त्यात त्यांचे वडील बसलेले होते आणि समोरून त्यांचा शेजारी 'बोगार्ट' जात होता. त्यांच्या वडिलांनी त्या बोगार्ट ला हाक मारली: 

"‘Every morning when he got up Hat would sit on the banister of his back verandah and shout across, “What happening there, Bogart?”‘ 

हा संवाद त्यांनी लिहिलेल्या पहिल्या लघु-कथेची सुरुवात ठरली. 

पुस्तक आणि त्यातील धडे फक्त लिहायला मदत करून थांबतात असे नाहीं. कथानकाच्या विविध अंतरंग कसे शोधायचेत, आणि मग रंगवायचेत हे पण ऍन लमोट समजावतात. पुस्तकात "Moral Point Of View " हा धडा मला फार आवडला. 

"To be a good writer, you not only have to write a great deal but you have to care. You do not have to have a complicated moral philosophy. But a writer always tries, I think, to be a part of the solution. " (पृष्ठ १००)

गोष्ट असेल तर विषयाबद्दल, कथानकाबद्दल, घटनेबद्दल, पात्रांबद्दल आणि मनोगत असेल तर स्वतःबद्दल, आपुलकी आणि जिव्हाळा हवा. कोरड्या मनाने शब्दांचा अभिषेक चढविणे कठीण आहे. बहुधा अशक्य आहे. वाचकांना कळत-नकळत ती त्रयस्थता नक्कीच जाणवेल. असे होऊ शकते कि गोष्ट अचानक असे वळण घेईल कि रंगवलेल्या पात्रांची भूमिका पटणार नाहीं. रंग विस्कटलेल्या सारखा वाटेल पण खऱ्यात सुद्धा सीमारेषेच्या चौकटीत आयुष्य बसत नाहीं तर गोष्टींची पात्रे त्याला अपवाद कसा ठरणार? पण जिव्हाळा कायम ठेवला तर गोष्ट वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेईल. पु.ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातील व्यक्ती आणि वल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पुस्तकातील पात्रे खऱ्या लोकांवर आधारित आहेत पण खरी नाहीं. आपण आपल्या पोराला अभिमानाने पाहुण्यांसमोर बोलावितो त्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येक पात्र पु.ल. वाचकांसमोर उभी करतात. सखाराम गटणे आणि अंतू बर्वे हि पात्रे विरोधाभासी आणि जणू वेगळ्या विश्वात वावरतात. पण पु. ल. दोघांवर तेवढेच प्रेम करतात. आणि हे प्रेम वाचकांच्या हृदयी कळते. सन १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही वाचकवृंद घरी संग्रही ठेवतो.

"If people cannot write well, they cannot think well, and if they cannot think well, others will do their thinking for them."   - ओरवेल

समाज प्रबोधन, समाजउत्थान करण्याचा लेखनासारखा मार्ग नाहीं. फक्त गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास बघितला तरी सगळ्या मोठं-मोठाल्या बदलांचा किंव्हा क्रांत्यांचे मूळ लिहिलेले पुस्तकच असेल. बर, क्रान्ति वगैरेच्या भानगडीत नाहीं पडला तरी लेखनाचे महत्व कमी होत नाहीं. स्वतःची स्वतःला ओळख होण्याचा लेखन एक उत्तम मार्ग आहे.  

पुस्तकात पुढे प्रकाशनाबद्दल हि धडा आहे. हे पुस्तक तब्बल तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. तेंव्हा पुस्तकांद्वारेच लेखन होत. आणि त्यासाठी प्रकाशनगृह हा एकाच मार्ग होता. पण गेल्या तीन दशकात परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. प्रकाशनगृहे आहेत आणि लागतील पण आता प्रकाशाची विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे लिहिलेले वाचकांपर्यंत पोचवायला अधिक सोपे झाले आहे. पण सोपे असले किंव्हा अगदी स्वतःच्या खर्चाणे प्रकाशन करण्याची इच्छा असेल, कुठल्याही तऱ्हेचे प्रकाशन करणे हे अंतिम ध्येय असायला नको. ते एक एवढेच लक्ष्य नको. लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसे, लेखन हि नवीन अविष्काराची अनुभूती देणारा मार्ग आहे. देवत्व प्राप्त ना करीत देव बनून नवीन कल्पना सृष्टी रचण्याचा एक सहज मार्ग आहे.  आणि प्रकाशित नाही झाले तरी हे शक्ती आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आकाशात ध्रुव ताऱ्याचे  अढळ स्थान आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. 

लेखन नेहमी गंभीर असावे असे काही आवश्यक नाहीं. लेखन बोधीप्राय हवे असेही नाहीं. लेखन जगाकडे बघण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. खूपदा बोलून आपल्याला दिसत असलेले जग दुसऱ्यांना दर्शवू शकत नाहीं. अश्यावेळेस लेखणी (किंव्हा की-बोर्ड!) आपला मित्र ठरतो. लेखनाद्वारे किंव्हा गोष्टींद्वारे आपण आपल्या शेजार-पाजारच्या जगाला वेगळ्या रंगाने रंगवू शकतो. कोण म्हणत कि जसा रंग दिसतो तोच गोष्टीला द्यायला हवा? पाहिजे तो रंगवू शकतो. आकाश निळ्याचे हिरवे करू शकतो, चांगल्याला वाईट, आणि वाईटाला चांगला करू शकतो. किंव्हा चांगल्या वाईटाचा दोन्ही छटा एकाच व्यक्तिमत्वात ओतू शकतो. आकाश ठेंगणे ठरेल आपल्या कल्पनेच्या भरारी पुढे. अतर्क्य असे काहीच नाहीं इथे. खऱ्या आयुष्यात असे स्वातंत्र्य कधीच मिळायचे नाहीं. आणि हे सगळे करण्यात जो निखळ आनंद मिळेल तो फक्त आपलाच! 

पुस्तकाचे माहात्म्य आणि पुस्तकाचे यश असे कि वाचक काही तरी लिहायला उद्युक्त होतो. लिहायला प्रयोजनाची आवश्यकता नाहीं. बाळपणी चालायचे शिकायला प्रयोजन हवे होते का? बोलायला? तसेच लिहिण्याचे आहे. लिहायला लागायचे. सराव करायचा. एकदम उठून कोणी गीत-रामायण लिहू शकत नाहीं (माडगूळकरांनी गीत-रामायण लिहिले तेंव्हा त्यांना तब्बल वीस वर्षांचा विविध-रंगी लेखनाचा अनुभव होता.) पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी आणि त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही नक्कीच हवे. 

--

पुस्तक परिचय

'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ')   

लेखिका  - ऍन लमोट (Ann Lamott)

प्रकाशन दिनांक  - सप्टेंबर १, १९९५, 

पृष्ठ संख्या - २५६ 

ISBN-13 ‏ : ‎ 978-०३८५४८००१७

ऍमेझॉन ची लिंक -  https://www.amazon.in/Bird-Some-Instructions-Writing-Life/dp/०३८५४८००१६


No comments: