ही व्यथा म्हणावी तर व्यथा नाही कारण मी लौकिक दृष्ट्या सुखात आहे. ही कथा म्हणावी तर कथाही नव्हे कारण याची सुरुवात कुठे झाली आणि संपणार कुठेय याचा मुळीच थांगपत्ता नाही. हा वैयक्तिक अनुभव म्हणता येईल पण मला खात्री आहे कि या भावनांचे सुर अनेकांच्या मनात उमटतात. हा चूक-बरोबर किंवा चांगल-वाईट याचा मागोवा ही नव्हे. मी काही तरी महत्त्वाच हरवलय ही भावना सारखी मनाल टोचते आहे.
हे मनोगत काय हरवलय या शोधाचं आहे.
माझ अमेरिकेत येणं सहाजिक होते. मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातला मी, भारताबद्दल नको त्या कल्पना करुन आणि अमेरिकेबद्दल हव्या त्या कल्पना करुन, इंजिनिअरिंगच्या वर्गात असतांनाच परदेश गमनाची स्वप्ने बघत असे. माझ्या सोबतची बहुतांश मुले तर मनाने अमेरिकेत पोचली सुध्दा होती. इंजिनिअरिंग झाले व मी धोपट मार्गाने उच्च शिक्षणासाठी अमिरिकेत दाखल झालो. शिक्षण पुर्ण करायचे, वाणि़ज्य किंवा आर्थिक क्षेत्रात नोकरी धरायची. बस्स, मग लाल स्पोर्टस कार, बंगला, थोडक्यात नुसती ऐष. माझे सगळे आराखडे अगदी तयार होते. या सर्व गोष्टी साध्य करतांना मला किती मेहनत लागणार होती तसेच हे सगळ साध्य केल्या नंतर काय, हे असले प्रश्न मला कधी शिवलेही नाहीत. आणि असले प्रश्न पडावेत तरी का? म्हणजे, कुठल्याही तर्हेची मेहनत करण्याची तयारी होती. तसेच माझ्या आधी आलेली भारतीय यशस्वी होत होते. त्यामुळे माझा अपयशी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. पण यश-अपयश याचा सबंध केवळ लक्ष-भेदाशी नसतो. खुपदा लक्ष्या पर्यंत पोचण्यच्या प्रवास माणसात आमुलाग्र बदल आणितो.
आता मी काही वर्षांपुर्वीच्या भोळ्या आणि मूर्ख अश्या माझ्याकडेच बघतो तेंव्हा संमिश्र भावनांच वादळ मनात उमटत. अनेक प्रश्नांची मनात इतकी गर्दी होते कि उत्तर शोधण्याच्या ऐवजी मी प्रश्नांची मोजदाद करण्यातच रमुन जातो. मी पाहिलेली बहुतांश स्वप्ने, थोडी उशीरा का होईना, सत्यात आली आहेत. पण प्रत्येक गोष्टीची किंमत असते. अगदी श्वास घेण्याची किंमत या दुनियेत जगुन द्यावी लागते. अमेरिकेत 'यशस्वी' होण्याची किंमत कराव्या लागणार्या कष्टांमधे नुसती मोजता येत नाही. स्वप्ने सत्यात आणण्यासाठी करावी लागणारे कष्ट सुध्दा मी आनंदाने केलीत. पण हे सगळं करण्यात मी स्वतः स्वता:पासुनच दुरावलो. स्वता:लाच हरवुन बसलो. मी कोण होतो आणि मला काय करायचे होते या सोबत मी काय मिळविले आणि कोण झालोय याची सांगड लागत नाही.
शिक्षण चालू असतांना बरीच कष्ट पडलीत. प्रोफेसर ढंगाचा मिळाला नाही. थिसिस वेळेवर झाला नाही त्यामुळे शिक्षण वर्षभर लांबले. आता या 'अधिक' वर्षाची फी कुठुन येणार म्हणुन कॉलेज मधल्या नोकरी व्यतिरिक्त काही हॉटेमधे भांडी धुण्यापर्यंत काम करावी लागलीत. अर्थात, याबद्दल मला मुळीच तक्रार नाही. बरीच लोक हे सगळ करतात. पण या सगळ्या भानगडीत भारतात दोन वर्षे जाता आल नाही. सगळ्यांच्या बाबतीतच अस थोडं-फार होत की फक्त माझ्यासोबतच अस झाल मला माहिती नाही. पण घरापासुन इतकं दूर राहुन आणि अनपेक्षित तर्हेचे कष्ट करुन मी मनातुन कोरडा पडत गेलो.
घरी राहुन बर्याच गोष्टी आयत्या मिळतात. आईच्या हातचं सुग्रास अन्न खायला मिळत या बद्दल मी बोलत नाहीया. पण आपलं व्यक्तिमत्व, आपण जसा विचार करतो, जसं बोलतो-चालतो, आपले वैयक्तीक दृष्टीकोण इत्यादी पैलु बर्याच गोष्टींवर निर्भर करत. या गोष्टींवरच मानसिक दृष्ट्या आपण अवलंबुन असतो. आई-वडिल, नातेवाईक, मित्र-मंडळ, शेजार-पाजार हे सगळे चांगल्या-वाईट दोन्ही दृष्टींनी आपल्य व्यक्तीमत्वाला रुप देत असतात. आपण जे स्वता:ला आरश्यात बघतो त्यात या सगळ्यांची प्रतिबिंबे असतात. पण अमेरिकेत गेल्यावर हे सगळे धागे-दोरे अदृश्य होतात. अचानक आरश्यात फक्त आपणच उरतो. दोर तुटलेल्या पतंगासारखी गत होते. हे सगळं मला लगेच जाणवल नाही. पण हे परिणाम हळु-हळु अंगात भिनत गेले.
तरुण वयात परदेशात जाउन मर्दुमुकी गाजवणार नाही तर कधी करणार? अस कोणी म्हटल तर ते बरोबरच आहे. तसेच त्यासाठी नविन व्यक्तिमत्व बनवाव लागत असेल तर ते ही आवश्यकच आहे. खर सांगायच तर स्वता:चा भुतकाळ विसरुन, वर्तमानात परत जन्म घेण्यास कोणी तयार असेल तर त्याने कराव पण हे फार कठीण आहे. कळत-नकळत स्वतःला देशापासुन, संस्कृतीपासुन, आप्नजनांपासुन तोडुन जर का मी केवळ लाल गाडी आणि लॉन असलेलं मोठ घर मिळवत असीन तर माझे हिशोब चुकले आहेत असं मला वाटतं. जुनी हिंदी गाणी, जी विविध भारतीवर लागायचीत, ती ऐकुन आठवणींच्या असंख्य सुया जेंव्हा टोचतात तेंव्हा अस वाटत की जे कधीही हरवु शकत त्यासाठी मी जे आता परत कधीच गवसु शकत ते हरवलं. मला माझ्याशी जोडणारी नाळ नेहमी साठी तोडल्याच्या अगतिक दु:खाची जाणीव होते.
सगळे माझ्यासारखा विचार करतात का? की मनाच्या, मनाला रुचेल अश्या, समजुती पाडुन निवांतपणे जगतात. सांगण कठीण आहे. मी चूक-बरोबर, चांगल-वाईट याबद्दल काही मतं मांडत नाहीया. पण मला इथे सुबत्तेची व श्रीमंतीची झापण बुध्दीला लाउन व सुखी असल्याचे मुखवटे बांधुन लोक हिंडतांना दिसतात. पैसा कमविणे आवश्यक आहे पण ते अंतिम लक्ष नव्हे. छान घर, गाडी, तगडा बँक बॅलेन्स असणे चांगली गोष्ट आहे पण तेच सुख आहे अस वाटण चुक आहे. हे सगळ मिळविण्या साठी जर का स्वता:ला हरविणे आवश्यक असेल तर ती दु:खी कल्पना आहे.
गंमत म्हणजे भारतात रहाणारे बहुतांश आणि अमेरिकेत रहाणारे बरीच लोकं मला हे वाचल्यावर वेड्यात काढतील. काही लोक असेही म्हणतील कि एवढ देश-प्रेम होत तर अमेरिकेत गेलाच कशाला? पण इथे मुद्दा देश-प्रेमाचा नाहीया. हि कैफियत आहे मनाची. हे तक्रारीचे सूर नव्हेत. ही कहाणी आहे मनाला बसणार्या डागण्यांची. मी केलेल्या कष्टांची यादी मला इथे मांडायची नाहीया पण मनातल्या धुक्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे.
परदेशात जाउ नये अस माझ मुळीच म्हणण नाही. आर्थिक सुबत्तेचा शोध करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किंबहुना, मला परत भूतकाळ जगायला मिळाला तर मी परत अमेरिकेत येण्याचाच निर्णय घेइन. फक्त स्वता:ला घट्ट धरुन ठेवण्याचा प्रयत्न करीन. असही शक्य आहे की मला आता इथे राहुन भारत जास्त रम्य वाटत असेल. जसं भारतात असतांना अमेरिका दिसत होत. माझ म्हणणे एवढेच आहे कि परदेशात जाण्याची किंवा तिथे स्थायिक होण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते हे माहिती असणे आवश्यक आहे. दुरुन डोंगर साजरे हेच खरं.
या धुक्यातुन बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? मला तरी काही अजुन सुचलं नाहीया. पण मी बुध्दीला झापण लावायला तयार नाही. काही लोकं याबद्दल विचारही करत नाहीत. ती लोकं खरच सुखी आहेत. फार विचार करायला लागल कि नको असलेल्या गोष्टींना हव्या त्या तत्त्वांच्या वेष्टणात बांधुन मन मान्य करत.
अमेरिकेत राहुन आता मला बरीच वर्ष झाली आहेत पण मी ती तत्त्वे अजुनही शोधतोय.
(काल्पनिक)
5 comments:
Mala vatate baryach bharatabaher rahanarya NRI chi hich avastha asavi..
Any way in every conuntry there are some pros and some cons. It seems better to be happy wherever you are..(Though this post is 'kalpanik'.)
मस्त.
मस्त....
दुरुन डोंगर साजरे हेच खरं.
Dr.Suryabaalaa yanchi 'Maanushagandha' hee kathaa [hindi]jarur vaachaa.
-Hira Janardan
best
Post a Comment