आज तो सकाळी साडे-पाच ला आपणहुन उठला. नाहीतर रोज आई साडे-सातला उठविते तरी त्याला उठायच नसत. पण आजचा दिवस विशेष होता. गेला महिनाभर तो या दिवसाची वाट बघत होता. आजच्या दिवशी तो कस आणि काय करणार आहे याची तो स्वप्न बघत होता. काल रात्री त्याल नीट झोपसुध्दा आली नाही. दोन-तीनदा त्याने उठुन घड्याळात किती वाजले आहेत ते बघितले. सरांनी सकाळी सात वाजता मैदानावर हजर रहाण्याची सक्त ताकीद दिली होती. जो उशीरा येइल त्याला खेळायला मिळणार नव्हते. लहान वयाच्या मुलांना शिस्त लावणे आवश्यक असते पण शिस्त लावणे आणि आपली मर्जी चालविणे यात फरक आहे. सरांना तो फरक कधीच लक्षात आला नाही.
सुरुवातीला त्याला बास्केटबॉल खेळण्याची फारशी आवड नव्हती. त्याचा मोठा भाऊ बास्केटबॉल खेळायला नियमित जात असे. शेजार-पाजारच्या मुलांसोबत उनाडक्या करण्यापेक्षा थोडी नियमितता आणि शिस्त लागावी म्हणुन त्याच्या आई-वडिलांनी त्याला मोठ्या भावासोबत जबरदस्ती बास्केटबॉल खेळावयास पाठवु लागले. सुरुवातीला बरीच आदळ-आपट करुन झाली पण त्याल हळु-हळु खेळाची गोडी लागली. वयाने बराच लहान असल्यमुळे त्याला सुरुवातीला कुठल्या प्रतियोगितेत भाग घेणे शक्य नव्हते. त्याला नुकतेच ११ वे लागले होते. सरांनी क्रिडा मंडळात त्या वयाच्या मुलांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्याचा खेळ इतका चांगला होता की त्याला उत्तम खेळाडुचे पारितोषिक मिळाले. त्यामुले १४ वर्ष वयोगटाच्या चमूत त्याची निवड झाली होती. पण क्रिडा मंडळातील आपल्याच मित्रांसोबत खेळणे वेगळे आणि इतर क्रिडा मंडळातील मुलां विरुध्द खेळणे वेगळे. त्यामुळे तो शहर-स्तरावरील प्रतियोगितेत भाग घेण्यास उत्सुक होता. त्याला खात्री होती कि तो त्याच्या चमूला जिंकवुन देइल म्हणुन.
सकाळी उठुन त्याने कामे भराभर उरकली. आपल सोंग खेळासाठी इतकी धडपड करतय बघुन त्याच्या आईला फार कौतुक वाटत होते. निघायच्या वेळी आजीने पोटाशी धरुन आशिर्वाद दिले व हातावर दही ठेवले. सकाळी ६ वाजता एकट नको जायला म्हणुन तो सायकल वर आणि त्याच्या मोठा भाऊ पाठोपाठ स्कुटर वर, सोबत म्हणुन, अशी स्वारी निघाली. (वडिलांना त्याने सकाळीच नमस्कार केला होता. ते पहाटेच कामावर जात असत.)
सव्वा सहाला तो क्रिडांगणावर हजर झाला. बरीचशी मुले जमा झाली होती. नोव्हेंबर ची थंडी होती. सगळी मुले कुडकुडत होती. पण सरांचा पत्ता नव्हता. ते सात नंतर उगवलेत. मग सगळ्यांची वरात घेउन ते ज्या क्रिडांगणावर सामना होता तिथे त्यांनी कुच केली.
सगळ्या चमूने वॉर्म-अप केला. बास्केटबॉल च्या खेळात प्रत्येक संघाचे एका वेळेस फक्त पाच खेळाडु खेळतात. त्यातल्य कुठल्याही खेळाडु ला कधीही 'चेंज' करता येते. पण पहिले पाच मधे खेळणे विशेष मानल्या जाते. एवढी मेहनत केली असता आणि पारितोषिक मिळाले असता, त्याला खात्री होती तो पहिल्या पाच मधे नक्की खेळणार म्हणुन. पण पहिल्या पाच निवडतांना सरांनी त्याच्या कडे ढुंकुनही बघीतले नाही. वाईट वाटण्याऐवजी तो चकित झाला. कारण पाच पैकी दोन मुलांना मुळीच खेळता येत नव्हते. तो बिचार आपलं काय चुकल आणि सर का रागावलेत याचा विचार करु लागला.
सामना सुरु होउन १५ मिनिटे होउन गेली होती. (बास्केटबॉलच्या सामन्याचा कालावधी ४० मिनिटे असतो) सरांनी त्याच्या कडे साधी नज़रही टाकली नाही. तो अगदी कावुन गेला होता. सामना जिंकण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. सर घसा खरडुन, अस खेळा-तस खेळा सांगत होते. पण दोन टायर पंक्चर झालेली गाडी कशी नीट चालणार!
"सर, मी जाऊ का आत, खेळायला" त्याने धीर करुन विचारले.
सरांनी त्याच्यावर रागाने कटाक्ष टाकला. " कोच मी आहे कि तू?"
त्याचा चेहरा अजुन पडला व नजर खाली गेली.
"परत मी खेळु का विचारल तर लक्षात ठेव" सरांनी खडसावले.
इथे सामन्यात खेळता न येणार्या दोन मुलांपैकी एक मुलगा संघाची अक्षरशः वाट लावित होता पण सर त्याला काहीच म्हणत नव्हते. हाफ-टाइम नंतर तरी खेळायला मिळेल अशी त्याला आशा होती. पण तस घडणे नव्हते.
३२ मिनिटे होउन गेलीत आणि समोरच्या संघ बर्याच अंकांनी आघाडीवर होता. आता सामना जिंकणे जवळ-जवळ अशक्य होते. तेवढ्यात सरांनी त्याचे नाव घेतले व चेंज म्हणुन त्याल खेळात घातले. त्याला एकदम स्फुरण चढले. काहीही झाल तरी सामना जिंकुन द्यायचा चंग त्याने बांधला. त्याच्याकडे बॉल आला. त्याने बघितले तर त्याच्या आणि रिंगमधे विरुध्द संघाचा एकच खेळाडु होता. त्याने सफाइने विरुध्द संघाच्या खेळाडुला चकविले आणि रिंगच्या दिशेनी झेप घेतली व शॉट कनर्वट केला. त्याच्या आयुष्यातील पहिले दोन अंक त्याने नोंदविले. गेल्या महिनाभर गाळलेल्या घामाचा मोबदला मिळाल्याच्या भावनेने त्याला हुश्श झाले. त्याची चपळता बघुन जे थोडे-फार प्रेक्षक जमा झाले होते त्यांनी टाळ्या वाजविल्यात. त्याचा उत्साह द्विगुणित झाला. पण सरांनी त्याला परत हाक मारली आणि अवघ्या दोन मिनिटांमधेच त्याला परत बोलाविले. त्याला कळेचना की अंक नोंदविले असतांना सरांनी त्याला चेंज म्हणुन सामन्यातुन बाहेर का बोलाविले. पण त्याच्या नकळत त्याने फार मोठा अपराध केला होता.
" नालायक, तुला पास नव्हता देता येत का? तो मुलगा तिथे फ्रि उभा होता ना?" सरांनी रागात विचारले आणि जोरात टप्पल मारली.
सरांची अंगठी डोक्याला चांगलीच जोरात लागली.
"पण सर त्याला चांगले खेळत येत नाही आणि तो रिंग पासुन बराच दूर उभा होता"
झाले, सरांचा तोल सुटला. कारण ज्याला पास नव्हता दिला तो सरांच्या बॉसचा मुलगा होता. आपल्या कथा-नायकाला याचा मुळीच गंध नव्हत.
"मुजोरी करतोस" अस ओरडत सरांनी त्याला झापड मारली.
त्याच्या कानात सुं आवाज येउ लागला. सर पुढे काय ओरडत होते त्याला ऐकु येइना. तो गुमान बाकावर जाउन बसला. फारस कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हता.
अपेक्षितरित्या त्याचा संघ सामना हारला.
घरी येउन तो "आम्ही हरलो" एवढच तो कसं-बसं म्हणाला व आंघोळीसाठी गायब झाला. आईला आणि आजीला वाटले कि सामना हारला म्हणुन त्याचा चेहरा रडवेला झाला असावा. पण त्याच्या गालावर दोन बोट कोणाची हे त्या दोघींना कळेना.
2 comments:
I read your all short stories. i liked them. Asacha Lihit raha.
आपला बॉग खुपच छान आहे. मला असे लिहीता आले असते तर.
Post a Comment