9/5/08

निर्माल्य - भाग ३

माईंच्या डोळ्यातील अश्रुंचीच जणु पाऊस वाट बघत होता. एकसंथ पावसाची रीघ लागली. इतका वेळ गद्द झालेली हवा लगेच मोकळी झाली. बघता बघता हवेत गारवा आला. माई उठल्या, त्यांनी डोळे पुसले आणि माजघरात आल्या. सून रडून रडून झोपून गेली होती. दिवे लागणीची वेळ व्हायला आली होती. माजघरातल्या बायकांना माईंना बघुन नेमक काय बोलायच किंवा काय करायच कळत नव्हत. खर सांगायच तर माई इतक्या कमी रडल्या होत्या त्याचीच सगळ्यांना काळजी वाटत होती.

"माई या बसा" म्हणत कोणीतरी खुर्ची आणुन दिली.

माईंच लक्ष नव्हत.

"काय करताय अक्का?" माईंनी स्वयंपाकघरात गॅसपाशी उभ्या असलेल्या बाईला विचारल. एका शेगडीवर दूध ऊतू जात होत. अक्का गॅसशी झटापटी करत होत्या. गावात दोन-तीन घरांमधेच गॅस होता. अविनाश ने नुकताच घरी सिलेंडर लावला होता.

"चहा करत होते सगळ्यांसाठी पण या शेगडीची मेली भानगड कळत नाही." अक्का उत्तरल्या. माईंनी दुसर्‍या शेगडीकडे नजर टाकली. दुसर्‍या शेगडीवर काहीतरी खदखदत होत.

"पिठल करत होते. लोक येतीलच, जेवायच तर लागेलच ना" अक्कांच्या चेहर्‍यावर अपराधी भाव उगाच होते.

"बरं सुचल तुम्हाला" अस म्हणत माई वर्‍हाड्यांत पुन्हा आल्या आणि अण्णांच्या आरामखुर्चीवर अंगाची घडी करून बसल्या. घरात पिठल शिजतय या विचाराने त्यांना हसु आल. जो जायचा तो जातोच पण मागे राहिलेले भूकेच्या पछाड्यातून थोडीच सुटतात. भूकेला काही भावना नसतात. त्यांनी पदरात स्वतःल गुरफुटुन घेतल आणि चुकलेल्या गणितांचे हिशोब त्या करू लागल्या. पण कुठे हातचा चुकला त्यांना परत कळेनास झाला. ती संध्याकाळ त्यांच्या घशाशी आली होती. त्या परत आठवणींच्या गुहेत नाहीश्या झाल्या.

कोणाचही कोणावाचुन आणि कशावाचुन अडत नाही. रहाटगाड चालूच रहात. बघता बघता पोरं मोठी झाली. श्रीकांत लहाना आणि अविनाश मोठा. दोघांमधे चार वर्षाच अंतर होत. दोघांमधे पण त्यांच्या स्वभावात जमिन-आस्मान चा फरक होता. परिस्थिती छन्नी प्रत्येक मनुष्यावर निर्-निराळ्या तर्‍हेनी आकार देते. आईची होणारी सततची तक-तक आणि वडिलांची होत असलेली दुर्दशा बघुन अविनाश स्वभावाने विचारी आणि शांत झाला. घरची जवाबदारी लौकरात लौकर खांद्यावर घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असे. त्यांने आपले शिक्षण नीट पूर्ण केले. त्या काळात उठ-सुट सगळे इंजिनिअर होत नसत तेंव्हा त्याने मुंबई महाविद्यालयातून मेकानिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मुंबईलाच टाटा कंपनीत तो नोकरीला लागला होता. तो वडिलांवर गेला होता. अत्यंता हुशार आणि परिस्थितीमुळे कष्टीक. आईची काळजी त्याला सतत लागलेली असे. त्यामुळेच माईंची मदार अविनाश वर असे. श्रीकांतची काही फारशी शाश्वती नव्हती. तो लौकीक दृष्ट्या वाया गेला होता अस म्हणता येणार नाही पण निकम्मा जरूर होता. त्याने शिक्षण पूर्ण केल तरी पावलं अशी परिस्थिती होती. बुध्दु होता अश्यातला भाग नाही पण उनाडक्या करण्यातचा त्याचा बहुतांश वेळ जात असे. घरी बापाचा धाक नाही आणि आईला तो जुमानित नसे. त्याचाही आईवर जीव होता पण त्या पलिकडे आपली काही जबाबदारी आहे असे त्याला वाटत नसे एवढच. अविनाश ला नोकरी लागल्याच्या दोन वर्षाच्या आत माईंनी त्याला बोहल्यावर चढवला. गावातलीच मुलगी होती. तीनेही बी.ए. पूर्ण केल होत आणि माईंच्या शाळेत नुकतीच शिक्षिका म्हणुन लागली होती.

अण्णाच्या आजारपणाला सुरुवात झाल्यापासुन पुढल्या वीस वर्षाचा काळ इतक्या झपाट्याने गेला की माईंना फारसा विचार करायला फुरसत मिळाली नाही. सुरुवातीची देव-देवके थंडावली होती. अण्णा असेच रहाणार हे माईंनी मान्य केले होते. नवर्‍याचे सुख त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्ष सोडलीत तर कधीच लागले नाही. अण्णांचे व्यक्तीमत्व गेल्या वीस वर्षात सप्तरंग दाखवुन आता पांढरे फटक पडले होते. कुठल्याही भावनांचा लवलेश त्यांच्यात उरला नाही. फिटस मधुन मधुन येत असत. घरच्यांना नेमकं काय करायच हे पक्क माहिती होते. फिटस येउन गेल्यावर थोडं बहुत बोलणारे अण्णा अजुन गडद होत असत. परत पूर्ववत यायला दोन आठवडे लागत. पूर्ववत येण म्हणजे खायला दे किंवा चहा कर एवढ्या पूर्तीच त्यांची बौध्दीक क्षमता सिमित झाली होती. सुख-दु:खाच्या पलिकडे ते जणु गेले होते. आल्या -गेल्यांची विचारपूस नाही किंवा घरात होत असलेल्या गोष्टी मधे रस नाही. लाकडाची मूर्ती जणु घरात फिरत असे. पेपर मात्र दररोज वाचत असत. सकाळचा पेपर संध्याकाळ पर्यंत ते रात्रीपर्यंत पेपर त्यांच्या हातात असे. काय कळायच त्यात त्यांना देवच जाणे. थोडक्यात ते आहेत काय आणि नाही काय एकच होत.

दोन पोरांपैकी एक तर मार्गी लागला होता. संसारी पुरुष झाला होता. लहान्याची चिंता होती. पण अविनाश ओळखीनेच टाटाच्याच कुठल्या कारखान्यात श्रीकांतला लावण्याच म्हणत होता. रावसाहेबा शिक्षण पूर्ण कधी करतात त्यावर सगळ अवलंबुन होत. एकुण माईंच्या जीवनातील वादळ शांत होण्याच्या मार्गावर होतं. त्यांच्या शुष्क मनावर कर्तव्य पार पाडल्याचा भावनांची सावली पडत होती. खुप वर्षांनी त्यांना समाधान वाटत होत. शाळेतून घरी आल्या की त्यांना शांत वाटत असे. खुप वर्षांनी त्यांना स्वस्थता मिळत होती. अविनाशच नुकतच झालेल लग्न आणि घरात खुप वर्षांनी अजुन एका स्त्रीचा वावराने माईंच मन हुळहुळत होत. लौकरच नातू येणार घरात आणि घर परत खेळत होणार. नातवाला धडधाकट आई-वडिल असणार या विचाराने माईंना आनंद होत असे.

मुंबईहुन बसने अविनाश जा-ये करत असे. आणि एके दिवशी परत येतांना बस मोकळी होती म्हणुन तो पाय लांब करून झोपला. रात्रीची वेळ होती. अविनाश घरी उशीरा येत होता. बस वेगाने जात होती. मधेच कोणी तरी आल म्हणुन चालकाने करकचून ब्रेकस दाबले. अविनाश गाढ झोपला होता तो सीटवरून घसरला आणि त्यांच डोक दाणकन विरूध्द दिशेच्या सीटच्या लोखंडी भागाला आपटले. निमिषार्धात सगळ घडल आणि झोपेतच काही कळायच्या आत अविनाश मृत झाला. बस-चालकाला सुध्दा काही कळल नाही. बस जेंव्हा डेपोत गेली तेंव्हा हा कोण वेडा-वाकडा माणुस पसरलाय म्हणुन बस चालक बघायला गेला तेंव्हा सगळ त्याच्या लक्षात आला. सकाळी नेहमी सारखा कामावर गेलेला अविनाश फक्त देहरुपीच परतला.


काळ कुणासाठी थांबत नाही अस म्हणतात. न थांबायला काळाला जायच तरी कुठेय? काळ पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. तो तसाच असतो. स्थिर, चिरंतन चिराकाल. पुढे रेटत जात ते माणसाच घोंगड. दुसरा पर्यायही नसतो. दैव फासे खेळायला बसवतो पण फासे फक्त दैवच टाकत. फक्त भोगण आपल्या हातात असत. माईंच्या मनात असल्या काहीश्या विचारांचा फडफडाट होत होता. पण मग त्या निश्चयाने उठल्या. आधी डाव उलटला तेंव्हा त्यांनी हार मानली नव्हती आणि आत्ताही त्या धडाडीनेच पुढे जाणार होत्या. सुनेला सावली देणार होत्या. त्यांनी मनात पुढचे आराखडे बांधायला सुरुवात केली. तीचं शिक्षण कस पुढे चालू करायच. तिचा जीव कसा रमवायचा. कधीही न भरणार्‍या जखमेवर हात ठेउन त्या पुढे जाणार होत्या. त्यांच्याकडे अजुन कुठला पर्यायही नव्हता.

1 comment:

TEJAS THATTE said...

This reminds me of 'Va.Pu.Kale'