10/4/07

वामकुक्षी

आजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंदोलन (आ.आ.) ईत्यादी विशेषणं जरी 'उद्योगी' लोकांनी दिली असली तरी दुपारच्या झोपेचे आवश्यकता हळु-हळु लोकांस कळु लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील प्रतिष्ठित वर्तमानाचे पत्रकार चक्क आज उपस्थित आहेत. असो.
आज मी माझ्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे या आंदोलनाचा आरंभ कसा झाला हे आपल्या पुढे मांडु इच्छीतो.

मला लहानपणापासुनच वामकुक्षीची फार आवड होती. वामकुक्षी म्हणजे डावा हात डोक्याखाली ठेउन उपभोगलेली दुपारची झोप. डावा हात दुखु लागला की उठायच. साधारतः २० ते २५ मिनिटांनी हात भरुन येतो. मजबुत हात असतील तर जास्त वेळ झोपता येत. बरेच लोक याच कारणासाठी व्यायाम करतात. मी मात्र व्यायामाच्या भानगडीत फारसा पडलो नाही. मला तशीच बिना-उशीची झोपायची सवय आहे. अगदी रात्रीसुध्दा मी उ(र्व)शी घेत नाही. त्यामुळे झालं काय की माझी दुपारची झोप अर्धा-पाउण तासाहुन अधिक होऊ लागली. थोडक्यात, दुपारी झोपण्याचा सराव मी बालपणापासुन करतोय.

लहानपणी कोणी काही म्हणायचे नाही. शाळेत जाउ लागल्यावर मात्र पंचाईत होऊ लागली. अहो, रात्रीची झोप परवडली पण दुपारचं जागरण नको. मागल्या बाकावर बसुन झोपणे किंवा पुस्तक वाचण्याचे नाटक करत कपाळवर हात ठेउन झोपणे इत्यादी युक्त्या मीच शाळेत रुढ केल्यात. तसाही मी फारसा हुशार नव्हतोच त्यामुले माझ्या वामकुक्षीचा प्रगतीपुस्तकावर परिणाम जाणवला नाही. शेवटी, एक तर सकाळी साडे सातला उठायचे मग आई सांगेल ती कामे करायची, थोडा अभ्यास करायचा, मग शाळेत सायकल मारत जा, संध्याकाळी परत तोच प्रकार, इतकी कष्ट करुन दिवस रेटायचा तरी कसा? दुपारी थोडी झोप मिळाली की दहा वाजे पर्यंत दिवस कसा छान जातो. पुढे माझा झोपेचा अभ्यास वाढत गेला. रात्री ११ वाजता झोपायचे असल्यास किती वामकुक्षी लागते, १२ वाजता तर किती, १ पर्यंत जागयचे तर किती वेळ, असे माझे आराखडे मी पक्के केलेत. अर्थात, एक वाजे पर्यंत जागाण्याची कोणावर नौबत येउ नये. शेवटी, दुपारची झोप परवडली, रात्रीचे जागरण नको हे सुध्दा तितकेच खरे.

माझ्या शाळेत डुलक्या काढण्याच्या युक्त्या नेहमीच यशस्वी होत नसतं त्यामुळे शिक्षकांनी बरंच छळले. पण घरचेही काही कमी नव्हते. शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी माझ्या वामकुक्षीवरच बंदी आणली. मला झोपण्याचा रोग झालाय असले नाना आरोप सुध्दा लावलेत. शेवटी मी तिथे जाउन निवांतपणे बसायचो. पण उकिडवे-कुक्षी फारशी कधी अंगी लागली नाही. कॉलेज मधे प्रवेश घेतल्यावर मात्र हुश्श झाल. घरच्यांचा त्रास नव्हता व कॉलेजला त्रास द्यायचा नव्हता म्हणुन कॉलेज मागच्या वनराईचे मी बरेच 'परीक्षण' केले. कॉलेज मधला मुक्काम थोडा वाढला कारण माझ्या वामकुक्षीच्या वेळेसच नेमका गणिताचा पिरेड असे. असो.

मला माहिती आहे की येन-तेन प्रकाराने आपण सर्वांनी हा त्रास भोगलाच असेल पण झाल-गेलं गंगेला मिळाल. आता मात्र अजुन त्रास सहन करायचा नाही. अहो, नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत बरच काम असत. थोडी झपकी घेतली त्या दरम्यान तर त्या साहेबाचं काय जातय? व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही? थोडी पुढे-मागे का होईना पण कामं तर होतायत ना. आपणास माहिती नसेल पण इटली व फ्रांस सारख्या प्रगत राष्ट्रांमधे सुद्धा दुपारच्या झोपेची खास सुट्टी असते. त्यांस 'सिएस्टा टाईम' असे म्हणतात. आता, आपण जर का इतर बाबतीत पश्चिमी राष्ट्रांची नक्कल करु पहातो तर वामकुक्षीबद्दल इतकी उदासिनता का?


अंतरीच्या या दु:खाला वाट मात्र कुठे मिळत नव्हती. बालपणी घरच्यांचा त्रास आणि आता साहेबाचा. या दरम्यान आई-वडिलांनी अलगदपणे मला बायकोच्या हवाली केल. रविवारच्या झोपेचाही बर्‍याचदा काथ्याकुट होतो. आताशा एक तर कुटुंब काम सांगत किंवा पोट्टी उच्छाद मांडतात. ऑफिसमधे माझ्या सारखी अजुन बरीच समदु:खी भेटलीत. मनं मोकळ करायला अजुन जोडीदार मिळालेत. मग आम्ही आळी-पाळीने झोपु लागलोत. पण साहेबांचा चांगलाच दरारा होता. जागरणांनी व साहेबाच्या भीतीने माझी फार तारांबळ उडु लागली. मला झोपेत जागरणाची आणि जागेपणी झोपेची स्वप्ने पडु लागलीत. एकदा तर गाडी चालवतांना मागच्याने हॉर्न वाजविला तर मी हिला विचारले की घड्याळाचा गजर असा का वाजतोय ते!

शेवटी अघटित घडलंच. आमचा हाकाट्याच नेमका झोपी गेला आणि जोशी, साहेबाच्या तावडीत सापडलेत. ऑफिसमधे दहशतीचे वातावरण पसरले. साहेबांनी, जोशींना चक्क काढुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणा नंतर आम्ही संघटित होण्यास सुरुवात केली व या आंदोलनाचा जन्म झाला. बिन-सरकारी कार्यालयांमधील मंडळीसुद्दा हळु-हळु या आंदोलनात सामिल होऊ लागलित. त्यांची परिस्थिती आमच्याहुन केविलवाणी आहे.

आमचं म्हणणे सरळ सोट आहे. सगळ्यांनी वामकुक्षी घ्यावी असा आमचा आग्रह नाही. पण आम्ही घेतो तर आम्हांस विरोध करणेही बरोबर नाही. आमच्या मागण्या फार कमी आहेत. निदान ३३ मिनिटांची वामकुक्षीसाठी सुट्टी व वामकुक्षी घेण्यास आरामखुर्च्या एवढेच आम्ही मागतो आहोत.

आपण सगळ्यांनी मिळुन आवाज लावला तर आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा माझा विश्वास आहे. एवढे बोलुन मी माझी गाथा संपवितो. धन्यवाद.
वामकुक्षी आंदोलनाचा विजय असो.......विजय असो......


ऑ...ऑ......
"अहो, उठा. मनाची नाहीच तरी जनाची लाज बाळगा. ऑफिसात बरी झोप लागते तुम्हाला. कोण दिसतय स्वप्नात? रंभा उर्वशी का?"

"माफ करा साहेब. काल थोडं जागरण झाल म्हणुन......"

1 comment:

sumedha said...

blog is 2gud.vamkukshi baddal mala pan agadi asach vatat.