10/19/07

गोड-लिंब

"या ताई. बसा आरामात. झालाच माझा स्वयंपाक" जोशी बाईंनी सुधा ताईंच स्वागत केलं.

"होऊ दे तुझ आरामात. मला कसली घाई नाहीया"

"यंदाच्या १०वीच्या वर्गातील विद्यार्थी कसे आहेत? किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी विचारलं. सुधा ताईंनी लगेच उत्तर दिल नाही. काय उत्तर द्यावे याचा जणु त्या विचार करत होत्या.

"किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी परत विचारले.

" अगं, शिकवण्या सुरु झाल्या नाहीयात. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी दिली. आजकाल तर ९वी च्या परीक्षे आधीच १०वीचे वर्ग सुरु होतात. मुर्खांचा बाजार भरत चाललाय. मी मुलांना सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे मजा करा, जुन महिन्यात १०वीचा नारळ फोडुया."

थोडं खिन्न हसुन पुढे म्हणाल्यात "तशीही यंदा फारशी मुलं नाही आलीत." सुधा ताईंच चित्त काही थार्‍यावर दिसत नव्हत.

"तुला काही मदत हवी आहे का? मी पण अगदी वेळेवर आले. लौकर येणार होते पण शेजारच्या मारवाड्याने उच्छाद घातलाय."

"मारवाडी?" जोशी बाईंनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

"शेजारच्या केळकरांचा प्लॉट विकला गेल्याच कळल नाही का तुला? प्लॉट रिकामा होता तर मी तिथेही बरीच झाड लावली होती. पण नवीन मालकाने एकाच दिवसात सगळ साफ केलं." मग खिडकी बाहेर शुन्यात नज़र टाकुन त्या पुढे म्हणाल्यात " एवढच नाही तर त्याच्या प्लॉटवर डोकवणार्‍या माझ्या पेरुच्या आणि आंब्याच्या फांद्याही छाटल्या त्याने"

जोशी बाईंना काय बोलाव सुचेना. उगाचच काहीतरी बोलायच म्हणुन जोशी बाई सुधा ताईंना झाडांबद्दल माहिती विचारु लागल्यात.

तेवढ्यात अनिरुध्द जोरात दार आपटुन घरात आला. "आई....भुकेनी मरतोय मी, जेवायचं झाल का?" असं ओरडत तो दाण-दाण उड्या मारत न्हाणीघरात रवाना झाला.

" अरे, हळु. तु घरात आल्याच सगळ्या गावाला कळायला नकोय" जोशी बाई ओरडल्या.

सुधा ताई आज सवाष्ण म्हणुन जेवायला आल्या होत्या. म्हणुन जोशी बाईंची स्वयंपाकाची थोडी घाई होत होती. अनिरुध्दला आज आईला मदत करायची होती पण आज सकाळी बाहेर गेलेला तो आत्ता उगवला होता.

"अनिरुध्द, तुला येतांना गोड-लिंबाची पानं घेउन यायला सांगितली होती ना"

"मला वाटल की सुधा काकुच घेउन येणार आहे तिच्या बगिच्यातुन" अनिरुध्द उत्तरला.

आधीच घाई होत होती त्यातुन अनिरुध्द गोड-लिंब आणायचा विसरला बघुन जोशी बाईंचा पारा चढला. "एक काम सांगितल तर ते सुध्दा ढंगानी करता येत नाही. दिवसभर नुसत्या चकाट्या पिटायला हव्यात गावभर"

"अरे, एवढीशी पानं आणायची विसरलो तर एवढ रागवायला काय झाल? अनिरुध्द उगाच काहीतरी बोलायच म्हणुन बोलला.

"हे बघ, उलट उत्तर देउ नकोस. एक साध काम करता येत नाही तुला. कुठे होतास सकाळ पासुन, काय करत होतास? "

"राहु दे गं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालु आहेत ना त्याच्या"

" अहो, रागवु नाही तर काय करु. सकाळ-संध्याकाळ नुस्ता हुंडारत असतो. सकाळी उशीर उठायच मग नास्ता करुन मागल्या गल्लीतल्या मुलांसोबत चकाट्या पिटायच्या. दुपारचं जेवण झाल्यावर मस्त कुलर मधे ३ तास झोप कि संध्याकाळी परत वायफळ बडबड करायला मागल्या गल्लीत आमचे महाराज हजर" जोशी बाई फणकारल्या.

"बाप रे आई, इतकही काही चुकल नाहीया माझ" अनिरुध्द ने उलट उत्तर दिले.

" अरे, अनी अस आईला उलट उत्तर देउ नये. बरं तुझ्या मुंबई च्या शिबिराच काय झाल?" सुधा ताईंनी विषय बदलवायला म्हणुन विचारलं

" माहीती नाही. बाबांना विचारा." अनिरुद्धने गाल फुगवुन उत्तर दिले. मग हळु आवाजात स्वतःशीच पुटपुटला "एक तर इथे आई डोकं खाते सकाळ-संध्याकाळ" अनिरुध्दचे वाक्य पुर्ण केल नसेलच तेवढ्यातच जोशी बाईंनी त्याला फाडकन झापड मारली.

" लाज नाही वाटत तुला अस बोलायला. कुठुन शिकला असं बोलायला? बाबांची चूक आहे हां, का रे? त्यांना शंभर काम असतात. तुला एवढं जायच होता शिबिरात तर स्वत: नव्हता का अर्ज करता येतं. लिहिता येतं ना तुला, फॉर्म भरायला. आणि मी तुझं डोकं खाते ? अस बोलायची एवढी हिम्मत झाली तुझी?" सुधा ताई कडाडल्या. रागात त्यानी जोरात टप्पल मारली.

" लागतय ना मला" अनिरुध्द कळवळुन म्हणाला.

" अहो, जाउ द्या. लहान आहे अजुन. सुधा ताईंनी अनिरुध्द ची बाजु सांभाळायचा प्रयत्न करायला लागल्या.

"अनि, आईला सॉरी म्हण"

" काहीही सांगितल कि एकच उत्तर येतं. १०वीची परिक्षा आत्ताच संपली आहे. मला मजा करु दे. बघते आता कि काय दिवे लावतो १०वीत." जोशी बाईंचा राग काही आवरत नव्हता. त्यांनी अनिरुध्दचा कान ओढला.

"अहो, काय करताय. इतक रागवायला काय झाल" असं म्हणत सुधा ताईंनी जोशी बाईंचा हात धरला.

जोशी बाईंनी सुधा ताईंचा हात झटकला. "हे बघा सुधा ताई, तुम्ही याच्या मधे पडु नका. तुम्हाला काही माहिती नाही."

" का, मला स्वतःच मुल-बाळं नाही, म्हणुन अस म्हणताय का?" सुधा ताई फटकन उत्तरल्या.

जोशी बाईंना काय उत्तर द्यावे कळेना. त्या नुसत्या अचंबित नजरेनी बघत राहिल्या.

"कळत मला. तुमचा संसार भरलेल आणि मला मेलं एक सुध्दा पोरं नाही. म्हणुन तुम्हाला वाटत कि मला पोरं कशी मोठी करायची हे माहिती नाही. पण पोरांकडे लक्ष द्यायच सोडुन तुम्हे दिवसभर नोकरी करता आणि मग अपेक्षा करता कि मुलं शिस्तित रहावी म्हणुन. कस शक्य आहे ते?" खोलीत विचित्र शांतता पसरली. अनिरुध्दला कळेना मधुनच हे काय सुरु झालं म्हणुन.

जोशी बाईंना जणु अजुन शब्दांचा संदर्भ लागत नव्हता.

" आई, सॉरी. मी कधी परत अस बोलणार नाही" अनिरुध्द म्हणाला.

पण सुधा ताई काही थांबण्याच्या नादात नव्हत्या. खुर्चीत बसत त्या म्हणाल्या " इतकी वर्ष बघतेय मी, सोन्यासारखी मुलं आहेत. पण तुम्ही सतत त्यांची काळजी करता आणि त्यांना रागवत असता. तुम्ही त्यांच संगोपन करण्यात कमी पडत असाल तर त्याचा राग मुलांवर कशाला काढायचा" " अहो, काय बोलताय तुम्ही" जोशी बाई सुधा ताईंचा हा नवीन अवतार बघुन चकित झाल्या. सवाष्ण म्हणुन सुधा ताई जेवायला आल्य होत्या. पण आज अनिरुध्दला रागवण्याच निमित्तमात्र झालं व इतकी वर्ष साचत असलेल्या व्यथा खपली निघुन जखमेतुन रक्त वहाव्यात तश्या वाहु लागल्या.

" मी किती तरी वेळा आडुन-आडुन सांगण्याचा प्रयत्न केला की थोड मुलांच्या कलेनी घ्या म्हणुन पण मी काय बोलतेय याकडे तुमच लक्ष असेल तर शप्पत. माझ्याशी नेहमी सहानभूती वागण्याच नाटक करता. जणु काही मला पोरं नाही हे सतत दर्शवायच असत तुम्हाला. दोन पोरं आहेत हे मिरवता माझ्या समोर. तुम्हाला बागे बद्दल मुळीच आकर्षण नसत पण तरी तुम्ही मला खोटे प्रश्न विचारत असता." सुधा ताई स्वगत बोलत असल्या सारख्या बरळत होत्या.

"माझ पण नशीब किती फुटक असाव. केळकरांचा प्लॉट ज्यांनी विकत घेतला त्यांनी मी लावलेली सगळी बाग उध्वस्त केली. एवढच नव्हे तर माझ्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाच्या, त्यांच्या प्लॉट मधे येणार्‍या फांद्या ही तोडुन टाकल्या. तुम्ही मुलां मधे जितका जीव लावत नसाल तितका जीव मी झाडांमधे लावते त्याच मला हे फळ मिळत. आणि तुम्ही एवढी सोन्या सारखी मुलं आहेत तर त्यांना एवढ रागवता." एवढ बोलुन सुधा ताई रडायला लागल्यात. मग एकदम आवेशात येउन त्या म्हणाल्या की 'देव पण ज्यांची लायकी नसते त्यांना भर-भरुन देतो" व तरा-तरा चालत निघुन गेल्या.

जोशी बाई आघात झाल्या सारख्या मट्कन जमिनी वर बसल्यात. त्यांचा विश्वासच होईना कि इतकी वर्ष हि बाई आपली शेजारीण आहे. मी त्यांना नेहमी मोठ्या बहिणीचा मान दिला आणि ती आपल्या बद्दल हा विचार करते. हे सगळ प्रकरण रागाच्या पलिकडे गेल होत. त्यांना धड रडु ही येइना. अनिरुध्द आईचा हात हातात घेउन तीच सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला.

No comments: